आणि मग सप्टेंबरचा तो दिवसही आठवतो...

20 वर्षांपूर्वी : लाईफ येता-जाता...

फोटो सौजन्य: Wikicommons

न्यू जर्सीतले बरेचसे चाकरमाने न्यूयॉर्कला रोज बसनं अपडाऊन करतात. एके काळी मीही त्याच पंथातला होतो. दिवसातले अडीच-तीन तास बसप्रवासात व्यतीत व्हायचे. पुस्तक चाळताना, टीव्ही बघताना काही संवाद, प्रसंग किंवा पात्रं जशी उगाचच लक्षात राहतात तसंच काहीसं या प्रवासाबाबत झालं. काही व्यक्ती, काही प्रसंग, काही दृश्यं स्मृतिपटलावर चिकटली. रोजच्या प्रवासाचा कंटाळा त्यामुळे बराच सुसह्य झाला.

घरून बसस्थानकावर कारनं जायचं, तिथे कार पार्क करायची आणि बस पकडायची... म्हणून बसस्थानकाला ‘पार्क अँड राईड’ असंही म्हणतात... पण काही नशीबवान लोकांना कुणीतरी सोडायला आणि घ्यायला यायचं. कधी बायकोला नवरा सोडायचा तर कधी प्रियकराला प्रेयसी घ्यायला यायची. या वेळी अमेरिकन रितीनुसार निरोपादाखल चुंबनाचं आदानप्रदान व्हायचं. असं सोडायला येणाऱ्या गाड्यांचा थांबा वेगळा असतो आणि त्या थांब्याला ‘किस अँड राईड’ म्हणतात. 

ख्रिस गेस्टन हा ‘किस अँड राईड’वाला होता. त्याची प्रेयसी त्याला रोज सोडायला आणि घ्यायला यायची. ख्रिस तरुण असला तरी तब्येतीनं स्थूल होता. त्याच्या प्रेयसीचं त्याला खूप कौतुक होतं. बसप्रवासात त्याच्या जवळ बसलेल्या सगळ्यांना त्याची आणि जेनची पहिली भेट कशी झाली, त्यानं प्रत्येक व्हॅलेंटाईन डेला कशी अनोखी भेट दिली, त्यामुळे जेनी कशी भारावून गेली, जेनी त्याच्या डायटची कशी काळजी घेते, जेनीनं दिलेल्या सँडविचव्यतिरिक्त इतर अबरचबर खाताना किती अपराधी वाटतं, घटस्फोट घेतलेले जेनचे वडील आणि जेनच्याच वयाच्या त्यांच्या नव्या बायकोबरोबर व्हेकेशनला किती मजा आली इत्यादी घटना ख्रिसकडून इत्थंभूत वर्णन करून सांगितल्या जायच्या.

ख्रिसबरोबर बसायला मजा वाटायची. त्याच्या बडबडीत वेळ पटकन निघून जायचा. काही दिवसांनी तो बसमध्ये यायचा बंद झाला. एक दिवस मला उशीर झाल्यामुळे दुसरी बस पकडावी लागली आणि तो येताना दिसला. वजन वाढलं होतं. त्यानं ओळख दाखवली नाही. असो... एक गोष्ट मात्र खटकली. ख्रिस आता पार्क अँड राईडवाला झाला होता. 

बसचे बहुतेक प्रवासी ठरलेले असायचे. काही प्रवाशांची नावं कळायची तर काहींना मी नावं द्यायचो. असंच मी एकीचं नाव ठेवलं होतं हेलन! कारण ती हेलनसारखीच दिसायची. असं वाटायचं की, ही कधीही उठून ‘पिया तू अब तो आजा’ गाणार. हेलन अमेरिकन चायनीज होती. अमेरिकन जास्त आणि चायनीज कमी. आपल्या काळ्या केसांना तिनं खोटा ब्लाँड रंग दिला होता. पापणीवर निळसर आयशॅडो आणि मस्कारा, ओलसर लिप्स्टीक आणि चेहऱ्यावर मादक भाव. सकाळी सात वाजताचं तिचं हे रूप रात्रीच्या धुंद पार्टीला जाण्याच्या तयारीतलं वाटायचं. तिच्या नोकरीचं स्वरूप काय असेल याबद्दल मी कयास बांधायचो. ती सेक्रेटरी असावी किंवा हॉटेलची रिसेप्शनिस्ट असावी. नाहीतर बहुतेक ती बारमधली डान्सर असावी किंवा एस्कॉर्ट सर्व्हिस देणारी... एकदा वाटलं ती कुठ उतरते ते बघावं आणि नक्की कुठे नोकरी करते याची शहानिशा करावी... पण ज्या वेगानं तो विचार मनात आला त्याच वेगानं विरूनही गेला.

