मुलांच्या इंटरनेट वापराचं कौतुक करायचं की काळजी?

गैरवापर वाढला की त्याचं व्यसनात रूपांतर होतं

14 नोव्हेंबर बालदिनानिमित्तानं लहान मुलांच्या जगात मोठ्यांना सजगपणे डोकावता यावं, त्यांचं भावविश्व आणि मनोविश्व समजून घेता यावं या उद्देशानं कर्तव्यवर दोन लेख प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी मुलांच्या चित्रांच्या आकलनाविषयीचा रंजना बाजी यांचा लेख काल प्रसिद्ध झाला असून, तो इथं वाचता येईल. तर, मुलांच्या स्मार्टफोन वापराबाबतचा दृष्टिकोन देणारा लेख आज प्रसिद्ध करत आहोत.

कुणी तान्हुला हातात मोबाइल घेऊन बटणांवर टकटक हात फिरवून कानाला लावतो... कुणी जरासं मोठं मूल मोबाइलच्या सर्चबारवर बोलून एखादी कमांड देतं..अन्‌ धडाधड साइट्स, यूट्यूब असं हवं ते ओपन होतं... काही मुलं मोबाइल पाहतच जेवतात. मुलं तासन्‌तास एका जागी शांत बसून राहतात, जर त्यांच्या हातात मोबाइल असेल... काही जण गेम्समध्ये इतकी एक्सपर्ट की त्यांच्या पार केलेल्या लेव्हल्सची गिनतीच नसते.

ज्या ज्या घरात हे चित्र आहे त्या त्या घरातल्या पालकांना आपल्या मुला-मुलींचं कौतुक असतं. आपलं इटुकलं पिटुकलं मूल असो वा जरा मोठं; आपलं मूल किती हुशार आहे, किती टेक्नॉसॅव्ही- याची भारंभार स्तुती पालक स्वत:च मुलांसमोर करतात. हळूहळू पालक कौतुकाच्या गाडीवरून चिडचिडीकडं घसरू लागतात आणि मग मुलांचं स्मार्टफोन वापरणं ही गोष्ट पालक स्वत:ची डोकेदुखी करून घेतात.

सध्या आबालवृद्धांमध्ये स्मार्टफोनचा वापर ही चिंतेची बाब होत आहे. जगभरच स्मार्टफोन/गेमिंगचं व्यसन वाढत असल्याचं जागतिक स्तरावरच्या दोन महत्त्वाच्या संस्थांनी नोंदवलं आहे. ती म्हणजे अमेरिकन सायकॅट्रिस्ट असोसिएशन आणि जागतिक आरोग्य संघटना. अमेरिकन सायकॅट्रिस्ट असोसिएशन या मानसिक आजारांचं वर्गीकरण करणार्‍या संस्थेनं या प्रकारच्या व्यसनाला ‘इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर’ (आयएडी) असं नाव दिलं आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) याला ‘गेमिंग डिसऑर्डर’ म्हटलं आहे. जागतिक पातळीवरच्या दोन महत्त्वाच्या संस्थांना दखल घ्यावी लागते आहे इतपत या आजाराचं प्रमाण आता वाढलेलं आहे, हे उघड आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात भारताबाहेरच्या देशांमध्ये या प्रकारचं ई-व्यसन अधिक होतं, पण गेल्या काही वर्षांत ते भारतातही बर्‍यापैकी वाढू लागलं आहे. विशेषतः लॉकडाउननंतर. लॉकडाउनमुळे शाळा ऑनलाइन आल्या. शाळाच नव्हे तर मुलांचं मनोरंजन, मित्रमैत्रिणींच्या भेटी, सोशलायझेशन हे सगळंच ऑनलाइन घडायला लागलं. त्यामुळे स्मार्टफोनसारखी वस्तू ही जीवनाचा अविभाज्य भागच बनली. खरं तर लॉकडाउनच्या आधीपासूनच मुक्तांगणकडे या केसेस वाढत होत्याच; पण लॉकडाउननंतर तर त्या अधिकच वाढायला लागल्या.

