2013पर्यंत चीनचे सर्वांना कौतुक वाटायचे. त्यांची गतिमान आर्थिक आणि तांत्रिक प्रगती जगाला अचंबित करत होती. एकेकाळी चीनचे सर्वोच्च नेते असलेल्या डेंग शावपिंग यांनी चीनला दिलेला मंत्र होता, 'कम्युनिझम आणि श्रीमंती यांत संघर्ष असण्याचे कारण नाही.' ते नव्या चीनचे शिल्पकार!
तत्पूर्वी माओंच्या काळात चिनी सरकारने पूर्ण देशभरात शिक्षणावर भर दिल्याने गरिबी असली तरी चीनमध्ये केवळ सुशिक्षितच नव्हे तर शिस्तबद्ध असा प्रचंड मोठा तरुणवर्ग देशाच्या खेड्यांत होता. केवळ स्वस्त आणि शिस्तबद्ध मनुष्यबळाच्या भांडवलावर परदेशी कंपन्यांना आपले उत्पादन उद्योग चीनमध्ये आणण्यासाठी डेंग शावपिंग यांनी राजी केले. ते करताना या हुशार नेत्याने महत्त्वाची काळजी घेतली. त्यासाठी त्यांनी दोन अटी घातल्या. नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्या कामगारांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कंपन्यांनी स्वखर्चाने करणे आणि शहरात कामासाठी येणाऱ्या तरुणतरुणींनी आपले कुटुंब शहरात आणण्यावर बंदी! त्यामुळे उद्योग शहरात आले, उत्पादन वाढले पण झोपडपट्टी आली नाही.
त्यांच्या या अत्यंत विचारी भूमिकेमुळे असंख्य उद्योग आपले उत्पादन चीनमध्ये करू लागले. उत्पादनाबरोबर त्याला जोडलेले तंत्रज्ञानही चिनी तरुणवर्गाला फुकट मिळाले. अशी संधी मिळाल्यावर चिनी तंत्रज्ञान झपाट्याने विकसित झाले यात नवल नाही. मोठ्या उद्योगांना तयार माल पुरवणारे गरजेचे असतात... त्यामुळे असंख्य तरुणांनी स्वतःचे छोटे उद्योग सुरू केले. मोठ्या कंपन्या त्यांचा माल विकत घेऊ लागल्याच... शिवाय या सुट्या भागांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठही खुली झाली. आज चिनी एस.एम.ई. उद्योगांचे उत्पादन चीनच्या एकूण उत्पन्नाच्या 65 टक्क्यांहून अधिक आहे. 1992पासून मी दरवर्षी चिनी तांत्रिक प्रदर्शनांना जात असे. लक्षावधी परदेशी ग्राहक तिथे गर्दी करत. तरुणांच्या कल्पकतेला गती देणारे वातावरण त्या देशात निर्माण झाले. चीन जगाची फॅक्टरी बनला तो असा.
एक हुशार आणि विचारी नेता आपला देश किती प्रगत करू शकतो याचा हा इतिहास आहे. देशातली तांत्रिक प्रगती कल्पकतेला किती पोषक असते हे आजच्या चीनमध्ये दिसते. या वर्षी अमेरिकेपेक्षा अधिक पेटंट्स चिनी तंत्रज्ञांनी घेतली आहेत.
2013पर्यंत चीन हा जगासाठी कौतुकाचा आणि हेव्याचा विषय होता. चीनवर असंख्य लेख आणि पुस्तके लिहिली गेली... मात्र शी जिनपिंग यांनी त्या देशावर आपली सार्वभौम सत्ता लादली. विरोधकांना तुरुंगात डांबले. आणि केवळ सातच वर्षांत राष्ट्राध्यक्ष शी यांनी चीनला जगाचा शत्रू बनवले. चीनमध्ये पुन्हा एकदा पोलीस राज प्रस्थापित केले. उत्पादन घटले, निर्यात झपाट्याने रोडावली. सारे देश चीनमुक्त होण्याच्या दृष्टीने विचार करू लागले.
