पुद्दुचेरी - दुर्लक्षित प्रदेशातील 'आभासी' निवडणूक

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका : 2

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगाल वगळता इतर चारही राज्यांत 6 एप्रिलला मतदान झाले. तर बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 2 ते 29 एप्रिल या काळात सात टप्प्यांत. या सर्व राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी लागणार आहेत.  या पार्श्‍वभूमीवर अकरा लेखांची मालिका कर्तव्य साधनावरून प्रसिद्ध करत आहोत.  दरम्यानच्या प्रत्येक आठवड्यात तीन ते चार लेख प्रसिद्ध होत राहतील. ‘द युनिक फाऊंडेशन’ची संशोधक टीम, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील (राज्यशास्त्र विभाग) प्राध्यापक व संशोधक, आणि काही पत्रकार प्रस्तुत लेखमालेसाठी योगदान देणार आहेत. या लेखमालेतील हा दुसरा लेख आहे. पुद्दुचेरी विधानसभेच्या 30 जागांसाठी आज मतदान पार पडले. त्यानिमित्ताने  राजकीयदृष्ट्या काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या या प्रदेशातील राजकारण आणि समाजकारण  यांचा धावता आढावा  या लेखातून घेतला आहे.

पुद्दुचेरी (पूर्वीचे पाँडेचेरी) या केंद्रशासित प्रदेशाची एकूण 30 जागांसाठी (3 सदस्य नामनिर्देशित असतात अशा एकूण 33 सदस्यांची विधानसभा)  विधानसभा निवडणूक 6 एप्रिल 2021 रोजी एकाच टप्प्यात पार पडली. राज्यातील पक्षीय स्पर्धा काँग्रेस, द्रमुक व इतर पक्षांची आघाडी आणि अण्णाद्रमुक, एआयएनआरसी व भाजप आघाडी या दोन मुख्य आघाड्यांमध्ये आहे.. 

विधानसभेच्या 30 जागांसाठी एकूण 360 उमेदवार रिंगणात उतरले होते. 2011च्या जनगणनेनुसार पुद्दुचेरीची एकूण लोकसंख्या 12,47,953 इतकी असून एकूण मतदार संख्या 10,02,589 आहे. निवडणुकीच्या काही आठवडे आधीच पुद्दुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुद्दुचेरीला पूर्ण स्वायत्त राज्याचा दर्जा नसल्याने येथील निवडणुकांविषयी राष्ट्रीय पातळीवर फारशी चर्चा होताना दिसून आली नाही. 

पुद्दुचेरीची ओळख
दक्षिण भारतातील आकाराने लहान असे केंद्रशासित प्रदेश म्हणून पुद्दुचेरीची ओळख आहे. पुद्दुचेरीची पुद्दुचेरी, कराईकल, माहे आणि यनाम अशी चार जिल्ह्यांत विभागणी करण्यात आली आहे. पुद्दुचेरीवर फ्रान्सची सत्ता अनेक वर्षे होती. फ्रेंच वसाहतीच्या संस्कृतीचा प्रभाव पुद्दुचेरीच्या लोकांवर पिढ्यान्‌पिढ्या पडलेला दिसून येतो. त्यामुळे भारतातील छोटे फ्रान्स म्हणून पुद्दुचेरीची ओळख आहे राज्यात पोंगल व दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. पुद्दुचेरीमध्ये हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मियांचे प्रमाण सर्वाधिक आहेत आणि त्यांची अस्मितादर्शक अशी प्रतीके अर्थात मंदिर, चर्च आणि मस्जीदही तुलनेने सारखीच आहेत.

पुद्दुचेरी हे एक बहुभाषक (तेलुगु, तमीळ, मल्याळम भाषांसह इंग्लीश व फ्रेंच भाषा) राज्य असले तरी मल्याळम भाषा बोलीभाषेत सर्वाधिक बोलली जाते. पुद्दुचेरीमध्ये पर्यटनासाठी समुद्र आणि आधात्मिक केंद्रे असल्यामुळे राज्याला एक वेगळे सांस्कृतिक वैभव प्राप्त झाले आहे. या वैभवशाली राज्याचे नामांतर 2006 मध्ये  पुद्दुचेरी असे करण्यात आले आहे. 

