द इंडियन्स: अस्मितांच्या ध्रुवीकरणाच्या गदारोळातील विवेकाचा आवाज

इतिहासाकडे वास्तववादी दृष्टिकोनातून बघणारे विवेकी पुस्तक

‘द इंडियन्स’ या इंग्रजीतील बहुचर्चित पुस्तकाचा मराठी अनुवाद मनोविकास प्रकाशनाने 24 ऑगस्ट 2024 रोजी, भांडारकर प्राच्यविद्या संशोधनमंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात प्रसिद्ध केला. या पुस्तकाची मूळ संकल्पना प्रख्यात भाषावैज्ञानिक प्रा.डॉ.गणेश देवी यांची आहे. जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या 100 तज्ञांनी 105 अभ्यासपूर्ण लेख यात लिहिले आहेत. स्वतः गणेश देवी, प्रसिद्ध इतिहासकार आणि पत्रकार टोनी जोसेफ आणि पुरातत्त्वज्ञ रवी कोरीसेट्टर यांनी ते संपादित केले आहे. तर शेखर साठे, प्रमोद मुजुमदार, नितिन जरंडीकर आणि ज्ञानदा आसोलकर यांनी मराठी अनुवाद केला आहे.

‘द इंडियन्स’मध्ये ज्याला ‘इंडिया’ म्हटले आहे, त्याला आज दक्षिण आशिया असे म्हणता येईल. दक्षिण आशियाचा 12000 वर्षांचा; म्हणजेच होलोसीनपासून इसवीसन 2000पर्यंतचा इतिहास नव्याने संक्षिप्त रूपात लिहिण्याची जबाबदारी या पुस्तकाने पेलली आहे. इसवीसनापूर्वी साडेनऊहजार वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपून पृथ्वीचे तापमान वाढायला लागले (होलोसीन). माणूस गुहांमध्ये राहत होता तो बाहेर येऊन फिरायला लागला. जनावर असलेला माणूस जनावरांपेक्षा वेगळा कधी आणि का वागू लागला? माणसाच्या जगण्यात कसे बदल झाले? समाज आणि संस्कृती यांचा विकास, वैदिक वाङमय आणि पाली व प्राकृत भाषांत उदयाला आलेले वेदविरोधी बौद्ध व जैन वाङमय, हडप्पा-मोहेंजोदडो येथील सिंधू संस्कृती, त्यांचा एकमेकांवरील प्रभाव, वेदांबाबत हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, मुसलमान, शीख अशा विविध धर्मांच्या वाङमयाचा अभ्यास, भारताच्या वैदिक इतिहासाच्या अभ्यासातील पारंपरिक आणि चिकित्सक पद्धती, त्यांतील टोकाचे आणि समन्वयाचे मतप्रवाह, इंडियन या शब्दाची व्याख्या, वेगवेगळ्या अस्मितांचा आणि भाषांचा विकास, प्राचीन काळातील राज्यव्यवस्था, सामाजिक इतिहास, ज्ञान व कलांचा विकास, मध्ययुगातील घटनांचा अन्वयार्थ, संतसाहित्य, भक्तिकाळातील क्रांतीचा इतिहास, भारताचा एकोणिसाव्या शतकापासूनचा स्वातंत्र्यसंग्राम, आदिवासींचे मुक्तिसंग्राम, आणि अगदी नजीकच्या काळातीळ परिस्थिती यांचा सांगोपांग आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. त्यात कालानुक्रम असला तरीही प्रत्येक प्रकरण स्वयंपूर्ण आहे. होलोसीनपासूनच्या नैसर्गिक-भौगोलिक-पर्यावरणीय घटना आणि मानवी इतिहास यांची सांगड घालणारी कालरेषा मराठी आवृत्तीचे वैशिष्ट्य आहे.

अभ्यासकांनी आपापल्या दृष्टिकोनांशी प्रामाणिक राहून, संशोधनाचे पद्धतिशास्त्र सांभाळून हे लेख लिहिलेले आहेत. अनेक विवाद्य मुद्यांवर मत-मतांतरे विचारात घेतली आहेत, विश्वासार्ह पुराव्यांसह लेखन केले आहे. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी व जिज्ञासूंसाठी उपयुक्त असा संदर्भग्रंथ द इंडियन्सच्या रूपाने निर्माण झाला आहे. तमिळ, मल्याळम, गुजराती आणि हिंदी या चार भाषांत त्याचा अनुवाद करण्याचे काम सुरू आहे. प्रकाशनाच्या कार्यक्रमात वक्त्यांनी या पुस्तकाची पूर्वपीठिका, लेखन-अनुवाद-संपादन यांची प्रक्रिया, आणि अशा तर्कशुद्ध पद्धतीने इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची गरज या विषयांवर आपापले विचार मांडले.

