इथल्या सार्वजनिक निवडणुकीचा आम्हाला जवळून अनुभव घेता आला. विशेष म्हणजे येथील निवडणुका शांततेत व शिस्तबद्धरित्या पार पडताना दिसून आल्या. कुठेच आवाज, गडबड नाही. मोठमोठ्या प्रचारसभा नाहीत किंवा बॅनर्सबाजी व जाहिरातबाजी नाही. प्रसारमाध्यमांतून सर्वांना आपली मतं व अजेंडा मांडण्यासाठी समान संधी व वेळ दिला जात होता. निवडणुकीपूर्वी सुमारे 15 दिवस अगोदर सर्वांना मतदान केंद्रांची माहिती पोस्टाने कळवण्यात आली. मतदान न केल्यास येथे दंड केला जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या दरम्यान मतदान होऊन, त्याच दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत निकालही जाहीर झाला.
ऑस्ट्रेलियाला जाण्याचा हा माझा तिसरा योग. यावेळी आम्हाला सिडनीला येता यावं यासाठी गेली दोन वर्षं माझी मुलगी करत होती. पण कोरोनाच्या महामारीमुळे सगळ्या बॉर्डर्स बंद केल्या होत्या. त्यामुळे आम्हाला सिडनीला जाणं शक्य होत नव्हतं. डिसेंबर महिन्यात प्रवासासाठी थोडीसी सवलत मिळताच वेळ न दवडता माझ्या मुलीने माझी व माझ्या पत्नीची डिसेंबरच्या दुसऱ्याच आठवडयाची तिकीटं बुक केली आणि आमचा प्रवास निश्चित केला. परंतु विमानाची तिकीटं बुक करताना एक अडचण लक्षात आली. आमचा पासपोर्ट एक्स्पायर झालेला होता. पुष्कळ धावपळ केल्यानंतर, माझा गासातील मित्र पालीकान फोस याच्या मदतीमुळे 6 डिसेंबर रोजी आमचा पासपोर्ट नूतनीकरण करून आमच्या हाती पडला. आणि आमची मोठी चिंता दूर झाली. कारण डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात आमचा मुंबई ते सिडनी प्रवास निश्चित होता. कोरोना व इतर आवश्यक प्रवासपूर्व वैद्यकीय तपासण्या पार पाडून, मुंबई ते सिडनी करून 10 डिसेंबर रोजी आम्ही एकदाचे सिडनी विमानतळावर पोहचलो. विमानतळाबाहेर आमचा जावई आम्हाला घेण्यासाठी वाट पाहत होताच. विमानतळाबाहेर कडाक्याची थंडी होती. सुदैवाने आमच्या जवळ गरमीचे कपडे होते. मुलीच्या घरी सात दिवस आम्हाला एकांतात राहावं लागलं. तसेच दुसऱ्या आणि पाचव्या दिवशी आम्हाला कोरोना चाचणी करून घ्यावी लागली. सुदैवाने दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आमची डोकेदुखी कमी झाली. मुलीने आमच्यासाठी स्वतंत्र रूमची सोय केलेली होती. तिथे सात दिवस विलगीकरणात राहून नंतर आम्ही मुक्त झालो.
सिडनी हे ऑस्ट्रेलियाच्या जुन्या राजधानीचे शहर आहे. या शहराला चांगला समुद्र किनारा मिळालेला असून, चांगलं प्रसिध्द बंदरही लाभलेलं आहे. सिडनी शहराचा पसारा फार मोठा असून येथे हार्बर ब्रिज, ऑपेरा, बोडाय अशी प्रसिद्ध स्थळं आहेत. ख्रिसमस व नवीन वर्षाच्या दिवशी येथे फार मोठी आकर्षक व नयनरम्य रोषणाई केली जाते. त्याच बरोबर या दिवशी आकाशात डोळे दिपवणाऱ्या फटाक्यांची सुंदर आतेषबाजी केली जाते. हा नजारा जवळून पाहण्यासाठी आणि त्याकरता मोक्याच्या जागा मिळविण्यासाठी सकाळपासूनच लोक इथे ठाण मांडून बसलेले दिसतात. हजारो परदेशी पाहुणेसुद्धा या कार्यक्रमाची मजा लुटण्यासाठी इथे हजेरी लावताना दिसतात. सिडनी शहर हे रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग व जलमार्गाने उत्तम रितीने जोडलेलं आहे. त्यामुळे वाहतुकीची उत्तम सोय इथे उपलब्ध आहे.