समाज-अर्थ-राजकारण
पुद्दुचेरीमध्ये जातीय आणि धर्म यांवर आधारीत राजकारणाला फारसा वाव नाही.. तमीळनाडू व पुद्दुचेरी ही दोन्ही राज्ये भौगोलिकदृष्ट्या व भाषिकदृष्ट्या सारखी वाटत असली तरी तिथे राजकीयदृष्ट्या भिन्नता दिसून येते. राज्यात हिंदू 87 टक्के, मुस्लीम 6 टक्के, ख्रिश्चन 6 टक्के आणि इतर एक टक्का आहेत. राज्यात वनियार समाज 65 टक्के आहे. या समाजाचे लोकप्रिय नेते म्हणून एन. रंगासामी यांची ओळख आहे... त्यामुळे राज्यातील निकालात वनियार समाजाची महत्त्वाची भूमिका असते. राज्यात भाजपप्रणीत आघाडीसोबत एनआर काँग्रेसने आघाडी केली आहे... त्यामुळे राज्यातील वनियार समाजाच्या मताचे विभाजन होण्याची शक्यता आहे. 

राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 16 टक्के आहे. त्याअंतर्गत आदि द्रविड (73 टक्के), परायण (14 टक्के), वल्लूवन (2 टक्के), आदि आंध्र (2 टक्के), माला (2 टक्के) आणि इतर सर्व अनुसूचित जाती (7 टक्के) आहेत. यात आदि द्रविड व परायण या जाती संख्येने अधिक असल्या तरी  शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या जागृत व सक्षम नाहीत. 

राज्यातील बहुतांश दलित समुदाय भूमिहीन आहेत. राज्यात 5 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. या मतदारसंघात आदि द्रविड या एकाच समाजाचे वर्चस्व दिसून येते... मात्र इतर कोणत्याही मतदारसंघात दलित समाज हा निर्णायक घटक ठरताना दिसून येत नाही. 

राज्यात आदिवासी समाजाचेही प्रभुत्व दिसून येत नाही. मुळात राज्यात आदिवासी समाजाला एकही राखीव जागा नाही. अन्य राज्यांत भाजपच्या प्रचारात सक्रिय असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) संघटना इथे फारसी सक्रिय असलेली दिसून येत नाही. 

येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. याशिवाय मासेमारीचाही व्यवसाय प्रमुख मानला जातो. पर्यटन व्यवसायांवरही येथील अर्थव्यवस्था बरीचशी अवलंबून आहे.  

राष्ट्रपती राजवट
पुद्दुचेरीमध्ये कर्नाटक आणि मध्यप्रदेश यांप्रमाणे पाच वर्षांच्या उत्तरार्धात ऑपरेशन लोटस यशस्वी झाले. तरीही इथे भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही... कारण तोपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली... शिवाय विरोधकांकडे बहुमत स्पष्ट करता येईल इतके संख्याबळही नव्हते. या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती निर्माण करण्याचे काम नायब राज्यपाल किरण बेदी यांनी केले... त्यामुळे त्यांना तडकाफडकी पदावरून काढून टाकण्यात आले... किरण बेदी यांची कारकिर्द त्यामुळे वादग्रस्त ठरली. 

भाजपने किरण बेदींच्या आडून राज्यात आपले मिशन पूर्ण केले. किरण बेदी यांच्या ताठर भूमिकेमुळे आणि मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्या मर्यादित अधिकाराच्या संघर्षात जनता भरडली जात होती. 

व्ही. नारायणसामी यांनी पाठवलेल्या मोफत धान्य वाटपासह 39 प्रस्तावांवर किरण बेदी मान्यता देण्यास तयार नव्हत्या. त्या वेळी नारायणसामी यांनी त्यांच्या घरासमोर सहा दिवस धरणे आंदोलन केले होते. याशिवाय हेल्मेटची जागृती न करता थेट हेल्मेटसक्तीचा निर्णयही बेदी यांना मागे घ्यावा लागला. याची सहानुभूती काँग्रेसला मिळू नये म्हणून भाजपने किरण बेदी यांना बदलण्याचा निर्णय घेतला आणि सध्या तेलगणांचे राज्यपाल तमीलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. 

