टिपेश्वर अभयारण्य: एक थरारक अनुभव (उत्तरार्ध)

5 जून - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त...

सौजन्य: www.tipeshwarswildlife.com

सकाळी सहा वाजताच माथणी गेटमधून जंगलात प्रवेश केला. पायांखालची अंधाराची घोंगडी झटकून बाजूला केल्यामुळे जंगलातील स्पष्टता अधिकच वाढली. डोंगरावरील झाडे अंघोळ केल्यासारखी उजळलेली दिसत होती. सूर्यकिरणांमुळे पिवळसर रंग धारण करून खोलगट भागातल्या झाडांना हिणवत असल्यासारखी दिसायची. जणू गोऱ्या आणि काळ्या सवतींमधील खुणशीपणाच! टोई पोपटांच्या काही आकृत्या निळाईतून उतरून वाळलेल्या झाडावर अवतरल्या. त्यांच्या आवाजाने जंगल बोलते झाले.

मी आणि ‘जयंत शेळके’ उजव्या बाजूचे जंगल डोळे भरून पाहत होतो. सागाची उंच झाडे आकाशाला भेटण्यासाठी निघालेली. त्यांना कोण अडवणार? कधीकधी ती सगळी झाडे रांगेत उभी असल्यासारखी दिसत त्यामुळे खोडापर्यंतचा भाग अधिक स्पष्ट दिसायचा. तेवढ्यात वाघिणीने एका दगडावरून दुसऱ्या दगडावर उडी घेतली. तिची शेपटी वरच्या दिशेने वळली. ड्रायव्हरने गाडी थांबवली. गाडी हळूहळू पाठीमागे घेतली पण वाघीण पुढे निघून गेली. बसस्थानकावरील चुकामूक झालेल्या मित्रांसारखी आमची अवस्था झालेली. माथणी गेटसमोरील जंगलाचा परिसर त्या वाघिणीच्या मालकीचा होता. तिथे रानडुकरासह मोरांनाही मनसोक्तपणे फिरण्याचा अधिकार नव्हता. करकोच्यांना नैसर्गिक पाणवठयाच्या काठावर उतरण्याची परवानगी नव्हती. त्या जंगलातल्या परिसराची जणू ती राणीच! 

आम्ही वाघिणीच्या मागावर होतो. ती जंगलातल्या झाडोऱ्यात हरवून जायची. माझ्या डोळ्यांसमोर पानांची हिरवी चादर अडसर म्हणून आडवी यायची. धुक्यासारखी लवकर निवळणारही नव्हती. आम्ही ठरवून दिलेल्या जंगलवाटेने गोगलगायीच्या गतीने निघालो पण वाघीण वाकड्या वाटेने निघून जाई. ती पुन्हा रस्त्यालगत दिसलीच नाही. 

तीन वर्षांपूर्वी शिकारी रोडवर वाघाला पाहण्यासाठी झालेली गर्दी अजूनही आठवते. पाणवठ्याच्या बाजूने तो राजासारखाच चालत होता. वन्यजीव छायाचित्रकार ‘विजय ढाकणे’ यांनी त्याला कॅमेऱ्यात टिपले. त्याच्या पावलांची बोटे मातीवर उमटलेली. जणू धूळपाटीवर कोरलेली अक्षरेच! मातीवर उमटलेली बोटांची गोलाकार नक्षी पाहून जंगलवाचन करायला शिकलो. अंगावरील काळे पट्टे गुडघ्यापर्यंत पोहोचलेले. तांबूस विटकरी रंगाची फर अंगावर घेऊन मिरवतो. त्याच्या चालण्यातील ऐटदारपणा पाहून आपणही थक्क होतो. तो काही वेळासाठी रस्त्यावर येऊन जंगलात दिसेनासा झाला पण त्याची आकृती डोळ्यांत साठून राहिली. आज तो नर टिपेश्वर अभयारण्याची देखभाल करतो. तो जंगलातील ढाण्या वाघच! त्याला शिकारी रोडवर पाहिले तेव्हा मास आलेले नव्हते पण आज अंगावर मूठभर मास चढलेले पाहून आनंद होतो. 

