टिपेश्वर अभयारण्य: एक थरारक अनुभव (पूर्वार्ध)

 5 जून - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त...

फोटो सौजन्य - विनीत श्रीवास्तव | indiawilds.com |

यवतमाळ शहरापासून 61 कि.मी. अंतरावर असलेले ‘टिपेश्वर अभयारण्य’ वाघांसाठी प्रसिद्ध आहे. तेथील पशुपक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी जायचे असे ठरवले. पांढरकवडा गावापासून 20 किलोमीटर अंतरावर वसलेले हिरवेगार अभयारण्य. या अभयारण्याचे क्षेत्रफळ 148.62 चौ.कि.मी. असून येथे वाघ, चितळ, सांबर, काळवीट, कोल्हा, अस्वल, नीलगाय या प्रकारचे प्राणी आढळून येतात. तेथील निसर्ग उघड्या डोळ्यांनी टिपण्यासाठी जंगल सफारी करायची होती म्हणून बॅग भरली आणि जंगलाच्या ओढीने चालत राहिलो.  

‘टिपेश्वर अभयारण्य’ घोषित झाले अन् जंगलामधील ‘टिपेश्वर’ गावातील सगळी माणसं मनाविरुद्ध विस्थापित झाली पण त्यांच्या आठवणींचा मळा अजूनही फुललेला दिसून येतो. वाट चुकलेल्या पाडसासारखी मान वळवत त्यांनी स्वतःला गावकुसाबाहेर ओढत नेले पण वाढत चाललेल्या अंधाराने त्यांची वाट बंद केलेली. ‘टिपेश्वर तलाव’ पाहिला की त्यांचे डबडबलेले डोळे आठवतात. 

तिथल्या मातीच्या भिंतीत रंगीत बांगड्यांच्या तुकड्यांनी साकारलेले विविध आकार पाहून घर सावरणाऱ्या बायांच्या मनातील हळवा कोपरा मनाला घोर लावून जातो. भिंती कंबरेतून वाकलेल्या अन् मातीशी एकरूप झालेल्या. टिपेश्वर तलावातून घागरी भरून आणणाऱ्या पोरींच्या नाजूक पायांचे ठसे मातीने खाऊन टाकलेले... एखाद्या लोखंडी तुकड्यासारखेच! दुपारच्या वेळी दगडावर धुणे ठेवून पाण्यात पाय बुचकळत उद्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुलींचे बालपण वाहत्या पाण्याबरोबर जंगलाच्या बाहेर काढून देण्यात आले. मळलेल्या पायवाटेच्या घशाला कोरड पडलेली. जणू एखाद्या विषारी सापाने दंश करावा. तलावात उतरण्यापूर्वी ती पायवाट तणकटाने खाऊन टाकली. 

गावातील रस्ते बोरीबाभळींनी वाटून घेतलेले. इतरत्र कुठेही न आढळणाऱ्या बोरीबाभळी टिपेश्वर गावातून डोके वर काढू लागल्या. शाळेकडे जाणार्‍या रस्त्यावरची बोरे किती गोड! अंगणात फुलांचा सडा पडावा तसा बोरांचा सडा पडलेला. पिकलेल्या बोरांचा मंद वास तलावाकडे झेप घेई पण बोरे खाणाऱ्या पोरी कुठे दिसत नाहीत. अंगणात रांगणारी लेकरे वानरीच्या पिलांसारखी उचलून घेतली आणि सुरक्षित जागी ठेवली. मधमाशांनी डंख मारावा तसे अनेक प्रश्न मनावर आदळायचे. त्यांच्या जगण्याची झालेली वाताहत अन् गावाशी जुळलेली नाळ पाहून मन अस्वस्थ होते. अजूनही त्यांच्या अंगणातील जास्वंदीची फुले फुललेली दिसतात पण टवटवीतपणा हरवून बसलेली. इच्छा असूनही जिप्सीतून उतरून फुले न्याहाळता येत नाहीत की गावभर फिरता येत नाही. डोळे नुसते टुकूमुकू पाहून गावाचे बकालपण अधाशासारखे पिऊन घेतात. 

