...आणि मी कथा लिहायला लागले !

एका मनस्वी लेखिकेचे चिंतन : पूर्वार्ध

महाराष्ट्राला दिवाळी अंकांची मोठी परंपरा आहे. दरवर्षी अक्षरशः शेकडो दिवाळी अंक प्रकाशित होतात आणि त्यांतून असंख्य कथाही प्रसिद्ध होतात... मात्र कथालेखनामागे असणारी लेखकाची अस्वस्थता, त्याचे चिंतन यांविषयी क्वचितच लिहिले जाते. आजच्या काळात दमदार लेखन करणारी मनस्विनी लता रवींद्र हिचा याच विषयावरील विस्तृत चिंतनात्मक लेख कर्तव्य साधनावरून पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असा दोन भागांत आज आणि उद्या प्रसिद्ध होत आहे. 

नाटक, चित्रपट, मालिका यांचे लेखन करणारी मनस्विनी कथा हा लेखनप्रकार विलक्षण हाताळते. ‘ब्लॉगच्या आरशापल्याड’ या कथासंग्रहासाठी ‘साहित्य अकादमी’चा युवा पुरस्कार (2016) तिला मिळालेला आहे. विविध नियतकालिकांमधून, दिवाळी अंकांतून तिच्या कथा प्रसिद्ध होत असतात. या कथांमधून राजकीय, सामाजिक स्टेटमेंट्‌स सहजपणे येतात. बऱ्याचदा त्यात काळाचे तुकडे, अंतःस्थ प्रवाहही असतात. आज प्रकाशित होणाऱ्या पूर्वार्धातून तिचं कथेशी असणारं नातं उलगडत जातं... 

लहान असताना मी शब्दांचा खेळ करायचे आणि तसंच बोलायचे... माझ्या आईबाबांना जाणवलं की, मी कविता करते. मी तीन वर्षांची असताना आईनं मला चंदीगढला नेलं होतं तेव्हा मी असं काहीतरी बोलले.  ‘झाडावरती पक्षी बसले, झाडंच जणू पक्षी झाले.’ आणि माझ्या आईच्या मैत्रिणीनं ते लिहून ठेवलं. तेव्हापासून मी असं काही पद्यात बोलले की ते आईबाबा लिहून घ्यायला लागले. काही दिवसांनी मला कळायला लागलं... साधारणतः साडेचार-पाच वर्षांची असताना... की, हे आपल्याला जे काहीतरी सुचतं आहे... ते नॉर्मल, आपण बोलतो त्यापेक्षा वेगळं आहे. मग असं शी आली किंवा तहान लागली हे जसं आपण सांगतो तशी मी सांगत यायचे की, मला कविता आलीये. 

माझी आणि शब्दांची ओळख जुनी... पण अक्षरांची नवीन. मला अक्षरं लिहिता येण्याआगोदरपासून मला कविता सुचायची... त्यामुळे अक्षरांशी ओळख झाली पण सुरुवातीला लिखित अक्षरांशी शब्दांइतकी मैत्री नाही झाली. याला व्याकरण वगैरे असतं हे कळल्यावर; छंद, यमक अशी नावं समजल्यावर माझी कविता कनफ्युज्ड व्हायला लागली. आपल्याला जे असं आतून आधीच सुचतं त्याचं व्याकरण कुणीतरी तयार करून ठेवलंय याचा लहान असताना खरंतर रागच यायचा. ते समजावं अशी कुवत किंवा उमज नव्हती... त्यामुळे कविता हे माझं पहिलं माध्यम व्यक्त होण्याचं. हे वाचनाच्या आणि लिखित अक्षरांच्या आधी माझ्या आयुष्यात आलं. मला काही सुचलं तर शक्यतो माझे आईबाबा त्यात फेरबदल करायचे नाहीत. मला आठवतं त्याप्रमाणे एकदोनदा त्यांनी मला विचारलं होतं की, तुला वाटतं का... इथे याच्याऐवजी हा शब्द घालावा? तर मी तेव्हा नाही म्हणायची... मग ते माझं राहणार नाही असं काहीतरी मला वाटायचं. ‘ठिकेऽ मी बदल करते... पण मग ते तुमचं झालं.’ असं मी म्हणायची... त्यामुळे तसे बदल कधी नंतर कुणी केले नाहीत. 

माझ्या कविता जास्त करून निसर्गाच्या जवळच्या होत्या. त्या मुद्दाम सुचण्याचा अट्टाहास मी करायची नाही. नवीन शब्द कळला तर तो मुद्दाम वापरायला जायचा नाही... आपसूक कवितेत यायचा. जसं पाच-साडेपाच वर्षांर्षाची असताना मला प्रतिबिंब हा शब्द कळला होता आणि त्याचा अर्थ मला इतका आवडला होता की, मी सतत तो शब्द वापरायचे. तो वापरता यावा अशा सिच्युएशन्स तयार करायचे. जसं पाण्याच्या बादलीत डोकावून बघायचं आणि मग आईला हाक मारायची की, आई, माझं प्रतिबिंब बघ. त्याचा असा खूप वापर केल्यावर मला एक कविता सुचली होती...

