लापता लेडीज निघाल्या ब्लॅक लेडीकडे!

भारताकडून ऑस्करसाठी किरण राव यांचा 'लापता लेडीज' पाठवला जाणार

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने यावर्षी आमिर खान, ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओनिर्मित आणि किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्करसाठी पाठविण्याची घोषणा केली आहे. नव्या युगातील स्त्रीच्या आशा-आकांक्षा मांडणारा, परिस्थितीच्या कोंडमाऱ्यातून सुटका करून घेण्याचे मार्ग स्वतःच शोधू पाहणाऱ्या स्त्रीचे चित्र रंगवणारा, आणि त्यासाठी कर्कशपणाऐवजी विनोदाचा आधार घेणारा हा नितांतसुंदर चित्रपट ऑस्करला पाठवला जावा ही उत्तम बातमी आहे.

हा चित्रपट गेल्या वर्षी टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. भारतात 1 मार्च 2024ला प्रदर्शित झाला. त्यानंतर 8 आठवड्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला. नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेल्या चित्रपटांत त्याचे नाव आहे.

चित्रपटाची कथा 2001 सालची म्हणजेच 23 वर्षांपूर्वीची आहे. किरण राव यांनी संभाव्य वादविवाद आणि आरोप टाळण्यासाठी 'निर्मल प्रदेश' नावाच्या एका काल्पनिक राज्याची कथा निवडली आहे. असे असले तरी पडद्यावर साकारण्यात आलेला काल्पनिक प्रदेश हा हिंदी भाषिक प्रदेशच (बिहार, पूर्व उत्तर प्रेदश) आहे हे लगेच कळून येते. (राजकीय भाषेत या राज्यांना 'मागासलेली राज्ये' असंही संबोधलं जातं.) किरण राव यांनी या निर्मल प्रदेशातील सामाजिक संरचना पडद्यावर दाखवत समाजात पूर्वीपासून चालत आलेली पुरुषप्रधान मानसिकता उघड केली आहे.

तर 2001 मध्ये, या काल्पनिक निर्मल प्रदेशात, दीपक नावाचा शेतकरी (स्पर्श श्रीवास्तव) आणि त्याची नववधू फूलकुमारी (नितांशी गोयल) हे लग्न करून दीपकच्या गावी परत जात असतात. ते अनेक नवविवाहित जोडप्यांसोबत एका गर्दीने भरलेल्या प्रवासी ट्रेनमध्ये बसतात. सर्व नववधू ‘दुल्हन का लाल जोडा आणि घूंघट’ अशा वेशात असतात. दीपकला डुलकी लागते आणि रात्री जाग आल्यावर त्याला समजते की त्याचे स्टेशन आले आहे. उतरण्याच्या घाईत, अंधारात आणि गोंधळात तो चुकीच्या नवरीसोबत (प्रतिभा रांता) खाली उतरतो, आणि त्याची बायको फूल दुसऱ्या एका नवऱ्यामुलासोबत म्हणजे प्रदीपसोबत (भास्कर झा) ट्रेनमध्येच राहते.

दीपकच्या कुटुंबात जोडप्याचे स्वागत केले जाते, पण त्यांना समजते की ही नवरी चुकीची आहे, तेव्हा त्यांना धक्का बसतो. ती त्यांना आपले नाव पुष्पा सांगते. दरम्यान, एका वेगळ्या स्टेशनवर, फूलला झालेल्या गोंधळाची जाणीव होते पण दीपकच्या गावाचे नाव माहित नसल्यामुळे स्टेशनमास्तर तिला मदत करू शकत नाही. ती तिच्या कुटुंबाची नाचक्की होऊ नये म्हणून माहेरी न जाता दीपक आपल्याला शोधत येईल या आशेने स्टेशनवरच थांबायचे ठरवते आणि प्लॅटफॉर्मवर चहाचा स्टॉल चालवणारी मंजू माई तिला मदत करते. 

इकडे दीपक बायको हरवल्याची तक्रार पोलिसात नोंदवतो. पोलिसांना संशय येतो की त्याच्या घरी आलेली पुष्पा चोर असू शकते. पोलिस इन्स्पेक्टर तिचा पाठलाग करतो आणि तिला दागिने विकताना, मोबाइल फोन वापरताना आणि बसचे तिकीट घेताना पाहतो. दरम्यान, पुष्पा दीपकच्या कुटुंबाशी मैत्री करते. त्याच वेळी, फूल चहाच्या दुकानात काम करू लागते, मंजू माईला मदत करते, कलाकंद बनवते आणि स्वावलंबी होण्याचे धडे शिकते.