गावाशी जुळलेली नाळ या अर्थाने म्हणायचे की, टिपाई देवीच्या उत्सवाला ही गावगाड्यातील माणसे अजूनही न चुकता येतात पण पिंजऱ्यात बंद केलेल्या पोपटासारखीच! जी माणसे वाघांसोबत लहानाची मोठी झाली त्यांच्यासाठी प्रशिक्षित अंगरक्षक म्हणून शासनाने ठरवून दिलेली माणसे पाठवली जातात. कदाचित आजच्या परिस्थितीला अनुकूल असावे. माथणीपासून टिपेश्वरमार्गे सुन्नापर्यंतच्या आणि सुन्नापासून शिकारी रोडमार्गे माथणीपर्यंतच्या रस्त्याने वाघाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा जागोजागी अनुभवता येतात त्यामुळे पायी चालणे म्हणजे पोहता न येणाऱ्या माणसाने नदीत उडी घेतल्यासारखेच! 

टिपाई देवीचे मंदिर बांबूच्या हिरव्यागार बेटांनी झाकोळून गेलेले. डोंगराच्या मध्यभागापासून एक रस्ता गावाकडे वळसा घेतो. त्याच रस्त्याची दुसरी बाजू माथणीकडे आणि शिकारी रोडकडे वळणे घेत नाहीशी होते. अगदी सापासारखीच! ज्या बांबूच्या बेटातून रस्ता पुढे सरकतो तिथपासूनच दगडी पायर्‍यांची पायवाट वरच्या दिशेने मंदिराकडे सरकते. सुरुवातीला उजवीकडे, नंतर डावीकडे असे करत-करत देवीच्या गाभार्‍यापर्यंत सहज पोहोचता येते. पाठीमागे थोडे पाणी साचलेले. मंदिराभोवतीचा परिसर म्हणजे वाघांची आराम करण्याची जागा. 

उजव्या हाताला देवीचे मंदिर पाहतच डावीकडे वळण लागते. जिथे भीतीची काजळी पसरलेली दिसते. गाडी बंद केल्यावर तेथील भयाण शांतता खायला उठते. वन्यजीव छायाचित्रकार ‘ज्ञानेश्वर गिराम’ यांनी जंगली कोळ्यांपासून सावध राहण्याचा इशारा केला. जिथे आपल्या श्वासाचा आवाजही स्पष्ट यायचा तिथे बोलणे म्हणजे काहीतरी संकट ओढवून घेणे. तिथपासून टिपेश्वर तलावालगतच्या मारुती मंदिरापर्यंत गावपणाच्या खाणाखुणा डोळ्यांत भरत जातात. उजव्या बाजूला असलेले लहानसे मंदिर म्हणजे गावातील लेकरांचे आकर्षण केंद्र. देवळीत बसल्यासारखीच लेकरेसुद्धा आत बसायची पण आज तेथील मंदिर खायला उठते. 

मारुती मंदिरासमोर बसून समोरचा तलाव डोळेभरून पाहणारी वयोवृद्ध माणसे खाटकाच्या दावणीला बांधलेल्या जनावरांसारखीच जंगलाच्या बाहेर बाजावर निपचित पडलेली. अजूनही त्यांचे मन फूलपाखरू होऊन जास्वंदीच्या झाडांभोवती रेंगाळते. ही झाडे मरणयातना उपभोगत आहेत. काही झाडांवर एखादी कळी उमललेली पाहून तिचे एकाकी जगणे वयोवृद्ध माणसांची वारंवार आठवण करून देते. 

