14 नोव्हेंबर बालदिनानिमित्तानं लहान मुलांच्या जगात मोठ्यांना सजगपणे डोकावता यावं, त्यांचं भावविश्व आणि मनोविश्व समजून घेता यावं या उद्देशानं आज आणि उद्या कर्तव्यवर दोन लेख प्रसिद्ध करत आहोत. मुलांना सहज शिक्षण मिळावे यासाठी रंजना बाजी या दीर्घ काळापासून कार्यरत आहेत. मुलांच्या चित्रांचा अर्थ उलगडून सांगणारा हा त्यांनी लिहिलेला लेख आज प्रसिद्ध करत आहोत.
मुलांच्या चित्रांकडे मोठे कसं पाहतात? ते नेहमीच मुलांच्या सहजपणे चित्र काढण्याला 'चित्रकला' या गटात नेऊन बसवतात आणि इथंच मोठी गल्लत करतात. यामुळं एक तर मुलांचं चित्र काढणं थांबू शकतं आणि दुसरं म्हणजे मुलांची सभोवतालची जग समजून घ्यायची जी स्वत:ची पद्धत असते तिला बाधा येऊ शकते.
जन्माला आल्यापासूनच मुलांचं भोवतालच्या जगाबद्दलचं कुतूहल सुरू झालेलं असतं. आपली ज्ञानेंद्रिये वापरत मूल जग समजून घ्यायचा प्रयत्न करत असतं. आजूबाजूला असणारी माणसं, प्राणी-पक्षी, घरं, इमारती, घडणाऱ्या प्रक्रिया या सगळ्या गोष्टी मुलांना आकर्षित करत असतात. मूल सतत त्यांचं निरीक्षण करत असतं. अनेक अनुभव घेत असतं. मुलांमध्ये उपजत खेळकरपणा असतोच. मुलं मग आपली निरीक्षणं आणि अनुभव यांची खेळकरपणे स्वत:च्या पद्धतीनं मांडणी करून बघतात. याला आपण मोठ्यांनी ‘मुलांचं खेळणं’ असं नाव दिलं आहे.
मुलांसाठी ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. अशा ‘खेळण्यातून’च मुलांना आपल्या सभोवतीच्या जगाचं आकलन होत जातं. मुलं त्यांच्या खेळण्यातून बऱ्याच गोष्टी शिकतात. उदा. वस्तूंचे आकार, गुणधर्म, वेगवेगळ्या प्रक्रिया, नातेसंबंध इ. बरोबर मुलांच्या सर्जनशीलता, कल्पकता, धाडस, चौकसपणा यांसारखे उपजत गुण आणि क्षमतांना बहर येतो. त्याचबरोबर सहकार्य, मोठ्यांनी लहानाची काळजी घेणं, समता, आहे त्या परिस्थितीत समाधानी असणं यासारख्या मूल्यांची निकोप वाढही त्यांच्या खेळातून होते. अर्थात, जेव्हा आजूबाजूच्या मोठ्या लोकांचं वागणं याच्या विपरीत असतं तेव्हा त्याचा परिणाम मुलांवर होतो. यासाठी मुलांना मोकळा अवकाश देणं गरजेचं आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. बहुतेक सजीवांची मुलं याच पद्धतीनं जग समजून घेतात.
मुलांचं असं सहज खेळणं (natural play) महत्त्वाचं आहेच. कारण तो आकलन प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर आजच्या काळात मुलांच्या भोवतालच्या परिसरात कागद, पेन्सिली, पाटी, खडू, रंग अशा गोष्टी सहज उपलब्ध असतात. मुलं जशी खेळण्यातून अनुभव, निरीक्षणं मांडतात तशीच ती कागदावर, भिंतींवर, जमिनीवर अशा कोणत्याही 2D प्रतलावर आपले अनुभव, निरीक्षणं रेखाटतात. हे सहज (natural) खेळणं आणि चित्र काढणं एक प्रकारे मुलांच्या मनन प्रक्रियेचा भाग आहे असं म्हणता येईल.
