कोझिकोडे : युनेस्कोने गौरवलेले साहित्याचे शहर

युनेस्कोकडून ‘सिटी ऑफ लिटरेचर’ हा सन्मान लाभलेले हे भारतातील पहिलेच शहर ठरले आहे. 

पी.एन.पाणिकर यांनी 1926 मध्ये स्थापन केलेले ग्रंथालय

समृद्ध साहित्य परंपरेसोबतच चळवळी आणि राज्य सरकारची शैक्षणिक धोरणे ही कायमच वाचन चळवळीला पोषक राहिली आहेत. अशातच पी.एन.पाणिकर यांनी उभारलेली ‘ग्रंथालय चळवळ’ या सगळ्या मल्याळी साहित्य प्रसारात कळस ठरली. निलमपेरू येथे जन्मलेले पाणिकर पेशाने शिक्षक होते. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. याचाच परिपाक म्हणून 1926 मध्ये सनातनधर्म नावाच्या ग्रंथालयाची स्थापना केली. पाणिकरांच्या आयुष्याचे एक सूत्र होते - ‘वाईच्चु वलरुका’ म्हणजे ‘वाचा आणि वाढवा’. या सूत्राला अनुसरून पुढे ग्रंथालये वाढत गेली.

केरळमधील ‘कोझिकोडे’ (पूर्वाश्रमीचे कालिकत) हे भारतासाठी नेहमीच एक महत्त्वाचे शहर राहिले आहे. मसाल्याचा व्यापार आणि अन्य दृष्टीने बहुतांश परकीयांनी ‘भारतभूमीचे प्रवेशद्वार’ म्हणूनही कालिकतचा वापर केला होता. मसाल्याचे पदार्थ, कॉफी अशा अनेक घटकांसाठी हे शहर किंबहुना बंदर महत्त्वाचे ठिकाण राहिले आहे. व्यापारी दृष्टीने महत्त्वाचे हे शहर आता आपली आणखी एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे. नुकतीच ‘युनेस्को’ने कोझिकोडे या शहराची ‘साहित्याचे शहर’ म्हणून घोषणा केली आहे.

सर्वात प्रथम साहित्यिक शहर ही संकल्पना काय आहे हे समजून घेऊ या. युनेस्कोने 2004 मध्ये ‘क्रिएटिव्ह सिरीज नेटवर्क’ चालू केले. या माध्यमातून युनेस्को जगभरातील, विविध देशांमधील शहरांचा अथवा जिल्ह्यांचा अभ्यास करून, त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार त्यांची ओळख जागतिक पातळीवर जाहीर करते. भारतातील इतरही शहरे या स्पर्धेत होती. यात श्रीनगर - हस्तकला आणि लोककला, चेन्नई - संगीत, वाराणसी - संगीत, जयपूर - हस्तकला आणि लोककला, मुंबई - चित्रपट यांचा समावेश होता. या यादीत ओळख मिळवण्यासाठीचे निकष त्या स्थानिक प्रांताला पूर्ण करावे लागतात. त्यात ‘साहित्य’ या आघाडीवर कोझिकोडेने बाजी मारली आहे.

या निमित्ताने प्रश्न पडतो की कोझिकोडेमध्ये असे वेगळे काय आहे? जयपूर लिटरेचर फेस्ट, दिल्लीतील फेस्टिव्हल्स असे चर्चेतील फेस्टिव्हल असताना कोझिकोडेच का? स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथे साहित्य-पुस्तक प्रकाशनासाठी पोषक वातावरण आहे. आज रोजी एकट्या कोझिकोडेमध्ये सत्तरहून अधिक प्रकाशन संस्था आहेत. वर्षभरात 400 ते 500 च्या आसपास पुस्तके या प्रकाशन संस्थांकडून प्रकाशित होतात. इथे फक्त पुस्तकेच प्रकाशित होत नाहीत, तर साहित्याच्या अनुषंगाने लहान-मोठे कार्यक्रम-महोत्सवही होतात; ज्यात प्रसिद्ध लेखक वैकोम मुहंमद बशीर यांच्या आठवणींनिमित्त 40 दिवसांचा ‘बेपोर आर्ट महोत्सव’, ‘केरळ लिटरेचर महोत्सव’ हे देशातील मोठे आणि आघाडीचे महोत्सव आहेत.