सध्याच्या काळात आपण आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. स्मार्टफोन, टीव्ही न वापरणं आपल्याला शक्यच नाही. ती आपल्या सर्वांची ‘गरज’ झालेली आहे. अशा वेळी एखादा जर स्मार्टफोन किंवा इंटरनेटच्या आहारी गेला असेल, तर त्याला आपण काय सल्ला दिला पाहिजे? एरवी दारू-सिगरेटचं व्यसन असणार्‍या व्यक्तींना व्यसनाधीनतेतून बाहेर पडण्यासाठी दारू-सिगरेट पूर्णतः बंद करण्यास सांगतो. पण स्मार्टफोन किंवा इंटरनेटच्या व्यसनाबाबतीत आम्हांला असा सल्ला देता येत नाही. आम्ही स्वतः जर ते रोज वापरतो तर आम्ही त्यांना वापरू नका असं कसं सांगणार? आणि मुलांच्या बाबत तर हा विषय अजून नाजूक होतो. ‘‘मोठी वापरतात तर आम्ही का नाही,’’ असा सवाल करणारच...अशा वेळी मुलांना या वस्तूंचा ‘वापर’ आणि ‘गैरवापर’ यांच्यातला फरक समजावून सांगावा लागतो. 

संवादासाठी, ऑनलाइन खरेदीसाठी, मनोरंजनासाठी आणि अशा इतर कित्येक कामांसाठी ही गॅजेट्स, इंटरनेट आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. नक्की किती वेळात आपलं काम होणार आहे हे आपल्याला माहीत असतं तरीही आपण आपलं काम करून त्यावर विनाकारण काहीतरी करत बसतो. आपल्याला हातातून मोबाइल सोडवत नाही. आणि याचं प्रमाण वाढत गेलं की त्याला आपण ‘गैरवापर’ म्हणू शकतो. जेव्हा आपण ‘वापरा’कडून गैरवापरा’कडे जातो तेव्हा ते धोक्याचं लक्षण असतं. शिवाय या गैरवापरामुळे आपल्या जीवनाच्या गुणवत्तेवर काही परिणाम झाला आहे का हे पाहणंही महत्त्वाचं असतं. वापर (युज) आणि गैरवापर (मिसयुज) याच्या पुढची पातळी असते ती व्यसनाची (अ‍ॅब्युज). गैरवापर वाढला की त्याचं व्यसनात रूपांतर होतं. मग त्या विशिष्ट वस्तूशिवाय जगणं अवघड होतं.

पण मुळात कुणालाही हे व्यसन का लागतं?
एखादा मुलगा स्मार्टफोनवर गेम खेळत असतो. त्या गेममध्ये आपण एखाद्याला मारायचं असतं. ज्या वेळी समोरच्याला गेममध्ये मारलं जातं त्या वेळी आपल्या मेंदूमध्ये डोपामाइनचा स्राव होतो आणि त्यानं खूप छान वाटतं आणि मग त्याची चटक लागते. डोपामाइनमुळे ते व्यसन लागतं. मग ज्यांना असं व्यसन नाही त्यांना डोपामाइन कधी मिळतं? एखादा छान आवडीचा पदार्थ खाल्ला, मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारल्या, गार पाण्याने अंघोळ केली तरीसुद्धा डोपामाइन स्रवतं. पण या सगळ्या कृतींतून ते संथपणाने स्रवत असतं. गेमिंगच्या व्यसनाबाबतीत मात्र पहिल्यांदा ती कृती करताना डोपामाइन अचानक पुष्कळ प्रमाणात स्रवतं आणि पुढं त्याची गरज निर्माण होते. मात्र ते तितक्या प्रमाणात स्रवत नाही. यातूनच त्या कृतीचं व्यसनात रूपांतर होतं. एखादी क्रिएटिव्ह गोष्ट आणि फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी यांची सवय शरीराला लागली की त्याच्यातून चांगल्या प्रकारे डोपामाइन स्रवतं आणि मग इतर गोष्टींची व्यसनं लागण्याची शक्यता कमी होते.

