टेंभूर्णीसारख्या गावात अभ्यासाव्यतिरिक्त वाचनासाठी पुस्तकं मिळणं आणि मिळवणं या दोन्ही गोष्टी अवघडच. अशात जमेल तशी मिळवून पुस्तकं वाचण्याचा छंद चौथी-पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीला लागतो..मग पुढे दिनदर्शिका असेल, कुणाचा 'ढापलेला' दिवाळी अंक असेल, ती वाचत सुटते..वाचता वाचता लिहित्या हातांची होते..शेताच्या बांधावर सुचलेल्या कवितांना कागदावर उमटवू लागते आणि कवयित्री म्हणून नावारूपास येते. पुस्तकांसाठीची तिची धडपड मात्र आजही तशीच पहिल्यासारखीच.. 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने कर्तव्य साधना वर एकूण चार लेख प्रसिध्द होत आहेत, त्यातील या पहिल्या लेखात कवयित्री कल्पना दुधाळ सांगताहेत त्यांच्या वाचन प्रवासाची, त्यातून उगवलेल्या भुईकमळांची गोष्ट..
वाचनाचा विचार करत असताना मला माझ्या भवतालाकडं नीट बघावंसं वाटतं. 'त्या भवतालात पुस्तकांना जागा होती का, आहे का आणि असेल का?' असा विचार करावासा वाटतो. आज माझं वय चाळीस वर्षं आहे. पहिली दहा-बारा वर्षं सोडून दिली तरी नंतरच्या माझ्या कळत्या वयापासून आतापर्यंतच्या काळाचा पट वाचनाच्या संदर्भाने मला उलगडावासा वाटतो.
आमची मागची पिढी पोटापाण्यासाठी धडपड करत उभी राहिली होती. त्यांच्यासाठी शिक्षण ही फारच लांबची गोष्ट होती. तशात ओढाताण करून त्यांनी आम्हाला शाळेची वाट दाखवली होती. चटके खात-खात आम्हीही ती वाट धरली. अक्षरओळख झाली. अभ्यासक्रमाची जुनीपानी पुस्तकं मिळवता मिळवताच आम्ही पकाट झालो. इतर पुस्तकांची नावं, संदर्भ, माहितीही आम्हाला क्रमिक पुस्तकांमधून झाली. म्हणजे हा धडा अमुक-अमुक पुस्तकातून घेतलेला आहे किंवा ही कविता अमुक-अमुक कवितासंग्रहातून घेतलेली आहे, असं. तेव्हा आम्हाला ती-ती पुस्तकं वाचावीशीही वाटत होती, पण आम्ही त्या पुस्तकांपर्यंत पोचलो मात्र नाही किंवा ती पुस्तकंही आमच्यापर्यंत पोचली नाहीत.
एखादी गोष्ट एखाद्याला करावीशी का वाटते? 'तर त्या माणसाचा तसा काहीसा कल असतो', अंतःप्रेरणा असते- असं आपण म्हणूया. मला आठवतंय- आमच्या वस्तीवर चौथीपर्यंत शाळा होती. तिथं शिकून मी टेंभुर्णी गावातल्या शाळेत गेले. त्या शाळेचे गुरुजी आमच्या लांबच्या नात्यातले होते. एकदा त्यांना काही तरी सांगावा सांगायला म्हणून घरातून मला शाळेत पाठवलं. तेव्हा त्यांच्याकडे पुस्तकं आहेत, हे मला समजलं. त्यांच्याकडे एक लाकडी पेटी होती, त्यात काही पुस्तकं होती. मग काय! 'मी ही दोन पुस्तकं आज नेते, उद्या परत आणून ठेवते,' असं करून सगळी पुस्तकं वाचून संपवली होती. ती पुस्तकं कोणती होती? तर अकबर-बिरबल, सिंदबादच्या सफरी, छान-छान गोष्टी, एकदा काय झालं, छोटे-मोठे शब्दकोश... असं काहीही. पण मला शब्दांची ओढ तिथं लागली.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मी काही ना काही वाचायला शोधायचे. शोधून काय वाचायचे? तर घरातल्या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानाच्या मागे वेगवेगळ्या लेखकांचे लेख, रेसिपी, कलाकृती असं काहीही असायचं. त्यातलं काहीच मी सोडत नव्हते. वेळ मिळाला की, पुनः पुन्हा वाचायचं. शाळेतली भाषेची पुस्तकंही मला खूप आवडायची. तसंच दिवाळीत आमच्या घरी माझे चुलते यायचे. ते पुण्यातून येताना एखादा दिवाळी अंक एसटीत वाचायला म्हणून आणायचे. मग ते घरी आले की, मी त्या अंकावर टपून असायचे. अजून एक गंमत अशी की, तो अंक मी लपवून ठेवायचे. ते शोधायला लागले की, मी त्यांना शोधूसुद्धा लागायचे. पण सापडू मात्र देत नव्हते. ते परत गेल्यावर मग बरेच दिवस मी तो अंक वाचत राहायचे.