बरेच पालक या सहज प्रक्रियांबद्दल अनभिज्ञ असतात. त्यामुळं मुलांना सतत सूचना देणं, त्यांनी केलेल्या कामात, काढलेल्या चित्रात बदल, दुरुस्त्या सुचवणं, त्यांना ‘मदत’ करणं, चित्रं काढायला विषय देणं, तयार चित्रं रंगवायला देणं, तयार चित्रं बघून कॉपी करायला सांगणं अशा अनेक प्रकारांनी मोठी माणसं मुलांच्या या महत्त्वाच्या आकलन प्रक्रियेत बाधा आणत असतात. यासाठी पालकांनी, शिक्षकांनी आणि मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकानं मुलांचं सहज खेळणं आणि सहज चित्र काढणं समजून घेतलं पाहिजे.
काही वर्षांपूर्वी Existential Knowledge Foundation या संस्थेच्या माध्यमातून आम्ही एका शाळेत Re-imagining Schools या कार्यक्रमांतर्गत मुलांना जास्तीतजास्त मोकळेपणा दिला तर ती स्वत:च्या परिसराचं सहज (natural) आकलन कसं करून घेत असतात याबद्दल आम्ही नोंदी ठेवत होतो. मूल का, कसं आणि काय शिकतं याबद्दल संशोधन करत होतो. यात मुलांचं सतत, सखोल निरीक्षण करणं, त्यांना नकळत त्यांचे व्हिडिओ आणि इतर डॉक्यूमेंटेशन करणं या गोष्टी होत्या. यातून मुलांच्या सहज शिकण्याबद्दल बऱ्याच गोष्टी उलगडत गेल्या. मुलांचं खेळणं हा त्यांचा अंगभूत नैसर्गिक गुणधर्म आहे. पण मुलांचं चित्र काढणं तसं नैसर्गिक म्हणता येणार नाही. पण घरात, आजूबाजूला जेव्हा चित्र काढायला अनुकूल वातावरण असेल तेव्हा मुलं नक्कीच चित्र काढतात.
आपण मुलांनी काढलेलं चित्र ‘सुंदर दिसत’ आहे का याकडंच बघत बसतो. आपल्यासाठी ती एक वस्तू असते. चित्र हा एक कलेचा आविष्कार आहे हे आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. त्यामुळं त्याच पद्धतीनं आपण मुलांच्या चित्राकडं बघतो. पण मुलासाठी ती एक प्रक्रिया आहे. त्याला जसा अनुभव आला असेल, त्याचं जसं निरीक्षण असेल तसं ते चित्र असणार आहे. तिथं चित्र सुंदर दिसणं, रंगसंगती, प्रमाणबद्धता असणं हे बघणंच चुकीचं आहे. मुलाला काय दिसलं आहे, त्यानं कोणता अनुभव घेतला आहे आणि त्यातून त्याला काय समजलं आहे हे आपण जाणून घेणं म्हणजे मूल समजून घेणं!
आम्ही मुलांनी काढलेल्या चित्रांचा सविस्तर अभ्यास केला. नंतर आम्ही इतरही काही शाळांमध्ये असे प्रयोग केले. अशा चित्रांचा अभ्यास अजूनही सुरू आहे. आम्ही यात 3-3.5 ते 11 अशा वयोगटातल्या मुलांच्या चित्रांचा अभ्यास करत आहोत. यात मुलं चित्रं काढतानासुद्धा आम्ही त्यांचं निरीक्षण केलं. अनेक गोष्टी समोर आल्या. ही शाळा ग्रामीण भागातली होती त्यामुळं मुलांचे अनुभव आणि त्यांची मांडणी त्या प्रकारची होती.
यासाठी आधी बरीच तयारी करावी लागली. तिथल्या शिक्षकवर्गाला मुलांचं सहज खेळणं आणि सहज चित्र काढणं यांचं त्यांच्या आकलन प्रक्रियेत असलेलं महत्त्व समजावून सांगितलं. त्यांच्या कार्यशाळा घेतल्या. एका तरुण शिक्षिकेकडं वेगवेगळ्या आकारांचे भरपूर कागद आणि पेन्सिली ठेवल्या. मुलं मागतील तेव्हा तिनं ते द्यायचं. मुलांना पाहिजे तेव्हा मुलांना चित्र काढू द्यायचं. ‘चित्रकले'चा वेगळा तास असणार नाही. वर्गाच्या भिंती मुलांचा हात पोचेल तिथपर्यंत काळ्या ब्लॅकबोर्ड रंगाने रंगवून घेतल्या. मुलांना जमिनीवर आणि भिंतींवर चित्र काढण्यासाठी भरपूर खडू उपलब्ध केले.