भारतासारख्या मोठ्या देशाला ही सुवर्णसंधी लाभली खरी... मात्र अनेक कारणांमुळे आपण तिचा फायदा घेऊ शकणार नाही असे दिसते. आपल्या कामगारांची आणि उद्योगचालकांची त्यासाठी तयारी नाही. उत्पादनवाढीसाठी शिस्त सर्वात महत्त्वाची. ती आपल्याकडे नाही, कामगारांतही नाही आणि बहुतेक उद्योगचालकांतही नाही. त्यातच बाजारी कामगार युनिअन्सनी असंख्य छोट्या फॅक्टरीज्वर ताबा मिळवला. आपले कामगारविषयक सोशालिस्ट कायदे आणि तंटे वाढवणारी कायदाव्यवस्था याला जबाबदार आहे. मालकवर्ग कामगारांची पिळवणूक करतो अशी सोशालिस्ट विचारसरणी... त्यामुळे मालकांना शिस्त राखणे कठीण. कम्युनिस्ट रशियातही असे कायदे नाहीत.
आज कायदे असूनही बालकामगारांवरचे अत्याचार आपली सरकारे थांबवू शकलेली नाही. अशा कामगार तंट्यामध्ये लाखो छोटे धंदे बंद पाडले गेलेले आहेत. त्यांतली किमती मशिनरी भंगारमध्ये गेली आहे. ‘ना तुला ना मलाऽ घाल कुत्र्याला’ ही म्हण भारताच्या बंद पडलेल्या एस.एम.ई. क्षेत्राला पूर्णपणे लागू होते. अशा मशिनरीवर बँकेचा ताबा असतो पण आपल्या बँका त्याची काळजी घेत नाहीत. कागदावरची मालकी त्यांना पुरते. असंख्य उद्योगधंदे आज प्रगत होत नाहीत याचे कारण आहे कंपनीबाहेरची कामगार युनिअन. आज अशा युनिअन हा किफायतशीर धंदा झाला आहे. त्यात राजकारणी लोक घुसले आहेत.
अशा वातावरणात चीनशी स्पर्धा आपला देशच नव्हे... तर इतर कुठलाही देश करू शकणार नाही. व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया या देशांत असे कायदे नाहीत... त्यामुळे या देशात प्रचंड प्रमाणात उद्योगवाढ होत आहे. चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या त्या देशांकडे पाहत आहेत... भारताकडे नाही. आपले कायदे कामगारांचे प्रचंड नुकसान करत आहेत... कारण उत्पादक मशिनरी वापरून कमीत कमी कामगारांत उत्पादन करण्यावर चालक जोर देत आहेत.
आज जग चीनविरोधी आहे... मात्र चीनमधून माल घेणे लगेचच बंद करता येणार नाही... पण तसा प्रयत्न जगभर सुरू राहणार आहे. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाची किंमत चिनी जनतेला द्यावी लागणार आहे. हाँगकाँगमधून आंतरराष्ट्रीय उद्योगव्यवसाय प्रचंड प्रमाणावर चालत असे. त्यासाठी आजवर हाँगकाँगचे स्वतंत्र आस्तित्व चीनने राखले होते. त्याचा प्रचंड फायदा चीनला होत होता... पण हाँगकाँगमध्ये आपली सत्ता बळजबरी लादण्याचा प्रयत्न चीनचा स्वतंत्र जगाशी असलेला झरोकाही बंद करू पाहत आहे.
शी जिनपिंग दूरदर्शी असते तर संसर्गजन्य कोरोना साथीत इतर देशांना मदत करण्यासाठी चीन पुढे आला असता. निदान त्यांच्या ‘बेल्ट अॅंड रोड’ प्रकल्पातल्या मित्रराष्ट्रांना त्यांनी सढळ हाताने मदत केली असती... पण त्याने ‘कोरोना व्यापारा’वर भर दिला. गुणवत्ता नसलेले कोरोना प्रतिबंधक चिनी वैद्यकीय उत्पादन निर्यात करून त्यांनी चीनचे नाव अधिकच खराब केले आहे.
