तुम्हाला तुमच्या वयाच्या 120व्या वर्षी झाडावरची फळे तोडायची आहेत?

17 डिसेंबर 'पेन्शनर्स डे'च्या निमित्ताने ईकीगाई - स्वस्थ दीर्घायुष्याचे कानमंत्र

कमरेत वाकलेल्या ९० वर्षांच्या (आजी)बाई बागेत फळझाडे लावून घेताना माळीबाबांना म्हणाल्या “झाडे अशाप्रकारे लावा की त्यांच्या फळांच्या फांद्या जमिनीजवळ येतील”. माळीबाबा म्हणाले “या झाडांना फळं यायला बरीच वर्षे जावी लागतील, तुम्ही असाल का तेव्हा?” (आजी)बाई म्हणाल्या “हो म्हणूनच जमिनीलगतची फळं हवी आहेत, मी १२० वर्षांची होईन तेव्हा मला सोप्पं जाईल मग फळं काढायला”!

ही गोष्ट मी जपान संदर्भात पूर्वी वाचली होती. ज्या बाईंना ९०व्या वर्षी त्या १२० वर्षांच्या होतील तेव्हा ‘माझी फळं मला तोडता यावीत, खाता यावीत’, इतके भरभरून आयुष्य जगण्याची इच्छा आहे त्यांना आजी कसं म्हणायचं? म्हणूनच आजीबाई असं सलग न लिहिता "आजी" या शब्दाला कंसात टाकलं.   

नोकरदार माणसे एका विशिष्ट वयाला पोहोचल्यावर निवृत्त होतात, काही जण वयाच्या ५८ व्या वर्षी, काहीजण ६० व्या वर्षी, काहीजण ६२ व्या वर्षी, इत्यादी. सतरा डिसेंबर ‘पेन्शनर्स डे’ म्हणून ओळखतात. आत्ताच्या काळात निवृत्त होणारे सगळेच पेन्शनर्स म्हणता येणार नाहीत कारण सगळ्यांनाच पेन्शन मिळते असे नाही.

पुण्याला  IT hub, सांस्कृतिक शहर, विद्येचे माहेरघर या ओळखींबरोबरच पेन्शनर्सचे शहर म्हणूनही पूर्वी ओळख होती. लोक निवृत्त झाल्यावर पुण्यासारख्या ‘थंड, भरपूर पाणी’ असणाऱ्या ‘निवांत’ ठिकाणी राहायला पसंत करत.

या लेखात ‘पेन्शनर्स डे’ चा संदर्भ घेऊन मी एका पुस्तकाबद्दल व त्यातल्या अगदी थोड्या भागाबद्दल लिहिलं आहे. पेन्शनर्सचा संदर्भ जसा आर्थिक आहे तसाच तो ‘एक विशिष्ट वाढलेलं शारीरिक वय’ याच्याशी पण आहे. वाढलेलं शारीरिक वय म्हणजे वाढलेल्या शारीरिक (आताच्या काळात मानसिक सुद्धा) व्याधी. निवृत्ती घेतल्याने किंवा झाल्याने हातात आलेला मोकळा वेळ, त्याचा सदुपयोग कसा करायचा याची समस्या, कुटुंबातील इतर मंडळींना तुमच्यासाठी वेळ असेलच याची शक्यता नाही, असे अनेक प्रश्न आपल्याला समाजात दिसतात.  त्यातच वृद्धांनी केलेल्या आत्महत्यांबद्दल बातम्या वाचल्या, टीव्हीवर बघितल्या की आत्ताचा ‘तरुण भारत’ पुढे ‘वयोवृद्धांचा भारत’ असणार आहे तेव्हा कसं होणार हे वाटणं साहजिकच आहे.