आशिष पाटकर यांनी प्रकाशकाची भूमिका मांडली. मनोविकास प्रकाशनाने सातत्याने विज्ञाननिष्ठ व पुरोगामी तत्त्वे रुजवणारी पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘बदलता भारत’ या पुस्तकात स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास प्रकाशित केल्यानंतर ‘द इंडियन्स’ ही त्यापुढची पायरी आहे. मराठी अनुवादाचे काम 80-90% झालेले होते, तेव्हा मनोविकास प्रकाशन या प्रकल्पाशी जोडले गेले आणि पुढच्या आठच महिन्यांमध्ये अनुवाद प्रकाशित झाला.

रानटी अवस्थेतून सुसंस्कृत समाजाकडे माणसाने जी वाटचाल केली ती सध्याच्या काळात परत रानटीपणाकडे होते आहे की काय अशी सध्या भीती आहे. शालेय पुस्तकांतून किंवा विशिष्ट हेतूने लिहिलेल्या पुस्तकांमधून दिसणारे इतिहासाचे, संस्कृतीचे चित्र हे वास्तवदर्शी उरलेले नाही, अशा वेळी इतिहासाचे वास्तव चित्र समोर आणण्याचा या पुस्तकातील निर्भय दृष्टिकोन मनोविकाससाठी महत्त्वाचा आहे.

अनुवादकांचे प्रतिनिधी शेखर साठे यांनी अनुवाद करतानाचे केवळ ऐतिहासिक संदर्भांचे नव्हे तर भाषिक संदर्भांचेही त्यांना पडलेले प्रश्न, त्यांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया स्पष्ट केली. काही ठिकाणी मूळ लेखाचा आशय मराठीत आणताना विशेष अडचणी आल्या, मात्र काही ठिकाणी मराठी लेख मूळ लेखांपेक्षा अधिक वाचनीय झाले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. मराठी भाषांतराचे काम पावणेदोन वर्ष चालू होते. सर्व अनुवादकांनी स्वतंत्रपणे काम केल्यामुळे त्यात मतांचे आणि अभिव्यक्तीचे प्रामाणिक वैविध्य आहे. ही गोष्ट त्यांनी आवर्जून सांगितली.

या पुस्तकात न आलेल्या, मात्र ज्यांचा अभ्यास झाला पाहिजे अशा काही गोष्टी त्यांनी नोंदवल्या. एक म्हणजे भारतीय इतिहासकारांनी आर्थिक इतिहासाकडे तुलनेने दुर्लक्ष केले आहे. आणि दुसरे, देशविदेशांतल्या चांगल्या महत्त्वाच्या साहित्याचे आदान-प्रदान होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. भारताने अगदी अलीकडच्या काळापर्यंत स्वतःहोऊन जगाला स्वतःकडचे कोणतेही ज्ञान देऊ केलेले नाही. परदेशी प्रवासी लोक इथे येऊन इथल्या वस्तू, इथल्या संकल्पना, इथले ज्ञान घेऊन गेले. भारतीयांनी परदेशप्रवास जाऊन काही ज्ञान आणलेही नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांच्या काळात जगामध्ये इतरत्र काय घडत होते? आयझॅक न्यूटनचा जन्म झाला. लाइबनित्स् हा जर्मन संशोधक, फॉर्मा हा फ्रेंच विचारवंत हे त्याच काळात युरोपात होऊन गेले. या काळात महाराष्ट्रात संतसाहित्य निर्माण झाले. पण त्या परदेशी विद्वानांचे विचार, काम सर्वदूर पोहोचवण्यासाठी जसे प्रयत्न त्यांच्या काळात किंवा भविष्यकाळात झाले तसे प्रयत्न भारतीयांनी कोणत्याच ज्ञानाच्या बाबतीत कधीच केले नाहीत. तसे यापुढे झाले पाहिजेत. जगात अनंत ज्ञान आहे, त्यातले आपल्याला रुचणारे मुद्दे निवडून त्याविषयी सखोल ज्ञान मिळवणे आणि ते जगाला सांगणे ही प्रत्येक शिकलेल्या माणसाची जबाबदारी आहे, असे मत त्यांनी मांडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासविभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी या पुस्तकनिर्मितीमागची प्रेरणा आग्रहीपाणे मांडली. द इंडियन्स हे पुस्तक एक ठाम संशोधकीय विधान करते. खरेतर ज्या विषयात आपण विशेष प्रशिक्षण घेतले आहे त्यावर संशोधनाची शिस्त पाळून लिहिणे यात काही विशेष नाही, पण इतिहास हा विषय माणसांनी आपापल्या अस्मितेसोबत जोडलेला असल्यामुळे, त्या विषयाबाबत आस्था असणाऱ्या पण प्रशिक्षण नसणाऱ्या कुणीही कुठून इतिहासाबाबत काहीही विधाने करावीत, प्रक्षोभक संदेश, चित्रे एकमेकांकडे ढकलावीत आणि त्यातली आपल्या अस्मितेला सुखावतील ती कथने खरी मानून चालावे, अशी सध्याची रीत आहे. ज्ञानाचे किरकोळीकरण केले गेले आहे. सखोल अभ्यासाला अनेकदा किंमत मिळत नाही. “स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते” असे संस्कृत वचन असले तरीही विद्वत्तेपेक्षा आपल्या मनातल्या प्रतिमेला सुसंगत असणारी माहितीच हा समाज खरी धरून चालतो. हातात आलेल्या पुराव्यांचा अस्सलपणा, विश्वासार्हता तपासून पाहून त्यानंतर लिहिला गेलेला इतिहास ही गोष्ट दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे संशोधनाच्या पद्धतिशास्त्राची पथ्ये पाळून लिहिलेल्या या पुस्तकात लेख लिहिण्याची संधी मिळाली याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