गावातली माणसे जंगलाच्या बाहेर फेकली गेली आणि जंगलात भटकणारे कोल्हे गावाच्या आश्रयाला आले. त्यांच्या विष्ठेतून फळांच्या बिया लवकर रुजल्या. जिथे फळांची झाडे होती तिथे बोरीबाभळींनी वाटा उचलून घेतला. काही वर्षांनी गावपरिसराचा भूभाग काटेरी बन म्हणून ओळखला जाईल पण अजूनही अनेक वस्तू जिवंत वाटतात. रस्त्यावरच्या विजेच्या तारा आणि सिमेंटचे खांब पाहून तेथील नगररचना कळू लागते. गावालगतच्या कडूलिंबाच्या झाडावर वानरांच्या टोळ्यांनी आश्रय घेतलेला. त्यांची पिलावळ सिमेंटच्या खांबावर चढून विजेच्या तारा हातात धरून स्वतःच झोके घेताना पाहायला मिळाली. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका नव्हता हे ऐकून जीव भांड्यात पडला. वन्यजीव छायाचित्रकार गणेश कुरा, राजेंद्रसिंह गौर, ज्ञानेश्वर गिराम आणि पक्षिमित्र जयंत शेळके यांच्यासह टिपेश्वर गावातील निरीक्षणे नोंदवहीत घेतली. गावाजवळून शाळेकडे जाणारा सिमेंटचा रस्ता पाहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आठवण यायची. रस्त्यात अनेक चिमण्या उतरलेल्या. जंगलात इतरत्र कुठेही चिमण्या आढळल्या नाहीत. फक्त या गावकुसाच्या आत त्या स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना गाव सोडून जावेसे वाटले नाही. 

रस्त्यालगतच्या बोरीच्या झाडाखाली बसून त्यांनी आमचा रस्ता अडवून धरलेला. जणू एखाद्या कारखान्यातील मजुरांनी आपल्या मागण्यांसाठी रस्ता अडवून धरावा तसे चित्र डोळ्यांसमोर उभे होते. त्या चिमण्या काय बरे मागत असतील? तांदूळ टिपण्यासाठी घरासमोरचे अंगण? गावालगतच्या झाडावर घरट्यासाठी जागा? शाळेतल्या मुलांसारखे रस्त्यातच धूळस्नान का अजून काही? चिमण्यांनी अजून गाव सोडला नव्हता. जशी झाडे ताठ मानेने जगण्याचा प्रयत्न करत होती तसे चिमण्यांकडे पाहून वाटत नव्हते. त्यांचे चित्त थाऱ्यावर नव्हतच मुळी. मला वाटते की, गावातल्या चिमण्या जंगलात गेल्या की त्या आदिम काळात पोहोचत असाव्यात. ‘टिपेश्वर’ गाव फक्त पाटीवर उरलेले. गावाचे जंगलात रूपांतर सुरू होते तशा चिमण्या आदिम काळाकडे सरकत असाव्यात? बायांनी तांदूळ टाकले तरी त्या अंगणात उतरायच्या नाहीत. गावाकडे येताना त्यांना भीती वाटेल. येणाऱ्या पिढीला चिऊचा घास फक्त पुस्तकातून वाचायला मिळेल. 

आमची जिप्सी चिमण्यांजवळ पोहोचताच त्या भानावर आल्या अन् गावाकडच्या बोरीवर जाऊन बसल्या. किती चिवचिवाट केला त्यांनी! वर्गात शिक्षक नसणाऱ्या पोरांसारखाच! काही चिमण्या मारुती मंदिराकडे निघून गेल्या पण त्या गावाभोवतीच वावरायच्या. त्या आदिम काळात गेल्यावर कशा दिसतील याचा विचार मनात खोलवर रुजत गेला. 

गावाकडे पाठ फिरवून तळ्याकडे एकटक पाहत होतो. सकाळपासून एक पाणकावळा पंख सुकवत माझ्यासारखा ताटकळत उभा दिसायचा. त्याच्या बाजूला काही ढोकरी भक्ष्यावर ताव मारण्यासाठी टपून बसलेल्या. पाठीमागून येणारा चिमण्यांचा आवाज पुढे ढकलण्याचा प्रयत्न करी पण मला तळ्याच्या काठावरची झाडे पाण्यात डोकावताना कशी दिसतात हे अनुभवायचे होते म्हणून मीसुद्धा झाड होऊन तळ्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करी. पाण्यात पाय सोडून बसणाऱ्या मुलींचे चित्र डोळ्यांसमोर तरळत होते. पक्षितज्ज्ञ ‘मारुती चितमपल्ली’ यांनी रेखाटलेल्या अनामिकेसारखेच. झाडाच्या मुळ्या त्या मुलींच्या पायासारख्याच पाण्यात उतरलेल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू झाडांच्या पानांवर उमटत होते म्हणून कोवळ्या सकाळी तळ्याच्या काठावरची झाडे हसल्यासारखी भासू लागली. पाठीमागून आलेल्या जिप्सीच्या आवाजाने माझे लक्ष विचलित झाले. तशी आमची जिप्सी शाळेच्या दिशेने वळली. 

