हुड सावल्या उन्हाच्या : कवितेमागची कथा

21 मार्च : जागतिक कविता दिनानिमित्त...

फोटो सौजन्य : Alamy Stock Photo

आज 21 मार्च, जागतिक कविता दिवस. यानिमित्ताने शेताच्या बांधावर सुचलेल्या कवितांना शब्द देणाऱ्या कवयित्री कल्पना दुधाळ सांगताहेत त्यांच्या एका कवितेमागची कथा... 'सिझर कर म्हणतेय माती' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'सावल्या' ही कविता सुचण्याआधी ती ज्या कारणानं त्यांच्या आत मुरत राहिली त्याचा हा अनुभव मनाला स्पर्शून जातो...

आम्ही घरातल्या चार पोरी आठदहा वर्षांच्या आतबाहेरच्या असू. उनाडक्या करत उन्हातान्हात फिरतोय. जरा म्हणून पायाला दम नाही. तर घरातल्यांनी दामटलं, ‘जावाऽ पळा रानात. बाया खुरपतेत. गवतं गोळा करून लिंबाखाली आणून टाका. पळा.’

आम्ही मांडलेला भांड्याकुंड्यांचा खेळ रंगात आलेला. तो मोडून जायचं जिवावर आलेलं. दोघीदोघींत घर केलेलं. बोळक्यात पाणी भरून उतरंडी लावलेल्या. तुरीच्या ओल्या शेंगा सोलून एका झाकणीत ठेवलेल्या. दुसऱ्या झाकणीत भुईमूग सोलून ठेवलेला. एकमेकींकडं पाहुणे म्हणून जायचं. सोललेले शेंगदाणे दिसले की आज आमचा उपासंय म्हणायचं आणि ते हादडायचे. उपवास सोडायला ओल्या तुरीचे गपाणे भरायचे. पिकलेल्या लिंबोळ्या हुडकून आणून त्या पाण्यात पिळून बोळक्यात भरून ठेवलेलं. ‘आवो पाव्हणेऽ आमरस घ्या की अजून... घरच्या आंब्याचाय.’ असा पाहुण्यांना आग्रह करायचा. घरी पाहुणे आल्यावर कशा चौकशा करतात तशा करायच्या. मोठाल्या गप्पा झोडायच्या. खुडबुड न वाजवता घरातनं गुळाचा खडा पळवलेला. तो कुठंतरी झाकून ठेवलेला... तर मुंग्यांनी नेमका तो हुडकून काढलेला. सगळ्यांची नजर चुकवून तो खायचाय तोवर पुन्हा घरातनं हाका, ‘काऽ संपत नाय काय खेळणं अजून? जावा की पळा.’ मग बोळक्यातलं मातीच्या वासाचं घोटघोट गार पाणी घटाघटा संपवून रानाची वाट धरायची.

बरडाच्या रानात बायांची खुरपणी चाललेली. बांधावर मोठं कडुनिंबाचं झाड. घरातल्या जबाबदार माणसागत भक्कम. त्याला बरडाचा लिंब असंच म्हणणार सगळे. मोठ्या फांदीला दरवर्षीच्या झोक्याचं दावं कचून-कचून खाचा पडलेल्या. घरातल्या मोठ्या माणसांच्या मागं लागून आम्ही पोरींनी झोका बांधून घेतलेला. पलीकडच्या बांधाला उंबर. त्यावर पाखरांचा कलकलाट. चारपाच पाखरं वर उडाल्यागत करणार... की परत तिथंच घुटमळणार. पाखरांत पाखरं मिसळणार. कच्ची, पिकलेली उंबरं, अर्धवट खाल्लेली, खाऊन-खाऊन भुगा खाली पसरलेला. उंबरांचा गोडसर वास दरवळतोय. 

भर दुपार. ऊन तळपतंय. चहूबाजूंनी पहारेकरी उभे केल्यासारखा तुरीचा ताटवाय. मधनं जायला आम्हीच वाटा पाडलेल्या. बांधाची मुरड घातल्यागत रान. गवत उचलणं हाताजोगं कामंय म्हणून घरातल्यांनी आम्हाला पिटाळलेलं. आम्ही कलकलत, खेळतमेळत रानात आलोय. तर बाया म्हणतेत, ‘आल्या ह्या भोरड्या.’ पटापट गवतं उचलून आम्हाला लिंबाखाली खेळायला पळायचंय... म्हणून हाताला येईल तसं गवत गोळा करतोय तर बाया खवळायला लागल्या, ‘काऽ कुठं लढायला जायचंय का?’