आता, मुलांच्या बाबतीत या व्यसनाचा विचार करण्याआधी पालकांनीही आत्मपरीक्षण करणं गरजेचं असतं. आपण स्मार्टफोन वापराच्या नक्की कुठल्या पातळीवर आहोत याचा विचार पालकांनी केला तरच ते मुलांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतात. आमच्याकडे आम्ही पालकांना सांगतो, ‘मुलांना आमच्याकडे आणण्याआधी तुम्ही स्वतः या. त्यानंतर आम्ही मुलांशी बोलू.’ बर्‍याचदा पालकांशी बोलताना असं लक्षात येतं की,पालकच स्मार्टफोन्सचा अति वापर करताहेत आणि मुलं तेच पाहत असल्यानं तीही नकळत त्यांचंच अनुकरण करताहेत. अशा वेळी पालकांनाच सांगावं लागतं, ‘‘तुम्हीच तुमचा वापर थोडा कमी करा, मुलांना जास्त वेळ द्या. आपोआप मुलांचा वापरही कमी होईल.’’

अलीकडे काही पालकही सजग झाले आहेत. ‘‘मुलांना स्मार्टफोन घेऊन देणार आहोत तर काय केल्यामुळे मुलांना त्याचं व्यसन लागणार नाही हे तुम्ही आम्हांला सांगा.’’ अशीही पालक विचारणा करतात. पालकांची ही मला खूप सकारात्मक गोष्ट वाटते. आम्ही पालकांना सांगतो की, मुलांना सोबत घेऊन आपण काही नियम करू या. जेणेकरून आपल्यावर हे नियम लादले गेले आहेत अशी मुलांचीही भावना होता कामा नये. नियमांमधे, उदा. जेवताना टीव्ही किंवा मोबाइल बघायचा नाही,  सगळ्यांनी गप्पा मारत जेवायचं, संध्याकाळी घरात फोन घेऊन बसायचं नाही, मोकळ्या हवेत खेळायला जायचं- अशा सूचना पालक सांगतात. अशा वेळी मुलंही सांगतात, ‘‘मग मोठ्यांनीही त्या वेळेला फोन घेऊन बसायचं नाही, त्यांनीही व्यायाम वगैरे करायचा.’’ रात्री दहानंतर फोन बंद करायचा असं ठरलं तर मग घरातल्या कोणीच रात्री दहानंतर फोनवर काही करायचं नाही असे काही नियम ठरवले जातात. विशेषकरून हे नियम बनवताना मुलं स्वत: सहभागी असल्यानं त्याचा त्यांना जाच वाटत नाही.

समुपदेशनासाठी येणार्‍या मुलांचीही पहिली दोन-तीन सेशन्स झाल्यानंतर असेच काही नियम आम्ही सगळे मिळून ठरवतो. पालकांना आम्ही आवर्जून एक गोष्ट सांगतो की, मुलांवर आपल्याला हे नियम लादायचे नाहीत, नियम करण्याच्या प्रक्रियेत आपल्याला त्यांना सहभागी करून घ्यायचं आहे. आणि जे नियम मुलांसाठीचे ते पालकांनी स्वतः पाळले तरच मुलं ते पाळतील. एकदा एक आई तिच्या मुलीला आमच्याकडे घेऊन आली होती. आई सांगत होती,‘‘ही संध्याकाळी खूप वेळ मोबाइलवर घालवते.’’ त्यावर ती मुलगी तावातावाने म्हणाली, ‘‘ही मला संध्याकाळी खाली खेळायला जा असं सांगते आणि स्वतः टीव्हीवर मालिका पाहत बसते, तुम्ही आधी तिला सांगा.’’ आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा मुलांचं आपल्याकडे जास्त लक्ष असतं त्यामुळे आपणच नियम पाळले तर मुलंही ते नक्कीच पाळतात.