पुद्दुचेरीमध्ये पाच वर्षे पूर्ण केले नाही असे काँग्रेसचे आत्ताचे एकमेव सरकार नाही... तर यापूर्वी असा प्रसंग राज्यात अनेकदा आलेला आहे. अर्थात 1969 मध्ये द्रमुक व भाकप (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) यांचे सरकार, 1974 आणि 1977 मध्ये अण्णाद्रमुकचे सरकार, 1980 मध्ये द्रमुकचे आणि काँग्रेसचे सरकार, 1990 मध्ये द्रमुक आणि जनता दल यांचे सरकार असा सरकार कोसळण्याचा घटनाक्रम राहिला आहे. 

या पाच सरकारांच्या वेळी पक्षातंर्गत कलह वा मित्रपक्षांच्या कलहामुळे सरकार कोसळले... तर या वेळी राज्यातील नायब राज्यपाल यांचा हस्तक्षेप यामुळे आत्ताचे सरकार कोसळले आहे.  

मागील निकाल (2011 व 2016)
2011च्या विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसला 15 जागा व 32 टक्के मते, काँग्रेसला 7 जागा व 27 टक्के मते मिळाली होती. ऑल इंडिया अण्णाद्रमुकला 5 जागा आणि 14 टक्के मते मिळाली आहेत. द्रमुकला 2 जागा 11 टक्के मते मिळाली आहेत... तर एक उमेदवार अपक्ष निवडून आला होता. 

2016च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 15 जागा आणि 31 टक्के मते मिळाली होती तर द्रमुकला 2 जागा  व 9 टक्के मते मिळाली होती. अण्णाद्रमुकला 4 जागा आणि 17 टक्के मते तर एआयएनआरसीला 8 जागा आणि 28 टक्के मते मिळाली आहेत आणि एक उमेदवार अपक्ष निवडून आला आहे. 2011च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या व द्रमुकच्या जागांमध्ये आणि मतामध्ये वाढ झालेली दिसून येते तर अण्णाद्रमुकच्या व एनआर काँग्रेसच्या जागांमध्ये घट झालेली दिसून येते. 

जागा वाटप
राज्यात सत्तेची स्वप्ने पाहणारा भाजप पक्ष केवळ 9 जागांवर निवडणूक लढवत आहे. मित्रपक्षामध्ये एआयएनआरसी 16 जागा तर अण्णाद्रमुक (एआयएडीएमके) 5 जागांवर निवडणूक लढवत आहेत. अर्थात एके काळी सत्तेत (1974 ते 1977) असणारा अण्णाद्रमुक पक्ष केवळ 5 जागांवर निवडणूक लढवत आहे... शिवाय राज्यात भाजपचे तीन नामनिर्देशित सदस्य आहेत... तर काँग्रेसप्रणीत सेक्युलर लोकशाही पुरोगामी आघाडीमध्ये काँग्रेस 15 जागा,  डीएमके 13 जागा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि विदुथलाई चिरुथाईगल काटची (व्हीसीके) अनुक्रमे एकेका जागेवर निवडणूक लढवत आहेत. अशा पद्धतीने दोन्ही आघाडी निवडणूकपूर्व काळात तयार झाल्या आहेत. 

भाजप, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) आणि एआयएनआरसी यांच्या आघाडीला बहुमत प्राप्त झाले तर एआयएनआरसीचे संस्थापक के. एन. रंगासामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठीची तयारी केली आहे. 2016च्या निवडणुकीत भाजपच्या 30पैकी 29 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती... हेही विसरून चालणार नाही. या दोन आघाड्यांशिवाय राज्यात कमल हसन यांची मक्कल निधी मय्यम (एमएनएम) आणि तमीळ राष्ट्रवादी पार्टी अशी अस्मिता घेऊन नाम तमलीर काची पक्ष निवडणूक लढवत आहे. तरीही राज्यातील लढत ही प्रमुख दोन आघाड्यांमध्येच दिसून आली.

राजकीय नेतृत्व
पुद्दुचेरीमध्ये भाजपकडून राष्ट्रीय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा यांची सभा व रॅली पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. समिनाथन आणि प्रादेशिक पातळीवर एआयएनआरसीचे  संस्थापक के. एन. रंगासामी यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत. रंगासामी पूर्वी काँग्रेसमधील प्रमुख नेते मानले जायचे. 2011 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून ऑल इंडिया एनआर काँग्रेस (एन आर म्हणजे नामाथू राजीयम अर्थात आमचे राज्य) पक्षाची स्थापना केली. 

