साहित्य संमेलन खुजे वाटले नाही !

93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून लिहलेल्या चार भागांच्या लेखमालेतील हा शेवटचा लेख

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून उस्मानाबाद येथे सुरुवात झाली. 10, 11 व 12 जानेवारी अशा तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचा ‘आंखो देखा हाल’ कर्तव्यच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश पोकळे यांचे संमेलनात दिवसभरात घडलेल्या आणि अनुभवलेल्या घटनांचा वेध घेणारे तीन लेख सलग तीन दिवस प्रसिद्ध केले गेले. या मालिकेेेतील हा चौथा आणि शेवटचा लेख.

गेले तीन दिवस ज्या साहित्य सोहळ्याने उस्मानाबादनगरी गजबजून गेली होती त्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. कुठे समाधानी चेहऱ्याने तर कुठे गहिवरून आलेल्या मनाने साहित्यप्रेमींनी निरोप घेतला तो 'या संमेलनाने काय दिले' या प्रश्नाला जन्म देऊन.

तीन दिवसीय संमेलनाचा वृत्तांत आम्ही रोजच्या रोज आपल्यासमोर मांडलाच आहे. या साहित्य संमेलनावर वारंवार टीकाही होत होती. बरं ही टीका सर्वसामान्यांकडून नव्हे तर साहित्यविश्वाच्या शिखरावर पोहचलेल्या व्यक्तींकडून केली जात होती. आणि अशा दखलपात्र व्यक्तींनी टीका केल्यामुळे साहित्य संमेलनाविषयी आधीच वाईट असणारी काहींची मते आणखीनच गडद होत गेली आणि साहित्य संमेलनाच्या मांडवातील जाणकार साहित्यिकांची गर्दी कमी झाली.

गेले तीन दिवस या साहित्य संमेलनात वावरताना जाणवलेली बाब म्हणजे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर टीका करणाऱ्या- याचा-त्याचा बाजार म्हणत नाके मुरडणाऱ्या- मंडळींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाव न ठेवता अखिल भारतीय मराठी साहित्यिकांना नावे ठेवावीत. कारण साहित्यिकांमध्ये अनेक कारणांनी मतभेद, हेवे-दावे असतात, आर्थिक हितसंबंध असतात, काहीजण आपले स्थान मजबूत करण्यासाठी धडपडत असतात. म्हणून टीकाकारांनी साहित्यिकांवर जरूर टीका करावी, पण टीकेचा रोख संपूर्ण साहित्य संमेलनावर का असावा?

ताकदीचे कितीतरी साहित्यिक, लेखक यावर्षीच्या साहित्य संमेलनातही आलेच नाहीत. पण त्यांच्या अनुपस्थितीमुळे हा सोहळा खुजा वाटला नाही. तो पूर्णतः 'अखिल भारतीय' या शब्दाला साजेसाच होता. संमेलन परिसरातील शेतांत हरभरा, ज्वारी, गहू आदि पिके चांगली बहरून आलीत, कुणाचे फवारणीचे काम सुरू होते तर कुणी या पिकाला पाणी देण्याचे काम करत होते. हे त्यांचे काम रोजचेच. येथील शेतकरी महिलांना वर्षानुवर्षे घर आणि शेती यांच्याबाहेर डोकावण्याची सवडही मिळत नसते. त्या महिला आपल्या लेकरा-बाळांसह या तीन दिवसीय सोहळ्यात उत्साहाने सामील झालेल्या दिसल्या. त्यातल्या बऱ्याच माता-माऊलींना अक्षर ओळख नसली तरी पुस्तकांचे, नाटकाचे, कवितांचे मोठे कुतूहल त्यांच्या चेहऱ्यावर अगदी फुलून आलेले दिसले.