पोलिस इन्स्पेक्टरला वाटते की पुष्पा चोरांच्या टोळीशी संबंधित आहे, म्हणून तो तिला अटक करतो. पण त्यानंतर त्याला कळते की तिचे खरे नाव जया आहे. जया सांगते की तिला देहरादूनमध्ये सेंद्रिय शेतीविषयी उच्च शिक्षण घ्यायचे होते पण तिच्या कुटुंबाने तिला जबरदस्तीने प्रदीपशी लग्न करायला लावले. मात्र प्रदीप तिच्याशी चांगला वागत नाही. त्यामुळे ती परत जाऊ इच्छित नाही. प्रदीप जयाला नेण्यासाठी पोलिस ठाण्यात येतो. तो पोलिसांसमोर तिला मारतो आणि तिच्या आईकडून संपूर्ण हुंडा वसूल करण्याची धमकी देतो. पोलिस त्याला सज्जड दम भरतात, जयाला मोकळे करतात. 

जया दीपकच्या वहिनीला पूनमला फूलचे चित्र काढायला सांगते, आणि ते पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावते. अखेरीस त्या पोस्टरमुळे फूल दीपकला पुन्हा भेटते, आणि जया डेहराडूनला जाते.

आपण फूल आणि पुष्पाचे आयुष्य आमूलाग्र  बदलताना पाहतो. त्यांच्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या जगात होणारे बदल पाहतो. त्यांच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण होताना पाहतो. आणि पाहता पाहता या दोघींचा प्रवास केव्हा आपला प्रवास होऊन जातो ते कळतही नाही. चित्रपटाच्या लेखक आणि दिग्दर्शकांनी अत्यंत सहजतेने समाजातील लैंगिक भेदभाव आणि रूढी परंपरांवर भाष्य केले आहे. हिंदी भाषिक प्रदेशातील गवई समाजाशी जुळलेली पात्रं आणि सामाजिक प्रथांमधील विसंगती विनोदातून रंगवताना तो विनोद दर्जेदार राहील, हिणकस वाटणार नाही याकडे आवर्जून लक्ष दिलं आहे. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी किंवा आक्रमक ‘ism’चा आधार न घेता चित्रपटाची कथा संयतपणे आणि रंजकपणे मांडण्यात आली आहे. स्त्री लेखक / दिग्दर्शक / अभिनेत्री चांगले विनोदी काम करू शकत नाहीत हा समज सहजपणे खोडून काढण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. हा चित्रपट समाजात उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या महिलांचं जीवन दाखवतोच, पण त्याचबरोबर विकसित भारताच्या वल्गना करणाऱ्या सत्तारूढ राजकीय पक्षांचेही वास्तव उघड करतो. या पार्श्वभूमीवर गोरखपूरचे भाजपचे लोकसभा खासदार रवीकिशन यांनीदेखील या चित्रपटात महत्त्वाचं पात्र साकारलं आहे, याही गोष्टीचे महत्त्व वेगळे आहे.
चित्रपटातील दृश्यांतून आणि संभाषणांमधून वर्तमान सामाजिक स्थितीतील विसंगती दर्शविण्यात आली आहे. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर एखाद्या मुख्य प्रवाहटल्या हिंदी चित्रपटात गाव-खेड्यातील सामान्य जीवनाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. शेतं, आणि गावकुसातील दैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आपल्याला दिसतात. तसेच खेड्यांत भेडसावणारे प्रश्न, अडचणीही अधोरेखित करण्यात आल्या आहेत. एक शहरी प्रेक्षक म्हणून चित्रपट बघताना, उत्तर भारतीय ग्रामीण भाग विकासाच्या वाटेवर किती मागे राहून गेला आहे, वैचारिक स्वातंत्र्य आणि आधुनिकतेचा गंधही जेथे पोहचलेला नाही त्या समाजातील बहुतांश बदल किती संथपणे होत आहेत याची जाणीव आपल्याला होते.

