‘मॅकार्थी’ व्हायरस आजही जगभरातील लोकशाहीला छळतो आहे!

ओपनहायमर यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर केलेले वैचारिक मंथन आणि त्यांच्या भूमिकेचे आज एका वेगळ्या परिस्थितीत पुनरावलोकन होणे गरजेचे आहे.

डॉ. जे. रॉबर्ट ओपनहायमर

मागील काही वर्षांत जगभरात ध्रुवीकरण करणाऱ्या, धार्मिक बहुसंख्याकवादाच्या आधारावर आणि संकुचित राष्ट्रवादाच्या आक्रमक प्रॉपगंडाच्या जीवावर निवडून आलेल्या राजवटी या सर्व ओपिनियन मेकर्सची घुसमट वाढवत आहेत. भारतात मागील काही वर्षांत झालेल्या अनेक अशा घटना त्याची साक्ष आहेत. ओपिनियन मेकर्सचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यांचे काम त्यांना करू देण्यासाठी सार्वजनिक जीवनात आवश्यक असणारी मोकळीक आणि त्यांच्या ध्येयवादाबद्दल मतभेद असले तरी त्यासाठी त्यांना लक्ष्य न करता समजूतदारपणा दाखवणारा समाज ही परिस्थिती लोकशाहीतील नागरिकांसाठी ‘ऑक्सिजन’सारखे काम करते. ओपनहायमर यांच्या काळात अमेरिकन सरकारच्या ‘मॅकार्थी विचारसरणी’ने प्रेरित राजवटीने त्यांचा हा ‘ऑक्सिजन’ पुरवठा बंद केला होता.

डॉ. जे. रॉबर्ट ओपनहायमर यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या अणूस्फोट संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व केले होते. युद्ध संपल्यावर अमेरिका आणि तत्कालिन सोव्हिएत रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरु झाले. जगभरात दोन्ही देशांच्या सत्ताविस्ताराची पावले पडू लागली. ऐतिहासिकदृष्ट्या मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट विचारांनी जगभरातील शोषित, कष्टकरी वर्गाला न्यायासाठी संघटित होण्याची व लढण्याची प्रेरणा दिली. कोणत्याही लोकशाही देशातील राज्यव्यवस्था कशी असावी यावरच ही चळवळ भाष्य करत नव्हती तर एकंदर मानवी जीवन हे अधिक सुखकर, समतावादी आणि प्रगतीशील न्यायाच्या दिशेने जाणारे असावे असाही विचार मार्क्सवादाने जगाला दिला. अमेरिकेत मात्र याला शीतयुद्धाच्या गडद पडछायेमध्ये वेगळे वळण मिळाले. 

जोसेफ मॅकार्थी हे विस्कॉन्सिन प्रांतातील माजी न्यायाधीश आणि दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन नौदलात सेवा बजावलेले अधिकारी होते. महायुद्धानंतर झालेल्या निवडणुकीत ते अमेरिकन संसदेचे (सिनेट) सदस्य म्हणून निवडून आले. अमेरिकेच्या संरक्षण, गुप्तहेर, परराष्ट्र आणि इतर महत्त्वाच्या विभागांत मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट (थोडक्यात ‘रशिया समर्थक’) लोकांचा शिरकाव आणि घुसखोरी झाली आहे. ‘त्यांना तेथून हुसकून लावणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे’ असा आक्रमक दुष्प्रचार आपल्या अधिकृत पदांचा गैरवापर करून मॅकार्थी यांनी सुरु ठेवला. लवकरच विरोधकांना दाबून टाकण्यासाठी आणि आपली सत्ता बळकट करण्यासाठी हे धोरण अमेरिकन सरकारने एकप्रकारे अप्रत्यक्षपणे स्वीकारले. याचाच परिणाम म्हणजे अमेरिकेतील अनेक पत्रकार, लेखक, शास्त्रज्ञ, कलाकार, मानवी हक्क कार्यकर्ते, अधिकारी आणि इतर अनेक जणांना या धोरणामुळे आयुष्यभर जाच सोसावा लागला. यात हजारो लोकांचे प्रसारमाध्यमांतून चारित्र्यहनन केले गेले, अनेकांची कारकीर्द संपवण्यात आली आणि काही जणांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात धाडण्यात आले.

