कोरोनाचे संकट आणि त्यानंतरचा लॉकडाऊन यांमुळे मी अडीच महिने घरुनच काम करत होते. फावल्या वेळात नवनवीन पदार्थ करून बघत होते. मला घरी बसून कंटाळा येत होता. मी चिडचिड करत होते, निराश होत होते, मन रमवण्यासाठी स्वयंपाक करणे, सिनेमे बघणे, वाचणे, व्हिडीओ कॉल असे काहीबाही करत होते. ही सगळी चैन मला परवडली. अनेकांचा अनुभव कमीअधिक प्रमाणात असाच असेल.
इतका दीर्घकाळ लॉकडाऊन असले तरी भाजीपाला, गॅस, किराणा इत्यादी गोष्टी सहजपणे मिळत होत्या. पैशांचे व्यवहार होत होते, कचरा उचलला जात होता. यासाठी काही लोक काम करत होते... पण त्यांचे काम कसे चालले होते? कोरोनाचा धोका त्यांनाही होताच. पोलिसांची भीतीही होती. मास्क, सॅनिटायझर वापरण्याविषयी फारशी जागरुकता नव्हती. रोज बदलणाऱ्या नियमांची माहिती नव्हती. अर्थात, काम करून कुटुंबाला पोसायचं हे कर्तव्य माहित होते. मात्र आपण essential services मधे येतो हे त्यांना ठावूक नव्हतं... आणि खिडकीतून आभाळ बघत बसणाऱ्या अनेकांप्रमाणेच मलाही रस्त्यावरची परिस्थिती कळत नव्हती.
आता हळूहळू सगळं ‘unlock’ व्हायला लागल्यानंतर इतक्या दिवसांनी माझी हिंमत झाली (!) बाहेर पडून बघण्याची की लॉकडाऊनमध्ये कोण कसं काम करत होतं. मास्क, सॅनिटायझर आणि आईच्या भरघोस सूचना घेऊन मी घरातून निघाले. पुण्यामध्ये संपूर्ण सिंहगड रस्ता, मार्केट यार्ड, दांडेकर पूल, भवानी पेठ अशा स्वारगेटच्या परिघातील काही भागांतून (यांपैकी बराचसा भाग 'अतिसंक्रमणशील' क्षेत्रांत मोडणारा होता.) मी फिरले. सुरुवात भाजीवाल्यांपासून केली. बहुतांश भाजीवाल्यांनी सुरवातीच्या कडक लॉकडाऊनमध्ये काम बंदच ठेवले होते.
सुनिता ताईचा भाजीचा मोठा ठेला आहे. ठेल्याला वर पत्रे घातलेले, त्यावर ताडपत्री. या जरा प्रगत भाजीवाल्या ताई दिसतात म्हणून मी त्यांच्याशी आधी बोलायला गेले. औषधांच्या दुकानात मिळणारा चांगला मास्क त्यांनी लावला होता. त्यांच्याकडे सतत येणाऱ्या ग्राहकांच्या मधून त्या मला उत्साहानं माहिती देत होत्या.
‘ताई लॉकडाऊन मध्ये भाजी विकत होता?’
‘होय, विकत होतो की’
‘पण असं विकायला बसायला चालत नव्हतं की तेव्हा... ’
‘होय. तेव्हा इथं बसायचो नाही. इथल्या सोसायट्यामध्ये घेऊन जायचो. तिथं ओळीनं बुट्ट्या लावायचो. सोसायट्यातले लोक ओळीनं युन भाज्या घ्यायचे.’
‘मार्केट यार्ड पण बंद केलेलं ना बरेच दिवस. मग भाज्या कुठून आणायच्या?’
‘आमचं चाकण गावय. तिथनं डायरेक्ट शेतकरी लोकांकडनं आणायचो.’
‘पण पुण्यातनं रोज बाहेर जायचं आणि रोज परत यायचं हे कसं करत होता?’
‘ते पास काढलेला की आम्ही. ऑनलाईन पास होता. मी काढला की माझं मीच.’
‘भारीय की मग’
इथपर्यंत सगळं छान छान चाललेलं. आपण एका मेट्रो येऊ घातलेल्या प्रगत शहराची पॉ सिटीव्ह स्टोरी करत आहोत असं मला वाटायला लागलं होतं.