‘माझं प्रतिबिंब माझ्या मनात 
तुझं प्रतिबिंब तुझ्या मनात 
तुझ्या मनात फूल माझ्या मनात पान 
म्हणून तर आपली दोस्ती छान’  

असं काहीतरी तेव्हा मी लिहिलं होतं. तेव्हाच्या माझ्या बहुतेक सगळ्या कविता या माझ्या आईसाठी नाहीतर निसर्गातलं काहीतरी बघून सुचलेल्या असायच्या. 

मी थोडी मोठी झाले... त्यासोबत माझी कवितापण मोठी झाली, बदलत गेली. तिच्यातले विषय बदलले, तिची मांडणी बदलली... पण जशी नाटकाच्या किंवा कथालेखनाच्या मांडणीची आणि आशयाची फोड करता येईल तशी ती कवितेची मला अजूनही करता येऊ शकत नाही. तेव्हा मी खूप कविता वाचायचे... पण माझ्यावर असा इन्फ्लुएन्स व्हायचा नाही. 

सातवी-आठवीत मला मर्ढेकरांच्या कविता खूप आवडायला लागल्या. पुढे मोठी झाल्यावर नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्या. त्यांच्याइतक्या इतर कुठल्याच कविता मला ठसठसून आवडल्या नाहीत. 

पुढे नाटकाचं शिक्षण घ्यायला लागल्यावर माझ्या आयुष्यातून कविता गेली... कारण ती समजून उमजून केलेली नव्हती. ती मला सुचायची. माझ्या कविता कधीच लहान मुलीच्या कविता नव्हत्या, त्या एका स्वतंत्र व्यक्तीच्या कविता होत्या... पण त्याचं शिक्षण आणि थिअरी जसजशी मला कळायला लागली तशी मी स्वतःला कोतं समजायला लागले. 

ती माझी सवय कायम राहिली... सर्वच बाबतींत. ती मला कधी लागली याचा शोध मी अजूनही घेते आहे... शिवाय मी अमुक पद्धतीची, प्रगल्भ किंवा सामाजिक भान असलेली अशी कविता लिहावी ही मागणी जेव्हा कुणाकडूनतरी व्हायला लागली तेव्हा कविता माझ्यापासून लांब गेली. 

दुसरीकडे अजून एक झालं... सातवी-आठवीनंतर माझं भावविश्व बदललं, व्यक्ती म्हणून माझं खूप दमन झालं. मला काय वाटतं हे सांगायची मुभा अचानक निघून गेली. मला खूप गंड आले. भीती दाटल्या. घरातली परिस्थिती, सामाजिक चळवळी इतक्या आजूबाजूला असून समाजात काहीच बदलत नाही याचं अचानक झालेलं रिअलायझेशन. 

नववी-दहावी ते ग्रॅज्युएशन हा काळ फार बदलांचा होता, सगळ्यासाठीच असतो. तुमचं तरुण होणं... विशेषतः मुलीचं तरुण होणं... हे आपल्याकडे (सरसकट विधान आहे पण मला जाणवलेलं ऑबझर्व्हेशन म्हणू हवं तर...) सेलिब्रेट केलं जात नाही. आनंदानं घेतलं जात नाही. मुलीनं लहान राहावं असा अट्टहास असतो किंवा भीती असते की, शरीरात होणारे बदल, तरुणपणाचा वेडेपणा हे सगळं त्यांना दिसत असणार. सगळ्या सीमारेषा ब्लर करणारं आणि जगात काहीही करू शकू हे वाटायचं वय... आपल्याकडे मुद्दाम घाबरवून संपवून टाकलं जातं. 

मुलींच्या बाबतीत भीती असते, आता हिचं सेक्शुअल लाईफ सुरू होणार. सेक्शुअल लाईफ सुरू होणं हे मुलींसाठी मोठं होण्याचं परिमाण आणि पुरुषांना मुलं झाली तरी ते लहानच. माझ्या घरात माझं लवकर लग्न लावून द्यावं वगैरे असे विचार नव्हते. 

मी प्रेमात पडावं याचं एक रोमॅंटिक चित्रण माझ्या आईवडलांनी केलं होतं. मी येऊन त्यांना सांगेन वगैरे... तरी भीतीपण होतीच. आपली मुलगी काहीतरी चुकीचं करेल आणि चुकीचं म्हणजे अयोग्य मुलाच्या प्रेमात पडेल. त्यात प्रेमात पडणं हे आयुष्यात एकदाच होतं असे समज त्यांचेसुद्धा असावेत. आपल्याकडे मुली मोठ्या झाल्या की आनंद होण्यापेक्षा त्यांना आपल्या समाजातून गंड आणि कॉम्प्लेक्सेस जास्त मिळतात... शिवाय तिचं तारुण्य हे कधीच छान स्वीकारलं जात नाही. 

त्या अशा वयात माझी कवितापण बदलली. तिच्यात जगाबद्दल राग खूप यायचा, शिव्या वगैरे असायच्या. शारीरिकता असायची... पण मी सतरा-अठरा वर्षांची होते... त्यामुळे ती कविता कुणाला दाखवायची मला लाज वाटायची. हे असं काय सुचतंय मला? कुठे शिकले मी शिव्या? कुठून आलं माझ्यात हे? मला कळायचं नाही. मी त्या कविता कधीच कुणालाच दाखवल्या नाहीत.  