माणसाच्या स्वार्थीपणाच्या बरबटलेल्या भाषेपेक्षा मला जंगलाची मूकभाषा अधिक जवळची वाटते. रानवाटेवरील खाणाखुणा पाहून सांकेतिक भाषा कळू लागते. टिपाई देवीच्या रस्त्याने बांबूच्या बेटातून चालताना झाडांची पाने कातरल्यासारखी दिसतात. तेथील शाकाहारी प्राण्यांच्या अधिवासाची कल्पना येते. तिट्याजवळील नीलगायीच्या लेंड्या पाहून कळपाची चाहूल लागते. पिलखान ओढ्याजवळील कुरणात चितळांच्या आठवणी माना वर उचलतात. टिपेश्वर तलावाजवळील पाण्याच्या दिशेने उतरलेल्या सगरी पाहून विविध प्राण्यांच्या पायांची ओळख पटते. रानडुकरांनी घातलेला धुडगूस नजरेतून सुटत नाही. रस्त्यावर येऊन गेलेल्या वाघाच्या पावलांचे ठसे पाहून काही काळासाठी मुकी झालेली रानवाट खूप काही सांगून जाते. डोंगराच्या पायथ्याला साळिंदराच्या बिळाकडे जाणाऱ्या लहान चोरवाटा दिसल्या की शाळकरी मुलांनी बोरे खाण्यासाठी तयार केलेल्या चोरवाटा आठवतात. फाटलेल्या खिशातून कुठे-कुठे बोरे गळून पडावीत तसे साळिंदराचे काटे गळून पडलेले दिसतात. रानउंदराच्या चोरवाटा त्याहूनही वेगळ्या. या रानउंदरांना सापाने गिळून घ्यावे तशा जंगलातील रानवाटा उघडपणे खूप काही गिळून घेतात. डोळे उघडे असले तरी काळाची गरुडाची झेप सशाच्या अंगावर अलगदपणे उतरते. जंगल त्याच्याकडेही डोळेझाक करते. अनेक घटना जंगलाच्या पोटात सामावतात.

पिलखान ओढ्याजवळून टिपेश्वर तलावाकडे जाताना वाटेतच कोपामांडवी आणि येदलापूर फाटा लागतो. तिथे जंगलाचे रूप अधिकच भयावह दिसते. डोंगराची पायवाट चढताना डोक्यावर उसाची मोळी असल्यासारखे वाटते. उतारावरून दगड घरंगळत जावेत तशी पिंडरीतून निघालेली कळ खाली ओढून घेते. रानम्हशीसारखे मटकन खाली बसले की मेचकीतल्या ताठरलेल्या शिरा ताणल्या जातात तेव्हा मेचकीतली कळ सणसणत डोक्याकडे सरकते.

येदलापुर कक्ष क्र. 110 आणि 115 या भागांतील बांबूच्या बेटातील वेगळेपण नजरेला भुरळ घालते. रस्त्याच्या डाव्या बाजूने या बेटांनी मोठा घेर धारण केलेला होता. ही बांबूची बेटे रातोरात भसकन जमिनीच्या वर येत असत. हळूहळू जंगल पादाक्रांत करणाऱ्या दिशेने वाटचाल सुरू आहे असे वाटते. जणू अलेक्झांडरच! पण बांबूचा पाडाव करणारी अनेक झाडे या जंगलात जागोजागी विखुरलेली आहेत हे त्यांना माहीत नसावे. कक्ष क्र. 110च्या परिसरात एक पाणवठा तयार केलेला असून तिथे वन्यप्राण्यांचे निरीक्षण करणे सोपे जाते. 

डॉ.आनंद देशपांडे आणि धनंजय गुट्टे यांनी पिलखान ओढ्यात वाघ पाहिल्याचे सांगितले. उजव्या बाजूला असलेल्या झाडीतून खाली उतरत वाघाने ओढ्यातील पाण्यात प्रवेश करून पाणपाखरांना हुसकावून लावले. ती पाखरे उघड्या झाडावर रेंगाळली. तसा वाघ नाल्याच्या मधोमध आला. पाण्यातील प्रतिबिंब पर्यटकांना खुणावत होते. त्याच्या पोटापर्यंत पाणी पोहोचलेले. अर्धी शेपूट पाण्याखाली गेलेली. तो हळुवारपणे पुलाच्या दिशेने सरकत होता. डॉ.आनंद देशपांडे यांनी पिलखान पाणवठ्यात काढलेल्या छायाचित्राला परभणी येथील दैनिक पुण्यनगरी वर्तमानपत्राने प्रसिद्धी देऊन या अभयारण्याची वेगळी ओळख करून दिली. वन्यजीव छायाचित्रकार या जंगलाचे वेगळेपण इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ या उक्तीप्रमाणेच! 