1954 मध्ये अमेरिकेच्या अणुऊर्जा आयोगाने स्वतःच्याच नियमांचे उल्लंघन करत सुनावणी समितीच्या ‘फार्सिकल’ प्रक्रियेद्वारे डॉ. ओपनहायमर यांची सुरक्षा मंजुरी रद्द केली होती. त्यामुळे त्यांना सर्व शासकीय समित्या, पदे आणि इतर अधिकारांपासून मुक्त करण्यात आले. एकप्रकारे, तुरुंगात न पाठवता दिलेली ती मानहानीची जन्मठेपच होती. पण जसजसा काळ पुढे सरकला तसतसे डॉ. ओपनहायमर यांच्यावर झालेल्या पक्षपाती कारवाईचे अधिक पुरावे समोर आले. आणि त्यांनी वारंवार त्यांच्या देशनिष्ठेवर शिक्कामोर्तब केले गेले. 

1963 मध्ये त्याच अणुऊर्जा आयोगाने ‘केवळ अणुबॉम्बच्या विकासातच नव्हे, तर अणुऊर्जेच्या अनेक शांततापूर्ण उपयोगांसाठी पायाभूत योगदान देण्याबद्दल’ डॉ. ओपनहायमर यांची प्रतिष्ठित एनरिको फर्मी पुरस्कारासाठी निवड केली. ‘ओपनहायमर’ हा अलीकडेच आलेला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही महिने आधी म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये अमेरिकेच्या ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, ‘साधारणतः एखादा अधिकारी किंवा शास्त्रज्ञ यांच्यावर घालण्यात आलेली बंदी किंवा पदमुक्ती या प्रकारची कारवाई रद्द करण्याची किंवा तो निर्णय रद्द ठरवण्याची परंपरा अमेरिकेच्या प्रशासनात नाही.’ 

मग हा अपवाद का केला गेला यावर या चार पानी निवेदनात प्रकाश टाकण्यात आला आहे. (अहवालाची लिंक) मंत्रालयाकडून अशी कबुली दिली गेली आहे की, ‘ओपनहायमर यांचे प्रकरण अनेक बाबतीत अनन्यसाधारण होते कारण त्यांनी दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या संशोधन क्षेत्रातील प्रगतीमध्ये अद्वितीय असे योगदान दिले होते. ऐतिहासिक पुरावे असे सूचित करतात की, डॉ. ओपनहायमर यांच्या दोषमुक्ततेचे पुनरावलोकन करण्याच्या निर्णयामागे तंत्रज्ञानाबाबतीतील संवेदनशील माहितीच्या सुरक्षिततेबाबतची चिंता कमी, तर ओपनहायमर यांना आण्विक शस्त्र धोरणावरील सार्वजनिक चर्चेत बदनाम करण्याच्या राजकीय नेतृत्वाच्या इच्छेशी जास्त संबंध होता.’ 

ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या विस्तृत निवेदनात या सुनावणी आयोगाने लावलेल्या अनेक दुटप्पी मापदंडांचा आणि वेळोवेळी ओपनहायमर यांचे निर्दोषत्व सिद्ध करणाऱ्या विविध समित्यांचा, पुस्तकांचा, अहवालांचा दाखला दिला आहे. हा विद्वेष किती व्यक्तिगत पातळीवर होता हे ओपनहायमर चित्रपटाच्या उत्तरार्धात खूप ठळकपणे पुढे आले आहे.

