पुद्दुचेरी - एन. रंगासामी नेतृत्वाचे यश आणि भाजपचा प्रवेश

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका : 9

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पुद्दुचेरीचे नवे मुख्यमंत्री एन. रंगासामी. (फाईल फोटो)

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले. पुद्दुचेरीच्या एकूण तीस जागांपैकी सोळा जागांवर विजय मिळवत एनडीए आघाडीने बहुमत प्राप्त केले तर काँग्रेसप्रणीत आघाडीला नऊ जागांवर समाधान मानावे लागले. ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसला दहा; भाजप, द्रमुक आणि अपक्ष यांना प्रत्येकी सहा,तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. 

ही आकडेवारी पाहता एन. रंगासामी यांच्या नेतृत्वामुळे एन.आर. काँग्रेस भाजपसह सत्तेवर येत आहे. एन. रंगासामी यांच्यामुळे आणि पक्षांतर करणाऱ्या काँग्रेस आमदारांमुळे इथे भाजपचा प्रवेश झाला तर व्ही. नारायणसामींना दूर केल्यामुळे आणि केंद्रीय नेतृत्व प्रचारापासून दूर राहिल्याने काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलेला दिसतो. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या मित्रपक्षांना अधिक महत्त्व दिले होते.

22 फेब्रुवारीला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तत्कालीन मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे सरकार कोसळल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. खरेतर तेव्हाच काँग्रेस पक्षाने जनतेचा विश्वास गमावला होता मात्र सर्वांचे लक्ष या केंद्रशासित प्रदेशाच्या निकालाकडे लागले होते कारण ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. भाजपने इतर राज्यांप्रमाणे इथेही सत्ताधारी पक्षांतील आमदारांना आयात करण्याची परंपरा कायम ठेवली. यामध्ये काँग्रेसमधील सहा आमदारांनी पक्षाचा त्याग करुन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांपैकी चार आमदार भाजपकडून निवडून आले.

पुद्दुचेरीच्या इतिहासात प्रथमच सहा अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहे. इथे एक किंवा दोन अपक्ष निवडून यायचे आणि विधानसभेच्या कार्यकाळात सत्ता बदलण्यात ते नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजवायचे. या निवडणुकीत एडीएमके या द्रविड प्रादेशिक पक्षाला चार टक्के मते मिळाली असली तरी त्यांना एकही जागा मिळवता आली नाही.  इतर पक्ष, अपक्ष आणि नोटा यांच्या एकूण मतांचे प्रमाण 21 टक्के आहे.

या निवडणुकीत दोन महत्त्वाच्या आघाड्यांमध्ये चुरस होती. काँग्रेसप्रणीत (एसडीपीए – सेक्युलर डेमोक्रॅटीक पुरोगामी) आघाडीत – द्रमुक, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, व्हीसीके; तर भाजपप्रणीत आघाडीत – एन. आर. काँग्रेस, अण्णाद्रमुक आणि पीएमके. या निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता पीएमकेने एनडीएला बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता. प्रादेशिक छोटे पक्ष अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम, नाम तमितर कच्छी, मक्कल निधी मयम आदी पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली मात्र यांना फारशी मतेही मिळवता आली नाहीत. 

पुद्दुचेरी विधानसभा 33 सदस्यांची आहे. यांपैकी 30 जागांवर निवडणूक झाली तर तीन सदस्य केंद्राद्वारे नियुक्त केले जातात. या निवडणुकीत 77.90 टक्के मतदान झाले. 2011च्या निवडणुकीत 85.52 टक्के तर 2016च्या निवडणुकीत 85.08 टक्के मतदान झाले होते. 2011च्या व 2016च्या निवडणुकांच्या तुलनेत 2021मध्ये करोना महामारीमुळे मतदानाच्या टक्केवारीत सात टक्के घट झाल्याचे दिसून येते. काँग्रेस सरकारच्या कामगिरीवर नाराज झालेल्या राज्यांतील मतदारांनी मतदानासाठी फारसा उत्साह दाखवला नाही त्यामुळे राज्यात अँटी-इन्कम्बन्सी तयार होऊन सत्तांतर होईल अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. 