‘भारी काय! रात्री जायला लागायचं 12 -12.30 नंतर चाकणला भाज्या आणायला, पहाटेपर्यंत परत यायचं. पास असूनपण पोलीस मारायचे. माझ्या नवऱ्याला पायावर काठ्या बसलेल्या. तीन दिवस झोपून होता. आमची भाजीची गाडी पोलिसांनी फोडली. सगळ्या काचा फुटलेत गाडीच्या. आता रिपेअरी करायला परवडत नाही. ती तशीच ठेवलेय गाडी.’
पहिल्यांदाच ताईंचा नवरा पुढं येऊन बोलला. इतका वेळ तो गिऱ्हाईक बघत होता.
‘घरी दोन पोरं आहेत मला. त्यांच्यासाठी काम करायला बाहेर पडतोय. पण भीती वाटती. आम्हाला कोरोना झाला तर? पोरांना पण हुईल की.’
याच भीतीनं मीही अडीच महिने घरी बसलेले. ‘भीती’मुळे घरी बसणं मला परवडलं.
‘एक फोटो घेऊ काय ताई’
‘घ्या की’ ...
फुटपाथवरची गर्दी कापत मी पुढे गेले. तिथं दोन बायका फुटपाथवर भाजी मांडून बसलेल्या.
‘ताई लॉकडाऊन मध्ये भाजी विकायचा काय?’
‘नाही. कुठलं. आम्हाला बाहेर पडायला देत नव्हते. दोन महिने घरीच होतो.’
या ताईनं तिच्या चकमकत्या साडीचा पदरच तोंडाला गुंडाळून बांधलेला. पण ती डोळ्यातून छान हसून बोलत होती. इतक्या फास्ट बोलायची की दोन-दोनदा मला ‘काय?-काय?’ करावं लागलं.
‘बाहेर का पडून देत नव्हते?’
‘आम्ही पर्वतीपाशी ‘वस्ती’ त राहतो ना. काय रोग पसरू नये म्हणून वस्तीतून बाहेर पडू देत नव्हते. माझा काय पहिल्यापासून भाजीचा धंदा नाही. मी धुणं-भांड्याची कामं करतोय. पण येऊ नका म्हणलेत अजून महिनाभर.’
‘मग पैसे तरी देतात काय?’
‘पहिल्या महिन्यात दिले की. एप्रिलला नाही दिले.’
‘पण तुम्ही मागायचे होते की.’
‘आता आपण कामच केलं नाही की ताई. खोटं कशाला बोला. सगळ्यांना माणुसकी असती होय?’
‘मग कसं भागलं दोन महिने?’
‘रेशनला तांदूळ. गहू ते मिळालं की.’
‘हां. मग ठीकाय’
‘भाडं थकलंय तीन महिन्याचं. आता मालक म्हणतोय घर सोडा.’
‘पण मोदिजीनी सांगितलं की घरमालकांना या तीन महिन्याचं भाडं मागू नका. ऍडजस्ट करा. पुढं-मागं देतील. घरातून बाहेर काढू नका.’
‘मोदीचं कोण ऐकतंय! शेजारचे म्हणतात पोलिसात तक्रार करा. मालक म्हणतोय असा काय नियम केलाय काय घरभाड दिलं नाही तरी ठेऊन घ्यायचं? दाखवा म्हणतोय तसला नियम. आता कुठं पोलिसात जायचं त्यांचा आणि मार खायला’
‘मग आता कुठून घेताय भाजी? मार्केट यार्ड मधून?’
‘नाही. तिथं फक्त लायसन्सवाल्यांना घेतात आत. माझ्याकडं लायसन्स नाही. ते काढायला दीड हजार रुपये लागतात. ते आणि कुठून आणू?’
शेजारच्या भाजीवालीकडं हात दाखवून म्हणाल्या, ‘हिच्याकडं आहे लायसन्स. ती घेती भाजी आणि मला देती. रिकामं बसण्यापेक्षा हे बरं नाही.’
‘चांगलय.’
‘आता इथं कॉर्पोरेशनची गाडी येती कधीपन. तिकडं कोपऱ्याला गाडी आली की आम्ही हे सगळं उचलतोय आणि या बिल्डिंगांमधे लपतोय.’
तेवढ्यात तिच्याकडं दोन-तीन बायका भाजी घ्यायला आल्या. तोपर्यंत मी तिच्या शेजारी मांडी घालून बसून घेतलं. बायका भाज्या घेऊन गेल्या. मी तंद्री लाऊन बसलेले.
