स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकर या चोवीसवर्षीय तरुणाने पुणे येथे गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. त्यानंतर माध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून हळहळ व्यक्त झाली. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'स्पर्धा परीक्षा - स्वप्न आणि वास्तव' या विषयाचा वेध घेणारा रिपोर्ताज तीन भागांत 'कर्तव्य साधना'वरून 13 जुलै ते 15 जुलै 2021 असे सलग तीन दिवस प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील हा पहिला लेख. या मालिकेतील दुसरा लेख इथे, तर तिसरा लेख इथे वाचता येईल.
महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत पास होऊनही पुढची प्रक्रिया सुरू न झाल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकर या चोवीसवर्षीय विद्यार्थ्याने आठ दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येविषयी, त्याच्या आईवडिलांच्या दुःखाविषयी सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त झाली. स्वप्नीलला भावपूर्ण श्रद्धांजली!
स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर स्पर्धा परीक्षा या विषयावर माध्यमांतून आणि समाजमाध्यमांतूनही मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. स्वप्नीलच्या आत्महत्येत दोष कुणाचा, काय केले असते म्हणजे स्वप्नीलला आत्महत्येस सामोरे जावे लागले नसते, एमपीएससीच्या चक्रव्यूहात युवा पिढी कशी अडकली आहे, अशा मुद्द्यांवर चर्चेचा मोठ्या प्रमाणावर भर होता. या मुद्द्यांवर व्यक्त होणे स्वाभाविक आहे. मात्र याशिवायही आणखी काही मुद्द्यांवर गंभीरपणे चर्चा करायला हवी, जेणेकरून स्पर्धा परीक्षार्थींना दिशादर्शन होईल आणि सामाजिक–शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक बदलांसाठी ते महत्त्वपूर्णही ठरू शकेल.
एकट्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आज पाच लाखांहून अधिक विद्यार्थी एमपीएससीद्वारे (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे) घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. वय आणि संधी संपली म्हणून दरवर्षी लाखो विद्यार्थी बाहेर पडतात आणि लाखो नवीन विद्यार्थी अभ्यासाची सुरुवात करतात. एमपीएससीशिवाय पोलीसभरती, सैन्यभरती, लिपिक परीक्षा, बॅंकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन व इतर टेक्निकल पदांसाठीच्या परीक्षा ते यू.पी.एस.सी. (केंद्रीय लोकसेवा आयोग) चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे. या स्पर्धा परीक्षांनी मोठ्या प्रमाणावर अर्थकारण आणि राजकारणही व्यापलेले आहे.
आपले प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय आहे की नाही, आपल्यामध्ये अधिकारी होण्यासाठीच्या क्षमता आहेत का, अधिकारी होऊन आपल्याला नेमके काय करायचे आहे या प्रश्नांवर गांभीर्याने विचार न करता विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षांकडे का वळतात याचे उत्तर पहिल्यांदा शोधायला हवे.
हाती आलेले स्मार्टफोन्स, इंटरनेटचा वाढता वापर, वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, अधिकाऱ्यांचे सत्कार-समारंभ, पास झाल्यावर गावोगावी निघणाऱ्या मिरवणुका, शाळा महाविद्यालयांतील चर्चा यांमुळे आता सर्वसाधारणपणे दहावी बारावीचा अभ्यास करत असताना किंवा पदवीकाळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख होते.
आजूबाजूच्या चर्चा ऐकणारे पालकदेखील या परीक्षांविषयी माहिती मिळवायला लागतात. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांची भाषणे, अनुभव यूट्यूबद्वारे ऐकत-पाहत असतात. ‘मी कसा अभ्यास केला’, ‘यशाची रणनीती काय’ अशा विषयांवरची यशस्वी अधिकाऱ्यांची मनोगते विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनावर प्रभाव टाकतात. ‘मन में है विश्वास’, ‘कार्यकर्ता अधिकारी’, ‘अभ्यास ते अधिकारी’ हे शब्द विद्यार्थ्यांच्या मनात घर करतात. सनदी अधिकाऱ्यांची अनुभवपर, प्रोत्साहन देणारी पुस्तके विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर वाचतात.