कुणी पुण्या- मुंबईची मुलगी आली की घटकाभर तिच्या केसांकडे, ड्रेसकडे मोठ्या आश्चर्याने पाहणाऱ्या इथल्या पंजाबी ड्रेसमधल्या मुलीही मोठ्या संख्येने बाहेर पडलेल्या दिसल्या. कारण  इथल्या मुलींना शहरातल्या मुलींप्रमाणे इच्छा होईल तेव्हा सिनेमाला, नाटकाला, पुस्तकांच्या दुकानात किंवा अन्य कार्यक्रमाला जाता येत नाही. अशा सांस्कृतिक पातळीवर गुदमरलेल्या मुला-मुलींनी या तीन दिवसांत मोठ्या आनंदाने मोकळा श्वास घेतलेला पाहायला मिळाला.

आज अशा ग्रामीण भागात कित्येक तरुण-तरुणी आहेत त्यांना वाचनाची मोठी आवड आहे. मात्र, कुठले पुस्तक वाचावे हे माहिती नसते, किंवा माहीत असले तरी ते उपलब्ध नसते. काहींना नाटकं पहायची असतात, पण पाहता येत नाहीत. आपण वाचलेल्या पुस्तकाचे लेखक, पाहिलेल्या नाटकांचे लेखक भेटावेत, त्यांच्याशी बोलता यावं अशी कित्येकांची तीव्र इच्छा असते , काहींना तर फक्त लांबून त्यांना पाहण्यातच मोठा आनंद असतो. त्या कित्येक तरुण-तरुणींच्या मनात साचलेले कुतूहल, या साहित्य संमेलनाने मोकळे झालेले पाहायला मिळाले. अनेक मोठे लेखक, नाटककार, कादंबरीकार, कवी मंडळी मुंबई, पुणे नागपूर व अन्य मोठ्या शहरांत वास्तव्याला असल्याने त्यांची समोरासमोर भेट होणे तसे कठीण असते. ते या साहित्य सोहळ्याने बरचसे सोपे केले.

मोठ्या साहित्य विश्वात नावाजलेले नसले तरी दुर्लक्षित करता येणार नाहीत असे कितीतरी नवतरुण लेखक आपल्या-आपल्या आदर्श लेखकाला शोधत होते, भेटेल त्या साहित्यिकाशी चार शब्द बोलून आपल्या मोबाईलमध्ये ही भेट कैद करून ठेवत होते. तसेच ज्यांचे लिखाण आपल्याला भावलेय त्या लेखकाचे मनोगत (ज्या कुठल्या कार्यक्रमात सहभाग आहे तो) मन लावून ऐकत होते. परिसंवाद असो, चर्चासत्र असो, किंवा प्रकट मुलाखत असो. त्यातले महत्वाचे मुद्दे आपल्या डायरीत लिहून घेत होते. कुतूहलाने भारावून गेलेल्या तरुण-तरुणींसह अनेक लहान थोरांनीही हे सगळे कार्यक्रम आपल्या क्षमतेनुसार  आपापल्या ओंजळीत सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळाला.

उस्मानाबादनगरीसह पूर्ण जिल्हा पाण्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी, शेतीच्या उत्पादनासाठी, व्यापार-उद्योगांसाठी कायम तहाणलेलाच असतो. हा प्रदेश सांस्कृतीकदृष्ट्याही तितकाच तहानलेला आहे हे या तीन दिवसांच्या साहित्य सोहळ्याने दाखवून दिले. गरिबीतली जाणीव आणि जाणिवेतली माया या नागरिकांनी तीन दिवस कायम तितक्याच उंचीची ठेवली. पुस्तकांच्या दुकानांत, चर्चासत्राच्या, कविकट्ट्याच्या वा नाटकाच्या व्यासपीठासमोर कायम ओथंबून वाहणारी गर्दी पाहायला मिळाली. मग सांगा तुम्हीच, का नाव ठेवावीत या साहित्य सोहळ्याला?

