इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य: एक सुसंवाद

कर्तव्य साधना

हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या प्रकाशन संस्थेकडून गेल्या वर्षी 'इस्लाम अँड फ्युचर ऑफ टॉलरंस'  या मोठ्या नावाचे अगदीच छोटे पुस्तक प्रकाशित झाले, त्याचा मराठी अनुवाद आता साधना प्रकाशनाकडून आला आहे. हे संपूर्ण पुस्तक संवाद फॉर्म मध्ये आहे. ही चर्चा जरी इस्लामला समोर ठेवून केलेली असली तरी, यातील विवेचन विश्लेषण कमीअधिक प्रमाणात सर्वच धर्मांना लागू होणारे आहे. सर्वाधिक महत्त्वाची बाब अशी की, या पुस्तकातील भूमिका हमीद दलवाई व मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या खूप जवळ जाणारी आहे. आणि आणखी विशेष हे आहे की, हे संवाद वाचताना नरहर कुरुंदकर व हमीद दलवाई यांच्यात झालेल्या संवादांची कल्पना येऊ शकते. या पुस्तकातील हे पहिले प्रकरण... 

पार्श्वभूमी

हॅरिस- माजिद, आज या संभाषणासाठी वेळ काढलात, याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही जे काम हाती घेतले आहे, ते फार म्हणजे फार महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. इस्लाम धर्माबद्दल किंवा एकूणच धर्मश्रद्धा बदलणे कितपत शक्य असते यावर आपण एकमेकांशी किती सहमत होऊ, हे माहीत नाही. पण तुम्ही जे काही करत आहात, त्याला पाठिंबा देणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि हेच मला आज तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे.

नवाझ- मनापासून धन्यवाद. तुम्ही माझ्या कामास पाठिंबा इच्छिता, ही माझ्यासाठी फार मोठी बाब आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की, आपण फार संवेदनशील, नाजूक कामाला हात घातला आहे. हे काम म्हणजे तारेवरची कसरत आहे. त्यासाठी आपण अनेक लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पण यातील खूप जणांना थोडेसुद्धा जागचे हलण्याची इच्छा नाहीये. अशा वेळी आपण हे संभाषण शक्य तितक्या जबाबदारीने पुढे नेणे फार महत्त्वाचे आहे.
 
हॅरिस- एकदम मान्य. संभाषणाच्या सुरुवातीला मला आपल्या पहिल्या भेटीची आठवण करून द्यायला आवडेल. कारण याच भेटीत मला जाणवले की, तुम्ही फार अवघड कसरत करत आहात. अगदी खरे सांगायचे तर, आपली ती भेट फार काही मैत्रीपूर्ण झाली नव्हती. 

ऑक्टोबर 2010 मध्ये मी इंटेलिजन्स स्क्वेअर्ड आयोजित एका चर्चासत्राला गेलो होतो. तिथे तुमचा सामना माझ्या दोन मित्रांशी- आयान हिर्सी (इन्फिडेल या पुस्तकाची आफ्रिकन वंशाची, मुस्लिम धर्मीय लेखिका. तिने इस्लामचा त्याग केला आहे.) आणि डग्लस मरे (हे ब्रिटिश लेखक ‘सेंटर फॉर सोशल कोहीजन’ या संस्थेसाठी काम करतात.) यांच्याशी झाला. चर्चेनंतर आयोजक, सहभागी आणि काही निवडक पाहुणे यांच्यासाठी मेजवानी आयोजित केलेली होती. तिथे आपली पहिली भेट झाली.

लोक नुकत्याच झडून गेलेल्या चर्चेवर थोडेफार मतप्रदर्शन करत होते आणि पुढच्या गप्पांकडे वळत होते. तेवढ्यात आयान म्हणाली, ‘या चर्चेवर सॅम हॅरिसला काय म्हणायचंय? मला आवडेल त्याचं मत जाणून घ्यायला.’ खरे तर तोवर माझ्या पोटात बऱ्यापैकी व्होडका गेली होती. तरीसुद्धा मी काय बोललो, हे मला आजही लख्ख आठवते आहे; अगदी शब्द न्‌ शब्द! मी थेट तुम्हाला उद्देशून बोलू लागलो. खरे तर आपली ओळख नव्हती; कुणी करूनही दिली नव्हती. मी कोण आणि काय करतो, हे तुम्हाला माहीतही नसावे. पण मी जे काही म्हणालो, ते पुढीलप्रमाणे होते :