शेतीत धडपडत, काबाडकष्ट करत आमची कोरडवाहू शेती बागायती झाल्यावर घरची परिस्थिती जरा बरी झाली. कष्टाची फळं मिळाली. मग आम्ही चार पैसे घालून जुनापाना कृष्णधवल टीव्ही घरात आणला. वेळ मिळेल तेव्हा त्या टीव्हीसमोर बसून आम्ही आमच्यापेक्षा वेगळं जग बघू लागलो. खरं-खोटं कसंही असेल, पण आम्ही तिथं टक लावून बघायला बसू लागलो. म्हणजे टीव्ही घरात आला पण अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय इतर पुस्तकं आमच्याकडं आली नाहीत. टीव्हीवरील पुस्तकांशी संबंधित कार्यक्रम म्हणजे- वाचाल तर वाचाल, साहित्यिकांच्या मुलाखती वगैरे बघून आम्हाला काही पुस्तकं मिळवावीशी वाटायला लागली. वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. पण ते वाटणं प्रत्यक्षात यायलाही बराच काळ जावा लागला.
अजून एक असं की- आमचं ज्या पाहुण्यारावळ्यांकडे येणं-जाणं असायचं तिथंही कुणाकडे पुस्तकं आहेत आणि कुणी तरी लिहीत-वाचत बसलंय असं कधी दिसलं नाही. क्वचित कुणाकडे तरी नवनाथाची पोथी वगैरे चालू असायची. भजन, कीर्तन, भारूड, ओव्या असं मौखिक काही ना काही अधून-मधून चालू असायचं. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा काही लोकांच्या घरातही असायचा. एक अपवाद म्हणजे, माझ्या आईच्या माहेरी गेल्यावर जुन्या सामानात मला एक वही सापडली होती. जाड पुठ्ठ्याच्या कव्हरची ती मोठी वही होती. निळ्या रंगाच्या शाईने वहीभरून लिहिलेलं होतं. मी त्यापूर्वी वाचलेल्या गोष्टींपेक्षा ते वेगळं होतं. खिळवून ठेवणारं होतं. आता माझ्या लक्षात येतंय की, त्या कथा होत्या. एका कथेच्या नावात चलाखीने लिहिलेले लेखकाचे नाव मला सापडले होते. ते माझे मोठे मामा होते. त्यावरून त्या कथा मामांनी लिहिलेल्या होत्या. पण नंतरच्या काळात मी पाहिलेले मामा लेखक-वाचक वगैरे नव्हते. ते एका कारखान्यात अकाउंटंट म्हणून कामाला लागले आणि निवृत्त झाले. आता ते कीर्तन वगैरे करतात. म्हणजे लेखक म्हणून लिहिण्यातलं सातत्य काही मला त्यांच्यात दिसलं नाही. आता मला कळतंय की, मामांनी जर लेखन चालू ठेवलं असतं, तर आज ते मराठीतले मोठे कथाकार असते.
पुस्तकं असणं, वाचणं हे सुसंस्कृत समाजाचं लक्षण मानलं जातं. असं म्हणतात की- तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकरी घ्या आणि दुसऱ्या रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरी तुमची भूक भागवेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. पण आम्ही आमच्या दोन्ही रुपयांच्या भाकऱ्या घेतल्या असं म्हणावं लागेल, कारण पुस्तकं ही आम्हाला आमची महत्त्वाची गरज कधी वाटलीच नव्हती. अजूनही वाटत नाही. कारण घरातल्या इतर वस्तूंसारखी आवर्जून पुस्तकखरेदी केली जात नाही. वाचनाची आवड असल्यानं मला पुस्तकं मिळवण्यासाठी धडपड करावी लागत होती. मात्र इतरांना घडीभराचं मनोरंजन म्हणून टीव्हीचा पडदा सहजासहजी उपलब्ध होता आणि पडद्यासाठी लिहिता-वाचता येण्याची गरजही नसते.