कोपामांडवी फाट्याला डावीकडे सोडून जिप्सी टिपेश्वर तलावाच्या दिशेने निघाली. बांबूच्या बेटाची विरळता वाढत चाललेली. तशी करड्या गवताची दाटी दिसायची. उजव्या बाजूची सागाची झाडे पाठ सोडत नसत. 115च्या परिसरातील पाणवठा जवळ येऊ लागला तशी हृदयाची धडधड वाढायची. नदीच्या पुरात अडकलेल्या माणसासारखी आपली गत होऊ नये म्हणून प्रत्येक पाऊल सावधपणे पडायचे. डाव्या बाजूने एक वाघीण तीन बछड्यांसह पाणवठ्याच्या दिशेने निघालेली दिसली. दुपारची वेळ. सागाची पाणगळ झालेली. मायलेकरांच्या नजरा जिप्सीकडे वळलेल्या. ‘विजय ढाकणे’ यांनी पाणवठ्याजवळ थांबण्याचा इशारा केला.

आम्ही प्राण्यांसारखीच मूकभाषा शिकलो. ती भाषा जंगलात सोयीस्कर असते. सागाच्या झाडांमधून त्यांची एक-एक छबी टिपली जायची. ढगांनी दाटी करावी तशी तेथील शांतता अधिकच गडद झाली. त्यांच्याशिवाय तिथे कुणीही नव्हते. बाजूला उभी असलेली सागाची झाडे पाणवठ्यात डोकावून पाहत... पण बछड्यांच्या गमतीजमतीमुळे पाणी गढूळ झालेले त्यामुळे झाडांना रूप न्याहाळता येत नव्हते. बछड्यांना मिशा फुटलेल्या. ती वानरांसारखेच दात दाखवत पण त्यांच्यातला आक्रमकपणा अजून दिसत नव्हता. त्यांना आईवडिलांसारखेच जंगल समजून घ्यायचे आहे. वाघीण आठ ते दहा मिनिटे पाण्यात रेंगाळली. आलेल्या वाटेने निघूनही गेली. जत्रा पांगल्यासारखाच उदासलेपणा अंगावर पांघरून पाणवठा दुसऱ्या प्राण्यांच्या येण्याची वाट पाहू लागला. 

पाणवठा कधीच एकाकी जीवन जगत नाही. नेहमीच त्याच्या सोबतीला दोनचार जण असतात. झाडांवरून उतरून वानरे पाणी पितात. चितळ, सांबर मनातली भीती बाजूला ठेवून पाणवठ्यावर उतरतात. रानडुकरे चिखलात लोळतात. नीलगायींचा कळप पाण्याला तोंड लावून पोटभर पाणी पितो. पाखरांची ये-जा चालूच असते पण वाघ आला की पाणवठ्याचे सगळे रस्ते बंद. जणू शहरातल्या रस्त्यावरची नाकेबंदीच! एखाद्या थोर व्यक्तीची गाडी निघून गेल्यावर रस्ता पूर्ववत माणसांनी गजबजून जातो तसा पाणवठा मोकळा श्वास घेऊ लागला की पाखरे पाणी पिण्यासाठी खाली उतरत. 

टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांना ओळखण्यासाठी अन् आपल्या सोयीसाठी काही नावे दिलेली. तीन वर्षांपूर्वी शिकारी रोडवर दिसलेल्या वाघाला ‘स्टार’ हे नाव मिळालेले. तोच ढाण्या वाघ म्हणून सर्वपरिचित. माथणी गेटसमोर सागाच्या जंगलात उडी मारून पसार झालेली ‘आर्ची वाघीण’. टिपेश्वर गावाकडून टिपाई देवीकडे जाताना कोपऱ्यावर दिसलेला ‘लिटल स्टार वाघ’. ढाण्या वाघाची वंशवेल. अजूनही अनेक वाघ मुक्तपणे जंगलात भटकंती करताना आढळतात. बुद्धपौर्णिमेला या वाघांची गणना केली जाते.

