कोरोना:एकांतवासाची अनमोल संधी

Photo Courtsey: shutterstock.com

आठ दशकांपेक्षा अधिक असलेल्या माझ्या जीवनात असे स्वप्नातही वाटले नव्हते की एक अतिशय छोटा अदृष्य विषाणू सारे जग इतक्या झपाट्याने बंद करू शकेल. सारेच अजब! चीनमधून आलेला हा विषाणू इटालीसारखा रम्य देश जवळजवळ उध्वस्त करत आहे, तो जगातील साऱ्या मानवी जीवनाला मालवून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. हे सारेच अघटित आहे. सरकारची झोप उडवणाऱ्या आणि झपाट्याने पसरणाऱ्या या कोरोनाच्या साथीपेक्षा ‘पुढे काय वाढून ठेवलेले आहे’ या भीतीने समाजाला ग्रासून टाकलेले आहे. मनात विचार येतो, की गेली तीनशे वर्षे माणसाने निसर्गावर सातत्त्याने केलेल्या अत्याचाराबद्दल निसर्ग आपल्याकडून जबाब मागत असावा. कदाचित चीनने जगावर लादलेले हे तिसरे आणि महाभयंकर महायुध्दही असू शकेल. चीन हे करू शकतो? परमात्मा जाणे! 

या विषाणूने आज एका बाजूला साऱ्या मानवी समाजाला आपापल्या घरात बंदिस्त करायला भाग पाडले आहे आणि दुसऱ्या बाजूला तो विविध राज्यकर्ते, समाजसेवक, आरोग्यसेवेतील डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांची परीक्षा घेत आहे. ही सारी मंडळी या विषाणूपासून आपणा सर्वांचे रक्षण करण्याची नि:स्वार्थपणे पराकाष्टा करत आहेत. टेलिव्हिजनवर दिसणारी दृश्ये पाहून असे दिसते, की आज असाही एक मोठा वर्ग आहे ज्यांना या संकटाच्या तीव्रतेची समज नसावी आणि समाजाला आणि त्यांना स्वतःला असलेल्या धोक्याची उमज नसावी. देव आमचे रक्षण करेल अशी त्यांची खात्री असल्याचे दिसते. ती त्यांची अपेक्षा खरी ठरो अशी माझीही अपेक्षा!

दिल्लीत जमलेल्या मुस्लीम धर्मगुरूंना या विषाणूने शिकवलंय की त्यांचा अल्लासुध्दा त्यांना यापासून वाचवणार नाही. त्यांच्यावरच स्वार होऊन त्या विषाणूने देशातील विविध प्रांतात होणाऱ्या थैमानात खूप बाजी मारली! आज सर्वधर्मीय देवही आपापल्या घरात बंदिस्त आहेत. आज जगाचे भविष्य अनिश्चित आहे हे नक्की. ही महामारी कधी संपेल हे सुद्धा अगदी अनिश्चित. मात्र या सर्वांची सामाजिक आणि आर्थिक किंमत जबर असणार आहे हे मात्र निश्चित.

माणसाचे मन आणि त्याची कल्पनाशक्ती कल्पनातीत आहे. माणसांनीच आजचे आधुनिक जग निर्माण केले आहे, प्रत्येक प्रश्नाला अचूक उत्तर शोधलेले आहे. अनेक बाबतीत निसर्गावर मातही केली आहे. प्रत्येक संकट ही त्याने संधी मानली आहे, त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे की हा विषाणू माणसापुढे टिकणार नाही. थोडा वेळ लागेल आणि तोवर हा विषाणू आपली किंमत वसूल करेल इतकेच.    

हातातोंडाची गाठ घालून देण्यात गुंतलेल्या देशातील प्रचंड गरीब समाजाला मात्र आजची आणि उद्याची भ्रांत सतावत आहे. काम नाही, दाम नाही आणि कशाला उत्तरही नाही. आजारपणाची काळजी आहे. खायला मिळाले तरी लोकांच्या दयेवर जगणे. हे सोपे नाही. या विषाणूच्या क्रूरतेची ही पराकाष्टा आहे. घर नाही त्यांनी कुठल्या घरात बंदिस्त व्हायचे? फुटपाथवर जगणारे कुठे जाणार? धर्मस्थाने बंद, देवसुध्दा देवघरात, गाभाऱ्यात बंदिस्त. सारा देश या विषाणूच्या, COVID19 च्या संकटनिवारणात गुंतलेला, या फुटलेल्या आभाळाला कुठे-कुठे ठिगळ लावणार?