मुलं जे बघतात, अनुभवतात तेच त्यांच्या चित्रात येतं. त्यामुळंच लहान मुलं चित्र काढतात त्यात माणसांचे चेहरे समोरून, विशेषत: डोळे त्यांच्या चित्रात असतात, तर पक्षी, प्राणी यांची बाजूनं काढलेली चित्रं (side profile) असतात. पण एकदा एका मुलीनं काढलेल्या म्हशीच्या चित्रात तिनं म्हशीचा चेहरा समोरून काढलेला दिसला. हे जरा वेगळं वाटलं म्हणून तिच्या आईला विचारलं, तर तिनं सांगितलं की, ही मुलगी घरातल्या म्हशीला रोज चारा घालते. त्यामुळं ती म्हशीला समोरून जास्त वेळ बघते. म्हणून हे अनुभव-चित्र!
एकदा चार-पाच वर्षांची मुलं मोठ्या हॉलच्या जमिनीवर खडूनं रेघा मारत पळत होती. काय झालं असं विचारलं तर म्हणाली, ‘‘बोअरिंगचं पाणी सुटलंय.’’ त्यांचं चित्र आणि खेळणं हे एकत्र चालू होतं. मुलांच्यासाठी हे भेद नसतातच. बोअरिंगला पाणी सुटल्यावर पाणी कसं वाहत जातं हा त्यांच्या कुतूहलाचा विषय होता. घरी, गावात बघितलेलं हे दृश्य मुलं पुनः मांडून बघत होती.
मुलांच्या चित्र काढायच्या प्रक्रियेची सुरुवात बरीचशी त्यांच्या बोलण्याचालण्याच्या प्रक्रियेसारखी असते. अगदी सुरुवातीला ती नुसतीच गिरगिटत राहतात. मग हळूहळू त्यात आकृत्या दिसायला लागतात. जसजसं त्यांचं चित्र काढणं वाढतं तसतसं या चित्र काढण्यात सुसंगती येते. जसजसं मुलांचं निरीक्षण सखोल होतं तसतसं त्यांच्या चित्रात बारीकसारीक तपशीलही दिसायला लागतात. रूढ अर्थानं ती दिसायला चांगली नसतील पण चित्र काढणाऱ्या मुलांना आपण कशाचं चित्र काढलं आहे ते नक्की माहीत असतं. कारण ती त्यांनी घेतलेल्या अनुभवाची मांडणी असते. त्याचमुळं आपण सुबक न दिसणारं अक्षर कसं चालवून घेतो आणि त्यातल्या आशयाला प्राधान्य देतो तसंच या चित्रांच्या बाबतीतही केलं पाहिजे, असं वाटतं. चित्रात काय मांडलं आहे हे महत्त्वाचं!
मग मुलं कल्पना करत चित्र काढत नाहीत का? नक्कीच काढतात. आम्ही मुलांची चित्रं बघत असताना अशी चित्रं मिळाली. नागपंचमीच्या नंतर मुलांच्या चित्रात झोके दिसायला लागले. एका मुलाच्या चित्रात एकाच फांदीला एकाशेजारी एक असे तीन झोके ओळीने काढले होते. त्याला विचारलं तर त्यानं सांगितलं की त्याच्या बहिणी त्याला झोका खेळायला देत नाहीत म्हणून त्यानं चित्रात प्रत्येकासाठी एक झोका काढला होता.
शाळेतल्या एका शिक्षिकेला दिवस गेले. बाकीच्या शिक्षिकांनी शाळेतच हौसेनं तिच्या ओटीभरणाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमात मुलंपण सामील होती. ताईच्या पोटात बाळ आहे हा संदेश मुलांपर्यंत गेला. मग लगेच चित्रं सुरू झाली. आधी ताईचंच पोटात बाळ असलेलं चित्र आलं. मग पक्ष्याच्या पोटात पिल्लू असलेलं चित्र कुणीतरी काढलं. नंतर एका मुलानं गायीच्या पोटात पिल्लू आणि पिल्लाच्या पोटात पिल्लू असं तीन पिढ्यांचं चित्र काढलं. दोन दिवस हे चाललं होतं.