पण साहित्याची आवड कोझिकोडे या गावामध्ये आणि पूर्ण केरळमध्ये एका रात्रीत निर्माण झालेली आहे का? तर नाही. ‘अभिजात भाषा’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मल्याळम भाषेचे मूळ हे तमिळ आणि तिच्या संगम भाषेत आहे. द्रविड प्रांतात शेजारी नांदणाऱ्या या राज्यात कालांतराने भौगोलिक दृष्टीने पूर्वेकडे तमिळ, तर पश्चिमेला मल्याळम अशा स्वतंत्र भाषा नांदू लागल्या. पहिल्या मल्याळी कॅलेंडरची व्युत्पत्ती ही इसवी सन 825 ची आहे. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात चिरामन यांनी ‘रामचरितम्’ नावाचा काव्यप्रकार लिहिला गेल्याचे पुरावे आहेत. तर 1350 ते 1450 च्या दरम्यान माधव पाणिकर, शंकरा पाणिकर आणि रमा पाणिकर यांनी त्यात आणखी सुधारणा करत लिखाण केले. मल्याळी साहित्याचे असे अनेक जुने पुरावे समप्रमाण उपलब्ध आहेत.

या समृद्ध साहित्य परंपरेसोबतच चळवळी आणि राज्य सरकारची शैक्षणिक धोरणे ही कायमच वाचन चळवळीला पोषक राहिली आहेत. अशातच पी.एन.पाणिकर यांनी उभारलेली ‘ग्रंथालय चळवळ’ या सगळ्या मल्याळी साहित्य प्रसारात कळस ठरली. निलमपेरू येथे जन्मलेले पाणिकर पेशाने शिक्षक होते. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. याचाच परिपाक म्हणून 1926 मध्ये सनातनधर्म नावाच्या ग्रंथालयाची स्थापना केली. पाणिकरांच्या आयुष्याचे एक सूत्र होते - ‘वाईच्चु वलरुका’ म्हणजे ‘वाचा आणि वाढवा’. या सूत्राला अनुसरून पुढे ग्रंथालये वाढत गेली. यातून 1945 मध्ये ‘अंबालापुझा त्रावणकोर ग्रंथालय संघटने’ची स्थापना झाली, जे नंतर केरळ राज्य सरकारने ताब्यात घेतले. आज ती संस्था ‘केरळ ग्रंथालय परिषद’ म्हणून ओळखली जाते. त्या काळी 47 ग्रंथालयांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा पुढे सहा हजार शाखांपर्यंत विस्तार झाला. यानंतर 1977 मध्ये ‘केरळ असोसिएशन फॉर नॉनफॉर्मल एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट (KANFED)’ची स्थापना राज्य सरकारने केली. याद्वारे केरळमध्ये सर्वंकष शिक्षणावर भर दिला गेला. आणि आज केरळ 100 टक्के साक्षर झाले आहे. यामुळे वाचन संस्कृती वाढण्यास मदतच झाली. 