ज्यांना घर आहे अशा साऱ्यांना या कोरोनाने आपापल्या घरात बंदिस्त केले आहे. या विषाणूने आपल्या सर्वांना दिलेली ही दीर्घ सुट्टी आहे. खरतर ही एक संधी आहे. सारे कुटुंब एकत्र नांदते आहे, त्यामुळे मुले आणि आजी-आजोबा आनंदात आहेत. सगळ्यांकडे माणसांशी संवाद टाळणारे स्मार्टफोन असले तरी कुटुंबातील एकमेकांमधील संवाद वाढतो आहे. एकमेकांची नव्यानेच ओळखही होत आहे. वाद असले तरी संवादातून हे वादळ शमत आहे. 

पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आज मिळालेली एकांताची अप्रतिम संधी! हा एकांतवास म्हणजे स्वतःला जाणून घेण्याची एक नामी संधी आहे. बाहेर जाता येत नाही हे जरी खरे असले तरी, स्वतःच्या मनात खोलवर डोकावण्याची ही एक अनमोल संधी आहे हे नक्की.

आपापल्या घरात बंदिस्त असलेल्या नोकरदार आणि स्वायत्त व्यवसायात असलेल्या प्रौढ व्यक्ती आज ट्राफिक जाम, डेडलाईन्स, टार्गेट्स वगैरेंच्या दगदगीच्या दिनक्रमातून मुक्त आहेत. आजवर या सर्व धावपळीत स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसे. क्षणभर थांबून स्वतःच्या आयुष्याकडे नजर टाकावी यासाठी फुरसत नव्हती. आता फुरसतच फुरसत आहे. एकांत आहे, स्वतःसाठी वेळ आहे. शांतता आहे. हा एकांतवास चिंतनासाठी उत्तम. त्यासाठी आपण सर्वांनी चीनचे आणि  COVID19 चे आभार मानायला हरकत नाही.  

या एकांतवासात चिंतनासाठी मार्ग दाखवतात आपले संत- निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव आणि तुकाराम. हा सुद्धा एक ज्ञानमार्गच आहे. संन्यास घ्या, ज्ञानोपासना करा आणि ज्ञानाची शिडी (सोपान) चढून गेलात की मुक्ती! मग उमजते की, 'एकनाथ; देवशक्ती एकच. पुढे ज्ञानाची उपासना केली की उमजते देव हा नामपुरता; नामदेव! आणि शेवटी तुकाराम; तु का राम?'. 75 वर्षांपूर्वी आमच्या नूतन मराठी विद्यालयामध्ये पाचव्या इयत्तेत असताना आमच्या बापट गुरुजींनी आम्हाला हे सार सांगितले आणि ते मनात खोलवर रुजले. आजही ते ताजे आहे.

आज बऱ्याच मंडळींना आला दिवस पुढे ढकलणे कठीण झाले आहे. वेळ जात नाही. काय घडतंय ते दिसतंय पण त्याचे कारण समजत नाही. त्यावर उपाय दिसत नाही. ही मनस्थिती बदलायची असेल तर या आयत्या मिळालेल्या एकांतवासात राहून आपल्या अंतर्मनात डोकावणे फायद्याचे आहे आणि जरुरीचे सुध्दा! 

विसाव्या शतकातील तत्ववेत्ती, हॅना अरेंडीट लिहिते, “खरेतर खोलवर विचार करण्यासाठी एकांत आवश्यक. एकांत हा मी आणि माझे मन यांमधील संवाद आहे. पण या संवादाचा संपर्क सभोवतालच्या जगाशी, स्वजनांशी कायम निगडीत असतो कारण ते सारे आपल्या व्यक्तित्वाचाच भाग आहेत.” तर तत्ववेत्ता सॉक्रेटीस म्हणतो, “तावूनसुलाखून न घेतलेले जीवनच व्यर्थ”. आपल्या गतजीवनाकडे नव्याने नजर टाकण्याची ही संधी आहे. जगात आणि आसमंतात होणाऱ्या बदलांच्या संदर्भात स्वतःचे जीवन, आपले कट्टर विश्वास आणि आपल्या धारणा तपासण्याची एक नवी संधी कोरोना आपल्याला  देत आहे. 