फूल आणि पुष्पाची परिस्थिती वेगळी असली तरी सारखीच आहे. दोघींचंही वर्तमान अनिश्चिततेच्या गर्तेत आहे. फूल तिच्या साधेभोळेपणामुळे आणि पुष्पाकडे कमालीची बुद्धीमत्ता असूनही परिस्थितीच्या दबावामुळे या दोघी पुरुषप्रधान समाजाच्या चाकोरीत खितपत पडल्या आहेत. दोघींच्या नवऱ्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. दीपक हा प्रगत विचारांचा तरुण आहे, तर प्रदीप हा रूढीवादी आणि पुरुषी मानसिकतेचा आहे. फूल, पुष्पा, दीपक आणि प्रदीप या चौघांच्या त्रांगड्यातून महिलांचा स्वाभिमान, अस्मिता, ओळख आणि प्रतिष्ठा याबाबत महत्त्वाचे प्रश्न किरण राव यांनी अत्यंत थेटपणे मांडले आहेत. एका मुलाखतीत किरण राव यांनी म्हटले आहे, "चित्रपट नेहमीच एकमेकांना जोडण्याचे, सीमा ओलांडण्याचे आणि अर्थपूर्ण विषयांवर विचारविमर्शाची सुरूवात करण्याचे माध्यम राहिले आहे.” लापता लेडीज हा त्यांचा सिनेमा या तीन्ही गोष्टी सहज सिद्ध करतो.

बिप्लव गोस्वामी यांच्या, स्नेहा देसाई आणि दिव्यनिधी शर्मा यांच्या लेखणीत एक आधुनिकता आहे, जी जुन्याच गोष्टीकडे नव्या नजरेने पाहू शकते. चारही मध्यवर्ती व्यक्तिरेखा रंगावणारे कलाकार नवे आहेत, आणि हे चित्रपटाचे मोठे सामर्थ्य ठरले आहे. कारण कलाकारांच्या अभिव्यक्तीत, देहबोलीत एक नाविन्य आहे, ताजेपणा आहे. चौघांनीही समरसून कामे केली आहेत. लापता लेडीजमध्ये रवीकिशन वगळता एकही प्रसिद्ध कलाकार नाही. रवीकिशनसुद्धा आपल्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा वेगळ्या साध्या पद्धतीने व्यक्त झाले आहेत. फूलला आयुष्यकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास देणारी, स्वातंत्र्याची जाणीव करून देणारी, “औरतों को मर्दों की कौनो खास जरूरत है नहीं, इ बात औरतों को पता चल गयी तो मरद बेचारा का बाजा ना बज जायेगा!!!” असे म्हणणारी, स्त्रीवाद उघडपणे मिरवत पण अवडंबर ना माजवता जगणारी मंजू माई हे देखील एक अप्रतिम पात्र आहे. आणि छाया कदम यांचा सहजसुंदर अभिनय त्याला उत्तम न्याय देतो. पुष्पा आणि पूनम यांची मैत्री, ‘कधीतरी आपल्या मनासारखं काहीतरी करून पाहण्याची’ ऊर्मी पूनमला देणारी पुष्पा, स्वभावतः चांगलाच असणारा दीपक, घरातला छोटा बबलू ही पात्रे लक्षात राहतात. एकेका वाक्यात सपकारे हाणणारे, टोमणेवजा चुरचुरीत संवाद हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एकूणच भाषा, संवाद आणि वातावरणात कमालीची सहजता जाणवते. सिनेमॅटोग्राफर विकाश नौलखा आणि संगीतकार राम संपत यांनीही चित्रपटाची परिणामकारकता वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे.
हा चित्रपट दर्जेदार आहेच पण ऑस्करची वारी करणे सोपे असणार नाही. भारतातच काही वाद आहेत. ज्येष्ठ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी असा आरोप केला होता की त्यांच्या 1999च्या "घूंघट के पट खोल" या चित्रपटाची नक्कल लापता लेडीज करतो, मात्र त्याचे श्रेय दिले गेलेले नाही. Cannes फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला 'ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट’ हा चित्रपट किंवा अनुराग कश्यप - विजय सेतुपती यांचा 'महाराजा' हा चित्रपट ऑस्करसाठी अधिक पात्र ठरला असता असे अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे. अशा वादांना तोंड देऊन पुढे गेल्यावर जगभरातील चित्रपटांचे परीक्षण करण्यासाठी ऑस्करची जी समिती असते त्यांचे लक्ष वेधण्यासाठी चित्रपटनिर्मात्यांना मेहनत घ्यावी लागेल. भरपूर पैसा खर्च होईल. निवड झालेल्या चित्रपटाच्या पाठीशी धनदांडगा निर्माता नसेल तर अशा वेळी प्रचार आणि इतर महत्वाच्या खर्चासाठी निधी उभारण्यासाठी वेगळे कष्ट पडतात. यासाठी प्रचंड प्रतिभा आणि उर्जा खर्ची होते. 

