महाराष्ट्राला दिवाळी अंकांची मोठी परंपरा आहे. दरवर्षी अक्षरशः शेकडो दिवाळी अंक प्रकाशित होतात आणि त्यांतून असंख्य कथाही प्रसिद्ध होतात... मात्र कथालेखनामागे असणारी लेखकाची अस्वस्थता, त्याचे चिंतन यांविषयी क्वचितच लिहिले जाते. त्यामुळे 'माझा कथालेखनाचा अनुभव' याविषयावरील दोन लेख कर्तव्य साधनावरून आज आणि उद्या प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी इंदुमती जोंधळे यांचा हा एक लेख.
मराठी वाङमयातील अस्वस्थ आणि आश्वस्त करणारे आत्मकथन म्हणून इंदुमती जोंधळे यांच्या 'बिनपटाची चौकट' याचा समावेश होतो. या आत्मकथानापासून इंदुमती यांच्या लेखनप्रवासाची सुरुवात झाली. पुढे त्यांनी बेदखल, पाषाणनिद्रा, अस्वस्थ श्वासांची डायरी, स्तन्यसुक्त्त हे कथासंग्रह लिहिले. पापणीआड पाणी ही कादंबरी, फुलझडी हे बालनाट्य, निर्मोही ठसे हे व्यक्तिचित्रे, कर्मयोगी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे हे चरित्र ग्रंथ असे विविध प्रकारचे लेखन केले. लेखनप्रक्रिविषयीचे विशेषतः कथा या लेखनप्रकाराविषयीचे त्यांचे हे चिंतन...
आंबेजोगाई तालुक्यात वरवंड हे माझं मूळ गाव. माझ्या आईवडलांचा त्या काळात आंतरजातीय विवाह. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. माझे वडील शिक्षक होते. त्यांनीच गावात पहिली शाळा काढली होती. मी घरात थोरली. माझ्या पाठी दोन भाऊ, एक बहीण. आमचं जीवन सुखी, आनंदी होतं. वडलांचं एक वैगुण्य होतं ते संतापी स्वभावाचे होते. मी साधारण आठेक वर्षांची असताना घरगुती कारणांवरून वडील आईवर प्रचंड चिडले. त्याच भरात त्यांनी आईच्या पाठीत जात्याचा खुंटा मारला पण तिचं डोकं जाऊन जात्यावरच आपटलं. ती रक्तबंबाळ झाली. गावकर्यांनी तिला आंबेजोगाईच्या दवाखान्यात चारपाच दिवसांनंतर तिचे प्राण गेले. इकडे वडील स्वतःहून पोलीस स्टेशनात हजर झाले.
एका क्षणात आम्ही पोरके झालो. पुढं त्यांना जन्मठेप झाली. नातेवाइकांनी मात्र आमची आबाळ केली. त्यामुळंच दूधपित्या तान्ह्या बहिणीचा मृत्यू झाला. वडलांना आमच्या भविष्याची चिंता होतीच. त्यांनीच जेलरसाहेबांची मदत घेऊन रिमांड होममध्ये आम्हाला भरती करण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या शिक्षणाची सोय व्हावी हा त्यांचा मूळ हेतू होता मात्र यामुळं बहीणभावांची ताटातूट झाली. कोल्हापूर, शिरूर, औरंगाबाद इथली छात्रालयं, समाजकल्याणची वसतिगृहं इथं राहून शिक्षण घेतलं. अकरावीपर्यंत छात्रालयात शिक्षण घेतलं. तिथून पुढे औरंगाबादला बीए केलं.
