1 सप्टेंबर 2008 रोजी उत्तर अमेरिका खंडाला ‘आईक’ (ike) नावाच्या चक्रीवादळाचा सामना करावा लागला. 1 तारखेला सुरु झालेलं हे वादळ तब्बल दोन आठवड्यांनी 14 सप्टेंबर 2008 रोजी शांत झालं. क्युबा, डॉमिनिकन रिपब्लिक, मेक्सिको, युनायटेड स्टेटस या देशांच्या आखातानजीकच्या प्रदेशांचं वादळामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं. मृतांची संख्या दोनशेच्या आसपास पोहोचली होती. प्रस्तुत लेखिका मुळची कोल्हापूरची असून हे वादळ आले तेव्हा ती टेक्सासमधील ह्युस्टन शहरात शिकत होती. तिचा हा अनुभव.
माझ्या कोल्हापुरात ऑगस्ट 2019ला पूर आला. मी सध्या कॅनडामध्ये असल्यामुळं परदेशातून मी फक्त बातम्या पाहू शकत होते. तेव्हा मला आठवण झाली सप्टेंबर 2008 मध्ये मी अनुभवलेल्या हरिकेनची. येत्या 1 सप्टेबरला त्या घटनेला 11 वर्ष होतील.
कोल्हापूर हे हवामानाच्या दृष्टीने संतुलित आहे. अति थंडी नाही, अति ऊन नाही, अति पाऊस नाही. सगळं कसं-सोसेल तसं आणि तेवढंच. वादळ वगैरे प्रकरणं तर फक्त भूगोलाच्या धड्यात पाहिलेली आणि गोष्टीत ऐकलेली! अशा कोल्हापुरातून ह्युस्टनमध्ये येऊन मला एकच महिना झाला होता. मी 21 वर्षांची होते आणि नुकतंच इंजिनिअरिंग पूर्ण करून मास्टर्स डिग्रीसाठी अमेरिकेला आले होते. कोल्हापूरबाहेरचं जग मी पहिल्यांदाच पाहत होते. विमानातही पहिल्यांदाच बसले होते. अमेरिकेतल्या, युनिव्हर्सिटीमधल्या वातावरणाशी जुळवून घेण्यात आम्ही विद्यार्थिनी मग्न होतो.
आम्ही आमच्या नव्या नव्या रुटीनमध्ये मश्गुल असताना अचानक बातम्यांमधून वादळाची सूचना यायला लागली. ह्युस्टन, टेक्सास मधल्या आमच्या क्लिअरलेक युनिव्हर्सिटीने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मेल केला होता.
टेक्सासमधल्या वॉटर रीस्पोंस एजन्सीज, एनव्हार्न्मेंट कमिशन, रुरल वॉटर असोसिएशन अशा संस्थांच्या स्टेट गव्हर्नमेंटशी बैठका सुरु असल्याच्या बातम्या येत होत्या. दोन-तीन दिवसांतच शहर रिकामं करण्याची ‘ऑर्डर’ आली. ती सूचना नसून ‘ऑर्डर’च होती! आईक नावाचं चक्रीवादळ येणार होतं.
युनिव्हर्सिटीजवळच एका फ्लॅटमध्ये आम्ही सहा जणी राहत होतो. आम्ही सगळ्याच भारतीय विद्यार्थिनी होतो. बातम्या बघून आम्ही भांबावलो. पण युनिव्हर्सिटीने पाठवलेला मेल आमचा गोंधळ शांत करणारा होता. ‘आईक येणार आहे, ते येण्याच्या वेळेचा अंदाज, त्याच्या तीव्रतेचे अंदाज’ - ही सगळी माहिती त्या मेलमध्ये होती. शहर रिकामं करून सुरक्षित जागी जायचं आहे, जवळच्या कुठल्या शहरांमध्ये जाता येईल, कसं जाता येईल, वाहनांची व्यवस्था कुठून करण्यात आली आहे, ज्यांची राहण्याची सोय कुठेच होऊ शकत नाही; त्यांच्यासाठी आमच्या युनिव्हर्सिटीने लांबच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये व्यवस्था केली होती. त्याविषयीची माहिती, इमर्जन्सीमध्ये वापरायची संपर्क साधने, फोन नंबर्स आणि वादळात कुठे अडकून पडलो तर घ्यायची काळजी इत्यादी सर्व माहिती मेलमध्ये सविस्तर दिली होती. असेच मेल सरकारी यंत्रणेकडून इतर नागरिकांनाही गेलेले होते.
