'नयनरम्य सिडनी'ची दुसरी बाजू

थोड्या माहितीवर इतर देशांचं कौतुक करत आपल्या देशाला दूषणं देणं कितपत योग्य हा विचार केला जावा...

‘कर्तव्यसाधना’मधील ‘नयनरम्य सिडनी’ या लेखाच्या नावाप्रमाणे सिडनी नयनरम्य आहे यात वाद नाही. किंबहुना विकसित देशांमधली बरीचशी शहरं नयनरम्य असतातच. परंतु लेखामध्ये एक समांतर सूर भारताबद्दलच्या तक्रारीचा जाणवत राहिला. भारताबाहेर गेल्यावर तो तसा सूर येणं हे जरी अपरिहार्य असलं तरी बराच काळ बाहेर राहिल्यावर ही तक्रार कमी होऊ लागते; कारण भयानक परिस्थितीला भारत ज्याप्रमाणे सामोरा जातो त्याप्रमाणे हे विकसित देश जाऊ शकत नाहीत हे जाणवू लागतं.

भारतीय माणूस भारताबाहेर विकसित देशांमध्ये थोड्याच काळासाठी गेला की तिथली सुबत्ता पाहून भारावतो. त्या भारावलेपणातून विकसित देशांचे गोडवे गाताना नकळत भारताला आणि भारतीयांना नावं ठेवू लागतो. हे जाणून-बुजून नसतं. भारतात अनेक गोष्टी चुकीच्या आहेत. परंतु विकसित देशांचं कौतुक करून आपल्या देशाला दूषणं देताना आपल्यावर हजारो वर्षं झालेली परकीय आक्रमणं, आओ-जाओ-घर तुम्हारा म्हणत मतपेट्यांसाठी कुणालाही, कसाही प्रवेश देऊन वाढलेली भरमसाठ लोकसंख्या, या आणि अशा मुद्द्यांमधून निर्माण झालेल्या प्रश्नांची पार्श्वभूमी विसरणं वैयक्तिकरित्या मला तरी योग्य वाटत नाही.

इतर देशांचं कौतुक करावं परंतु थोड्या माहितीवर त्यांचं कौतुक करत आपल्या देशाला दूषणं देणं कितपत योग्य हा विचार केला जावा, इतर देशांच्या वरवरच्या दिखाव्यामागे काय दडलं आहे हे पाहावं असंही वाटतं. (उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियामधल्या मूळच्या रहिवाशांवर (aboriginal and torres strait islander) काय भयानक स्वरूपाचे अत्याचार करून त्यांना जवळपास संपवण्यात आलं?). मी पाच वर्षं सिडनीमध्ये राहिलो आहे त्यामुळे ‘नयनरम्य सिडनी’ या लेखाबद्दल माझा अनुभव देणं मला गरजेचं वाटतं. खरं तर मी या लेखाच्या लेखकाहून फार काही वेगळा नाही. ते या अर्थानं की मी प्रथमच भारताबाहेर गेलो तेव्हा मी ही भारावून गेलो होतो. परंतु 10 वर्षं भारताबाहेर वेगवेगळ्या 10-12 विकसित देशांमध्ये राहिल्यावर मला आता ही दुसरी बाजू फार जाणवू लागली. त्यामुळे खाली नमूद केलेल्या माझ्या अनुभवांमध्ये ‘नयनरम्य सिडनी’ लेखातील संदर्भ चुकीचे ठरवण्याचा हेतू नाही. तसा भास झाल्यास बिनदिक्कतपणे ती माझ्या लिखाणाची आणि माझी कमतरता समजावी. ‘नयनरम्य सिडनी’च्या लेखकांनी जे पाहिलं आणि नमूद केलं त्याबद्दल कधी पार्श्वभूमी सांगावी, कुठे अधिक माहिती द्यावी, विकसित देश/शहरं नामक चमचमणाऱ्या नाण्याची दुसरी बाजूही अगदी थोडक्यात दाखवावी हा विचार मात्र नक्की आहे.

लेखातील संदर्भ : 10 डिसेंबर रोजी सिडनीला पोचलो... कडाक्याची थंडी होती. 
माझा अनुभव : नोव्हेंबर ते मार्च हा काळ सिडनीमध्ये दमट आणि भयानक उकाड्याचा असतो. क्वचित एखाद-दुसऱ्या दिवशी थंडी जाणवते. परंतु कडाक्याची म्हणावी अशी थंडी साधारण सप्टेंबरपर्यंत संपते. 