शिवाय डाॅक्युमेंटरीज, वेबसिरीज, आजूबाजूच्या चर्चा, यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्काराचे कार्यक्रम या सर्वांमुळेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राविषयी आकर्षण निर्माण होते. त्यांनी रुबाबदार अधिकारी प्रत्यक्षात पाहिलेले असतात; त्यांची भाषणे ऐकलेली असतात; त्यांच्याबद्दल वाचलेलं असतं; ही परीक्षा पास झाल्यावर आपल्यालाही अशीच प्रतिष्ठा लाभेल; आपण आपल्या गरिबीचं निर्मूलन करू शकू; खासगीपेक्षा सरकारी नोकरी जास्त चांगली; पद, प्रतिष्ठा, पैसा या सर्वच गोष्टी मिळतील या आकर्षणामुळे लाखोंच्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळतात.
काही विद्यार्थी मात्र याला अपवाद आहेत. ते केवळ आकर्षणापोटी नव्हे तर मनाशी ध्येय बाळगून आणि त्यांच्यामध्ये क्षमता असते म्हणून विचाराअंती स्पर्धा परीक्षेकडे आलेले असतात. मात्र हा अपवाद वगळता इतरांना ‘तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास का करता?’ हा प्रश्न विचारल्यावर त्यांच्याकडून काही ठरावीक पठडीतली उत्तरे मिळतात. ‘सरकारी नोकरीत आर्थिक सुरक्षितता आहे’, ‘मानसन्मान मिळतो’, ‘हाती अधिकार येतात’, ‘हाती अधिकार आल्यामुळे देशसेवा करायला मिळते’, ‘चांगलं काम करता येतं’ असे त्या उत्तरांचे स्वरूप असते. एकूणच काय... तर आकर्षण ही अशी गोष्ट आहे जी लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना इकडे खेचून आणते.
गर्दी झाल्यामुळे मार्केट वाढले. खासगी क्लासेस मोठ्या प्रमाणावर सुरू झाले, संदर्भसाहित्य सहज उपलब्ध व्हायला लागले. शहरांतून स्पर्धा परीक्षांची सेंटर्स निर्माण झाली. साहजिकच स्पर्धा वाढली. परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या आणि पद मिळणाऱ्यांची संख्या यांत प्रचंड दरी निर्माण झाली. या तुलनेत भरती करणाऱ्या संस्था तेवढ्या प्रमाणात सक्षम झाल्या नाहीत. खासगी क्षेत्रांना सरकारी धोरणाने दिलेले झुकते माप, सरकारी सेवेतील पदांची कमी होणारी संख्या, लोकसेवा आयोगाच्या कामातील विसकळीतपणा, मेगा भरतीमधील फोलपणा, आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न, कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती, त्यामुळे ठप्प झालेली भरतीप्रक्रिया, भरती प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप, भविष्याविषयी दिसू लागलेली अस्पष्टता यांमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निराशा आणि अस्वस्थता आहे. अशा पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कराडचा दिग्विजय कुंभार एमपीएससी परीक्षांमधील अनियमिततेविषयी म्हणाला, “गेले कित्येक दिवस आम्ही परीक्षेची वाट पाहत आहोत. वाट पाहण्यातून निराशा आलेली आहे. या सरकारची आणखी किती दिवस खोटी आश्वासने आणि प्रलोभनं एकायची? करोनाच्या काळात निवडणुका झाल्या, हजारोंच्या संख्येनं राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या रॅली निघाल्या. राजकीय लोकांच्या केवळ आश्वासनांमुळे आमची ऐन उमेदीची वर्षं वाया गेली. आमच्या आयुष्याशी हे सरकार आणखी किती दिवस असा खेळ चालवणार आहे?”
