स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकर या चोवीसवर्षीय तरुणाने पुणे येथे गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. त्यानंतर माध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून हळहळ व्यक्त झाली. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'स्पर्धा परीक्षा - स्वप्न आणि वास्तव' या विषयाचा वेध घेणारा रिपोर्ताज तीन भागांत 'कर्तव्य साधना'वरून 13 जुलै ते 15 जुलै 2021 असे सलग तीन दिवस प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील हा दुसरा लेख. या मालिकेतील पहिला लेख इथे, तर तिसरा लेख इथे वाचता येईल.
The Viral Fever (TVF) या युट्यूब चॅनलवरील ‘Aspirants’ ही वेबसिरीज यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या युवकयुवतींमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या वेबसिरीजमध्ये धैर्या आणि अभिलाष हे यूपीएससीचा अभ्यास करणारे परीक्षार्थी आहेत. अभिलाषमध्ये आयएएस होण्याची प्रचंड आकांक्षा असते मात्र वैकल्पिक विषय कोणता निवडायचा, आयएएस नाही झालो तर प्लॅन बी काय असेल यांबद्दल त्याच्या मनात प्रचंड गोंधळ होता. धैर्या मात्र स्वतःच्या करिअरबद्दल स्पष्टता असणारी तरुणी. ती अभिलाषला म्हणते, “मेरा प्लान ए हैं कि मैं यूपीएससी क्लिअर करू, सिव्हिल सर्व्हंट बनू, ताकि मैं नशामुक्ती पर काम कर सकती हूँ... रूरल एरियाज में और मेरा प्लान बी है कि मैं नशामुक्ती पर काम करू, रूरल एरियाज में... विदाऊट क्लिअरिंग यूपीएससी।”
यूपीएससी पास झाली तरी आणि नाही झाली तरी धैर्या नशामुक्ती या विषयावर काम करणार असते. ग्रामीण भागात जाऊन या विषयावर काम करणे हा तिच्या आयुष्यातील सामाजिक कार्याच्या प्रेरणेचा भाग असतो. धैर्या हुशार असते, खूप मेहनत घेते पण यूपीएससी क्लिअर होत नाही. ठरवल्याप्रमाणे ती एनजीओ स्थापन करते आणि ध्येयपूर्तीसाठी पुढचा प्रवास सुरू करते.
धैर्याचा हा स्पष्ट विचार आणि ही कृती, दोन्ही सर्वच परीक्षार्थींसाठी अनुकरणीय आहे. ज्यांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी व्हायचे आहे त्यांनी हे ध्यानात ठेवायलाच हवे की, ही स्पर्धा आहे, आपल्यासारखे खूप विद्यार्थी या स्पर्धेत आहेत, आपल्याला भविष्यात यश मिळू शकते आणि अपयशही येऊ शकते. यश आले तर प्रशासकीय सेवेमध्ये करिअर करायचे आहे आणि तिथे जाण्याची संधी मिळाली नाही तर दुसऱ्या मार्गाने करिअर करायचे आहे. थोडक्यात काय तर आपल्याला आपल्या आयुष्यात चांगले काम करायचे आहे. मग मार्ग सरकारी सेवेचा असो किंवा खासगी क्षेत्रातील सेवेचा असो.
आयुष्यात व्यावसायिकदृष्ट्या यश मिळवणे, लोकांसाठी चांगले काम करणे हे जसे पहिल्या मार्गाने साध्य करता येते, तसे ते दुसऱ्या मार्गानेही साध्य करता येते. यांपैकी एक मार्ग श्रेष्ठ आणि दुसरा कनिष्ठ असे अजिबातच नाही. म्हणजेच स्पर्धा परीक्षेतून अधिकारी पदासाठी पात्र होण्याचा आणि आपल्या आयुष्यातील यशस्वीतेचा संबंध जोडणे ही मोठी चूक ठरेल.