आपल्याला कुणीही सांगणारं, शिकवणारं नाही म्हटल्यावर टीपकागदासारखं लोकांकडून निरनिराळ्या गोष्टी टिपत गेले. आपल्याला आचारविचार नाही असं कुणी म्हणू नये म्हणून धडपडत राहिले. डॉ.गजानन गायकवाड, पद्मविभूषण अण्णासाहेब सहस्रबुद्धे, मामा क्षीरसागर, राष्ट्रसेवा दलाचे श्यामराव पटवर्धन, एस.एम. जोशी, भाई वैद्य यांच्यासारख्या थोरामोठ्यांचं प्रेम, संस्कार, मार्गदर्शन लाभलं. गायकवाडकाकांनी वाचनाची आवड लावली. योग्य वयात योग्य माणसं मिळाल्यामुळं अनाथपण विसरायला मदत झाली. भलीबुरी माणसं भेटली, कटू आणि गलिच्छ अनुभव आले मात्र त्या सगळ्यांतूनच धीटपणा आला. अनाथपण विसरायला लावणारी चांगली माणसे लाभली यासाठी मी स्वतःला भाग्यवानच समजते.
महावीर जोंधळे यांच्याशी लग्न झाले सुरुवातीला मी कोल्हापुरात असताना आम्ही एकमेकांना पत्र लिहायचो. मी लिहू शकते असा विश्वास कदाचित तेव्हाच त्यांना वाटला. ते सतत लिहिण्यासाठी आग्रह करायला लागले. मला लिहितं करण्यासाठी उत्तम साहित्य आणि महत्त्वाची स्त्री-आत्मकथनं वाचायला आणून द्यायचे. त्याच प्रेरणेतून मी ‘बिनपटाची चौकट’ हे आत्मचरित्र लिहिलं. या पुस्तकानं माझी स्वतंत्र ओळख करून दिली.
समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहात बारा ते पंधरा वर्षे राहिले. त्या वेळी ज्या मुलींच्या सहवासात राहिले त्या प्रत्येकीची कहाणी वेगळी. त्या कहाणीला अनाथपणाचे, व्यथेचे, दारिद्र्याचे, दुर्लक्षितपणाचे जसे वेगवेगळे पदर तसे त्यांच्या जगण्याच्या ऊर्नीचेही. त्यातील एकेक पदर उलगडताना अकल्पित, भयंकर सत्य सामोरे येत गेले. काही उलगडले काहींना मर्यादा होत्या तरीही अशी ‘बेदखल' मुलींची आयुष्ये वाचकांच्या आणि समाज कल्याण खात्यातील अधिकऱ्यांसमोर आली तर... त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि आजच्या सुखवस्तू तरूण-तरुणींसमोर एक आव्हान ठरेल... 'असेही जगणे असते...?" सकारात्मक विचाराने ते प्रेरीत होतील ही आशा आहे.
वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर समाजकल्याण खाते वसतिगृहातील मुला-मुलींना वाऱ्यावर सोडते; पण वसतिगृहात असताना अन्न, वस्त्र, निवारा दिला जातो त्यात प्रेमाची ऊब किती? कर्तव्याची भावना किती? अन्नात पौष्टिक आणि वस्त्रात अब्रू किती आणि कशी झाकली जाते? ही मुले वयात पौगंडावस्थेत असतानाच वसतिगृहाबाहेर काढली जातात, कारण शासनाचा तसा नियम आहे. पण त्या मागील धोका त्यांनी ओळखलेलाच नसतो. बेवारस, बेसहारा, असाह्य मुली त्याही यौवनात आलेल्या बंदिस्त चार भिंतीतून एकदम बाहेर उघड्या, विशाल जगात पाऊल ठेवतात तेव्हा त्या सैरभैर होतात. कोण आपले.... हाताला काम नाही, हातात पैसा नाही,
पण यातील काही जणींना स्वत्त्व आणि सत्त्व कसे सांभाळायचे या मुळातच भान असते. त्या कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता छोटी-मोठी कामं करत स्वाभिमानाने जगण्यासाठी ठाम निर्णय घेतात. भले मग परिचारिका असतील, शिक्षक असतील वा डॉक्टर इंजिनिअरही असतील अशा 'वीरांगणांचं' जगणं खरच 'दखल' घेण्यासारखं, समाजासमोर एक उत उदाहरण म्हणून त्यांना या कथांमध्ये अग्रस्थान दिलेलं आहे. सामान्यातून असामान्यत्त्व निर्माण होऊ शकतं ते त्यांच्या कर्तृत्त्वाने दाखवून दिले.