आपल्या वाचण्यात, बघण्यात बरेचदा जपानच्या व्यवस्थापन तंत्रांबद्दलच्या नवनवीन गोष्टी येत असतात. हे व्यवस्थापन तंत्र वापरुन घडणाऱ्या घटना आपल्याला अचंबित करत असतात. ईकीगाई (Ikigai) नावाचे एक छान पुस्तक वाचण्यात आले. जपानी लोकांच्या मोठ्या आणि सुखी आयुष्याचे गुपित या पुस्तकात दिले आहे. एकूण सर्व पुस्तकच वाचनीय आहे. हेक्टर गार्जिया (Hector Gargia) आणि फ्रान्सिस् मिरालेस (Francesc Miralles) या दोन लेखकांनी जपानमध्ये विविध लोकांना प्रत्यक्ष भेटून, माहिती घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.

नऊ भागांमध्ये ईकीगाई या विषयावर उदाहरणासहित फार महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते:

१.ईकीगाई - म्हातारं होता होता तरुण राहण्याची कला.

२.वृद्धत्वविरोधी गुपिते - मोठ्या आणि सुखी आयुष्यासाठी छोट्या गोष्टींची बेरीज.

३.लोगोथेरपी (Logotherapy) ते ईकीगाई - आपल्या जगण्याचा उद्देश शोधून अधिक काळ आणि चांगले कसे जगायचे.

४.तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत ओघवते रहा - काम आणि मोकळा वेळ यांचे रुपांतर प्रगतीच्या संधींमध्ये कसे करता येईल?

५.दीर्घायुष्याचे स्वामी - जगात जास्त काळ जगणाऱ्या लोकांचे शहाणपणाचे शब्द.

६.आयुष्याची शताब्दी पूर्ण केलेल्या जपानी माणसांकडून धडे - आनंद आणि दीर्घायुष्यासाठी परंपरा आणि नीतिसूत्रे किंवा म्हणी.

७.ईकीगाई आहार-पथ्य - जगात सर्वात जास्त जगणारे लोक काय खातात आणि पितात?

८.हळुवार हालचाली, मोठ्ठं आयुष्य - पूर्वेकडचे व्यायाम प्रकार जे आरोग्य आणि दीर्घायुष्य देतात.

९.चिकाटी आणि वाबी-साबी (Wabi Sabi) - जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना ताणतणाव आणि चिंतेनं आपण म्हातारं होऊ नये यासाठी काय करावं.

हे सर्वच्या सर्व नऊ भाग वाचून, समजून, प्रत्यक्षात आणावेत असे आहेत. पुस्तक वाचताना ‘आपलं आयुष्य निसटू द्यायचं नाही, प्रत्येक क्षण भरभरुन परंतु दुसऱ्याचाही विचार करून जगायचा’ हे वारंवार लक्षात येत राहतं. या पुस्तकाच्या नवव्या भागात मांडलेल्या तीन मुद्द्यांची चर्चा मी आत्ता या लेखात करणार आहे.

शेवटच्या नवव्या भागातले काही विशिष्ट मुद्दे घेऊनच लेख लिहावासा वाटला कारण हे मुद्दे आपण तरुण वयातच समजावून घेतले आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य सुद्धा कसं भरभरून जगता येईल याची गंमत आपल्याला वेळेत समजेल आणि तरुणपणातही काही गोष्टी सुकर होतील.

नवव्या भागात ‘चिकाटी (resilience) म्हणजे काय?’ याची चर्चा करताना लेखक म्हणतात ‘कितीही संकटं आली तरी आपल्याला जे मिळवायचं ते मिळवण्याचा प्रयत्न करत राहायचं, कधीच हार मानायची नाही’. परंतु चिकाटी (Resilience) म्हणजे इतकंच नाही; तर आयुष्यातल्या तातडीच्याच नव्हे तर महत्त्वाच्या गोष्टींवरही लक्ष केंद्रित करत राहणं. कोणत्याही नकारात्मक भावनांमध्ये वाहावत न जाणं.