‘ताई तुम्ही कुठं राहता? या समोरच्या ‘सोसायटी’मध्ये?’
‘नाही. मी इथून बरीच लांब राहते.’ मी म्हणाले
मी पुढे निघाले. ती स्वतःच्या भागाला ‘वस्ती’ म्हणत होती. फुटपाथच्या मागच्या इमारतींना ‘बिल्डींग’ म्हणत होती आणि माझ्या घराला ‘सोसायटी’ म्हणत होती. तिला या सगळ्यातला फरक नेमका कळत असावा.
मला बरेच भाजीवाले भेटले. त्यातले मोजकेच भाजीवाले लॉकडाऊनमध्ये भाजी विकत होते. बाकीचे मिळालेल्या रेशनवर आणि थोड्याफार शिलकीवर दिवस काढत होते. पोट भरत असलं तरी त्यांची घरभाडी थकली आहेत, आधीची देणी तुंबली आहेत.
अजून एक एकदम तरतरीत ताई भेटल्या. ‘या अक्ख्या एरियात आमचा एक तेव्हढा स्टॉल चालू होता’ म्हणाल्या.
‘पण ताई तुम्ही दर पण वाढवून लावलेले की. म्हणजे कमाई पण चांगली झाली असणार’
स्टॉलच्या मागं लावलेल्या छोट्या टेम्पोला टेकून ताई चहा पीत होत्या. तिथं खाली एका खोक्यावर बसलेला त्यांचा जावई आमच्या चर्चेत मधे पडून म्हणाला,
‘कमाईचं काय मॅडम. आता हे बघा ही सिमला मिरचीची पिशवी. आता मार्केट यार्ड बंद होतं. आम्ही यवत, शिक्रापूर अशा गावातनी जाऊन भाजी आणायचो. तिथं चार गावात शेतकऱ्यांच्या पाशी ही हुं म्हणून गर्दी. आमच्या सारखी भाजी घेणारी सगळीच तिथं जाणार ना. मग ही सिमला मिरचीची एक पिशवी शेतकरी मला लावणार 50 रुपयाला. माझ्या मागं माझ्यासारखं दहा जण. मग दुसरा म्हणणार मी 60 ला घेतो मला दे. अजून एक म्हणणार मी 80 देतो मला दे. मग मी झक मारत किंमत वाढवून 90-100 ला ही पिशवी आणणार. मग मी तशीच किंमत लावणार की इथं युन. मला परवडायला नको?’
मधेच सासूबाई थोड्या चिडूनच बोलल्या,
‘लोक म्हणतात आम्ही कमवलं. तो माझा लेक, हा जावई आणि ते माझे मालक. तिघांनी मार खाल्लाय पोलिसांचा. आलटून-पालटून तिघं भाजी आणायला जायची आणि मार खाऊन यायची. मी आणि माझी पोरगी भाजी विकायला बसायचो. आमच्या या बापय लोकांनी मार खाऊन भाजी आणलीय ताई मग तुम्हाला ती आयती मिळालीय.’
तिच्या डोळ्यात किंचित पाणी आलेलं. चहाचा कागदी कप चुरगाळून बाजूला फेकत ती गिऱ्हाईकं बघायला गेली. माझं बोलणं तिला आवडलं नसावं. जावई सांभाळून घेत म्हणाला,
‘ताई चहा घेणार काय?’
‘नाही नको. आत्ताच झाला.’
‘अहो घ्या. भिता का काय? आमच्याकडं चहा पिऊन कोरोना होणार नाही तुम्हाला. आम्ही सगळी काळजी घेऊन काम करतोय.’
मी विषय बदलत विचारलं,
‘पण पोलिस कसं काय मारत होते, भाजीपाला तर इसेन्शलमध्ये येत होता ना?’
तोपर्यंत त्याची बायको आईवर स्टॉल सोपवून कुतूहलाने आमच्यात येऊन बसली.
‘इसेन्शल म्हणजे?’
‘म्हणजे ‘जीवनावश्यक’ वस्तू. त्यात मोडतो ना भाजीपाला?’
दोघांनी एकमेकांकड बघितलं. ती म्हणाली,‘काय की बाई’.
लॉकडाऊनमध्ये भाजी विकणाऱ्या प्रत्येकानं काठ्या खाल्लेत. पण यातल्या कुणीही पोलिसांना वाईट बोलत नव्हतं. ते त्याचं काम करत होते असंच ते म्हणाले याचं मला आश्चर्य वाटलं. थोडा वेळ शांततेत गेला. त्यांची पोरगी माझ्याकडं फारच संशयानं बघायला लागली. मी उठले. जावयाकडं बघून विचारलं, ‘फोटो घेऊ काय एक?’
