रोज नव्याने दिवस सुरू करायचे काय कारण असते? झोप पूर्ण झालेली असते किंवा पाहिजे तितके झोपता येत नाही, त्याच्यापेक्षा उठलेलेच बरे असे वाटते! शाळा/ कॉलेज/ ऑफिसला जायचे असते किंवा जाणे भाग असते! या सगळ्यापेक्षा आतुरतेने, उत्सुकतेने नवीन दिवस वापरायचा आहे हे किती सकारात्मक आहे.
We are what we repeatedly do.
Excellence, then, is not an act but a habit. ~ Aristotle
आपल्या आवडीचे काम करताना आपल्याला वेळेचे भान रहात नाही, म्हणजे वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. जे काम तेवढ्या आवडीचे नसते किंवा करणे भाग असते, ते काम करताना वेळ संपता संपत नाही. हा अनुभव फक्त कलाकार / शास्त्रज्ञ किंवा नावाजलेल्याच लोकांचा असतो असे नाही तर सर्वसामान्य माणसांना सुद्धा असाच अनुभव येतो.
आमच्या हाऊसिंग सोसायटीत गाड्या धुणारे, घरांची साफसफाई करणारे, कचरा टाकणारे अशोकदादा जरी सुरुवातीला गरज म्हणून ही कामे करायचे तरी आता अनेक वर्ष ही कामे करून त्यांना त्यात आलेलं कौशल्य, कामाची सापडलेली ‘लय’ ही एखाद्या व्यवस्थापन विषयात अभ्यासाची केस स्टडी म्हणून घेता येईल. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळातसुद्धा व्यवस्थित काळजी घेऊन, एकही दिवस सुट्टी न घेता ते काम करत होते. कोणीही न सांगता त्यांचे आठवड्याचे कामाचे 70/80 तास सहज होतात, अगदी रविवार धरून.
तसेच आमच्याकडे सगळ्या घरकामाला येणाऱ्या शोभाताईंचे. रोजचे कामाचे दहा तास. एकाच घरातल्या दोन स्त्रिया – आई-मुलगी, सासू-सून, बहिणी-बहिणी – स्वयंपाक करताना वेगवेगळ्या पद्धतीने करतात. प्रत्येकीच्या वेगळ्या तऱ्हा. त्यातून वेगवेगळे भांड्यांचे (का भांडणांचे?) आवाज किचनमधून निघत असतात. शोभाताई एकदम स्थितप्रज्ञ. शांतपणे त्या-त्या घरातल्या माणसांच्या खाण्याच्या आवडी-निवडी समजून घेऊन, आनंदाने पटापट स्वयंपाक करतात. प्रत्येक घरातली पद्धत वेगळी, त्यांच्या स्वतःच्या घरची पद्धत आणखीनच वेगळी. “कसं जमवता?” विचारल्यावर हळूच हसतात आणि म्हणतात “जमतं ताई, चला चला, बसा गरम गरम भाकरी खायला!”
आमच्याकडे इलेक्ट्रिशिअन म्हणून अनेक वर्षं येणारे मुजुमले दादा - काम, विश्वासार्हता तर अशी की कोणत्याही मॅनेजमेंट कोर्सला ‘कस्टमर सर्विस कशी द्यावी’ हे शिकवायला त्यांना अपॉइंट करावे (आणि माणूस म्हणून तर खूपच चांगले). परत रोज दहा-बारा तास काम करून घरी जाता-जाता एखादे किरकोळ काम आले तरी ते पटकन करून देऊन मग घरी जाणार, कारण नंतर करायला मोकळा वेळ नाहीच.
माझ्या आईची आई, माझी आज्जी कधीही कपाळावर आठ्या न आणता सतत कामात असायची. तीही आनंदाने. तिच्या शब्दकोशात ‘कंटाळा आलाय’ हे शब्दच नव्हते. घरातली सगळी कामे, पाहुणे-रावळे, सणवार करूनही रोजचा तिचा स्वतःचा वेळ ती काढायचीच. मैत्रिणींबरोबर मंदिरात जायला, भरतकाम / विणकाम करायला. दिवसाला बारा-बारा तास काम करणारी आजी शेवटपर्यंत कार्यरत होती. तिचे डॉक्टर म्हणायचे सुद्धा “या तरुणपणी तर किती अॅक्टिव्ह आणि स्मार्ट असतील”. माझ्या घरातल्या इतरही स्त्रिया – आई, मावशी वगैरे – अशाच. समाजात आपल्या घरांमधल्या बहुतांश सगळ्याचजणी अशाच असतात.
आपण सगळेच आपल्या गरजा काय आहेत, आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे, काय हवं आहे, आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत, त्यानुसार काम करत असतो. ही कारणे आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वरूपाची असतात.
