ढोर-चांभार महिलांना आत्मभान देणारे पुस्तक

आंबेडकरी चळवळीतील महिलांच्या इतिहासलेखनातील एक महत्त्वाचे पान

बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला; त्यांच्या पाठोपाठ महार समाजाने सामूहिक पातळीवर बौद्ध धर्म स्वीकारला, इतर अस्पृश्य जातींनी मात्र सामूहिकपणे धम्म स्वीकारला नाही, व्यक्तिशः काही लोकांनीच तो स्वीकारला. समाज म्हणून चांभार, मातंग, ढोर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला असता तर कदाचित आजच्या समाजाचे चित्र वेगळे झाले असते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, अस्पृश्य मानला गेलेला समाजातला मोठा वर्ग, स्वतःच्या मूलभूत हक्कांसाठी बंड करून उभा राहिला. या चळवळीत स्त्रियांनीही कर्तृत्व गाजवले. विविध अस्पृश्य जातींतील स्त्रियांनी धर्म आणि जातीपलीकडचा विचार करून काम केले. त्यापैकी ढोर आणि चांभार समाजातील स्त्रियांच्या सामाजिक जाणिवा आणि त्यांचे समाजकार्य ‘ढोर-चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ’ ह्या पुस्तकातून डॉ. सुनीता सावरकर यांनी पुढे आणले आहे.

“गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो गुलामीविरुद्ध बंड करून उठेल” हा बाबासाहेबांचा विचार या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. ‘ढोर-चांभार समाजाच्या कर्तृत्वाची आणि स्वाभिमानी इतिहासाची जाणीव त्यांना नेमकेपणाने करून देण्याची गरज आहे, जेणेकरून ते परिवर्तनाच्या चळवळीत अधिक जोमाने कर्तृत्व सिद्ध करतील’ या विचाराने हे पुस्तक लिहिल्याचे लेखिकेने स्वतःच मनोगतात म्हटले आहे. ढोर-चांभार समाजातील स्त्रियांनी जुन्या प्रथा-परंपरा नाकारून स्वातंत्र्य-समता-बंधुता या तत्त्वांवर आधारित परिवर्तनवादी विचार आत्मसात केले आणि समाजातही त्या विचारांचे योगदान दिले, त्याचा धांडोळा या पुस्तकात घेतलेला आहे.

आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या कर्तृत्वाविषयी ‘आम्हीही इतिहास घडवला’ हे पुस्तक लिहिणाऱ्या ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार यांची दीर्घ प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. सुनीताताईंनी संदर्भ आणि मूलस्रोत शोधण्यासाठी घेतलेले कष्ट आणि वेगवेगळ्या अंगांनी या इतिहासाची केलेली मांडणी याची त्यांनी प्रशंसा केली आहे, आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांविषयीच्या इतिहासलेखनात या पुस्तकाच्या रूपाने महत्त्वाची भर पडली आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

‘अस्पृश्य स्त्रियांच्या इतिहासाचा मागोवा’ हे पहिले प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकरणात लेखिकेने आंबेडकरपूर्व काळातील अस्पृश्य स्त्रियांच्या सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक स्थितीचा विचार केला आहे. त्यासाठी सत्यशोधक चळवळ, निराश्रित सेवा सदन, बहिष्कृत चळवळ आणि उच्चवर्णीय समाजसुधारक या चार प्रवाहांचा संदर्भ घेतला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यातील दिवंगत चांभार कामगाराच्या पत्नीला पेन्शन देणे, महाराजांच्या छत्रछायेत मोठे झालेले चांभार समाजाचे पुढारी दत्तोबा पवार, बहिष्कृत चळवळीचे शिलेदार व नंतरच्या काळातील बाबासाहेबांचे सहकारी शिवराम जानबा कांबळे, त्यांचे परिवर्तन चळवळीला वाहिलेले ‘सोमवंशी मित्र’ हे मासिक, त्यात मुरळी म्हणून देवाला सोडलेल्या स्त्रियांना समाजात स्थान मिळावे यासाठी एका मुरळीने लिहिलेले अनावृत्त पत्र, सोयराबाई, सखूबाई यांच्यासारख्या संतपदी असलेल्या स्त्रिया, त्यांच्या रचना, सत्यशोधक चळवळीत सावित्रीबाई फुले आणि ज्ञानप्रकाशात मातंग समाजाचे दुःख मांडणारी 14 वर्षांची मुलगी मुक्ता साळवे, महार समाजातील कीर्तनकार बायजाबाई यांची संक्षिप्त माहिती दिली आहे.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी जनाक्का शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनाची जबाबदारी सांभाळली, त्यात त्यांनी अनेक अस्पृश्य मुलींना शिक्षण दिले. या संस्थेच्या कार्यक्रमात महार, मांग व चांभार जातीच्या तीन बायकांनी मिळून सयाजीराव गायकवाड महाराजांना ओवाळले व महाराजांनी प्रत्येकीला ओवाळणी म्हणून एकेक सोन्याची गिनी घातली असा उल्लेख आहे. हा पहिला असा कार्यक्रम होता, ज्यात वेगवेगळ्या अस्पृश्य जातींतील स्त्रिया एकत्र कृती करताना दिसतात.

