फादर फ्रान्सिस दिब्रिटो: चिरतरुण लेखक

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने...

उस्मानाबाद येथे होणाऱ्या  93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. संमेलनाध्यक्ष पदासाठी ना. धो. महानोर, रा.रं बोराडे, सुधीर रसाळ, न्या. नरेंद्र चपळगावकर आदींची नावे चर्चेत होती. 22 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली. यानिमित्ताने फादर दिब्रिटो यांच्या व्यक्तिमत्वावर व कार्यावर  टाकलेला दृष्टिक्षेप ...  

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझी पत्नी आम्ही एका शाळेत एका कार्यक्रमासाठी उपस्थित होतो. चर्चची शाळा असल्याने त्या शाळेचे मुख्याध्यापक फादर असणे हे ओघाने आलेच. त्या तरुण फादरांचे शिक्षणाविषयीचे भाषण ऐकले आणि काही मिनिटांतच आम्हाला जांभया येऊ लागल्या. समकालीन शैक्षणिक समस्यांचे काहीही प्रतिबिंब नसलेले ते भाषण आम्हाला काहीसे रटाळ, out-dated वाटले. तसे ते फादर चाळिशीतील म्हणजे तरुण पिढीतीलच होते. मी पत्नीकडे पाहत म्हणालो, “ह्यां तरुण फादरांपेक्षा सत्तरी ओलांडलेले फादर दिब्रिटो ह्यांची मते किती तरुण असतात, नाही?” 

“हो ना…” असे म्हणत तिनेही दुजोरा दिला. 

आजच्या तरुण पिढीला फादर दिब्रिटो अजूनही काळाबरोबरचे वाटतात, कारण ते मनाने चिरतरुण आहेत. आजही ते तरुण पिढीशी सहज कनेक्ट होऊ शकतात. आज दुपारी फादरांची आगामी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याची बातमी ऐकली आणि सुखद धक्का बसला. एक वसईकर म्हणून त्यांचा अभिमान आहेच, पण एक साहित्यप्रेमी म्हणूनही 'एक सार्थ निवड' असाच विचार ह्या बातमीने मनात आला. 

वसई आज जरी उच्चशिक्षित तरुणांची पंढरी झालेली असली तरी, 1950-60च्या दशकात परिस्थिती खूप वेगळी होती. बहुजनांत शिक्षणाचे हवे तितके प्राबल्य नव्हते. त्याच दरम्यान चर्चने 'चर्च तिथे शाळा' हे धोरण सुरु केले. धर्माचा पगडा असलेल्या इथल्या समाजाने चर्चच्या ह्या आवाहनाला सहज प्रतिसाद दिला आणि परिसरात शिक्षणाचा प्रसार सुरु झाला. 1970-80च्या दरम्यान नव-शिक्षितांची ही पिढी मुंबईमध्ये नोकरी करू लागली आणि मुंबईच्या शेजारी असलेल्या वसईकरांना शेतीपलिकडेही उदरनिर्वाहाचे इतर मार्ग आहेत हे कळू लागले. हळूहळू समाजाची आर्थिक प्रगती होत होती. पण प्रगतीबरोबरच पारंपारिक, रुढीप्रिय समाजात सामाजिक, कौटुंबिक समस्याही उद्भवत होत्या आणि त्यावर मात करण्यासाठी शिक्षण घेतलेल्या ह्या 'पहिल्या पिढीकडे' वैचारिक खाद्याची कमतरता होती.

'सुवार्ता' हे पाक्षिक फादर डॉमनिक डिअब्रिओ ह्यांनी 1955 साली सुरु केलेले असले, तरी ते वाचकाअभावी तळागाळात पोहोचले नव्हते. हळूहळू आर्थिक बाबींपलिकडे आपल्या हक्कांविषयी व समाजाविषयी जागरूक होत असलेली पिढी वसईत घडत होती. अशातच 1983मध्ये चाळिशीतील फादर दिब्रिटो यांच्याकडे 'सुवार्ता' ह्या मासिकाचे संपादकपद आले. धर्मगुरू असल्याने समाजातील सर्व थरांतील लोकांशी त्यांचा संपर्क येत होता. विविध स्तरांतील, विविध वयोगटातल्या निरनिराळ्या समस्या- त्यांचे संवेदनशील मन टिपत होते. कौटुंबिक समस्या, तसेच रीतीरीवाजांनी त्रस्त असलेल्या समाजाच्या वेदनेला फादरांनी शब्दरूप दिले. त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नावर सुवार्ता मधून भाष्य करण्यास सुरुवात केली. वैवाहिक जीवन, मुलांचे संगोपन, वृद्ध आई-वडिलांच्या समस्या ह्या साध्या सामान्य लोकांना भिडणाऱ्या समस्यांपासून ते संस्कृती, पर्यावरण, विज्ञान अशा अनेक विषयांवर त्यांनी त्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर लेख प्रकाशित करण्यास सुरुवात केली. वसईतील बऱ्याच नवोदित लेखकांना एक माध्यम उपलब्ध करून दिले. वसईत आज कित्येक लेखक, कवी साहित्यक्षेत्रात बहरत आहेत, त्याचे बीज त्यांच्या सुरवातीच्या काळात त्यांना सुवार्ताने उपलब्ध करून दिलेल्या माध्यमातही आहे. दिब्रिटोंच्या कारकिर्दीत हे पीक जास्त बहरले.