लेखातील संदर्भ : ख्रिसमस आणि नववर्षाची आकर्षक आणि नयनरम्य रोषणाई असते.
माझा अनुभव : नको तिथे सर्व इमारतींमध्ये वर्षभर दिवस-रात्र दिवे चालू असतात आणि सगळीकडे नको तितकी रोषणाई असते. सर्व रोषणाई आणि आतषबाजी ही ऊर्जेची हेळसांड करणारी आणि प्रदूषणाला आमंत्रण देणारी, वन्यजीव आणि पर्यावरणाची हानी करणारी असते. अविकसित आणि विकसनशील देशांना ऊर्जाबचत आणि प्रदूषण विषयांवर शिकवू पाहणारे हे असे विकसित देश स्वतः मात्र सर्व बाबतीत सर्व नियम सोयीस्करपणे धाब्यावर बसवत असतात.
(‘Win for wildlife’: Council to consider phasing out New Year’s Eve fireworks)

लेखातील संदर्भ : आतषबाजी पाहायला लोकं आणि परदेशी पाहुणे ठाण मांडून बसतात.
माझा अनुभव : त्याचा व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो. स्थानिकांना त्याचा त्रास होतो. याच गोष्टी भारतात होतात (मिरवणुकी, उत्सव, वारी) तेव्हा मात्र असा कौतुकाचा सूर नसतो. 

लेखातील संदर्भ : सिडनी शहरातील लोक शिस्तबद्धपणे वागतात. 
माझा अनुभव : कारण त्यांना शिस्तबद्ध वागायला व्यवस्था भाग पाडते. वाहतुकीच्या नियमांपासून ते अगदी पासपोर्ट, व्हिसा, नागरिकत्व, भाषाप्रभुत्व, कौशल्य अशा सर्व बाबतीत कागदपत्रांची आणि नियमांची काटेकोर तपासणी आणि पूर्तता करायला लावली जातेच. भारताबाहेर जाताना कागदपत्रांची पूर्तता निमूटपणे करणारे आपले लोक भारतामध्ये मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेसंबंधी नियम आणि कायदे करण्याचे सरकारचे प्रयत्न हे जुलूमशाही, हुकूमशाही आणि धार्मिकतेचे फलक उंचावत हाणून पाडतात. विकसित देशांमध्ये गृहरचना संस्था आणि महापालिका वर्षाकाठी घरागणिक सरासरी दोन-तीन लाख रुपये मेंटेनन्ससाठी (strata, council rates) वसूल करून घेतातच. मग स्वच्छता, साफसफाई, टापटीपपणा का नसणार? आपल्याकडे लोकं वर्षाकाठी काही हजार रुपयेसुद्धा खर्च करायला तयार नसतात. लगेच सरकारवर आणि संस्थांवर दडपण आणलं जातं. सिडनीसारख्या शहरांमध्ये सुद्धा जिथे व्यवस्था शिस्तबद्ध वागण्यास भाग पाडत नाही तिथे माणसं अतिशय बेशिस्त, असभ्य आणि असंस्कृतपणेच वागतात. बस आणि ट्रेन्समध्ये लोकांना चपला-बूट, बसायच्या सीटवर आणि बॅक रेस्टवर ठेवायची सवय आहे. (त्या विरोधात सूचना असूनही). हे रोजचे दृश्य असते. अशा प्रवाशांचे अगदी पावसात ओले झालेले शूज सुद्धा सीटवर ठेवतानाचे, फिरवतानाचे फोटोज / व्हिडिओज मी काढले. ते दाखवून संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी केल्या. त्यावर अधिकाऱ्यांचं उत्तर हे – “आम्ही (अधिकारी असून) त्यांना बोलू धजत नाही. आणि तुम्हीपण सांभाळून राहा. हे असे फोटो वगैरे काढताना त्यांनी तुम्हाला पाहिले तर ते तुम्हाला त्रास देतील. ते गुंड असू शकतात, नशेमध्ये असू शकतात”. अर्थात गुंड नसणाऱ्या, नशेमध्ये नसणाऱ्या प्रवाशांनापण असे करताना मी ‘रोज’ पाहिले आहे.