एक दिवस बसस्टॉपवर दोनतीन लहान मुली दिसल्या. मग लक्षात आलं की, त्या दिवशी ‘ब्रिंग युअर डॉटर टू वर्क डे’ होता. बस सुरू व्हायच्या आधी हेलन धावत आली. सोबत तिची दहा वर्षांची मुलगी होती. या चायनीज पोरींच्या वयाचा अंदाजच बांधता येत नाही साला. हेलनच्या मुलीच्या मिचमिच्या डोळ्यांत अफ़ाट कुतूहल होतं आणि हेलन कौतुकानं तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होती. त्या दिवशी एक कळलं की, हेलन एक आई होती आणि तिची नोकरी नक्कीच अशी असावी की, जिथे ती आपल्या दहा वर्षांच्या मुलीला निःसंकोच घेऊन जाऊ शकत होती.

बसमधले काही प्रवासी नेहमीचे तर काही पाहुण्या कलाकारासारखे येऊनजाऊन असायचे. नेहमीच्या प्रवाशांमध्येच केली नावाची एक जण होती. सगळ्या बसला तिचं नाव माहित होतं. ही कृष्ण वर्णाची महिला इतकी विशाल होती की, तिला बसायला दोन सलग सीट्स लागायच्या. बिचारीला कधी-कधी दोन सीट नसल्यामुळे बस सोडावी लागायची.

दुसरा होता लँडऑफ. तो बसमध्ये ऑफिसच थाटायचा. त्याला शेजारची सीट मोकळी हवी असायची. शेजारी कुणी येऊन बसलं की तो वैतागायचा. बस मुक्कामी पोहोचेपर्यंत त्याच्या सकाळच्या सगळ्या इमेल्सना उत्तर देऊन झालेली असायची. खरंतर लँडऑफ आधीची बस पकडायचा... पण ती चुकली तर आमच्या बसला असायचा. तिसऱ्या रांगेतल्या डावीकडच्या सीटवर बहुतेक वेळेस चोई आणि त्याची बायको सकाळचा नाश्ता करायचे. कधी ऒल्ड पीट बस चालवायला असायचा. माणूस अतिशय प्रेमळ. सगळ्यांची चौकशी करायचा... पण तो आला की लोक वैतागायचे, कारण तो बस हळू चालवायचा. 

आजूबाजूच्या परिसरात देशी लोकांची वसाहत वाढू लागली तशी बसमधल्या देशी प्रवाशांची संख्याही वाढली. या देशी जनतेत एक होती ममता (अर्थात मी ठेवलेलं नाव). दोनतीन आठवडेच बसला होती. आलीच ती चेहऱ्यावर अवघडलेला भाव घेऊन. ममता दरवेळी बसमध्ये बेबी इज बॉर्न नावाचं पुस्तक वाचायची. एकदा तिच्यामागे बसलेलो असताना मला लक्षात आलं की, त्या चकचकीत पुस्तकाच्या आत भारतात छापलेली गुजराती पुस्तिका होती ज्यामध्ये सुमार, अस्पष्ट चित्रांमधून बालजन्माच्या रहस्याचं वर्णन होतं. शेवटी ज्याच्या-त्याच्या विश्वासाचा प्रश्न असतो. अत्याधुनिक छ्पाई आणि शास्त्रीय माहिती असलेल्या पुस्तकापेक्षा ममताला मायदेशातून आलेली ती साधारण पुस्तिका अधिक आधाराची वाटत होती. कदाचित ते पुस्तक तिच्या आईनं दिलं असावं. अँड दॅट मेक्स ऑल द डिफरन्स.

दुसरा लक्षात राहिलेला देशी होता कन्ना चेरबूल. कृष्णवर्णीय माणूस. बसमध्ये बसला की आधी पोथी वाचायचा आणि मग मोबाईलवरून टणटणीत आवाजात असं संभाषण चालू करायचा की, सगळी बस परेशान व्हायची. तो काय बोलतो आहे हे कळलं असतं तर कदाचित एवढा त्रास नसता झाला... पण बसमधल्या फार कमी लोकांना त्याची भाषा कळायची. त्याच्या टणटणीत आवाजानं डोक उठायचं. प्रवासी खूप दिवस सहन करत राहिले. देशी असल्यामुळे मला उगाचच अपराधी वाटायचं. शेवटी एक दिवस बसमध्ये ठळक पाटी लागली. इमर्जन्सी असल्याशिवाय मोबाईल वापरू नये. अर्थात त्या पाटीचं कन्नाला सोयरसुतक नव्हतं. त्याचा संवाद त्याच जोमानं सुरू राहिला... पण मग एक दिवस एका प्रवाशानं ती पाटी दाखवून कन्नाला हटकलं. नेमका त्या दिवशी कन्ना अपघातात सापडलेल्या त्याच्या बायकोशी बोलत होता. तो प्रवासी खजील झाला... पण त्या दिवसानंतर कन्नाचा टणटणीत स्वर मंदावला.