सोनल नावाची माझी एक रूममेट होती. तिचे काका-काकू आमच्यापासून तास-दोन तासाच्या अंतरावर राहत होते आणि त्यांच्या शहराला आईकचा धोका नव्हता. म्हणजे तिथंही वादळ पोचणार होतंच पण तितका धोका नव्हता. सोनलचं त्यांच्याशी बोलणं झालं. काकांनी विनाविलंब सोनलसकट आम्हां पाच जणींची सोयही स्वतःच्या घरी केली. अशा अनेकांनी अनोळखी लोकांना त्या संकटात आसरा दिला.
वेधशाळेवर, युनिव्हर्सिटीवर, सरकारी यंत्रणांवर विश्वास ठेऊन सगळे एकमार्गी काम करत होते. सगळ्यांनी निसर्ग स्वीकारला होता आणि तरी त्यात तग धरून सुरक्षित राहण्याची धडपड सगळे करत होते.
आम्ही मेलमधील सूचनांप्रमाणे खाण्याचं काही सामान, पाणी, फर्स्ट एड बॉक्स, मोजके कपडे, कागदपत्रे, सोन्याचे दागिने, टॉर्च वगैरे गरजेच्या गोष्टी सोबत घेतल्या. इतर सर्व बॅगमध्ये घालून बॅग्स शक्य तितक्या उंचीवर ठेवल्या. पाणी, अन्नपदार्थ घेण्यासाठी दुकानांत गेलो. बऱ्याच दुकानांतला माल संपत आला होता. काही दुकानदार परिस्थितीचा फायदा घेऊन जास्त किमतीला माल विकत होते.
आमच्यापैकी एकीची कार होती. 100 किलोमीटर अंतर जाण्यासाठी, जे एरवी दोनेक तासात पार होऊ शकत होतं; त्या दिवशी आम्हाला आठ तास लागले. रस्त्यांवर चार-पाच किलोमीटर गाड्यांच्या रांगा होत्या. सगळ्यांनाच सुरक्षित ठिकाणी जायचं होते. पोलीस ट्रॅफिकला दिशा देत होते. गाड्या संथ गतीने पुढे जात होत्या. सगळ्यांच्या मनातली घालमेल मनात राहत होती. आणि ट्रॅफिक शिस्तीनं, संयमानं पुढे पुढे जात होतं.
घरी काय कळवावं, मला समजत नव्हतं. मी माझ्या धाकट्या बहिणीला सांगितलं की, वादळ येणार आहे म्हणून आम्ही सोनलच्या काकांकडं चाललो आहोत. ती मला म्हणाली,"तुम्हाला आधीच कसं कळलं वादळ येणारे म्हणून?"
"अगं इथल्या वेधशाळेने तसं सांगितलंय"
"मग आपली वेधशाळा पण सांगत असतीच की काय काय. ते म्हणतात पाऊस येईल त्यादिवशी पाऊस येतोच असं कुठंय?"
"इथं तसं नाहीय. सगळे लोक गाव सोडून चाललेत. ते खुळे आहेत काय? "
"बरं बाई. मग आता? आईबाबांना सांगते मी. बापरे! मला भीती वाटतीय आता."
"बापरे वगैरे काही नाही. आम्ही सेफ जागी चाललोय. वादळ तिथं पोचणार नाही. तू आईबाबांना काही सांगू नको."
धाकट्या बहिणीला मी उसना धीर दिला पण मनातून मात्र माझी पुरती वाट लागली होती! ‘एवढा खटाटोप करून अमेरिकेला आलेय आणि पहिल्याच महिन्यात आपण वादळात मरणार’ असं एकीकडे वाटत होतं आणि दुसरीकडे ‘वाऱ्यानं काय माणसं मरतात काय. एवढं वारं कुठं येतंय! आणि आपण चाललोय ना सेफ ठिकाणी, निघू यातून सुखरूप बाहेर’ असंही वाटत होतं.