बसमध्ये अनेक जण बसभाडे न देता बसतात. 
पोलिसांची आणि इतर अधिकाऱ्यांची वागणूक वंशभेदाची असते. 
व्यायाम करणारे उत्साही, बिनधास्त सिग्नल तोडून धावत असतात.  

लेखातील संदर्भ : धूळ दिसत नाही. 
माझा अनुभव : मुद्द्यात बऱ्याच प्रमाणात तथ्य असलं तरी धूळ असण्या-नसण्याचा संबंध हा भौगोलिक स्थानाशीपण निगडित असतो. धुळीचे प्रमाण कमी-अधिक असण्यामागचं कारण समजावणारा, माधव गाडगीळ यांचा एक लेखदेखील पूर्वी एका वर्तमानपत्रात आला होता. बाकी सिडनीमध्ये घराच्या खिडक्या उघड्या ठेवल्या तर इथेदेखील प्रचंड धूळ आणि जळमटं घरात येतातच. आम्ही प्रचंड ऊर्जा वापरून ती साफ करत राहतो इतकंच. कारण (पुन्हा) ऊर्जा बचतीचं काम तर आम्हा विकसित देशांचं नाहीच ना मुळी!

लेखातील संदर्भ : एसी हिटरच्या सोयी, वगैरे.
माझा अनुभव : पुन्हा तेच उत्तर मी देऊ शकेन - भरमसाठ ऊर्जा वापरायची मक्तेदारी आम्हा विकसित देशांची आणि बचतीची जबाबदारी अविकसित आणि विकसनशील देशांची. शिवाय पैसे खर्च करायची तयारी असल्यास आजकाल या सोयी भारतातल्या अगदी गावांमध्ये सुद्धा मिळतातच.

लेखातील संदर्भ : लोक आरडाओरडा करताना दिसत नाहीत. 
माझा अनुभव : हे भागानुसार ठरतं. ‘पब’च्याजवळ तुमचं घर असेल तर शांतता विसरा. त्याचप्रमाणे सरकारी भत्त्याच्या जीवावर काहीही काम न करता राहणारे लोकसुद्धा अनेकदा रात्री-अपरात्री रस्त्यांवर उपद्रव देतात. 


हेही वाचा : कोल्हापूरचा पूर आणि ह्युस्टनचं हरिकेन - मुग्धा दीक्षित


लेखातील संदर्भ : जागोजागी दुकानं दिसणार नाहीत. मॉल्स दिसतील. 
माझा अनुभव : अर्थव्यवस्थेवर, गुणवत्तेवर, अंगभूत कौशल्यांवर, सामान्य माणसाच्या व्यावसायिक क्षमतेवर, चुरशीवर याचा विपरीत दूरगामी परिणाम शक्य असतो. भारतात सामान्य माणूस कायदेशीरपणे चहाचं खोपटं किंवा साधं वह्या-पुस्तकांचं दुकान टाकण्याचं स्वप्न पाहू शकतो. इथे अशा बहुतांश साध्यासुध्या गोष्टींवर मोठमोठ्या कंपन्यांचा कब्जा आहे,

लेखातील संदर्भ : वस्तू व सामान महाग आहे.
माझा अनुभव : विकसित देशांत तिथल्या मोठ्या पगारांना साजेसेच दर असतात. Ratio पाहिल्यास ती महागाई बिलकुल जाणवत नाही. (भारताशी पावलोपावली तुलना करणं योग्य नव्हे. मग महागाई जाणवणारच. म्हणजे पगारपण रुपये तीन ते चार लाख असतो तेव्हा साधा सॅण्डविच रुपये 500 असेल तर महाग म्हणून कसं चालेल?) भयानक महागाई असती तर दर वर्षी लाखो लोकं विकसित देशांत स्थलांतरित झालीच नसती. 

लेखातील संदर्भ : पर्यावरणाला फार महत्त्व दिलं जातं.
माझा अनुभव : सोयीस्कर-रित्या. अनेक अप्रतिम भले मोठे वृक्ष केवळ सौंदर्यीकरणाच्या नावाखाली छाटताना मी पाहिले आहेत. 