स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि निवृत्तीपर्यंत सरकारी सेवेत काम केलेल्या असंख्य अधिकाऱ्यांची नावेसुद्धा अनेकदा समाजाला माहीत नसतात. मात्र स्पर्धा परीक्षेशिवाय इतर क्षेत्रांत देदिप्यमान कामगिरी केलेले कितीतरी व्यक्ती लोकप्रिय ठरतात. स्पर्धा परीक्षा हा करिअरच्या दिशेने जाण्याचा, चांगले काम करण्याचा केवळ एक मार्ग आहे, तो एकमेव मार्ग नाही. आयुष्यात स्पर्धा परीक्षेशिवाय अशा असंख्य वाटा आहेत ज्या ध्येयसिद्धीकडे घेऊन जातात.
...त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वीच मनाशी ठरवायला हवे की, स्पर्धा परीक्षा पास झालो तर काय आणि नाही झालो तर पुढे काय. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे स्पष्टपणे देता येत असतील तर स्वतःबद्दल स्पष्टता आली आहे असे म्हणता येते. अस्पष्टता ठेवून वाटचाल करत राहिल्यास काहीच समाधानकारक घडत नाही. परिणामी वाट्याला निराशा आणि ताणतणाव येत राहतात.
प्लॅन ए म्हणजे परीक्षा पास होणे आणि अधिकारी म्हणून काम करणे आणि प्लॅन बी म्हणजे स्पर्धा परीक्षेतून अधिकारी नाही झालो तर करिअर म्हणून कोणत्या क्षेत्रात जायचे हा पर्याय. स्पर्धा परीक्षेत एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची असते. ती म्हणजे ही स्पर्धा आहे. याला खिलाडू वृत्तीनेच सामोरे जायला हवे. इथे 99 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याची संधी मिळणारच नाही. अशा सर्वांना आपल्या आयुष्यात वेगळ्या वाटेने जावेच लागणार आहे. मग ही वाट जर आपण सुरुवातीलाच निवडली, त्या दृष्टीने कौशल्ये आत्मसात केली तर मग प्लॅन ए नाही यशस्वी झाला तरी प्लॅन बी आपल्याला चांगली संधी देऊ शकतो.
प्रस्तुत लेखकाने 2014 ते 2017 या काळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला आहे. परीक्षेत उत्तीर्ण न होण्याचा अनुभव घेतलेला आहे. सध्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत असल्याने रोज अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क येतो. त्यातून आलेला अनुभव असा की, परीक्षा पास न झाल्यास पुढे काय करायचे याबद्दल 10पैकी 8 ते 9 विद्यार्थ्यांना स्पष्टता नाही. सर्व अॅटेम्प्ट संपल्यावर विचार करू, शेती करू, कुठेतरी नोकरी करू, काहीतरी व्यवसाय करू अशी ढोबळ उत्तरे विद्यार्थ्यांकडून मिळत असतात. पास न झाल्यास, वय वाढत गेल्यास, कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्यास या विद्यार्थ्यांच्या मनात पुढे काय करायचे याबद्दल द्विधा मनःस्थिती निर्माण होते. मग ताण अधिक वाढत जातो, अभ्यासात लक्ष लागत नाही आणि संधींची, वयाची मर्यादा संपते. यामुळे बरेच विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जातात. म्हणून प्लॅन बी हवाच. आणि त्यासाठीची आवश्यक कौशल्ये आपल्यामध्ये असायलाच हवीत.
करिअरसाठी प्लॅन बीसंबंधी चर्चा करणे हा या लेखाचा विषय आहेच. मात्र आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवा पिढी कौशल्यविकासापासून दूर का आहे, करिअरची संधी म्हणून स्पर्धा परीक्षांकडेच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी का वळतात, स्पर्धा परीक्षेतून मिळणाऱ्या नोकरीलाच शाश्वत का समजले जाते आणि सद्यःस्थितीत प्लॅन बीवर काम करायचे असेल तर मग कोणते मार्ग उपलब्ध आहेत, या गोष्टींवर चर्चा होणे गरजेचे आहे. आणि तोच या लेखाचा हेतूही आहे.
