बच्चाबाजी आणि भारतीय लोककला

लोकनृत्याच्या माध्यमातून पुरुषांचे लैंगिक शोषण

"बच्चा बाजी आणि भारतीय लोककला" हे एका वाक्यात ऐकताना थोडं ऑड वाटतंय ना? या दोन नृत्य प्रकारांचा काय संबंध? एकाकडे घृणास्पद किंवा अमानवीय म्हणून पाहिलं जातं. तर दुसऱ्याला समाजमान्यता मिळाली आहे. या दोन्हींची तुलनाच होऊ शकत नाही. होय, हे अगदीच खरं असलं तरी काहीं बाबतींमध्ये यामध्ये साम्य पण आहे. आणि हे साम्य पोशाख, गाणे, भाषा, नृत्यप्रकार यामध्ये नसून यामागच्या विचारांमध्ये आहे.

‘बच्चा बाजी’ म्हटलं की आपण नाक मुरडतो, किती अमानवीय म्हणून झटकून टाकतो. पण आपल्याकडील लोककला काही अशा घटनांपासून वेगळ्या राहिलेल्या नाहीत. फरक इतकाच की, काहींनी त्या प्रथा बदलून टाकल्या; काहींनी त्या आहे अशा टिकवल्या. आणि गंमत म्हणजे या प्रथा फक्त भारतात किंवा अफगाणिस्तान मध्ये नाहीत.तर इंडोनेशिया मध्यें ‘लेंगर लानांग’, जपानमधील वेश्या व्यवसायाला समांतर असणारा; मात्र जपानी समाजामध्ये आब राखून असणारा ‘गेशा’ व्यवसाय हेदेखील सुरवातीला अशाच प्रथांमधून पुढे आलेले आहेत. आता ही प्रथा नक्की कोणती?

तर या प्रथांमध्ये पुरुषांसमोर नृत्य करणारे, तुमचं मनोरंजन करणारे, त्यातून पुरुषांना मानसिक, शारीरिक आनंद मिळवून देणाऱ्या या स्त्रिया नसतात, तर पुरुषच असतात. काही ठिकाणी ते महिलांसारखी केशभूषा आणि वेशभूषा करतात; तर काही ठिकाणी मात्र पुरुषासारखीच वेशभूषा, देहबोली आणि वागणूक ठेवतात.

यामध्ये जसे इंडोनेशियाचा ‘लेंगर लानांग’ डान्स फॉर्म, जपानचं ‘गेशा’ कल्चर, अफगाणिस्तान, पाकिस्तानमधील ‘बच्चा बाजी’ येते. तशीच भारताच्या काश्मीरमधील ‘बाचा नगमा’, महाराष्ट्रामधील ‘लावणी’, उत्तर भारतातील ‘लौंडा नाच’, उत्तरेकडील ‘कथक’, दक्षिणेकडील ‘करक्कटम’, आदींचा समावेश होतो. यातील ‘बच्चा बाजी’, ‘बाचा नगमा’ यामध्ये बव्हंशी मुले ही मुलांच्याच कपड्यांत राहतात. सर्वसामान्य आयुष्यही ते मुलांसारखेच काढतात. मात्र ‘लौंडा नाच’, ‘लावणी’, ‘करकट्टम, ‘बाचा नगमा’ या प्रकारांत मात्र ते महिलांसाखी वेशभूषा ठेवतात. यामध्ये देखील एक गंमत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधील ‘बच्चा बाजी’ आणि काश्मीरमधील ‘बाचा नगमा’ हे नृत्य प्रकार स्थानिक पातळीवर आजही लोकप्रिय आहेत. त्याला ऐतिहासिक वारसा आहे. 

मात्र प्रत्येक जण या प्रकारच्या व्युत्पत्तीला त्रयस्थ व्यक्तीला जबाबदार मानतो. जसे की काश्मीर खोऱ्यातील ‘बाचा नगमा’ हे अफगाण टोळ्यांच्या आगमनानंतर त्यांनी सुरू केलं असे काहीजण म्हणतात, तर इतर काहीजण म्हणतात की, अकबर बादशाहच्या कार्यकाळात जेव्हा त्यानं काश्मीर खोऱ्यावर विजय मिळवला त्यावेळी स्वतःचा पुरुषार्थ दाखवत स्थानिक पुरुषार्थाला आपल्या नजरेत कमी दाखवण्यासाठी हा प्रकार सुरू केला. तिथेच काहीजण असेही म्हणतात की, काश्मीर खोऱ्यावर डोग्रा महाराज राज्य करत असताना तेथील पूर्वापार चालू असलेल्या महिलांच्या ‘हाफिज नगमा’ या लोककलेला त्यांनी पार दडपून टाकले.त्यामुळे ‘बाचा नगमा’ला प्रोत्साहन मिळाले. अगदी अशीच परिस्थिती ‘बच्चा बाजी’मध्येही आहे. काही इतिहास तज्ज्ञांनी अगदी तेराव्या शतकाच्या आगोदरपासून ही प्रथा असल्याचं नमूद केलं आहे. १९२१ मध्ये अफगाणी कायद्यात याविरोधात तरतूद केली गेली. १९९६ मध्ये तालीबान सत्तेवर आल्यानंतर त्यांनी शरिया लागू केला. आणि याला बंदी घातली. मात्र या विरोधात कुणावरही कधीच कार्यवाही झाली नाही. कारण ‘बच्चा बाजी’ करणं आणि सुंदर मुले ‘ठेवणं’ हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हतं. प्रस्थापित लोकच हे शौक करू शकत होते. कारण आर्थिक ताकद! अफगाणी लोक मात्र रशियन फौजांच्या आक्रमणानंतर अफगाणिस्तानात हा प्रकार चालू झाला असे म्हणतात.

