कोरोनाकाळात आमचे शिक्षण’ या स्पर्धेविषयी प्रसिद्ध केलेल्या निवेदनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांतून मिळून 78 शिक्षक/मुख्याध्यापक यांनी त्यांच्या स्वतःच्या किंवा त्यांच्या संस्थेच्या कामाविषयीची टिपणे पाठवली. या स्पर्धेतून निवडलेले सर्वोत्तम पाच लेख सलग प्रसिद्ध केले जात होते. या स्पर्धेत चौथे आणि पाचवे परितोषिक मिळवलेल्या या दोन छोटेखानी लेखांनी या उपक्रमाची सांगता होत आहे.
मुले शिकण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब
शाळा बंद झाल्यामुळे आम्ही सर्व शिक्षक घरीच होतो. या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचा विचार आम्ही करू लागलो. अनेक वर्षांपासून वर्गणीदार असलेली आणि जपून ठेवलेली विविध मासिके उदाहरणार्थ, शिक्षण संक्रमण, साधना साप्ताहिक, किशोर वाचू लागलो. पुस्तकांशी मैत्री केली. वाचनाचा सपाटाच लावला. काही प्रमाणात वेळेचा सदुपयोग झाला.
दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द झाला. इतर वर्गांचे निकालही अंतर्गत गुणांवर ठरले. मी आणि माझे सहकारी शाळेत जात होतो. विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात होतो. मन अस्वस्थ होत होते. यातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक होते. आमच्या विद्यालयात सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालकांशी फोनवर संपर्क करायला सुरुवात केली. ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग सापडला.
ऑनलाईन शिक्षण देण्यातही अनेक समस्या समोर दिसत होत्या. शाळा तालुक्याच्या ठिकाणची... पण आजूबाजूचा सर्व परिसर आदिवासी आणि ग्रामीण. पालकांची आर्थिक परिस्थिती; विद्यार्थ्यांचा प्रतिसाद; मोबाईल, संगणक या साधनांची उपलब्धता; परिसरातील भीतीचे वातावरण; आरोग्यविषयक प्रश्न आणि निर्माण झालेली नकारात्मक भूमिका या सर्व समस्यांमधून मार्ग काढत काम सुरू झाले.
पालकांशी संपर्क करायला सुरुवात केली. शाळेची भूमिका आणि आजूबाजूची परिस्थिती त्यांच्यापुढे मांडली. त्यांनी मुलांना मोबाईल देण्याचे मान्य केले. कोरोनाची वैज्ञानिक माहिती त्यांना दिली. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील वीण घट्ट होण्यास सुरुवात झाली.
विद्यालयातील ज्या शिक्षकांना तंत्रज्ञान अवगत आहे त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून इतर शिक्षकांना मार्गदर्शन केले. झूम ॲप, व्हॉट्सॲप, गुगल क्लासरूम, टेस्टमॉज (Testmoz), गुगल फॉर्म यांबद्दलची माहिती शिक्षकांना दिली.
विद्यार्थ्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले. त्यांवर अभ्यास दिला जाऊ लागला. विविध विषयांचे कन्टेन्ट, फोटोज्, व्हिडिओज्, वेगवेगळ्या विषयांच्या पीडीफ्स पाठवण्यास सुरुवात केली... पण अँड्रॉईड मोबाईल नसल्याने काही विद्यार्थी या सगळ्यापासून वंचित होते. साधा मोबाईल असलेल्यांना एसएमएसद्वारे अभ्यास दिला. जास्तीत जास्त विद्यार्थी कसे जोडले जातील यासाठी प्रयत्न सुरू केला.
झूम ॲपद्वारे अध्यापन
व्हॉट्सॲपपाठोपाठ झूम ॲपद्वारे अध्यापन सुरू केले. शिक्षकांनी मोबाईलचा आणि संगणकाचा वापर करून अध्यापन सुरू केल्यामुळे विद्यार्थी-भेट होऊ लागली. सर्व शिक्षकांशी चर्चा करून ऑनलाईन अध्यापनाचे वेळापत्रक तयार केले. त्यामुळे सुनियोजित अध्यापन सुरू झाले. शाळेतील शैक्षणिक साहित्याचा उपयोग केला जाऊ लागला. विद्यार्थ्यांची आवड, गरज आणि क्षमता यांचा विचार केला जाऊ लागला.
टिली मिली कार्यक्रम
शाळेतील झूम ॲपद्वारे अध्यापनाचे नियोजन करताना सह्याद्री वाहिनीवरील टिली मिली कार्यक्रमापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही असे नियोजन केले. त्याचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना दिले. प्रत्यक्ष फोन करून त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
दीक्षा ॲपच्या आणि क्यूआर कोडच्या वापराबद्दलची माहिती शिक्षकांना दिली. पुस्तकांच्या पीडीफ्स आणि व्हिडिओज् डाऊनलोड करणे, त्यांचा अध्यापनात उपयोग याचे मार्गदर्शन केले. 13 एप्रिल 2020पासून मा. शिक्षण संचालक श्री.दिनकर पाटील यांच्या कल्पनेतून ‘शाळा बंद... पण शिक्षण सुरू’ हा उपक्रम सुरू झाला. सुरुवातीला याकडे जरा दुर्लक्ष झाले... परंतु त्याची उपयुक्तता समजल्यावर सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना त्याचा उपयोग करण्यास सांगितले.
