संजीव चांदोरकर हे आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत. पण अभ्यासकांच्या वर्तुळात राहूनही कार्यकर्त्याच्या भूमिकेतून त्यांनी सर्वसामान्य वाचकांसाठी सोप्या शब्दांतून लेखन केले आहे. सोशल मिडिया, नियतकालिके, वृत्तपत्रांतील स्तंभ, पुस्तके इत्यादी माध्यमांतून ते अर्थविषयक लेखन करत असतात.
जानेवारी ते डिसेंबर 2020 या काळात त्यांनी ‘लोकसत्ता’ दैनिकासाठी ‘अर्थाच्या दशदिशा’ हे सदर लिहिले. हा संपूर्ण काळ करोनाने व्यापलेला होता, त्यामुळे या सदरातून त्यांनी करोना काळाचा आर्थिक दृष्टीकोनातून वेध घेतला. या सदरातील लेखांचे एकत्रीकरण करून ‘करोना काळातील जागतिक अर्थव्यवस्था’ हे पुस्तक आकारास आले. ‘द युनिक फाउंडेशन’ या संस्थेने नुकतेच ते प्रकाशित केले आहे. विविध आंतरराष्ट्रीय संदर्भांच्या आधारे करोना काळातील जागतिक अर्थव्यवस्थांविषयी मराठीतून मांडणी या पुस्तकातून केली आहे.
करोना महामारीच्या संकटाचा फटका संपूर्ण जगाला बसला. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे आजवर झालेले दुर्लक्ष यातून दिसून आले. या महामारीमुळे सामान्य जनतेला बेरोजगारी, दारिद्र्य, कुपोषण, आरोग्यसुविधांची वानवा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या महामारीविषयी काही तज्ज्ञांनी, संस्थांनी खोलात जाऊन गंभीरपणे या विषयाची चर्चा केली आहे. उदाहरणार्थ, ‘Economics In The Age Of Covid -19’- Joshua Gans, ‘Indian Economy’s Greatest Crisis’ – Arun Kumar, ‘The Economy In The Time Of Covid-19’ – The World Bank, ‘The Covid–19 Pandamic, India and The World’ – Rajib Bhattacharyya, Ananya Ghosh Dastidar, Soumyen Sikdar इत्यादी. याशिवाय World Economic Forum, Unicef, International Labour Organization (ILO) यांसारख्या जागतिक संस्थांनी काही महत्त्वाचे अहवालही प्रकाशित केले आहेत.
या पुस्तकात सात विभागांमध्ये एकूण 26 लेख आहेत. सोप्या शब्दांत, संदर्भासह, संकल्पना स्पष्ट करून देत हे लेख लिहिलेले आहेत. पुस्तकात करोना काळातील अर्थविषयक घडामोडींचे सात वेगवेगळ्या आयामांतून विश्लेषण वाचायला मिळते. जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक व्यापार, जागतिक गुंतवणूक - बॅंकिंग व वित्तक्षेत्र, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित, जागतिक आरोग्यक्षेत्र, करोना महामारी आणि नवउदारमतवादी तत्त्वज्ञान या सहा विभागांसह संकीर्ण हा सातवा विभाग या पुस्तकात आहे. लेखांचे विषय जरी तत्कालीन वाटत असले तरी लेखांतून केलेले विश्लेषण हे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांशी संबंधित आहे. त्यामुळे हे पुस्तक आणखी काही वर्षांनी वाचले तरी त्याचे संदर्भमूल्य कमी होणार नाही.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या लेखांचे स्वरूप वाचनीयता वाढवणारे आहे. लेखाचा इंट्रो, अधूनमधून दिलेली उपशीर्षके, उपशीर्षकातून सारांशरूपाने केलेली मांडणी, जोडलेले आकडेवारीविषयक तक्ते, मुद्देसूद रचना आणि शेवटी संदर्भबिंदू या या स्वरूपामुळे लेख वाचनीय झालेले आहेत. या स्वरूपामुळे विषय अधिक नेमकेपणाने समजतो. काही लेखांच्या शेवटी महत्त्वाच्या संकेतस्थळांच्या लिंक्स दिलेल्या आहेत. या लिंक्सऐवजी त्याचा क्यूआर कोड दिला असता तर वाचकाला मोबाईलच्या साहाय्याने तो संदर्भस्कॅन करून लगेच पाहता आला असता.