राज्यात काँग्रेसचे पी. शनमुगम आणि एम ओ. हसन फारुक मरिकार तीन-तीन वेळा खासदार राहिले. भारतातील घटकराज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे पहिले तरुण (वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी) मुख्यमंत्री म्हणून फारूक हसन यांची ओळख आहे.  फारूक हसन यांनी राज्यांत तीन वेळा मुख्यमंत्री व एक-एक वेळ झारखंडचे व केरळचे राज्यपालपदही भूषवले. या दोन्ही नेत्यांचे राज्याच्या राजकारणात वर्चस्व होते. त्यांनी केलेल्या मतदारांच्या राजकीय कृतिप्रवणतेमुळे काँग्रेसचे वर्चस्व राज्यात अजूनही टिकून असलेले दिसून येते. दोन वेळा राज्यांचे मुख्यमंत्री पद भूषवणारे काँग्रेसचे व्ही. वैथिलिंगम यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत 56 टक्के मते मिळवत विजय प्राप्त केला आहे. 

काँग्रेसचे राहूल गांधी यांची निवडणूकपूर्व काळात राज्यात एक सभा घेतली. याशिवाय प्रादेशिक पातळीवरील काँग्रेसचे व्ही. नारायणसामी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. व्ही. सुब्रमण्यम यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे... कारण या निवडणुकीत व्ही. नारायणसामी यांना उमेदवारी देण्यात आली नाही. काँग्रेसमधील प्रमुख चेहरे म्हणून मंत्री ए. नामासीवायम व पुद्दुचेरी विधानसभेचे अध्यक्ष व्ही. पी. शिवकोलुंधू व त्यांचे बंधु व्ही. पी. रामलिंगम यांची ओळख होती... परंतु त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा व काँग्रेस पक्षाच्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केले आहेत. 

जाहीरनाम्याची चर्चा
भाजपने राज्यात भ्रष्टाचार मुक्त शासन, अडीच लाख रोजगारांची निर्मिती, मच्छीमारांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य आणि महाविद्यालयीन विद्यार्थींनींना मोफत लॅपटॉप तर उच्च शिक्षणासाठी मोफत स्कुटी, महिलांना मोफत आरोग्य सेवा, शालेय शिक्षण मंडळ व युवक कल्याण आणि क्रीडा मंडळ स्थापन, पीएम किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये, पाणी सुरक्षा योजना, केजी ते पीजीपर्यंतच्या विद्यार्थांना मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण इत्यादी आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत... शिवाय नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरीला बेस्ट हब केंद्र बनवण्याचे ठरवले. त्यामध्ये एक व्यवसाय केंद्र, शिक्षण केंद्र, अध्यात्म केंद्र व पर्यटन केंद्र बनवण्याचे आश्वासन दिले आहे. याचा परिणाम मतदारावर किती होईल निश्चित सांगता येणार नाही.

काँग्रेस आघाडीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात उद्योग, शिक्षण, शेती, मच्छीमार कामगारांचे कल्याण यांसह अल्पसंख्याक समाजाचे आरक्षण करणे, स्वातंत्र्य आणि अखंडतेचे संरक्षण करणे, पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणे, प्रत्येक गृहिणीला प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांची आर्थिक मदत, मोफत कोरोना लसीकरण, उच्च महाविद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रतिमहिना 60 जीबी इंटरनेट डेटा, लॅपटॉप, वायफाय व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा, झोपडपट्टीमुक्त पुद्दुचेरी, अनुसूचित जाती-जमातींच्या व मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे आणि इतर महामंडळाच्या कर्जाची माफी देणे इत्यादी आश्वासने दिली आहेत. याशिवाय स्वतंत्र पुद्दुचेरीचे शिक्षण मंडळ, कृषी विद्यापीठ व विधी विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल. राज्यात भाजपप्रणीत एनडीए आघाडीचा सामना काँग्रेस व द्रमुक हा मित्रपक्ष कसे करणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. 