माझ्या पहिल्याच 'बिनपटाची चौकट' या पुस्तकाला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला त्यामुळे त्या पुस्तकाची नववी आवृत्ती संपून दहावी आवृत्तीच्या मार्गावर ते जाईल, ते केवळ वाचकांमुळेच. त्यामुळे त्यांची मी शतशः ऋणी आहे. त्यानंतरचे दोन कथा-संग्रह 'बेदखल' आणि 'पाषाणानिद्रा' च्या पहिल्या आवृत्त्या संपून आता त्यांची नवीन सुधारीत आवृत्ती 'अस्वस्थ श्वासांची डायरी' ही आपल्यासमोर येत असताना मला मनापासून आनंद होत आहे.
प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची एक कहाणी असते. सुख-दु:खांची, ऊन-सावलीची, चढ-उताराची. सुखाच्या-आनंदाच्या प्राप्तीने तो भरून पावतो, तर यातनाच्या प्रखर उन्हाने करपून जातो. जीवनाचा हा सततचा संघर्ष जो प्रामाणिकपणे, जिद्दीने, कष्टाने पार पाडून आपले ध्येय साध्य करतो, तेव्हा ता ‘खरा माणूस’ ठरतो. मग ती स्त्री असो की पुरुष. दोघेही माझ्या कथेच्या केंद्रस्थानी असतात. मग तिथे जात-धर्म-पंथ काहीही आडवे येत नाही. ‘माणूस’ महत्त्वाचा. त्याचं जगणं, त्याचा भोवताल, त्याच्या मनातील खर्या-खोट्याचा संघर्ष, त्यासाठी त्याने मोजलेली किंमत. बहुतेक सर्व पात्रं मध्यम वर्गीय, निम्न वर्गीय किंवा कोणताच आधार नसलेली अनाथ असतात. पण त्या प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व असतं. त्यांच्या अस्तित्वाभोवती त्या अनुषंगाने येणारे भोवताल, माणसं, नातेवाईक आणि अन्य इतर घटक. त्यातून ती/तो स्वत:चे ‘अस्तित्व’ कसे सिद्ध करते, हे महत्त्वाचे. जीवनात अनेक घटना, प्रसंग, घडामोडी यांचे आपण साक्षीदार असतो.
सर्जनशीलतेसाठी तुम्हांला हव्या आणि नको असलेल्या घटना आणि घटितांनाही सामोरे जावे लागते. होकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजू समजून घ्याव्या लागतात.पात्रांच्या मनाच्या खोलात जाऊन त्यांचा तळ शोधल्याशिवाय त्यांच्या आंतरिक मनाची कळ उमटत नाही. घटना कोणत्याही काळातली असली, तरी त्याचे वर्तमानाशी असलेले नाते, विविध पात्रांच्या माध्यमातून लेखकाला कथन करता यायला हवे. त्यासाठी लेखकाला गतकाळात जाता आले पाहिजे. त्या त्या काळाशी, भोवतालाशी संवाद करत एकमेकांशी असलेले नात्यांचे पदर मूलभूत भूमिकेशी जोडताना समाजव्यवस्थेशीही तेवढाच संबंध जोडता आला पाहिजे. आणि माझ्या लेखनामागील कदाचित तीच भूमिका आहे.
