...मग मी का लिहिते?

एका मनस्वी लेखिकेचे चिंतन : उत्तरार्ध

महाराष्ट्राला दिवाळी अंकांची मोठी परंपरा आहे. दरवर्षी अक्षरशः शेकडो दिवाळी अंक प्रकाशित होतात आणि त्यांतून असंख्य कथाही प्रसिद्ध होतात... मात्र कथालेखनामागे असणारी लेखकाची अस्वस्थता, त्याचे चिंतन यांविषयी क्वचितच लिहिले जाते. आजच्या काळात दमदार लेखन करणारी मनस्विनी लता रवींद्र हिचा याच विषयावरील विस्तृत चिंतनात्मक लेख कर्तव्य साधनावरून पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असा दोन भागांत प्रसिद्ध होत आहे. 

नाटक, चित्रपट, मालिका यांचे लेखन करणारी मनस्विनी कथा हा लेखनप्रकार विलक्षण हाताळते. ‘ब्लॉगच्या आरशापल्याड’ या कथासंग्रहासाठी ‘साहित्य अकादमी’चा युवा पुरस्कार (2016) तिला मिळालेला आहे. विविध नियतकालिकांमधून, दिवाळी अंकांतून तिच्या कथा प्रसिद्ध होत असतात. या कथांमधून राजकीय, सामाजिक स्टेटमेंट्‌स सहजपणे येतात. बऱ्याचदा त्यात काळाचे तुकडे, अंतःस्थ प्रवाहही असतात. काल प्रकाशित होणाऱ्या पूर्वार्धातून तिचं कथेशी असणारं नातं उलगडत गेलं, तर आजच्या उत्तरार्धात लेखन प्रेरणेविषयीचं तिचं मुक्तचिंतन...     

कथालेखन, ललितलेखन मला जवळचं वाटतं. लेखांचं आणि नॉनफिक्शनचं महत्त्व आहे... पण मला ते कमी जमतं. लहानपणापासून कुठल्याही चांगल्यावाईट प्रसंगाशी डील करताना कल्पनाशक्तीनं मला साथ दिली आहे. 

मी घरात एकटी असायची... तेव्हा दिवसदिवसभर घरातल्या गोष्टींना, वस्तूंना, झाडांना नावं देऊन काहीतरी रचत असायचे. खऱ्या गोष्टींपासूनची पळवाट म्हणून नाही. लहानपण फार मस्त, आनंदी नव्हतं. मी खूप काळ तंद्रीत घालवला असेल... पण तरी वास्तवात यायला लागायचं. 

आपण घरात हिंसा बघितली की त्याबद्दल इम्युन होतो. त्यातला अन्याय समजेनासा होतो आणि ते नॉर्मलाइज्ड होतं. सध्या तेच आहे आजूबाजूला... हिंसेचं नॉर्मलीकरण सुरू आहे आणि त्यात माणसं भेटतात, वागतात, सोलतात, छेदतात. बातम्या येतात, वागतात, सोलतात, भेदतात. सतत फ्रिक्शन. त्यातून जो गुंता होतो त्यामुळं लिहावं वाटतं. 

लिहावं वाटतं... लिहिलं नाही तर कदाचित वेड लागेल किंवा आत्महत्या करायला लागेल असं वाटतं. लिहिताना किमान प्रेमात पडल्यासारखं वाटतं, नाहीतर कुठे कुणाच्या प्रेमात असणार आता आपण? काही गोष्टी प्राणिज असतात, माझ्यात बहुधा सावज असायची क्वालिटी असावी... त्यामुळं मी कायम सावज होते... पण लिहिताना ती भीती नसते... तुम्ही सावज व्हाल याची... त्यामुळंही लिहिलं जातं.

कथा लिहिताना आधी मला फॉर्म आणि फॉरमॅट सुचतो म्हणजे दोन जणांचं नॅरेटिव्ह असलेली गोष्ट किंवा एक ब्लॉग आणि तो वाचणारी मुलगी यांच्यातलं कनेक्शन किंवा चित्रपटाच्या स्ट्रक्चरमध्ये फिल्मी एलिमेंट्स घेऊन लिहिणं... अशा प्रकारचं. 

मी पारंपरिक फॉर्म अंगात मुरावेत असं काहीही लहानपणी बघितलेलं नाही. ना कीर्तन, ना लोकनाट्य. मी टेलिव्हिजन आणि टिपिकल नाइन्टीज्‌... लेट नाइन्टीज्‌च्या फिल्म्स बघत मोठी झाले... पारंपरिक स्ट्रक्चर आणि व्हॅल्यूज असलेल्या. 