मूळच्या नांदेड येथील पण गेल्या सात वर्षांपासून पुण्यात राहून अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थिनीने नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती करत स्वतःबद्दल, सद्यःस्थितीबद्दल भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “मी नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहे. माझे आईवडील शेतकरी आहेत. मी परभणी इथून बीटेक (फुड टेक्नॉलॉजी) केलं आहे. नंतर एमएची पदवी घेतली आहे. मी गेल्या सात वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. राज्यसेवा तसंच संयुक्त परीक्षेची प्रत्येक पूर्वपरीक्षा मी पास झाले आहे पण मला मुख्य परीक्षेत अपयश येत आहे. आजही मी प्रयत्न करते आहे. या वर्षी मी शेवटची संधी म्हणून परीक्षा देणार आहे. सात वर्षांतील गेली दोन वर्षे ही आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे वाया गेली. येणाऱ्या काळात परीक्षा केव्हा येतील, त्या वेळेत होतील की नाही, त्यात पास झाले तरी शासन रुजू करून घेईल की नाही यांबाबत मनात अस्वस्थता आहे. माझ्यासारखे अऩेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत ज्यांच्या मनात सद्यःस्थितीत निराशेचे विचार येत आहेत.”
या विद्यार्थिनीने पुढे जे सांगितले ते खूप गंभीर आहे. ती म्हणाली, “आता स्वप्नील या विद्यार्थ्यानं जशी आत्महत्या केली तसा आत्महत्येचा विचार माझ्याही मनात आला होता. खूप निराशा वाटत होती पण मी स्वतःला सावरलं.”
असे टोकाचे विचार तुझ्या मनात येत होते तेव्हा त्यातून सावरण्यासाठी तू नेमकं काय केलंस या प्रश्नाला तिनं उत्तर दिलं, “मी जवळच्या व्यक्तींशी बोलले. मला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्यांशी बोलले त्यामुळे मी नकारात्मक विचारांपासून दूर गेले शिवाय एकटी राहिले नाही. स्वतःला इतर कामांत गुंतवत राहिले.”
नकारात्मक विचार आल्यावर आईवडिलांबद्दल, कुटुंबाबद्दल काही विचार केला नाहीस का? यावर ती म्हणाली, “आईवडिलांचा विचार सतत मनात येतो. आपण त्यांच्या अपेक्षांनुसार चांगलं कार्य करू शकलो नाही, आपण त्यांना तोंड दाखवायच्यादेखील लायकीचे नाही असं वाटत राहतं. मग तर आणखीच टोकाचे विचार मनात येत राहतात.”
'तुझा हा शेवटचा अटेम्प्ट असेल. जर वाईटात वाईट घडलं आणि तू अधिकारी नाही झालीस तर तू पुढे काय करशील?', असा थेट प्रश्न तिला विचारला. तिने या प्रश्नाचे उत्तर खूप मोकळेपणाने दिले. “आता आत्महत्येसारखा टोकाचा विचार मनातून दूर गेलाय. मी आता खूप रिलॅक्स होऊन हा शेवटचा अटेम्प्ट देणार आहे. मी नापास जरी झाले तरी मी ते स्वीकारेन. त्यानंतर छोटासा व्यवसाय करीन किंवा सुरुवातीला नोकरी करीन. यश नाही मिळालं तर मला वाईट वाटेल पण म्हणून मी माझं आयुष्य संपवणार नाही. मला आधार देणारे खूप लोक आहेत. त्यांनी माझ्या मनात खूप चांगले विचार निर्माण केले आहेत.”
या चर्चेतल्या तिच्या एका वाक्याचा गंभीरपणे विचार करायला हवा, “ती म्हणाली आत्महत्येचे विचार मनात येतात, त्याला बरीच व्यक्तिगत कारणं असतात. फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, सोशल प्रॉब्लेम्स असतात, आपण कमी पडलेलो असतो, आपण आपल्या पर्सनल गोष्टींमुळे निराश होतो आणि आरोप एमपीएससीवर करायला लागतो.”
दिग्विजयप्रमाणे तिनेही एमपीएससीमधील त्रुटी सांगितल्या. सोबतच निराशेच्या कारणांचीही चर्चा केली. तिने अजून प्लॅन बीचा म्हणजे स्पर्धा परीक्षेनंतरचा दुसरा मार्ग काय याचा गंभीरपणे विचार केलेला नाही पण भविष्यात तो नक्की करणार असे तिचे नियोजन आहे.