लेखातील संदर्भ : कुठेच पाणी साचताना दिसत नाही. 
माझा अनुभव : थोड्याशा पावसानेपण पाणी साचतं. पादचारी मार्गाचं पुन्हा पुन्हा काँक्रीटीकरण करण्यावर भर देणाऱ्या महापालिका डबक्यांकडे मात्र दुर्लक्ष करतात.

लेखातील संदर्भ : शिस्त व नियमांचं पालन बंधनकारक आहे. 
माझा अनुभव : तुमची कातडी कोणत्या रंगाची आहे यावर किती शिस्त आणि कशी बंधनं लादायची आणि केव्हा काणाडोळा करायचा हेदेखील ठरवण्याची एक समांतर अदृश्य व्यवस्था इथे कार्यरत असते. गरीब स्वभावाची आशियाई बाई (चायनीज असावी) आईस्क्रिम खात बसमध्ये चढताना पाहिल्यावर गोऱ्या ड्रायव्हरने दटावून तिला ते फेकून देण्यास भाग पाडलं. परंतु अनेक गोरे तरुण तरुणी इथे सार्वजनिक ठिकाणी प्रचंड घाण, कचरा करून हैदोस घालतात ते मात्र कुणाला दिसत नाही. शुक्रवारी रात्री तर या कचऱ्याला आणि हैदोसाला ऊत येतो हे मी ऑस्ट्रेलियाच नाही तर युरोप-अमेरिकेमध्येपण पाहिलं आहे. 

लेखातील संदर्भ : लोक हलकं जेवण करतात. 
माझा अनुभव : म्हणूनच आमचे KFC, McD, Dominos भरून वाहात असतात नुसते, अगदी दुपारच्या जेवणालापण. (ओबेसिटीबद्दल आम्हाला वारंवार जाहिराती कराव्या लागतात.)

लेखातील संदर्भ : लोकं स्वतःची घरकामं स्वतः करतात. 
माझा अनुभव : परंतु ती अतिशय सोपी असतात त्यात कुठल्याही प्रकारचा अति त्रास आणि अति कष्ट नसतात. (भारतात आमच्या घरात ‘कधीच’ गडीमाणूस, कामवाली बाई नव्हती. आई घर-नोकरी सांभाळून धुणं-भांडी, स्वयंपाक, झाडणं-पुसण्यापासूनची सर्व कामं - फक्त सुट्टीच्या दिवशीच नव्हे तर – ‘रोज’ करायची. आणि हो! स्वयंपाक रोज सकाळी ताजा जसा भारतात असतो तसं आमचं विकसित देशात नसतं बरं. आम्ही आदल्या दिवशी किंवा अनेकदा काही दिवसांचादेखील स्वयंपाक एकदम करून फ्रिजमध्ये कोंबतो आणि मग अनेक दिवस हवा तसा मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खातो (तुमचं आयुर्वेद म्हणेना का की, अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नये अशाने त्यातील विषधर्म वाढीस लागतात म्हणून...)

लेखातील संदर्भ : लोक समुद्रकिनाऱ्यावर मौज मजा करायला जातात.
माझा अनुभव : खरंय. अगदी कोरोनाचे संचारबंदीचे नियम असताना सुद्धा सर्व नियम फाट्यावर बसवून. (Coronavirus crisis: Crowds flock to Sydney beaches despite lockdown)

(क्षमा मागून थोडं विषयांतर करतो. कोरोनाची लस टोचून घ्यायची नाही म्हणून इथे कोरोनाच्या ऐन बहराच्या काळात हजारो लोक चिकटून चिकटून निदर्शनं देत बाहेर पडले. ज्यामुळं कोरोना प्रचंड प्रमाणात पसरून 2021 मध्ये साडेतीन महिने पुन्हा संचारबंदी आणावी लागली.  

त्या anti-vax निदर्शनांमध्ये येथील कडवट धार्मिकदेखील होते. (Should Christians be opposed to vaccination?)
विकसित देशातल्या मॉडर्न शहरातले सुशिक्षित लोक संचारबंदी पाळेनात म्हणून मिलिटरी बोलवावी लागली, पोलिसांची मदत घ्यावी लागली. (‘Very selfish boofheads’: Police taskforce to hunt down 3500 protesters). 