शाळेची सुंदर इमारत अभयारण्याच्या कार्यालयासाठी वर्ग करण्यात आली असावी. एक लहानसे कार्यालय, एक कर्मचारी नेहमी हजर असायचा. जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना थोडी विश्रांती घेता येते. कधीकधी जंगल फिरून पोट टम्म फुगल्यासारखे वाटते. लघवीसाठी कुठे थांबताही येत नाही. तेव्हा या संरक्षित इमारतीची गरज भासते. चारही बाजूंनी जाळीदार कुंपण. गावाच्या आणि तलावाच्या मधोमध आत किंवा बाहेर पडण्यासाठी फाटक. ही इमारत म्हणजे जंगलातील विश्रामगृहच. 

विद्यार्थ्याशिवाय पोरकी भासणारी इमारत पर्यटकांनी गजबजून गेली. गाव आणि शाळेत अंतर नसल्यातच जमा. दोघांच्या मध्ये फक्त एक आडवा रस्ता परंतु पर्यटकांच्या रंगीबेरंगी कपड्यांनी या जंगलातील पशुपक्षी विचलित होऊ शकतात. त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ढवळाढवळ व्हायला नको असे मला वाटते. त्यासाठी अभयारण्यात प्रवेश करताना जंगलाशी एकरूप होणारा गणवेश (कपडे) बंधनकारक असायला हवा. जेणेकरून जंगल सफारी करताना पशुपक्ष्यांचे डोळे आपल्याकडे वळणार नाहीत. ही एक माफक अपेक्षा व्यक्त केली तर कुठे बिघडले? ‘मिरवणे’ हा शब्दप्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संदर्भ घेऊन डोकावतो. जंगलही संवेदनशील असते हे कळू लागले की पायाला लागलेले पेंड गळून पडावे तसे स्वतःचे काही विचार गळून पडतात. 

जंगलात गुण्यागोविंदाने नांदणारे ‘टिपेश्वर’ गाव अभयारण्याच्या नकाशावर ठळकपणे उमटलेले दिसते. ‘टिपेश्वर तलाव’, ‘टिपेश्वर विश्रामगृह’, ‘टिपाई देवी’, ‘मारुती मंदिर’ ही नावे सर्वांच्या ओठावर रुळलेली. जे गाव फारसे कुणाला माहीत नव्हते. जंगलाने हिरव्या पदराखाली झाकून घेतलेले मनुष्यविरहित गाव आज सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. ‘टायटॅनिक’ सिनेमातील वयोवृद्ध स्त्रीसारखी ‘टिपेश्वर’ गावातील एखाद्या वयोवृद्ध स्त्रीने अनुभवलेल्या खर्‍याखुर्‍या गावाची कथा सांगितली तर नवल वाटायला नको!

सुन्ना गेटमधून पिलखान ओढ्याकडे जाताना जंगल हळूहळू घनदाट होत जाते. जणू एखाद्या बोगद्यात प्रवेश करावा अगदी तसेच! ओढ्याच्या अलीकडे डाव्या बाजूला काही चिंचेची झाडे आकाशाला कवेत घेऊ पाहताहेत. त्या झाडाखालून काही मिनिटांपूर्वी वाघाची स्वारी निघून गेलेली. मातीवर उमटलेले पावलांचे ठसे स्पष्ट दिसू लागले. जिप्सी थांबली तशी वातावरणातील शांतता अधिकच भयावह जाणवू लागली. सगळ्यांचे डोळे यात्रेतल्या पाळण्यासारखे गरागरा फिरू लागले. माझे डोळे कधी मातीवर उमटलेल्या पावलांच्या ठशाकडे तर कधी पिलखान ओढ्यातील पाण्याकडे वळू लागले. अंधार्‍या रात्री एखाद्या घुबडाने एकटक पाहत राहावे तसा मी चिंचेच्या झाडाकडे पाहू लागलो. त्या झाडाची भीती वाटली. वादळापूर्वीची शांतता जाणवली. गवतातील पाडसासारखे... डोळे आणि कान टवकारून आम्ही बसलो. सागाच्या वाळलेल्या पानांचीही हालचाल थांबलेली. जणू काही काळासाठी श्वास रोखून धरलेला. काही दिसत नसले तरी आजूबाजूला काहीतरी असल्याची जाणीव झाली. पाखरे उगीच शांत बसत नाहीत. वाघ कुठेतरी झाडीत बसलेला असावा म्हणून तेथील वातावरणातील शांतता अधिकच गडद होती. चिंचेच्या झाडापासून डावीकडे वळलेल्या ओढ्याकडे उतार तीव्र होत गेलेला. झाडे पाण्याकडे सरकलेली. नव्हे ती पाण्याकडे झुकलेली. एखाद्या स्त्रीने घागर भरून घ्यावी तशी. काही मिनिटांचा थरार अनुभवला आणि वातावरण निवळले.