‘डॉ.दुर्गादास कान्हडकर’ यांची भेट झाली की लिटल स्टारच्या अनेक आठवणी ते सांगत. टिपाई देवीच्या रस्त्यालगत दाटीवाटीने वाढलेल्या बांबूच्या बेटाजवळ तासन्तास उभे राहून जंगलाचे सौंदर्य डोळ्यांनी पिऊन घेणाऱ्या जंगलवेड्या माणसाला ऐकतच राहावे असे सारखे वाटायचे. ते जंगलाविषयी भरभरून बोलत.

जंगलातील शांतता मनात खोलवर रुजत जाते. एखाद्या रोपट्यासारखी सजीव होऊन वर डोकावते. जंगलात झिरपणारे रंग इतरत्र कुठेच अनुभवायला मिळत नाहीत. त्या रंगांची उधळण मलाही करता यावी म्हणून जंगल आवडते. 

एखाद्या बाळाने रंगीत खेळण्याकडे आकर्षित व्हावे तसा मी बांबूच्या बेटाकडे आकर्षित होत असे. त्या बेटातील हिरवेपणाच्या विविध छटा पाहून सगळी जमीन हिरव्या रंगात बुडवून काढल्यासारखी जाणवते. आपण जंगल अनुभवत नसून जंगलच आपल्याला अनुभवत असते हे विसरून चालणार नाही. त्या जंगलाचा एखादा कोपरा कळण्यासाठी बांबूच्या बेटाचा आसरा घेतो. त्यातील बारकावे शोधण्याचा प्रयत्न करतो. बांबूसारखे जमिनीचे पोट फाडून वर येण्यापेक्षा रातकिड्यांसारखे अनेक वर्षे मातीच्या गर्भाशयात राहायला आवडते. जिथे बांबूची मुळे पाण्यासाठी एकवटलेली असतात.

गावालगतच्या मारुती मंदिरासमोरून काही मीटर अंतर चालून गेल्यावर उजवीकडे वळावे लागते. तो रस्ता टिपाई देवीच्या मंदिराकडे जातो. रस्त्याचा उतार वाढलेला. त्या रस्त्यावरून ‘लिटल स्टार’ हळुवारपणे चालताना दिसला. त्याने विष्ठा टाकलेली. पक्षितज्ज्ञ ‘मारुती चितमपल्ली’ यांनी रानकुत्र्यांची विष्ठा जमवून त्यावर संशोधन केले. तसे मला काहीतरी करायचे आहे म्हणून मी वाघाच्या विष्ठेभोवती रेंगाळलो. 

सायंकाळी सहा वाजता टिपेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी पोहोचलो. तेव्हा जंगल नुकतेच कूस बदलत असल्याचे जाणवले. ‘मंगेश’ नावाच्या व्यक्तीने माथणी गेटपासून अलीकडे दोन किलोमीटर अंतरावर छानसे रेस्ट हाऊस बांधलेले. त्याच ठिकाणी दोनतीन दिवस मुक्काम पडणार होता. उजव्या बाजूला असलेल्या गेटमधून प्रवेश केला.

रेस्ट हाऊसची पाठीमागील बाजू डोंगराने अडवलेली. डोंगरावरची सागाची झाडे लढाईसाठी तयार असणाऱ्या सैनिकासारखी ताठ उभी दिसायची. पायथ्याला कापसाची थोडी शेती. त्यानंतर रेस्ट हाऊसचे तारेचे कुंपण. टुमदार चार खोल्या बांधलेल्या. दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघर. दोहोच्या मध्ये भरपूर मोकळी जागा. त्या जागेत शेकोटी पेटवून मध्यरात्रीपर्यंत आकाशातील चांदण्यांचा जंगलावर पडलेला प्रकाश उघड्या डोळ्यांनी पिऊन घेता येत असे. जंगलावर कधीच काळाकुट्ट अंधार पसरलेला दिसत नाही. चंद्राच्या किंवा चांदण्यांच्या आल्हाददायक प्रकाशाने झाडांची सावली जंगलभर पसरते. शेकोटी विझून गेल्यावर चांदण्या अधिक खुलून दिसत.