या पार्श्वभूमीवर विवेक सावंत यांच्याशी संवाद साधला. विवेक सावंत सर हे एमकेसीएलचे माजी व्यवस्थापकीय संचालक असून सध्या एमकेसीएलमध्ये चीफ मेंटॅार म्हणून कार्यरत आहेत.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या समस्येचे मूळ काय आहे याबद्दल विवेक सावंत सर म्हणतात, “आपल्या उच्च शिक्षणाचे दोन भाग पडतात. एक – प्रोफेशनल एज्युकेशन आणि दुसरा – नॉनप्रोफेशनल एज्युकेशन. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थी नॉन प्रोफेशनल एज्युकेशनमधून (बीए, बीएस्सी, बीकॉम इत्यादींमधून) येतात. या कोर्सेसमध्ये करिअर ओरिएंटेशन नाही. म्हणजे हे शिक्षण घेऊन रोजगाराची संधी मिळेल याची शाश्वती नाही. इथून या प्रश्नाची सुरुवात होते. जर एखाद्या विद्यार्थ्यानं प्रोफेशनल कोर्स केला तर त्याला रोजगाराचा किमान एखादा पर्याय तरी उपलब्ध होतो. पण तिथेही मोठ्या प्रमाणावर खासगीकरण झालेलं आहे. सामान्य कुटुंबातील मुलामुलींना तिथली फी परवडत नाही. राज्याच्या ग्रामीण भागात विज्ञान शाखेपेक्षा कला आणि वाणिज्य शाखेची ज्युनिअर कॉलेजेस संख्येनं जास्त आहेत. विज्ञान शाखेच्या कॉलेजेसची उपलब्धता कमी असल्यानं अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी प्रोफेशनल एज्युकेशनचा पर्यायच बंद होतो. विद्यार्थीनींचं तर यात अधिक नुकसान होतं. मुळात 75 टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जे 25 टक्के पोहोचतात त्यांच्यातले 75 टक्के विद्यार्थी बीए, बीएस्सी, बीकॉम या पदव्यांसाठी प्रवेश घेतात. महाविद्यालयीन शिक्षण ठरावीक साच्यात अडकलेले आहे. या पुस्तकी आणि साचेबंद महाविद्यालयीन शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाचा समावेश नसल्यानं रोजगारनिर्मितीच्या संधी विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. करिअर घडेल असं इथे काहीच नसतं. साहजिकच स्पर्धा परीक्षांतून मिळणाऱ्या शासकीय नोकऱ्यांकडे या विद्यार्थ्यांचा कल निर्माण होतो. इथे या समस्येचं मूळ आहे.”
या पार्श्वभूमीवर काय करायला हवे याबद्दल सावंत सर म्हणतात, “आपल्याकडे व्होकेशनल एज्युकेशनला प्रतिष्ठा दिली जात नाही त्यामुळे व्होकेशनल एज्युकेशनकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन सकारात्मक नाही. व्होकेशनल एज्युकेशनचं प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये रूपांतर करण्याचं आणि प्रोफेशनल एज्युकेशन महाविद्यालयीन शिक्षणात समाविष्ट करण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. उदाहरणार्थ, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना जीएसटी रिटर्न्स कसे भरायचे हे शिकवलंच जात नाही. हे काम जमणाऱ्या लोकांना रोजगाराची चांगली संधी निर्माण झाली आहे. जीएसटी रिटर्न्स भरण्यासाठी नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे (एनएसडीसीद्वारे) एक कोर्स तयार केलेला आहे. त्यासाठी अनुदान दिलं जातं. महाविद्यालयांनी असे कोर्सेस जर राबवले तर विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण प्राप्त होईल आणि त्यापासून त्यांना रोजगार मिळू शकेल. अशा प्रकारे महाविद्यालयीन शिक्षणातच प्रोफेशनल एज्युकेशनचा अंतर्भाव करता येईल. विद्यार्थ्यांना दोष देऊन चालणार नाही. धोरण म्हणून महाविद्यालयीन शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आलेल्या अपयशाला दोष द्यायला हवा. डिग्री मिळते पण त्याचं (शिक्षणाचं) अॅप्लिकेशन कसं करायचं हे विदयार्थ्यांच्या लक्षात येत नाहीत हे वास्तव आहे.”
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा विवेक सर नोंदवतात, “आपल्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत हे शोधून काढणाऱ्या संधींचासुद्धा आपल्याकडे अभाव आहे. तुम्हाला काय करायला आवडतं, तुम्हाला काय करायला जमतं आणि समाजाला कशाची गरज आहे, हे जर विद्यार्थ्यांनी तपासून पाहिलं आणि त्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळालं तरच त्यांना योग्य मार्ग मिळू शकतो.”