कथेतील पात्रांशी संवाद साधताना आपले मन आणि डोळे त्यांच्या डोळ्यांतील भावभावनांशी एकरूप करता आले पाहिजेत. ते एकदा आले की मग कथाधर्मातील व्यंग-अव्यंग, तृप्त-अतृप्त संबंध किंवा आशय असंवेदनशून्य होत नाहीत. मग तो संबंध जवळचा असो की लांबचा याचा विचार लेखकाला मनोमनी करून संवाद व अनुभवांचा सुस्पष्ट संबंध घडवून आणता येतो. तेच माझ्या कथांचे वैशिष्ट् समीक्षकांनी ठरवले असावे. जाणिवा व्यक्त करताना अनुभव आणि कथापात्रांचा मोकळेपणा स्पष्टपणे द्यायला हवा, असे मला वाटते. प्रत्येक वेळी संस्कृती, परंपरांचे अस्तित्व रेखाटलेच पाहिजे, असे मला वाटत नाही. आत्मजागरण असे सांगते की, आपण केलेले लेखन एक प्रकारचे सामाजिक कथनच असते आणि म्हणून ते प्रामाणिक असावे.
कथेमध्ये बाह्य व्यक्तिचित्रणापेक्षाही आंतरिक भावना येणे महत्त्वाचे. राग-द्वेष, आनंद-दु:ख, कारुण्य-कृतज्ञता आदी ही मानवी वर्तमानातील मानसिकता व्यक्त झाली नाही, तर कथेतील पात्रं सजीव होत नाहीत, असे मला वाटते. त्या सर्व मानवी भावभावना, त्यातील अनुभव, कथेतील संवाद आणि तत्कालीन कालानुभव व्यक्तिसापेक्ष होत जातात. वर्तमानातील गुंतागुंतीचा आणि अंतर्गत मानसिकतेचा प्रत्यानुभव डोळस झाला तर कथा सर्वसामान्य वाचकही आपलीशी करू शकतो. अशा पद्धतीच्या लेखनात एकरूपता दिसते, असे जेव्हा वाचक कळवतात, तेव्हा मी निरपेक्षपणे निवडलेल्या कथा-वस्तूंचा प्रत्यक्ष पुन:पुन्हा विचार करते. लेखकाने तो आपला धर्म म्हणूनच स्वीकारला पाहिजे, कारण त्यात तुमचा लेखन-विकास दडलेला असतो.
कथावाङ्मय निर्मितिक्षेत्रात लेखन व्यवस्थापन म्हणून प्रारंभ आणि शेवटातील मोकळी जागा लक्षात घेऊन तत्कालीन अर्थकारण, समाजकारण, राजकारण यांच्या प्रदेशातील सामाजिक भावबंधांची ओळख होणे गरजेचे आहे व लेखकाने ते जाणले पाहिजे. कथानकात शहर असो वा खेडे, यातील भोवताल आणि वेगळेपणा टिपण्याची क्षमता माझ्या लेखनात वेगळी ठरते. काही काळासाठी आत्ममग्न राहून त्यावर चिंतन-मनन होणे आवश्यक असते. त्यातील प्रांजळपणा आपल्या कथेला उजळून टाकतो. कथेतील आशय, विषय, भाषाशैली, शब्दांची मांडणी व त्यातून येणारा आत्मविश्वास लेखक-वाचकाला प्रेरणादायी ठरतो. आंतरिक प्रत्ययाची जबाबदारी शब्द-भावना घेत असतात तेही मूल्यांवर आधारितच.
अस्वस्थता आणि स्वस्थता यांतील जाणीव मूल्यभावाशी प्रतारणा करणार नाही, याची खबरदारी घेतली, तर परिस्थिती-अनुरूप लेखकाच्या निवेदनशैलीला ताकद मिळत जाते, ही बाब जर ओळखता आली नाही, तर कथेचा पाया भुसभुशीत न राहता भरभक्कम होतो. घरबांधणीचा जसा विचार... त्याच पद्धतीने कथा-वास्तू उभी करताना लेखकाला करावा लागतो, कारण नातेसंबंधातील ताणतणाव, भावभावना आणि त्याचे कमी-अधिक महत्त्व सविस्तर आणि स्पष्ट झाले, तर चांगल्या चित्रणाला त्याची मदतच होते. मानवी विरोधाभासाच्या जंगल सफारीची मनाला जेवढी सवय लावता येईल, तेवढी लावली गेली तर कौलारू छिद्रातून घरात येणारे उन्हाचे कवडसे वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्याला बघता येतात... आणि टिपताही येतात.