पोरगी म्हणाली, ‘नाही नाही. ते आम्हाला उगच पोलीसांचा ताप नको. जावा तुम्ही.’
मग मी मार्केट यार्ड मधे गेले. होलसेलवाल्यांनी सांगितलं त्यांनी दोन महिने सगळं बंद ठेवलं होतं आणि ते घरी बसलेले. हमाल लोकांनी पण तेच सांगितलं. ‘रेशन वर धान्य मिळालेलं, कसंतरी दोन महिने काढले. आता काय नाही प्रोब्लेम. आता सगळं सुरु झालंय’.
एक उत्तर प्रदेशचा भाजीवाला भेटला. मार्केट यार्ड मधून हातगाडीवर भाज्या भरून घेऊन निघालेला.
‘लॉकडाऊनमध्ये भाजी विकत होता काय?’
‘जी हां. विकत होतो जी’
‘काय प्रोब्लेम येत होते काय? कसं विकत होता?’
‘कुछ प्रोब्लेम नहीं मॅडम. हमने सब चेकअप करवाया दो बार. हमे कुछ हुआ नहीं है.’
‘अरे भैय्या वैसे नहीं. जो लोग घर में बैठे थे उन्हे हम आपकी स्टोरी बताने वाले है की आपने कैसे सब्जी बेची, क्या कुछ प्रॉब्लेम्स आये. खैर आप कहासे हो?’
‘भवानी पेठ’
‘अरे वैसे नहीं बिहार, युपी वगैरा’
‘हां मॅडमजी हम युपी से है’
‘वापस नहीं गये?’
‘बिवी, दो बच्चे है हमारे. गाव जाके भी कोई फायदा नहीं है मॅडम. वहाभी कुछ काम नहीं है. और खाली बोलते है ट्रेन फ्री है. सब लोगोंसे 500-700 रुपये ले रहे थे. या चढने के समय या फिर उतरने के समय. यहापे भी राशन नहीं मिल रहा था. वो बोल रहे थे आपका यहा का कार्ड नहीं है. वो खाली न्यूज में बता रहें थे. पर हमें तो कुछ नहीं मिला.’
‘मार्केट यार्ड तो बंद था तो सब्जी कहा से लेते थे’
‘वो सिटी प्राईड के सामने और कात्रज के यहा टेम्पो लगते थे.’
‘अच्छा है’
‘मेरी गाडी दो बार उठाके ले गये. लॉकडाऊन में ये तिसरी गाडी है. अब हम एक जगह तो रुके नहीं थे. फिर भी गाडी ले गये. पाच हजार का खर्चा आता है गाडी छुडवानेमे. और वही गाडी थोडे महिने बाद ब्लॅक में मिलती है बाहर. दोन-तीन बार मार भी खाया. पैर सुज गये थे.’ (लगेच पाय वर करून दाखवायला लागला.)
15-20 सेकंद शांतता. त्या शांततेमधेच हातगाडीला धक्का देऊन तो जायला लागला. मग परत मार्केट यार्ड मधला गोंगाट ऐकू यायला लागला.
ट्रक ड्रायव्हर म्हणाले, ‘मालकांनी लायसन्स काढलेलं. त्यामुळ आम्ही जात होतो. काय प्रोब्लेम नाही.’
एका फळवाल्यानं सांगितलं, ‘इथं मार्केट यार्डात भरपूर लोक अडकून बसलेले.’
‘इथं आत राहिलेले? कसे काय राहिले ते?’
‘इथं शिवशाही म्हणून हॉटेल आहे ते चालू होतं तिथं खायचे.’
‘कुठं आहे ते हॉटेल?’