सोलापूर जिल्ह्यातलं टेंभुर्णी हे गाव सोडून १९९७ मध्ये मी पुण्यात एसएनडीटी महाविद्यालयात शिकायला आले. तिथं तीन वर्षे ग्रंथालय मिळालं. फार काही नाही पण आधी जे-जे काही वाचावंसं वाटत होतं, त्यातलं बरंचसं आता हातात आलं होतं. त्यामुळे झपाटल्यासारखं काहीही वाचत होते. अधून-मधून कविता लिहीत होते. त्यानंतर लग्न झालं. मु. पो. बोरीभडक, ता. दौंड, जि. पुणे इथं एकत्र शेतकरी कुटुंबात मी आले. शेतात वस्तीवर पुन्हा पुस्तकं मिळवणं अवघड झालं. पहिली गोष्ट माझ्याकडे पैसेच नसायचे. समजा पैशांचीही जुळवाजुळव केली, पण पुस्तकं घ्यायची कुठून? तेव्हा आमच्याकडे रायकर मिस्त्री नावाचे एक गृहस्थ कामाला होते. त्यांच्या बहिणीचं कसलं तरी दुकान पुण्यात अप्पा बळवंत चौकात होतं. ते कधीतरी तिकडे जाणार आहेत असं सांगायचे तेव्हा मी त्यांच्याकडे पुस्तकांच्या नावांची चिठ्ठी आणि पैसे गुपचूप द्यायचे. ते कधी पुस्तकं आणायचे, तर कधी पैसे घेऊन आठवडाभर गुल व्हायचे. मग पुन्हा आमच्या घरच्या कामाचे नुकसान व्हायचे. मी पुस्तकं आणण्यासाठी त्यांना पैसे देते हे घरात समजलं आणि तो खुष्कीचा मार्गही बंद झाला.
पुढे बोरीऐंदी या शेजारच्या गावात ग्रंथालय आहे, असं समजल्यावर मी तिथली वर्गणी भरली. तिथं कसल्याही अनुदानित पुस्तकांचा भरणा होता. पण दुधाची तहान ताकावर भागवत मी अधून-मधून ग्रंथालय धुंडाळून काही पुस्तकं आणायचे. गावातली काही ठरावीक मंडळी ग्रंथालयात सकाळची वर्तमानपत्रं वाचायला यायची. क्वचित कुणी तरी निवृत्त शिक्षक वगैरे कादंबऱ्या वाचायला घेऊन जायचे. लिहिता-वाचता येणाऱ्या स्त्रिया ग्रंथालयाकडे फिरकत नसायच्या, कारण घरोघरी टीव्ही. घरातली, बाहेरची कामं उरकून टीव्ही बघणं हे ठरलेलं.
पुस्तकं वाचणं-लिहिणं हे आपलं काम नाही, असं वातावरण आमच्या घरातही होतंच. पण मला वाचनाची आवड असल्याने मी त्यासाठी धडपडत राहिले. आमच्या शेतात टोमॅटो असायचे. सकाळपासून तोडलेले टोमॅटो दुपारनंतर लाकडी खोक्यात भरावे लागायचे. वर्तमानपत्र फाडून खोक्याला चारही बाजूंनी लावताना माझी नजर शब्दांवर.. त्यात काय लिहिलंय याकडेच असायची. असून-असून असणार काय होतं त्या रद्दीवर? पण पेपर फाडता-फाडता चार-दोन ओळी वाचतेय तोवर कुणी तरी म्हणणार, "उरका.., एवढं काय ठेवलंय त्या पेपरात?" मग मुकाट कामं उरकायची. बाकीच्यांच्या नजरा चुकवून त्यातलं काही तरी फाडून बाजूला ठेवायचं, घरी न्यायचं, गादीखाली ठेवायचं. वेळ मिळेल तसं वाचायचं. जे काही वाचायचंय, तो तुकडा टोपल्यात टाकायचा. मग भाकरी करता-करता ते वाचायचं. अशातच केव्हा तरी मी लिहू लागले... कधी कधी माझं मला आश्चर्य वाटायचं, हे मला सुचलंय? सुचलेल्या ओळी घरी जाऊन कागदावर पोचेपर्यंत धरून ठेवायच्या. कविता सुचण्याचे सुंदर क्षण... थोडंफार वाचण्याचे हे क्षण जगण्यात हिरवळ आणत होते. शेती करता-करता कविता बहरत होती. पुढे माझे कवितासंग्रह आले. ओळखी वाढल्या. कुणी जे वाचायला सुचवलं, ते मिळवायचा मी प्रयत्न करायचे. पुस्तकं घेण्याची संधी मिळाली की, सोडायची नाही. असं करत-करत स्वतःचा पुस्तकसंग्रह वाढवला. वाचनाच्या तुटक-तुटक वाटेवरून मी चालत राहिले.अनेकदा घरी कुणी नसावं, कामांतून सवड मिळावी आणि मला वाचायला निवांत वेळ मिळावा याची मी वाट बघत असायचे..अजूनही असते. रानात जाताना किंवा आमचा छोटा व्यवसाय आहे, तिथं जाताना मी एखादं पुस्तक बरोबर नेते. कधी वेळ मिळाला तर वाचते, नाही तर न उघडताच परत घेऊन येते.