लेखक हा एक निवेदक असतो. निवेदनासाठी स्वीकारलेल्या शैलीतून प्रश्न आणि उत्तरांची गुंफण पात्राच्या वागण्या-बोलण्याशी आणि आलेल्या अनुभवाशी किती प्रामाणिक आहे, याचा अंदाज घेण्याची सवय असेल, तर आपण आपले समीक्षक होत जातो. लिहीत असताना काही महत्त्वाचे प्रसंग, घटना लक्षात येताच ते कथा-वास्तू बळकट करण्यासाठी उपयोगी पडतात. रंजकता आणि लालित्यपूर्णता, पसरटपणा, पाल्हाळीकता येऊ न देण्यासाठी प्रसंग आणि घटितांचा प्रामाणिक मेळ घालायचा असेल, तर आपल्याला काहीसे सौंदर्यरचनेपासून फटकून राहावे लागते आणि तशी मी राहण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करते. कारण ते मला महत्त्वाचे वाटते. जे सांगायचे ते सहजपणे सांगता यावे, यासाठी वेगळ्या आत्मतंत्राची गरज असते आणि तोच कथालेखनाचा आत्मा ठरत असतो. त्यासाठी हळुवारपणाही महत्त्वाचा आणि अनुभववृत्तीही तेवढीच महत्त्वाची.
गोष्टी वेल्हाळतेपेक्षा त्या त्या पात्रांच्या अंतरंग रूपातून आणि संभाषणातून मूळ स्वभावाकडे वाचकांना घेऊन जाण्याची सारासार गरज असते. ती गरज ओळखून चांगली कथा कशाला म्हणावे याचा अंदाजही आपणांस येऊ शकतो. तत्त्वज्ञान आणि आदर्शवाद याहीपेक्षा ‘माणूस’ म्हणून जगण्यासाठीची अटकळ कथासूत्रात असेल, तर ती कथा अधिक वेधक होते असे माझे वैयक्तिक मत. कथापात्रांच्या बाह्य स्वरूपापेक्षा त्यांच्या आंतरस्वरूप मन:स्थितीला ठसठशीतपणे उजागर केले, तर त्यांच्या संवेदन स्वभावाशी आपली नाळ घट्ट जमते असे मला वाटते. आज कथेच्या कक्षा रुंदावल्या आहेत. कथेची उद्दिष्टेही सतत बदलत जात असून त्यातील घटना-प्राधान्याला फारसे महत्त्व न देता मानवी मनाचे पदर अलगद उलगडले जात आहेत. कथेतील व्यक्तींची स्वभावचित्रे जिवंतपणे चित्रित करणे अवघड असले तरीही कथेतील व्यक्तींच्या लहानमोठ्या कृती, त्यांच्या सवयी, उक्ती स्पष्ट झाल्या पाहिजेत. तसेच बारीक-सारीक लकबी, बोलण्या-चालण्याचा ढंग, चेहर्यावरील सूक्ष्म भाव टिपण्याचे सूक्ष्म नियंत्रण लेखकापाशी असणे गरजेचे आहे.