डिप्रेस्ड क्लासेस मिशनतर्फे जनजागृती कार्यक्रमांत अस्पृश्य स्त्रियांचा समुदाय जातीच्या बाहेर एकत्र येत असे. मिशन तर्फे 1912 मध्ये महाराष्ट्र परिषद घेण्यात आली. या परिषदेत अनेक अस्पृश्य महिलांनी सहभाग घेतला. आंबेडकरांच्या काळात दलितांची चळवळ फोफावली, परंतु त्यापूर्वीच विद्रोहाची आणि जागृतीची बीजे पेरणाऱ्या या महिलांच्या कार्याचा मागोवा घेणे पुस्तकाच्या दृष्टीने निश्चितच औचित्यपूर्ण झाले आहे.

पुस्तकाच्या केंद्रस्थानी ढोर आणि चांभार समाजातील चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या, काळासोबत स्वतःला बदलणाऱ्या आणि स्वतःसोबत इतर महिलांना बदलण्याची प्रेरणा देणाऱ्या अशा स्त्रिया आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी, जातिव्यवस्थेशी आणि कुटुंबातील पुरुषी वर्चस्वाशी झुंजत त्यांनी शिक्षण घेतले. कुणी विवाह न करता सामाजिक काम केले, कुणी विवाहानंतर केवळ कौटुंबिक जबाबदारी न सांभाळता सामाजिक कामही केले, कुणी नवऱ्याच्या सोबतीने आंदोलनात सहभागी झाल्या, कुणी नवऱ्याच्या अत्याचाराविरोधात जाहीरपणे आणि धाडसाने घटस्फोटाचा पर्याय निवडला; कुणी शिक्षिका झाल्या, कुणी लेखन केले, आपल्या समाजातील मुलींच्या शिक्षणासाठी काम केले, अस्पृश्य जातींतील अंतर्गत भेद विसरून महिलांनी संघटित होण्यासाठी विशेष उपक्रम राबवले, समाजोपयोगी कामांत सहभागी झाल्या. अशा सत्त्वशील, सामर्थ्यवान स्त्रियांची आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या सामान्य स्त्रियांची प्रेरक लघुचरित्रेच लेखिकेने मांडली आहेत.

या महिलांनी आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेतली आणि स्वतः पुढाकार घेऊन लहानमोठी धाडसी पावले उचलली. वेणुताई शिवतरकर यांनी स्वतःच्या हाताने बनवलेले जेवण समता संघामार्फत इतर जातींच्या लोकांना सहभोजन कार्यक्रमात दिले म्हणून त्यांच्यावर बहिष्कार घातला गेला. त्यांनी मोठ्या धैर्याने जातपंचयातीचा सामना केला आणि स्वतःची बाजू लावून धरली. रमाबाई आंबेडकर धारवाडला गेलेल्या असताना बाबासाहेबांचे सहकारी बळवंतराव वराळे यांच्या पत्नी राधाबाई यांनी सर्व स्थानिक अस्पृश्य जाती-पोटजातींच्या महिलां रमाबाईंसोबत एकत्र चहापान आयोजित केले. रुक्मिणीताई राजभोज यांनी ‘बौद्ध धर्म हा मानवी जीवनाची संजीवनी आहे’ हा प्रेरक लेख लिहिला, आपल्या विचारांनी इतर महिलांना दृष्टी दिली.

