बलाढ्य चीन भारताला का घाबरतो?

भारताशी मैत्री करणे चीनसाठी फायदेशीर ठरणार आहे.  

भारत आणि चीन यांच्यातल्या युद्धाच्या शक्यतेविषयी काही परदेशी आणि देशी वृत्तपत्रांमध्ये चर्चा सुरू आहे. लडाखमधल्या भारत-चीन सीमेवर अलीकडेच झालेल्या झटापटीनंतर ही युद्धाची चर्चा सुरू झाली आहे. यानिमित्ताने भारत-चीन युद्धाची शक्यता आणि ‘चीन भारताला का घाबरतो?’ या दोन्ही गोष्टींचा ऊहापोह करूया... 

भारत-चीन युद्धाची शक्यता 

भारतीय सीमेवर होणाऱ्या झटापटी काही नव्या नाहीत... मात्र अलीकडच्या काळात भारताची लष्करी तयारी अनेक पटींनी वाढलेली आहे. देशाच्या सीमांवर अधिक कसोशीने गस्त सुरू आहे आणि त्यामुळे चीन अस्वस्थ आहे. लडाखमधल्या सीमेवर झटापट प्रथम कोणी सुरू केली यावरून दोन्ही देश एकमेकांना दोष देत आहेत. ‘दोन्ही देशांच्या कमांडर्सनी 6 जूनला भेटून सीमेवरचा तंटा सामोपचाराने मिटवण्याचे ठरवले आहे.’ असे वक्तव्य चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वू शिआन यांनी या तणावानंतर केले होते. त्यांच्या या वक्तव्याकडे पाहता युद्धाच्या वावड्या अनुचित आहेत असे दिसते.  

त्यातच कोरोनामुळे चीन जगभराचा खलपुरुष झाला आहे. 2013मध्ये शी जिनपिंग चीनचे कायमस्वरूपी अध्यक्ष झाल्यापासून चीन आपले दंड थोपटू लागला आहे. चीनचा खरा प्रतिस्पर्धी अमेरिका आहे. खरा तंटा आहे चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान असलेल्या चढाओढीमुळे. त्यांच्यातला तणाव सातत्याने वाढतो आहे... मात्र ते दोन्ही देश व्यापारीदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या एकमेकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. आजच्या घडीला बहुतांश जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती अमेरिकेत होत नसल्यामुळे चीन ही अमेरिकेची फॅक्टरी बनली आहे... त्यामुळे एकमेकांना दमदाटी करण्यापलीकडे ते जाणार नाहीत असे मला तरी वाटते.  

खरेतर चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश विश्वासपात्र नाहीत. आपल्या स्वार्थासाठी इतर देशांत अशांतता पसरवणे, सरकारे उलथून टाकणे हा अमेरिकेचा इतिहास आहे... मात्र तो अधिक पंचमस्तंभी देश आहे. अमेरिकेला चीनशी युद्ध करण्याची खुमखुमी आहे... मात्र त्याला हे युद्ध स्वतःच्या देशात नको आहे. दुसऱ्या महायुद्धातही आपल्या भूमीवर युद्ध पोहोचणार नाही याची काळजी अमेरिकेने घेतली होती.

चीनसोबतचे आपले युद्ध भारतात व्हावे अशी अमेरिकेची इच्छा आहे हे उघड आहे... म्हणूनच अमेरिकेने चीनविरुद्ध भारताच्या बाजूने उभे राहण्याचे अभिवचन आपल्याला दिले आहे. आपल्याला लढाऊ विमानांचे कवच देऊ केले आहे. ‘तू लढ, मी मागे आहे!’ हे सूत्र त्यामागे आहे. माझ्या मते, अमेरिकेला मागे टाकण्याच्या चीनच्या ईर्षेत युद्धाला अजिबात वाव नाही. दुसरीकडे भारताने मात्र अमेरिकेपासून अतिशय सावध राहणे गरजेचे आहे. अमेरिकेच्या मानाने चीन हा सरळ देश आहे. 

चीन आणि भारत हे दोन्ही देश आपापल्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये गुंतलेले आहेत... पण कोरोनामुळे चिनी उद्योग आज मोठ्या अडचणीत आहेत. तिथले लाखो उद्योग बंद पडले आहेत. जागतिक बाजारपेठेत मालाची मागणी खूपच रोडावली आहे. निसर्गानेही चीनला जोरदार फटका दिला आहे.

चीन पूर्णपणे निर्यातीवर अवलंबून असलेला देश आहे आणि त्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे अमेरिका. भारतही चीनसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. युद्ध सुरू झाले की देशाच्या औद्योगिक प्रगतीला खीळ बसते हे चीन चांगले जाणतो... त्यामुळे भारताशी मैत्री करणे चीनसाठी फायदेशीर ठरणार आहे.  