23 जून 2024 रोजी अधिकृत घोषणा करताना कोझिकोडेच्या महापौर बीना फिलिप आणि केरळचे पर्यटन मंत्री पी.ए. मोहम्मद रियास  

ब्रिटिश काळात केरळमध्ये कम्युनिझमची मुळे रोवली गेली. ही विचारसरणी मूलतः चळवळींवर अवलंबून असल्याने त्यांनी केरळमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आपली विचारसरणी वाढवताना वाचन संस्कृती वाढवण्याचे प्रयत्न केले. 1961 मध्ये केरळमध्ये मल्याळी वाचकांसाठी प्रति हजारी 32 दैनिके वितरित होत. त्याच कालावधीत भारतातील विविध भाषांमधील हा दर जवळपास 11 इतका होता. 1989 मध्ये केरळमधील हाच आकडा 61 वर गेला, तर इतर भारतीय भाषांमधे तो सरासरी 28 वर होता. यावरून आज कोझिकोडेला युनेस्कोने पुरस्कृत करण्यामागे किती मोठी चळवळ आहे हे लक्षात येते.

केरळच्या वाचन संस्कृतीचा विषय निघालाच आहे, तर पेरूमकुलमचे नाव वगळून पुढे जाता येणार नाही. पेरूमकुलम हे केरळमध्ये ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. गावातील प्रमुख ठिकाणी बॉक्स किंवा रॅक केलेले आहेत; ज्यात पुस्तके ठेवली जातात. काही घरांबाहेरही अशी सुविधा आहे. पण हे सगळे पेरूमकुलममध्ये एका रात्रीत घडलेले नाही. त्यामागेही रंजक इतिहास आहे. 1948 मध्ये गांधीजींची हत्या झाल्यावर कोल्लम जिल्ह्यातील या गावात गांधीजींच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कामाची आठवण राहावी म्हणून एक अभिनव प्रयोग केला गेला.

त्याच गावात राहणाऱ्या कुझैकातुवीतिल कृष्णा पिल्लई नावाच्या एका तरुणाने आणि त्यांच्या काही मित्रांनी शक्य तिथून जवळपास 100 पुस्तके गोळा केली आणि गावातील एका छोट्या खोलीत ठेवली. यातून वाचन संस्कृती प्रस्थापित करून गांधींना वंदन करण्याचे ठरले. या कल्पनेला स्थानिक नागरिकांनी उचलून धरले. हे ग्रंथालय बाळसे धरू लागले. युवकांनी सुरू केलेला हा उपक्रम तितकेसे आर्थिक पाठबळ नसल्याने असंख्य अडथळ्यांवर मात करत, मार्गक्रमण करत, चालूच होता. शेवटी 2016 मध्ये या ग्रंथालयाची सुसज्ज इमारत बांधण्यात आली. अनेकांनी सढळ हातांनी पुस्तकांची मदत केली. यातून या गावात एक कल्पना - ‘पुस्तकांचे घरटे’ बांधण्याची - सुचवली गेली. याद्वारे 50 पुस्तके बसतील असे छोटेखानी कपाट गावातील मुख्य ठिकाणी लावण्यात आले. हळूहळू या कपाटांचीही संख्या वाढली. आणि घरासमोर पुढेही अशी छोटेखानी पुस्तकांची घरटी बसवण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने लोकांच्या उत्साहाची दखल घेत 19 जून 2021 रोजी आणखी बळ पुरवत या पेरूमकुलम गावाला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून जाहीर केले.


हेही वाचा : कहाणी दोन जोसेफची... - डॅनिअल मस्करणीस


केरळमधील वाचनाचा इतिहास पाहता, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात याविषयी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करून म्हटले की, “सध्या वाढत चाललेल्या द्वेषाच्या वातावरणात, वाढत्या अंधश्रद्धेच्या युगात, वाचन हाच समर्थ पर्याय आहे; जो या गोष्टींना प्रतिबंध करू शकतो. तेव्हा कोझिकोडेला साहित्यिक शहर म्हणून गौरवले जाणे सार्थ वाटते...”

- शशिकांत हिवरकर
h.shashi43@gmail.com 


पी.ए. पाणिकर यांच्याविषयीचा एक व्हिडिओ :

 

Tags: books library unesco P.N. Panicker reading kozhikode city of literature keral Load More Tags

Add Comment

संबंधित लेख