माजिद, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही हाती घेतलेले काम तडीस जाणे मला अशक्य कोटीतील वाटते. तरी तुम्ही ते कितपत समर्थपणे पार पाडू शकता, यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. तुम्हाला अख्ख्या जगाला आणि खासकरून मुस्लिम जगताला पटवून द्यायचे आहे की, इस्लाम हा शांतिप्रिय धर्म असून त्याचे अतिरेक्यांनी अपहरण केले आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की, इस्लाम हा शांतिप्रिय धर्म नाहीच आणि हे जे कुणी तथाकथित अतिरेकी आहेत, त्यांचा प्रयत्न इस्लाम धर्माच्या खऱ्याखुऱ्या मूलतत्त्वांचा अत्यंत प्रामाणिक अन्वय लावून तो वास्तवात आणणे हाच आहे. त्यामुळे तुम्ही आज व्यासपीठावरून इस्लामी धर्मग्रंथांच्या अर्थविवरणाविषयी जे दावे करत होतात, ते भाबडे आणि फोल आहेत. तुम्ही म्हणत होतात की, कुराणातील काही उताऱ्यांचा अन्वय कोणत्या ऐतिहासिक संदर्भांत लावला गेला, हे लक्षात घेतले पाहिजे. 

इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला जाणीव आहे की, तुम्ही या जगातील सर्वांत कठीण कामाला हात घातला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व जण तुमचे कृतज्ञ आहोत. इस्लाममध्ये आतून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचेच आहे. हे काम आयानसारखी इस्लामचा त्याग केलेली व्यक्ती किंवा डग्लस आणि माझ्यासारखे काफिर करू शकत नाहीत. पण धर्मसुधारणेचा मार्ग मला काहीसा लटका वाटतो. तो चोखाळताना काही गोष्टी खऱ्या आहेत, असे मानावे लागेल. इस्लामचे मूलतत्त्व प्रत्यक्षात जसे नाही, तसे ते आहे, असे समजून चालावे लागेल. उदाहारणार्थ, जिहाद म्हणजे केवळ आंतरिक, आत्मिक संघर्ष होय, असे मानावे लागेल. पण तत्त्वत: जिहाद म्हणजे पवित्र युद्धच होय. तोच त्याचा वास्तविक अर्थ होय. माझा प्रश्न असा आहे की, तुम्हालासुद्धा असेच वाटते का? तुमचा पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे काही काल्पनिक गोष्टी खऱ्या आहेत, असे इतके ठामपणे आणि प्रदीर्घ काळ मानायचे, की यथावकाश खरोखरच त्या वास्तवात उतरतील? 

मला पुन: पुन्हा हे स्पष्ट करावे लागेल की, त्या दिवशी मी तुमच्या बरोबर जो संवाद सुरू केला, तो काहीसा निमखासगी तर थोडासा सार्वजनिक होता. आपले संभाषण कुणी ध्वनिमुद्रित करत नव्हते, हे खरे. पण त्या वेळी त्या खोलीत सत्तर-पंचाहत्तर लोक आपण काय बोलतोय, ते ऐकत होते. मी काय बोललो, ते तुम्हाला आठवतेय का? आणि त्यावर तुम्ही काय उत्तर दिले, ते तुमच्या लक्षात आहे का? 

नवाझ- हो- हो, मला आठवतेय. आणि तुम्ही त्याला पुन्हा उजाळा दिलात, हे चांगलेच झाले. त्या वेळी तुम्ही जे म्हणालात, त्याचा मी जे काही करू इच्छित होतो त्याच्याशी काय संबंध आहे, हे मला नीटसे उमगले नव्हते. आपले बोलणे कुणी प्रसारित करत नसले, तरी त्या वेळी बरेच जण उपस्थित होते, याचा तुम्ही उल्लेख केलात, याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.