त्याच स्ट्रक्चरचा वापर करून, तसाच हिरो घेऊन, त्याच प्रकारच्या कथानकाला मोडूनतोडून ‘बाईक बिना हिरो’ नावाची कथा लिहिली. यातला हिरो हा अँग्री यंग मॅन. डॉक्टर असून राडे घालणारा. व्यवस्था वरवर झुगारणारा. एक प्रकारचा आत्मविश्वास आणि अ‍ॅग्रेशन असणारा. सिनेमातल्या हिरोसारखा. इंटरनेटवर अनोळखी मुलीसोबत थेट चॅटिंग करणारा... पण जेव्हा त्याला आपल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळतं तेव्हा मात्र तो त्या मुलाला जाऊन ठोकतो. पुरुषप्रधान व्यवस्थेत एक पुरुष म्हणून मिळणारं प्रिव्हिलेज. 

वरवर बघता सगळं बदललेलं... छोट्या शहरात आलेलं इंटरनेट, चॅटिंग, फेसबुक वगैरे... पण स्त्रीकडे मात्र बारीक नजरेनं गाळणी-चाळणी करत गॉसीप करत राहणं.  सतत प्रत्येकावर नजर ठेवण्याची गरज असलेले अदृश्य मायक्रोस्कोप्स.

कधीकधी कथा एखाद्या पात्रातून सुचते. ऊर्मी नावाची कथा मला सुचली... ती एका मित्रानं सांगितलेल्या एका किश्शामुळं. त्याचे कुणीतरी नातेवाईक गायब झाले आणि परत आलेच नाहीत. अशा प्रकारच्या किती जाहिराती स्टेशनात आपण बघतो. ही ही व्यक्ती हरवली आहे. कुठे जातात हे सगळे? काय ऊर्मी असते ती... ज्यात त्यांना सगळं सोडून जावंसं वाटतं? त्यात ज्या प्रकारे एखादा पुरुष सगळं सोडून निघून जातो तसं एखाद्या स्त्रीला जाता येईल का? 

मागं असंच कुठेतरी वाचलेलं की ऐकलेलं... एका नटीबद्दल. ती गाडी वेगात चालवायची. एकदा गाडी अगदी डोंगराच्या कठड्याशी नेऊन तिनं थांबवली आणि म्हणाली की, असं वाटतं झोकून द्यावं यात... पण संसार, घर यांची स्त्रियांची पाळंमुळं फारच खोल रुतलेली असतात. ती नसली तरी बाहेरच्या जगाची इतकी प्रचंड भीती असते की, त्यापेक्षा घर बरं. अशा स्त्रियांच्या ऊर्मीचं काय होत असेल... यातून बहुधा ती सुचली.

‘ब्लॉगच्या आरशापल्याड’ सुचली ती आधी फॉर्म म्हणून. मग त्यात ब्लॉग कशा प्रकारचा असेल? कुठल्या देशातला असेल? मग ती मुलगी अफ्रिकन अमेरिकन असेल तर? असं एक एक अ‍ॅड होत गेलं. 

माझ्या सर्व कथा वास्तवादी नसतात. ‘कॅसिनोचे रॅपर असलेला बॉक्स’ नावाच्या कथेतल्या नायकाला रोज नदीच्या पुलावरून जाताना खाली बुडणारा माणूस दिसतो आणि तो त्याला वाचवायला रोज पाण्यात उतरतो. 

मी मुंबईत वाढले आहे. मुंबईचा खूप भाग फिरले आहे. सर्व प्रकारच्या वस्त्यांमध्ये राहिले आहे, वावरले आहे... त्यामुळं माझ्या कथेत मुंबई येते. ‘पिंपळावरचं हेल्मेट’ नावाच्या कथेत मी जाणीवपूर्वक मुंबईच्या जुन्या वस्तीचा भाग घेतला. जिथल्या इमारती आता तीसचाळीस वर्षं जुन्या आहेत... सायन, चुनाभट्टीसारखा भाग. त्या-त्या भागाचं आणि वस्तीचं आणि राहण्याच्या जागेचं मिळून एक कल्चर तयार होतं. 

त्या कथेत मी मुंबईतल्या बऱ्याच स्ट्रक्चर्सचा उल्लेख गुंफलेला आहे. त्यातली स्त्री-नॅरेटर आणि लेखक यांच्या निवेदनात सरमिसळ केली... म्हणजे कधी ती मी म्हणून बोलते तर कधी तिच्याबद्दल बोललं जातं... म्हणजे स्वत: आणि त्रयस्थ यांना एकमेकांत घुसळून टाकलं. 