सावंत सरांनी सांगितले आहे ते या प्रश्नाचे मूळ आहे. आपल्या महाविद्यालयीन शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाचा समावेश नाही हे वास्तव मान्य करून आपल्याला धोरणात्मक बदल करावे लागतील. समाजात जर व्होकेशनल एज्युकेशनला प्रतिष्ठा प्राप्त झाली, महाविद्यालयांच्या पातळीवर व्होकेशनल एज्युकेशनचे रूपांतर प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये झाले आणि प्रोफेशनल एज्युकेशनचा समावेश महाविद्यालयातील शिक्षणात झाला तर रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना खुल्या होतील. प्लॅन बीची अर्थात पर्यायी संधींची आपण जी चर्चा करत आहोत त्या संधी असंख्य प्रमाणात उपलब्ध होतील. किंबहुना असेही होईल की, महाविद्यालयीन पातळीवर प्रोफेशनल एज्युकेशन मिळाल्याने रोजगाराच्या अनेक संधी मिळाल्यास विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वळणारही नाहीत.
सहाआठ वर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्लॅन बीची चर्चा केली तर ते एकून घेतीलच असे नाही पण हे वास्तव त्यांना कधीतरी स्वीकारावे लागेल. अनेकांना हा यूटर्न वाटतो हे खरे आहे पण हा यूटर्न कधी ना कधी घ्यावाच लागेल. रोजगारच उपलब्ध नाहीत असा विचार न करता काही कौशल्ये विकसित करून, त्यासाठी छोटेमोठे कोर्स करून आपल्याला रोजगाराची संधी मिळवता येईल. असे कोर्सेस केंद्र शासनाने मोफत उपलब्ध करून दिले आहेत. केद्र शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकासाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशनतर्फे हे कोर्सेस राबवले जातात. वेगवेगळ्या 37 सेक्टर्समधील बाराशेपेक्षा अधिक कोर्सेस युवकयुवतींसाठी उपलब्ध आहेत... शिवाय ते मोफत आहेत. (या 37 सेक्टर्समधील कोर्सेसबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा)
एअरोस्पेस, ॲग्रीकल्चर, होम फर्निशिंग, ब्युटी अँड वेलनेस, कॅपिटल गुड्स, इलेक्ट्रानिक्स, फुड इंडस्ट्री, जेम्स अँड ज्वेलरीज्, हेल्थकेअर, मिडिया अँड एंटरटेनमेंट इत्यादी सेक्टर्समधील कोर्सेस करून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. व्यवसायात काही दिवस सातत्य ठेवल्यास प्रगती होते मात्र प्रतिष्ठेचा प्रश्न करून याकडे नकारात्मक दृष्टीने पाहता कामा नये. स्पर्धा परीक्षेत आपण जितकी जोखीम घेतो, मेहनत करतो ते इथे केल्यास यश नक्कीच मिळू शकेल. दर महिन्याच्या एक तारखेला होणारा पगार, लाल दिव्याची गाडी, इतर सुविधा हे डोक्यातून बाजूला काढायला हवे.
प्लॅन बीचा विचार करणारे, त्यावर काम करणारे तरुण आपल्या व्यवसायात यशस्वी झाल्याचे दिसून येईल. अमोल पवार (माळशिरस, जिल्हा सोलापूर) हा तीन वर्षांपूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. त्याने मुख्य परीक्षा दिल्या, मुलाखतही दिली. पण अंतीम निवडयादीत त्याचे नाव आले नाही. त्याने बांधकाम व्यवसायात काम करायला सुरुवात केली. टाळेबंदीच्या काळात गावाकडे त्याची भेट झाली. तो सांगत होता, “यश नाही आले, मग व्यवसाय करायचा ठरवलं. आज मला तर चांगले पैसे मिळतातच शिवाय इतरांनाही रोजगार देता येतो.”