बसच्या आत जसं एक विश्व होतं तसंच बसच्या खिडकीबाहेरही एक अनोखं विश्व होतं. न्यू जर्सी टर्नपाईकवर धावणाऱ्या बसच्या खिडकीतून वेगवान आयुष्याची अनोखी प्रचिती यायची. बारा लेन्सच्या हायवेवर वाहनांचा प्रचंड ओघ, उड्डाणपुलावरून जाणारी एअर ट्रेन, दूरच्या पुलावरून जाणारी पाथ ट्रेन, एका बाजूला एलिझाबेथ पोर्टवर शिरणारं मालवाहू जहाज, तर दुसरीकडे निवार्कच्या (न्यू जर्सी राज्यातील एक शहर) विमानतळावरून विमानांची एकामागून एक होणारी उड्डाणं. एका दृष्टिक्षेपात गतीची विविध रूपं डोळ्यांपुढे झळकायची. कधी त्याच बसच्या खिडकीतून दिसायचा चक्का जाम. रस्त्यावर दूरवर खिळलेली वाहनं. वाहनांतले अस्वस्थ, हतबल प्रवासी आणि उतरण्याची वाट पाहत आकाशात ताटकळलेली विमानांची रांग.

याच खिडकीतून ऋतुचक्राचं विविधअंगी दर्शन व्हायचं. हिवाळ्यात मिठाच्या चिखलात लडबडलेले रस्ते दिसायचे, तर कधी पिठीसाखरेसारखा पसरलेला बर्फ. वसंत ऋतूत हिवाळ्यात हाडाची काडं झालेल्या झाडांवर नव्या चैतन्याची पालवी फुटलेली दिसायची. ग्रीष्मात हिरवळीची श्रीमंती दिसायची आणि दिसायचं चकचकीत, निळसर, निरभ्र आकाश.

सप्टेंबरचा असाच एक दिवस होता आणि आकाश चकचकीत, निळसर निरभ्र होतं. आकाशात चमकणारं विमान होतं. बसनं टर्नपाईक ओलांडलं आणि ती लिंकन टनेलमधून मिडटाऊन मॅनहॅटनमध्ये बाहेर पडली. डुलकी काढणारे जागे झाले.

आज काहीतरी वेगळं होत होतं. काय ते कळेना... पण काहीतरी वेगळं होत होतं हे नक्की. रस्त्यावरून फायर इंजिन्स किंचाळत डाऊन टाऊनच्या दिशेनं सुसाट धावत होती. बसमधल्या एकानं माहिती दिली की, वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान आदळलं. प्रवाशांमध्ये थोडी कुजबुज झाली. बस ड्रायव्हरनं सांगितलं की, बस नेहमीच्या थांब्यापासून अलीकडे थांबेल. मी बसमधून उतरून चालतच ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसच्या खिडकीतून वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर्स स्पष्ट दिसत होते. एका टॉवरमधून प्रचंड धूर येत होता. तेवढ्यात अचानक एक विमान आलं आणि त्यानं दुसऱ्या टॉवरला धडक दिली. हा अपघात नव्हता. हे काहीतरी भयंकर हादरवणारं होतं. ऑफिसमध्ये हलकल्लोळ माजला. लोक फोन करू लागले पण फोन लागेना. मोबाइल्सही काम करेनात. माझी सहकारी डोरी अचानक रडू लागली. तिच्या नवऱ्याची सकाळी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये मिटिंग होती आणि आता त्याचा फोन लागत नव्हता. भांबावलेले रडके चेहरे स्पीकरवरचे आदेश पाळत इमारतीच्या बाहेर पडू लागले. संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या दिवसाची सुरुवात झाली होती…

त्या दिवशी परत येताना बस नव्हती. नंतर कित्येक दिवस त्या घटनेचे पडसाद उमटत राहिले. एक दिवस बसमधून रात्री परत येताना खिडकीतून पाहिलं. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागी खोल विवरातून आकाशाला भिडणारे दोन प्रकाशझोत दिसत होते. 

काही दिवसांनी माझी नोकरीची जागा बदलली आणि माझं बसमधून येणंजाणंही सुटलं. कधीकधी बसमधली माणसं आठवतात, काही प्रसंग आठवतात आणि मग सप्टेंबरचा तो दिवसही आठवतो... आणि मग बसबद्दल बाकी काहीच आठवत नाही.

- राजीव भालेराव
rajivpost@gmail.com
(लेखक, मागील दोन दशके अमेरिकेत स्थायिक असून, सध्या महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) या संस्थेचे अध्यक्ष आहेत.)

Tags: राजीव भालेराव अमेरिका बस प्रवास वर्ल्ड ट्रेड सेंटर Rajiv Bhalerao America Bus Journey World Trade Center Load More Tags

Comments:

Nanda Kulkarni

Eaka thararak prasangache varnan

Add Comment