पुढे मात्र जेव्हा नाटक लिहायला लागले तेव्हा नाटकाचं शिक्षण घेतल्यामुळे आपण काय लिहितोय, आपल्याला काय सुचतंय याबद्दलचं अप्रूप किंवा अजाणता कमी होती. कवितेचं माध्यम मी स्वतः निवडलेलं नव्हतं... पण बाकी लिखाण हे मी निवडलं. त्यात उत्स्फूर्तता नव्हती असं नाही... पण कवितेइतकं ते अ‍ॅबस्ट्रॅक्ट नसल्यानं आणि आपल्याला जे वाटतं त्याची जबाबदारी घेण्याची एक प्रकारची धमक किंवा उमज माझ्यात आल्यामुळे माझं लेखन बदलायला लागलं. 

प्रत्येक लेखकाची लेखन करायची ऊर्मी आणि कारणं वेगवेगळी असतात. त्यांत काही सामाजिक संदर्भ आणि कारणं असतीलही... पण तरी ते खूप व्यक्तिसापेक्ष असावं. अनेकदा काही जण आपण का लिहितो हे चांगल्या पद्धतीनं आर्टिक्युलेट करू शकतात. काही जण फक्त आर्टिक्युलेटच करू शकतात... शिवाय तुमच्या त्या-त्या वेळच्या विचारांच्या आणि आयुष्याच्या फेजवरही ते विसंबून असावं... म्हणजे हाच लेख मी काही दिवसांपूर्वी लिहिला असता तर वेगळा झाला असता आणि आणखी काही दिवसांनी लिहिला तर वेगळा होईल. 

आपले विचार, आपलं सुचणं आणि वाटणं यांपेक्षा आपला स्वभाव संपूर्ण भिन्न असू शकतो. मला वाटतं की, मी लिहिते ती त्यांतली गॅप कमी करायला. स्वभाव अनेकदा तुमच्या लहानपणापासूनच्या संकलित भीतींमधून आणि गंडांमधून तयार होत असतो... पण त्याप्रमाणेच तुमचे विचार किंवा तुमचं व्यक्त होणं असतंच असं नाही. 

थोडं मोठं होत असताना मला ही तफावत जाणवायला लागली. मला स्वतःच्या सवयी किंवा मी परिस्थितीनुसार जशी झाले आहे ते बदलणं एका झटक्यात शक्य नव्हतं. जशी मी खूप हळूवार बोलायचे, संथ होते, माझं वागणं लाडीक वाटायचं. मी स्वतःपेक्षा समोरच्याला जास्त महत्त्व देणारी होते. यावरून माझी एक जी प्रतिमा व्हायची ती एक तथाकथित सर्व नियम धरून चालणारी अशी... 

पण तरी माझे विचार हे त्या वागण्याला सुसंगत नव्हते. किंबहुना असं म्हणता येईल की, अशा प्रकारच्या व्यक्तीबद्दल जी धारणा होते तीच खरी... असं आपण मानत असल्यानं समोरची व्यक्ती ही त्याहून वेगळी असू शकते याची तिळमात्र शक्यता आपण नाकारतो... त्यामुळे माझे विचार जेव्हा मी सांगायला लागायची तेव्हा माझ्या आजूबाजूच्या लोकांना भलामोठ्ठा धक्का बसायचा किंवा कधीकधी उलटं व्हायचं... 

आमच्या शिक्षकांना उद्धट मुलं आवडायची... जी पुढे बंडखोर निघतील असं त्यांना वाटायचं. माझ्या नम्र स्वभावामुळे मी त्यांना इरिटेट करायची... आगाऊ मुलं पुढे काहीतरी वेगळं घडवतील, ती व्यवस्थेला प्रश़्न विचारू शकतील असं त्यांना वाटायचं... त्यामुळे मी त्यांना आवडत नसे. 

या प्रतिमांच्या चौकटीत माझी फार घुसमट झाली. कुणाच्यातरी विशिष्ट पद्धतीच्या प्रतिमांबद्दल काही धारणा आहेत... त्यामुळे मला ते त्या प्रकारे जज करतात याचा मला त्रास व्हायचा. 

या प्रतिमांचा इतका पगडा आपल्यावर असतो की, आपल्याला काय आवडावं, काय नाही हेही या प्रतिमा ठरवत असतात. महाभारत-रामायणातल्या मिथकांपासून हे विभाजन सुरू होतं. टेलिव्हिजनसाठी लिहिताना मला एक गंमत जाणवली. त्यांना वेगळं काहीतरी दाखवायचं असतं, उदाहरणार्थ, हिरोईन बिनधास्त आहे, ती मारामारी करते... पण मग ती लोकांना आवडेल का? तर मग ती लहान मुलांना वाचवण्यासाठी मारामारी करते असं तिला दाखवायचं ठरतं किंवा तिला स्वयंपाक येत नाही... पण मग ती हळूहळू नवऱ्यासाठी तो शिकते. 

या दोन परस्परविरोधी गोष्टी नाहीत... पण मॉरली त्यांना परस्परविरोधी उभं केलं जातं. तसेच नैतिकतेचे साखळदंड मिथकांनाही काळाच्या ओघात घातले गेले आणि त्यांतली गुंतागुंत जाऊन काही ठरावीक साचे घडत गेले. आपली भाषापण अशीच बायस्ड होत गेली आहे. आपण किती सहज म्हणतो.. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आता उंचीचा एखाद्याच्या कीर्तीशी काय संबंध? एक वेळ वयाचा असेल... पण उंचीनं कमी असलेल्या माणसांबद्दल हा समज आहे की, ती वयानं लहानच राहतात किंवा ती भोळीभाबडी असतात, समोरच्यावर अवलंबून असतात आणि उंच माणसं डॉमिनेटिंग पोझिशनला असतात, अन्याय करणारी असतात असं आपण मानतो. 