गुणाबाई गाडेकर यांच्या ‘स्मृतिगंध’ हे आत्मकथनपर पुस्तकाचा संदर्भ घेऊन गुणाबाईंचे वडिलांच्या विरोधात जाऊन निराश्रित सेवासदनात शिकणे, शिक्षिका-मुख्याध्यापिका होणे, चांभार समाजातील मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करणे, लेखन करणे, त्यांच्यासोबत शिकलेली त्यांची मैत्रीण सावित्रीबाई बोराडे यांचे आंबेडकरी चळवळीतील कार्य याविषयी विवेचन केले आहे.

आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त 1933 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘जनता’ विशेषांकाचे संपादन सावित्रीबाई बोराडे आणि अंबूबाई गायकवाड यांनी केले होते. 1893 मध्ये सखू कोय विठ्ठल विणेरकर या अस्पृश्य महिलेने सोडून गेलेल्या नवऱ्याला घटस्फोटाची नोटीस दिली, तसे करणारी ती य समजातली पहिली महिला ठरली. ठमा चिमणा ढोर, भागू मर्द गंगाराम चांभार, गंगूबाई भ्रतार रूपचंद मोची यासारख्या कौटुंबिक अन्यायाविरोधात उभ्या राहून स्वतःच नवऱ्याला घटस्फोट देणाऱ्या महिलांच्या संघर्षांच्या कथा संगीतल्या आहेत. याचबरोबर अनुसया शिवतरकर, शांता राजभोज, कमल पारखे, बेबीताई मुकणे, काशीबाई जाधव या ढोर समाजातील कार्यकर्त्या या सर्वांच्या विचार, प्रबोधनपर लेखन आणि कार्य यांची दखल पुस्तकात घेतलेली आहे.

भागीरथी केशवराव चांदुरकर या वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या पदवीधर, राधाबाई नरहर कदम, गंगूबाई चांदोरकर, मुक्ताबाई खंडोजी नागोटकर यांच्यासारख्या स्वतः शिक्षण घेऊन शिक्षक झालेल्या आणि समाजासाठी उन्नतीचे कार्य करणाऱ्या स्त्रियांचा उल्लेख पुस्तकात सन्मानाने केलेला आहे.

अशी अनेक उदाहरणे पुस्तकात सापडतात. एकेका स्त्रीचा संघर्ष वाचणेही प्रेरणादायी आहे, सर्वांचा एकत्रित परिणाम तर पुस्तकाला अधिक उंची देतो.

ढोर समाजातील स्त्रियांविषयीची संकलित माहिती सर्वप्रथम आर ई एंथोवेन या ब्रिटिश लेखकाच्या ‘ट्राइब्स अँड कास्ट्स इन बॉम्बे प्रेसिडेन्सी’ या पुस्तकात आढळते. या पुस्तकात त्याने चांभार ही ‘आर्य’ जात असल्याचा उल्लेख केला आहे. चर्मना या वैदिक संकल्पनेच्या आधारे आणि वैदिक काळातील चामड्याच्या उल्लेखांच्या आधारे तशी समजूत प्रचलित आहे. चांभार स्त्रियांचे सौन्दर्य आणि स्वातंत्र्य याविषयीच्या देखील आख्यायिका, म्हणी प्रसिद्धा आहेत, मात्र प्रत्यक्ष स्थिती तशी आहे का, याचा अभ्यास या पुस्तकात लेखिकेने केला आहे.