युद्धाची अव्यवहार्यता जाणून चीनने सामोपचारी भूमिका घेतली आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. युद्ध करणे परवडणारे नाही हे 1914मध्ये सुरू झालेल्या भारत-चीन सीमावादावरून दोन्हीही देश जाणतात. 1962मध्ये झालेल्या आक्रमणाच्या वेळी चीनमध्ये राजकीय अस्थिरता होती. माओ त्से तुंग यांना पदच्युत केले होते. त्या गडबडीत चीनने आक्रमण केले होते. त्या वेळी भारताला हरवण्याची ताकद त्याच्याकडे होती. कृष्ण मेनन यांच्यामुळे आपण पराजित झालो... मात्र चिनी सैन्यानेही स्वतःहून बरीच माघार का घेतली हे विचार करण्यासारखे आहे.

दोन्ही  देशांतला सीमावाद जुना आहे. 1914मध्ये ब्रिटिशांनी आखलेली सीमारेषा चीनने तेव्हापासूनच अमान्य केलेली आहे. तरीही हा 106 वर्षांचा जुना सीमावाद सलोख्याने चर्चा करून सोडवायचा असे दोन्ही देशांमध्ये ठरलेले आहे. ही रेषा स्वतंत्र भारताने काढलेली नाही. दोन्ही देशांमध्ये असलेला लडाखचा छोटा संघर्ष त्यामुळे सामोपचाराने मिटवला जाईल यावर माझा विश्वास आहे... त्यामुळे चीन भारताशी युद्ध पुकारणे अशक्य आहे कारण या संघर्षातले राजकीय आणि व्यावहारिक धोके तो जाणतो. 

भारतीय लष्कर सुसज्ज आहे... मात्र लष्करी ताकदीच्या, विशेषतः युद्धसामग्रीच्या दृष्टीने भारताच्या मानाने चीन आज खूपच बलाढ्य आहे. दोघांचे सैन्य संख्येच्या दृष्टीने समबळ आहे... मात्र चीनचे शस्त्रबळ दुप्पट आहे. स्वयंचलित शस्त्रे आणि रॉकेट्स भारतापेक्षा सहापट अधिक आहेत, विमाने दुप्पट आहेत, फायटर्स जेट तिप्पट आहेत, नाविक शक्ती चौपट आहे... मात्र चीनला हे ठाऊक आहे की, युद्ध सुरू केले तर अमेरिका आणि कदाचित रशियासुद्धा भारताच्या बाजूने उभे राहतील... त्यामुळे आपल्याला केवळ भारताशीच नव्हे तर अमेरिकेशीही युद्ध करावे लागेल. दक्षिण चीन समुद्रातल्या इतर देशांनाही तोंड द्यावे लागेल... त्यामुळे चीन असे विकतचे श्राद्ध करण्याच्या भानगडीत पडणार नाही. 

अमेरिकेला मागे टाकत चीनला जागतिक महासत्ता व्हायचे आहे. गेल्या पंचवीस वर्षांत चीनने त्या दिशेने अफलातून प्रगती केली आहे... तर दुसरीकडे अमेरिकेची अधोगती होत आहे. या ईर्षापूर्तीमध्ये कोणत्याही युद्धाला जागा नाही हे चीन जाणतो. मिशा पिळणे वेगळे आणि कुस्ती खेळणे वेगळे.

चीन भारताला का घाबरत असावा...

इतिहासकाळापासून सांस्कृतिकदृष्ट्या चीनवर भारताची मोठी छाप आहे. पाचव्या शतकामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातले ऋषितुल्य विद्वान चीनला गेले आणि त्यांनी त्या देशाला बौद्धधर्मीय बनवले. चीन भारताचे हे ऋण मान्य करतो. त्या काळातल्या भारत-चीन संबंधांविषयी आपल्याकडे त्रोटक कागदपत्रे असली तरी चीनकडे मात्र त्याविषयीचे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. 

वर्तमानकाळात भारतीय चित्रपट व्यवसायाने चिनी लोकांना भुलवले आहे. बॉलीवूडचा हा प्रभाव म्हणजे चीनवरचा सांस्कृतिक हल्ला आहे... त्यामुळे आज सामान्य चिनी लोकांचे भारताविषयीचे मत सरकारी मतापेक्षा खूप वेगळे आहे. दोन्ही समाजांतले वैचारिक साम्य त्यामुळे स्वच्छ दिसते. आमीर खानचा दंगल चिनी जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. दोन महिन्यांत या चित्रपटाने 19.40 कोटी अमेरिकन डॉलर कमावले. चित्रपटात शेवटी दिसणारा भारताचा राष्ट्रध्वज पाहून चिनी प्रेक्षक टाळ्या वाजवत असत. आज हिंदी चित्रपटांना चीनमध्ये अतिशय मोठी मागणी आहे. चित्रपटाच्या वितरणाचे हक्क मिळवण्यासाठी चिनी कंपन्यांत चढाओढ आहे. ही गोष्ट चिनी सरकारला अस्वस्थ करते.