पाखरांच्या आवाजाने तेथील शांतता भंग पावत गेली. पाठीमागून काही जिप्सी आल्या अन् पिलखान ओढ्याच्या पलीकडे निघूनही गेल्या. मातीवर उमटलेल्या पायांच्या ठशांना कॅमेऱ्यात बंद करून घेतले. अजूनही ओढ्याकडची एक बाजू अर्धांगवायू झालेल्या माणसासारखी हलतही नव्हती. आम्हीसुद्धा ओढ्याच्या पलीकडील सागाच्या जंगलात प्रवेश केला. 

माथणी गेटमधून जंगलात पाय ठेवताना एकदम खोल काळ्या डोहात उडी घेतल्यासारखे अंधारून येते. सागाचे जंगल कधी पोटात घेईल हे बाहेरच्यांना कळायचेही नाही. काही मीटर अंतर पाठीमागे सोडून डाव्या हाताला वळून ‘टिपेश्वर तलाव’ किंवा ‘शिकारी रोड’कडे जाता येते. उजव्या बाजूला 50 मीटरवर एक नैसर्गिक पाणवठा असून तिथे वाघिणीचा पहारा असतो हे कळायला वेळ लागत नाही. ती सीमेवरील सैनिकासारखी गस्त घालत राहते. जिप्सी सागाच्या जंगलातून दबक्या आवाजात निघालेली. सूर्याची किरणे जंगलात घुसण्याचा प्रयत्न करू लागली. उजाडण्यापूर्वीची जंगलातील विविध रंगांची स्थित्यंतरे पाहून भारावून गेलो. नैसर्गिक पाणवठ्याजवळ गेल्यावर समोरची झाडे स्पष्ट दिसू लागली. तसे आम्ही टिपाई देवीच्या रस्त्याला वळलो. मातीचा रस्ता. एक लहानसा ओढा. पुलाखालून पाणी वाहून गेल्याच्या खाणाखुणा. डबक्यासारखे पाणी ओढ्यात साचलेले. जणू हातपाय गोळा करून बसलेले. ड्रायव्हरने अचानक गाडी थांबवली.

दोन वेळेस वाघ रस्त्यावर येऊन ओढ्याच्या दिशेने खाली उतरलेला. पिलखान ओढ्याजवळ जसा वाघाने चकवा दिलेला तसाच इथेही अनुभव आला. लहानशा ओढ्याकडे उतरण्यापूर्वी वाघाच्या पायाचे ठसे त्याच्या अस्तित्वाची ग्वाही देत आम्हाला खुणावत होते. त्या ओढ्याच्या काठाने डोळे फिरत राहिले. कुठेही मोराचे केकावणे नव्हते की चितळसांबराचा आवाज. वाघ दिसताच वानरांचा उंच स्वर जंगलभर पसरतो. तशी कोणतीही हालचाल जाणवत नव्हती. जशी वानरांची एक टोळी टिपेश्वर गावातील झाडावर खेळायची तशी या ओढ्याच्या काठाने असलेल्या झाडावर उतरलेली... ती जवळपास कुठेही झाडीत वाघ नसल्याचे सांगत होती. त्यांची पिलावळ आईपासून दूर जाऊन मस्ती करायची. खालच्या फांदीवर बसलेल्या वानरांची शेपूट ओढण्याचा प्रयत्न करत पण त्यांच्या हाताला येत नसे. त्यांची फजिती पाहून हसू आवरत नसे पण दुसर्‍याच क्षणी ही पिलावळ सरसर झाडावर जाई.