जशा मुंबईतल्या या वस्त्या एकमेकांत मिसळलेल्या आहेत. या कथेतली स्त्री या वस्तीतल्या चाळीस वर्षं जुन्या इमारतीत तिचे आईवडील, नातेवाईक, बहिणी यांच्यासोबत राहते आणि ती रात्री बाहेर पडते. तिच्या ओळखीचे काही जण नवीन झालेल्या वस्तीत गोरेगाव, मालाड अशा जागी राहायला गेलेले आहेत. 

तिच्या आजूबाजूला नवीन, उंच इमारती झाल्या आहेत. तिच्या घराजवळच्या रेल्वे स्टेशनजवळ झोपड्यांची वस्ती आहे... जिथे मुसलमान आणि हिंदू यांच्या वस्तीच्या दोन बाजू आहेत... त्यांतही भाषेनुसार घरं विभागलेली. बौद्धवाडी हा भाग गटारीच्या जवळ रेल्वेलाईनला लागून आहे. हे जातधर्मवर्गनिहाय स्ट्रक्चर आहे. मुंबईसारखं शहर तुलनेनं कमी कट्टर असलं तरी आहेच. 

ती कथेतली स्त्री रात्री फिरते तेव्हा तिला हे सगळं दिसतं... शिवाय एक बारडान्सर दिसते. पुलाखाली बसून पोळ्या करणारे काही स्थलांतरित दिसतात. बीइएसटीमध्ये काम करणारे रात्रपाळी संपवून परतणारे काका भेटतात. जाडसर पूर्ण मळका पडदा असलेला त्या वस्तीतला एक लोकल बार दिसतो... जिथे सकाळपासून लोक जाऊन बसतात... त्यात असलेला लाल मंद प्रकाश दिसतो आणि शेवटी तिला कब्रस्तान आणि स्मशान दिसतं... तेपण धर्मानुसार विभागलेलं. हे सगळे शहराचे तुकडे, घटक. ती स्त्री तिच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांविषयी विचार करते आहे आणि त्याच्या बॅकड्रॉपला हे शहर. दोन्ही हळूहळू एकमेकांत मर्ज होऊ लागतात. 

असं या कथेचं स्ट्रक्चर होतं. कधीकधी एखादं प्रतीक सुचतं आणि मग कथा त्याभोवती रचली जाते. जागा या माझ्या कथेत महत्त्वाचा भाग असतात. त्यानं भोवताल बदलतो, वागणं बदलतं. 

मुंबईतल्या वेगवेगळ्या वस्त्यांना घेऊन यासारख्या अजून कथा मला लिहायच्या आहेत. वसई-विरारसारख्या जागी ‘बेफिकीर कणसांचं रान’ ही कथा घडते... जिच्यात दहावीतला मुलगा आहे... शहराच्या जवळ पण पूर्ण शहर नसलेला भाग. तिथे तो मोठा होतो आहे. त्याची हाईट अचानक वाढली आहे. समाज त्याला त्याच्या पुरुषपणाची आणि पुरुषत्वाची जाणीव करून देतोय आणि तो ज्या ठिकाणी क्रिकेट खेळायला जातो तिथे वाटेत एका पुलाच्या खाली खाडीत रामबाण कणसांचं रान माजलंय. ही कणसं तोडायचा प्रयत्न तो रोज करतो आणि ती लवचीक कणसं त्याला हुलकावणी देतात. 

त्यांचे दुसरीकडे समाजाकडून त्याच्याकडे सुपुर्त झालेले पुरुषपणाचे ट्रेट्स आहेत जे नेणिवेत शिरलेत... पण त्याच्या वडलांना शेजारची मुलगी पेढे द्यायला येते आणि नमस्कार करते तेव्हा ते चोरून तिच्या छातीला स्पर्श करतात हे तो मुलगा बघतो आणि त्याला स्वतःच्या मुलगा म्हणून असलेल्या सत्तास्थानाला प्रश्न विचारावासा वाटतो. त्याला त्याचीच लाज वाटते, चीड येते... तो त्या खाडीत शिरून ते रामबाण कणसांचं रान तोडून काढतो. जबर चिवट आतपर्यंत रुतलेल्या पुरुषीपणाचं प्रतीक म्हणून मला ते वापरावंसं वाटलं. 

बरेचदा माझ्या कथा या पुरुषाच्या नॅरेशनमध्ये असतात. मूळात नाटकाकडून कथेकडे वळल्यामुळे पात्रांच्या त्वचेत शिरून लिहिण्याची गंमत वाटते... स्थळकाळाचे पाश ओलांडून जाता येतं. 