जसे घडले तसे लिहिले, तर त्यात मजा नसते. परंतु आयुष्याकडे कोण कसा बघतो, हे लेखकाला समजून घेता आले पाहिजे. नाहीतर केवळ आशयाच्या फेर्यात सापडून कथा शब्दबंबाळ होईल. कथेत भाबडेपणा, बालिशपणा न येता, एकंदर जीवनविषयक व्यवहाराच्या पातळीवर नेमकेपणाने सांगता आले तर तो वाङ्मयप्रकार अधिक उठावदार होऊन सजीव होतो. याच पद्धतीने रुदन किंवा आंक्रदन मूळ स्वभावाच्या चित्रणाला ठसठशीत करत असते. तसे झाले, तर कथानक व्यक्तीगोचर होऊन बसते आणि असे करणे - लिहिणे जाणीवपूर्वक वाटत असले तरी ते कथा उठावदार - प्रत्ययकारी होण्यासाठी आवश्यकच असते. कथानकाचा आणि आंतरमनातील भावभावनांचा ठावठिकाणा घेण्यासाठी पात्रापात्रांतील संबंधांचा, त्यांच्यातील मनोव्यवहारांचा गुंता सोडविता सोडविता कथेचा गाभारा मोकळा करावा लागतो.
बुद्धिप्रामाण्यवाद, आचार-विचार, जुन्या रूढी-परंपरा, कर्मकांड आणि पूर्वसंचितावर भर, यांतील कर्मकांड हा अव्यवहारी पद्धतीने कथासूत्राला हानिकारक न ठरता, त्या पद्धतीच्या पात्रांच्या माध्यमातून आणला तर तोही आवश्यक असतो. आघात केल्याशिवाय बहुजनांची सामाजिक पातळी आणि सार्वजनिक, धार्मिक तसेच आर्थिक असमानतेचा विचार निवडलेल्या कथानकाचा अविभाज्य भाग असतो, असे मला वाटते. रोमँटिक, काल्पनिक, मनोरंजनपर लिहिणे हा माझ्या लेखनाचा पिंड नाही. ती फार दूरची बाजू आहे. सांगण्यासारखे सांगून (लिहून) झाल्यावर त्याकडे वळण्याचा नक्कीच प्रयत्न करते, कारण तोही एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे नाकारून कसे चालेल? परंतु तो भाग नंतर घेतला तरी चालू शकतो. कथा बेतण्यापेक्षा कथा-वास्तूची कळ आतून जेव्हा येईल, तेव्हा कथानक कोठेही कमी पडत नाही. समाजातील गुणावगुणांचा विचार करता कोणतीही गोष्ट कुणाच्यातरी दडपणाखाली झाकून ठेवणे माझ्या स्वभावात नाही.
वर्तमानात या सर्व गोष्टी कथानकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात. शाब्दिक सहानुभूतीपेक्षा शब्द-चळवळ म्हणून कथानक डोक्यात-मनात सतत घोळत राहते. मूळ निवडलेले कथानक आणि त्याचा चालू काळातील संबंध यांच्यात फारकत होता कामा नये. कथा आकृतिबंधापेक्षा पात्राच्या व्यवहाराला समोर मांडणे मी पसंत करते. त्यासाठी सूक्ष्म निरीक्षणशक्तीची गरज असते आणि त्याबरोबर उदार अंत:करणाचीही.
अनुकरण आणि प्रभाव या दोन्हींनाही दूर ठेवता आले, तर आपल्या कथेची प्रतिमा सुंदर-असुंदर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यात्या कथा-वस्तूंच्या पूरकतेसाठीचा व्यवहार लक्षात द्यावा लागतो. मूळ स्वभावाची प्रेरणा कशा पद्धतीने आणता येईल याचा विचार करावा लागतो. कुठल्यातरी निमित्ताने आलेले अनुभव, प्रसंग, घटना जेव्हा लेखनप्रेरणा बनतात, तेव्हा त्या वेळची मन:स्थिती वेगळी असते. त्यालाही लेखनात महत्त्व द्यावे का? हा विचार महत्त्वाचा. कल्पकतेपेक्षा अनुभव ताकदीने येतात, तेव्हा ती कथा मनासारखी आकार घेऊन परिणामकारक ठरते आणि तत्कालीन परिस्थितीचा आलेख समोर येतो.