पाच-सहा तासांनी आम्ही काकांच्या घरी पोचलो. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. त्यांनी आम्हाला अगदी घरच्यासारखं वागवलं. भारतातून स्थलांतरित झालेलं पंजाबी कुटुंब होतं ते. आमचं हिंदी यथातथाच. इंग्रजी देखील नव्यानंच बोलायला लागलेलो. पण तरी बोलण्यामध्ये भाषेचा काही अडथळा आला नाही. आपल्याला वादळातून सहीसलामत बाहेर निघायचंय ही सर्व्हायव्हलची भावना आम्हाला बांधून ठेवत होती. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आमच्याकडे चार-पाच तास होते वादळासाठी तयार व्हायला. वादळाचा सौम्य झटका बसणाऱ्या ठिकाणी काय काय काळजी घ्यायची याचं माहितीपत्र गव्हर्नमेंटने आमच्यापर्यंत बातम्या, ई मेल यातून पोचवलं होतं. आम्ही सगळ्या खिडक्या बंद करून मोठ्या टेपने पॅक केल्या. घरातील सर्व ज्वालाग्राही उपकरणं म्हणजे गॅस, स्टोव्ह पूर्ण बंद केले. आणि अशा खोलीत सगळेजण बसून राहिलो जिथे कमीत कमी वस्तू पडतील वा फुटू शकतील.
वादळाला तोंड द्यायला आता आम्ही आमच्यापरीने तयार होतो. हवामान खात्याचा अंदाज हा अंदाजच होता. त्यामुळं अंदाजापेक्षा मोठ्या प्रमाणात संकट येण्याचीही शक्यता होती; आणि अगदीच फुसका बार निघाला असं होण्याचीही शक्यता होती. आम्ही अक्षरश: वादळाची वाट बघत बसलो होतो. काका-काकू मुळीच पॅनिक वाटत नव्हते. आम्ही मुली मनातून कदाचित खूप गोंधळलो होतो पण आमची एकमेकांशी ओळख इतकी नवीन होती की आम्ही मनातलं बोलत नव्हतो. मी नास्तिक असल्यामुळं देवाचा धावा करण्याचा पर्यायही माझ्याकडे नव्हता. ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’च्या नियमावर मदार ठेऊन मी फिट राहण्याच्या इराद्याने तयार बसले होते. अशा परिस्थितीत स्वतःशीच तेवढा संवाद शक्य होता. आत्तापर्यंतच्या चुकांची कबुली मी स्वतःकडे देऊन टाकली. मग प्रेमाची दिली. आई, बाबा, बहीण, मित्र-मैत्रिणी अशा अनेकांवर माझा किती जीव आहे; हे तेव्हा मला अधिक उमगलं.
वादळ येईपर्यंतचा वेळ जाता जात नव्हता. आणि वादळ सुरु झाल्यावर वेळ कसा गेला तेही समजलं नाही. खिडक्या थरथरत होत्या, लाईट गेलेली होती, आणि थंडी वाढली होती जी पुढं काही काळ तशीच राहीली. ते काही क्षण सर्वात कठीण होते. पण वादळ ओसरलं होतं आणि आम्ही वाचलो होतो.आम्ही ज्या भागात राहात होतो तिथून चक्रीवादळ फक्त पास झालं. साधारण अर्धा तास ते आमच्या डोक्यावर घोंगावत निघून गेलं. पुढे आम्ही त्या काकांकडे पूर्ण दोन आठवडे राहिलो. कारण टेक्सासमध्ये वादळाचा तडाखा सुरूच होता.
मूळ वादळापेक्षा, त्याचे परिणाम भयावह होते. हळूहळू लोक आपापल्या घराकडे परतत होते. आम्ही परत गेलो तेव्हा सगळ्या काचा, खिडक्या फुटलेल्या, घरात एक-दोन फूट पाणी साठलेलं. कित्येक भागात लाईट नव्हती, पाणी पुरवठा होत नव्हता. आमचा फ्लॅट अगदीच दोन-तीन दिवसांत पूर्ववत झाला. आमचं तुलनेने काहीच नुकसान झालं नव्हतं. पण बरीच घरं संपूर्ण उध्वस्त झाली होती. अमेरिकेतून, बाहेरच्या देशांतून मदत येत होती, तिथल्या लोकांचा विमा होता, सरकार पुनर्वसनासाठी मदत करत होती. तरीही ती मदत पुरी पडत नव्हतीच. पुढे तीन-चार वर्ष म्हणजे 2011-12 पर्यंत कित्येक लोकांना त्यांच्या हक्काची मदत मिळाली नसल्याच्या बातम्या येत होत्या. कित्येक लोक कित्येक दिवस लाईट-पाण्याशिवाय राहिले, काहीजण अनेक महिने स्वतःच्या शहरापासून दूर आपल्या नातेवाइकांकडे राहिले. अनेक दवाखाने वादळात बंद झाले ते महिनाभराने पूर्ववत झाले. तोपर्यंत चालू असणाऱ्या दवाखान्यांमध्ये गर्दी होत होती. वादळानंतर काही प्रमाणात रोगराई पसरल्याच्या बातम्याही येत होत्या. मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. घर, गाडी, वस्तू सगळंच उध्वस्त झालेल्यांचं फक्त घर उभं करायचं नव्हतं तर त्या माणसांनाही उभं करायचं होतं. राजकारण झालं, आरोप-प्रत्यारोप झाले, निदर्शनं झाली. सगळी घडी बसायला काही वर्षं गेली.