अलीकडे होणारी भारताची प्रगती चीनला बेचैन करत आहे. 2015मध्ये भारतातली परदेशी गुंतवणूक 6.3 कोटी अमेरिकन डॉलर होती तर चीनमध्ये ती 5.9 कोटी डॉलर होती. ही तफावत आणखी वाढत आहे. कोरोनानंतरचा भारत चीनला अनेक बाबतींत मोठ्या प्रमाणात मागे टाकेल असे दिसते आहे. निदान या बाबतीत कोरोनाचा प्रचंड फायदा भारताला होणार आहे. 

चीनमधले सध्याचे पगार भारताच्या चार ते पाचपट आहेत... त्यामुळे आंतरराष्ट्रीय उत्पादन उद्योगांना भारत आकर्षित करणार ही बाबही चीनला बेचैन करत आहे. जगाची फॅक्टरी म्हणवल्या जाणाऱ्या चीनला हा संभाव्य धोका आहे... मात्र आपल्याशी व्यापार करण्यासाठी जग तयार असले तरी उत्पादन क्षेत्रामध्ये चीनला मागे टाकणे सोपे नाही. आपल्या उद्योगचालकांची आणि कामगारांची मनोभूमिका चीनला टक्कर देण्यासाठी आजतरी अयोग्य आहे.  

लोकसंख्या आणि आकार या दोन्ही बाबतींत चीनला टक्कर देऊ शकेल असा जगातला मोठा देश केवळ भारत आहे हे चीन जाणतो.

सॉफ्टवेअर सर्व्हिसेसमध्ये भारत चीनच्या अनेक वर्षे पुढे आहे... पण आपले सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्‌स नाहीत. आपण फक्त परदेशी कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम करतो. चीनची स्वतःची असंख्य सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्‌स आहेत. या क्षेत्रातही भारत प्रगती करेल अशी भीती चीनला आहे. चीनमध्ये ज्या विदेशी कंपन्या या क्षेत्रामध्ये आहेत त्या कोरोनामुळे तिथून बाहेर पडून भारतात येतील ही भीतीही चीनला सतावते आहे. 

अंतराळ संशोधनातली भारताची प्रगती चीनला रुचत नाही. उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात भारत 104 उपग्रह एकाच ऑरबीटमध्ये पाठवणार आहे हे चीनच्या अस्वस्थतेचे आणखी एक कारण आहे. चीनची मंगळावरची झेप फसली... मात्र भारत त्यात यशस्वी झाला हेही चीनचे एक दुःख आहे.

अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये झालेला लष्करी मदतीविषयीचा करारही चीनला अस्वस्थ करतोय. अमेरिकाच नव्हे तर इस्राईलसह सारे पश्चिमी देश भारताच्या पाठीशी उभे आहेत ही बाब चीनला सलल्याशिवाय कशी राहील?   

 - प्रभाकर देवधर, मुंबई 
psdeodhar@aplab.com

(लेखक, APLAB Group of companies या संस्थेचे संस्थापक असून ते भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक कमिशनचे माजी अध्यक्ष आहेत. 1986-88 या काळात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे तंत्रज्ञान सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भारत-चीन संबंधांवर 'Cinasthana Today – Viewing China from India' हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.)

Tags: प्रभाकर देवधर आंतरराष्ट्रीय संबंध भारत चीन भारत चीन संबंध चीनी युद्ध भारतीय सीमा Prabhakar Deodhar Internaltional Relations India China India China Relation War Indian Borders Conflicts Load More Tags

Comments:

विश्वास पेंडसे

छान मांडणी केली आहे.पण एक कटुसत्य असे कि ज्या देशामध्ये एकाधिकारशाही निर्माण होते तेथे अविवेकी निर्णय घेतले जातात.जसे हिटलरने घेतले

Sunil Tambe

कर्तव्य साधना ला धोरण आहे का? हा लेख वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे. भारत-चीन संबंधांचं चुकीचं आकलन असणारा आहे. भारताने अमेरीकेसोबत राहाण्यात भारताच हित आहे अशी मांडणी करणारा आहे. कर्तव्य आणि साधना ही दोन्ही नावं साने गुरुजींच्या नियतकालीकाची होती. आपल्याला गुरुजींच्या पत्रकारितेशी देणं-घेणं नसेल तर ती नावंही टाकून द्या. तुमचा वेगळा ब्रँण्ड बनवा.

Suresh Topkar

Well studied, balanced article. Liked.

VINAY

The natural human tendency is that, we love to listen those things which gives us feel good moments. So nice to know that China is afraid of India on many fronts according to Mr. Deodhar. I think that's the reason China has occupied more than 1000 sq.km area of ours without firing a single bullet and our PM simply deny it. Further will you please elaborate on your following statement - कोरोनानंतरचा भारत चीनला अनेक बाबतींत मोठ्या प्रमाणात मागे टाकेल असे दिसते आहे. निदान या बाबतीत कोरोनाचा प्रचंड फायदा भारताला होणार आहे. Thank you.

Atul Teware

Nice

Add Comment