‘लढायला नाय खेळायला जायचंय.’

‘हांऽऽऽ सदान्‌कदा खेळ. काडीन्‌काडी गोळा करावी.’

‘आम्हाला येतंय तसं गोळा करतोय.’

‘नीट गोळा करा आन मग खुशाल लिंबाखाली जावा.’

आम्हाला तेवढंच पाहिजे. मग लिंबाची एकेक फांदी वाकवून पालेदार शेंडा कडकन मोडायचा. मधल्या कांडीला धरून सर्रदिशी पानं खाली पाडायची. मग हातातल्या लवचीक काड्यांच्या अंगठ्या विणून त्यांत गवताचं तुरं खोचून एकमेकींना दाखवायचं. पाची बोटात अंगठ्या घालून नटायचं. तीन काड्यांच्या वेण्या घालायच्या. गळ्यातले हार करायचे. बांगड्यापण हिरव्यागार. लिंबाखाली ऊनसावलीची हलती रांगोळी. नुकताच लिंबाला तऊर आलाय. बारीक पांढऱ्या फुलोऱ्याचा सुगंधी घमघमाट उन्हात मिसळून मंदमंद दरवळ सुटलाय. काही देठांना नखनख पोपटी लिंबोळ्या डुलून दाखवतात. गवताच्या गार ढिगाला पाठ लावून आमच्या गप्पा रंगलेल्या, ‘या वर्षी नागपंचमीला मोठा झोका बांधायचा. या मोठ्या फांदीला. मग या कडंपासनं त्या कडंपर्यंत झोका चढवायचा. तोंडात पाला आणायचा.’

मग शांत स्थिर सावल्या झोक्याबरोबर झुलणार. हलणाऱ्या फांद्या बघत, अंगभर सावल्या झेलत दुपार पुढं सरकणार.

बायांच्या पाता पुढं गेल्या की गवतं गोळा करणं लांब पडतंय म्हणून आम्ही गवतं धडप्यात बांधून लिंबाखाली आणून टाकतोय. वाऱ्यानं कुठं पानसुद्धा हलत नाही. बाया म्हणतात, ‘वाऱ्याची दातखीळ बसली का काय? घामाच्या धारा लागल्यात.’ गवताचा ढीग सुकतोय. दुपारच्या भाकरी खायला सगळे लिंबाखाली गोळा झालेले. पाणी प्यायला भरून आणलेली कळशी लिंबाच्या बुडाशी ठेवलीय. नुकत्याच कुंभाराकडनं आणलेल्या मातीच्या काळ्या कळशीवरनं पाण्याचे थेंब खाली घरंगळतात. त्या झिरपलेल्या पाण्यानं बुडाखालची माती ओली झालीय. पाण्यातल्या सावल्यांचे घोट घटाघटा वाजतात. भाकरीच्या तुकड्यावरच्या सावल्या घासाबरोबर पोटात जातात. मग हुश्श करत बाया घडीभर इथंतिथं आडव्या झालेल्या. आम्हीपण गवताच्या ढिगाशेजारी हसत-खिदळत पडलोय.

इतक्यात कुठनंतरी वाऱ्याचा भराका लिंबात घुसला. फांद्या हलल्या. सावल्या हलल्या. अंगावरचं ठळक ऊन हललं. फांद्यांवरचं आभाळ हललं. बांधावर झोपलेल्या सावल्या हलल्या. वाऱ्याच्या झुळकीनं आम्हाला बरं वाटलं. आम्ही उल्लासलो. आम्ही आणि सावल्या वेगवेगळ्या नाहीतच आता. आम्ही हूड झुळकीबरोबर झुळूक झालो, सावल्या झालो. वारा आम्हाला विचारतोय, ‘सांगाऽ सांगा पोरींनोऽऽ कुणाच्या वं तुम्ही?’ वाऱ्याच्या अचानक प्रश्नांनी आम्ही कावऱ्याबावऱ्या झालोय. कुणाचं नाव सांगावं? आईचं, वडलांचं, आजीचं, आजोबांचं की नुसतंच आडनाव सांगावं? की तोऱ्यात स्वतःचं नाव सांगावं? आमची चुळबुळ चालूये. वारा भलतेसलते हावभाव करतोय. उठून जावं तर अडवतोय. फांद्यांतनं, सावल्यांतनं आमच्याशी चाळे करतोय. आम्ही अंग चोरून बसलोय. उनाड वारा थांबत नाही. भराक्यामागनं भराके सुटलेत. आता मात्र आम्हाला वाऱ्याचा राग आलाय. डोळे वटारून आम्ही कुजबुजतोय, ‘आत्तापर्यंत दडलेलाच बरा होता. कुणी याचं दार उघडलं आन हा कानात वारं शिरल्यागत भान विसरलाय.’