चिकाटीपेक्षाही अँटी-फ्रॅजिलिटी (anti-fragility) ला या पुस्तकात जास्त महत्त्वाचे मानले आहे. नसीम निकलस तालेब (Nassim Nicholas Taleb) यांनी अँटी-फ्रॅजिलिटी शब्दाचा अर्थ सांगताना म्हणलं आहे की “ज्या गोष्टींना इजा झाल्यावर त्या अजून मजबूत किंवा सामर्थ्यवान होतात त्या अँटी-फ्रॅजाईल होत.”.

फ्रॅजाईल (fragile) म्हणजे नाजूक किंवा ठिसूळ, म्हणजेच धक्का लागला तर लगेच तुटणारी किंवा मोडणारी, कोलमडून जाणारी गोष्ट अथवा वस्तू (पुस्तकाच्या संदर्भात व्यक्ती).अँटी-फ्रॅजाईल (anti-fragile) म्हणजे अशी गोष्ट अथवा वस्तू जिला ‘कोणताही शॉक किंवा धक्का लागला तर ती गोष्ट तुटून कोलमडून नं जाता उलट अधिक भक्कम, कणखर होते’.

तर मग अँटी-फ्रॅजाईल होण्यासाठी काय करता येईल हे पुस्तकाच्या नवव्या भागात तीन टप्प्यांमध्ये सांगितले आहे.

१.अधिक पर्याय निर्माण करा: एकाच नोकरीवर किंवा उत्पन्नाच्या एकाच पर्यायावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या प्रकारे पैसे कसे कमवता येतील याचा विचार करा, उदाहरणार्थ छंदातून. तुम्ही एकाच कमाईवर अवलंबून राहिलात तर तुम्ही फ्रॅजाईल, कमकुवत होता, काही कारणाने ती नोकरी गेली तर तुम्ही कोलमडून पडता. परंतु तुमच्याकडे जर वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतील तर तुम्हाला दुसरी नोकरी किंवा कमाईचे साधन लगेचच उपलब्ध होऊ शकते. त्याद्वारे तुम्ही आधीच्या नोकरीपेक्षाही अधिक कमाई करु शकता. पहिली नोकरी जाऊन पर्याय उपलब्ध असल्याने दुसऱ्या नोकरीत जास्त पगार कमावण्याची परिस्थिती निर्माण झाली की तुम्ही अँटी-फ्रॅजाईल आहात हे सिद्ध होते.

ओगिमि (Ogimi) गावातील ज्या १००% वृद्धांची लेखकांनी मुलाखत घेतली त्या सर्वांचे प्राथमिक आणि दुय्यम व्यवसाय होते. भाजीपाला पिकवून स्थानिक बाजारात विकणे हा सर्वांचा ‘दुय्यम’ परंतु ‘महत्त्वाचा’ व्यवसाय होता. ही अँटी-फ्रॅजिलिटी त्यांनी मैत्री, वैयक्तिक आवडीनिवडी, नातेसंबंधातदेखील ठेवायला सांगितली आहे.

‘मी एकाच नोकरीवर समाधानी आहे, आहे त्या मित्रांमध्ये आनंदी आहे, मी कशाला नवीन काही शोधू?’ असे प्रश्न आपल्याला पडू शकतात, 'कशाला वेळ वाया घालवायचा. सामान्यतः असामान्य गोष्टी होत नाहीत' असे वाटू लागते. मग आपण कम्फर्ट झोनमध्ये म्हणजेच आपल्याला आरामदायी असेल तितक्याच क्षेत्रात राहतो. परंतु आपण आपल्या आरामक्षेत्रात सुखी असलो तरी कधी कधी अनपेक्षित घटना घडतातच, त्या अनपेक्षित क्षणांना सामोरे जायला आपली तयारी पाहिजे, म्हणजेच आपण अँटी-फ्रॅजाईल, खंबीर असायला हवे.