सिडनी शहरातील लोकांचं राहणीमान फारच उच्च दर्जाचं असून ते फारच शिस्तबद्धपणे वागताना दिसतात. ब्रिटिश लोकांची नाळ या देशाशी जोडलेली असल्याचा हा परिणाम आहे. शहरातील टोलेजंग इमारती सोडल्यास बहुतेक ठिकाणी सर्व सुविधांनी सुसज्ज असलेली छोटी-छोटी टुमदार कौलारू घरं उभी असलेली दिसतात. या घराच्या आजुबाजूला सुंदर बागा, फुलझाडे व गवत यांनी ती सजवलेली दिसून येतं. रस्त्यापासून पुरेशी जागा सोडून ही घरं बांधलेली दिसतात. घर व रस्ता यांच्या मधल्या जागेत गवत वाढवण्यात येतं आणि त्याची वेळच्या वेळी सुंदररित्या छाटणी करण्यात येते. अशा प्रकारे मध्ये मोकळी जागा न ठेवल्यामुळे कुठेच फारशी धूळ पसरत नाही. प्रत्येक घरात जमिनीच्या खाली नैसर्गिक गॅसची आणि त्याचबरोबर गरम/थंड पाण्याची सोय केलेली असते. घरामध्ये एसी व हिटरचीही सोय असते. त्यामुळे, बाहेर तापमान वाढलं किवा कमी झालं तरी त्याचा परिणाम घरात जाणवत नाही. येथे बहुतेक घरामध्ये लाकडाच्या टाईल्स बसविण्यात येतात. बऱ्याच घरांत त्यावर कार्पेटचाही वापर करण्यात येतो. यामुळेही घरातील वातावरण संतुलित राहण्यास मदत होते. येथील कौलारू घरं दोन ते सहा रूमपर्यंत मोठी असतात. तर प्रत्येक घराला एक ते दोन कारच्या पार्किंगची सोय केलेली दिसून येते. येथील घरं बहुतेक वेळा बंदच असतात. तसेच घराची डागडुजी व रंगसफेती नियमितपणे वेळच्या वेळी करण्यात येते. घराच्या बाहेर, ओटीवर अथवा अंगणात लहान मुलं खेळताना, बागडताना दिसणार नाहीत किंवा आवाज करतानाही दिसणार नाहीत. इथे लोक आपसांत बोलतानाही मोठयाने अथवा आरडाओरडा करून बोलताना आढळणार नाहीत, ते मंद व हळू आवाजात बोलताना दिसतील.
सिडनीमध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळे रस्त्यावर फिरतानाही फार तुरळक लोक दिसून येतात. बहुतेक मॉल, दुकानं, शाळा, दवाखाने व कार्यालयं दूर असल्यामुळे घरोघरी कार ठेवावी लागते. काहींच्या घरी दोन-तीन कार दिसतात. इथल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ते आरोग्याविषयी फारच काळजी घेताना दिसतात. त्यामुळे सकाळ, दुपार व संध्याकाळ - जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा - ते रस्त्यावरून किंवा उद्यानांमध्ये धावताना व व्यायाम करताना दिसतात. विशेष म्हणजे बऱ्याच उद्यानांमध्ये लोकांना व्यायाम करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या दिसून येतात. येथे आपल्यासारखी जागोजागी भाजी, मासळी, मटन इत्यादीची दुकानं दिसणार नाहीत. इतकंच नाही तर रस्त्यावर व फुथपाथच्या आजुबाजुला हातगाडीवाले अथवा फेरीवाले दिसणार नाहीत. तर ठराविक ठिकाणी मोठमोठे मॉल्स असून त्यामध्ये सर्व प्रकारचं सामान मिळतं. येथील बरीच दुकानं ही चिनी लोकांनी थाटलेली दिसून येतात. इथलं एकंदरित जीवनमान व राहणीमान उच्च दर्जाचं असल्यामुळे वस्तु व इतर सामान महाग आहे. इथला बराच, म्हणजे 90 टक्के माल चीनमधून आयात केला जातो.