नातेपुते, जि. सोलापूर येथील त्रिभुवन कुलकर्णी हा सहा वर्षांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आहे. तो एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयात राहतो. 2021मध्ये येणाऱ्या नव्या जाहिरातीकडे तो डोळे लावून बसला आहे. त्याचे म्हणणे आहे, “तुम्हाला आमची अस्वस्थता जर पाहायची असेल तर मध्यांतरी आम्ही विद्यार्थ्यांनी पुण्यातल्या शास्त्री रोडवर केलेल्या आंदोलनाच्या व्हिडिओ क्लिप्स पाहा. परीक्षा वेळेवर झाल्यास, जास्तीच्या जागा निघाल्यास विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा. विद्यार्थ्यांना समजून घ्यायला हवे.”
दिग्विजय, त्रिभुवन आणि ती मैत्रीण या सर्वांचा अभ्यास चांगला आहे. कुठेतरी कमी पडल्याने ते अधिकारी होण्यापासून थोडे दूर राहिलेले आहेत. ही तीन प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. असे लाखो विद्यार्थी आहेत... जे स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करत आहेत.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा ज्यांना दीर्घ अनुभव आहे अशा प्रा.डॉ. शिरीष शितोळे यांच्याशी ‘स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व त्यांची मानसिकता’ या विषयावर चर्चा केली. प्रा. शितोळे हे सध्या महावीर महाविद्यालय, कोल्हापूर इथे मानसशास्त्र विषयाचे अध्यापन करतात. ते म्हणाले, “पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी करिअर म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. नंतर त्याची विचारपूर्वक निवड करायला हवी. CAREER या शब्दांतली पहिली चार अक्षरे - CARE खूप महत्त्वाची आहेत. मराठीत करिअरला आपण जीवनमार्ग असेही म्हणतो. आपल्या भावी आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या परिणामकारकरीत्या पार पाडण्याचा मार्ग म्हणजे करिअर. करिअरचा विचार करताना आपण स्वतःचा, जवळच्या मंडळींचा आणि एकूणच समाजात असणारी व्यवस्था या सर्वांचा विचार करत असतो. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी यातील ‘स्व’चा विचार फारसा करताना दिसत नाहीत. स्वतःकडे कमीत कमी लक्ष देऊन, स्वतःच्या क्षमता न ओळखता, आवडीनिवडी जाणून न घेता स्पर्धा परीक्षेकडे वळणारी मुलंमुली आपल्या आयुष्यातल्या ताणतणावांची, निराशेची बीजं रोवताना आपल्याला दिसतात.”
आर्थिक सुरक्षितता मिळते म्हणून विद्यार्थ्यांचा इकडे जास्त कल आहे. विद्यार्थ्यांच्या तोंडूनही हे सतत येत असते. विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या आर्थिक सुरक्षिततेच्या विचारांबद्दल प्रा. शितोळे म्हणाले, “आर्थिक सुरक्षिततेची व्याख्याच मुळात आपल्याकडे खूप संकुचित पद्धतीनं केली जाते. उत्तम व्यवसाय करणाऱ्या, नोकरीच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करून पुढे जाणाऱ्या, कौशल्यविकासावर सातत्यानं भर देणाऱ्या कर्तृत्ववान लोकांकडे लक्षच वेधले जात नाही. 90 टक्क्यांहून अधिक व्यवसायाच्या संधी खासगी क्षेत्रातच आहेत. यांपैकी आपणही एक कर्तृत्ववान व्यक्ती होऊ शकतो, आपणही आपल्या कामाचा ठसा उमटवू शकतो याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. खासगी क्षेत्रात सुरक्षाच नाही हे चूक आहे. तसं तर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांची संख्या पाहिली तर केवळ शेकड्यांच्या किंवा हजारांच्या पटीतच लोकांना सुरक्षा मिळत असल्याचं दिसून येईल. उर्वरितांना ही सुरक्षा मिळणारच नाही त्यामुळे सुरक्षिततेसाठी आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय हा विचारच मुळात चुकीचा आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी करिअरचा विचार दोन पातळ्यांवर करायला हवा. एक – या परीक्षेत यशस्वी झालो तर माझं करिअर काय आणि दोन – या परीक्षेत मी नाही यशस्वी झालो तर माझं करिअर काय. यातलं एक श्रेष्ठ आणि दुसरं दुय्यम असा विचार अजिबात करू नये. असे दोन्ही पर्याय आपण आपल्या महाविद्यालयीन जीवनात असतानाच समोर ठेवायला हवेत आणि त्याप्रमाणे पुढे जायला हवं.” थोडक्यात आपण वास्तवाचे आकलन करून घ्यायला हवे, दोन पर्याय तयार ठेवायला हवेत आणि केवळ आकर्षणापोटी स्पर्धा परीक्षेकडे वळू नये.