अनेक वानरांच्या शेपट्या शेवग्याच्या झाडावरील शेंगांसारख्या खाली झुकलेल्या पाहून कितीतरी वेळ तिथेच घुटमळलो. पिलांच्या शेपट्या वळवळत वर जायच्या. एकमेकांच्या शेपट्या ओढत पण प्रौढ वानरवानरीच्या शेपट्या अजूनही लटकलेल्या दिसत. कळपाचा नायक परिसराची टेहळणी करत बसलेला. आज कळपाला कोणत्या दिशेला घेऊन जायचे याचा विचार करत असावा. त्याच्या अंगावर पडलेली सूर्याची किरणे झाडावरून खाली उतरत होती. अंधाराच्या विळख्यातून सुटलेली झाडांची खोडे मोकळा श्वास घेऊ लागली. या झाडावरील वानराच्या कळपाला पाहून वन्यजीव छायाचित्रकार ‘बैजू पाटील’ यांनी ‘भरतपूर’ येथे काढलेल्या माकडाच्या छायाचित्राची आठवण येते. माकडे झाडाच्या फांदीवर एकमेकांना बिलगून झोपलेली असून त्या कळपाचा नायक डोळे सताड उघडे ठेवून धोक्याची चाहूल घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. वर्तमानपत्राने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शीर्षकाखाली छायाचित्राची दखल घेतलेली. 

टिपेश्वर तलावाकडून पिलखान ओढ्याकडे जाताना डाव्या बाजूला रस्त्यालगत चितळाचे एक पाडस ‘मंगेश पाडगावकर’ यांच्या ‘वेडं कोकरू’ कवितेतील वाट चुकलेल्या कोकरासारखेच भेदरलेले दिसत होते. त्याचा पिवळसर रंग पाहून अलगद उचलून त्याच्या कळपात नेऊन सोडावे असेही वाटले... पण ते चुकले कशावरून? धीटपणे जंगलात हुंदडत असावे... अंगणात खेळणाऱ्या बाळासारखेच पण त्या पाडसाच्या आजूबाजूला कुणीही नव्हते. त्याचा सांभाळ करणारी आईसुद्धा. ते आमच्याकडे टुकूमुकू पाहायचे. शेजारच्या झाडावर सरसर चढलेली कोवळी वेल तोडून त्याच्या गळ्यात बांधावीशी वाटली. त्याच्या पिवळ्या अंगावर वेलीची हिरवी पाने शोभून दिसतील. जिप्सीतून उतरून गुडघ्यावर रांगत त्याच्यासारखेच आपणही चालावे असे सारखे वाटायचे. ते कान टवकारून आमच्याकडे एकटक पाहत होते. इथे जागोजागी वाघाची गस्त वाढलेली हे त्याला ठाऊक नसावे. वाघ त्याला एका घासात मटकावून टाकील पण सध्या तरी तशी शक्यता नव्हती. झाडांची पाने हळुवार बोलत होती. पाडसाभोवतीचे गवत एकमेकांच्या अंगावर रेलायचे. पांढऱ्या छातीचा खंड्या किलीलीली करत पिलखान ओढ्याकडे निघूनही गेला पण पाडस अजूनही गवतातच उभे होते. त्याला आमची भीती वाटत नसावी. आमच्या मनातला भाव ओळखला असावा पण त्या पाडसाने लवकर  निघून जावे असे वाटायचे. 