इथले रस्ते स्वच्छ, गुळगुळीत व खड्डेविरहित असतात. रस्ते बांधताना भूमिगत गटारं व फुटपाथ यांचं व्यवस्थित नियोजन केल्यामुळे कुठेच पाणी साचताना दिसत नाही. त्यामुळे मच्छर व डास इत्यादीचा प्रादुर्भावही होताना दिसत नाही. विशेष म्हणजे इथे पर्यावरणाला फारच महत्त्व दिलं जातं. त्यामुळे रस्ते अथवा घरं बांधताना चढ व उताराची जागा सपाट न करता, आहे त्या स्थितीतच बांधण्यात येतात. यामुळे येथील रस्ते व घरं समान पातळीवर न दिसता, कुठे उंचवट्यावर तर कुठे खोलगट जागेत दिसून येतात.
हेही वाचा : प्रथम इटली पाहता.. - राजीव भालेराव
कुठलंही वाहन चालविताना फारच काळजी व दक्षता घ्यावी लागते. शिस्त व नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्यामुळे इथे कुणी सिग्नल तोडताना अथवा बेशिस्तपणे वाहन चालवताना दिसत नाही. वाहन चालवतांना सीटबेल्ट लावणं सर्वांनाच बंधनकारक आहे. इतकंच नाही तर कारमधून प्रवास करताना लहान मुलामुलींनाही स्वतंत्रपणे सीटबेल्टची व्यवस्था करावी लागते. दारू पिऊन वाहन चालवण्यास बंदी असून नियम मोडणाऱ्यांना जबरी दंड आकारण्यात येतो. काही वेळेस ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा रद्द केलं जाण्याची भिती असते. मोक्याच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात आलेले असून ते सर्व वाहन चालकावर बारीक नजर ठेऊन असतात. सर्व कार व्यवस्थित 'कंडीशन'मध्ये ठेवाव्या लागतात. कारण प्रत्येक वर्षी वाहनाची नियमित तपासणी होते. ड्रायव्हिंग लायसन्स देतानासुध्दा फारच दक्षता घेऊन कठोर कसोटया घेतल्या जातात. अशा रितीने पहिल्या तीन वर्षांपर्यंत लर्निंग लायसन्स मिळतं. लर्निंग लायसन्सधारकाने कार चालवताना ‘P’चं लेबल लावावं लागतं. त्यानंतर पाच वर्षांनी, सर्व कसोटया यशस्वीपणे पार पाडल्यानंतर पक्कं लायसन्स दिलं जातं. तसंच वाहन चालवताना वाहन चालकाकडून चूक किंवा दुर्घटना घडल्यास त्याचे पॉईंटस् (गुण) कमी होतात. हे गुण ठराविक मर्यादेच्या बाहेर गेले की, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्याची भिती असते. ठरवून दिलेल्या वेगातच कार चालवावी लागते. सिग्नल जवळ व इतर ठिकाणी कार थांबविताना दोन्ही कारमध्ये पुरेसं अंतर ठेऊनच कार थांबवावी लागते. यामुळे इथे होणाऱ्या दुर्घटनांचं प्रमाण फारच कमी आहे. रस्त्यावरून कार चालवताना रस्ता क्रॉस करणाऱ्या पादचाऱ्यांना प्राधान्य देऊन, कार थांबवून त्यांना प्रथम रस्ता पार करण्याची संधी दिली जाते. मनुष्यबळाचा वापर न करता कारच्या पार्किंगची उत्तम सोय केलेली दिसून येते. यासाठी रस्त्याशेजारी ठराविक ठिकाणी स्टॅण्ड पोस्ट उभं करून त्यामध्ये डेबिट कार्डच्या मदतीने पार्किंगचे पैसे भरून आपली कार पार्क करू शकता. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत नाही.
व्यायामासाठी सायकल वापरण्याचं प्रमाण इथे फारच आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याशेजारी सायकलसाठी स्वतंत्र मार्गाची सोय केलेली दिसून येते. सायकल चालकालाही हेल्मेट वापरणं बंधनकारक आहे.
इथल्या लोकांच्या खाण्याविषयी बोलायचं झालं तर, इथे बरेच लोक हलका आहार करताना दिसतात. पाव, मस्का, सँडविच, बटाटयाचे प्रकार व फळे आहारात असतात. मांसाहारामध्ये पोर्क, बिफ, लॅम, मटन, चिकन व मासळी इत्यादीचा समावेश असतो. भात व चपाती खाताना इथे कोणी दिसणार नाही. खाण्यामध्ये व जेवणात तेल अथवा मसाल्यांचा वापर होत नाही. तसेच विशेष म्हणजे येथील लोक एकाच वेळी जास्त व अति जेवण करताना दिसणार नाहीत. सकाळी कॉफी व त्याबरोबर पाव अथवा बटाटा चिफ, सँडविच इत्यादी तर दुपारी व रात्री हलकं जेवण घेतात. घरी स्वयंपाक करण्याऐवजी पार्सल मागवून नाश्ता व जेवण घेण्याचं प्रमाण जास्त आहे. इथल्या लोकांना कॉफीचं व्यसन फारच दिसतं. कारण बरेच लोक रस्त्यावरून कॉफीचा कप हातात घेऊन चालताना दिसतात.