यामध्येच भारतासह अनेक देशांतील चित्रपट मागे राहतात. मुंबईची हिंदी चित्रपटसृष्टी आणि अन्य प्रादेशिक भाषांच्या सिनेसृष्टीतील अनेक चित्रपट निर्माते ऑस्कर अभियानाची भारतीय चित्रपटांना गरज नसल्याचा दावा करतात. काही तर 'भारतीय चित्रपटांच्या श्रेष्ठत्वासाठी ऑस्करच्या शिक्क्याची गरजच काय?' असा सवालही करतात. पण कला, संस्कृती आणि सिनेमाच्या सार्वत्रिकीकरणाच्या या काळात आपले चित्रपट कशा पद्धतीने बनतात आणि आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांना किती मान मिळतो हे पडताळून पाहण्याचा हा उत्तम मार्ग आहे, आणि म्हणूनच Cannes सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आणि ऑस्करसारख्या पुरस्कारांचे महत्त्व नाकारता येत नाही.

लापता लेडीज चित्रपटाचा निर्माता आमिर खान आहे. यापूर्वी त्याच्या प्रॉडक्शनखाली तयार झालेले लगान आणि तारे जमीं पर हे चित्रपट ऑस्करसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आमिरच्या पूर्वानुभवांचा फायदा लापता लेडीजला ऑस्कर एन्ट्रीपर्यंत पाठविण्यास नक्कीच होईल, अशी आशा आहे.

भारताकडून ऑस्करला पाठवण्यासाठी वेगवेगळ्या भाषांतील 29 चित्रपटांचा विचार केला गेला. ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट’बरोबरच 'कल्कि 2898 एडी', 'अ‍ॅनिमल', 'चंदू चॅम्पियन', 'सॅम बहादूर', 'केट्ट्रकल्ली', 'आर्टिकल 370', 'महाराजा', ‘छोटा भीम अँड द कर्स ऑफ दामियान’ इत्यादी चित्रपटसुद्धा विचारात घेण्यात आले होते. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 13 सदस्यीय समितीने विचारविमर्श करून 'लापता लेडीज' पाठविण्याची शिफारस केली.

दरवर्षी भारतीय फिल्म इंडस्ट्रीत सप्टेंबर ते फेब्रुवारीदरम्यान ऑस्कर अभियान राबविले जाते आणि बहुभाषिक भारतीय फिल्म इंडस्ट्रीत दर वर्षी चित्रपट निवडण्यावरून वाद होतो. हिंदी चित्रपटांचा मोठ्या प्रमाणात विचार होतो, मुंबईतील चित्रसृष्टीतील लोकांचेच निवड समितीत प्राधान्य असते, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून या प्रक्रियेसाठी वेळेवर माहिती दिली जात नाही, अवास्तव शुल्क आकारले जाते अशा अनेक तक्रारी असतात. काही निर्माते पैशाअभावी आपले चांगले चित्रपट विचारात घेण्यासाठी पाठवू शकत नाहीत, तर काही आर्थिकदृष्ट्या समर्थ असलेले निर्माते आपल्या सुमार चित्रपटांचीसुद्धा एन्ट्री करतात. राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित चित्रपटच ऑस्कर एन्ट्रीसाठी पाठविण्यात यावा, अशीही सूचना समोर आली होती, मात्र ऑस्करसाठी वेगळी प्रक्रिया केलीच जाते. 1957 पासून दरवर्षी एक भारतीय चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जातो. मात्र आतापर्यंत मदर इंडिया (1957), सलाम बॉम्बे (1988) आणि लगान (2001) हे तीनच चित्रपट नामांकनापर्यंत पोहोचू शकले आहेत.

आजची भारतीय स्त्रीची परिस्थिती बघता, लापता लेडीज या स्त्रीवादी आशय मनोरंजक पद्धतीने मांडणाऱ्या, निर्मिती-लेखन-दिग्दर्शन-अभिनय-तांत्रिक बाजू सांभाळणे या सर्व पातळ्यांवर स्त्रियांचे उत्तम काम असलेल्या चित्रपटाची ऑस्करला पाठवण्यासाठी निवड होणे, हे चांगलेच लक्षण आहे. ऑस्कर प्रवासासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छाच दिल्या पाहिजेत.


दिग्दर्शन: किरण राव
मूळ कथा: बिप्लब गोस्वामी
पटकथा आणि संवाद: स्नेहा देसाई, दिव्यनिधी शर्मा
निर्माता: आमिर खान, किरण राव, ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओज
मुख्य कलाकार:नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रांटा. अभय दुबे, छाया कदम, रवी किशन
छायाचित्रण: विकाश नवलखा
संगीत: राम संपत
कालावधी: 124 मिनिटे
भाषा: हिंदी
कोठे पाहता येईल - Netflix


- ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com 

Tags: film review oscars lapata ladies kiran rao amir khan ravi kishan chhaya kadam Load More Tags

Add Comment