भारतीय उपखंडाचा होलोसीनपासूनचा इतिहास लिहिण्यासाठी केंद्रसरकारने 2017मध्ये एक समिती स्थापन केली. त्या समितीची रचना सदोष होती. शिवाय त्यांनी ही जबाबदारी गांभीर्याने घेतली नाही. आजपर्यंत एक ओळही प्रकाशित केलेली नाही. प्रा. देवींनी डोळसपणे ही जबाबदारी स्वीकारली. इतिहासाच्या अनिश्चित, बदलत्या स्वरूपाची जाण ठेवून लेखन-संपादन केले, आणि चार वर्षांत पुस्तक प्रकाशितही केले. समाजाच्या विविध घटकांपर्यंत हा इतिहास पोहोचावा यासाठी त्यांनी या पुस्तकाची पाच भाषांमध्ये भाषांतरेही हाती घेतली.

मराठी वाचकाला यातल्या अनेक गोष्टींचा विशेष आनंद वाटण्यासारखी परिस्थिती आहे. यातील अनेक लेखक मराठी आहेत. जगाच्या पाठीवरच्या नामवंत अभ्यासकांमध्ये ही मराठी नावे आदराने घेतली जात आहेत. इंग्रजीत लिहिली गेलेली उत्तमोत्तम पुस्तके मराठी वाचकांना मराठीत लवकर मिळत नाहीत, पण मनोविकास प्रकाशनाने तेही काम त्वरेने तडीस नेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकेकाळी मराठी लेखक-वाचकांच्या जगात अतिशय मोकळेपणाने अभ्यासविषयांवर वाद-प्रतिवाद-संवाद घडत असत. उदाहरणार्थ, ‘भारतीय समाज आणि संस्कृती’ या ग्रंथात प्रा.एम.ए.मेहेंदळे यांनी ‘नवभारत’मधल्या अनेक लेखकांना प्रतिसाद म्हणून दिलेली अभ्यासपूर्ण पत्रे संग्रहित केलेली आहेत. अशा सशक्त वाद-विवादाची परंपरा सध्या मात्र लुप्त झाल्यासारखी दिसते. लोक मुद्द्यांवर न बोलता गुद्द्यांनी बोलायला सरावत आहेत. या पुस्तकातल्याही सर्वच लेखकांची / संपादकांची मते एकमेकांशी तंतोतंत जुळणारी नाहीत; पण संशोधनाचे सौंदर्य यातच आहे की, मुक्त संवाद चालू ठेवून आपापले मुद्दे सर्व संशोधक मांडत राहू शकतात. द इंडियन्स या पुस्तकाच्या माध्यमातून अशा संवादाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. मराठी वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे, त्यात जे खटकेल त्यावर मुद्द्यांसहित टीका करावी, जे आवडेल किंवा नवे कळेल त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