लोककथा, मिथकं याच्या धर्तीवर ‘तीव्र ठणक’ नावाची कथा लिहिली होती. एक खलाशी बाप आपल्या आजारी मुलीला वेगवेगळ्या कथा सांगतो... मुक्तपणाच्या. लोककथांच्या धर्तीवर मी त्या लिहिल्या होत्या. त्या कथेत अरेबिअन नाइट्ससारखं स्ट्रक्चर करायचा प्रयत्न केला होता. अर्थात मला ते अजून खूप लिहावं वाटत होतं... पण मी ते आवरतं घेतलं... कारण त्यात कितीही कथा लिहिता येणं शक्य होतं... पण असं लिहिताना फार मजा येते. छान वाटतं. 

लग्नव्यवस्था हा व्यवहार आहे आणि ती सोयही आहे इथली उतरंड टिकवण्याचा. बेल हुक्स नावाच्या अफ्रिकन-अमेरिकन रायटरचं पुस्तक आहे... ‘‘Ain't I a Woman?’ जे अफ्रिकन-अमेरिकन स्त्रीचं अमेरिकन सोसायटीतलं स्थान याबद्दल बोलतं. ती म्हणते ‘Racism has always been a divisive force separating black men and white men, and sexism has been a force that unites the two groups.’  

हेच आपल्याकडच्या समाजातही दिसतं. स्त्रियांचा प्रश्न आला की सर्व जातींतले पुरुष एकत्र होतात. जी व्हॅल्यू सिस्टीम उच्चजातीच्या पुरुषांना हवी आहे तीच व्हॅल्यू सिस्टीम खालच्या जातीच्या पुरुषांनाही हवी आहे. तिच्यात स्त्रियांचं शोषण आहे आणि जेव्हा स्त्रीच्या समान हक्काची गोष्ट येते, मुक्त मोकळीकतेची गोष्ट येते तेव्हा दोन भिन्न स्तरांतल्या स्त्रिया मात्र एकच व्हॅल्यू सिस्टीम मानत नाहीत. 

उदाहरणार्थ, उच्चजातीय स्त्रियांची अपेक्षा असते की, मोकळीकतेची मक्तेदारी आपल्याकडे आणि ट्रॅडिशनल व्हॅल्यूज्‌ सांभाळायची जबाबदारी खालच्या वर्गाकडे, जातींकडे... त्यामुळंच डोमेस्टीक व्हॉयोलन्स हा फक्त खालच्या वर्गात होतो असा समज निर्माण केला जातो आणि मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय घरांत होणाऱ्या हिंसेकडे काणाडोळा केला जातो... कारण त्या स्त्रिया स्वतःला मुक्त मानत असतात. 

आपण गाडी चालवतो, कुठल्यातरी मोठ्या पोस्टवर असतो, ब्रॅंडेड कपडे घेतो, दारू-सिगरेट पिऊ शकतो म्हणजे आपण स्वतंत्र झालो असा काहीतरी समज निर्माण होतो... पण खरंतर दोन्ही गटांतल्या पुरुषांच्या स्त्रियांकडूनच्या अपेक्षा सारख्याच असतात आणि हिंसापण सारखीच असते. 

लग्नव्यवस्था या हिंसेचं समर्थन करते, ती आर्थिक एक्सप्लॉयटेशन करणारी संस्था आहे आणि तिच्यात प्रचंड दमन आहे... आणि आता ही इतकी रुजली आहे की, ती मोडायचं म्हटलं तरी फटका स्त्रीलाच बसणार. या व्यवस्थेबद्दलही मला खूप लिहावं वाटतं. त्यावर भाष्य करावं वाटतं. 

गोदार्द त्याच्या सिनेमाच्या दृष्यात्मकतेतून आणि बर्गमन कथानकातून या स्त्री-पुरुष नातेसंबधाच्या गुंतागुंतीवर खूप मोठं भाष्य करताना मला दिसतात. गोदार्दच्या सिनेमातल्या स्त्रियांचं रेझरनं केस काढणं; आरशासमोर स्वतःला न्यहाळणं; डोळा, कान, पायावर पाय, तिच्या मानेवर त्याची बोटं असे अत्यंत एक्स्ट्रीम क्लोजअप्स यांतून तो पात्रांना सूक्ष्मदर्शकाखाली बघतो... 

त्यामुळं जो परिणाम साधला जातो, तो बरोबर त्याला जे म्हणायचं आहे त्याकडे जाणारा असतो. त्याचे सिनेमे बघितल्यावर मीसुद्धा त्या सूक्ष्म तपशिलांचं वर्णन करायला लागले. आधीपण करायचे... पण मला वाटतं या दृष्यात्मकतेचा माझ्या लेखनावर काहीतरी मोठा परिणाम झाला. 