दीक्षा ॲपचा वापर करण्याचे तंत्र अवगत करून घेतल्याने अध्ययनात त्याचा वापर करणे सोपे झाले. झूम ॲप किंवा व्हॉट्सॲप उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांच्या तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. शारीरिक अंतर ठेवून शिक्षकमित्रांनी गृहभेटीचा उपक्रम राबवला.
सेवानिवृत्त शिक्षकांचे मार्गदर्शन
अध्ययन व अध्यापन अधिक चांगल्या प्रकारे कसे होईल याचे मार्गदर्शन आमच्या संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांकडून त्यांना प्रत्यक्ष भेटून घेतले. संस्थेतील त्यांच्या दीर्घ अध्यापनाचा फायदा शिक्षकांना... पर्यायाने विद्यार्थ्यांना झाला.
प्रकट वाचन योजना
विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप झाल्यानंतर दैनिक वाचन योजना राबवली. मराठी, हिंदी, इंग्लीश, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचा दररोज एक धडा वाचण्यास सांगितले. घरात आईला ऐकू जाईल एवढ्या आवाजात प्रकट वाचन करण्यास सांगितले. वाचनाने विद्यार्थ्यांचे उच्चार, शब्दसंग्रह, व्याकरण आणि अभ्यासघटक यांचा विकास आपोआप होईल, वक्तृत्व सुधारेल... मात्र याचा फायदा दीर्घ काळाने दिसेल. वाचनासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
विविध स्पर्धांचे आयोजन
विद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्गानुसार गट पाडून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव केला.
व्हिडिओ कॉलिंग योजना
ऑनलाईन अध्यापन ही एकेरी चालणारी प्रक्रिया आहे. शाळा बंदमुळे विद्यार्थी घरीच आहेत. शिक्षकांविषयी जवळीक निर्माण व्हावी यासाठी व्हिडिओ कॉलिंग योजना राबवली. विद्यार्थ्यांना आपले शिक्षक आपल्याशी प्रत्यक्ष मोबाईलवर बोलताना दिसल्यामुळे आनंद झाला.
ऑनलाईन परीक्षा
ऑनलाईन अध्यापनाची फलनिष्पत्ती काय याचाही पडताळा घेणे आवश्यक होते. यासाठी ऑनलाईन चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन केले. टेस्टमॉज, गुगल फॉर्म, आणि आवश्यक तिथे झेरॉक्स प्रती देऊन विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. विद्यार्थी सहभाग वाढला... त्यामुळे विद्यार्थी अधिक सक्रिय होऊ लागले.
- सुरेश आंबरे
suresh.ambre1@gmail.com
अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अकोले
ता. अकोले, जि. अहमदनगर
मुलांबरोबर शिक्षकांनीही गिरवले ऑनलाईन शिक्षणाचे धडे
ऐन परीक्षेच्या काळात लॉकडाऊन सुरू झालं. शाळा प्रत्यक्ष भरत नव्हती. विद्यार्थी आणि पालक यांच्यापर्यंत आभासी पद्धतीने, तंत्रज्ञानाच्या मदतीने पोहोचण्यास सुरुवात केली. अध्यापन कौशल्याची परीक्षा पाहणारे हे नवे आव्हान आम्ही स्वीकारले.
सर्व इयत्तांसाठी वेळापत्रक निश्चित करून वर्गाचे स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले. विद्यार्थ्यांना झूम ॲपच्या वापराची माहिती दिली. अध्यापन सुरू झाले. यादरम्यान पाठाची तयारी नव्या पद्धतीने करावी लागली. तंत्रज्ञानाच्या वापरात, मोबाईल हाताळण्यात विद्यार्थी आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक तयारीचे असल्याचा अनुभव आला... त्यामुळे शिकणे-शिकवणे याची ही नवी पद्धत आत्मसात करणे सर्वांना सोपे झाले. घरी केलेला अभ्यास विद्यार्थी आमच्याकडे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवू लागले. आपले हे नवे काम यशस्वी होत असल्याचा अनुभव आला.
शैक्षणिक साहित्यनिर्मिती
कमीत कमी वेळात विद्यार्थ्यांना अधिकाधिक अध्ययन अनुभव देण्यासाठी स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल सुरू केले. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार केले. ते यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड केले. पाठाच्या अनुषंगाने पीडीएफ फाइल्स तयार केल्या. हे पाहून विदयार्थ्यांच्या अभ्यासाबद्दलची पालकांचीही काळजी कमी झाली. त्यांच्यात समाधानाची भावना निर्माण होऊ लागली.