महत्त्वाचं म्हणजे इथे लहान मुलामुलींना खेळाचं प्रशिक्षण देण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. यामध्ये सायकलिंग, धावणे, लांब व उंच उडी, बास्केटबॉल, फुटबॉल, रूग्बी, पोहणे, क्रिकेट, टेनिस इत्यादी खेळांचा समावेश असतो. विकेंड किंवा सुटीच्या दिवशी आई-वडील आपल्या मुलामुलींना मोकळ्या ग्राऊंडवर घेऊन जातात, तिथे वर लिहिलेल्या खेळाचं प्रशिक्षण दिलं जातं.
घरकामासाठी घरगडी नेमण्याची पद्धत इथे नाही, कारण येथील घरगडयाची मजुरी सुमारे तासाला 100 ते 200 डॉलर एवढी असते. त्यामुळे सुटीच्या दिवशी घरातील साफसफाई, गवत छाटणी, कपडे धुणे इत्यादी कामं लोक स्वतःच करणं पसंत करतात.
सिडनी शहराला बोडायसारखा सुंदर समुद्रकिनारा मिळाल्यामुळे बरेच लोक आपल्या कुटुंबासह मौज मजा करण्यासाठी तिथे जातात, पोहण्याचा व बोटिंगचा आनंद लुटताना दिसतात. काही समुद्र-किनाऱ्यांवर शार्क माशांचा धोका असतो. यामुळे काहीवेळा जिवितहानीही होते. यासाठी अशा धोकादायक समुद्र किनाऱ्यांवर लोकांच्या मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी लाईफ गार्ड तैनात केलेले दिसून येतात.
येथे सार्वजनिक वाहतुकीसाठी सुसज्ज सार्वजनिक बस व ट्रेनची सुविधा उपलब्ध असते. परंतु बरेच लोक स्वतःच्या कारचा उपयोग करणेच पसंत करताना दिसतात. त्यामुळेही रेल्वे स्टेशन व बस स्टॉप इत्यादी ठिकाणी गर्दी किंवा धावपळ नसते. येथील लोकांना कुत्रे बाळगण्याचा फारच छंद व आवड असून बहुतेक लोक एक ते दोन कुत्रे पाळताना दिसतील. पाळीव कुत्र्याचं जेवण-खाण, औषधं, त्याची स्वच्छता व निगा यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यास दंड किवा शिक्षा होण्याचीही शक्यता असते. कुत्रा रस्त्यावरून अथवा गार्डनमध्ये घेऊन जाताना कुत्र्याने नैसर्गिक क्रिया केल्यास ती प्लॅस्टिक पिशवीने स्वच्छ करून जवळच असलेल्या कचरा पेटीत टाकावी लागते. पण लोक हे काम आनंदाने करताना दिसतात.
ऑस्ट्रेलियामध्ये चिनी समाजाची लोकसंख्या डोळ्यात भरण्यासारखी असून, ते लहान-मोठे काम-धंदे करत असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली दिसून येते. विशेष म्हणजे चिनी व गोऱ्या लोकांमध्ये रोटी-बेटीच्या व्यवहाराचं प्रमाणही बऱ्यापैकी दिसून येतं. एकदा मुलगा अथवा मुलगी वयात आली की, ते स्वतंत्र राहून आपला भार आपण उचलताना दिसतात. स्वतःच्या मर्जीने लग्न करण्याचं प्रमाण इथे अधिक आहे. त्यामुळे म्हातारे आई-वडीलही आनंदाने स्वतंत्र राहताना दिसतात. लहान मुलांना सांभाळण्यासाठी ‘चाईल्ड केअर’सारखी सेंटर्स आहेत. तिथे लहान मुलांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. परंतु तिथेही प्रत्येक तासाला सुमारे 100 ते 200 डॉलर फी आकारली जाते. यामुळे बऱ्याच महिला नोकरी न करता लहान मुलाचं संगोपन करणं पसंत करताना दिसतात.