मुलांच्या चित्रात गोष्टीसुद्धा असतात. त्या अर्थात त्यांच्या जगण्यावर/निरीक्षणावर आधारित असतात. एकदा एका मुलानं आंब्याच्या झाडाचं चित्र काढलं. त्यात त्यानं तीन आंबे आहेत असं सांगितलं. आम्हांला चित्रात एक अख्खा आंबा आणि एक नुसता देठ दिसत होता. तो म्हणाला, ‘‘एक आंबा पक्षी खाऊन गेलाय, एक खारीनं कुरतडला आणि एक झाडावर अजून राहिलाय.’’ म्हणजे त्याच्यासाठी चित्रात तीन आंबे होते आणि ते चित्र पूर्णच होतं.
मुलं ज्या परिसरात राहतात तोच त्यांच्या आकलनाचा संदर्भबिंदू असतो. या शाळेची मुलं खेड्यात राहत त्यामुळं त्यांचं आकलन, खेळणं, चित्र काढणं यांत ग्रामीण संदर्भ असत.
सध्या आम्ही शहरात राहणाऱ्या पालकांसोबत काम करतो. मुलं स्वत: शिकत असतातच. आपण फक्त योग्य अवकाश दिला पाहिजे हे त्यांच्यापर्यंत पोचवलं आहे. मुलांना चित्र काढण्यासाठी कागद पेन्सिलीसोबत घरातली एखादी भिंत मोकळी ठेवावी, फरशीवर मनसोक्त चित्रं काढू द्यावीत हा विचार त्यांच्यात रुजला आहे.
करोनाकाळात मुलं घरातच आहेत. त्यामुळं मुलांचं मनोरंजन करणं ही आपलीच जबाबदारी आहे असं पालकांना वाटलं होतं. त्यांना आम्ही आश्वस्त केलं. मुलं स्वत:तच कशी रमतात, बऱ्याच गोष्टी करत राहतात. आपण त्यांना योग्य वातावरण दिलं की त्यांना दुसरं काही लागत नाही. ते समजून घेण्यासाठी मुलांचं सखोल निरीक्षण करून नोंदी ठेवल्या पाहिजेत हे त्यांना पटलं आहे.
आम्ही या पालकांचे WhatsApp ग्रुप बनवले आहेत. त्यातून मुलं काय करतात त्याच्या नोंदी ते ठेवतात आणि एकमेकांशी शेअर करतात. यातसुद्धा मुलांची ‘सहज’ चित्रं बघायला मिळतात. शहरातल्या मुलांचे संदर्भ वेगळे असतील, पण चित्र काढायची प्रक्रिया सगळ्या मुलांची सारखीच दिसते.
आजूबाजूची जी परिस्थिती असते ती या मुलांच्या चित्रांत दिसतेच. करोनाकाळातली शहरी मुलांची चित्रं अशीच आहेत. त्यांच्या चित्रांत मास्क घालून बाहेर गेलेले आजोबा दिसतात, घरी राहून जाड झालेले आईवडील आहेत, एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर बोलणारे नातेवाईक आहेत. पहिल्या लॉकडाउनमध्ये सगळीकडं करोना व्हायरस कसा दिसतो याचं चित्र माध्यमात प्रसारित होत होतं. त्यामुळं मुलांच्या चित्रात करोना असायचाच. एका मुलानं तर आईनं भेंडी चिरून झाल्यावर टाकायला ठेवलेली देठं स्वत:च्या चेहऱ्यावर लावून आपला चेहरा हाच करोना आहे असं सांगितलं होतं.
मूल सतत आपल्या आजूबाजूच्या जगाचा अर्थ लावायचा प्रयत्न करत असतं. ही निसर्गानं त्याच्यात निर्माण केलेली ऊर्मी आहे. सहज खेळणं आणि साक्षरतेच्या संस्कृतीतून सुरू झालेलं सहज चित्र काढणं यासाठी मोठ्यांची भूमिका मुलांच्या या आकलनासाठी योग्य वातावरण निर्माण करणं एवढीच आहे. योग्य वातावरण तेच- ज्यात मुलांसाठी पूर्ण मोकळीक, निरपेक्ष प्रेम, विश्वास आणि शारीरिक आणि मानसिक सुरक्षितता मिळते!
- रंजना बाजी
dranjana12@gmail.com
Tags: चित्रकला सहज शिक्षण रंजना बाजी मुलांचे विश्व बालदिन 14 नोव्हेंबर drawing learning ranjana baji baldin 14 November Load More Tags
Add Comment