माझ्या दृष्टीने त्या खोलीत काय, किंवा खोलीबाहेर काय; मी जे म्हणतोय, ते जसेच्या तसे लोकांनी समजून घेणे महत्त्वाचे होते. खरे तर मला जे म्हणायचे आहे, त्याचा मुस्लिमबहुल समाजावर जेवढा परिणाम व्हावा अशी माझी इच्छा आहे, तेवढाच मुस्लिम अल्पसंख्य समाजावरही व्हावा, असे मला वाटते. समविचारी लोकांना एकत्र आणून त्यांचाच मुख्य प्रवाह तयार करावा, असा माझा मानस आहे. याचा अर्थ त्या सर्वांनी मुस्लिम व्हावे किंवा इस्लामचा त्याग करावा, असे मुळीच नाही.

उलट, आपणा सर्वांना काही धर्मनिरपेक्ष, म्हणजेच धर्माचा संदर्भ नसणारी मूल्येच एकत्र बांधून ठेवू शकतील. मानवी अस्तित्वाची वैश्विकता, तसेच लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष (अमेरिकन आणि ब्रिटिश ज्या अर्थाने secular हा शब्द वापरतात, त्या अर्थाने) मूल्यांवर लक्ष केंद्रित केल्यास आपण सर्व जण काहीएक समान भूमिकेवर येऊ शकू.

अर्थात, माझे हे म्हणणे सर्वांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या दिवशी त्या खोलीतसुद्धा बरेच काही पणाला लागले होते. तेथील श्रोते गमावणे म्हणजे माझी भीती प्रत्यक्षात उतरण्यासारखेच होते. भीती कसली, तर चर्चेमधून श्रोत्यांचे ध्रुवीकरण होण्याची. काही लोक म्हणणार की, इस्लाम हा युद्धखोर धर्म आहे आणि असे म्हणून ते त्याच्या नावाने युद्ध करणार. तर, उरलेले म्हणणार की, इस्लाम हा युद्धखोरच आहे, म्हणून त्याच्या विरोधात युद्ध छेडणार. असे काही झाले, तर परिस्थिती अगदी हाताबाहेरच जाईल. 

आता तुमच्या प्रश्नातील विशिष्ट मुद्द्यांबाबत. मी त्या वेळी जे उत्तर दिले, ते तसे दिले त्यामागे एक कारण होते. मला असे वाटले की, तुम्ही मला सूचित करत होतात की, इस्लामला शांतिप्रिय धर्म असे लेबल लावून मी अस्तित्वात नसलेली गोष्ट खरी मानतोय. मला आठवतेय, तुम्ही त्यानंतर असेही म्हणालात, ‘व्यासपीठावरून मी असे बोललो तर समजण्यासारखे आहे, पण त्या खोलीत छोट्याशा गटासमोर तरी मी प्रामाणिक का नाही राहत?’

हॅरिस- हो, मी अगदी हेच म्हणालो होतो. 

नवाझ- इथे, या छोट्याशा गटासमोर तरी तुम्ही प्रामाणिक का नाही राहत; या तुमच्या प्रश्नामधून सरळसरळ सूचित होत होते की, मी तुमच्याशी प्रामाणिक नव्हतो. खरे म्हणजे माझे अत्यंत प्रामाणिक मत असे आहे की, इस्लाम हा धर्म शांतिप्रियपण नाही आणि युद्धखोरपण नाही; तो फक्त एक धर्म आहे. इतर कुठल्याही धर्माच्या पवित्र ग्रंथांप्रमाणे इस्लामच्या पवित्र ग्रंथांमध्येसुद्धा काही मजकूर काही लोकांना अत्यंत अडचणीचा, आक्षेपार्ह वाटू शकतो.

त्याच वेळी हेपण खरे की, सर्वच पवित्र ग्रंथांमधील काही भाग अगदी साधे-सरळ, निरुपद्रवी असतात. धर्म कधी स्वत:च्या बाजूने बोलत नाहीत, स्वत:ची वकिली करत नाहीत. कुठल्याही साहित्यकृतीला, पवित्र ग्रंथाला किंवा पुस्तकाला स्वत:चा असा आवाज नसतो. अन्वय लावणारी व्यक्ती तिचा आवाज त्याला बहाल करत असते. हे माझे मत मी सर्वच साहित्यकृतींना लागू करतो. मग शेक्सपिअरचा अन्वय लावणे असो, की धार्मिक ग्रंथांचे अर्थविवरण करणे असो.