कराईकल भागातील पाच विधानसभा मतदारसंघांत मच्छीमार समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो. त्यांची तिथे युनायटेड फिशरमन असोसिएशन नावाची संघटना सक्रिय आहे. या संघटनेचे नेते जॉन जेरी यांच्या मते जोपर्यंत आम्हाला पिण्याचे पाणी, रस्ते व मच्छीमार व्यवसाय करण्यासाठी सुलभ सोयीसुविधा इत्यादी पायाभूत सुविधा मिळण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आम्ही या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू आणि मतदानापासून अलिप्त राहू असे म्हणाले. आम्ही मतदान का करावे असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या समुदायाची या मतदारसंघात निर्णायक मते ठरत असतात. 

थोडक्यात तमीळनाडूमध्ये द्रमुकची भूमिका महत्त्वाची ठरताना दिसून येत आहे तर केरळमध्ये काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरताना दिसून येते. या दोन्ही पक्षांच्या भूमिकेचा फायदा पुद्दुचेरीमध्ये होऊ शकतो. राज्यात नायब राज्यपाल यांच्या भूमिकेची (फ्लोअर टेस्टमध्ये नारायणसामी अपयशी ठरल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.) सहानुभूती या आघाडीला मिळू शकते. नामनिर्देशित उमेदवारांमध्ये विविध क्षेत्रांतील सदस्यांची निवड करण्याऐवजी भाजपच्याच कार्यकर्त्यांची निवड इथे करण्यात आली आहे. भाजपप्रणीत आघाडीला दक्षिण भारतात निवडणुकीत फारसे यश प्राप्त होताना दिसून येत नसले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने काही जागांच्या व मतांच्या टक्केवारीत वाढ होताना दिसून येईल. निवार वादळाचा फटका राज्य सरकारला बसणार की केंद्र सरकारला हे निकालातून स्पष्ट होईल. 

- राजेंद्र भोईवार
brantapur09@gmail.com

(संशोधक विद्यार्थी,  राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.)

Tags: लेख लेखमाला निवडणुका पाच राज्यांतील निवडणुका - 2021 पुद्दुचेरी राजेंद्र भोईवार कॉंग्रेस भाजप Series Election Puducherry Rajendra Bhoevar Congress BJP Load More Tags

Comments: Show All Comments

Raju Gaikwad

सर्व प्रथम प्रा. राजेंद्र भोईवार सर आपले मनापासून अभिनंदन खूप सुंदर लेख लिहिला आहे तुम्ही राजकीय सारांश तुम्ही व्यक्त केले आहे. पुन्हा एकदा धन्यवाद ...

Dr.Sandeep Baburao Abhang

सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन

Suhas Naik

राजेंद्र भोईवार सर, धन्यवाद. आपण केलेली अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी वाचायला मिळाली. पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीबाबत स्थानिक माध्यमातून इतकी माहिती मिळत नाही, आपल्या लेखातून ती मिळाली. पुद्दुचेरी येथील जातींचे संदर्भ , आर्थिक परिस्थिती, निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे आणि याचा निवडणुकीतील प्रभाव यांची सखोल आणि तटस्थ शैली वाचकांना भावनारी आहे.

jitesh Bhoiwar

राजेंद्र भोईवार सर, धन्यवाद. आपण केलेली अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी वाचायला मिळाली.

Nagnath Balte

राजेंद्र भोईवार यांनी महत्त्वाचे व अन्वयार्थक लेखन केले आहे

Manik Sonawane

पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजेंद्र भोईवार यांनी लिहिलेला सदरचा लेख अत्यंत उपयुक्त आणि माहितीपुर्ण आहे. सदरच्या लेखात राजेंद्र यांनी पुद्दुचेरी राज्याच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा उत्तम आढावा घेतला असून पुद्दुचेरी राज्याच्या विकासाचे प्रश्न तेथील स्थानिक समस्या आणि राजकारणातील चढ उतारांची सविस्तर माहिती दिल्यामुऴे वाचनीय झाला आहे.

ASHVINI KRUSHNARAO RAUT

खूप छान माहिती पुद्दुचेरी बद्दल या लेखातून प्राप्त झाली. धन्यवाद सर.......

Gajendranath Khatagave

खरंच अडगळीत पडलेल्या एका राज्याची पूर्ण माहिती एका लेखात मिळाली . धन्यवाद राजेंद्र सर

Sonu Gaikwad

अतिशय सुंदर लेख, धन्यवाद सर....

Pravin Govind Kamble

Thank you sir...

Add Comment