वेदविद्या, संस्कृत साहित्य, बौद्ध परंपरा व साहित्य यांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी या पुस्तकातील वेद-संस्कृत-भाषा या संदर्भातील लेखन स्वतः केले आहेच, शिवाय तज्ञांना प्रकल्पात सहभागी करून घेणे, त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करणे ही जबाबदारीदेखील उचलली आहे. पुस्तकातील त्यांच्या लेखनविषयांची ओळख त्यांनी करून दिली. वैदिक साहित्याची रचना झाली तो काळ व स्थळ यांचे संदर्भ त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानच्या पर्वत प्रदेशशातून, सिंधु-सरस्वतीच्या मार्गे, गंगा, नर्मदा खोऱ्यांतील संस्कृती, भगवान बुद्धांनी एकीकडे वेदपरंपरेविषयी दाखवलेला आदर पण त्याचबरोबर व्यवस्थेवर चढवलेला हल्ला, त्यामुळे त्या काळाच्या संदर्भात वैदिक, बौद्ध, जैन आणि पारशी परंपरांचा समांतर अभ्यास करण्याचे महत्त्व सांगितले.

ज्याच्यामुळे वेदांची माहिती जगाला झाली, त्या मॅक्स म्युलरविषयी ते बोलले. मॅक्स म्युलर हा जर्मन मूळ असलेला पण इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात स्थायिक असलेला वेदांचा अभ्यासक. त्याने हस्तलिखितांवरून ऋग्वेदाची चिकित्सित आवृत्ती काढली, वैदिक संस्कृतीच्या अभ्यासाला वेगळी दिशा दिली. मात्र त्याने मौखिक परंपरेकडे दुर्लक्ष केले. पंडित सातवळेकरांनी मॅक्स म्युलरच्या आवृत्तीतल्या काही चुका मौखिक परंपरेच्या आधाराने दाखवून दिल्या, मात्र त्याच्या चिकित्सक दृष्टिकोनाचे कौतुकही केले. पारंपरिक व चिकित्सक अशा दोन्ही परस्परपूरक पद्धतींनी वैदिक काळाचा अभ्यास करण्याचे महत्त्व बहुलकरांनी सांगितले. मध्ययुगात संतांनी वेदाभ्यासक समाजातील उतरंडीच्या व्यवस्थेविषयी विद्रोहाची भूमिका घेतली, त्या भूमिकेच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

कुमार केतकर यांनी इंडियन या शब्दाची ओळख आणि व्याप्ती कशी बदलत गेली, याचा आढावा घेतला. पूर्वी अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, तिबेट, म्यानमार, इंडोनेशिया, श्रीलंका असा भूभाग म्हणजे भारत होता, पण काळानुसार आपली इंडियन म्हणून भौगोलिक-राजकीय ओळख अधिक संकुचित होत गेली. 1947 आणि 1971 नंतर तर ती खूपच बदलली. आत्ता भारतीय म्हणजे कोण? तोच अर्थ कायम राहणार का? खलिस्तान, दक्षिण भारत वगैरे आणखी तुकडे पडले तर आपली ओळख टिकेल का? आजच्या काळात अखंड भारताच्या घोषणा देणाऱ्यांना ही ओळख बदलता येणार आहे का? बारा ते पंधरा हजार वर्षे आपण नेमके कोणाचे गुलाम होतो? आपण गुलाम कधी आणि कसे झालो? अमेरिकेत इंडियन्स (भारतीय) आणि रेड इंडियन्स हे मूळनिवासी मागास लोक, यांच्या ओळखीत इंडियन्स या शब्दामुळे गोंधळ होत असे. कारण रेड इंडियन्सना स्थानिक लोक इंडियन्स असेच म्हणतात. मात्र भारतीयांना रेड इंडियन समजलं जाण्याने अपमान वाटे. किंवा परदेशात भारतीयांचे राज्यनिहाय गट आहेत. त्या गटांचे सांस्कृतिक कार्यक्रम स्वतंत्रपणे होतात. पण आपापसात फारसा संवाद होत नाही. तरीही ते सर्वजण इंडियन ही ओळख सांगतात. या सर्वांसाठी भारतीयत्व काय आहे? असे मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