काही वर्षांपूर्वी मी एका परिचितांकडे गेले होते. तिथल्या एका लहान मुलाशी मी सहज बोलत होते. मी त्याला विचारलं, ‘‘तुला कुठला खेळ आवडतो?’’ तो म्हणाला, ‘‘मला क्रिकेट आवडतं.’’ ‘‘अरे वा! मग कुठे खेळतोस?’’ तो म्हणाला, ‘‘ग्राउंडवर नाही, मी मोबाइलवर क्रिकेट खेळतो.’’ हे टाळण्यासाठी आम्ही पालकांना सुचवतो की मुलांना पळणं, पोहणं, खेळणं अशा काही ना काही शाररीक हालचालींची सवय लावा आणि त्याबरोबर कुठल्यातरी एखाद्या ॲक्टिव्हिटीचीही (कार्यानुभव) सवय लावा. त्यासाठी लगेच क्लास वगैरे लावण्याची गरज नाही, घरातच या गोष्टी करण्याची सवय त्यांना लागली पाहिजे. निदान त्यांना वाचनाची आवड लावा. अनेक घरांमध्ये मुलं तर नाहीच- पण पालकही अजिबात वाचन करत नाहीत. अशा वेळी आम्हांला त्यांना सांगावं लागतं की, अमुक एखाद्या पुस्तकातलं तुम्ही सर्वांनी रोज रात्री बसून एक एक प्रकरण वाचायचं. अशा उपक्रमांमुळे खूप फरक पडतो. आता फिरायला जायचं मटलं तरी काहींना वाटतं म्हणजे फक्त मॉलमध्ये जाणं, फिल्म बघायला किंवा जेवायला जाणं असं. कधीतरी तुम्ही टेकडीवर जा, कुठेतरी निरुद्देश भटकायला जा, असं आम्हांला सुचवावं लागतं. या सगळ्या गोष्टींमुळे मग हळूहळू बदल व्हायला लागतो. आधीपासूनच घरात या गोष्टी आपण सुरू केल्या असतील तर ते जास्त चांगलं ठरतं.

आमच्याकडे येणार्‍या केसेसमध्ये साधारण विशीतल्या आसपासच्या मुलांचं प्रमाण जास्त असतं, त्यांचे पालक मुलांना घेऊन येतात. मात्र हे व्यसन कुणालाही असू शकतं. अगदी दहा वर्षांची मुलं ते ऐंशी वर्षांचे आजोबा. चांगली गोष्ट म्हणजे, मुलं सतत मोबाइलवर आहेत किंवा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतोय यावरून पालकांना मुलांच्या व्यसनाधीनतेची लगेच जाणीव होऊ शकते.

अनेकदा पालकही मुलांच्या व्यसनासाठी जबाबदार असतात. ऑफिसमधून घरी आल्यावर मुलांना मोबाइल किंवा टीव्ही लावून दिला की पालकांना स्वतःसाठी थोडा वेळ मिळतो. आणि सुरुवातीला त्यांना बरं वाटतं की, हा आता काही कटकट करत नाही, त्यामुळे ते दुर्लक्ष करतात. अनेकदा लहान मूल जेवत नाही तेव्हा त्याला टीव्ही दाखवतात. मूल ती रंगीत चित्रं पाहून हिप्नोटाइज होतं आणि जेवतं. हळूहळू त्याला ती सवयच लागते. एवढ्याशा मुलाला आयपॅड कसा वापरता येतो, तो स्वतःहून यूट्यूबवर व्हिडिओ कसा लावतो आहे या सगळ्याचं पालकांना सुरुवातीला खूप कौतुक वाटतं; पण नंतर त्या सगळ्याचे नकारात्मक परिणाम जाणवायला लागतात. मग मुलांना फोन दिला नाही की ती अग्रेसिव्ह होतात. नीट जेवत नाहीत. मोठ्या मुलांच्या बाबतीत असं दिसतं की, त्यांचे परीक्षांतले गुण कमी व्हायला लागतात, ती ‘असोशल’ होतात. परक्या लोकांशी बोलायची सवय त्यांना राहत नाही.