सन 1967 मध्ये जेव्हा ओपनहायमर यांचे निधन झाले तेव्हा अमेरिकेच्या सिनेटमध्ये सिनेटर जे. विल्यम फुलब्राइट यांनी त्यांना अशी श्रद्धांजली वाहताना म्हटले, “या महान बुद्धिमान व्यक्तीने, वैज्ञानिकाने आपल्या देशासाठी काय केले एवढेच आपण लक्षात ठेवू नये तर आपण त्या माणसाला कशी वागणूक दिली हेसुद्धा आपण लक्षात ठेवूया. एखाद्या माणसाच्या व्यक्तिगत जीवनासाठी त्याला राजकीय हेतूंनी लक्ष्य करणे ठीक नाही. कायद्याचा न्यायपूर्ण वापर करूनच आपण आपल्या आदर्श मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करू शकतो.” 

सन 1954 ते 2022 असा ओपनहायमर यांचा अधिकृतपणे दोषमुक्त होण्याचा 68 वर्षांचा प्रवास आहे. सन 1642 मध्ये मृत्यू झालेल्या गॅलिलिओ गॅलिली यांना ‘पृथ्वी ही गोल असून ती सूर्याभोवतीसुद्धा परिभ्रमण करते’ या आग्रही मतासाठी दोषी ठरवून 1633 च्या सुमारास तुरुंगवासात पाठवले गेले होते. त्यानंतर जवळपास 360 वर्षांनी ख्रिस्ती धर्माचे प्रमुख केंद्र असलेल्या ‘व्हॅटिकन’ने त्यांना दोषमुक्त केले होते. गॅलिलिओ प्रकरणाच्या तुलनेत ओपनहायमर यांच्या बाबतीत कदाचित लवकर दुरुस्ती झाली. परंतु ओपनहायमर यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर केलेले वैचारिक मंथन आणि त्यांच्या भूमिकेचे आज एका वेगळ्या परिस्थितीत पुनरावलोकन होणे गरजेचे आहे. ओपनहायमर चित्रपटामुळे ही संधी जगाला पुन्हा मिळाली आहे.

‘ओपनहायमर यांनी हायड्रोजन बॉम्बच्या विकासाला विरोध केला’ असा एक ठपका आण्विक आयोगाच्या सुनावणीदरम्यान त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. परंतु ओपनहायमर यांनी सुनावणी समितीच्या आरोपांना दिलेल्या प्रदीर्घ उत्तरामध्ये अशी बाजू मांडली की, दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत तांत्रिकदृष्ट्या ते शक्य नव्हते. पुढे 1949 मध्ये जेव्हा रशियानेसुद्धा आण्विक चाचणी घेतली तेव्हा अमेरिकन व्यवस्थेमध्ये अधिक शक्तिशाली अशा हायड्रोजन बॉम्ब प्रकल्पाचे काम (Super) पुढे रेटण्यासाठी दबाव वाढला. त्यावेळी ओपनहायमर यांनी अशा प्रकल्पामुळे राष्ट्रीय सुरक्षा वाढण्यापेक्षा मानवजातीला सतत विनाशाच्या सावलीत राहावे लागेल अशी भीती व्यक्त केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काळात ओपनहायमर यांना अशी आशा होती की, जपानवर अणुबॉम्ब टाकल्यावर त्याच्या शक्तिशाली परिणामामुळे कोणताही देश यापुढे विनाशाची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वापरण्याचे धाडस करणार नाही आणि त्यामुळे जगात कायमची शांतता नांदेल. परंतु जेव्हा दोन बॉम्ब टाकल्यानंतर झालेला विध्वंस त्यांनी पाहिला, तेव्हा त्याचा धक्कादायक परिणाम ओपनहायमर यांच्या मानसिकतेवर झाला. चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की, हिरोशिमावर बॉम्ब टाकल्यानंतर लॉस अलमॉस येथील मॅनहॅटन प्रकल्पाच्या आपल्या सहकाऱ्यांसमोर जल्लोषाच्या वातावरणात ओपनहायमर भाषण देतात तेव्हा एकाच वेळी त्यांना विजयश्री साजरे करणारे अमेरिकन शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ-सैनिक आणि जपानमध्ये विव्हळणारे नागरिक एकमेकांत विरघळून गेलेत असा भास होतो. व्यथित करणाऱ्या संगीतासह साकारलेला तो प्रसंग ओपनहायमर यांच्या बदलत्या मनस्थितीचा प्रभाव अंदाज देऊन जातो.