करिअरकडे आणि एकूणच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच विकसित नसेल तर वाट चुकण्याची शक्यता अधिक असते. वाट चुकल्यावर निराशा येणे, ताणतणाव निर्माण होणे स्वाभाविकही आहे. कदाचित विश्वास बसणार नाही, पण असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांना दहा वर्षानंतरही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता आलेले नाही. आणि तरीही ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडायला आणि वेगळा मार्ग निवडायला तयार नसतात... कारण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला येताना हे विद्यार्थी इतर सर्व मार्ग बंद करून आलेले असतात.
भविष्यात स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आणि मग चांगली नोकरी मिळेल या एकाच शक्यतेवर अवलंबून राहण्यासारखी दुसरी कुठलीच जोखीम नाही. आपले आयुष्य एका परीक्षेसाठी इतके पणाला लावणे चुकीचे आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचे आहे याची स्पष्टता असल्याशिवाय विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येऊच नये.
एक काळ असा होता जेव्हा स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे माहीत नाही, त्याबद्दल काही ठरवलेलेही नाही पण यशस्वी व्यक्तीकडे, अधिकाऱ्याकडे पाहून, मित्र अभ्यास करतोय त्याच्याकडे पाहून विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास केला आणि ते पासही झाले. मात्र त्या काळात स्पर्धा तितकी अटीतटीची नव्हती. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मर्यादित होती. आज मात्र स्पर्धा कित्येक पटींनी वाढलेली आहे, विद्यार्थीसंख्या वाढलेली आहे आणि दुसरीकडे ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिकम गव्हर्नन्स’ हे सरकारचे धोरण असल्याने पदांची संख्यादेखील कमी झालेली आहे. म्हणून, कुणीतरी सांगतेय, आकर्षण वाटतेय म्हणून इकडे येणे हे प्रचंड जोखमीचे आहे.
स्पर्धा परीक्षेकडे वळण्यापूर्वी प्रा. शितोळे विद्यार्थ्यांना पुढील चार गोष्टींचा गंभीरपणे विचार करायला सुचवत आहेत.
एक – आपली ध्येयनिश्चिती ही वास्तववादी असायला हवी. आपल्या सामर्थ्याची आणि मर्यादांची जाणीव असायला हवी. स्पष्टता असेल तर इकडे वळण्यात अर्थ आहे.
दोन – घर, परिस्थिती, आईवडील, स्वतःचे महाविद्यालयीन शिक्षण या सर्वांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा.
तीन – स्पर्धा परीक्षा देणे हे करिअर नव्हे. परीक्षा पास झाल्यावर आपल्या करिअरची खरी सुरुवात होत असते. पास झाल्यानंतर पुढे काय आणि नाही झाल्यास पुढे काय या दोन्हींचा विचार करायला हवा.
चार – स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपली लक्ष्मणरेषा आखायला हवी. म्हणजे मी किती वर्षे हा अभ्यास करणार आहे, हे ठरवायला हवे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपल्याला आयुष्यात खूप काही देऊन जातो. परीक्षेमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतात पण एका मर्यादेपेक्षा जास्त काळ आपण इथे राहिलो तर त्याचे नकारात्मक परिणामही होतात.