प्रत्येक लेखातून लेखकाने सद्यःस्थितीची चिकित्सक दृष्टीकोनातून मांडणी केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पडझडीचा विचार करता एक संधी म्हणून भविष्यात उभारी घेण्यासाठी भारताला या परिस्थितीत काय करता येईल याविषयी ते जागोजागी काही सुचवू पाहतात. उदाहरणार्थ, ‘कोणत्याही कॅम्पशी विनाकारण जवळीक न दाखवता आपल्या देशाच्य हितासाठी, कोट्यवधी कामगार कष्टकऱ्यांना, विशेषतः तरुणांना सामावून घेणारी रोजगारकेंद्री अर्थव्यवस्था भारताने उभारावी.’ (पृष्ठ 19), ‘...भाव कमी असतील त्या वेळी देशातील खनिजतेलाचे साठे वाढवणे, सार्वजनिक वाहतूक वाढवून खासगी वाहनांची संख्या कमी करणे आणि सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक उर्जास्रोतांवर भर देणे एवढेच सध्यातरी आपल्या हातांत आहे.’ (पृष्ठ 28), ‘अनेक कारणांमुळे अमेरिकन, युरोपिअन, जपानी कंपन्या चीनमधील आपली केंद्रे किमान अंशतः तरी दुसऱ्या विकसनशील देशात हलवण्याच्या बेतात आहेत. भारत त्यासाठी एक उमेदवार राष्ट्र आहे.’ (पृष्ठ 44), ‘भारतात सार्वजनिक क्षेत्राच्या प्रवासातील काही धडे आपल्यासाठीदेखील गिरवण्यासारखे आहेत.’ (पृष्ठ 121).
अशा प्रकारे सद्यःस्थितीत भारतासमोरील आव्हांनाना, तसेच भारताने घ्यावयाच्या पुढाकारांना अधोरेखित केले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींचा परिणाम काय असेल याची मांडणी लेखक करतात. उदाहरणार्थ, ब्रेक्झीटनंतर जी अनिश्चितता निर्माण झाली आहे त्याचे परिणाम युरोपच्या व्यापारावर होणारच आहेत, पण भारतीय व्यापारावर त्याचे काय परिणाम होतील त्याची चर्चादेखील केली आहे. धोरणकर्त्यांनी विचारात घ्यायला हवेत असे हे मुद्दे आहेत.
ढासळत्या अर्थव्यवस्थेला करोना महामारी जबाबदार आहे, असे राज्यकर्त्यांनी दाखवायला सुरुवात केली आहे. परंतु करोना महामारीच्या पूर्वीचे भू–राजनैतिक तणाव, देशांतर्गत ताणतणाव, स्वसंरक्षणात्मक पवित्रे, पर्यावरणीय अरिष्टे, वित्तीय मार्केटवर परिणाम, प्रत्येक राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत तेजीमंदीची चालू असलेली चक्रे या निसरड्या जागा किंवा अर्थचक्र रुतण्याची करोनापूर्वीची कारणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालाचा आधार घेऊन लेखकाने दाखवून दिली आहे. करोनामुळे ओढवलेल्या मंदीची इतिहासातील इतर आर्थिक मंदींशी तुलना करताना लेखाच्या शेवटी एक गंभीर इशारा दिला आहे. तो म्हणजे करोनापश्चात कोट्यवधी लोक नरक–दारिद्र्यात ढकलले जाणार आहेत. अर्थव्यवस्थेच्या डबघाईची कारणे आणि परिणाम या लेखांतून संदर्भासह वाचायला मिळतात.