माझ्या बघण्यातल्या या लोकांना काम करताना एक लय सापडलेली आहे. त्या लयीच्या मदतीने ते त्यांचे काम मनापासून करतात. त्यांच्या आयुष्यातली आव्हाने व्हाईट कॉलर जॉब्स करणाऱ्यांपेक्षा वेगळी आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणारे काही लोक अतिशय कुशलतेने काम करताना आपल्या आजूबाजूला दिसतात. आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप असते. संघटित क्षेत्रात ७०/ ९०/ १०० तास काम करताना त्याप्रमाणे मोबदला दिला जातो किंवा जाईल, मात्र असंघटित क्षेत्रात यातले कुठलेच फायदे / भत्ते / लाभ नसतात. असंघटित क्षेत्रातील शारीरिक कष्टातील कुशलतेची लय जर आपण शिकू शकलो तर आयुष्यभर आनंद देणाऱ्या कामात आपण स्वतःला गुंतवून घेऊ शकू.
(डिलीव्हरी देणारे - गिग अर्थव्यवस्थेतले कर्मचारी)
गिग अर्थव्यवस्थेतले कामगारसुद्धा प्रचंड वेळ काम करणारे परंतु सामाजिक सुरक्षितता नसणारे. मी जेव्हा ऑनलाईन डिलिव्हरीवाल्यांना स्वतःच्या पाठीवर मोठ-मोठी ओझी घेऊन, वेळा गाठण्याच्या गडबडीत दुचाकीवरून जाताना बघते; तेव्हा चाळिशी / पन्नाशीच्या वयात त्यांच्या पाठीच्या कण्याचे काय होईल या विचाराने अस्वस्थ होते.
व्याख्येच्या दृष्टीने, गिग इकॉनॉमी म्हणजे “ऑन-डिमांड कॉमर्सच्या समर्थनार्थ गिग (किंवा जॉब) आधारावर सेवा देणाऱ्यांना ग्राहकांशी जोडणाऱ्या बाजारपेठांचा संग्रह.” इंटरनेट-आधारित तांत्रिक प्लॅटफॉर्म किंवा स्मार्टफोन अॅप्लिकेशनद्वारे सेवांची विनंती केली जाते. अशा प्रकारे, गिग इकॉनॉमीमध्ये पारंपारिक 'कायमस्वरूपी' नोकऱ्यांऐवजी अल्पकालीन कराराने किंवा फ्री लान्स पद्धतीने काम मिळते, नोकरी नाही. निश्चित वेतनाऐवजी, गिग इकॉनॉमीमध्ये कामगारांना सामान्यतः त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक 'गिग'साठी पैसे दिले जातात. माझ्या दृष्टीने गिग इकॉनॉमी म्हणजे एक प्रकारचा आणि अत्याधुनिक ऑनलाइन मजूर अड्डाच आहे.
जागतिक स्तरावर आणि भारतात गिग आणि प्लॅटफॉर्म वर्क हे रोजगार निर्माण करणारे एक प्रमुख साधन म्हणून उदयास आले आहे. नीती आयोगाचा अंदाज आहे की २०२० मध्ये या क्षेत्रात ७.७ दशलक्ष कामगार होते आणि २०२९-३० पर्यंत ही संख्या तिप्पट होऊन २३.५ दशलक्ष होईल. गेल्या काही वर्षांत या क्षेत्राने कामाच्या व्यवस्थेच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडवले आहेत. त्यामुळे रोजगाराशी संबंधित नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत.
सर्वसाधारणपणे व्हाईट कॉलर जॉबवाले पेन्शन / PF / ग्रॅच्युइटी / विविध प्रकारच्या गुंतवणुका, या आधारे नोकरीनंतरचे आयुष्य / निवृत्तीचे आयुष्य बऱ्यापैकी जगू शकतात किंवा जगत असतात. त्यांना ह्या आर्थिक परिस्थितीमुळे चैन / मौजमजा / एन्जॉयमेंट, इ. चा अनुभव मिळविताना “मी आयुष्यभर (कामावरचे आयुष्य) आठवड्याचे ५०-६० तास राबलो / राबले आहे त्यामुळे आता एन्जॉय करतो / करते आहे, रिलॅक्स होणे हा माझा हक्क आहे, त्यासाठी माझ्या कष्टाचा पैसा माझ्या इच्छेप्रमाणे वापरतो / वापरते आहे असे त्यांना वाटते. अगदी बरोबर. अशा प्रकारची ‘चैन’ असंघटित क्षेत्रात नाही, नोकरीची शाश्वती नाही, आहे ती नोकरी दणदणीत पगार / मोबदला देईल अशीही नाही.