‘लैंगिक प्रश्न’ हे विविध वैवाहिक समस्यांमागील एक महत्वाचे कारण आहे हे जाणून २० वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईतील एका तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे 'वैवाहिक कामजीवन' ह्या बोल्ड विषयावर लेखमालिका प्रसारित करण्यास सुरुवात केली. धार्मिक संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या मासिकात लैंगिक विषयावरील शास्त्रशुद्ध चर्चा प्रकाशित होण्याचे हे एक दुर्मिळ उदाहरण असावे!

कालपूरक विषय असलेले व धार्मिक आशयाबरोबरच सामाजिक भानही शिकविणारे हे मासिक फादर दिब्रिटो ह्यांच्या कारकिर्दीत तळागाळात न पोहोचते तरच नवल! सुवार्ता वाचकांची एक मोठी चळवळच यानिमित्ताने तयार झाली. लेखक वाचकांच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्राभरात बरेच समविचारी लोक जोडले. पुढे ही वैचारिक चळवळ अधिक भक्कम करण्यासाठी त्यांनी विविध व्याख्यानमालांचे आयोजन वसईत चालू केले. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी महाराष्ट्रातील बऱ्याच नामवंत विचारवंत, लेखक आदी दिग्गजांना वसईत आणले आणि वसईकरांना एक वैचारिक मेजवानी उपलब्ध करून दिली. वसईकरांची वैचारिक चौकट भक्कम होण्यामध्ये या विविध उपक्रमाचा महत्त्वाचा वाटा आहे. सुवार्ता मासिक, सुवार्ता व्याख्यानमालिका याही पलिकडे एक पारंपारिक गट जो या सर्वांपासून अलिप्त होता, अशा वर्गाशी त्यांनी धर्मगुरू म्हणून चर्चमधील प्रवचनांद्वारे संवाद साधला. ओघवते वक्तृत्व, सामान्यांशी समरस होणारे अनुभव, संवेदनशील मन, चौफेर वाचन यामुळे त्यांची प्रवचने साहित्याचा दुरूनही संबंध नसणाऱ्या सामान्यातील सामान्य लोकांना साहित्यिक अनुभूती देत आलेली आहेत. आणि माझ्यामते ते मोठे साहित्यिक कार्य आहे. 

ऐंशीच्या दशकात वसईच्या स्थानिक राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा प्रभाव वाढलेला आणि त्यांनी घेतलेले काही निर्णय वसईच्या पर्यावरणास घातक ठरू शकणार होते, ही बाब फादर यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसईतील काही जागृत नागरिकांच्या सहकार्याने 'हरित वसई संरक्षण समिती'ची 1988 मध्ये स्थापना केली. पर्यावरणाच्या मुद्याला तेव्हापासून जे त्यांनी वाहून घेतले ते आजतागायत, वयाच्या पंचाहत्तरीतही. सुरवातीला यात विहिरी, बावखले वाचवणे, विहिरींतील पाण्याचा उपसा करून पाणी पुरवणाऱ्या टँकरवर बंदी घालणे, जमिनविक्री थांबवणे अशा बाबी अग्रस्थानी होत्या. 

पुढे वसईत स्थानिक सत्ताधाऱ्यांची दहशत निर्माण झाली. कोणालाही त्याविरूध्द ब्र काढायची हिंमत राहिलेली  नव्हती.  त्यावेळेस त्यांनी एकट्याने पोलिस कचेरीत जाऊन निषेधयात्रेची सुरुवात केली. अर्थात हजारोंचा लोकसमुदाय त्यांच्या पाठीशी धिटाईने उभा राहिला. विजय तेंडुलकर, मेधा पाटकर, निखिल वागळे अशा समविचारी लोकांनीही वसईत येऊन त्यांना साथ दिली. चर्चच्या चार भिंतीत किंवा पुस्तकांच्या पानांमध्ये अडकून न पडता त्यांनी ही चळवळ उभारली. अर्थात ह्या चळवळीचे यशापयश हा वेगळा मुद्दा असला तरी वसईत बरेच नेते यानिमित्ताने घडले. लोकांमध्ये आपल्या हक्कांविषयी जागरूकता व आत्मविश्वास आला.