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्लॅन बी तयार करता यावा, त्यात त्यांना मदत व्हावी या हेतूने अमोल आणि काही समविचारी तरुण एकत्र आले आहेत. भविष्यात तरुणांचे संघटन करून रोजगाराच्या प्रश्नावर काम करण्याचा त्यांचा हेतू आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी जर व्यवसायात पदार्पण केले, खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतील कारण त्यांनी अभ्यासाच्या दरम्यान विविध विषय अभ्यासलेले असतात. त्यांना चालू घडामोडींचे ज्ञान असते. त्यांचे आकलन वाढलेले असते. तौलनिकदृष्ट्या विचार करण्याची क्षमता विकसित झालेली असते. या सगळ्याचा फायदा प्लॅन बीमध्ये होऊ शकतो.
दर्शना दावडा ही नागपूरची तरुणी. एमपीएससीचा आणि यूपीएससीचा अभ्यास पुण्यात करत होती. तिने दोन वेळा मुख्य परीक्षा दिली. दिल्लीत जाऊन यूपीएससीची तयारी केली पण यश मिळू शकले नाही. उत्तम इंग्लीश येत असल्याने तिला बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. कंपनीत तिला इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत लवकर यश मिळवता आले. अमोल असो किंवा दर्शना असो यांनी स्पर्धा परीक्षेतील अपयशाला स्वीकारले. प्लॅन बीची अंमलबजावणी करून ते आज व्यावसायिक जीवनात यश मिळवत आहेत.
हे सर्व दृष्टीकोनावर अवलंबून आहे. आयएएस न होऊ शकलेले कितीतरी तरुणतरुणी आज प्राध्यापक, संशोधक, व्यावसायिक, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तर अनेक जण खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. आएएएस झाल्यावर त्यांनी जितके चांगले काम केले असते तितकेच चांगले काम ते आपापल्या क्षेत्रात करत आहेत.
शासकीय अधिकाऱ्यांना बक्कळ पैसा मिळतो, पगाराव्यतिरिक्त खूप संपत्ती जमा करता येते, आपल्यालाही असे श्रीमंत होता येईल हा विचार विद्यार्थ्यांनी डोक्यातून काढून टाकायला हवा. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवल्याने अतिरिक्त पैशाचे हे आकर्षण वाटू शकते. सर्वच विद्यार्थी असा विचार करत नाहीत पण अशा प्रकारे विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही ही वस्तुस्थिती आहे. या आकर्षणापोटीही दीर्घ काळ अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. खरेतर आपल्याला मिळणाऱ्या पगारातच सर्व कौटुंबिक खर्च भागवता आला पाहिजे. क्षेत्र कोणतेही असो एकही अतिरिक्त पैसा भ्रष्ट मार्गाने आपल्या घरात यायला नको या नैतिक विचाराचा कधीही विसर पडता कामा नये.
या लेखाच्या निमित्ताने एका शिक्षकांशी संवाद झाला. दुःख व्यक्त करत त्यांनी एक अनुभव सांगितला. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना अधिकारी होण्यासाठीचे मार्गदर्शन केले आहे. दोनतीन वर्षांपूर्वी क्लासवन अधिकारी झालेल्या एका विद्यार्थ्याचे उदाहरण ते देत होते. अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात त्या विद्यार्थ्याकडे शहरात राहायला पैसे नव्हते. तोच विद्यार्थी अधिकारी झाल्यावर आता दोन वर्षांनी ऐंशी लाख रुपयांचा फ्लॅट बुक करतो आहे. इतक्या कमी कालावधीत शासकीय अधिकाऱ्याच्या पगारात हे पूर्ण होणे शक्य नाही. भ्रष्ट मार्गाने हे तो करत आहे. याचे त्याला काहीच वाईटही वाटत नाही. जे विद्यार्थी अशा अधिकाऱ्यांच्या संपत्तीकडे, त्यांच्या जीवनशैलीकडे पाहून आकर्षित होत असतात ते प्लॅन बीचा विचारही करायला तयार नसतात. त्या शिक्षकांना आपल्या या विद्यार्थ्याबद्दल मनोमन वाईट वाटत होते.