आज सर्वसाधारण व्यक्तीला सारे काही घाईत अपेक्षित असते. जल्दी करो! धिमेपणा बिलकुल खपत नाही. प्रवासाला हवी तेजीत धावणारी गाडी, ट्राफिकमध्ये थांबावे लागले की जीवाची तगमग, विमानाने जायचे असेल तर आणखीनच जास्त चिंता! आम्ही सतत कुठल्या ना कुठल्या चिंतेने ग्रासलेले. 

कमी उत्पन्नाची चिंता तर अनेकांची पाठ सोडत नाही. देशाचा जीडीपी कमी झाला की चिंता आणि त्यावर उपाय सुचवण्याची क्षमता नसली तरी तावातावाने चर्चा. ही वाढ सामाजिकदृष्ट्या आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांच्या दृष्टीकोनातून पाहण्याचे भान नाही. दरवर्षी जीडीपी वाढला नाही की जीवाची घालमेल. ही विकतची चिंता. उत्तर माहीत नसले की ते शोधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याऐवजी नुसत्या प्रश्नांचीच चिंता! 

आजचे जीवन हव्यासाने व्यापलेले आहे. सारे सुखासाठी, आर्थिक श्रीमंतीसाठी वखवखलेले. उद्योगांना सतत वाढ हवी. टी-ट्वेंटी सामना आपण सतत जिंकला पाहिजे. अनेक लैंगिक आकर्षणात अडकलेले, त्यामुळे हवालदिल झालेले. प्रेमभावना नाही केवळ लैंगिक आकर्षण. फडके, खांडेकर यांच्या कादंबऱ्यांतील प्रेमकथा आज असल्यातर फारच थोड्या. तरुणांचे लक्ष शरीरावर, मनावर नाही त्यामुळे बलात्कारांना उत. आपण कसे आहोत याच्यापेक्षा आपण कसे दिसतो आणि नटतो यावर बहुतेकांचा जोर. मनोरंजनात बीभत्सपणा जास्त. आजवरचे कोरोनापूर्व जग हे असे आहे!  

आजच्या स्मार्टफोनच्या जगात माणसाला मिळणाऱ्या माहितीत असंख्यपटीने वाढ झालेली आहे. त्याचे मोठे ओझे अनेकांच्या डोक्यावर आहे. माहितीची संख्या वाढली पण खोली कमी झाली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील जाहिराती माणसाच्या हावेला खतपाणी घालत आहेत. अनावश्यक गोष्टी आवश्यक करण्याचे कसब अमेरिकन धंद्यांनी जगाला दिले आहे. अनेकांना रिबॉकच्या बुटांशिवाय चालता येत नाही, पिझ्झाशिवाय जेवण रुचत नाही. माध्यमांद्वारे आपल्या जीवनाचा ताबा अनावश्यक वस्तू बनवणाऱ्या उद्योगांनी घेतला आहे. ब्रॅन्ड नसेल तर वस्तू रुचत नाही. आज आम्हाला झटकन कंटाळा येतो. सतत काहीतरी नवे हवे! काही अनपेक्षित झाले की राग अनावर होतो किंवा भीती वाटते. एकटेपणाची भीती वाटते. शांतता खायला उठते. 

आजचे जीवन प्रचंड गतिमान झाले आहे. गती नसेल तर आपल्याला कंटाळा येतो, काहींना अनामिक भीती ग्रासते. साऱ्या जगाची गतिमानता कोरोनाने एका महिन्यात थांबवली. आणि जीवनाची एक नवी बाजू आपल्याला दाखवली. परिस्थितीने आपल्याला अंतर्मुख केले आहे. हा एकांतवास अतिशय महत्त्वाचा आहे, जरुरीचा आहे. आजवरच्या जीवनाचे ऑडीट करण्याची ही संधी आहे.

गांधीजींनी जीवनातील साधेपणा आणि संथपणा याचे सौंदर्य आपल्याला दाखवले आहे. अमेरिकेने निर्यात केलेली भक्षक हाव कुरूप आहे, कारण त्यात अंतर्मनाच्या आवाजाला जागा नाही. आत्मीयतेला महत्त्व नाही. ते गतिमान आणि जीवघेण्या स्पर्धेत रमले आहे. संथपणातले सौंदर्य त्यात नाही. निसर्गावर मात करण्याचा त्यांचा विफल प्रयत्न आहे. त्याची किंमत आज साऱ्या जगाला मोजावी लागत आहे. आणि ते बदलण्याची ही संधी आहे.