पुढे काही वर्षांनी अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा हजार पट अधिक शक्तिशाली असणाऱ्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली. या चाचणीनंतर वर्षभरातच शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने असा इशारा दिला होता की, ‘हायड्रोजन बॉम्ब कदाचित मानवजातीचा नाश करू शकतो.’ असे घडू नये यासाठी एका मुक्त संवादाचे आवाहन या गटाने केले होते. या गटात मॅक्स बॉर्न, पर्सी ब्रिजमन, अल्बर्ट आईन्स्टाईन, लिओपोल्ड इनफेल्ड, फेड्रिक जॉलिओट-क्युरी, हरमन म्युलर, लायनस पॉलिंग, सेसिल पॉवेल, जोसेफ रॉटब्लॅट, बर्ट्रांड रसेल आणि हिडेकी युकावा यांचा समावेश होता. या गटाने आण्विक निःशस्त्रीकरणासाठी पुढे ज्या ज्या बैठका केल्या त्या ‘पगवॉश कॉन्फरन्स’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत. ओपनहायमर यांनी थेट या संमेलनात सहभाग घेतला नाही. पण ‘पगवॉश’मधील अनेक शास्त्रज्ञ आणि जगभरातील अनेक नामवंत कलाकार, विचारवंत, राजकीय-सामाजिक नेते यांच्या सक्रिय सहभागाने ‘वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अँड सायन्स’ची (WAAS) स्थापना झाली, त्यात जे. रॉबर्ट ओपनहायमर यांचा सक्रिय सहभाग होता. 

हिरोशिमा आणि नागासाकी येथे दोन आण्विक हल्ले झाले तेव्हाच अणुबॉम्बच्या संशोधनाची विध्वंसक बाजू ओपनहायमर यांच्यासमोर आली होती. न्यू मेक्सिको राज्यातील लॉस अलमॉस प्रयोगशाळेने 16 जुलै 1945 रोजी पहाटे साडेपाच वाजता ‘ट्रिनिटी’ ही ‘प्लुटोनियम इम्प्लोजन’ची आण्विक स्फोट चाचणी घेतली, तो प्रसंग चित्रपटामध्ये अतिशय उत्कंठावर्धकरित्या चित्रित केला गेला आहे. त्या चाचणीच्या संदर्भात भगवद्‌गीतेतील ‘Now I Am Become Death, the Destroyer of Worlds’ हे वचन आपण अनुभवल्याचे ओपनहायमर यांनी नंतर सगळ्या जगाला सांगितले. या चाचणीनंतर ओपनहायमर यांना अणुबॉम्बच्या महाविध्वंसक क्षमतेचा अंदाज आला. त्यामुळेच जेव्हा जपानवर अणुबॉम्ब टाकावा की नाही याबद्दल राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत ‘अणुबॉम्बच्या वापराबद्दल वैज्ञानिकांमध्ये दोन विरुद्ध मतप्रवाह आहेत’ असे ओपनहायमर यांनी सांगितल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. 