पण हे परिणामही निदान दृश्य असतात; काही अप्रत्यक्ष परिणामही होतात. उदाहरणार्थ, अगदी लहान मुलांची कवटी पुरेशी विकसित झालेली नसते. फोन, वाय-फाय यांमधून सतत रेडिएशन्स येत असतात. खूप जणांना झोपताना उशाशी फोन ठेवायची सवय असते. ती अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. लहान मुलांच्या हातात रात्री फोन दिला जातो तेव्हा ती तो उशाशी ठेवून झोपी जातात. अशा वेळी त्यातून निघणारे रेडिएशन्स त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. प्रोढांइतकं विकसित कवटीचं संरक्षण त्यांना नसतं. या क्षेत्रात काम करणारे लोक सांगतात की, या सगळ्याचे दुष्परिणाम नक्की काय आहेत हे आपल्याला अजून पुरेसं कळलेलं नाही, ते कदाचित आणखी काही वर्षांनी कळणार आहेत. जे सतत कानात इयरफोन घालून गाणी ऐकत आहेत त्यांच्या कानांवर काही परिणाम होतो आहे का, जे सतत स्क्रीनकडे पाहत काम करतात त्यांच्या डोळ्यांवर काही परिणाम होतो आहे का, त्यांच्या मेंदूवर नक्की काय परिणाम होतो आहे, त्यांना मानसिक आजार होत आहेत का- हे आणखी दहा-पंधरा वर्षांनी आपल्याला कळू शकेल. पण कदाचित तेव्हा खूप उशीर झालेला असेल.

किंबरली यंग या मानसशास्त्रज्ञाने या विषयावर पहिल्यांदा संशोधन केलं. तंत्रज्ञानाच्या अतिवापराने असा काही प्रकार घडतो आहे हे सिद्ध करणारी ती पहिलीच मानसशास्त्रज्ञ होती. हे ठरवण्यासाठी तिनं एक मानसशास्त्रीय चाचणी तयार केली. ‘इंटरनेट अ‍ॅडिक्शन टेस्ट’ या नावाने आता ती इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. त्यात तिनं अनेक प्रश्‍न दिलेले आहेत आणि त्यांचं स्कोरिंग कसं करायचं तेही दिलेलं आहे. त्या-अनुसार तुमचा अमुक अमुक इतका स्कोअर आला तर तुमचा ‘वापर’ ठीक आहे पण अमुक इतक्यापेक्षा तो जास्त आला तर तुम्ही ‘गैरवापर’ करत आहात असे पडताळे तिनं दिलेले आहेत. आपण स्वतः प्रामाणिकपणे त्या प्रश्‍नांची उत्तरं नोंदवून आपण कुठल्या पातळीवर आहोत हे जाणून घेऊ शकतो. ‘‘तू मोबाइल किंवा लॅपटॉप खूप जास्त वेळ वापरतोस/वापरतेस,’’ असं समजा कुणी आपल्याला सांगितलं तर आपल्याला ते खटकतं. ‘‘हॅ! मी फक्त कामासाठीच ते वापरत असतो/असते,’’ अशी आपली पहिली प्रतिक्रिया असते. त्यामुळे एखाद्याविषयीचं आपलं निरीक्षण त्याला/तिला केवळ तोंडी सांगण्यापेक्षा ही चाचणी देता येईल. ही चाचणी लहानमोठ्या सर्वांनीच करून पाहायला हरकत नाही!
(शब्दांकन - सुहास पाटील)

- डॉ. मुक्ता पुणतांबेकर
puntambekar@hotmail.com

(लेखिका व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असलेल्या ‘मुक्तांगण’ या संस्थेच्या संचालिका आहेत.)


हेही वाचा : मुलांनी काढलेली चित्रं - कला नव्हे, आकलन प्रक्रिया

Tags: इंटरनेट व्यसन मुलांचे इ व्यसन मुक्ता पुणतांबेकर मुक्तांगण सुहास पाटील मोबाइल स्मार्टफोन mobile internet smartphone internet addiction mukta puntamekar muktangan Load More Tags

Add Comment