एन रंगासामी यांचे नेतृत्व  
एनडीएप्रणीत आघाडीला विजयश्री मिळवून देण्यात एन. आर. काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे. एनडीएला बहुमत प्राप्त झाल्यामुळे एन. आर. काँग्रेसचे प्रमुख आणि प्रभावशाली राजकारणी एन. रंगासामी (70 वर्षे) यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एन. रंगासामी एके काळी काँग्रेसचे प्रमुख नेते होते. 2001 आणि 2006 मधील यशानंतर तेच मुख्यमंत्री झाले. 2008मध्ये तत्कालीन खासदार व्ही.नारायणसामी यांच्या तक्रारीवरुन त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्यात आले होते. काँग्रेस पक्षात पुन्हा नेतृत्व करण्याची संधी मिळणार नसल्याने त्यांनी पक्षातून बाहेर पडत 2011च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसची स्थापना केली. पक्षाच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पक्षाला 15 जागा व 32 टक्के मते मिळाल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावर विराजमान होता आले... परंतु 2016 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला आठ जागांवर समाधान मानावे लागले. सात जागा कमी झाल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पुन्हा एकदा 2021च्या निवडणुकीत प्रदेशातील नागरिकांनी एन. रंगासामी यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. 

साधे राहणीमान, सामान्य नागरिकांना सहज भेटणारा नेता, कल्याणकारी राज्याची भूमिका साकारणारा, कोणताही बडेजाव नसलेला, ना वाहनांचा ताफा, ना सुरक्षा आणि राज्यात मोटरसायकलवर फिरणारा नेता अशी एन. रंगासामी यांची ओळख आहे. याशिवाय दक्षिण भारतातील वन्नियार समाजाचे ते प्रमुख नेते आहेत. त्यांनी या निवडणुकीत थट्टानचावडी व यनाम या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. त्यांपैकी केवळ थट्टानचावडी या एका मतदारसंघात विजय मिळाला तर यनाम मतदारसंघातून त्यांना 655 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी या निवडणुकीत अनेक आश्वासने दिली आहेत. त्यांपैकी पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी आणि आव्हान त्यांच्यासमोर आहे. केंद्रात भाजप आघाडीची सत्ता आहे. या आघाडीचाच मित्रपक्ष एन. आर. काँग्रेस असून केंद्रातील सरकार संपूर्ण राज्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार की पाच वर्षे निभावून नेणार ते येत्या काळात समजून येईल. 

एनडीएच्या विजयाची कारणे
पुद्दुचेरीमध्ये तीन उमेदवार नामनिर्देशित आहेत. भाजपने इथे सरळसरळ तीन राजकीय नेत्यांची निवड आमदार म्हणून केली. जवळपास गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राचे राज्यपाल 12 नामनिर्देशित सदस्यांची निवड करत नाहीत कारण यांतील बहुतांश नावे ही राजकीय आहेत. पुद्दुचेरीच्या तत्कालीन नायब राज्यपाल किरण बेदी यांनी राजकीय उलथापालथ घडवून आणून राजकीय अस्थिरता निर्माण केली. त्यांनी कधीच प्रदेशामध्ये सुशासन घडवून आणण्यास मदत केली नाही. केंद्राने नियुक्त केलेल्या तीन राजकीय नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

अगदी निवडणुकीच्या समोर तत्कालीन नायब राज्यपाल किरण बेदी यांची कारकिर्द वादग्रस्त ठरल्यामुळे त्यांना काढून तमीळभाषक तमीलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुच्चेरीच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. अर्थात भाजपने किरण बेदींच्या आडून प्रदेशात आपले मिशन पूर्णत्वास नेले त्यामुळे प्रदेशात एन. आर. काँग्रेसबरोबर भाजपला पहिल्यांदाच सत्तेत सहभागी होता येईल.

पुद्दुचेरीच्या कराईकल जिल्ह्यातील एन. एच. 45 अ या 56 किलोमीटर महामार्गाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तसेच निवडणुकीच्या तोंडाशी नरेंद्र मोदी यांनी मेडिकल महाविद्यालयाच्या इमारतीचीही पायाभरणी केली. याशिवाय विविध प्रकल्प पुद्दुचेरीला देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

लोकांना भावनिक करून निवडणुकीत मते मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी निवडणुकांच्या आधी करोना लस घेऊन त्याचे भांडवल केले. अर्थात लस घेताना त्यांनी जी वेशभूषा करून लस घेतली त्याची चर्चा अधिक झाली. लस घेताना त्यांनी आसामी गमछा परिधान केला होता. लस टोचणाऱ्या नर्समध्ये एक नर्स पुद्दुचेरीची होती तर त्यांना साहाय्य करणारी दुसरी नर्स केरळची होती.