राष्ट्राची ओळख काय, हा प्रश्न भारतापुरता मर्यादित नाही. फक्त दोन कोटी लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेतही उत्तरेत तामिळ व दक्षिणेत सिंहली लोकांनी स्वतंत्र राष्ट्र मागितलेले आहे. सोविएत युनियन फुटून राष्ट्रे वेगळी झाली, कारण त्यांना त्यांच्या स्वतंत्र धार्मिक, राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक अस्मिता अधिक महत्त्वाच्या वाटल्या. युगोस्लावियासारख्या निव्वळ तीन कोटी लोकसंख्येच्या राष्ट्रातून सात स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. त्या राष्ट्रांमध्ये पराकोटीचे संघर्ष आहेत. छळछावण्या, युद्धे, सीमेवरच्या चकमकी, बॉम्बहल्ले हे सारे सुरूच आहे. आजच्या रशिया–युक्रेन युद्धाचे बीज वस्तुतः युक्रेनने रशियाला दिलेले आश्वासन मोडून नाटोशी हातमिळवणी केली तेव्हाच पेरले गेले. अशा अनेक संदर्भातून राष्ट्राची ओळख ही संकल्पना त्यांनी मांडली.

2026मध्ये भारतात डिलिमिटेशन होणार आहे. म्हणजे लोकसभेतील खासदारसंख्या वाढवली जाईल. उत्तरभारताची लोकसंख्या दक्षिणभारताच्या दुप्पट आहे. त्यामुळे केवळ लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढवल्या तर दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व व निर्णयप्रक्रियेतला सहभाग कमी होईल, अशी भीती दक्षिणी लोकांना वाटते आहे. प्रांत, भाषा, जात, धर्म या निकषांवरही वेगवेगळ्या गटांच्या अस्मिता खूप टोकदार होत आहेत. त्यामुळे होत असलेल्या वाढत्या संघर्षाविषयी, ध्रुवीकरणाविषयी चिंता त्यांनी व्यक्त केली.

संपादक प्रा. गणेश देवी यांनी यापूर्वी तब्बल तीन हजार सहकाऱ्यांसाह ‘पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे’च्या माध्यमातून भारतातल्या 780 भाषांचे संकलन केले. आता त्यांनी शंभर तज्ञांसह द इंडियन्स हा संदर्भग्रंथ पूर्ण केला आहे. या प्रकल्पाची आवश्यकता व प्रक्रिया त्यांनी सविस्तर सांगितली.

2017मध्ये केंद्रसरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने होलोसीनपासूनच्या इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या कामाचे नियोजन करण्यासाठी 14 सदस्यांची समिती नियुक्त केली. या समितीची रचना विशिष्ट सांप्रदायिक हेतूने झाल्याचे स्पष्ट होते. कारण या समितीत केवळ उत्तर भारतीय हिंदू पुरुषांचा समावेश होता. मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, इत्यादी कोणत्याही धर्माच्या उपासकांना त्या समितीत स्थान नव्हते. नर्मदेच्या दक्षिणेकडील एकही व्यक्ती नव्हती, ईशान्य भारताचे प्रतिनिधित्व नव्हते, एकही स्त्री नव्हती. 2019मध्ये कामाला वेग यावा म्हणून समितीत चार सदस्य वाढवले गेले, तेव्हाही समितीच्या रचनेत संख्येव्यतिरिक्त काहीही बदलले नाही. त्या समितीने आजतागायत एक ओळही प्रकाशित केलेली नाही.

ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्यावर भारतातील भौगोलिक, भाषिक, धार्मिक व सामाजिक विविधतेचे (डायव्हर्सिटीचे) भान राखून, सर्वसमावेशक दृष्टिकोनातून हा दीर्घकालीन इतिहास लिहिण्याचे काम आपणच केले पाहिजे असे त्यांना वाटले. भाषा, साहित्य, इतिहास, जनुकीय विज्ञान, पुरातत्त्वशस्त्र, मानववंशशस्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, भूगर्भशास्त्र, भारतविद्या, वेदाभ्यास, अशा विविध विषयांच्या 150 ख्यातनाम तज्ञांना त्यांनी पत्रे लिहिली. त्यातल्या 120 जणांनी लेख पाठवायचे मान्य केले, आणि अंततः 105 अभ्यासपूर्ण लेख यात समाविष्ट झाले.

ज्या एकेका विषयावर अनेक पुस्तके, हजारो-लाखो पाने प्रकाशित झालेली आहेत, त्यांचा आवाका सातशे ते आठशे शब्दांत नेमकेपणाने कोणताही महत्त्वाचा दुवा निसटू न देता आणणे, हे काम या सर्व लेखकांनी उत्तम केले. मराठी आवृत्तीत मूळ पुस्तकात नसलेला कुमार केतकर यांचा लेख समाविष्ट करण्यात आला.