हेही वाचा : ओपनहायमर : काळाच्या परिप्रेक्षातील अस्वस्थ वर्तमानाचे चित्रण - मकरंद दीक्षित


ओपनहायमर चित्रपटाने कोणताही दुर्लक्षित असा इतिहास समोर आणलेला नाही हे इथे नमूद करणे आवश्यक आहे. आण्विक संशोधन, अणुबॉम्बचा वैज्ञानिक इतिहास आणि परिणाम यांची चर्चा अनेक महत्त्वाच्या पुस्तकांतून आणि चित्रपटांतून केली गेली आहे. ओपनहायमर हा चित्रपट के बर्ड यांनी लिहिलेल्या ‘अमेरिकन प्रोमिथियस: द ट्रायम्फ अँड ट्रॅजिडी ऑफ जे. रॉबर्ट ओपनहायमर’ (American Prometheus: The Triumph and Tragedy of J. Robert Oppenheimer) या पुस्तकावर आधारित आहे. आण्विक शस्त्रे किंवा आण्विक ऊर्जेचा नकारात्मक परिणाम या विषयांवरील चित्रपटांच्या बाबतीत काही दशकांपूर्वी आलेले ‘डॉ. स्ट्रेंजेलोव ऑर: हाउ आय लर्न टू स्टॉप वरिंग अँड लव्ह द बॉम्ब’ (Dr. Strangelove Or: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb) किंवा ‘हिरोशिमा मोन अमौर’ (Hiroshima, Mon Amour) किंवा अलीकडेच ‘एचबीओ’वर आलेली ‘चेर्नोबिल’ (Chernobyl) ही सिरीज यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. मग ओपनहायमर चित्रपट नेमका कुठे योगदान देतो? ‘बुलेटिन ऑफ अ‍ॅटोमिक सायंटिस्ट’ या आण्विक भौतिकशास्त्राला वाहिलेल्या मासिकाने त्यांचा जुलै 2023चा विशेषांक ओपनहायमर चित्रपटाने समोर आणलेल्या इतिहासाबद्दल आहे. (विशेषांकाची लिंक) ओपनहायमर यांना दुसऱ्या महायुद्धानंतर मानहानीपूर्ण जीवन जगावे लागले आणि त्यातच ते जग सोडून गेले. याला कारणीभूत झालेल्या सुनावणी समितीच्या जाचाला या चित्रपटात केंद्रस्थानी ठेवले आहे. हा चित्रपट आण्विक भौतिकशास्त्र किंवा आण्विक शस्त्रे या दोन्हींसंबंधित संपूर्ण इतिहास सांगत नाही उलट ओपनहायमर यांच्या आयुष्यातील विविध नाजूक आणि आव्हानात्मक वळणांवरील द्वंद्वे दृश्यमाध्यमातील शक्तीस्थानांचा वापर करून प्रभावीपणे दाखवतो. आणि छोट्या छोट्या प्रसंगांच्या मालिकेने तत्कालीन वैचारिक, वैज्ञानिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळातील व्यक्तींतील परस्पर-सहकार्य आणि संघर्ष आपल्यासमोर आणून ठेवतो. या दृष्टिकोनातून मॅनहॅटन प्रकल्पाच्या लॉस अलमॉस प्रयोगशाळेची उभारणी करण्याचा चित्रपटातील प्रवास ज्या प्रवाही पद्धतीने दाखवला आहे तो दिलखेचक आहे. 

‘बुलेटिन ऑफ अ‍ॅटोमिक सायंटिस्ट’चे मल्टीमिडिया एडिटर थॉमस गॉलकिन आपल्या संपादकीयात या चित्रपटाच्या मर्मस्थानाबद्दल सांगतात की, ‘It’s notable that the longest scenes—when Christopher Nolan (दिग्दर्शक) let’s things settle for a moment—are those in which the big moral and political questions are being debated: the decision to use the bomb on civilians, the development of the hydrogen bomb, preventing an arms race, etc. As these scenes repeat across Nolan’s interconnected narrative, Murphy (‘ओपनहायमर’चा नायक-अभिनेता) portrays Oppenheimer becoming increasingly detached and diminished as he loses his grip on the nuclear genie he helped unleash. Elsewhere, the film delivers Oppenheimer’s thoughts through a kaleidoscopic medley of words and scenes that are sometimes obviously fictional, and sometimes a hodgepodge of real events. Some are accurate in broad strokes, but not the details.’ 