याशिवाय पक्षाने प्रभावशील प्रचारयंत्रणेचा वापर केला. केंद्रशासित प्रदेशाच्या प्रचारात नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामण यांच्यासह अनेक केंद्रीय नेत्यांच्या प्रचारसभा महत्त्वपूर्ण ठरल्या तर स्थानिक भाषेत मतदारांना आकर्षित करण्यात एन. रंगास्वामी यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

काँग्रेसच्या पराभवाची कारणे 
2016च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 15 जागा आणि 31 टक्के मते मिळाली होती. त्यात घसरण होऊन दोन जागा आणि 16 टक्के मते प्राप्त झाली आहेत. ही घसरण झाल्यामुळे काँग्रेसला तिथे पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवाची काही कारणे सांगता येतील.

पहिले कारण म्हणजे पुद्दुचेरीतील निवार चक्रीवादळानंतर राहुल गांधी यांनी प्रदेशाच्या दौऱ्यावर जाऊन मासेमारी करणाऱ्या समूहाची भेट घेऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. निवार चक्रीवादळानंतर ज्या समस्या उद्‌भवल्या त्या स्थानिक भाषेत राहुल गांधी यांना त्या दौऱ्याच्या वेळी प्रदेशातील जनता सांगत होती. त्या वेळी नारायणसामी यांनी त्या समस्यांचे चुकीचे भाषांतर करून राहूल गांधी यांना सांगितले मात्र नारायणसामी यांनी केलेली चूक दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांतून आणि माध्यमांतून काँग्रेसच्या लक्षात आली. इथूनच काँग्रेसने आपला जनाधार गमावण्यास सुरुवात केली.

दुसरे कारण म्हणजे दक्षिणेतील केरळमध्ये व तमीळनाडूमध्ये प्रचार करण्यात व्यग्र असणारे राहुल गांधी हे नारायणसामी यांच्या वर्तनामुळे नंतर पुद्दुचेरीच्या प्रचाराकडे फिरकले नाहीत. तिसरे कारण म्हणजे  तत्कालीन नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या वर्तणुकीचा फायदा काँग्रेसला पूर्णपणे घेता आला नाही.

चौथे कारण असे की, नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात फ्लोअर टेस्टमध्ये पूर्णतः अपयशी ठरले. त्यांच्या या ढिसाळ कारभाराचा फटका काँग्रेसला बसू शकतो अशी शक्यता वर्तवून या निवडणुकीत काँग्रेसने तत्कालीन मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना उमेदवारी न देता त्यांच्याकडे निवडणुकीच्या प्रचाराचे व नियोजनाचे काम सोपवले त्यामुळे काँग्रेसकडे असलेला जनाधारही कमी झाला. तरीही नारायणसामी यांना उमेदवारी दिली असती तर नायब राज्यपालाच्या कारवायांमुळे सरकार पडल्याची सहानुभूती मिळून ते काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ करू शकले असते. 

पाचवे कारण म्हणजे या निवडणुकीत व्ही. नारायणसामी यांना तिकीट नाकारून पक्षाने मोठी चूक केली हे या निकालावरून स्पष्ट झाले कारण काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार (चेहरा) नसल्यामुळे मतदारांची निराशा झाली. मतदारांची ही निराशा दूर करून काँग्रेसचा जनाधार कायम ठेवण्यात पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते वा मंत्री अपयशी ठरले.

द्रविड पक्षाची भूमिका 
राज्यात द्रविड पक्षाचा प्रभाव कमी झाला आहे. एके काळी सर्वाधिक जागा जिंकणारे पक्ष म्हणून त्यांची ओळख होती. या निवडणुकीत द्रविड पक्षांना राज्यात सहापेक्षा अधिक जागा मिळवता आल्या नाहीत. अर्थात ही जागा आता राष्ट्रीय व इतर प्रादेशिक पक्षांनी घेतली आहे का... असा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने पडल्यावाचून राहत नाही कारण या निवडणुकीत केवळ द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाला सहा जागा आणि 19 टक्के मते मिळाली तर अण्णाद्रमुक पक्षाने सर्व जागा गमावल्या. गेल्या तीन दशकांत पक्षाने प्रथमच सर्व जागा गमावल्यामुळे अण्णाद्रमुकचे नेतृत्वही या कामगिरीबद्दल समाधानकारक दिसून येत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकला चार जागा आणि 17 टक्के मते मिळाली होती. त्यात आता घट होऊन शून्य जागा आणि चार टक्के मते मिळाली. डीएमडीकेसारख्या द्रविड पक्षाला राज्यात केवळ 2524 मते मिळाली आहेत. प्रदेशात द्रविड पक्षांनी आपला प्रभाव गमावल्याचे यातून दिसून येते. 