येथील धार्मिक जीवन फारच उदारतेचं आहे. बरेच लोक दररोजच्या जीवनात धर्माला महत्त्व देताना दिसत नाहीत. येथे सुमारे 40 टक्के लोक धर्म न पाळणारे आहेत. त्यामुळे येथे लोकांच्या गळ्यात, कारमध्ये किंवा घरात धार्मिक चिन्हे अथवा देवाच्या मूर्ती दिसणार नाहीत. सर्व धर्मांचे/पंथांचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहताना दिसतात.
पॅरामाटा इथल्या उपनगरात असं अनुभवाला आलं की, इथे आपल्या भारतीयांची वस्ती बरीच असून ते मात्र आपल्या गळ्यात, घरात, कार व दुकानांमध्ये धार्मिक चिन्हे व देवाच्या मूर्ती इत्यादींचा सर्रास वापर करताना दिसून आले. आपल्याकडच्या कडव्या धार्मिक व्यक्तींनी इथल्या लोकांचा आदर्श घेणं आज खूप गरजेचं आहे.
इथलं हवामान फारच लहरी आहे. कारण उष्णता असतानाही मध्येच मुसळधार पाऊस पडून पूर येतो, तर थंडीमध्येदेखील अचानक पावसाचं आगमन होतं. उन्हाळ्यात बऱ्याच वेळेस जंगलामध्ये भयंकर आग लागून (बुशफायर) मोठं नुकसान होतं, काहीवेळा जीवितहानी होते. इथे तापमान किमान 7 अंश सेल्शियस तर जास्तीत जास्त 41 अंश सेल्शियस पर्यंत असतं. लहरी हवामानामुळे नेहमीच उबदार कपडे सोबत बाळगावे लागतात. इथला सूर्यप्रकाश शरीरासाठी हानिकारक असल्यामुळे घराबाहेर पडताना कॅप, गॉगल व शरीर पूर्ण झाकले जाईल असे कपडे वापरण्याचा आग्रह सरकारी सूचनांद्वारे केला जातो. या सुर्यप्रकाशामुळे कातडीचा रोग व कॅन्सर इत्यादी रोगांचं प्रमाण वाढलेलं दिसतं. रोजच्या व पुढील आठवडयाच्या हवामानाचा अचूक अंदाज वेधशाळा देत असल्यामुळे लोकाची गैरसोय दूर झालेली दिसून येते.
इथल्या सार्वजनिक निवडणुकीचा आम्हाला जवळून अनुभव घेता आला. विशेष म्हणजे येथील निवडणुका शांततेत व शिस्तबद्धरित्या पार पडताना दिसून आल्या. कुठेच आवाज, गडबड नाही. मोठमोठ्या प्रचारसभा नाहीत किंवा बॅनर्सबाजी व जाहिरातबाजी नाही. प्रसारमाध्यमांतून सर्वांना आपली मतं व अजेंडा मांडण्यासाठी समान संधी व वेळ दिला जात होता. निवडणुकीपूर्वी सुमारे 15 दिवस अगोदर सर्वांना मतदान केंद्रांची माहिती पोस्टाने कळवण्यात आली. मतदान न केल्यास येथे दंड केला जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या दरम्यान मतदान होऊन, त्याच दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत निकालही जाहीर झाला. मतदानासाठी मशीनऐवजी मतपत्रिका वापरली गेली. फक्त त्वरित निकालासाठी मतमोजणीस बहुधा मशीनचा वापर केला जातो. अशा रितीने इथे गेली 15 वर्षं सत्तेत असलेल्या लिबरल पार्टीचा पराभव होऊन लेबर पार्टी सत्तेत आली. निकालानंतर कुठेही विजयी मिरवणुका नाहीत की फटाके वाजवून विजय साजरा केलेला दिसून आला नाही. सर्व काही शिस्तीत पार पडलेलं दिसून आलं. थोडक्यात, निवडणुका कधी आल्या आणि कधी संपल्या हे समजलंही नाही! निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, दुसऱ्या दिवशी सकाळीच माजी पंतप्रधानांनी त्यांचं सरकारी निवासस्थान खाली करून दिलं. तर निवडून आलेल्या पंतप्रधानांचा शपथविधीही साध्या पध्दतीने दुसऱ्याच दिवशी पार पडला. आपल्याला या सगळ्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे.
- चार्ली रोझारिओ, वसई
cel.rosario47@gmail.com
Tags: सिडनी प्रवास संस्कृती निवडणूक खाद्यसंस्कृती चार्ली रोझारिओ आंतरराष्ट्रीय Load More Tags
Add Comment