सार्क गटाच्या आठ राष्ट्रांमध्ये वस्तूमालाच्या व्यापाराविषयी साफ्ता (SAFTA) हा करार करण्यात आला. दक्षिण आशियातील शेजारी राष्ट्रांचे संबंध हे तणावाचे आहेत. राजनैतिक, लष्करी उपाययोजना यांच्या जोडीला समांतर पद्धतीने आर्थिक–व्यापारी व्यूहनीतीची गरज अधोरेखित करून साफ्तासारख्या कराराचे पुनरुज्जीवन व्हावयास हवे आणि त्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा हे लेखकाचे मत महत्त्वपूर्ण आहे.
‘चायनीज कॉर्पोरेट नूडल्स’ या शेवटच्या लेखात चीनच्या सार्वजनिक आणि खासगी कंपनीविश्वाची चर्चा केली आहे. चीनमधील खासगी कार्पोरेट क्षेत्र सार्वजनिक क्षेत्राचे धाकटे भावंड असल्याचे लेखकाने म्हटले आहे. बहुधा हे चिनी मॉडेल लेखकास मान्य आहे. भारताने त्यांचे धडे गिरवावेत असेही लेखक सुचवतात. पण चीनचा अविभाज्य भाग असलेला हाँगकाँगदेखील चिनी अर्थव्यवस्थेचे धडे गिरवत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग चीनच्या अर्थव्यवस्थेत काही नकारात्मक गोष्टी आहेत का आणि असल्या तर त्या कोणत्या आहेत हे लेखकाकडूनच जाणून घ्यायला आवडेल.
लेखकाने एक गोष्ट स्पष्टपणे मांडली आहे. ती म्हणजे जागतिकीकरणाचा आंधळेपणाने स्वीकार करू नये. विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचे उदाहरण समोर ठेवून त्यांनी नवउदारमतवादातील पोकळपणा उघड केला आहे. 2003मध्ये Raghuram Rajan आणि Luigi Zingales यांनी ‘Saving Capitalism From The Capitalist’ या पुस्तकातून याविषयी महत्त्वपूर्ण मांडणी केली आहे. त्याची आठवण चांदोरकरांचे जागतिकीकरणावरील लेख वाचताना होते.
या पुस्तकातील एका विभागाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. तो म्हणजे जागतिक आरोग्यक्षेत्र हा विभाग. या विभागातील दोन्ही लेख सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचे महत्त्व पटवून देणारे आहेत. नागरिकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे आरोग्यावर खर्च करावा किंवा परवडत असेल त्या प्रमाणात आरोग्यविमा विकत घ्यावा, अशा आर्थिक तत्त्वज्ञानावर आधारित आरोग्य व्यवस्था ज्या अमेरिकेने राबवली त्या अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील फोलपणा करोना महामारीच्या काळात दिसून आला. दुसऱ्या एका लेखात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा प्रदूषणामुळे होणारे मृत्यू अधिक असल्याचे आकडेवारीसह नोंदवून प्रदूषणाकडे समग्र दृष्टीकोनातून पाहायला लावतात.
अशा प्रकारे करोना संकटाचे विविध आर्थिक पैलू मांडून जागतिक अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेली संकटे, त्यांच्या सद्य आणि दीर्घकालीन परिणामांची केलेली चर्चा या पुस्तकातून वाचायला मिळते. मराठी वाचकांच्या आर्थिक जाणिवा वाढवणाऱ्या संजीव चांदोरकर यांच्या या नव्या पुस्तकाचे स्वागत.
- सतीश देशपांडे
sdeshpande02@gmail.com
करोना काळातील जागतिक अर्थव्यवस्था
लेखक – संजीव चांदोरकर
प्रकाशक – द युनिक फाउंडेशन
पृष्ठे 124, किंमत – 100 रुपये
Tags: सतीश देशपांडे संजीव चांदोरकर पुस्तक नवे पुस्तक परिचय परीक्षण करोना अर्थव्यवस्था अर्थकारण Marathi Book Introduction Sanjeev Chandorkar Economy Corona Load More Tags
Add Comment