सुरुवातीला मी कवितासंग्रह जास्त वाचले. आता कथासंग्रह, कादंबऱ्या, ललित गद्य वाचते. समग्र दुर्गा भागवत, भालचंद्र नेमाडे, राजन गवस, आसाराम लोमटे, किरण गुरव, आनंद विंगकर, गौरी देशपांडे... असे किती तरी लेखक वाचत राहिले. अनुवादित पुस्तकं मिळवून वाचते. कविता-रती, मुक्तशब्द, आपले वाङमयवृत्त, अनुष्टुभ, पूर्वग्रह, समकालीन भारतीय साहित्य अशी काही नियतकालिकं, दिवाळी अंक देखील आता वाचते.
हजार कामांचा शीण वाचन घालवतं. कुणी लिहितं-वाचतं माणूस भेटलं की, खूप आनंद होतो. आता मला लेखनाचं, कार्यक्रमाचं मानधन वगैरे मिळतं. शिवाय बुकगंगा, अॅमेझॉनवरुन घरपोच पुस्तकं मिळतात ही माझ्यासाठी फारच मोठी गोष्ट आहे. पुण्यात गेले की, पुस्तकपेठ, अक्षरधारा बुक गॅलरीतून मी पुस्तकं विकत घेते. भोवतीच्या अशा अनुभवांवरून मला असं वाटतं की, ज्या माणसाला वाचनाची-साहित्याची आवड आहे, तो काहीतरी खटपटी करून तिथपर्यंत पोचतो. ज्याला आवड नाही, तो ढीगभर पुस्तकं समोर असली तरी एक पानही उघडून वाचत नाही.
वाचन कमी होत आहे, असं म्हणताना अगोदरची परिस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागते. मधल्या काळात पुस्तकं हातात आली. नंतर मोबाईलचा छोटा पडदा हातात आला. मोबाईलवरही पुस्तकओळख होऊ लागली. मुलांना मात्र कितीही चांगली पुस्तकं वाचायला आणून दिली तरी त्यांच्या हातातून मोबाईल सुटत नाही. असं वाटतं की, मुलांच्या हाताला चिकटून बसलाय आणि तो निघतच नाही किंवा टीव्हीवर काही तरी चालू आहे,टीव्हीने धरून ठेवलंय मुलांना आणि सोडतच नाही अजिबात. एक अपवाद मात्र सापडला.
मध्यंतरी The Yearling (यर्लिंग) या इंग्रजी कादंबरीचा ‘पाडस’ हा राम पटवर्धन यांनी केलेला मराठी अनुवाद मुलाला वाचायला दिला. म्हणजे जेव्हा मी पाडस वाचत होते, तेव्हा त्यात काय काय वाचलं ते मी त्याला सतत सांगत होते. ते त्याला आवडायला लागलं. मग जेव्हा तो पाडस वाचायला लागला तेव्हा त्याने ती चारशे पानं वेड्यासारखी वाचून काढली. ती कादंबरी वाचताना त्या कादंबरीचा नायक- जो त्याच्याच वयाचा होता त्या ज्योडीसारखा वागायला लागला होता. मला असं वाटतं, अशीच हळूहळू आपली पुढची पिढी वाचायला लागेल. त्यांना खूप पर्याय उपलब्ध आहेत.