कोरोना काळात इथल्या अनेक ‘सुशिक्षित’ लोकांनी आपापल्या घरात प्रचंड प्रमाणात जीवनावश्यक गोष्टींचा अनावश्यक साठा निर्माण करून बाजारात मात्र कृत्रिम टंचाई निर्माण केली. (More than a year into the pandemic, why are we still panic buying?) आणि इतरांना सकाळी पाच-सहा पासून ‘मॉल्स’ / सुपर मार्केटच्या रांगेत थांबण्यास भाग पाडले.) 

लेखातील संदर्भ : रेल्वे / बस स्टेशन वर गर्दी नसते.
माझा अनुभव : हे वेळ आणि ठिकाणावर अवलंबून आहे. चॅट्सवूड, विनिअर्डस, टाऊन हॉल, सेंट्रल यांसारखी ठिकाणं आणि काही ठराविक वेळांमध्ये ठराविक मार्गांवर प्रचंड गर्दी असते. 

लेखातील संदर्भ : मुलगा-मुलगी वयात आली की स्वतंत्र राहून आपला भार उचलतात.
माझा अनुभव : ते स्वतंत्र राहतात कारण त्यातल्या खूप जणांचा भार विविध भत्त्यांच्या माध्यमातून सरकार म्हणजे अप्रत्यक्षपणे करदाते उचलतात. (जे भत्ते मिळवल्यावर काही तरुण-तरुणी दोन दिवसात ड्रग्जवर उडवतात. ऑस्ट्रेलियामध्ये नवीन आलो तेव्हा भाड्याच्या मोठ्या घरात ज्या ऑस्ट्रेलियन किशोरवयीन मुलासोबत मी राहात होतो त्याला ड्रग्जवर अशी उधळपट्टी करताना मी पाहिलं आहे.) इथल्या सोशल सिक्युरिटी सिस्टिमकडून जेवढं कार्य केलं जातं त्याहून खूप अधिक कार्य भारतातली भक्कम कुटुंबसंस्था आणि समाजव्यवस्था नकळतपणे करते. (सोशल सिक्युरिटीशी संबंधित इथल्या एका सरकारी प्रकल्पावर मी जेव्हा अतिशय जवळून काम करू लागलो, तेव्हा मला भारतातल्या कुटुंबव्यवस्थेचं, समाजव्यवस्थेचं महत्त्व प्रकर्षाने जाणवलं.)

इथे बरेच किशोरवयीन स्वतंत्र राहतात कारण शालेय वयापासून सुरु झालेला स्वैराचार त्यांना अधिक प्रमाणात करता येतो. काहींचे आई-वडील जबाबदारी घ्यायला तयार किंवा पात्र नसतात. काहींच्या आई-वडिलांना पालकांच्या भूमिकेमध्ये शिरल्यावर स्वतःचा स्वैराचार थांबवायचा नसतो. काहींच्या आई-वडिलांपैकी एकजण गायब असतो. (अजून एक ‘फन-फॅक्ट’ - अगदी मागच्या दशकापर्यंत भारताबाहेर स्थायिक झालेले काही भारतीय, त्यांची मुलं वयात येऊ लागली की त्यांना घेऊन भारतात परत यायचे. का? तर इथे शालेय वयातच शरीरसंबंध ठेवण्याचं, कौमार्य घालवण्याचं, ड्रग्ज घेण्याचं प्रचंड दडपण समवयस्कांकडून असतं.)

लेखातील संदर्भ : भारतीयच स्वतःच्या गळयात, घरात, दुकानात, कारमध्ये धार्मिक चिन्ह मिरवताना दिसले.  
माझा अनुभव : भारतीय हे सर्व ‘स्वतःच्या’ बाबतीत करतात कारण ते सार्वजनिक, शहराच्या मध्यवर्ती, गर्दीच्या टाऊन हॉल भागात जॉर्ज स्ट्रीटवर इतर एक-दोन धर्मियांप्रमाणे लाऊडस्पीकर लावून 'प्रत्येक' शनिवार-रविवार धर्म प्रचार / प्रसार / प्रहार करत आपल्या धर्माची दुकाने भर रस्त्यावर थाटत नाहीत. शिवाय लेखकांनी लिहिले त्याप्रमाणे ख्रिसमसची रोषणाई तर सर्वत्र नोव्हेंबरपासून जानेवारी उजाडेपर्यंत असते. डिसेंबरमधला ख्रिसमस कमी की काय म्हणून ख्रिसमस-इन-जुलै नावाचा प्रकारपण इथे साजरा होतो. का? तर पारंपरिक ख्रिसमसच्या काळातली थंडी इथे डिसेंबरमध्ये नसते तर जुलैमध्ये असते म्हणून. 