राजेंद्रसिंह गौर, ज्ञानेश्वर गिराम, गणेश कुरा आणि जयंत शेळके आराम करण्यासाठी निघून जात तेव्हा मी कासवाच्या पिलांसारखा चांदण्यांकडे एकटक पाहत बसायचो. एखाद्या विस्तीर्ण झाडावर बसून हजारो काजव्यांनी ते झाड प्रकाशमय करावे अगदी तसेच आकाशाच्या पोकळीत असलेल्या चांदण्या पाहून वाटायचे. डोक्यावरचे चांदण्यांचे झाड दूरपर्यंत पसरलले. झाडावरून एखादा काजवा निघून जावा तशी आकाशातून एखादी उल्का चमकत खाली यायची अन् विझून जायची. सुगरण पक्षी काजव्याला चोचीत पकडून स्वतःच्या घरट्यात घेऊन जातो असे ऐकलेले... पण खोप्यातून उजेड बाहेर पडल्याचे कधी जाणवले नाही त्यामुळे पक्षिनिरीक्षकांना संशोधनाची नक्कीच गरज आहे असे मला वाटते. 

त्या रेस्ट हाऊसमध्ये हडकुळ्या देहाची एक व्यक्ती नेहमी कामात व्यग्र दिसायची. त्या व्यक्तीला सगळे जण ‘बापू’ म्हणायचे. दररोज सकाळ-सायंकाळ गरमगरम चहा घेऊन पुढ्यात उभा राहायचा. पहाटे चार वाजता जंगल सफारीसाठी बाहेर पडत असू. त्यापूर्वीच ‘बापू’ चहा घेऊन हजर व्हायचा. पांढरा सदरा, काळसर पॅन्ट, दाढी वाढलेली. तुरीच्या रानात एखादे पांढरेशुभ्र कापसाचे झाड फुलून  दिसावे तशी त्याच्या वाढलेल्या दाढीत काही पांढऱ्या केसांची सरमिसळ दिसायची. त्याच्या चेहऱ्यावरून दुधासारखेच हसू उतू जायचे. तीन दिवसांत त्याला कधीही रागावलेले पाहिले नाही. जेवण वाढण्यासाठी त्याचे हात नेहमी तयार असायचे. बापू म्हणून हाक मारली की त्याच्यातला वक्तशीरपणा टिपून घ्यायचो. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू माझ्या दिशेने उतू जावे असे वाटायचे. शिकलेली काही माणसे स्वतःला पैशाच्या कोषात बंदिस्त करून घेतात. जी कधीच फूलपाखरू होऊन बाहेर पडू शकत नाहीत. तसे बापूचे नव्हते. 

रात्रीच्या वेळी जंगलातून येणारा गार वारा अंगाला झोंबून जाई. अंगात हुडहुडी भरली जायची तेव्हा बापू दोनतीन लाकडे आणून शेकोटी पेटवून द्यायचा. चहा घेत गप्पांना रंग चढायचा. गणेश कुरा जंगलातील अनुभव सांगायचा.

तो म्हणाला, ‘रात्रीच्या वेळी शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात हरीण सापडायचं. त्याला सोडवण्यासाठी धावपळ व्हायची. हरणाला मुक्त केल्यावर शिकाऱ्यांच्या मागावर जायचं. त्यांच्याकडचं जाळं जप्त करून कारवाई करताना कधीच हात थरथरले नाहीत.’ 

वन विभागात नोकरी करणाऱ्या या मित्राला दीर्घायुष्य लाभो.

रात्रीच्या वेळी अनेक अपरिचित आवाज कानावर पडत. ‘भिगवण’जवळील ‘कुंभारगावी’ मुक्कामाला असताना पाणपक्ष्यांचे आवाज येत असत. अगदी तशाच परंतु जंगलातील प्राण्यांच्या आवाजाने रेस्ट हाऊसचा परिसरही गोंधळून जायचा. खोल दरीतून एखादा आवाज यावा तसा घुबडांचा घूत्कार ऐकू येई. अंधाराला चिरत जाणारा आवाज ऐकून मी डोंगरावरील सागाच्या दिशेने मान वळवत असे. तिकडे अंधाराशिवाय दुसरे काही दिसायचे नाही. 