तज्ज्ञांनी सांगितलेल्या या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला भविष्यात काय करायचे आहे याबद्दल नक्कीच स्पष्टता येईल. मार्ग चुकण्याची शक्यता कमी होईल. एका गोष्टीचा विचार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी आवर्जून करायला हवा. ते म्हणजे परीक्षा देणे हे आपल्या हातात आहे. लोकसेवा आयोगाच्या कामात होणारा राजकीय हस्तक्षेप, शासनाची अनास्था, आयोगाच्या कारभारातील विसकळीतपणा हे आपल्या हाती नाही. जी गोष्टच मुळात आपल्या नियंत्रणाबाहेरची आहे, तिचा विचार करून आपल्याला त्रास करून घेणे चुकीचे आहे. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांनीदेखील हेच सांगितले आहे. दुसऱ्यांच्या चुकांची शिक्षा आपण आपल्याला का करून घ्यायची? सरकार चुकले म्हणून आपण निराश होण्यात अर्थ नाही.
दुसरे म्हणजे परीक्षेत अपयश आले म्हणून सगळे संपले असे वाटून घेणेही चुकीचे आहे. परीक्षेतील अपयशाचा संबंध आपल्या आयुष्यातील कर्तृत्वाशी जोडता येत नसतो. परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही. तो आपल्या आयुष्यातील एक टप्पा आहे. परीक्षेत अयशस्वी झालेल्या कितीतरी विद्यार्थ्यांनी इतर क्षेत्रांत नंतर देदिप्यमान यश मिळवले आहे.
आपल्याला नेमके काय करायचे आहे याचे भान आपल्याला आपल्या महाविद्यालयीन जीवनातच आले पाहिजे पण शैक्षणिक व्यवस्थेमुळे या गोष्टीचे भानच काय... जाणीवसुद्धा विद्यार्थ्याला या वयात होत नाही आणि तशी ती कुणी करूनही देत नाही.
स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या गर्दीला, त्यांच्यामधील ताणतणावांना कोणकोणते घटक जबाबदार आहेत याविषयी प्रा.प्रवीण चव्हाण यांच्याशी चर्चा केली. प्रा. प्रवीण चव्हाण हे पुणे येथील ‘मार्गी अकॅडमी’चे संस्थापक आहेत. गेली दोन दशके स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव त्यांना आहे. सामाजिक घडामोडींचे ते जाणकार आहेत. सरांच्या मते, “हा प्रश्न एकूणच समाजाचा आहे. आपण स्पर्धा परीक्षेतल्या यशाला ‘लार्जर दॅन लाईफ’ करून ठेवलं आहे. ‘अपवर्ड मोबिलिटीज’ विद्यार्थ्यांना हव्या असतात. निराशेच्या प्रचंड टोकावर विद्यार्थी का जातात... तर त्यांच्या अपेक्षांची पूर्ती होत नाही म्हणून. विद्यार्थ्यांच्या कल्पनेतलं जग आणि वास्तवातलं जग यांत प्रचंड फरक आहे... यामुळेच प्रचंड ताण निर्माण झालेले आहेत. यासाठी स्पर्धा परीक्षेचं वास्तव समजून घ्यायला पाहिजे. मार्केटमुळे आणि भाषणबाजीमुळे विद्यार्थी फसतात. ‘हायपर रिअॅलिटी’ आणि ‘रिअॅलिटी’ यांतला फरकच विद्यार्थ्यांना समजत नाही. एमपीएससीचा कारभार पूर्वीपण विसकळीत होता आणि आतापण विसकळीत आहे... यात नवीन काय आहे? आता व्यवस्थेला दोष देण्यात अर्थ नाही. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर वस्तुस्थिती समजून द्यायला हवी मात्र तसं होताना दिसत नाही. शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांची अनास्था आहे. मुळात त्या शिक्षकांनाच काही कळत नाही. शाळा-महाविद्यालयांतील शिक्षणाचा आणि स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपाचा काहीच संबंध नाही. शाळा-महाविद्यालये, सरकारच्या प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर्स कमी पडताहेत म्हणून मार्केटमध्ये खासगी शिकवण्या वाढत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कशाचेच आकलन होत नाही. शिक्षण-व्यवस्थेचा पुर्नविचार या निमित्तानं व्हायला हवा. परिस्थितीशी झगडणं, कष्ट करणं, जास्तीत जास्त काम करणं हे नकोय... आयतं मिळेल ते हवं आहे म्हणून हा प्रश्न केवळ एमपीएससीचा नाही तर या निमित्तानं एकूणच समाजात काय बदल करायचा याकडे लक्ष द्यायला हवं.”