अजून एक उदाहरण म्हणजे सावळी पण सुंदर आहे... म्हणजे सावळं असणं हे मूळतः सुंदर असूच शकत नाही... मग ‘सावळी असूनही सुंदर आहे...’ म्हणताना सुंदर असण्याची मक्तेदारी गोऱ्या रंगाकडे आपोआप दिली जाते. खालच्या जातीतला असून इंजिनिअर झाला असं म्हणताना हुशारीची मक्तेदारी ब्राह्मण वर्गाकडे दिली जाते. शहरातली असून साधी आहे, गावातला असून इंग्लीश येतं ही अशीच काही उदाहरणं. 

मला मान्य आहे की, ही सगळी अत्यंत ढोबळ उदाहरणं आहेत... पण याच ढोबळतेवर अख्खं कथानक रचून आपल्याकडचा मिडिया आज लोकांना भडकवण्याचं, काही लोकांबद्दल द्वेष निर्माण करण्याचं तर काही निर्घृण गुन्हे केलेल्या गुन्हेगारांबद्दल कणव निर्माण करण्याचं काम करतं. हे साचे आणि ही गृहीतकं मोडण्याचा प्रयत्न मला लेखनातून करावासा वाटतो. ते किती घडतं माहीत नाही... पण लिहिताना माझ्या डोक्यात ते नेहमी असतं. 

माझे आईवडील सामाजिक चळवळीत कार्यरत होते, आहेत... त्यामुळे मला घरात इतर काही नसलं तरी पुस्तकं वगैरे बरीच मिळाली. आर्थिक चणचण नव्हती... पण फार सुखवस्तू परिस्थितीपण नव्हती. आई - लता ही अ‍ॅक्टिव्हिस्ट आणि बाबा - रवींद्र हे फार्मसी कॉलेजमध्ये लेक्चरर. घरात सतत माणसं असायची. 

इतर मुलींसारख्या अपेक्षा माझ्याकडून नव्हत्या... स्वयंपाक यावा किंवा सातच्या आत घरात वगैरे... पण त्याऐवजी मी खूप अभ्यास करावा, मी खूप वाचावं, मी सगळ्यांपेक्षा वेगळं असावं असं काहीतरी होतं. सामाजिक भान हा मुद्दा सतत होताच. 

माझं वाचन प्रचंड नसलं तरी बऱ्यापैकी होतं. मला त्या वेळेस मिळालेली लहान मुलांची पुस्तकं जसं गोट्या, साने गुरुजींचं श़यामची आई वगैरे वाचताना रिलेट व्हायचं नाही... पण त्या वेळेस रादुगा प्रकाशानाची मराठीत भाषांतरित केलेली खूप सारी रशिअन पुस्तकं मिळायची. माझ्यासाठी बालसाहित्य म्हणजे तेच. देनिसच्या गोष्टी, सुंदर वासिलिसा, दोन भाऊ, एका अस्सल माणसाची कथा, जग बदलले या शोधांनी, धातूंच्या नवलकथा, पुश्किनच्या कथा ही आणि अशी बरीच पुस्तकं मी तेव्हा वाचली. 

आठवी ते दहावी या काळामध्ये साधारणतः चळवळीतल्यांची मुलं वाचतातच... ती म्हणजे मॅग्झिम गॉर्कीचं आई आणि अ‍ॅलेक्स हॅलीचं रूट्स... यांचा प्रभाव राहिला... शिवाय शेरलॉक होम्स, भा.रा. भागवत मी वाचायची. थोडी मोठी व्हायला लागल्यावर आवडलेली पुस्तकं म्हणजे पु.शि. रेगेंचं सावित्री, नेमाडेंचं कोसला आणि गो.नी. दांडेकरांचं माचीवरला बुधा... मग प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, गौरी देशपांडे, लक्ष्मण गायकवाडांचं उचल्या हे अकरावी-बारावी, फस्ट इअरमध्ये वाचले. 

त्या काळात गो.नी. दांडेकर, शांता शेळके, माडगूळकर, अण्णाभाऊ साठे आणि वि.स. खांडेकर हेही लेखक वाचले... पण माझ्यावर इम्प्रेशन राहिलं ते रशिअन साहित्याचं. रशिअन साहित्यातलं भावविश्व मला जवळचं वाटायचं. शहरात वाढल्यामुळे गाव अप्राप्य आणि लांबचं वाटायचं. त्याबद्दल अप्रूप होतं पण रिलेटेबिलिटी कमी होती. भाषा भुलवायची. शब्दांचा वापर कोड्यात पाडायचा. त्याबद्दल प्रचंड आकर्षण वाटायचं... पण तरी ते जगणं मी बघितलेलं नव्हतं. त्यामानानं मेघना पेठे आणि प्रिया तेंडुलकर यांचं लिखाण जवळपासचं वाटायचं. 