पुस्तकांच्या सोबतीनं सिनेमा हा माझ्यासाठी खूप मोठा सुचण्याचा स्रोत आहे. मागं एकदा कुठल्याशा सिनेमाच्या साउंडच्या स्टुडिओमध्ये गेले होते. तिथलं फोलीचं काम बघितलं. साउंडचं काम कसं चालतं ते खूप जवळून बघितलं. मग एका कथेत मी ते वापरून बघायचं ठरवलं म्हणजे प्रत्येक प्रसंगाला एक शाब्दिक साउंड इफेक्ट देता येतो का असं. ते लिहिताना एकदम जाणवलं की, ध्वनिवाचक किती शब्द आहेत मराठीत. झुळझुळ, खळखळ, सळसळ, धबक, टपटप, डुबकी, सर्रकन, झर्रकन, छमछम, खसखस आणि असे अनेक... अनेक... फारच गंमत वाटली ते लिहिताना. 

इंग्लीश पुस्तकं मी आधी कमी वाचायचे. इंग्लीशमधली नाटकं वाचायचे पण बाकी थोडं कमी. आता बरंच इंग्लीश वाचते. मिलान कुंदेरा, मार्क्वेज, क्नट हमर्सन, कर्ट वोनेगट, चिमांमांडा ग्नोझी आदिचे, का़फ्का, काम्यू, मुराकामी, मार्गारेट अटवूड आणि असे बरेच. 

इंग्लीश वाचायला लागल्यावर वेगवेगळ्या भाषांतून भाषांतरित झालेलं जगभरचं साहित्य वाचता येतं. लैंगिकता, शारीरिकता यांबद्दलचं अवघडलेपण तिथं जाणवत नाही. सहजता असते. तू लैंगिकतेविषयी लिहितेस असं बरेचदा लोक मला म्हणतात. खरंतर मी असं लिहिते असं मला वाटत नाही. तो आकृतिबंधाचा किंवा आशयाचा भाग असेल तर ते आपसूक लिहिलं जातं. मुद्दाम तो विषय घेऊन मी कधीच लिहिलेलं नाही. लिहायला हरकत नाही... पण आत्तापर्यंत तरी तसं लिहिलं नाहीये. 

दुसरीकडे मी स्वतः व्यक्ती म्हणून बऱ्यापैकी रुमानी स्वभावाची आहे... त्यामुळे प्रेम, त्यातली गुंतागुंत, एक प्रकारचा रोमॅंन्टीकपणा त्यात असावा. इमॅजिनेशन ही इतकी भारी गोष्ट वाटते मला... जे आपण जगू शकत नाही ते काहीही आपण इमॅजिन करू शकतो आणि त्या स्वप्नरंजनाची एक कीक बसते. त्यासाठीपण लिहावं वाटतं.

मला खूप प्रचंड स्वप्नं पडतात... रंग, पोत, वास असलेली आणि नंतर बरेचदा ती आठवतातसुद्धा. झोपेतून उठल्यावर तीनचार सिनेमे सलग बघून टॉकीजमधून बाहेर आलेय असं वाटतं. मला त्यावरपण काहीतरी लिहायचं आहे... एखादी कथा किंवा कादंबरी, ज्याचं स्ट्रक्चर हे स्वप्नांसारखं असेल... अतार्किक तरी रंगीत. 

बरेचदा आपल्याला खूप काही वाटत असतं आणि लिहिताना प्रत्येक वाक्य, शब्द हा काही तितकासा ठरवून नाही लिहिला जात. ढोबळमानानं दिशा ठरवली जाते... पण बाकी गोष्टी आपसूक घडतात. कधीकधी शब्द पूर्ण साथ देतात... इतकं सहज स्फुरत असतं आणि कधीकधी काहीच धड सुचत नाही. खूप प्रयत्नपूर्वक लिहावं लागतं. मी जे काही दृक्‌श्राव्य माध्यमासाठी व्यावसायिक काम करते त्यासाठी रोज दिवसाचे चार तास तरी बसून लिहावंच लागतं. मग त्यानंतर आपल्याला वाटतं ते. 

ते मी रोज लिहिते असं नाही... पण तरी आठवड्यातून तीन ते चार वेळा ते लिहायला बसते. सतत लिहायचा सराव असावा लागतो असं मला वाटतं. ते एक्सरसाइजेससारखं आहे. लवचीकपणा सातत्यातून येतो. हे मला वाटतं सगळेच लेखक करत असतात. 

कथाबीज सुचलं की मी बरेचदा नोंद करून ठेवते. आधी बाहेर असताना लिहून ठेवाव्या वाटलेल्या गोष्टी मोबाईलमध्ये नोंदवून ठेवायचे... पण मोबाईलमध्ये गोंधळायला होतं... शिवाय आता मोबाइल थ्रू आपल्यावर चोवीस तास पहारा असतो... त्यामुळं मागच्या एका वर्षापासून मी डायरी ठेवते. 