पक्षिसप्ताहानिमित्त पक्षिनिरीक्षण करताना दुपारच्या वेळी येलदरी जलाशयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या डोंगराच्या कपारीत शृंगी घुबड पाहिल्याचे आठवते. त्या वेळी मी नीलगायीच्या मागावर होतो. त्यांच्या लेंड्या प्लॅस्टिकच्या पिशवीत जमा केल्या. जशा वन उद्यानातील सशाच्या लेंड्या जमा केलेल्या. नीलगायी दूर निघून गेल्यावर गणेश कुरा आणि मी त्या घुबडाच्या दिशेने सरकलो. कपारीत बसून त्याने आम्हाला पाहिले. त्याचे डोळे रागात आलेल्या माणसासारखे दिसत. त्याच्या डोक्यावरील पिसांची शिंगे वाकुल्या दाखवायची. आम्ही जवळ जाण्यापूर्वीच त्याने भरारी घेतली. आकाशात उंचावर घिरट्या घालणाऱ्या घारीने घुबडाचा पाठलाग केला. घुबडाने कडूलिंबाच्या झाडावर आश्रय घेतला. तशी घार निघून गेली. काही वेळाने घुबडही जलाशयाच्या दिशेने निघून गेले. 

पहाटे चार वाजता जंगल सफारीसाठी तयार झालो. बापू चहा घेऊन पुढ्यात उभा. चार वाजून तीस मिनिटांनी माथणी गेटसमोर हजर. रानपाखरे अजून झोपलेलीच होती. हळूहळू जंगलातील अंधार माघार घेत असे. पूर्वेकडील आकाश विविध रंगांनी गजबजून गेले. जंगलातील कोवळी सकाळ अधिकच सुखमय होती. पाखरांच्या आवाजाने जंगलाला जाग आलेली. रानवाटा खुणावत असत. सागाच्या वाळलेल्या पानांनी रानवाटा अडवून धरलेल्या. सूर्य उगवण्यापूर्वीची सकाळ आणि सूर्य उगवल्यानंतरची सकाळ जंगलाला वेगवेगळी रूपे देऊन जाते. अंगणात चिमण्या उतराव्यात तशा जंगलवाटेवर प्राण्यांच्या खाणाखुणा उमटू लागतात. 

पिलखान ओढा ते यदलापूर फाट्यापर्यंत एकाच ठिकाणी घुबडाची वस्ती पाहायला मिळाली. रस्त्यापासून थोडे आत गेल्यावर दाट चिंचेच्या झाडावर घुबडाने घरटे केलेले. रस्त्यालगतच्या वाळलेल्या झाडाच्या ढोलीत एका घोरपडीने ताबा मिळवलेला. ती घोरपड नेहमी दिसायची. ‘मेन रोड सुन्ना’ या रस्त्यावरही घुबडाची वस्ती असायची पण मला पाहता आली नाही. घुबडाविषयीच्या अनेक अंधश्रद्धा समाजात पसरलेल्या. जमिनीत रुतून बसलेल्या मेखीसारख्याच. निघता निघत नाहीत. 

जंगलभर टोई पोपटांचा किलकिलाट दिवसभर ऐकू येई. शेंड्यावर बसून ही गोजिरवाणी रानपाखरे सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेत. दोन्ही खांद्यांवरील लालसर भाग ही त्यांची ओळख. डोके लाल रंगात बुडवून काढलेले. त्यावर आकाशाचा फिकट रंग उतरलेला. उंच झाडांच्या फांद्यांमधून अतिशय वेगाने निघून जाताना पाहिलेय. पाणवठ्याच्या काठावर असलेल्या पिंपळाच्या झाडावरून त्यांचा आवाज ऐकू येई. थव्याने राहणारे पक्षी. परभणी येथील कृषी विद्यापीठ परिसरात या टोई पोपटांना ज्वारीच्या कणसांवर बसून दाणे टिपताना पाहिलेय. टिपेश्वरच्या जंगलात किती निर्भयपणे राहतात! पाचुंद्यासारखे आकर्षक दिसत. 