मूळ शिक्षणव्यवस्थाच कमी पडत असल्याने बाजारपेठेने याचा गैरफायदा घेतला आहे. यात काही सन्माननीय अपवाद वगळता बाजारपेठेने विद्यार्थ्यांची दिशाभूल केली आहे. यासंदर्भात प्रवीण सर सांगतात, “एक साधी गोष्ट आहे. अधिकारी झाला म्हणून त्याचा भला मोठा सत्कार करणं यात प्रोत्साहन कमी आणि मार्केटिंग अधिक आहे. विद्यार्थी अधिकारी झाला म्हणजे तो थोडाच समाजसेवा करण्यासाठी अधिकारी झालेला असतो. त्यानं त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था केलेली असते. पोटापाण्याची व्यवस्था करणाऱ्या सगळ्याच लोकांचा सत्कार आपण करणार आहोत का? रोजगार हमी योजनेवर कामाला जाणाऱ्यांचा कधी सत्कार झाल्याचं पाहिलंय का? मोठमोठी भाषणं करण्यातून, सत्कार करण्यातून नाहक स्तोम वाढवून ठेवलंय. याला विद्यार्थी बळी पडतात. खरंतर याला बळी पडू नये हा विचार करण्याची क्षमता आपल्या शिक्षणानं आपल्यात विकसित करायला हवी. ती गोष्ट इथे घडत नाही.” (या चर्चेचा ऑडिओ लेखाच्या शेवटी देण्यात आला आहे.)
प्रवीण सरांनी कठोर शब्दांत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची फारशी चर्चा आजघडीला होताना दिसत नाही आणि दिसणारही नाही. अधिकाऱ्यांच्या निवडपद्धतीतील दोष, आपली सदोष शिक्षण व्यवस्था आणि सामाजिक परिस्थिती या सर्वच घटकांवर एकत्र बोलायला हवे, त्या सर्वांत सुधारणा होणे हे या प्रश्नाचे उत्तर आहे, हा त्यांच्या सांगण्याचा मथितार्थ आहे. मार्केटमधील लोक या मुद्द्यांकडे जाणूनबूजून दुर्लक्ष करतील कारण त्यांना ते गैरसोयीचे आहे आणि शासकीय पातळीवर इतके सखोल जाऊन काम केले जाईल असे वाटत नाही.
प्रश्न केवळ एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येपुरता मर्यादित नाही, एमपीएससीसारख्या संस्थेच्या कारभारात बदल करण्यापुरताही तो मर्यादित नाही. हा प्रश्न व्यापक स्वरूपातील बेरोजगारीचा आहे. मोठ्या संख्येने असणाऱ्या पण कौशल्ये नसणाऱ्या, शिकलेल्या पण आकलनक्षमता विकसित न झालेल्या युवा पिढीचा आहे. याकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन विकसित व्हावा, त्यांना योग्य मार्ग मिळावा आणि भविष्यात अधिकारी झाल्यावर त्यांनी कसा विचार करावा याचे दिशादर्शन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी समाजमाध्यमातून केले आहे. ते म्हणतात, “माझा यूपीएससीचा निकाल लागल्यापासून मी एक तत्त्व पाळत आलोय. शक्यतो भाषणबाजी करायची नाही. अभ्यासाबद्दल बोलायचं. विद्यार्थ्यांना वास्तवाचं भान असलं पाहिजे. आयएएस होणं ही एक मोठी संधी आहे पण ती संधी सर्वोच्च नाही. आपण कुणीही हिरो नाही आणि एक टक्क्याहून कमी निकाल असणाऱ्या परीक्षेत इतरांचं काय हा प्रश्न कायम विचारण्याचा माझा आग्रह आहे. स्वतःच्या प्रेमात पडून आपला प्रवास पुन्हा सांगण्यासाठी लिहीत नाही पण एका विद्यार्थ्याच्या मृत्यूने अस्वस्थ झाल्यानं लिहीत आहे.”