साऱ्या जगाला कोरोना सतावत असताना भारत-चीन सीमेवर विनाकारण सैनिकी दंडेली करून शी जिनपिंग यांनी साऱ्या जगाला आश्चर्यचकित केले आहे. हा त्यांचा मुत्सद्दीपणा? जपानशी सेन्काकू बेटांवरून तंटा, दक्षिण चीन समुद्रावरचा आपला हक्क लादण्यासाठी त्यांतल्या देशांशी तापलेले संबंध, सीमाप्रश्नावरून लगतच्या अनेक देशांशी झगडे हे सारे काय दर्शवते? असले उपद्व्याप करून चीन जगातली महासत्ता बनण्याची ईर्षा बाळगतो?
शी यांनी ऑस्ट्रेलियाशी वैर साधले आहे. जगभर झालेल्या कोरोनाच्या फैलावाची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याचे ऑस्ट्रेलियाने ठरवल्यावर शी भडकले आणि त्यांच्यावर आर्थिक कारवाई करण्याचा दम देण्यात आलाय. ऑस्ट्रेलियातून चीनला बार्लीची आणि बीफची मोठी निर्यात होते. त्यात मोठी कपात केली आहे.
कोरोनाविषयी आंतरराष्ट्रीय चौकशी करण्यास चीनचा प्रखर विरोध आहे. का असावा? शी काय झाकू पाहत आहेत. 2011मध्ये फुकुशिमा अणुआपत्तीची आंतरराष्ट्रीय चौकशी जपानने करू दिली होती. कोरोना विषाणूची तशी चौकशी करण्यास जगातले शंभर देश संमत असताना चीनचा प्रखर विरोध का? शी यांचा चीन आणि डब्ल्यू.एच.ओ.चे प्रमुख यांच्यातल्या संबंधांचे काय रहस्य आहे?
‘कोरोनाची साथ’ जग पूर्णपणे बदलणार हे नक्की. माणसामाणसांतले संबंध नवे वळण घेणार, मोठ्या सभा आणि निदर्शने बऱ्याच काळासाठी होऊ शकणार नाहीत. प्रत्यक्ष भेटी थांबणार आणि इंटरनेटवर भेटी होणार. घरात पाहुणे येणे बंद झाले आणि हे असेच चालू राहणार. या सगळ्याला चीन मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. चीनच्या व्यापाराला आता प्रचंड धोका आहे. चीनचे कौतुक शी जिनपिंग यांनी झपाट्याने संपवले. शी यांच्यामुळे चिनी नागरिकांना जबरदस्त किंमत द्यावी लागणार आहे.
जिआंग झमीन आणि हु जिंताव हे चीनचे पूर्वीचे अध्यक्ष. 1993 ते 2003 आणि 2003 ते 2013 असा त्या प्रत्येकाचा 10 वर्षांचा कार्यकाल. चीनच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान आहे. चीनच्या राजकारणात आज त्यांचा मागमूसही नाही. इतर कुठल्याही देशात हे होत नाही. त्यांच्या काळात चीनची लष्करी, व्यापारी आणि सामाजिक प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली... पण त्यांचा चीन मगरूर नव्हता. आंतरराष्ट्रीय संबंध सलोख्याचे होते. अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अधिपत्याखालील चीनचे भविष्य उज्ज्वल नाही हे नक्की.
- प्रभाकर देवधर, मुंबई
psdeodhar@aplab.com
(लेखक, APLAB Group of companies या संस्थेचे संस्थापक असून ते भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक कमिशनचे माजी अध्यक्ष आहेत. 1986-88 या काळात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे तंत्रज्ञान सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भारत-चीन संबंधांवर 'Cinasthana Today – Viewing China from India' हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.)
Tags: प्रभाकर देवधर चीन भारत चीन कोरोना चीनी शी जिनपिंग माओ Prabhakar Deodhar China India China Standoff Xi Jinping Corona Mao Load More Tags
Add Comment