पिलखान ओढ्याच्या काठावर आकाशाकडे झेपावलेल्या एका उंच झाडावर ‘तुरेवाल्या सर्पगरुडाने’ आश्रय घेतलेला. त्याभोवती काही चिंचेची झाडे. जिथे वाघाच्या पावलांचे ठसे पाहून वातावरणातील भीती अनुभवलेली. सर्पगरुडाने आमच्याकडे पाठ फिरवली. त्याला अशा जंगलमय प्रदेशात राहायला आवडते. उंचावर बसून सगळ्या परिसराची पाहणी करायचा. जणू बुरुजावर उभा राहून गडकिल्ल्यांची पाहणी करणारा शिवरायांचा मावळाच. काही वेळाने त्याने आकाशात भरारी घेतली. त्याच्या शेपटीखालील पांढऱ्या आणि काळ्या रंगांचे पट्टे पाहायला मिळाले. हे पट्टे पंखांखालीसुद्धा होते. छातीवर ठिपके काढलेले. त्याची भेदक नजर सगळ्या जंगलावर फिरायची. बगळ्यांची एक रांग तलावाच्या दिशेने उतरली. सगळी पाणपाखरे आनंदाने राहायची. तलावालगतच्या मंदिराभोवती काही चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येई. त्या बोरी-बाभळीवर बसलेल्या असायच्या. 

सुन्ना गेटमधून शिकारी रोडकडे जाताना काही झाडांवर ‘पांढऱ्या पोटाचे कोतवाल’ हाक मारल्यासारखे थांबवून घेत. या पाखरांना पहिल्यांदाच पाहत होतो. काळ्या रंगाचे कोतवाल सगळीकडे दिसतात पण या जंगलात पांढऱ्या पोटाचे कोतवाल पर्यटकांना आकर्षित करतात. ‘टकाचोर’ पक्ष्यांचा जंगलभर ऊत येतो. साग, चिंच, तेंदू या झाडांवर ‘टकाचोर’ दिसायचे. त्यांच्या शेपटीवरील रंगांची सरमिसळ खुणावत असे. या पक्ष्यांनी मला भुरळ घातलेली. डोळ्यांनी त्यांचा पाठलाग करायचो. माहूर गडावर वानरांच्या टोळीसह या पाखरांचा माग काढताना दमछाक  व्हायची. टिपेश्‍वर अभयारण्यातील जंगलवाटा पाखरांच्या आवाजाने समृद्ध झालेल्या अनुभवता येतात. 

सूर्य मावळतीकडे झुकलेला. काळोख रानवाटांना पायी तुडवत जंगलात घुसलेला. गवतात चरणारे मोर झाडांच्या फांदीवर विराजमान झाले. टोई पोपटांचा आवाज जंगलात विरून गेला. आम्ही शिकारी रोडवर अंधारात बुडून गेलो. जंगलातून बाहेर पडताना एक नीलगाय आमच्याकडे पाहत असल्याची जाणीव झाली. माथणी गेटकडे जाताना त्या नीलगायीची आठवण यायची. तिचे कळपातून बाहेर पडणे माझ्या मनाला बेचैन करायचे. काळोखाने पंख पसरले तसे जंगल शांत झाले. 

सकाळी वार्ता कानावर आली… वाघिणीने एका नीलगायीची शिकार केली होती.

टिपेश्वर अभयारण्य अनुभवले आणि तेथील प्राण्यांचा जगण्यासाठीचा जीवनसंघर्षही अनुभवता आला. जंगलातून बाहेर येताना तेथील प्राण्यांच्या हाका अजूनही ऐकू येत होत्या. जंगल नुसते फिरण्यापुरते नसते. प्राण्यांचा अधिवास नष्ट होणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागते. हळूहळू जंगलाचे क्षेत्र नष्ट होते आहे. प्राणी आणि मानवी संघर्ष उद्भवू नये यासाठी राखीव जंगल आवश्यक आहे. वन्य पशुपक्षी ही निसर्गाची लेकरे आहेत हे विसरून चालणार नाही....

- माणिक पुरी
manikpuri01021984@gmail.com

या लेखाचा पूर्वार्ध इथे वाचा.

Tags: अभयारण्य टिपेश्वर अभयारण्य माणिक पुरी पर्यावरण जंगल सफारी environment jungle tipeshwar sancturay manik puri Load More Tags

Comments:

Satish khandagale

प्रत्यक्ष जंगलाची सफर करत आहोत असा भास झाला. जंगलातील निसर्ग, पशु व पक्षी यांचे अप्रतिम वर्णन केले आहे

Madhav Gavhane

पुरी सरांचे लेख वाचून खूप खूप छान वाटते.वाचकांच्या पुढं जंगल उभं करून देण्याचे बळ आहे सरांच्या शब्दात.

Add Comment