लेखातील संदर्भ : पूर, आग, जीवितहानी होते, वगैरे.
माझा अनुभव : हे सगळं असतं यात वाद नाही परंतु ते याहून भयानक प्रमाणात आपण भारतात भोगतो आणि त्याचा सहजी सामना देखील करतो. राजकीय पक्ष कधीही कोणताही असला तरी भारतातल्या व्यवस्थेवर प्रचंड ताण असूनही व्यवस्था कोलमडून पडत नाही. इथे फुटकळ पावसाने रेल्वेच काय साधे एस्कलेटर्सपण बंद पडतात. 

लेखातील संदर्भ : निवडणुकीची जाहिरातबाजी नाही. 
माझा अनुभव : निवडणुकीची जाहिरातबाजी वेगळ्या पद्धतीने होते इतकंच. हाय-क्लास ग्लॉसी पेपरवर प्रत्येकाच्या पत्रपेटीत प्रत्येक उमेदवार स्वतःचा टेंभा मिरवण्याचा सतत प्रयत्न करत राहतो. (पुन्हा विषयांतराबद्दल दिलगिरी परंतु विकसित अमेरिकेची ट्रम्प-हिलरीची हिलॅरीअस निवडणूक पाहिल्यानंतर तर काही काळ भारतातल्या ‘सर्वच्या सर्व’ राजकीय नेत्यांबद्दल मला आदरच वाटू लागला होता.)

याप्रमाणे इतरही अनेक मुद्दे देऊन ही दुसरी बाजू दाखवता येईल परंतु मी मुद्दे मूळ लेखातल्या संदर्भांपुरते मर्यादित ठेवले आहेत. शेवटी हे पुन्हा सांगू इच्छितो की, विकसित देशांमध्ये दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी तुलनात्मकदृष्ट्या चांगल्या, सोयीस्कर आणि सुसह्य असतातच. म्हणूनच लाखो लोकं विकसित देशांत जातात, राहतात, स्थायिक होतात. परंतु बाहेर जितकं अधिक राहू तितका भारताशी तुलना करण्याचा भाग मात्र हळूहळू कमीच होऊ लागतो आणि एकीकडे भारताबाहेरचे भव्य प्रासाद पाहताना दुसरीकडे आईच्या झोपडीमधील काही गोष्टीच अधिक प्रिय असल्याची जाणही तीव्र होत राहते - निदान माझ्याबाबतीत तरी असंच घडलं आहे.

- उमेश देशपांडे
umesh_deshpande@yahoo.com

Tags: प्रवास ऑस्ट्रेलिया प्रतिवाद अर्थव्यवस्था भारत आणि जग प्रवासवर्णन Load More Tags

Comments:

Subhash Athale

सार्वजनिक व्यवहारात, एकमेकांशी वागताना, या परदेशातील नागरिक अधिक नीतिमान असतात ( कमरेच्या वरील नीती). भारतीय लोकांची सामाजिक नीती खुरतलेली राहिली, कारण मला वाटते, मोक्षनीतीवर भर दिला गेला, ऐहिक जगाकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे पाश्चात्य देशांची ऐहिक प्रगती झाली, आपली नाही झाली.

जयंत घाटे

अत्यंत सुरेख लेख. लेखकाला दीर्घकाळ परदेशी वास्तव्यामुळे स्वानुभव लिहिण्याचा पूर्ण नैतिक अधिकार आहे. सर्वसामान्य वाचकांच्या ज्ञानात हे वाचून मोलाची भर पडेल. कमी काळासाठी परदेशी जाऊन आलेल्या मंडळींचे अनुभव उथळ, एककल्ली आणि म्हणून विश्वासार्ह नसतात हे पटलं!

दत्ताजीराव

मानस सगळीकडे सारखीच, शेवटी तो प्राणीच. तुलना नकोच.

Makarand

अत्यंत उचित आणि आवश्यक लेख आहे हा..पूर्णपणे सहमत

Add Comment