पुनर्वसन, पुनर्बांधणी यामध्ये भ्रष्टाचार, दिरंगाई, राजकारण झालं असेल पण वादळाची सूचना आल्यापासून ते वादळ शमून जाईपर्यंत सर्व यंत्रणा, सर्व माणसे एका दिशेत, एकत्र काम करत होती हेही मी तेव्हा अनुभवलं. नंतरच्या मदतीत देखील एक सुसूत्रता होती, ती एकमार्गी होत होती.
वैयक्तिक पातळीवर विचार केला तर त्या चक्रीवादळामध्ये माझं काही फार नुकसान झालं नाही. आजूबाजूला झालेल्या नुकसानाची तीव्रताही मला फारशी जाणवली नव्हती. पण आता वय आणि समज वाढताना लक्षात येतंय की उध्वस्त होणं काय असतं. नैसर्गिक आपत्तीमध्ये माणूस किती हतबल असतो. आपण निसर्गाच्या विरुद्ध उभे राहू शकत नाही. त्याला स्वीकारून आपण स्वतःचा बचाव करायचा असतो फक्त! अशा वेळी सगळ्या यंत्रणा, सर्व माणसे एका दिशेने विचार आणि कृती करणारी हवीत.
अवघ्या चोवीस तासात त्या ठराविक भागात राहणारे लोक, विद्यार्थी, नोकरदार, धंदेवाईक सगळ्यांचं आयुष्य पार विस्कटून गेलं होतं. त्यातच पराक्रमाच्या कथा ऐकायला मिळत होत्या, संवेदनशीलतेच्या तसेच स्वार्थीपणाच्याही कथा ऐकायला मिळत होत्या. एकाच घटनेतून अनेक भावनांचे अनुभव येत होते. पण सरकारने आणीबाणी घोषित करून अशा कठीण प्रसंगी लोकांना मार्गदर्शन व मदत केल्यामुळं संकटाची तीव्रता कमी झाली हेही तितकंच खरं आहे.
जिथे तुलनेने नैसर्गिक आपत्ती अधिक येतात, (शिवाय तो विकसित देश आहे) तिथे आपत्ती व्यवस्थापन चांगलं असणार ही स्वाभाविक गोष्ट आहे. तंत्रज्ञान, माणुसकी, विश्वास, इन्फ्रास्ट्रक्चर आणि हो-पैसा! अशा बऱ्याच गोष्टींनी हे साध्य होत असावे. संवेदनशीलतेला पर्याय नसतो. आणि ती विकतही घ्यावी लागत नाही. ती असतेच आपल्यात.
तिकडे कोल्हापूरच्या वर्तमानपत्रातही पहिल्या पानावर आमच्याइथल्या या वादळाची बातमी आली होती. वर्तमानपत्र आल्या आल्या माझ्या बहिणीने ते दडवून ठेवलं. आई बाबांना बातमी कळली तोपर्यंत वादळ येऊन गेलं होतं आणि मी सुखरूप राहिले होते. फक्त एक अनुभव गाठीशी आला होता. जिवंत राहण्यासाठीची धडपड समजली होती.
अलिकडे मात्र हवामानाचा इतका अचूक अंदाज देणं अमेरिकेतही दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. माणसाचा निसर्गाशी संवाद कमी होत चालला असावा.
मुग्धा दीक्षित
शब्दांकन : मृदगंधा दीक्षित
Tags: mugdha dixit america kolhapur flood अमेरिका चक्रीवादळ Load More Tags
Add Comment