ओपनहायमर चित्रपटाच्या निमित्ताने राज्यव्यवस्था आणि बुद्धिवंत यांच्यातील ताण-तणावाच्या संबंधांमधील एक महत्त्वाचा ऐतिहासिक आयाम पाहायला मिळतो. याला दुसऱ्या महायुद्धाच्या काळाच्या विज्ञान-तंत्रज्ञान इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडींची किनार आहे. या घडामोडींनी जग कमालीचे बदलून गेले. आंतरराष्ट्रीय राजकारणाची फेरमांडणी, जागतिक विज्ञान-तंत्रज्ञानातील उत्कृष्ट नवनिर्मिती, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला गती, साम्राज्यवादाचा अंत, लोकशाही समाजवादाचा उदय, वैयक्तिक स्वातंत्र्याने भारलेल्या भांडवलशाहीचे आगमन आणि सर्वच क्षेत्रात तात्त्विक पातळीवर सुरु झालेले सखोल विचारमंथन यामुळे जगाकडे पाहण्याचे नवीन मापदंड विकसित झाले. यामध्ये लेखक, विचारवंत, कलाकार, शास्त्रज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते, पुढील काळात चित्रपटनिर्माते, धोरणकर्ते, सामाजिक शास्त्रज्ञ आणि इतर ओपिनियन मेकर्सचा समावेश होतो. मागील पाच-सहा दशके जगभरातील विविध देशांमध्ये या व्यक्तींनी परिवर्तनाच्या अनेक लाटा-लहरी आणल्या आणि त्यातून आपले पृथ्वीवरचे जीवन अधिक आनंदी करण्यासाठी योगदान दिले. 

पण मागील काही वर्षांत जगभरात ध्रुवीकरण करणाऱ्या, धार्मिक बहुसंख्याकवादाच्या आधारावर आणि संकुचित राष्ट्रवादाच्या आक्रमक प्रॉपगंडाच्या जीवावर निवडून आलेल्या राजवटी या सर्व ओपिनियन मेकर्सची घुसमट वाढवत आहेत. भारतात मागील काही वर्षांत झालेल्या अनेक अशा घटना त्याची साक्ष आहेत. ओपिनियन मेकर्सचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यांचे काम त्यांना करू देण्यासाठी सार्वजनिक जीवनात आवश्यक असणारी मोकळीक आणि त्यांच्या ध्येयवादाबद्दल मतभेद असले तरी त्यासाठी त्यांना लक्ष्य न करता समजूतदारपणा दाखवणारा समाज ही परिस्थिती लोकशाहीतील नागरिकांसाठी ‘ऑक्सिजन’सारखे काम करते. ओपनहायमर यांच्या काळात अमेरिकन सरकारच्या ‘मॅकार्थी विचारसरणी’ने प्रेरित राजवटीने त्यांचा हा ‘ऑक्सिजन’ पुरवठा बंद केला होता. प्रत्येक निर्दयी आणि न्यायविरोधी राजवट हे काम करत असते. कायद्यांचा गैरवापर करून व सत्तेच्या अहंकारात ओपिनियन मेकर्सची प्रगती थांबवण्याचे मोठे कारस्थान संविधानाने दिलेल्या मूल्यांच्या विरोधात असलेले सरकार नेहमी करत असते. ओपनहायमर चित्रपटाच्या निमित्ताने ‘असे पुन्हा कधी होऊ नये’ असं वारंवार वाटावं हे या चित्रपटाचं मोठं यश आहे असं मला वाटतं.

- राहुल विद्या माने
nirvaanaindia@gmail.com 
लेखक, मुक्त पत्रकार आहेत.)

Tags: अणुबॉम्ब शास्त्रज्ञ J. Robert Oppenheimer mccarthy Christopher Nolan Atomic Bomb World Cinema Load More Tags

Comments:

Sanjay Kale

सत्य परिस्थितीचे अभ्यासपूर्वक वर्णन.

Makarand

उत्कृष्ट लेख !!

Add Comment