93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून उस्मानाबाद येथे सुरुवात झाली. 10, 11 व 12 जानेवारी अशा तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचा ‘आंखो देखा हाल’ कर्तव्यच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश पोकळे यांचे संमेलनात दिवसभरात घडलेल्या आणि अनुभवलेल्या घटनांचा वेध घेणारे तीन लेख सलग तीन दिवस प्रसिद्ध केले गेले. संमेलनाच्या आजच्या शेवटच्या दिवसाचा आढावा घेणारा हा लेख.
तीच बोचरी थंडी सुटलीये सगळीकडे. सकाळचे सात वाजलेत. हिवाळ्यात ही वेळ म्हणजे कुणाची अंगावर दोन गोधडी घेऊन गुरफटून झोपण्याची, कुणाची अंगात स्वेटर, कानटोपी घालून फिरायला जाण्याची तर कुणाची शेकोटी करून गप्पांचा फड रंगवण्याची ही वेळ. मात्र, इथे काही हिवाळा किंवा त्यातली थंडी जाणवत नाहीये. शहरातले नागरिक आपापल्या दैनंदिन कामाला धावतायेत. शेतकरी शेतातली सकाळची काम उरकून घरी चाललेत. तर कुणी चहाच्या टपरीवर गप्पा मारत बसलेत. समोर गेली दोन दिवसांपासून गजबजून गेलेल्या साहित्य महोत्सवाच्या मांडवात सनई चौघाड्यांची गाणी वाजतायेत. रोजच्या कामात व्यस्त असलेल्या उस्मानाबाद नगरीतल्या नागरिकांना साहित्य महोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आहे हे माहीत नसले तरी ही सनई चौघाड्यांची गाणी समारोपची आठवण करून देतायत. समारोपचा दिवस असल्याने आयोजकांची धावपळ सुरुये. पुस्तक विक्रेते रात्री आवरून ठेवलेली पुस्तके विक्रीसाठी रॅकवर वर्गवारीनुसार रचून ठेवतायेत. काहींची झाडझुड सुरूये. तर काही नाष्टा करण्यासाठी भोजनकक्षाकडे धावलेत.
सकाळचे दहा वाजलेत. साहित्य उत्सवाच्या मंडपात "आजच्या लक्षवेधी लेखकांशी संवाद" या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटेंसह किरण येले, संजय कळमकर, बालाजी सुतार, किरण गुरव यांच्याशी संवाद सुरूये... 'आपण कुठल्या जाणिवेतून कथा लेखनाकडे वळलात, आपल्याला आजच्या सामाजिक स्थितीबद्दल काय वाटते' असे प्रश्न प्रा. दत्ता घोलप या कथा लेखकांना विचारतायेत. यावर उत्तर देताना ही कथाकार मंडळी आपल्याला जाणवलेल्या अनुभवांची शिदोरी इथे मोकळी करतोय, कुणी स्वजाणिवेचा अनुभव विशद करतोय तर कुणी एकमेकांवर कुरघुडीही करतोय. समोरची प्रेक्षकसंख्या मात्र गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत जरा पातळ झालीये. बऱ्याच रिकाम्या खुर्च्या चमकतायेत. विषयांची जाणीव असणारे आणि साहित्याची गोडी वाटणारे सोडले तर फार कुणी या मंडपात आढळत नाहीये.
सुट्टीचा दिवस असल्याने विध्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढलीये. शेवटचा दिवस असल्याने पुस्तक खरेदी करायला लहानग्यांसह मोठ्यांनीही गर्दी केलीये. तर समोरच्या कविकट्टा व्यासपीठावर कविता रंगल्यात.
"प्रत्येकाच्या नावापुढं नवा एक देव आहे, अस्तित्वात नसूनही त्याला किती भाव आहे...
कोंबडी, बोकड, पंचपकवन सारा किती थाट आहे,
पण खात काही नसतानाही मान त्याला पहिला आहे...
भूक मात्र कुठेतरी अनवाणी फिरत आहे,
तिकीट घेऊन याला पाहायला भली मोठ्ठी रांग आहे,
म्हताऱ्या आईवडिलांना पाहायला मात्र खूप कमी वेळ आहे...
लेकरं, बाळ, संसार काही नसतानाही याला देणगीदारांची साथ आहे,
लेकरांना शिकवताना, उजवताना बाप माझा का फाशी जात आहे...
अशा कवितांचा कार्यक्रम बहरलाय. तसेच पुस्तकांच्या दुकानामागील सेतूमाधवराव पगडी साहित्य मंचावर लहान विद्यार्थ्यांच्या बाल नाट्याचा कार्यक्रम सुरूये तर दुपारचे एक वाजून गेल्याने बरेचजण जेवायला गेलेत तर काही जेवण करून पुस्तकाच्या दुकानांत, कार्यक्रमात, आपल्या मित्रांसोबत बसलेत गप्पाटप्पा करत...
पहिल्या दिवसाचे कुतूहल, तो उत्साह, ती लगबग ते मराठमोळ्या गाण्यांचे आवाज आता येत नाहीयेत. काहीसं मरगळलेपण सगळ्याच व्यासपीठाच्या समोर पसरलंय. दुपारचे चार वाजून गेलेत. थंडीतले चटक्याचे ऊन थोडं निवळलय. साहित्य विश्वातले लेखक, साहित्यिक, कवी, कथाकार, आपल्या-आपल्या कार्यक्रमासाठी हजेरी लावून वापस फिरल्याने या साहित्यातील मंडळींपेक्षा साहित्याची आवड असणारे इकडे तिकडे फिरतायेत. तर काही घराकडे निघालेत. दूरवरून आलेली मंडळी या तीन दिवसांत झालेल्या नवीन मित्र-मैत्रिणींना आपुलकीने भेटतोय आणि पुन्हा भेटू म्हणून बसस्थानकाडे निघालाय. दिवसभर दिसत होती ती गर्दी आता नाही. पुस्तकांच्या दुकानांसह व्यसपीठासमोरील खुर्च्याही रिकाम्या झाल्यात. स्थानिक लोकांसह आजूबाजूचे लोकं सोडले तर बाकी दूरवरून आलेल्या साहित्यप्रेमींनी, रसिकांनी, आणि साहित्यिकांनी परतीची वाट धारलीये. येताना एक पिशवी घेऊन आलेले हे साहित्य रसिक जाताना पुस्तकांच्या ब्यागा घेऊन चाललेत पुन्हा असेच साहित्य मेळ्यात भेटू या निरोपासह...
तर असा होता या साहित्य सोहळ्याचा तिसरा आणि निरोपाचा दिवस. तो आता मावळतीकडे सरकलाय आणि आम्हीही बस्थानकाकडे निघालोत तर चला भेटुयात पुन्हा अशाच साहित्य मेळ्यात...
तोपर्यंत नमस्कार!
- गणेश पोकळे
(ganeshpokale95@gmail.com)
हे पण वाचा:
उत्सव 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस
Tags: Marathi अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य गणेश पोकळे Load More Tags
Add Comment