आपण लिहू असं तेव्हा कधी वाटलं नाही... शिवाय घरात रोज चर्चा, वेगवेगळे विषय यांमुळे एक सामजिक पाया बांधला गेला... पण तरी लोकांमधली विसंगती जाणवायची आणि त्याचा त्रास व्हायचा... शिवाय ते वय असं रिअ‍ॅक्शन देण्याचं होतं आणि आजूबाजूला फार मोठमोठी माणसं, कनफ्युजन वाढवायची. जे योग्य आहे त्यालाच चुकीची रिअ‍ॅक्शन तर देत नाही ना आपण... अशी भीती वाटायची. 

बाहेरच्या भुलवणाऱ्या गोष्टीबद्दल आकर्षण होतं... पण इमेजेस तयार झालेल्या. इतर मुलंमुली जे सहज करतात ते करणं चुकीचं की काय? ते करायची लाज वाटायची. उदाहरणार्थ, चांगलं दिसावं असं वाटणं, जी फॅशन आहे तसं काहीतरी घालावंसं वाटणं (महागडं, ब्रॅंडेड तेव्हा माहीत नव्हतं. रस्त्यावरचा तीस किंवा पन्नास रुपयांचा टॉप घ्यायचा तरी भीती वाटायची.) आपण चंगळवादी होतोय का? शब्द बरेच माहीत होते, त्यांचे अर्थ थोडेफार उमजत होते. 

घरात ग्लोबलायझेशन आणि कंझ्युमेरिझम हे सगळं ऐकलेलं. ते शब्दपण सररास वापरले जायचे. ते वापरायची गरज आहे की नाही याची माहिती नव्हती. या कनफ्युजनमध्ये मी ललितकला केंद्रात नाटकाचं शिक्षण घ्यायला गेले. 

नाटक या प्रकाराशी ओळख झाली. स्टेजवर उभं राहिलं की आपल्याकडे सगळे बघतात हे मला आवडायचं नाही. स्वतःला मिटून घ्यावंसं वाटायचं... पण नाटकाचा इतिहास शिकल्यावर तीन वर्षांत काहीतरी वेगळं सापडल्यासारखं झालं नक्की. 

नुसतंच सुचणं आणि इतिहास कळल्यावर लिहिणं यांत फरक पडत असावा. एक म्हणजे तुम्ही पहिले नाही हे कळतं आणि त्यामुळे थोडं जमिनीवर राहायला होतं. दुसरं म्हणजे आपल्याला आपली भाषा सापडायला मदत होते. बेसिकली एखाद्या विषयाची थिअरी आणि त्याचा आकृतिबंध यांबद्दल शिकलं की तुमच्यात मुळातच फरक पडत असावा... म्हणजे इझम्स शिकले की साहित्य आणि कला हे काळाचं पिल्लू आहे हे जाणवतं... त्यामुळे अनेकदा आशय कितीही योग्य असला तरी तो मांडायची धाटणी बदलली नाही तर तो जुनाटच वाटू शकतो याचं भान आलं... फॉर्मबद्दलचं आकर्षण वाढलं. 

बेकेटचं वेटिंग फॉर गोदो आणि जॉ जेनेचं मेडस या दोन नाटकांनी माझ्यावर खूप परिणाम केला... म्हणजे मी त्यासारखं लिहिलं नाही. लेखनात त्याचा प्रभाव पडला असं नाही... पण ती नाटकं सोबत राहिली. तशीच सोबत राहिलेली आणि अपील झालेली काही नाटकं म्हणजे आळेकरांचं बेगम बर्वे, टेनिसी विल्यम्सचं ग्लास मिनॅजरीज, शेक्सपिअरचं मिडसमर नाइट्स ड्रीम, कर्नाडांचं हयवदन आणि चेकॉव्हचं चॅरी ऑर्चेड. 

त्या वेळेस शिक्षकांचा प्रभाव असायचा... त्यामुळे तेव्हा काही नाटकं फार आवडली होती... पण काही नाटकं नंतर वाचल्यावर त्याचं तितकंसं इंम्प्रेशन राहिलं नाही. पुढे जेव्हा अजून काही नाटकं वाचनात आली तेव्हा सारा केन या लेखिकेचा माझ्यावर खूप असर झाला. इतकं निर्भीड आणि मोडतोड, चिरफाड करणारं मी याआधी कधीच काहीच वाचलं नव्हतं. 

त्या काळात मराठी नाटकातपण बदल घडत होते. 2003 ला मी जेव्हा बीए करून बाहेर पडले तेव्हा प्रायोगिक नाटकांत काहीतरी हालचाल होत होती. अर्थात गंमत अशी असते की, आपण ज्या विषयाचं शिक्षण घेतो त्याचा समूह कितीही छोटा असला तरी त्यामध्ये जे बदलतं आहे त्याचा विचार होतोच. 

मराठी प्रायोगिक नाटकाच्या विश्वात ठरावीक नावं होती. सतीश आळेकर, महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर यांची नाटकं होऊन बराच काळ लोटला होता. शफाअत खान, जयंत पवार, दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, राजीव नाईक यांची नाटकं होत होती... पण नाटकाच्या विषयात एक मोठा बदल झाला. मोठ्या विषयाकडून छोटेखानी रोजच्या कमी नाट्यमय अशा विषयांकडे नाटक जायला लागलं. ‘साठेचं काय कारायचं?’ हे त्याचं एक उदाहरण... 