राखीव जागांचा निकाल
पुद्दुचेरीत तीसपैकी पाच मतदारसंघ राखीव आहेत. पुद्दुचेरी जिल्ह्यात एकूण 23 जागांपैकी चार जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत तर कराईकल जिल्ह्यात एकूण पाच जागांपैकी केवळ एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. माहे आणि यनाम या जिल्ह्यांत प्रत्येकी एक-एक जागा खुली आहे. पुद्दुचेरी जिल्ह्यातील चार राखीव मतदारसंघापैकी थिरुभुवनाई (अ.जा.) या राखीव मतदारसंघात अपक्ष, उसूडू (अ.जा.) या मतदारसंघात भाजप, अम्बालम (अ.जा.) व कराईकल जिल्ह्यातील नेदुंगडू (अ.जा.) या दोन मतदारसंघांत एन. आर. काँग्रेसला विजय मिळाला... तर काँग्रेसने केवळ नेट्टापक्कम (अ.जा.) या राखीव मतदारसंघात विजय मिळवला. केंद्रशासित प्रदेशात 36 महिलांनी निवडणूक लढवली. त्यांपैकी एन. आर. काँग्रेसच्या केवळ एका महिला उमेदवाराला विजय मिळवता आला. तसेच 10 मुस्लीम उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यांपैकी द्रमुकच्या केवळ एका मुस्लीम उमेदवाराला विजय मिळवता आला. 

एके काळी दक्षिण भारतात काँग्रेसचे वर्चस्व होते. आज पुद्दुचेरीसारखा एक लहान प्रदेशही त्यांच्याकडे उरला नाही त्यामुळे भाजप हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे ज्याचे प्रत्येक राज्यात अस्तित्व टिकले आहे... तर दुसरा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस. अर्थात समकालीन परिस्थितीत राज्य व केंद्रशासित प्रदेशातून काँग्रेसची प्रासंगिकता कमी होत आहे. पुद्दुचेरीच्या सत्तेत भाजप सहभागी होत असला तरी त्याला स्वतःचा जनाधार निर्माण करता आलेला नाही कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. सामीनाथन यांनाच पराभवाला सामोरे जावे लागले. 

भाजपकडून निवडून आलेल्या सहा उमेदवारांपैकी चार उमेदवार काँग्रेसमधून आले आहेत 1990मध्ये पुद्दुचेरीच्या विधानसभेचे प्रतिनिधित्व भाजपने केले होते तर आता दक्षिणेतील राज्याच्या सत्तेत एन. आर. काँग्रेससोबत त्यांना भागीदार म्हणून काम करता येईल. काँग्रेस पक्षातून बाहेर पडून स्वतंत्र एन. आर. काँग्रेस पक्ष स्थापन करून चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एन. रंगासामींप्रमाणे पुढील काळात व्ही. नारायणसामी यांनी पक्षातून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास आश्चर्य वाटू नये... त्यामुळे येत्या काळात काँग्रेसने राज्यात नवनेतृत्वाचा शोध घेणे आवश्यक वाटते.

- राजेंद्र भोईवार
brantapur09@gmail.com

(संशोधक विद्यार्थी,  राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.)


'पाच राज्यांतील विधानसभा निवडणूका- 2021' या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Tags: लेख लेखमाला निवडणुका पाच राज्यांतील निवडणुका - 2021 पुद्दुचेरी एन. रंगासामी राजेंद्र भोईवार Series Election Puducherry N. Rangasamy Rajendra Bhoevar Load More Tags

Comments: Show All Comments

राजेंद्र भोईवर

प्रविण जाधव, पियुश, जितेश, राजू गायकवाड आणि सुहास नाईक यांचे मनपूर्वक आभार.

प्रविण जाधव

सर्व मुद्यांना स्पर्श करणारा लेख निवडणूक निकालापूर्वीचा लेख सुद्धा वाचला सर. या दोनही लेखांच्या माध्यमातून पुद्दुचेरी राज्याची राजकीय प्रक्रिया अगदी व्यवस्थितपणे समजून घेता आली. धन्यवाद राजेंद्र भोईवार सर.

Jitesh Bhoiwar

Very nice

Piyush Telang

Good observation and study between multiple political parties.

Raju Gaikwad

सुंदर लेख सर

Suhas Naik

भोईवार सर खुप छान मांडणी. पंतप्रधान मोदींची कृती राजकीय प्रभावित असते. वेशभूषा, आहार यामधून ते मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. लस घेतानाची त्यांची कृती राजकीय अभ्यासक म्हणून आपल्या निरिक्षणातून सुटली नाही.

Add Comment