धुराळा, ऊन, गचपान उधळतंय. सावल्यांचे आकार बदलतात. लिंबात लुडबुडतोय वारा. हट्टाला पेटलाय. आमच्या झिपऱ्या उडवून तोंडावर आणतोय काय, झग्यामधे घुसून छत्रीगत फुगवतोय काय, हाताला ओढतोय काय. काय करावं... आम्हाला काही सुचत नाही. नंतर नंतर तर वाऱ्यानं आमच्या अंगावरचे कपडे काढून घेतले आणि स्वतःच नेसून उनाडायला लागला. वारा खिदळतोय. चिडवतोय. हसवतोय. खदाखदा अघोरी हसतोय. सगळीकडनं आम्हाला घेरलंय. पळू देत नाही वारा. धुम्माट पळायचं बळंय आमच्या काटक पायांत... पण आम्हाला सावल्यांगत लिंबाला बांधलंय. वारा छळतोय. लांबून, जवळून. जरा रिकामं सोडून लांब जाऊ देतोय की पुन्हा माघारी ओढतोय. हिसकं देतोय. वारा वेड्यासारखा करतोय. फडफडत्या सावल्यांत धडपडतोय आम्ही. उन्हाला, उजेडाला पाठीवर घेऊन वाऱ्याचा छळ सोसणाऱ्या सावल्या आणि आम्ही. सावल्यांच्या सावल्या. बुडाच्या स्थिर सावल्यांभोवती हलत्या फांद्यांनी फेर धरलाय. असंख्य बोटं बोटांत गुंतवून फेर धरलेल्या सावल्या. दुसऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या सावल्या. दुसऱ्यांच्या घरात नांदणाऱ्या सावल्या. वारा कधी सावल्या तोडून भिरकावतोय तर कधी नव्यानं जोडतोय.

लिंबाच्या पालापाचोळ्यावर पहुडलेली एकेक सावली हलली. उठून बायांबरोबर भुईमूग खुरपायला आली. गवताच्या सावल्या उपटून मागं ठेवल्या. आम्ही पटापट गवतं गोळा करून ढिगावर आणली. ढिगात सावल्या गुडूप झाल्या. उन्हातनं लसलसत लिंबाखाली गारव्याला आलेल्या कुत्र्याच्या जीभंवर रेंगाळल्या सावल्या. मग त्याची लाळ होऊन मातीत मिसळल्या. सावल्यांची चित्रंच चित्रं मनाला मोहवली. कितीतरी वर्षं मनात वसली. पाठलाग केला. त्यांतली काही चित्रं कवितेत आली. कविता झाली, सावल्या.

सावल्या

बांधावर निजल्या वं
हुड सावल्या उन्हाच्या
वारा पुसतो पोरींनो
सांगा तुम्ही वं कुणाच्या

चुळबुळल्या पोरी त्या
वारा करताना चाळे
अंग चोरून बसल्या
वटारून मोठे डोळे

कुजबुजल्या पोरी वं
नाकं मुरडून त्याला
त्योबी हट्टाला पेटला
ओढी पोरींच्या हाताला

डोळ्यांदेखत माझ्या वं
वारा फांद्यांत घुसला
झगे ओढून पोरींचे
त्यो गं सोताच नेसला

कशा धुम्माट पळाव्या
पोरी झाडाला बांधल्या
छळ वाऱ्याचा सोसून
घरी उन्हाच्या नांदल्या

कल्पना दुधाळ, मु. पो. बोरीभडक ता. दौंड 
dudhal.kalpana@gmail.com


कल्पना दुधाळ यांचा हा लेखही वाचा : रिकाम्या मुठीतली भुईकमळं

Tags: कविता कल्पना दुधाळ धग असतेच आसपास सीझर कर म्हणतेय माती kalpna dudhal poem dhag astech aaspas sizer kar mhntey mati Load More Tags

Comments: Show All Comments

डॉ.संदीप रंगनाथ तापकीर

सभोतालच धगधगत वास्तव आपल्या कवितेतून सांगणाऱ्या कल्पना दुधाळ शेती मातीची बोली बोलणारी त्यांची कविता मातीत राबणाऱ्या भूमी कन्येची कविता आहे .