त्यामुळे गंमत अशी घडली की, जेव्हा मी पासआऊट झाले आणि माझा सिनिअर सतीश मनवर (चित्रपट-नाट्य दिग्दर्शक) यानं मला नाटक लिही असं सुचवलं तेव्हा मी जे नाटक लिहिलं... ‘सिगारेट्स’ नावाचं ते या सगळ्या बदलाचा भाग झालं... कमी पात्रं, छोटा विषय आणि रोजच्या आयुष्यातलं काहीतरी... नेहमीचं. फार ड्रामॅटीक नाही... आणि मग मी समहाऊ लिहायला लागले. ही लेखिका आहे असं लोक मला संबोधायला लागले... पण मी तशी वयानं लहान होते... एकवीस-बावीस... त्यामुळे मला काही पडलेली नव्हती. त्याचं ओझं घ्यावं असं वाटायचं नाही. मी प्रेमात होते, नाटकाचा आमचा ग्रुप होता. रोज मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायलाच हवा असं काहीतरी मला वाटायचं... त्यामुळे मी अजिबात जडबीड वाटून न घेता पुढचं लेखन केलं. 

नाटकाचा ग्रुप हळूहळू विखुरला आणि मागच्या आठदहा वर्षांत नाटकातही बदल घडले. नाटकं ही आंतरराष्ट्रीय पातळीवरच अधिक सामूहिक व्हायला लागली आणि त्याचा परिणाम होऊन त्याचं अनुकरण मराठी प्रायोगिक नाटकांत झालं. 

नाटककार प्रायोगिक नाटकांतून हळूहळू गायब व्हायला लागला/लागली. ड्रॅमॅटुर्ग (dramaturge) ही संज्ञा आली. दिग्दर्शक डिझायनर झाला. नाटकं डेकोरेटिव्ह झाली आणि मूळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या सर्व फेस्टिव्हल्समध्ये ती व्हायला हवीत... या आग्रहामुळे त्यांतली भाषा दुय्यम झाली. यात चांगलंवाईट असं नाही... पण त्यामुळे मराठी प्रायोगिक नाटक बदललं हे नक्की. विशेषतः नाटकातले प्रस्थापित गट तरी अधिकाधिक राष्ट्रीय पातळीवर काम करायला लागले. 

मी यादरम्यान जगण्याच्या कश्मकशीत होते. तरी नाटक लिहीत होते, करत होते... पण एका पाइंटला जाणवलं की, आपण पूर्ण प्रस्थापित नाही, नवीनपण नाही. यासाठी लागते ती सपोर्ट सिस्टीम आपल्याकडे नाही. त्यात ग्रुपपण विखुरलेला. मग नाटक करणं हळूहळू कमी होत गेलं. तरी मागच्या पाचसहा वर्षांत मी चार नाटकं लिहिली. दोन कमर्शिअल थिएटरमध्ये व्हावीत म्हणून त्यांची गणितं सांभाळून आणि दोन माझ्यासाठी. त्यांतलं एक इंग्लीशमध्ये लिहिलं... नुकतंच... पण ते होईल असं वाटत नाही कारण ते पॉलिटिकल आहे. सध्यातरी कुणी ते करेल असं मला वाटत नाहीये. त्यांतलं एकही झालं नाही. पाचवं ते म्हणजे अमर फोटो स्टुडिओ... जे व्यावसायिक रंगभूमीवर झालं.

मग आपल्याला जे म्हणायचंय त्याचं माध्यम नाटकपण राहिलं नाहीये किंवा आपण ज्यात म्हणतो ते नाटक होणार नाही हे मनात इतकं पक्कं झालं की त्या सुमारास मला व्यक्त व्हायला अजून कुठल्यातरी माध्यमाची गरज निर्माण झाली. 

... आणि मी कथा लिहायला लागले. सुरुवातीच्या दोन कथा सोडल्या तर त्यानंतर मला ते माध्यम आवडायला लागलं. एकतर बाकी कुणाचाही त्यात हस्तक्षेप नाही. दुसरं म्हणजे आशय आणि आकृतिबंध यांत हवं तितकं हवं तसं खेळता येतं.
 
भाऊ पाध्ये, विलास सारंग, चिं.त्र्यं. खानोलकर, श्री.दा. पानवलकर, कमल देसाई, अण्णाभाऊ साठे, जयंत पवार यांचं लेखन मला अधिक आत गेल्यासारखं वाटलं... त्यामुळे नेणीव पातळीवर काहीतरी उलाढाल होते, हालचाल होते. भाषा आणि फॉर्म यांचे कंगोरे कळू लागतात. 

मला खूप राग यायचा... पण तो व्यक्त करता येत नाही. मी भांडकुदळ नाही. वाद घालताना माझा मुद्दा मला कधीच पटवून देता येत नाही. मी पटकन हार मानते. मग हा राग बाहेर कसा काढायचा? राग छोट्यामोठ्या गोष्टींचा यायचा. साध्या-साध्या गोष्टी असतात... ज्या विषमतेची जाणीव करून देतात. 