आपल्या संतांप्रमाणे गांधीजी ज्ञानसाधनेला अतिशय महत्व देत. शुमाखर यांच्या ‘स्मॉल इज ब्यूटीफुल’ या पुस्तकात गांधीजींच्या विचारांवर सविस्तर भाष्य आहे. या कोरोनानंतरच्या जीवनाला दिशा देण्यासाठी ते पुस्तक वाचायला हवे. हव्यास आणि त्याउलट साधेपणा, साधेपणाचे फायदे-तोटे जाणण्यासाठी आणि प्रगतीचा योग्य अर्थ समजून घेण्यासाठी ‘स्मॉल इज ब्यूटीफुल’ जरूर वाचा. 

'जीवनाची दिशा पालटणे का गरजेचे आहे', हे यथार्थपणे उमजण्यासाठी दिशा दाखवणारे दुसरे पुस्तक म्हणजे एरिक फ्रॉम यांचे ‘दी आर्ट ऑफ लव्हिंग’. एरिक फ्रॉम लिहितात, “गतिमान जीवनाचा आणि सतत नाविन्याचा पाठपुरावा करणे मनाच्या अस्वस्थपणाचे लक्षण आहे. हव्यासाला अंत नसतो. दुसऱ्याची बरोबरी करण्यात स्वतःला कमी केले जाते. उद्योजकांनी चेतवलेल्या व न संपणाऱ्या या हावरेपणाला लगाम लावायचा असेल तर आपली अर्थव्यवस्था अमुलाग्र बदलावी लागेल. हे अवघड असले तरी जीवनाच्या आणि पर्यावरणाच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला ते करावे लागेल”. मला वाटते कोरोनामुळे मिळालेला एकांतवास त्याची नांदी होऊ शकेल.
  
प्रत्येकाच्या जीवनात अशी एक वेळ येते, जेव्हा शांतता आणि एकांतवास यांची जरुर पडते. आज ते एका सूक्ष्म विषाणूने शक्य केले आहे. आपण आपल्या ‘कोरोना एकांतवासात’ केलेल्या आत्मपरीक्षणानंतर आपल्या जीवनाला नवी दिशा मिळो.

- प्रभाकर देवधर, मुंबई 
psdeodhar@aplab.com

(लेखक, APLAB Group of companies चे संस्थापक असून ते भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक कमिशनचे माजी अध्यक्ष होते. 1986-88 या काळात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे तंत्रज्ञान सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भारत-चीन संबंधांवर त्यांनी  'Cinasthana Today – Viewing China from India' हे पुस्तकही लिहिले आहे.) 

Tags:Load More Tags

Comments: Show All Comments

Nikita sunil magdum

सुंदर विचार आहेत.

Manjiri Deshmukh

आपल्या आयुष्याला धीर व दिशा देणारा लेख. कोरोनामुळे मनात एक अनामिक भिती आहे, त्याच भितीच्या विरोधात लढण्याचे बळ ह्या लेखांमुळे मिळेल..

Sonali Rajaram Raut

Vichar karyla lavnar lekhan mast ahe sunar vichar ahet

Manohar Dhondu Kajrolkar

कोरोना निमित्त सद्य जीवनावर परखड पण अंतर्मुख करणारे विचार.

Anjani kher

चीनचा कणभर सुद्धा गौरव हा अस्थानी आणि निषिध्द आहे.

योगेश पाटील

मार्मिक लेख.

राही

लेखाचे शीर्षक वाचून मोठ्या अपेक्षेने वाचायला घेतला..पण हाती विशेष काही आले नाही.

Milind vasant patil

विचार करायला लावणारं लेखन

दिलीप रा. शिंदे

सद्य परिस्थितीची चौफेर जाणीव करूण देणारा लेख असुन भविष्यातील जिवण जगण्यासाठी प्रत्येकाने स्वतास साधेपणाने , सजगतेने सिध्द करावे तरच भविष्यातील स्पर्धा व दु:ख कमी होतील.

दत्ताराम जाधव

चीन युद्ध पिपासू आहे आणि जगाला घातक आहे, त्यापासून सावध राहायला हवे हे डॉ. आंबेडकरांनी आठ दशकांपूर्वी जाहीर केले.

Santosh Kandekar

Sir tumache manapasun abhar, atishay sunder.

Add Comment

संबंधित लेख