दलित चळवळीतील अंतर्गत मतभेद आणि महार, मांग, चांभार, ढोर आणि वाल्मिकी यासारख्या जातींमधील सामाजिक आणि राजकीय व्यवहारावर सुनीताताईंनी व्यापक संशोधन केलेलं आहे, त्या संशोधनातून जन्माला आलेली अभ्यासपूर्ण भूमिका या पुस्तकात दिसते. अस्पृश्य म्हणून अपमानकारक वागणूक सर्वांनाच मिळत असली, तरी अस्पृश्यांच्या जाती-पोटजातींमध्ये फारशी एकी दिसत नाही. बाबासाहेबांच्या प्रेरणेने संघटित होण्याचा प्रयत्न करणाऱ्या अस्पृश्यांमधील दरी पुणे करारामुळे परत वाढली कारण राखीव जागांवर महार, मांग, चांभार, ढोर यांनाच एकमेकांच्या विरोधात उभे राहावे लागले. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला; त्यांच्या पाठोपाठ महार समाजाने सामूहिक पातळीवर बौद्ध धर्म स्वीकारला, इतर अस्पृश्य जातींनी मात्र सामूहिकपणे धम्म स्वीकारला नाही, व्यक्तिशः काही लोकांनीच तो स्वीकारला. समाज म्हणून चांभार, मातंग, ढोर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला असता तर कदाचित आजच्या समाजाचे चित्र वेगळे झाले असते, असे मत लेखिकेने व्यक्त केले आहे.

लेखिकेचा सखोल अभ्यास लेखनातून तर जाणवतोच, शिवाय संदर्भग्रंथसूचीमध्ये मराठी व इंग्रजी भाषेतील पुस्तके, निबंध, नियतकालिके मिळून 71 संदर्भस्रोतांचा उल्लेख लेखिकेने केला आहे, त्यातूनही त्यांची बहुश्रुतता सिद्ध होते.

या पुस्तकातील परिशिष्टांचा विशेष उल्लेख करावा लागेल. ऐतिहासिक प्रसंगांचे व माणसांचे फोटो, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतील लेख, बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांचे पत्रव्यवहार, सभांचे अहवाल, पत्रके, भाषणे, ठराव, कार्यक्रम पत्रिका, ढोर व चांभार समाजाच्या लोकसंख्येशी संबंधित आकडेवारी (उदाहरणार्थ स्त्री-पुरुष प्रमाण, स्त्रियांमधील विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, विधवा यांचे प्रमाण इत्यादी) यांचा समावेश परिशिष्टांमध्ये केला आहे, त्याने पुस्तकाचे संदर्भमूल्य आणि वाचनीयता वाढली आहे. हे संदर्भ अधिक स्पष्ट व मोठ्या आकारात छापता आले असते तर वाचकांची अधिक सोय झाली असती, असे मात्र सुचवावेसे वाटते.

ढोर आणि चांभार स्त्रियांच्या कर्तृत्वाची ओळख संपूर्ण समाजाला करून देणारे आणि परिवर्तनाच्या चळवळीतील एका महत्त्वाच्या घटकाकडे वाचकांचे लक्ष वेधणारे हे पुस्तक अवश्य वाचावे असे आहे.

ढोर - चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ
लेखक : सुनीता  सावरकर
प्रकाशन : ग्रंथाली
पृष्ठ संख्या : 206
किंमत : 300 रुपये

Tags: साधना डिजिटल ढोर चांभार आंबेडकरी चळवळ महिला दलित अस्पृश्य अस्पृश्य दलित Load More Tags

Comments:

प्रकाश सिताराम बाविस्कर

जोपर्यंत जाती जातीमधील दरी नष्ट होत नाही व सरवामधये एकोपा निर्माण झाल्या शिवाय अस्पृश्य समाजाची प्रगती शक्य होईल

Milind Chavan Chavan

देश प्रेमाची भावना असणाऱ्यांसाठी वा ज्यांना देश म्हणजे काय हे कळाले आहे त्यासाठीच्या आम्हां लोकांना हे पुस्तक महत्वपूर्ण आहे.

Rohit Agawane

How to contact sunita sawarkar....

सुरेश कृष्णाजी पाटोळे

डॉ.सुनिता सावरकर यांच्या या संशोधनातली चिकाटी, आत्मियता, ध्यास, निकोप व्यवहार मी अनुभवला आहे.त्यांची या दस्तऐवजाची धारणा अत्यंत प्रांजळ आहे.सर्वसमावेशक अशा या संशोधनाचा हा ऐवज अतुलनीय आहे.निरंतन याचं जतन होऊन भावी संशोधकांना मार्गदर्शक ठरेल.

Add Comment