उदाहरणार्थ, यवतमाळला दीराच्या लग्नासाठी गेले. तिथे सगळ्या स्त्रिया ब्युटीपार्लरमध्ये गेल्या... मीसुद्धा. एक बाई तिथं व्हॅक्सिंग करायला आलेली, तिनं साडी नेसलेली. ब्लाऊज किंचित घट्ट. शरीराची लाज खूप... त्यामुळे तिनं ते ब्लाऊजही काढलं नाही. व्हॅक्सिंग करणारीनं ब्लाऊजच्या बाह्या वर करून जणू काहीतरी गोपनीय करते आहे असं अगदी सुमडीत पटापटा उरकल्यासारखं तिचं व्हॅक्सिंग करून दिलं. ही बाई कदाचित स्लीव्ह्जलेसही घालत नसावी... पण नवऱ्यासाठी काखेत केस ठेवून तर चालणार नाही किंवा फॅमिली रेस्टॉरन्ट अँड बारमध्ये आलेल्या फॅमिलीज्‌. जिथे नवरे दारू रिचवत असतात आणि बायका पनीर खात असतात. त्यांचा पाळीवपणा अंगावर येतो. 

आजही अनेक घरात संध्याकाळ झाली, ऑफिसं सुटली की नवरे बारमध्ये मित्रांसोबत बसतात आणि बायका घरी मुलांचा अभ्यास घेत असतात. असं असतानाही या पुरुषांना मूल काढायचंच असतं... कारण मूल नाही झालं तर पुरुषार्थ सिद्ध झाल्यासारखं वाटत नाही. छोट्या शहरांत एखाद्या टपरीवर चहाही बायका घेऊ शकत नाहीत. रिक्षावाला, शेजारपाजारचे, आपण फिरायला गेलो तर ज्या हॉटेलात थांबलोय तिथला हॉटेलमालक कुणीपण तुमचं लग्न झालंय का? तुम्हाला मुलं आहेत का? हे विचारू शकतात. विचारण्याचं काही नाही... पण त्यावरून तुम्हाला सतत जज केलं जातं. सतत कुणापेक्षातरी आपण वरचढ ही भावना असतेच. मग कितीही लिबरल विचारांची माणसं असली तरी. 

त्यात तुमची जात, तुमचा धर्म आणि क्लास हे दोन्ही फार महत्त्वाचं असतं. हे सगळं सूक्ष्म पातळीवरचं, सततचं, रोजच्या जगण्यातलं... त्याशिवाय खैरलांजीपासून हाथरसपर्यंत; गौरी लंकेश, कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांच्या हत्यांपासून एनआरसी-सीएएपर्यंत. सगळं आहेच अस्वस्थ करणारं... पण याहून जास्त अस्वस्थ व्हायला होतं जेव्हा दाभोळकरांच्या हत्येविरोधात बोलणाऱ्या व्यक्ती कुठल्याशा बाबाबुवांकडे जातात आणि राममंदिर, एनआरसी यांना सपोर्ट करतात. 

या सगळ्याचं काय करायचं कळत नाही. मी वावरते तिथे आजूबाजूला माणसं बरी वागतात... पण धर्म-जात यांबाबतचे त्यांचे विचार कट्टर असतात आणि आपण कुणीतरी श्रेष्ठ हे तिथे त्यांना दाखवायचंच असतं. 

स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताना बायकांना रिझर्व्हेशन  हवं म्हणायचं... पण दलितांना काय गरजये रिझर्व्हेशनची? असं बोलायचं. शहारांतले लेखक गावांबद्दल संपूर्ण अजाण आणि त्याबद्दल पूर्ण दुराग्रही... उघडउघड उन्माद, तुच्छ लेखणं आणि गावातल्या नि छोट्या शहरांतल्या लेखकांना शहराबद्दल राग. सगळ्यांनाच आयतं सगळं मिळालंय असं वाटणं. 

शहरात सगळेच कसे प्रीव्हिलेज्ड असतील? शहर म्हणजे तिथली झोपडपट्टी, चाळ संस्कृती, गिरणगाव हे सगळं नाकारता कसं येईल? शहर, गाव अशा सीमारेषा खरंच आहेत का? की त्यासुद्धा धूसर झाल्या आहेत? कारण शेवटी तुमचा क्लास, धर्म, तुमची जात आणि तुमचं जेंडर यांवरच सगळी गणितं ठरणार आहेत. 

बायनरीज्‌ असलेल्या या जगात बाकी काहीही आशादायी नाही. इतकंच की, आपण जे बघतो त्याला गोष्टीचं स्वरूप देणं. मार्गारेट अटवूड ही लेखिका म्हणते, ‘War is what happens when language fails.’ तशा अर्थानं आपण सगळेच भाषा हरलेल्या जगात वावरत आहोत. भाषापण अत्यंत हिंसक, माणसाला कुठल्याही थराला नेऊन पोहोचवेल अशी... चिथवणारी....

- मनस्विनी लता रवींद्र
manaswini.lr@gmail.com


वाचा या लेखाचा उत्तरार्ध : ...मग मी का लिहिते?

 

Tags: मनस्विनी लता रवींद्र चिंतन कथा कथालेखन मराठी नाटक साहित्य Manaswini Lata Ravindra Drama Marathi Story Storytelling Musing Load More Tags

Comments: Show All Comments

Dinkar

व्यक्तींचे पराभव समाजाचे होत नाहीत. सामाजिक दुःख अनाथ होताहेत. फुटपाथवरल्या पोराकडं पाहिल्यासारखं कुठल्याही प्रश्नाकडे पाहण्याशिवाय पर्याय नसणं हे कसलं जीवन का आयुष्य. बाकी स्वतःबाबत असूनही तुम्ही वाचनीय लिहीलत.