प्लॅन बीसंदर्भात करिअर मार्गदर्शक आनंद पाटील हे विद्यार्थ्यांसमोर वेगळा दृष्टीकोन ठेवतात. ‘स्टडी सर्कल’च्या माध्यमातून आनंद पाटील हे गेली 30 वर्षांहून अधिक काळ स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. पाटील सरांच्या मते, “स्पर्धा परीक्षेला प्लॅन ए मानूच नका. स्पर्धा परीक्षेला प्लॅन बी मानून तयारी करा कारण इथे संधी अल्प प्रमाणात आहेत. जिथे अधिक संधी आहेत, जिथे यश मिळण्याची शक्यता अधिक आहे तिथे जास्त लक्ष द्या. सरकारी क्षेत्रापेक्षा खासगी क्षेत्रात लवकर संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपले SWOT Analysis (Strengths, Weaknesses, Opportunities & Threats Analysis) करायला हवे. आपल्यामधल्या क्षमता काय आहेत, आपल्यामध्ये कमतरता काय आहेत, आपल्या क्षमतेनुसार आपल्याला कुठे चांगली संधी मिळू शकेल, ध्येय साध्यतेसाठी संधी आणि धोके काय आहेत या सर्व बाजूंचा विचार करून करिअरची निवड करायची असते. स्पर्धा परीक्षेत येणारे विद्यार्थी स्वतःचे असे विश्लेषण करत नाहीत. केवळ अनुकरण म्हणून अभ्यास करू नये, विचारपूर्वक अभ्यास करावा. बहुतांश विद्यार्थ्यांकडे अधिकारी होण्याची क्षमता नसते पण ते चारपाच वर्षे अभ्यास करतात. त्यात आयुष्यातली महत्त्वाची वर्षे वाया जातात. घरचे काम नको, जबाबदाऱ्या नको म्हणूनही बरेच विद्यार्थी अभ्यास करताना दिसतात. आर्थिक–राजकीय घटक लक्षात घेता या क्षेत्रात भविष्यात आणखी अनिश्चितता येऊ शकते याचा विचार करावा. वस्तुस्थितीचा विचार न करता जर स्वप्नरंजनात राहून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आलात तर हाती निराशाच येणार आहे. आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपण फार दिवस आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून पैसे घेऊ नये. स्वतःसाठी लागणारे पैसे स्वतः कमवावेत. स्वयंभू असण्याने आत्मविश्वास येतो... आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, आपल्याला अधिकारी होण्याची संधी मिळणार की नाही हे केवळ आपल्या हातात नसून ते इतरही अनेक घटकांवर अवलंबून आहे.” अनुकरण न करता, स्वप्नरंजनात न रमता वास्तवाचा विचार करा... हा आनंद पाटील यांचा सल्ला विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी अनमोल आहे.
स्पर्धा परीक्षार्थींचा प्रश्न हा व्यापक स्वरूपातील बेरोजगारीचा आहे. तो देशभर आहे. यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या पातळीवर धोरणात्मक सुधारणा होणे अपेक्षित आहे. विद्यार्थी भरकटतात याचा अर्थ विद्यार्थी दोषी असतात असे नव्हे. आपली शैक्षणिक-आर्थिक धोरणे त्यांना दिशाहीन करत आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणते धोरणात्मक बदल करायला हवेत याची चर्चा सद्यःस्थितीच्या निमित्ताने व्हायला हवी. दबावगटाच्या माध्यमातून धोरणबदलाच्या दृष्टीने सकारात्मक हस्तक्षेप करणे, शाळा-महाविद्यालयांच्या स्तरावर धोरणात्मक दृष्टीने बदल घडवून आणणे, युवकयुवतींना यासाठी जागृत करणे हे आव्हानात्मक असले तरी आवश्यक आहे.
- सतीश देशपांडे
sdeshpande02@gmail.com / 9960620823
(लेखक मुक्त पत्रकार आहेत)
वाचा 'स्पर्धा परीक्षा - स्वप्न आणि वास्तव' या रिपोर्ताजचे इतर दोन भाग
वास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...
एमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको!
Tags: रिपोर्ताज स्पर्धा परीक्षा - स्वप्न आणि वास्तव स्पर्धा परीक्षा सतीश देशपांडे एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यूपीएससी Reportage Satish Deshpande Competitive Exam MPSC Maharashtra Public Service Commission UPSC Load More Tags
Add Comment