पाडस निघाले की आपणही त्याच्या खुरांचा अंदाज घेत पाठलाग करायचा पण घनदाट अरण्यात त्याच्या घराचा सुगावा लागला नाही तर... आपल्याला पाहून चितळ दूर निघून जातात. वाटाड्या नसला की जंगलात हमखास वाट चुकते. कधीकधी जंगल दलदलीच्या पापुद्र्यासारखे असते. कधी पोटात घेईल कळतही नाही. उरतात फक्त बुडबुडे... ज्यांना काहीच अर्थ उरत नाही. काही वेळाने बुडबुडेही नाहीसे होऊन जंगल पूर्ववत दिसू लागते. जे आपल्याला कळतही नाही आणि दिसतही नाही. मनाच्या पातळीवर पाडसाचा पाठलाग करू लागलो. त्याने दोन्ही बाजूंचा अंदाज घेत पटकन मान वळवून उंच गवतात स्वतःला लपवून घेतले. त्याच्या चालण्याने गवताची हालचाल व्हायची. ते किती दूर गेले याचा अंदाज कळायचा. पुढे घनदाट झाडी. त्यात हरवून गेले. नव्हे त्याने मला चकवा दिला. कितीतरी वेळ झाडांमधून डोळे फिरवले पण त्याची भेट झाली नाही. 

त्याच्या डोळ्यांतली निरागसता पाहून मी फक्त त्याच्याकडे पाहत होतो. लाजाळूसारखे डोळे मिटले तरी त्याची भिरभिरती नजर मला बोलवायची. त्याच्या पिवळसर अंगावर पांढऱ्या ठिपक्यांनी जागा घेतलेली नव्हती. त्याच्या पाठीवर काळपट रेघही उमटलेली नव्हती. नुकतेच बाळसे रूप घेऊन ते जंगलभर भटकत होते. माझे मन फूलपाखरू होऊन त्याच्या मागे-मागे भिरभिरत पाठलाग करी. सागाच्या झाडांमधून त्याला न्याहाळत कळपापर्यंत जायचे. कुरणात चरणारा चितळांचा कळप पाहून पाडसाच्या वेगाने आपणही कळपात भिरभिरत राहायचे. किती मजा येईल! पांढऱ्या ठिपक्यांनी सजलेले चितळ जंगलभर मिरवतात. त्यांच्या आवडीची फळे मलाही चाखायला मिळतील पण पाडसाची आई त्याच्यावर रागावणार तर नाही? उशीर झाला की शाळेतले गुरुजी रागवायचे. पोहायला गेलो की आई मारायची. बोरे खाल्ली की भाऊ रागवायचा. तसे पाडसाला कुणीही राग-राग करू नये असे वाटते. मनाच्या कुंपणावरून वेड्यावाकड्या उड्या मारून पाडस निघून गेले. तशी माझी नजर सागाच्या झाडांमधून त्याला शोधण्याचा प्रयत्न करी पण पाडस कुठेही नव्हते. त्याने काही वेळ माझ्या मनाचा ताबा घेतलेला होता. 

पिलखान ओढा ओलांडण्यापूर्वी चितळांचा मोठा कळप चरताना दृष्टीस पडला. खुरट्या गवतावर ताव मारत पुढे-पुढे चालत असे. एक चितळ अगदी जवळच असलेल्या चिंचेच्या झाडाखाली आले. पाडसापेक्षा त्याच्या अंगावरील रंग गडद झालेला. त्याने तांबूस विटकरी रंग धारण केलेला. त्याच्यावर पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी चितारलेली. पोटाखालचा पांढरा भाग जणू बगळ्यांनी दान दिलेला. त्याच्या पाठीवरची काळपट रेघ मानेपासून शेपटीपर्यंत पोहोचलेली. त्याच्या शेपटीची हालचाल दिसत असे. ज्ञानेश्वर गिराम आणि राजेंद्रसिंह गौर यांनी त्याची भरपूर  छायाचित्रे घेतली. चितळ हळूहळू उताराच्या दिशेने निघाले. मान वळवून आमच्यावर कटाक्ष टाकला. मी त्याच्या अंगावरील पांढऱ्याशुभ्र  ठिपक्यांना न्याहाळत होतो. 