कौस्तुभ दिवेगावकर पुढे म्हणतात, “एसबीआय क्लर्क, एलआयसी ऑफिसर यांपासून जमतील त्या सर्व परीक्षा मी दिल्या आहेत. शिकवण्या घेतल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड आपल्याला चुकलेली नाही. मुळात काही कारणांमुळे शेवटच्या वर्षाला इंजिनिअरिंग सोडल्यानंतर समोर अंधारच होता. मराठी साहित्याच्या आवडीतून मुक्त विद्यापीठातून बीएची मिळवलेली डिग्री तेवढी होती. एक परीक्षा पास झालो म्हणून ठीक आहे पण मराठी साहित्य आवडते म्हणून त्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य नक्की काय आहे?
आज एका शासकीय पदावर कार्यरत असताना हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, खासगी क्षेत्रापेक्षा शासकीय सेवेत पगार कमी आहेत. जबाबदारी अधिक आहे. व्यवस्था एकदोन लोकांनी निर्माण होत नाही. ती असंख्य लोक, विचार, नियम, संस्था यांतून आकाराला येते. तिला चेहरा म्हटले तर असतो, म्हटले तर नसतो. यामुळे आपण ज्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येऊ पाहतो त्यासोबत काही मर्यादाही आपल्याला समजून घ्याव्या लागतील. पगारात भागवणे तर आहेच... त्याशिवाय अनेक प्रकारची आव्हाने, टीकाटिपण्या यांना तोंड देणे शिकत राहावे लागते.
सातत्य आणि संयमाची परीक्षा कोणालाही चुकलेली नाही पण शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असते. आपल्या मागे आपले घर असते. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्त्वाचा असतो पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्त्वाचा खरेच नाही. निराशेच्या एका क्षणी त्यांचा विचार केला पाहिजे. आपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षांच्या लांब, थकवणाऱ्या प्रक्रियेत संधीची वाट पाहत असणारी अनेक तरुण मंडळी दिसतील. त्यांच्याशी संवाद साधत राहावे लागेल.
आपल्याकडे आजकाल भाषेत आणि सामाजिक शास्त्रातही 100 टक्के गुण मिळतात. काही महाविद्यालयांचे प्रवेशाचे मेरिट तर 99 टक्क्यांवर थांबतात. मग त्यांतले थोडे मेडिकल इंजिनिअरिंगच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. इतर मागे पडतात. यशस्वी लोकांमधून आणखी थोडे यशस्वी उरतात. सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत शेवटी जीवन नावाच्या चाकोरीच्या मर्यादेचे भान विद्यार्थ्यांना आणून देण्यात आपण कमी पडतो आहोत. यशाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. चांगला माणूस म्हणून जगणे, कष्ट करणे आणि कष्टाचा एकेक रुपया हे सामाजिक यश आहे असे मानणारा समाज आपण निर्माण करणार आहोत का? Survival of the fittestकडून सर्वोदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही पण समाज म्हणून आपल्याला कधी-ना-कधी तो स्वीकारावा लागेल.
...आणि हीच त्या तरुण मित्राला आदरांजली ठरेल!”
- सतीश देशपांडे
sdeshpande02@gmail.com / 9960620823
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व 'मार्गी अकॅडमी'चे संस्थापक प्रवीण चव्हाण यांच्याशी सतीश देशपांडे यांनी साधलेला संवाद. (मोबाईलवर ऑडिओ ऐकण्यासाठी Listen in browser वर क्लिक करावे.)
वाचा 'स्पर्धा परीक्षा - स्वप्न आणि वास्तव' या रिपोर्ताजचे इतर दोन भाग
दोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे!
एमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको!
Tags: स्पर्धा परीक्षा सतीश देशपांडे एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यूपीएससी Satish Deshpande competitive exam MPSC Maharashtra Public Service Commission UPSC स्पर्धा परीक्षा - स्वप्न आणि वास्तव Load More Tags
Add Comment