‘ही मागची पाकळी आहे ना त्याच्या कडेपर्यंत जावा. मग तिथं असा वळसा घालून डाव्या बाजूला आहे’
तिथल्या गल्ल्यांना आतले लोक पाकळ्या म्हणतात. तरी मधे एकाला परत शिवशाहीचा पत्ता विचारला. तो म्हणाला राजेशाही असेल. म्हणलं ‘असेल बुवा, पत्ता सांग.’ शेवटी जे सापडलं ते हॉटेल समाधान निघालं. त्यावर शिवभोजन थाळीची पाटी होती. त्यांनी सांगितलं,
‘दीड-दोनशे लोक अडकलेले की इथं. पन्नासएक महाराष्ट्रातले असतील. बाकीचे बाहेरचे होते. 26 जानेवारीलाच आमच्याकडं शिवभोजन थाळी सुरु झालेली ना. आम्ही सकाळी 2-3 तास येऊन सकाळच्या जेवणाची व्यवस्था करायचो. कुणी पैसे दिले नाहीत तरी त्याला जेवण द्यायचोच.’
तेव्हढ्यात मोटार सायकल वरून एक हट्टा कट्टा पोलीसवाला हॉटेलात त्याची पाण्याची बाटली भरून घ्यायला आला. मी त्याच्याकडं दुर्लक्ष करत हॉटेलवाल्याशी बोलणं सुरूच ठेवलं,
‘हां मग? दोन महिने चालू होतं म्हणा तुमचं हॉटेल?’
‘होय. मग लक्षात आलं त्यांची रात्रीची जेवणाची सोय नाही. मग आम्ही समोरच्या यांच्या (पोलीसवाल्याकडे हात दाखवून) पोलीस स्टेशनला कळवलं. मग यांनी लगेच रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली. पुलाव, बिर्याणी असं काय काय द्यायचे पोलीस त्यांना रात्री. कोण उपाशी राहिलं नाही बघा आमच्या इथं. पोलीस पण होते न बघायला.’
‘आता कोण भेटेल काय त्यातलं?’
‘नाही आता ट्रेन सुरु झाल्या ना. गेले सगळे’
त्यांच्या मागं दोन तरुण उभे होते. हॉटेलातले कामगार असावेत. हॉटेलात शिरतानाच त्यांना एकमेकांशी हिंदीत बोलताना ऐकलं होतं.
‘तुम्ही हॉटेलात सगळे मराठीच लोक आहात काय?’
‘होय आम्ही घरचेचं आहे सगळे. हा माझा मुलगा, हा नातू. (मागच्या दोघांचा त्यांनी उल्लेखच केला नाही. एवढा वेळ आमच्याकडे बघत आमचं बोलणं ऐकणारी ती दोघं पोरं आता मागच्या बाकड्यावर बसायला गेली आणि फोनमध्ये डोकं घालून बसली.)
‘चांगलंय चांगलंय.’
‘तेव्हा एकदम बंद बंद होतं सगळं, आता काय नाही आता सुरु झालं सगळं. आता काय वाटत नाही.’
मला वाटलं भाजीवाल्याचं एक वेगळं जग आहे. मग त्या जगातले देखील काही नियम आहेत, संकल्पना आहेत. त्यात सुद्धा एक वर्गांची उतरंड आहे. शोषण आहे. तिथल्याही एका ठराविक वर्गाला लॉकडाऊनने फारसा फरक पडलेला नाही. काही जण मात्र जिवंत राहण्याचं ध्येय ठेऊन आजचं मरण उद्यावर ढकलत, मिळेल तिथून पोट भरत जगली आहेत. निराशा, कंटाळा, अस्वस्थता, निद्रानाश अशा मानसिक उच्चभ्रू चोचल्यांमध्ये कणाकणाने मी मरत असताना ही माणसे जिवंत राहिली. They survived. When the time will come, they will survive. But I am not sure about myself.
किराणावाले म्हणाले, ‘होलसेल मार्केट बंद होतं. छोट्या छोट्या व्यापारांकडून मिळेल तसं सामान भरत होतो. महिन्याच्या सामानाची फोनवरून यादी घेऊन घरपोच सामान द्यायचो. च्या मारी रोज नियम बदलायचे. आज काय सकाळी दोन तास उघडा. आज काय 10 ते 1 दुकान उघडा. मग 10 ते 5. मग चार दिवस सगळं बंद. नुसता गोंधळ.’
‘सगळ्यात जास्त काय खपत होतं?’
‘बिस्किट, रेडी मिक्स, चायनीज इटालियन सॉस, मसाले ते खपायचं भरपूर, चोकलेट खपायचं.’
‘गर्दी व्हायची काय?’
‘दिवसभर उघडं ठेवलं असतं की नाही तर गर्दी झाली नसती. दोन तासच उघडं ठेवलं की गर्दी व्हायची ओ. आणि लोक तर काय शाण्या डोक्याची. एकेक वस्तू घ्यायला लाईन मधे थांबायची. खारे शेंगदाणे, रवा, पावभाजी मसाला, असं एकेक घ्यायला यायची. आता दिवसभर दुकान उघडं असतंय आता गर्दी नाही बघा.’