हरीण, काळवीट मोकळ्या जागेत चरताना दिसतात. तिथे चितळ आढळत नाहीत. चितळांना दाट झाडीत राहायला आवडते. जंगलाच्या बाहेरच्या बाजूला हरणांचा कळप आणि जंगलात खोलवर चितळांचा कळप मनसोक्तपणे हुंदडताना पाहायला मिळतो. चितळ  झाडांच्या विश्वासावर पाडसाला वाढवतात. वेल झाडांच्या आधाराने वाढत जाते तसे पाडसही. जंगल प्राण्यांना जोपासते तसे पोटातही घेते. ढोकरीने गिळून घेतलेल्या माशासारखे. कधीकधी जंगलातील पायवाट मृत्यूच्या खोल दरीत घेऊन जाते. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखे वापस येता येत नाही. जंगलावर प्रेम केले तरी मृत्युचा फास आवळायला जंगल विसरत नाही. त्यासाठी ‘जिम कार्बेट’सारखे जंगलवाचन करता आले पाहिजे. जसे सरड्याच्या चालण्याच्या वेगावरून त्याच्या जिवाला किती धोका आहे हे ओळखता येते तसे जंगल भटकंती करताना स्वतःच्या जिवाला कुठे धोका आहे हे कळले की आपणही ‘जिम कार्बेट’ होऊ. त्यासाठी स्वार्थी वृत्ती घरातील खुंटीला टांगून निःस्वार्थपणे जंगलात भटकंती केली पाहिजे.

अचानक चितळाने मान उंच केली तसे आम्ही उभे राहिलो. त्याच्या कानांसारखीच आमचीही अवस्था. अगदी स्तब्ध. वाळलेल्या पानांचा आवाज आला. चितळ सावध होऊन कळपाच्या दिशेने चालू लागले. एकट्या वाघालाही जास्त काळ जगता येत नाही. त्यालाही सोबती आवश्यक असतोच. कळपात राहणार्‍या प्राण्यांना एकटेपणात जास्त भीती असते... म्हणून चितळाने कळपाचा आश्रय घेतला तसे आम्ही सुन्ना गेटकडे वळलो.

- माणिक पुरी
manikpuri01021984@gmail.com

या लेखाचा उत्तरार्ध इथे वाचा.

Tags: अभयारण्य टिपेश्वर अभयारण्य माणिक पुरी जंगल सफारी jungle tipeshwar sancturay manik puri Load More Tags

Comments: Show All Comments

Mangala malve akashwani yavatmal

माणीकजी तुमचा लेख वाचला,वडील महसूल खात्यात उपविभागीय अधीकारी होते त्यामुळे गडचिरोलीत,मेळघाट येथे तिन तिन वर्ष राहण्यास मीळाले जंगल जवळुन अनुभवलेय बालपण जंगलाच्या सान्निध्यात गेलेय.खुप सुंदर शब्दात तुम्ही विस्थापित आदिवासीच्या भावना रेखाटल्या. डोळ्यात चित्र उभं राहतं. कदाचित त्यांनाही हेच सांगायचे असेल. अप्रतिम लिखाण.

डी.एम.भोयर

खुप छान लेख मला माझे बालपण आठवले कारण मी जवळच्याच बोथ येथील रहिवासी आहे व बालपणी मी अनेकदा टिपेश्वर आणि टिपाईला जात होतो

Hemraj Punamchand Patil

अप्रतीम लेखन...जंगल भटकंती अनुभवली.

Dattaram Jadhav.

हा लेख वाचून तेथील वनसंपदा आणि परिसर समजला.

Madhav Gavhane

लेख वाचताना प्रत्यक्ष जंगल बघितल्या सारखे वाटत होते.गावाच्या आठवणी वाचताना मनाच्या पटलावर दुःखाचे चरे पडल्यासारखे वाटते. लेख अप्रतिम आहे.

Satish khandagale

खूपच अप्रतिम लेखन.प्रत्यक्ष जंगलात फिरत असल्याचा भास झाला.सर्व घटना डोळ्यासमोर घडत आहे असे वाटत होते माणिक.I am proud of you

Anil Uratwad

खुप मस्त लेख .............

SHIVAJI PITALEWAD

मनापासून आभार! जणू अभयारण्यात प्रवेश केला होता आणि जंगल, प्राणी ,टिपेश्वर वासी जाणवत होते.

विष्णू दाते

चपखल वर्णन जंगलाचे! ज्यासाठी मानव झाला विस्थापित!!

Add Comment