बरेचदा सतत लिहून तुम्ही जे शब्द नेहमी वापरता तेच परत-परत वापरले जायला लागतात. मग नवीन काही वाचलं की माझ्या वापरात फार नसलेले शब्दसुद्धा मी लिहून ठेवते. ते लिहिले की आपोआप कधीतरी पुढच्या लेखनात डोकावतात. 

मी काही कथांचे ड्राफ्ट्‌स करते... पण काही कथा मात्र एकटाकी लिहिल्या जातात. जशी ‘मळक्या पायांची मुलगी’, ‘ओझं’ किंवा आत्ता नवीन लिहिलेली ‘रहस्य, प्रेम आणि खून’. बरेचदा लिहून झालं की परत ड्राफ्ट करताना नवीन खूप अ‍ॅड होतं किंवा एडीटही होतं. एखादा भाग कथेत नकोसा असेल तर ते सतत डोक्यात राहतं. त्यावर विचार होतो. ते नको, ते नको असं आपल्याला मन सांगत राहतं... दातांत काहीतरी अडकल्यासारखं आणि ते एडीट केलं की बरं वाटतं. 

वाक्याची रचना मी बरेचदा मुद्दाम बोली करते म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद हा क्रम गरज असते तिथे मोडते... त्यामुळे कदाचित ते पुस्तकी न वाटता आसपासचं आहे असं वाटतं... शिवाय त्यातला एक्सक्लुझिव्हनेस कमी होतो किंवा त्याला खूप महत्त्व दिल्यासारखं वाटत नाही. 

बरेचदा लेखक स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी भाषेला फार आग्रही पद्धतीनं मांडतात किंवा वाचतात, बघतात. ते मला प्युरिटन वाटतं. मोघम असणं मला पटत नाही... पण तितकंच फार आग्रही असणंही नाही. मी जाणीवपूर्वक इंग्लीश शब्द वापरते. सगळ्या मराठी शब्दांचा अट्टाहास मला फार पटत नाही... कारण जशी उर्दू मराठीत आली, मिसळली... तिच्यातून नवीन शब्द निर्माण झाले, तसंच आहे. 

इंग्लीश, आत्ताची स्लॅंग, मोबाईलची तोडकीमोडकी भाषा हे सगळे प्रवाह भाषेत येणारच. ते यायला हवेत. भाषा जशीच्या तशी कधीच राहत नाही. बाहेरून आलेल्यांना जसा विरोध होतो तसंच हे वाटतं. कोण बाहेरून आलेलं नाही? सगळेच इकडून तिकडून आलेत. पवित्र आणि शुद्ध हे दोन शब्द मला अमान्य आहेत. त्यांचा अर्थ मला आवडत नाही. 

कथेत अनेक प्रतलं असतात आणि ते आपसूक होतं असं नाही. ते ठरवून केलेलं असतं... पण त्यामुळं कथा दुर्बोध झाली तर... किंवा कळायला अवघड झाली तर... असा विचार मी कथा लिहिताना करत नाही. अगदी बिलकूलच करत नाही... कारण मी इतर माध्यमांत जे लेखन करते... त्यांत मला हा विचार सतत करावा लागतो... त्यामुळं इथं तो कटाक्षानं टाळते, नाकारतेच जवळपास. 

अजून एक म्हणजे लिहिताना तुम्ही स्थिर होता. अनेकदा मी स्वतःला खूप कोतं समजत असते पण लिहायला लागल्यावर ते सगळं गळून पडतं. कोतं असणं किंवा नसणं यानं फरक पडत नाही. 

एकवीस-बाविसाव्या वर्षापासून मी व्यावसायिक काम नाटकाच्या सोबतीनं सुरू केलं... कारण पैसे मिळवणं गरजेचं झालेलं. आपण कुणावरही अवलंबून राहायचं नाही हेपण होतंच. त्यानंतर आर्थिक थोडं बरं चालू झालं... मग परत काम नाही, परत स्ट्रगल असं अजूनपर्यंत सुरूच आहे. खूप पैसे कमावणं झालं नाही. त्याचं कारण सतत एक गिल्ट असायचा हेही आहेच. 

आपण करतो ते काम पैशासाठी आहे. इथं व्यक्त व्हायला जागा नाही. ती शोध़ून कधीतरी तुम्हाला काहीतरी तेही फार ढोबळ किंवा साध्यासोप्या पद्धतीनं सांगावं लागतं. विचारांना इथं स्थान नाही असं वाटायचं. घुसमट व्हायची. टेलिव्हिजनसाठी लिहिणं हे असं वाटत राहायचं. जे वाटून घेणं मी आता बंद केलंय... कारण शेवटी जगायला काहीतरी लागतं आणि अभिव्यक्त होण्याचं माध्यम आणि माझं पैसे मिळवायचं माध्यम साधारणतः लेखन असं ढोबळमानानं असलं तरी या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. 