कार्ल मार्क्स म्हणतो, ‘वास्तववादाचे चित्रण हे कोणत्याही अर्थाने वास्तवाची निव्वळ नक्कल नसते. घटनेच्या अगदी आंतरगाभ्यात शिरकाव करून घेण्याचा तो एक मार्ग असतो. वास्तववाद बोलका व रेखीव असेल, तर विचारांचे अधिष्ठान पक्के समजावे. भोगलेले, भोगावे लागणारे भोग व त्याबरोबर आलेले संघर्ष करीतकरीत जगण्याला उमेद देणारे साहित्य माणसाला उभे राहण्यास मदत करीत असते.’ माझ्या सर्व कथा आणि इतर साहित्य वास्तवावर आधारितच आहे. ते वाचकाला संघर्ष करायला प्रेरित करते. जीवनात पुन्हा उभे राहण्याची ताकद देते. अन्यायाची चीड आणि न्यायाची बूज राखण्यात, सत्याची बाजू घेण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला, तरी शेवटी सत्याचाच विजय ठरतो.
‘अस्वस्थ श्वासांची डायरी’मधील सर्व स्त्रिया समाजालाच जाब विचारतात, ‘‘तुम्हां संस्कृतीवाल्यांना स्त्रियांवरच अन्याय करण्याचा अधिकार कोणी दिला...?’’ त्या दृष्टीने ‘जिता गोळा’, ‘युगंधरा’, ‘दुर्गी’, ‘हरणी’ या कथा वाचकांच्या लक्षात येतीलच. ‘स्तन्यसूक्त’ मधील ‘भरलं वांगं’, ‘मोकळीया’, ‘अभिलाष’, ‘चिन्मय अंजन’ या कथा वाचकाला अंतर्मुख करतात. ‘पापणीआड पाणी’ - दीर्घ कथा. अविचाराने घेतलेला निर्णय जीवन कसे उद्ध्वस्त करून टाकतो... पण वेळीच निर्भयपणे घेतलेला दुसरा निर्णय आयुष्याचे सोने करून टाकतो, त्यासाठी शिक्षणाने आलेले शहाणपणच कामी येते. अन्यायाविरुद्ध बंड करून पुन्हा आपलं जीवन सुंदर करणारी यातील युवतीचा आदर्श आजच्या नवतरुणींनी अंगीकारला तर कोणीही तरुणी हुंडाबळी वा अन्य असंख्य कारणांसाठी बळी जाणार नाही. या दीर्घ कथेत कोणालाही ‘विशेष नाम’ नाही. नायक नाही, नायिका नाही. सारा गोतावळा आहे. शहर आहे... गाव आहे, सर्व काही आहे, पण तो - ती - ते - त्या... आणि सर्व... मुळातूनच वाचकप्रिय वाचकांनी वाचावी आणि त्यातील गुण-दोष लेखिकेला सांगावेत.
शेवटी लेखक हाही एक माणूसच आहे. चुका करणारा- त्यात सुधारणा करणारा. तेव्हा अशी संधी (चुका सुधारण्याची) वारंवार येवो व मी अधिकाधिक लिहिण्यास प्रवृत्त होवो.
- इंदुमती जोंधळे
'धर्मरेषा ओलांडताना' या मालिकेतील इंदुमती जाधव- महावीर जोंधळे यांची ही मुलाखतही वाचा
एकमेकांचा सर्वार्थानं स्वीकार करणं हे आनंदानं, समाधानानं राहण्याचं सूत्र...
वाचा मनस्विनी लता रवींद्र यांचे लेखन विषयक चिंतन करणारे दोन लेख
Tags: इंदुमती जोंधळे लेखक कथा साहित्य लेखन प्रक्रिया writing Indumati Jondhale Story writing writing process Load More Tags
Add Comment