ओघवत्या ललितशैलीमध्ये लिहिल्या गेलेल्या त्यांच्या विविध पुस्तकांनी साहित्यविश्वात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. 1979 मध्ये फादरांनी आखाती देशांपासून युरोपातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. या भ्रमंतीतून, विशेषत: तेथील समाजजीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी 'ओऍसिसच्या शोधात' या पुस्तकातून केला. पॅलेस्टाइनचा वाद उलगडणारे, 'संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची' हे पुस्तक असो वा बायबलमधील नव्या कराराचे ललित शैलीमध्ये भाषांतर केलेले 'सुबोध बायबल' हे पुस्तक असो, मराठी साहित्यविश्वात त्यांच्या प्रासादिक भाषाशैलीने नटलेली व संवेदनशील मनाने टिपलेली स्पंदने वाचकांना यापुढेही रिझवीत राहतील यात शंका नाही. 

इतर प्रकाशित साहित्यामध्ये 'तेजाची पाऊले', 'सृजनाचा मोहोर', 'परिवर्तनासाठी धर्म', 'पोप दुसरे जॉन पॉल जीवनगाथा', 'तरंग' अशा विशेष उल्लेखनीय ललित पुस्तकांचाही सहभाग आहे. 'सुबोध बायबल- नवा करार' या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २०१३ या वर्षीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला होता. राज्य सरकारच्या 2013-14 आणि 2014-15 या वर्षांसाठीच्या ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. इतर अनेक मानसन्मानही फादरांना मिळाले आहेत.   

'सुवार्ता'पासून आतापर्यंतच्या त्यांच्या प्रवासामध्ये चर्चचाही सिंहाचा वाटा आहे. चर्चने त्यांना त्यांच्या कार्यात खंबीर पाठिंबा दिला. धर्मातील काही कर्मकांडांचा त्यांनी जाहीररीत्या वेळोवेळी धिक्कार केला आहे. आपापल्या परीने लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्नदेखील केलेला आहे. पण धर्मगुरू म्हणून, चर्चचे प्रतिनिधी असल्याने चर्चच्या अधिकृत भूमिकेवर (कितीही कालबाह्य असला तरी) त्यांचा विश्वास आहे. अर्थात ते प्रांजळपणे तशी कबुलीही देत असतात.

सोळाव्या शतकात एकहाती बायबलचे मराठीमध्ये 'ख्रिस्तपुराण' ह्या ग्रंथात भाषांतर करणाऱ्या फादर स्टीफन असोत किंवा चर्चच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यास अनुकूल वातावरण असूनही त्यास विरोध करून मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारे विविध ख्रिस्ती धर्मगुरू असोत, ही मंडळी गेली कित्येक वर्षे मराठी साहित्याची सेवा करीत आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड संमेलनाध्यक्षपदी करून मराठी साहित्य संमेलनाने त्या सर्व मराठीप्रेमी ख्रिस्ती धर्मगुरूंचाही सन्मान केलेला आहे. 

चर्चमध्ये असताना संवेदनशील, साहित्यिक विचार सर्वसामान्य लोकांना देणे व चर्चच्या बाहेरही मोर्चात उतरून लोकांच्या प्रश्नांसाठी ते विचार कृतीत उतरविणे ह्यामुळे फादर हे खऱ्या अर्थाने 'People's Priest' आहेत. तरुणांशी अजूनही कनेक्ट होणाऱ्या 75 वर्षांच्या या तरुणाचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन !

- डॅनिअल मस्करणीस, वसई/पुणे
danifm2001@gmail.com      

(आय. टी. क्षेत्रात इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या डॅनियल मस्करणीस यांची 'मंच' ही लेखमाला साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली आहे.)

Tags: डॅनियल मस्करणीस मराठी साहित्यसंमेलन अखिल भारतीय साहित्य महामंडळ Father Francis D'Britto डॅनिअल मस्करणीस daniel mascarenhas Load More Tags

Comments:

Sarita awad

या लेखकाचं लेखन मी खूपच आतुरतेनं वाचते। त्यामुळे अज्ञानाच्या पडद्याआड असलेल्या समाजातील स्पंदन जाणवत आहे। फादर दिब्रेतो यांची निवड हा ही मोठा दिलासा वाटलं।

रेक्मन रोड्रिग्ज

चिरतरुण फादर आणी त्यांचे चिरतरुण विचार... अतिशय सुंदर लेखणी डेनियल साहेब....

Ravi Jagtap

अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब.

Add Comment