पुस्तकं आहेत. ती पाहतात कपाटातून. पदड्यावर पुस्तकं वाचणारे वाढताहेत. कशी का होईना, पण वाचा असं म्हणून आपण ई-बुक्स स्वीकारत आहोत. गावात कसे का होईना ग्रंथालयं आहेत. शेतकऱ्याच्या घरात निवांत पुस्तक वाचतबिचत बसलेलं मी अजूनपर्यंत कुणी पाहिलं नाही. अगदी आजही घरात ऐकावं लागतं की, 'कामंधामं सोडून वाचणं-लिहिणं करायचं नाही.' वाईट वाटतं. पण ते पेलण्याचं बळही पुस्तकंच देतात. रात्री झोपताना वाचलं तरीही चालतंच की अशी समजूत करून घेते.
पण मुळात आपण का वाचतो? तर ती आपली आवड असते. त्यात आनंद वाटतो. वाचल्यामुळे आपल्यात काही ना काही बदल होत असतात. ते आपल्या भोवतीची धग सुसह्य करतात. आधार देतात. पुस्तकं ही काही आभाळातून पडलेली गोष्ट नसते. ती तुमच्या-आमच्या अनुभवाची शिदोरी असते. वाचनामुळे मला माझ्या आतलं जग आणि बाहेरचं जग समजून घ्यायला मदत झाली. म्हणूनच मी कवितेतून म्हणू शकते की
आयुष्य समजून मुठीत माती घट्ट धरली
वरून पाण्याची धार सोडली...
तर रिकाम्या मुठीतही भुईकमळं फुलली!
ही भुईकमळं फुलली नसती ना, तर मुठीतली माती दाबून, दातखडे खात-खात ही आयुष्याची गाडी काही रुळावरून चालली नसती. ही आत-बाहेर बदलण्याची ताकद वाचनाने दिली. वाचनसंस्कृती असा भारदस्त शब्द नाही वापरत मी; पण भविष्यातली पिढी आत्मकेंद्री होऊन खऱ्या जगापासून दूर जाताना पुस्तकाच्या जगाकडे पाठ फिरवेल अशी भीती वाटते. त्यातून कल्पनाशक्ती अन सर्जनशीलता मरून जाईल की काय असंही वाटतं. जेवढं चिमूटभर प्रेम होतं पुस्तकांवर तेही नाहीसं करून पडद्यानं ती जागा घेतलीय हा निष्कर्ष खरा ठरू नये, असं वाटतं. पण थांबवता येत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही की, पडदा ही सर्वस्वी वाईट गोष्ट नाही. आज आपण डिजिटल होत असताना, डिजिटल पुस्तकं, वर्तमानपत्र येत असताना, पुस्तक जी हातात घेऊन वाचायची वस्तू आहे ती भविष्यात डिजिटल असेल असं गृहीत धरावं लागतं. हे लिहिता लिहिता काही ओळी सुचल्यात. त्या ओळींनी शेवट करून थांबते.
कधीतरी पायवाटांनी चकवा दिला
शब्दांची वावटळ झाली
नात्यांचं भेंडोळं भिरभिरलं
धापा टाकून धुराळा उधळला
काही पानं, काही अक्षरं फडफडली
श्वासांनाही पालवी फुटली
डोळे पुस्तकात रुतले
अक्षरं डोळे उघडून म्हणाली-
विसर, विसरून जा वावटळ, भेंडोळं
विसरून जा हिसकावलेलं जगणं
बघ ,मी आहे तुझ्यासोबत
बघ ,मी नाही रागवत तुझ्यावर
बघ ,तू फेकलंस तरी फडफडतो
मला थोडी जागा दे, थोडावेळ हातात घे
मला माहीत नाही
पण कदाचित तुला वाट सापडेल,
कदाचित मलाही वाट सापडेल..
- कल्पना दुधाळ, दौंड
dudhal.kalpana@gmail.com
(कल्पना दुधाळ या कवयित्री आहेत. त्यांची 'सिझर कर म्हणतेय माती' आणि 'धग असतेच आसपास' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.)
हेही वाचा : वाचन प्रेरणा दिवस विशेष
द अल्केमिस्ट: स्वप्नांवर विश्वास ठेवायला लावणारं पुस्तक – सानिया भालेराव
पुढचं पुस्तक वाचण्याआधी... – गणेश मतकरी
माझा पिंड पोसला गेला तो पुस्तकांवरच... – विभावरी देशपांडे
Tags: Kalpana Dudhal APJ Abdul Kalam birth anniversary कल्पना दुधाळ Load More Tags
Add Comment