जगभर इतिहासाचा विपर्यास करून, लोकांना भ्रमित करून सत्ता काबीज करणे ही गोष्ट अनेक देशांत, अनेक काळांत घडलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर वास्तववादी पुनर्लेखन सर्वांनाच महत्त्वाचे वाटले. कारण इतिहास हा चंद्रप्रकाशातल्या जगासारखा असतो. अस्पष्ट दिसतो. 90% दृष्टीआड असतो. आपल्याला त्यातले जे दहा टक्के दिसते, त्याचा इतिहासकार आपापल्या काळात आपापल्या परीने अर्थ लावत असतात, त्यावर विचार, पुनर्विचार करत असतात. हा पुनर्विचार होत राहिला पाहिजे. याच हेतूने टोनी जोसेफ व रवी कोरीसेट्टर यांच्यासोबत धारवाडला या पुस्तकाची आखणी व संपादन झाले. 23 जुलै 2023 रोजी हे पुस्तक प्रकाशित झाले. ते देशाविदेशांतल्या सर्व वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. अनेक देशी-परदेशी विद्यापीठांत त्यावर चर्चासत्रे, व्याख्याने झाली. आणि साधरणा एक वर्षाने मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला.

दीर्घकालीन इतिहासलेखनाचे अनेक प्रकल्प यापूर्वी देश-विदेशांत झालेले आहेत. परंतु ते मुख्यतः विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी पडावेत, या हेतूने लिहिले गेले. शास्त्रीय परिभाषा, विपुल संदर्भ, शेकडो तळटीपा अशा स्वरूपाची त्यांची मांडणी होती. या पुस्तकातून मात्र सामान्य वाचकाला रुची वाटेल, कुतूहल निर्माण होईल आणि अभ्यासकांनाही संदर्भासाठी उपयोग होईल अशा पद्धतीने विषय मांडला आहे. गुजराती माणसाला इतिहासाच्या वाचनाने राग येत आलेला आहे तो ह्या पुस्तकाच्या आगामी गुजराती भाषांतराच्या वाचनाने शांत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. द इंडियन्समध्ये लेखन केलेले अनेक लेखक पुण्यातले आहेत, त्यामुळे पुण्यात मराठी आवृत्ती प्रकाशित होण्याचे औचित्य दाखवून त्यांनी मनोविकास प्रकाशनचे आभार मानले. जगातील सर्व संस्कृतींचा इतिहास आणि परस्परसंबंध यासंदर्भातील इतिहासाचे पुनर्लेखन करण्याच्या आगामी प्रकल्पाचे सूतोवाच करून त्यातही तज्ञांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करून त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

इतिहासाची व्याख्या दोन प्रकारे करतात – एक, भूतकाळ – ‘जसा होता तसा’, आणि दुसरी, भूतकाळ - आपल्याला जसे वाटते की, ‘असा होता’ तसा. पण आज जगात सर्वत्र इतिहास म्हणजे भूतकाळ – ‘जसा आम्हाला असायला पाहिजे होता तसा’ किंवा ‘जसा आम्ही म्हणू तसा’ असे बिनदिक्कत समजले जाते. राजकीय स्वार्थासाठी इतिहासाचे सोयीस्कर विपर्यास करून समाजमाध्यमांवर वेगाने फिरवता येतात. लोक त्याला बळी पडतात. जगभर प्रचंड द्वेषाचे, संघर्षाचे व सततच्या तणावाचे वातावरण पसरत आहे. अशा स्थितीत द इंडियन्स सारख्या धाडसी व वास्तववादी पुस्तकाकडे वाचकांनी अवश्य वळावे व भारतीय समाज आणि संस्कृतीचे, संवादाचे मर्म सप्रमाण समजून घ्यावे.

द इंडियन्स (अनेक सहस्रकांचा आपला समग्र इतिहास)
संपादन – गणेश देवी, टोनी जोसेफ, रवी कोरीसेट्टर
अनुवाद – शेखर  साठे, प्रमोद मुजुमदार, नितिन जरंडीकर, ज्ञानदा आसोलकर
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या – 776
मूल्य – रु. 899


- ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com 


या संपूर्ण कार्यक्रमाचा दोन तासांचा व्हिडिओ येथे पाहता येईल.

 

Tags: kumar ketkar ganesh devy the indians history book publication event shrikant bahulkar shraddha kumbhojkar patkar manovikas prakashan Load More Tags

Add Comment