‘करकट्टम’ आणि ‘लावणी’मध्येदेखील सुरवात जेव्हा झाली, तेव्हा सुरुवातीला पुरुष कलाकारच बऱ्याचदा महिलांच्या वेशभूषेत सामील होत. कालांतराने ब्रिटिश आगमनानंतर हळूहळू पुरुष या डान्स फॉर्ममधून बाहेर गेले, आणि महिला आल्या. त्यानंतर पुन्हा गेल्या काही कालावधीपासून पुरुष या कला सादर करू लागले आहेत.

सुरुवातीला पुरुष कलाकारांनी महिला पात्र सादर करण्याचं आणि इतर प्रथा सुरू होण्याचं कारण म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये महिलांना चौकटीबाहेर नसणारा प्रवेश. ज्यामुळे पुरुषच मनोरंजक म्हणून काम करत. कथक नृत्य प्रकारातही सुरवातीला पुरुष कलाकारच कथा सांगत नृत्य करत. कालांतराने मुघल राजवट आणि ब्रिटिश राजवटीत स्त्रियाही या नृत्य प्रकारात मोठ्या प्रमाणावर आल्या, मुघल कालखंडात स्त्रिया या नृत्य प्रकारात आल्यानंतर या नृत्य प्रकाराला एलिट दर्जा मिळाला. आपसूकच सर्वहारा समाज या मनोरंजनापासून लांब गेला. त्याला पर्याय म्हणून मनोरंजनासाठी ‘लौंडा नाच’ पुढे आला. या सगळ्यात ‘लौंडा नाच’ हा लौकिक अर्थाने नवीन आहे. वास्तवात हा नृत्य प्रकार ११ व्या शतकातील आहे. मात्र १९ व्या शतकात भिकारीदास ठाकूर यांनी या कलेला पुनरुज्जीवित केलं.

या सर्व कलाप्रकारांमध्ये प्रामुख्याने वयात येणारे मुलगे आणले जातात किंवा आणले जायचे. म्हणजे १३ ते चौदा वर्षा पासून ची मुले.या सर्व च प्रकारांमध्ये असणाऱ्या साम्या मध्ये वर्ण,वर्ग,पितृसत्ताक पद्धती,आणि खर्चात बचत अथवा सुरक्षितता हे घटक कारणीभूत आहेत..या सर्वांच्या मधील एक समान घटक वर्ग,या सर्वच नृत्य प्रकारांमध्ये वापरली जाणारी मुले हि गरीब घराण्यातील असतात. बऱ्याचदा आई वडील घरच्या परिस्थिती मुळे इतर अपत्यांचं आणि स्वतःच उदर भरण करण्यासाठी आपलं मुलं या या कला सादर करणाऱ्या कलाकाराना काहीं रूपयांच्या बदल्यात विकतात,तर अपवादात्मक परिस्थिती तकाही मुले ही स्वखुशीने स्वतःच्या लैंगिक आवडीसाठी अथवा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सोपा पर्याय म्हणून इकडे वळतात. भारतात तर ‘लौंडा नाच’, ‘करकट्टम’ आणि ‘लावणी’ हे नृत्यप्रकार फक्त दलित समाजासाठी दलित समाजाकडून सादर केले जायचे. यात शोषण हा एक महत्वाचा समान धागा राहिलेला आहे. पुरुषाला स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी कायम आपल्यापेक्षा लहान आणि आपल्यापेक्षा कमजोर सावज गाठणं आवडतं. कारण तिथे शोषण करताना प्रतिकार तितकासा होत नाही. यासोबतच लग्नाव्यतिरिक्त बाहेर लैंगिक संबंध ठेवणे हे मर्दुमकीचं लक्षण मानलं जातं. पुरुषाने मुलांचं शोषण करणं याला आणखीन एक घटक कारणीभूत ठरला, तो म्हणजे महिला या समाजासमोर येत नव्हत्या, त्यांना ती परवानगी नव्हती. आपसूकच पर्याय कमी होते. त्याशिवाय मुलांबरोबर संबंध ठेवणं हे कमी खर्चाचं काम होतं. कारण स्त्रीसोबत संबंध ठेवताना तिच्यावर करावा लागणार खर्च, तिच्या अपत्यांचं पोषण याकरिता करावा लागणारा खर्च हा सगळा खर्च इकडे नव्हता. 