आनंद गोसावी

कल्पना दुधाळ हे निसर्गाचा संग लाभलेल आणि गावाकडची दुधाळ शब्द संपदा लाभलेलं गोड व्यक्तिमत्व आहे.

Madhusudan Nivrutti Jagtap

माती आणि मानवतेशी नाळ जोडणारी व मातीशी इमानदार असलेली कविता.

डॉ.सीमा नाईक गोसावी

मा.कवयित्री कल्पना दुधाळ यांची कविता शेती-मातीशी नाते तर सांगतेच पण कृषीजीवनाची सूक्ष्मातिसूक्ष्म चल चित्रे साक्षात डोळ्यासमोर उभी करण्याची एक खास शैली कवयित्री कल्पना दुधाळ यांना प्राप्त झाली आहे.याचे कारण कवयित्रींच्या जगण्याचा तो अविभाज्य भाग बनला आहे.ही एकरुपता ,संवेद्यता,आस्वाद्य असून कृषिजीवनातील सर्वच घटकांचा व्यापक असा सोशिकतेचा पट ही कविता मांडून जाते.म्हणाल तर या प्रतिमा निसर्गाशी मैत्र साधतात ,म्हणाल तर मानवी विभ्रम रेखाटतात,त्यातला अवखळपणा,एकरूपता,तादात्म्यवृत्ती, ग्रामीण जीवनातला रहाळसहाळपणाही डोकावतो .या कवितेतून! मग माठांच्या बुडाशी झिरपलेले पाणी अन् त्यामुळे बुडाशी ओला झालेला माठ इ.गोष्टी कवयित्रीच्या नजरेतून सुटत नाहीत .ही कविता जिवंत व‌ ताजी वाटते ती या विविध वैशिष्ट्यपूर्णतेमुळेच ! "सावल्या " लेख खरोखरच आवडला.आपले बालपण असेच गेले याची जाणीव झाली.आपलाच भोवताल टिपलाय असा भास झाला.असो. जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

अरुण कोळेकर , शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी.

जगणंच जेव्हा कविता होते... याचाच अनुभव कल्पना दुधाळ यांची कविता वाचताना येतो. जागतिक कवितादिनानिमित्त त्यांच्या कवितेला साधनाने दिलेला सन्मान म्हणजेच कवयित्रीच्या काव्यसाधनेचा सन्मान ठरला आहे. कल्पना दुधाळ यांच्या `सिझर कर म्हणते माती` व `धग असतेच आसपास` या काव्यसंग्रहांनी मराठी कवितेत अतिशय मौलिक भर घातली आहे. या कवितेने शेती मातीशी नाळ, नातं जोडत आपला जीवनानुभव समद्ध केला आहे. मराठी काव्यरसिकांनी, समीक्षकांनी या कवितेच्या जाणिवा आणि स्पंदन ओळखून तिचा तितकाच सन्मान आणि गौरवही केलेला आहे. आपल्या शेतात, शिवारात, माणसांत, त्यांच्या सुखदुःखात समरस झालेला आणि बदलतं मानवी जीवन आणि पर्यावरण यांचा नेमका, संवेदनशील आणि उत्कट काव्याविष्कार त्या करत आलेल्या आहेत. हे भावबळ त्यांच्या कवितेत समद्ध होऊन येताना दिसते आहे. असो. या निमित्ताने त्यांच्या काव्यप्रवासाला एक वाचक म्हणून अनंत शुभेच्छा आहेत.

सुनंदा महाजन

कल्पना दुधाळ यांच्या कविता जबरदस्त ताकदीच्या आहेत. आज त्यांचा हा विलक्षण लेखही खूप आवडला.

Raundhal Shital Maruti

Kavita ya manvatela sparsh karun jate ani manvaya an matishi NAL jodte.

Add Comment

संबंधित लेख