अध्यक्ष कोण, स्वागताध्यक्ष कोण, उदघाटक कोण किंवा निमंत्रित कोण अशा कित्येक मुद्यांवर वादविवाद, मतभेद, निषेध नोंदवता येऊ शकतो. मानवी स्वभावाच्या भिन्न स्वभाव वैशिष्ट्यावर पूर्णतः एकमत असणं हे कोणत्याच काळात शक्य होणार नाही. त्याला भूतकाळही अपवाद नाही आणि भविष्यकाळही अपवाद असण्याची शक्यता नाही. त्यामुळे थेट साहित्य संमेलनाला दूषणं देऊन, त्यावर नको त्या भाषेत टीका टिप्पणी करून मोकळे होणाऱ्या विद्वानांनी हे असे नको, हे असे असायला हवे अशी विधायक भूमिका मांडायला हवी. आपल्याला ज्या भाषेने लेखक, साहित्यिक, कलाकार म्हणून समृद्ध केले तिच्या या वार्षिक सोहळ्यात हिरीरीने सहभागी व्हायला हवे. तरच या भाषेचा आणि आपण मिरवत असलेल्या साहित्यिकपणाचा खरा सन्मान होईल ना?

संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची संमेलनाच्या पाच दिवस आधीपासून तब्बेत खराब होती. मात्र त्याचा परिणाम त्यांच्या भाषणात तसूभरही जाणवला नाही. "विद्यार्थ्यांची डोकी फुटत असताना गप्प कसे बसू" असा परखड सवाल व्हीलचेअरवर बसलेल्या अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केला, तेव्हा सुमारे सहा ते सात हजार लोकांनी भरलेला मंडप भयाण शांततेत बुडालेला पाहायला मिळाला. मात्र, वारंवार खोकल्याच्या अडथल्याने आणि पाठीला त्रास जाणवत असल्याने अध्यक्षांनी आपले भाषण आवरते घेतले. या संमेलनात आणखी लक्षात राहील ते मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी उद्घाटनाच्या सत्रात केलेले भाषण.

त्यांनी निकोप वाङ्मयीन चळवळीची अपेक्षा व्यक्त करून, अशा चळवळी उभारण्याचे आवाहन केले. तसेच एकही परभाषिक साहित्यिक संमेलनाला निमंत्रित केला नसल्याविषयी त्यांनी खेदही व्यक्त केला. त्याबरोबरच विशिष्ट विचारांनी भरलेल्या संघटनांनी निर्माण केलेल्या संभ्रमला शरण जाणे हे जसे खेदजनक आहे, तसेच कायम या ना त्या कारणाने प्रत्येक वर्षी संमेलनाचा वाद निर्माण होणे ही निषेधार्हच आहे, असेही त्या म्हणाल्या. आपण वेगवेगळे झेंडे खांद्यावर घेतले म्हणजेच आपण विचारी आहोत असे नाही, तो खरा विवेक नव्हे; संवादशक्ती आणि आत्मशक्ती गमावलेला एक भयभीत समाज ही आपली खरी ओळख नसायला हवी असे साडेतोड मतही त्यांनी नोंदवले. कोणतीही संस्कृती ही आरोळी देणाऱ्यांच्या, धाक दाखवणारांच्या, धमक्या देणाऱ्यांच्या किंवा बळजबरी करणाऱ्यांच्या आक्रमकतेवर तरत नाही. साध्या सामान्य माणसांच्या तत्वशील मुल्यांवर आणि ज्ञानवंतांच्या सशक्त विचारांवर ती तरलेली असते असे, सडेतोड भाष्यही त्यांनी केले.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी एका खासगी वृत्तवाहिनीने त्यांना ‘देशात हिटलरशाही आहे का?’ असा प्रश्न केला, तेव्हा त्यांनी ‘देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर नाही’ असे उत्तर दिले होते. त्यावर प्रसारमाध्यमांतून उलटसूलट चर्चा सुरु झाली आणि अरुणा ढेरे यांच्यावर जोरदार टीकाही झाली. ‘त्या’ विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला असा खुलासा त्यांनी नंतर केला. मात्र मूळ विधान, त्याचे संदर्भ व त्याचे स्पष्टीकरण/ अन्वयार्थ याबबत ठोसपणे अद्याप काही पुढे आलेले नाही.

बाकी हा मायमराठीचा तीन दिवसांचा उत्सव मराठी भाषेला, मराठी माणसाला आणि साहित्याची आवड असणाऱ्याला एका उंचीवर घेऊन जाईल हे नक्की!

- गणेश पोकळे
(ganeshpokale95@gmail.com)

Tags: Marathi अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य गणेश पोकळे Load More Tags

Add Comment