भारतात जेव्हा महिला कलाप्रकार सादर करू लागल्या, त्याला मुक्त वातावरण पोषक ठरले असे म्हणता येऊ शकते. कालांतराने समाजाचा दृष्टिकोन बदलू लागला, त्याला शिक्षण कारणीभूत ठरले. लैंगिक दृष्टीने विविध आघाड्यांवर चर्चा होऊ लागल्या. ज्याचा सकारात्मक परिणाम आज ‘लावणी’सारख्या ‘कथक’सारख्या नृत्यकलेमध्ये शिक्षित मुले बऱ्याचदा स्वखुशीने पॅशन म्हणून करिअर करत आहेत. किरण कोरे हे आपल्याकडचे अलीकडील आघाडीचे नाव यात सांगता येईल, ज्याच्या नंतर अनेक युवक ‘लावणी’मध्ये स्वतःचं करिअर करत आहेत. ‘लौंडा नाच’ आणि ‘करकट्टम’ मात्र याबाबत कमी नशिबी ठरले. हे दोन्ही नृत्यप्रकार दलित वर्गाकडून दलित वर्गासाठी सादर केले जायचे. जे कधीच एलिट वर्गाचे होऊ शकले नाहीत. नाही म्हणायला लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘लौंडा नृत्य’ या प्रकाराला आश्रय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानी त्यांनी या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. तदनंतर मात्र याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. कदाचित या फॉर्ममधील घटकही याला कारणीभूत ठरले असे म्हणता येईल. लौंडा नाचामध्ये बऱ्याचदा स्थलांतरितांच्या व्यथा मांडल्या जायच्या. कारण बव्हंशी कनिष्ठ वर्गातील उत्तर भारतीय हे उदरनिर्वाहासाठी पूर्वीपासून स्थलांतर करत आलेत. उच्चभ्रू वर्गाकडे स्थावर मालमत्ता एकटवल्याने हा दुष्परिणाम दिसून येतो. आपसूक त्या वर्गाच्या मनोरंजनाच्या साधनांमध्ये त्यांचं जगणं प्रतिबिंबित होत होतं.तीच गोष्ट करकट्टम बाबत. दलित कष्टकरी वर्ग हा स्त्री देवतेची उपासना, निसर्गपूजा करत असे. आपसूक कष्टकरी वर्ग असल्याने त्यात एक भडकपणा होता. त्यामुळे तोही उपेक्षित राहिला.

आणखीन एक गंमत म्हणजे, आपण पाहतो की, आपल्याकडे बऱ्याचदा गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम वादात सापडतो. त्याला कारण म्हणजे त्यांच्या प्रति असणारी क्रेझ होय. पण तुम्ही कल्पना करू शकता का, की अशीच काही परिस्थिती काही काळ अफगाणिस्तानमध्येही उद्भवली होती. ७० च्या दशकात अफगाणिस्तानच्या हेरत शहरात अशी परिस्थिती उदभवली होती. त्यामुळे ‘बच्चा बाजी’च्या सार्वजनिक कार्यक्रमांवर काही काळ बंदी घातली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान पुरुषार्थ सिद्ध करून सर्वात सुंदर मुलाला आपलं करण्याच्या नादात खूनही पडत. आता या परिस्थितीत सुसूत्रता आली आहे, असं म्हणता येईल. मात्र परिस्थिती बदलली नाहीय. सध्या या 'बच्चा बाजी’करिता मुलांना शास्त्रशुद्ध वाद्यं वाजवण्याचं, गाणं म्हणण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या कलेत पारंगत असलेले पुरुषच हे प्रशिक्षण देतात. त्यानंतर त्याचा मालक, म्हणजे ज्याने त्याला खरेदी केला आहे, तो त्याच्या वैयक्तिक कार्यक्रमात त्या मुलाला सादर करतो.

मुलांचं शोषण हे वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारे होत असतं. मात्र यावर तितकीशी चर्चा होत नाही. ‘लौंडा नाच’, ‘करकट्टम’, हे कितीही साधे वाटत असले, आणि ‘बच्चा बाजी’, ‘बाचा नगमा’ हे बऱ्यापैकी श्रीमंती शौक असले, आणि ‘गेशा’ व ‘लेंगर लनांग’ ही प्रकार कितीही उच्चभ्रू वाटले, किंवा या सर्व प्रकारांना ‘लोककला’ असे गोंडस नाव दिले जात असले तरीही त्याद्वारेदेखील मुलांचं शोषणच होतं, हे सत्य नाकारता येत नाही.

- शशिकांत हिवरकर
h.shashi43@gmail.com
(लेखक लोककला आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

Tags: लोककला पुरूषांचे शोषण मुलांचे लैंगिक शोषण नाच लौंडा नाच बच्चा बाजी Load More Tags

Comments:

Jayant Ghate

गौतमी पाटील हिचे नृत्य वादात सापडण्याचे कारण ती करीत असलेले अश्लील हावभाव आहेत. तिच्याबद्दल असलेली क्रेझ नाही.

Add Comment

संबंधित लेख