२.काही ठिकाणी धोका पत्करताना विचार करा आणि काही ठिकाणी छोटे धोके पत्करा: या मुद्द्यात अँटी-फ्रॅजाईल होण्यासाठी आर्थिक किंवा गुंतवणुकींची उदाहरणे दिली आहेत. छोटे धोके पत्करून बक्षीस मिळवता येते, परंतु काही ठिकाणी किंवा घटनांमध्ये धोका न पत्करणेच फायद्याचे असते. कमी वेळात, कमी कष्टात कितीही स्मार्टपणे किंवा चतुरपणे काम केले तरी जास्त नफा नेहमीच, सगळ्यांना मिळत नाही. कधी धोका पत्करायचा आणि कधी सावधपणा दाखवायचा याचा पूर्ण विचार करून प्रत्येकाने निर्णय घ्यावा.

हल्ली सायबर गुन्ह्यांमध्ये तरुणच नाही तर वृद्ध माणसं सुद्धा अडकतात, फसताना दिसतात. डिजिटल अटक असो, हनी ट्रॅप असो नाहीतर पैसे वाढवून देतोची बतावणी असो; त्यामुळे हा दुसरा टप्पा तर फार महत्त्वाचा आहे.

३.ज्या गोष्टींमुळे तुम्ही सहजपणे कोसळता किंवा उन्मळून पडता त्या गोष्टींना दूर करा: ‘कोणत्या गोष्टी, व्यक्ती, सवयी आपल्याला दुर्बल करतात?’ प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे. त्रासदायक होणारे घटक ठरवणे फार महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ:

दोन जेवणांच्या मध्ये उठसूट खाऊ नये
आठवड्यातून एकदाच गोड खावे
हळूहळू परंतु सर्व कर्ज फेडावे
दुर्जनांबरोबर वेळ घालवू नये
ज्या गोष्टींमधून आपल्याला आनंद, समाधान मिळत नाही त्या गोष्टी करण्यात वेळ घालवू नये
समाज माध्यमांवर वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ दिवसाला वापरू नये, इत्यादी.

आयुष्य हे स्पष्टपणे अपूर्णत्व असलेलं आहे. सर्व काही क्षणभंगुर आहे हे काळ आपल्याला शिकवतो. परंतु आयुष्यात आपल्याला काय मिळवायचं आहे हे पक्कं असेल म्हणजेच आपली ईकीगाई पक्की असेल तर प्रत्येक क्षणात इतक्या शक्यता सापडतील की ते क्षण न संपणारे किंवा शाश्वत वाटतील किंवा भासतील.

माझ्या जपानच्या ट्रिपमध्ये ८०-९० वर्षांची माणसे आरामात सायकल चालवताना दिसली की मी स्तब्ध होत असे. माझे एका ठिकाणचे गाईडपण सत्तरीच्या पुढचे होते. आपल्याकडेपण असे शरीर आणि मनाने दणकट आजी-आजोबा आहेत. त्यांची संख्या वाढायला पाहिजे तरच ‘पेन्शनर्स डे’ सारखे दिवस साजरे करताना समाधान मिळेल.

आशा करते की आपणसुद्धा आपली ईकीगाई "Ikigai" ठरवाल आणि आनंदी आयुष्य भरभरून जगाल, त्या ९० वर्षांच्या (आजी)बाईंसारखं!

शुभेच्छा.

उज्ज्वला देशपांडे
ujjwala.de@gmail.com 

Title - IKIGAI: The Japanese secret to a long and happy life (ईकीगाई)
Author - Hector Garcia & Francesc Miralles
Publisher - KRISHNA
Price - Rs. 171

Tags: book review ikigai Load More Tags

Comments:

Santosh Dhage

खूप आशादायक, जगण्याला उभारी देण्यासाठी आणि वयोवृद्ध लोकांना प्रोत्साहन देणारे लिखाण... खूप सुंदर खूप छान

Add Comment