मराठीतील महत्त्वाच्या नियतकालिकांचे संपादक, साहित्याचे समीक्षक आणि सौंदर्यशास्त्राचे भाष्यकार अशी ओळख असलेल्या प्रभाकर पाध्ये (1909 ते 1984) यांनी मार्च 1967 ते एप्रिल 1968 या काळात साधना साप्ताहिकामध्ये 'असेही विद्वान' हे सदर वर्षभर चालवले. त्यात त्यांच्या सहवासात आलेल्या 99 व्यक्तींविषयी त्यांनी लिहिले. या व्यक्तींशी संबंधित एखादी महत्त्वाची आठवण, घटना किंवा प्रसंग असे या लेखनाचे स्वरूप होते. त्याची पार्श्वभूमी सांगणारे टिपण साधनाचे तत्कालीन संपादक यदुनाथ थत्ते यांनी त्या सदरातील शेवटचा लेख प्रसिद्ध झाला, तेव्हाच्या अंकात लिहिले होते.
या पुस्तकाचे संपादन केले आहे, संकल्प गुर्जर या तरुण अभ्यासकाने. तेव्हा तो दिल्ली येथील सार्क (SAU) विद्यापीठात आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयात अभ्यास-संशोधन करत होता. त्याच दरम्यान, 'हिरवे पान' आणि 'सार्क विद्यापीठातील दिवस' ही त्याची दोन छोटी पुस्तके साधना प्रकाशनाकडून आली होती. सध्या तो उडुपी (कर्नाटक) येथील मणिपाल विद्यापीठात आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाचे अध्यापन करतो. 'द सुपरपावर्स प्लेग्राउंड'हे त्याचे पुस्तक गेल्या वर्षी 'Routledge'या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित झाले आहे.
असेही विद्वान हे पुस्तक आता ऑडिओ स्वरूपात उपलब्ध झाले आहे. त्यासाठी वाचन केले आहे गजानन परांजपे यांनी.. हे एकूण 20 ऑडिओज् आठवड्यातून दोन याप्रमाणे कर्तव्यवर प्रसिद्ध करत आहोत. प्रत्येक ऑडिओ 10 ते 20 मिनिटांच्या दरम्यान असून त्यात दोन किंवा तीन विद्वानांविषयीचे प्रसंग आहेत. वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकात एकूण 75 लेखांचे भारतातील विद्वान (33), आशियायी विद्वान (20) व पाश्चात्त्य विद्वान (22) असे तीन विभाग केले आहेत. क्रमवारी लावताना मात्र तसा काहीही विचार केलेला नाही. कारण या आठवणी इतक्या विविध प्रकारच्या आहेत की, त्या सर्व काहीएक सूत्रात पकडता येणे अवघड आहे. विद्वान व्यक्तींच्या विक्षिप्तपणाचे किंवा वैशिष्ट्यपूर्ण वर्तनाचे हे प्रसंग ऐकताना त्या-त्या विद्वानांविषयी असलेले गूढ कमी होईल; या विद्वान व्यक्तीसुद्धा मानवी भाव-भावना, इच्छा-आकांक्षा असलेल्याच आहेत हे प्रकर्षाने जाणवेल आणि असे असूनही त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देता आले याची जाणीव होऊन आपल्या मनातील या विद्वानांविषयीचा आदर निश्चितपणे वाढेल!
पार्श्वभूमी
श्री. प्रभाकर पाध्ये 'इंडिया रायटर्स सेंटर'च्या कामानिमित्त पुण्यात वास्तव्य करणार, असे समजताच साधनाला फार आनंद झाला. हा आनंद अगदीच निरपेक्ष होता असे म्हणणे कठीण आहे. त्यांच्या पुण्यातील वास्तव्याचा लाभ साधनाला काही प्रमाणात तरी मिळेल हा लोभही सूक्ष्मपणे कुठे तरी त्या आनंदाच्या आश्रयाने वागत होता. पाध्ये पुण्यात प्रत्यक्ष आल्यावर आम्ही त्यांच्यामागे काही तरी लिहिण्याचे दुगणेच लावले. साधनावरील त्यांचा लोभ सुरुवातीपासूनच सर्वांना ठाऊक असल्याने शेवटी भिडेला ते बळी पडतील असा आडाखा होता.
पाध्यांनी परोपरीने नकार दिला. ते गहन अशा सौंदर्यशोधात व्यग्र आहेत हे ठाऊक होते, पण गहनाच्या शोधात गढलेल्या माणसालाही काही विश्रांतीचे क्षण कधी कधी हवेहवेसे वाटतात. शिवाय ज्या थोरामोठ्यांशी सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या चळवळीमुळे त्यांचा संबंध आला त्यांचे सान्निध्य उत्कटपणे पुन्हा अनुभवण्याचा लाभ होत असला तर तो त्यांना निश्चितच आनंददायी वाटेल. शिवाय आयुष्यातला ऐन कर्तबगारीचा काळ त्यांनी वृत्तपत्रातच घालवलेला असल्याने त्याचेही काही अंश त्यांच्या पिंडात दबा धरून बसलेलेच असणार, तेही आपल्याला साथ देतील असा आमचा होरा होता.
आणि अखेर पाध्यांना राजी करण्यात आम्हाला यश मिळाले. 18 मार्च 1967 च्या साधनाच्या अंकात प्रथम हे सदर प्रकाशित झाले. गेले वर्षभर पाध्यांनी अतिशय नियमितपणे या सदरासाठी लिहिले, या अंकातल्या एकशेएकाव्या आठवणींबरोबर या सदराची समाप्ती होत आहे.
पाध्यांच्या या लिखाणाचा घाटच सर्वस्वी वेगळा होता. रूढ अशा कुठल्याही वर्गवारीत हे लिखाण बसवता येण्यासारखे नाही, पण त्यामुळेच या सदराबद्दल अगदी परस्परविरुद्ध टोकाच्या टीका संपादकांच्या कानी पडत होत्या. या टीका म्हणजे या सदराने वाचकांच्या मनावर प्रभाव पाडल्याचेच चिन्ह होते. काहींना हा व्यक्तिजीवनाला ओठंगून असणारा प्रकार अजिबात आवडला नाही, काहींना त्यामुळेच तो अधिक हृद्य व हवाहवासा वाटला! सदराच्या या समाप्तीनंतर एकत्रपणे ही धावती रेखाटने वाचकांनी पाहिली तर त्याबद्दल अधिक यथार्थपणे त्यांना आपले मत बनवता-व्यक्त करता येईल. पाध्ये यांना धन्यवाद.
- यदुनाथ थत्ते
संपादक, साधना, एप्रिल 1968
हे पुस्तक छापील किंवा इ-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags: marathi audio book prabhakar padhye gajanan paranjape asehi vidwan sadhana prakashan sankalp gurjar Load More Tags
Add Comment