अरुण कोळेकर , शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी.

लेखनातील आतला‌ आवाज , स्व:ताला खोदून घेणे , धीट आणि परखड भाषा , भवताल नीट न्याहळून त्याचे अंत:संबंध शोधून ते उलगडून दाखविण्याची किमया मनस्विनी लता रवींद्र यांना चांगलीच साधली आहे. आपल्या भावनांचा आणि विचारांचा तळ ढवळून काढणारे लेखन करणाऱ्या लेखिकेचे कथेविषयीचे मनोगतही मनस्वी झाले आहे. खूप मोकळं आणि अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं वाचायला मिळालं. उत्तरार्धाची असोशी लागून राहावी असे लेखन . वाचनाभिरुची निर्माण करणारे लेखन तरुणाईने वाचायलाच हवे.लेखिकेला धन्यवाद . आणि लेखनासाठी शुभेच्छा.

विष्णू दाते

मस्त, खुले,आधुनिक, सध्याच्या काळाशी सुसंगत, तरूण विचार!

Meghana Bhuskute

फार आवडलं प्रकटन. कधीतरी अजून, अजून दीर्घ गप्पा मारायला पाहिजेत आपण. किती भारीपैकी सकारात्मक अर्थानं रागीट आहेस तू.

शीतल आमटे

मनू, जबरदस्त! नेहमीप्रमाणेच. खूप दिवस झाले संपर्क नाहीये. माझ्याकडून एक घट्ट मिठी. बोलूया लवकरच.

Manini Pawar

मनू किती सुंदर लिहितोस ,सहज व्यक्त होतेस खूप छान..... तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

Vasanti Damle

मनस्विनीला मी ती एक वर्षाची असताना पहिल्यांदा पाहिले. तिचे वाचताना तिचे आईवडिल डोंळ्यांसमोर उभे राहिले. तिचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे. तिला शुभेच्छा.

नवगीरे संदीपान श्रीमंत

मनस्विनी लता रवींद्र यांची स्वतःच्या लेखननिर्मिती विषयी आणि लेखनकर्त्याच्या समकालीन सामाजिक, संस्कृतिक व साहित्य विषयक संदर्भांचा चक्री फेरा याविषयीचे मुक्त चिंतन वाचले. वाचनाच्या या पहिल्या अंकात जाणवले की या कवयित्रीच्या, नाट्यलेखनकर्तीच्या , कथा लेखिकेच्या लेखनप्रेरणा मर्ढेकरांच्या भाषेत परपुष्ट आहेत. शहरी उच्चशिक्षितांच्या घरात होणाऱ्या मराठी,हिंदी,इंग्रजी व अन्य परदेशी भाषेतील साहित्य, संस्कृतीच्या वाचनाने एक प्रकारचे बहुभाषिक, सांप्रदायिक,प्रादेशिक स्वरूपाचे वैचारिक मनोविचार तयार होतात. मनस्विनी ही या मुशीतून तयार झालेली लेखिका आहे. घरातच मुक्त वातावरणाचा लाभ मिळाल्याने, पोषक बौद्धिक भरणपोषण झाल्याने, आवडीने केलेल्या पहिल्या लेखनाला वेळीच पोहोच पावती मिळाल्याने, लहान वयात आणखी वेगळं लिहिण्याची उमेद मिळत गेली.हे ठीकच आहे. एका लेखन विश्र्वतून दुसऱ्या लेखनविश्वात दाखल होणे आणि तिथूनही काही काळातच काढता पाय घेणे ही परिपक्व कलावंताची मुक्त लेखन स्वातंत्र्याची निशाणी आहे. आपल्याला जेवढं आतून लिहावं वाटलं तेवढं लिहून पुढं जावं, उगीच रेंगाळू नये हा अष्टपैलू लेखन कर्त्याचा नियमच, म्हणून की काय मनस्विनी पुढें चालल्या आहेत. त्यांना खूप शुभेच्छा.

Sanjivani Pawde

खूप छान लिहिलंस मनस्विनी... ही खरी तरूणाई जी मला भुरळ पाडते, भावते..... तू लहान असताना तुझा तो पहिला कविता संग्रह घेऊन आई सोबत (लता) घरी आली होतीस...खूप कौतुक वाटलं होतं... उत्तरार्धाची उत्सुकता आहे....

संजय मेश्राम, पुणे

खूप छान. आपल्याला पटतील असे विचार बऱ्याच दिवसांनंतर वाचायला मिळेल. अगदी मनातलं लिहिलं. पुढील लेखनाला शुभेच्छा!

Vinod Phadke

एकदम थेट भिडलं, भावल मनाला. जणु माझच कथन वाटत होतं.( म्हणजे विचार, बाकी मी कधीच काहीही लिहिलेलं नाही).

प्रा. महेंद्र माने

अतिशय उत्तमप्रकारे लेखना पाठीमागची भुमिका आणि लेखिका म्हणून झालेली जडणघडण आपण अतिशय नेमक्या शब्दात मांडली आहे.उत्तरार्धाची उत्सुकता आहे.. मनःपूर्वक शुभेच्छा..

Add Comment