लेखक आपल्या भेटीला
पाठ्यपुस्तकात पाठ, कविता असणाऱ्या महेंद्र कदम, विरा राठोड, निलिमा गुंडी, आसावरी काकडे या लेखकांशी, कवींशी संपर्क साधला. त्यांना ऑनलाईन पाठ घेण्याची, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा अनुभव विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप आवडला. ते उत्साहाने मिटिंगद्वारे लेखक-लेखिकांशी, कवी-कवयित्रींशी संवाद साधू लागले, चर्चा करू लागले. मुले अभिव्यक्त होऊ लागली. विद्यार्थ्यांना लेखक, लेखिका यांना प्रत्यक्ष पाहता आले.
इंटरनेटवरून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लॉकडाउनच्या काळात पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर येथील आणि इतर जिल्ह्यांतील शिक्षकांना नववी-दहावीच्या वर्गांचे मराठी पाठ्यपुस्तकांतील पाठ, उपयोजित लेखन, व्याकरण यांबद्दल गुगल मीट व झूम मिटिंग यांद्वारे दि. 28 जून ते 30 ऑगस्ट 2020 या काळात मार्गदर्शन केले. यादरम्यान ऑनलाईन शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानचा वापर, यांमुळे अध्यापनाची नवीन दिशा मिळत गेली. तंत्रज्ञानाबाबतली साक्षरता वाढत गेली. महाराष्ट्रातल्या अनेक तज्ज्ञ शिक्षकांशी झालेल्या चर्चांतून नवीन अनुभव ऐकायला, शिकायला मिळाले.
सांगली जिल्ह्यातील मराठी अध्यापकांसाठी उपक्रम
सांगली जिल्ह्यातील मराठी अध्यापकांसाठी दिनांक 5 जून ते 28 जून 2020 या कालावधीत ऑनलाईन मार्गदर्शन हा उपक्रम राबवला. यासाठी मराठी अध्यापक संघाची मदत झाली. यामध्ये मराठी पाठ्यपुस्तकांतील मंडळाच्या सदस्यांनी आणि माझ्यासह इतर जिल्ह्यांतील तज्ज्ञ शिक्षकांनी तसेच काही लेखकांनी आणि कवींनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
या उपक्रमात जिल्ह्यातील मराठी विषयशिक्षकांचा चांगला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया मिळाल्या. शिक्षकांना अध्ययन-अध्यापनातील अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी शिकता आल्या. अध्ययनात किती रंजकता आणता येते हे शिकायला मिळाले. विषयाचा व्यासंग कसा वाढवता येईल याचे मार्गदर्शन मिळाले. घरबसल्या दर्जेदार पाठानुभूती मिळाली. पाठ अध्यापनाबाबतचा दृष्टीकोन विस्तारला. आपल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले शिक्षण कसे देता येईल याचा विचार करून प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली.
इ-बुक तयार करण्यात सहभाग
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत नववी-दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाचे इबुक तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये, तसेच प्रत्येकी एका गद्य आणि पद्य पाठाचे व्हिडिओ तयार करून घेण्यामध्ये शिक्षकांसोबत विद्यार्थीदेखील सहभागी झाले.
कोरोनाच्या धक्क्यातून सावरायला इतरांना जेवढा वेळ लागला त्याहून कमी वेळात शिक्षक सावरल्यासारखे वागू लागले. आत्तापर्यंत आम्ही फक्त संगणक साक्षर होतो... पण आता आम्ही संगणक-स्मार्टफोन हाताळण्याची नवनवीन कौशल्ये शिकलो, ती आत्मसात केली. एकाच वेळी आपल्या घरातून, शाळेतून अनेकांपर्यंत पोहोचण्याचे कसब आत्मसात केले. त्यातून आम्हाला अध्ययन-अध्यापनाच्या नव्या पद्धती, तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करणे यांबाबत नवी दृष्टी मिळाली. एकूणच शिकवणे या प्रकियेबरोबर शिकणे ही प्रक्रियाही सफल होऊ लागली.
- वैशाली आडमुठे
vaishaliadmuthe1008@gmail.com
यशवंतनगर हायस्कूल, यशवंतनगर (सांगली)
ता. मिरज, जि. सांगली
'कोरोना काळात आमचे शिक्षण’ या स्पर्धेसंबंधी इतर लेखही वाचा
या स्पर्धेविषयी मनोगत - शिक्षणाचा अनुबंध कायम राहावा यासाठी...
या स्पर्धेच्या परीक्षकांचे मनोगत - कोरोनाकाळ - शिकणं जगण्याशी जोडण्याचा काळ
या स्पर्धेत पहिले परितोषिक मिळवणारा लेख - स्वयंशिक्षणाला पालकांची साथ
या स्पर्धेत दुसरे परितोषिक मिळवणारा लेख - विद्यार्थी, पालक यांच्या सतत संपर्कातून शिक्षण
या स्पर्धेत तिसरे परितोषिक मिळवणारा लेख - ऑनलाईन शिक्षणाला सहशालेय उपक्रमांची जोड
Tags: स्पर्धा कोरोना काळातील आमचे शिक्षण शिक्षक चौथे पारितोषिक पाचवे परितोषिक सुरेशआंबरे वैशाली आडमुठे Series Our education in the time of corona Teacher Forth Prize Fifth Prize Suresh Ambre Vaishali Admuthe Load More Tags
Add Comment