गॅसवाले, वॉचमन, सफाई कर्मचारी यांचे युनिफॉर्म असल्यामुळे त्यांना पोलिसांची भीती नव्हती. त्यांच्याशिवाय लोकांचं अडलं असतं, त्यामुळे त्यांना सोसायट्यांमध्ये लगेच एन्ट्री मिळायची. मास्क, ग्लोव्ज, सॅनिटायझर अशा गोष्टी त्यांच्या संस्थांनी त्यांना पुरवले होतेच. त्यांना WFH (Work From Home) करता आलं नाही एव्हढंच काय ते. पण त्याविषयी त्यांची काही तक्रारच नव्हती. किंबहुना त्यांची काहीच तक्रार नव्हती. फक्त ते ज्यांच्यासाठी काम करत होते त्या लोकांची संशयित नजर त्यांना जाणवली होती. ‘त्यांच्या’ मुळे कोरोना पसरेल असं लोकांच्या नजरेत त्यांना दिसलं होतं. ‘पण जनता पण घाबरलेली होती ओ’ असं म्हणून त्यांनी तेही सोडून दिलेलं होतं.
भाजीवाले, किराणावाले, गॅसवाले, वॉचमन, सफाई कर्मचारी यांच्या बरोबरीने बँक कर्मचारी देखील सगळे दिवस काम करत होते. जितक्या सहज मी बाकीच्या लोकांच्या जगात घुसून बिनधास्त गप्पा मारत होते तितकी फ्री एन्ट्री मला बँकांमध्ये मिळाली नाही. पण बँकेचं, कर्मचाऱ्यांचं कोणाचंही नाव येणार नाही अशी खात्री दिल्यावर बँकांमध्ये एन्ट्री मिळाली. मार्केट यार्डात फिरतानाची माझी बोलण्याची शैली, टोन मी बँकेत जाताना बदलून घेतले. काही इंग्रजी वाक्य सोबत ठेवली.
55 वर्षांचे अकाउंटंट साहेब डबल मास्क लाऊन आलेले. ते हार्ट पेशंट होते. तरी त्यांना लॉकडाऊनमध्ये यावं लागलं होतं. ‘पोलिसातल्या फिफ्टी प्लस लोकांना उशिरा का होईना घरी बसायला सांगितलं. आमच्याकडे ती सोय नाही.’
‘पण अर्ध्या स्टाफ वर काम नसतं करता आलं?’
‘आलं असतं की. पण संस्थेची तशी इच्छाशक्ती पाहिजे.’
‘आम्हाला पाच वाजेपर्यंत पुरेल असं काहीतरी काम देऊन ठेवायचे’- काजळ घातलेल्या एक मॅडम म्हणाल्या. त्याही 50 च्या पुढच्या वयाच्या होत्या. रिक्षा मिळत नसल्यामुळे त्यांना चालत यायला लागत होतं.
“‘अहो, फक्त पासबुक प्रिंट करून घ्यायला कशाला आलाय तुम्ही बँकेत. उगच गर्दी’ असं मी एकाला म्हणाल्यावर, ‘मग तुम्ही बँक उघडलीय कशाला. तुमचं कामच आहे ना ते?’ असा रिप्लाय दिला त्याने. आता काय बोलायचं?”
नंतर एक एकदम तरतरीत मॅडम भेटल्या. माझ्याच वयाच्या असाव्यात. त्यांनी डोक्याला सुद्धा नर्स बांधतात तशी हिरवी टोपी बांधलेली. त्यांना मी माझ्या लेखाचा विषय सांगितल्यावर त्या लगेच पहिलं वाक्य बोलल्या,
‘माणसाला स्वतःच्या जिवापेक्षा आणि दुसऱ्याच्या मरणापेक्षाही पैशाची किंमत जास्त आहे हे या लॉकडाऊनमध्ये मी काढलेलं कन्क्लुजन आहे.’
‘कशावरून म्हणता हे?’