त्यामुळे मी जेव्हा म्हणत होतो की, इस्लाम हा शांतिप्रिय धर्म आहे; तेव्हा मी खोटारडेपणा करत नव्हतो. माझे म्हणणे अधिक स्पष्ट करण्याची संधी त्यानंतर मला ‘रिचमंड फोरम’ला मिळाली. तिथे मी आणि आयान पुन्हा या मुद्द्यावर बोललो. धर्मग्रंथ फक्त अस्तित्वात असतात; माणसे त्यांचा अन्वय लावतात.

त्या दिवशी ‘इंटेलिजन्स स्क्वेअर्ड’च्या कार्यक्रमास चर्चासत्राच्या काहीशा अनैसर्गिक मर्यादा होत्या. त्यामुळे तेथे मी इस्लाम हा शांतिप्रिय धर्म असल्याचे ठासून सांगितले; कारण आज बहुसंख्य मुस्लिमांना इस्लाम हा युद्धखोर धर्म आहे, हे विधान मान्य नाही. इस्लामचे अनुयायी इस्लामचा जो अन्वय लावतात, तोच खरा इस्लाम धर्म असे जर आपण धरून चालत असू; तर मग सध्या तरी इस्लाम हा शांतिप्रिय धर्म आहे, असेच म्हणावे लागेल.

आपल्यापुढे आता आव्हान आहे ते, हे जे मूक बहुसंख्य आहेत, त्यांना गदागदा हलवून जागे करणे आणि जिहादींच्या विरोधात एकत्र आणणे. असे झाले तर आज संघटित, अल्पसंख्य जिहादींनी जी हिंसेची भाषा लोकप्रिय केली आहे, तिला आव्हान मिळू शकेल. आज इस्लामविषयी जे बोलले जाते, त्यावर या अल्पसंख्य जिहादींचेच वर्चस्व आहे. त्या दिवशी मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण चर्चेने अशी दिशा पकडली की मला कुठली तरी एक बाजू घेणे भाग पडले : युद्ध की शांती? म्हणून मग मी शांतीची बाजू उचलून धरली. 

हॅरिस- अच्छा, असे आहे तर! अर्थात, तुम्ही त्या दिवशी मला दिलेल्या उत्तराबद्दल तुम्हाला जाब विचारावा, म्हणून मी ती आठवण काढली नाही. शिवाय त्यानंतर आजपर्यंत कदाचित तुमचे विचार थोडे बदललेपण असतील. एक मात्र खरे की, त्या दिवशी आपल्यामधील संभाषण खाड्‌कन थांबले. त्यानंतर आपण कशी रुजवात घातली, हे काही मला आठवत नाही. 

नवाझ- आपण रुजवात घातल्याचे काही मला आठवत नाही. 

हॅरिस- ठीक आहे. आज आपण अधिक आशावाद मनात बाळगून संभाषण सुरू करू या, कारण आपल्याला अनेक मुद्द्यांवर बोलायचे आहे. पण मुद्द्यांना हात घालण्याआधी आपण तुमची पार्श्वभूमी सांगू, कारण ती फारच रोचक आहे. आपण ज्या समस्यांवर चर्चा करणार आहोत, त्यांविषयी तुम्हाला एवढी माहिती कशी, हे जरा आपल्या वाचकांना सांगता का? 

(अनुवाद: करुणा गोखले)

 

Tags: Majid Nawaz Islam New Book मजीद नवाझ सॅम हॅरिस इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य नवे पुस्तक अनुवाद Load More Tags

Comments:

संजय लडगे

कृपया बाबासाहेब आंबेडकर यांचा 'Thoughts on pakistan' या ग्रंथाचे मराठी भाषांतर करून प्रसिद्ध करावे.

Dr. Abhijeet Safai

I am deeply grateful to the authors for translating this book! It is a very difficult topic to talk on and hence it was a much needed book. Thank you to everyone involved in the process!

Add Comment