साहित्यात कथा-कादंबऱ्या लिहिणारे लेखक बरेचदा आपल्या म्हणण्याविषयी आग्रही असतात... जे साहजिक आहे. मीसुद्धा कथा लिहिते तेव्हा आग्रही असते... पण सिरिअल किंवा व्यावसायिक चित्रपट या माध्यमांत तसं चालत नाही. तुम्ही कितीही चिकित्सक वृत्तीचे असलात तरीसुद्धा बरेचदा ते सोडून द्यावं लागतं... पण मग मी त्याचा वापर फक्त लेखनापुरता मर्यादित ठेवण्याची कला अवगत केली आहे. त्रास होतो... पण तो माझा माझ्यापुरता असतो. 

प्रत्येक ठिकणी सगळ्यांसाठी नियम सारखे नसतात. टेलिव्हिजन आणि कमर्शिअल फिल्म्सच्या गणितात कितीही हीट कामं केली, सातत्यानं केली तरी तुम्हाला संधी असतेच असं नाही. अ‍ॅरोगन्स चालतो... पण विचार आणि जगणं मात्र पठडीतलं हवं. विशेषतः समाजमान्य आणि व्यवस्थेला पूरक हवं किंवा मग तुम्ही कुणाचे तरी कुणीतरी हवे किंवा तुमचा क्लास वेगळा हवा आणि तुम्ही तुमचे विचार लपवून ठेवू शकत नाही... त्यामुळं माझ्यासारखीला कामं ही मेरीटवर नाही... तर गरजवंत झालो, लाचार झालो की मिळतात. बाहेर याबद्दल गैरसमज असतात. ग्लॅमर दिसतं. चार वेळा नाव छापून आलं म्हणजे जरा अतीच कौतुक होतंय वाटतं. 

टेलिव्हिजनसाठी लिहिताना विचारांशी प्रामाणिक राहणं आणि थोडेफार का होईना बदल करणं, गोष्ट सांगायच्या आणि व्यक्तिरेखेच्या माध्यमातून याची जाणीव नसते. त्यातले प्रयत्न किंवा तिथली धडपड आणि कशा प्रकारच्या लोकांशी डील करावं लागतं ते समजत नाही. 

वाक्यं, शब्द यांची साहित्यात केली जाते तशी चिकित्सा केली जाते... त्यामुळं दुखावलेपण येतं. मी करते याचं सतत कौतुक करावं असं नाही. हे फार मोठं महानही नाही... पण त्याला वेगळ्या प्रकारचा स्ट्रगल करावा लागतो आणि तो अविरत, निरंतर चालूच असतो याची जाणीव नसणं बोचतं... शिवाय कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असता तेव्हा चार माणसं संपर्कात येतात, स्नेही होतात. अशा वेळेस त्या क्षेत्राला पूर्ण नाकारता येत नाही. तिथं थोडं गुंतायला होतं. त्यात माणसांच्या स्वभावांतली विविधता, त्यातले कंगोरे, व्यामिश्रता सगळं जाणून घेणं आपसूक होतं, आवडतं. 

त्या मानानं साहित्य क्षेत्राशीच माझी तशी फार ओळख नाही. जास्त प्रकाशक, लेखक यांच्याशी पर्सनली ओळख, मैत्री नाही. इथं मी मला उपरी वाटते... पण विरोधाभास असा की, इथं साहित्यक्षेत्रात मला कुठली गाळणी लागत नाही आणि जिथं काही ओळखी आहेत तिथं सतत गाळणी लागते. हे असंच नमूद करावं वाटलं. उगीच. 

काही लेखक, साहित्यिक हे ज्ञानार्जन ही जबाबदारी असल्यासारखं करतात.. पण इतकं मिशन असल्यासारखं मला नाही जमू शकत. मला आरामात, हळू, संथ जायला आवडतं किंवा माझी ती स्पेस असेल आणि प्रत्येक जण भिन्न आहे... त्यामुळं कुणाला ते खटकत असू शकेलही. आपल्याहून वेगळं किंवा आपण केलेल्या प्रतिमेला तडा जाणारं काही असेल तर समोरच्याला रागराग येतो. त्याचा मला खूप त्रास होतो. 

आशय हा आपल्यासोबत असतो... पण मांडणी आणि आकृतिबंध आपल्याला शोधावा लागतो. कधीकधी काही आशय आपल्यासोबतच फॉर्म घेऊन येतात. कधीकधी तुम्हाला आशयाला फॉर्मच्या साच्यात बसवावं लागतं.

वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये लिहिता यायला हवं. जे सुचतंय त्याची इन्टेन्सिटी - घनता कमी न होता ते कथा-कादंबऱ्यांत उतरवता यायला हवं असं वाटतं. इस्मत चुगताई, मंटो आणि चेकॉव्ह यांनी ज्या पद्धतीनं लघुकथा हा प्रकार हाताळला आहे ते अचंबित करणारं आहे. कथेला बरेचदा कांदबरीइतकं महत्त्व दिलं जात नाही... पण हा एक स्वतंत्र आणि सर्वात जुना साहित्यप्रकार आहे. त्यात करून बघण्यासारखं खूप आहे असं मला माझ्यापुरतं तरी वाटतं. 

मला चित्रपट या माध्यमातूनही कथेइतकं पारदर्शक होऊन व्यक्त होता यायला हवं आहे. तिथं प्रोड्युसर पैसे लावत असल्यामुळं तसं ते सहज जमत नाही... पण आपणच आपला चित्रपट करू शकण्याइतकी मोकळीक आणि स्वातंत्र्य मिळालं तर ते शक्य होईल... शिवाय त्याला थोडाफार खर्चही येणारच... त्यामुळं परावलंबित्व येतं. 

तरी कधीकधी मी एखाद्या टीनएजरइतकी स्वप्नाळू होते, वास्तवाची परिमाणं पुसली जातात आणि व्यक्त होण्यासाठी आपण काहीही करू शकतो असं वाटतं. मेअर होल्डच्या सिम्बॉलीक आणि फिजिकल थिएटरसारखं किंवा ग्रोटिव्हस्कीच्या पूवर थिएटरसारखं किंवा युजिनिओ बार्बा आणि पीटर ब्रूक यांच्या मिनिमलिस्टीक थिएटरसारखं काहीतरी आपणपण सिनेमात, नाटकात करू शकू असं वाटायला लागतं. जिथं गरजा इतक्या कमी असतील आणि म्हणणं इतकं अग्रस्थानी असेल की, आपल्याला आपला सूर सापडेल. आपलं काहीतरी मांडायला इतरांवर विसंबून राहावं लागणार नाही. या पॉइंटपर्यंत पोहोचता यावं असं वाटतं. 

चिमांमांडा ग्नोझी आदिचे ही लेखिका असं म्हणते - To choose to write is to reject silence...आणि ही शांतता मोडायला सतत लिहीत रहायला हवं असं मला वाटतं. 

- मनस्विनी लता रवींद्र
manaswini.lr@gmail.com


वाचा या लेखाचा पूर्वार्ध - ...आणि मी कथा लिहायला लागले !

Tags: मनस्विनी लता रवींद्र चिंतन कथा कथालेखन मराठी नाटक साहित्य लेखन Manaswini Lata Ravindra Drama Marathi Story Storytelling Musing Writing Load More Tags

Comments: Show All Comments

अरुण वाघ

मनस्वी लता रवींद्र, या बंडखोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेखिका आहेत. शब्दा शब्दात त्यांच्या बंडखोरी दिसून येते. अरुण वाघ

Sujata Bodhankar

तुमचं हे लेखन वाचकाला खिळवून ठेवणारं आहे. आपली खूप जुनी ओळख असल्यासारखं अगदी सहजपणे तुम्ही माझ्याशी बोलताय असं वाटत होतं वाचताना. फार ग्रेट वाटलं.

Rahul Dahikar

प्रवाही लेखन.भाषा सुध्दा प्रवाही.वार्ता करतो असं सहज वाटत राहते व हा प्रवास संभाषणाचा कधी थांबू नये इतके प्रभावी लेखन.आपले अभिनंदन. असेच वेगवेगळे प्रयोग करीत रहा.नवे नवे आयाम लेखनात प्रदिप्त होतील।

संजय मेश्राम, पुणे

अगदी मनापासून आपण संवाद साधला. अनुभव, मनोगत, मते, दृष्टीकोन आदी जाणून घेता आले. शेयर केल्याबद्दल धन्यवाद!

Suresh Topkar

ओघवती भाषा, चिकित्सक दृष्टी अभासू वृत्ती सर्व गुण लेखनात आहेत. आपल्याच कामाचे प्रामाणिक विश्लेषण जाणवते. Good Luck .

विष्णू दाते

छान, आधुनिक काळाशी सुसंगतता साधणारी "मनस्वी" लेखिका!

Apurva

Your imagination is beyond words..Lots of best wishes to yours dreams should come true..To manu..Elder sister

Vinod Phadke

Fantastic! आपण जसे आहोत त्याप्रमाणे व्यक्त व्हायला लागणारा सच्चेपणा कमालीचा भावला

Bhimrao Kadhare

Extremely Inspirational Articles. Writer's Motivation behind Writing is Really a matter of Inspiration for New Writers

Add Comment