‘अहो लोकं छोट्या छोट्या शुल्लक कामांसाठी रांगेत गर्दी करायचे. जे काम दोन महिन्यांनी केल्यानं काही फरक पडणार नाहीय त्यासाठी उगच इथं फेऱ्या मारायचे. त्यांना स्वतःच्या जिवापेक्षा पैसा महत्वाचा होता. आणि माझ्याकडं काही लोक असे आले. ज्यांचे आई किंवा वडील तीन-चार दिवसापूर्वी वारले आहेत आणि हे शहाणे आता पुढची प्रोसिजर काय असं विचारायला बँकेत यायचे. इथे गर्दी करायचे. गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढणार. म्हणजे त्यांना दुसऱ्याच्या मरणापेक्षा सुद्धा पैसा महत्वाचा वाटतो.’
पुढे त्यांनी एक खूप लॉजिकल मुद्दा पुढे मांडला, ‘टीव्हीवर एक जाहिरात येतीय बघा RBI ची. तुम्हाला बँकांमध्ये काही अमुक सेवा नाही मिळाली तर तक्रार करा वगैरे. तसच लॉकडाऊनमध्ये त्यांनी जनहितार्थ अशी जाहिरात का नाही केली की बँकेच्या जीवनावश्यक कामामध्ये अमुक-अमुक कामे येतात ही सोडून बाकीच्या कामासाठी बँकेमध्ये जाऊन गर्दी करू नका. नुसती चौकशी करायला लोक बँकेत येत होते.’
पंतप्रधानांनी जाहीर केलेले 500 रुपये खात्यात जमा झालेत बघायला भरपूर गर्दी झाली. तेव्हा अजून पैसे जमा व्हायचे होते. जमा झाल्यावर पैसे काढायला गर्दी झाली. पण बँकवाल्यांची तक्रार या गरीब लोकांविषयी नव्हतीच. घरी निवांत बसलेले लोक शुल्लक कामांसाठी गर्दी करत होते त्यांच्या समोर ते हतबल झाले होते.
दुसऱ्या एकजण म्हणाल्या, ‘डीमोनीटायझेशनच्या वेळीही असंच झालं. सरकार आम्हाला गृहीत धरतं. सगळ्या त्यांच्या निघतील त्या स्कीमचं एक्सपेरिमेंट आमच्यावर होतं. आणि पगार वाढताना तेवढं तुम्ही सरकारी कर्मचारी नाही, तुमचा कायदा वेगळा आहे असं म्हणतं. मोदींनी लॉकडाऊनच्या भाषणात याला सल्युट, त्याला सल्युट केला. बँक कर्मचाऱ्यांचं नाव सुद्धा घेतलं नाही.’
एक ओळखीचे बँकवाले काका म्हणाले, ‘ सुरवातीला सॅनिटायझर मिळत नव्हते. रोज पन्नास एक माणस बाहेरची, पुन्हा स्टाफ म्हणजे भरपूर सॅनिटायझर लागत होता. मग एकदा ब्लॅक न घेतला सॅनिटायझर. माझ्या घराकडे जाण्याच्या सगळ्या रस्त्यांवर काठ्या घालून रस्ता बंद केलेला. मला खूप फिरून जावं लागायचं. एकदा संध्याकाळी सात वाजता जाताना मला प्रचंड भीती वाटायला लागली. घरी जाईपर्यंत मेडिकल सोडून कुठेही माणसाचा मागमूस नाही. एकदम शुकशुकाट. कार मधे असूनही मी खूप घाबरलो. आपण हे काय करतोय, कशासाठी करतोय असं वाटायला लागल. पण आता हे आपलं काम आहे ना. ड्युटी केलीच पाहिजे त्यात काय वाद नाही’
‘आपलं कामच आहे हे. आपण समाजासाठी काम केलं पाहिजे म्हणून आम्ही काम करत होतो’ असं म्हणून देशासाठी, समाजासाठी माणसं काम करत राहिली. त्यांच्यावर रोखलेली ‘हेच कोरोना पसरवतील’ अशी त्याच समाजाची संशयित नजर त्यांनी सहन केली, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, त्यांच्या त्यांच्या संस्थेने दाखवलेली अनास्था त्यांनी सहन केली, घरच्यांची काळजी, मनातली भीती सगळं सांभाळत काम करताना सरकार, जनता यांनी न घेतलेली दखल त्यांना जास्त बोचली असावी.
- मृदगंधा दीक्षित
mrudgandha.dixit@gmail.com
Tags: मृदगंधा दीक्षित कोरोना कोरोना वॉरियर्स संवाद Mrudgandha Dixit Corona In Conversation Load More Tags
Add Comment