यात एक छोटा उपमुद्दा (खरंतर छोटाही नाही आणि उपमुद्दाही नाही परंतु त्यावर वेगळा मोठा लेख होईल), आत्ताच्या काळात व्हाईट कॉलरवाल्यांना (सगळ्यांनाच नाही) चैन / मौजमजेसाठी निवृत्तीची वाट बघायची गरज नाही, निवृत्त व्हायच्या आधीच लाइफ एन्जॉय करून झालेले असते. असंघटित क्षेत्रातले कामगार (परत सगळे नाहीत) ‘आत्ताचा’ विचार करून लाईफ एन्जॉय करायचा प्रयत्न करीत असतात, कारण भविष्यात ठाम असे काही नाहीच.
(असंघटित घरगुती कामगारांसाठी निवृत्तीची / भविष्याची सोय काय?)
त्यामुळे परत ‘काम’ का करायचे याची उत्तरे व्यक्तीगणिक बदलतील आणि ती त्या-त्या व्यक्तीच्या दृष्टीने बरोबर असतील. अशा सर्व परिस्थितीत स्त्रियांचे असंघटित क्षेत्रातील जगणे अजूनच आव्हानात्मक – आताशा संघटित व्यवस्थेत बायकांना मासिक पाळी रजा मिळते, बाळंतपणाची आहेच. असंघटित क्षेत्रातल्या स्त्रिया कसे जगत असतील?
कामाच्या तासांचा आणि कामाच्या परिस्थितीचा विचार करताना फक्त संघटित, व्हाइट कॉलर जॉब्सवाल्यांचाच आवाज/ निषेध ऐकायला येतो. असंघटित कष्टकऱ्यांचा आवाज ‘तिसऱ्या नंबरच्या’ अर्थव्यवस्थेत ऐकायलाच येत नाही. पुढील काळात एक नंबरची अर्थव्यवस्था बनण्याची इच्छा असताना आपण या आवाजाला दुर्लक्षित करून चालणार नाही.
३७,००० हून अधिक लोकांनी आपले मत मांडलेल्या सार्वजनिक मतदानानंतर, २०२४ साठी ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 'ब्रेन रॉट' असल्याचे जाहीर झाले आहे. 'मेंदू कुजणे' चा पहिला रेकॉर्ड केलेला वापर १८५४ मध्ये हेन्री डेव्हिड थोरो यांच्या 'वॉल्डेन' या पुस्तकात आढळला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात सर्व लोक ८०-८० तास काय काम करणार? शारीरिक श्रमांना आणि ते करणाऱ्या कष्टकऱ्यांना समाजाने प्रतिष्ठा न देऊन कुजवलेच नाहीये का?
मी हा लेख लिहीत असतानाच बातमी आली ‘आठव्या वेतन आयोगाची घोषणा’. सरकारी क्षेत्रात तर कामाच्या बाबतीत इतकी बदनामी आहे की तासन् तास नाही पण निदान तासभर तरी प्रामाणिक काम करावे ही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा, एक मैत्रीण लग्नासाठी ‘योग्य वर’ शोधताना तिला आलेला अनुभव – हा लग्नाळू मुलगा नोकरीसाठी अमेरिकेत निघालेला; घरी फक्त आईच, पण अंथरुणाला खिळलेली. लग्न करून बायकोने आईपाशी राहून तिला संभाळायचे, हा परदेशात राहणार. मैत्रीण म्हणाली त्याला “तू बायको नको नर्स किंवा केअरटेकर शोध”. त्यावर त्याचे उत्तर होते “तिथे पैसे द्यावे लागतील”!!
(गृहिणीचे कामाचे तास कसे मोजणार?)
हे सांगायचे कारण जगभरातल्या विनामोबदल्यात २४×७ काम करणाऱ्या गृहिणी. त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांच्या कामाच्या तासांबद्दलही काही विचार करूयात. ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ त्यांच्यासाठी नाही का? बीबीसीवरच्या एका चर्चासत्रात भाग घेणाऱ्या वेगवेगळ्या बॅकग्राउंडच्या स्त्रियांनीही हेच सांगितले होते की, त्यांच्या घरातल्या पुरुषांना असे वाटते की छोट्या छोट्या उडणाऱ्या पऱ्या येऊन सगळी कामे करतात. ह्या छोट्या छोट्या उडणाऱ्या पऱ्यांनाही ‘दिल ढूँढता है फिर वही फ़ुर्सत के रात दिन..’ असं वाटतच असेल ना!
- उज्ज्वला देशपांडे
ujjwala.de@gmail.com
(लेखातील सर्व फोटो इंटरनेटवरून साभार)
Add Comment