चवदार प्रतिमांनी सजलेली नात्यांची कहाणी

चैतन्य डुम्बरे यांचा नवा कवितासंग्रह - एक नातं असंही...

नव्या वाटेने जाणारी ताजी कविता घेऊन चैतन्य सदाशिव डुम्बरे हे तरूण कवी त्यांचा 'एक नातं असंही' हा कवितासंग्रह घेऊन आले आहेत. निसर्ग, कला, सिनेमा, स्त्रिया, आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि स्वतः यांच्याविषयीच्या भावना आणि कवीच्या मनातील मुक्त विचार या पुस्तकातून भेटीला येतात. हा संग्रह डिंपल पब्लिकेशन यांनी प्रकाशित केला आहे. चैतन्य डुम्बरे यांचा हा दुसरा कवितासंग्रह आणि एकूण तिसरे पुस्तक आहे.

विख्यात लेखक, संपादक आणि पत्रकार श्री. सदा डुम्बरे हे चैतन्यचे वडील. सदाभाऊंच्या मार्गदर्शनामुळे चैतन्यचे वाचन लहानपणापासूनच उत्तम दर्जाचे होते आणि त्यातूनच माध्यमिक शाळेपासून त्याला लेखनाची ऊर्मी निर्माण झाली. साप्ताहिक साधनामध्ये आणि कर्तव्यसाधनावर चैतन्यने लिहिलेली पुस्तक परीक्षणे प्रसिद्ध झालेली आहेत. अन्य महत्त्वाच्या नियतकालिकांतदेखील त्यांचे कथा, कविता, ललितलेखन प्रसिद्ध झाले आहे. यासिर उस्मान यांनी लिहिलेल्या ‘रेखा- द अनटोल्ड स्टोरी’ या अभिनेत्री रेखा हिच्या इंग्लिशमधील चारित्राचा मराठी अनुवाद (2018) आणि कवितासंग्रह कोरी वही...निळी शाई (2020) ही त्यांची पुस्तके यापूर्वी प्रसिद्ध झालेली आहेत.

'एक नातं असंही' या नवीन कवितासंग्रहातील एकूण २६ कविता त्यांनी ६ भागांमधे विषयवार विभागल्या आहेत. या भागांची शीर्षके आहेत, ‘स्त्री तुझा रंग कसा?’,’निसर्गाच्या सानिध्यात...’, ‘कलेच्या प्रांगणात’, ‘तोच मी’, ‘पोर्ट्रेट पोएम्स’, आणि ‘कवीची दुर्बीण’. यामुळे संग्रहाबद्दल उत्सुकता अधिकच वाढते. चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी रेखाटलेली चित्रे प्रत्येक विषयाला आणि कवितांच्या आशयाला साजेशी आहेत. त्यातीलच निसर्गाच्या सान्निध्यात या विभागाचे चित्र मुखपृष्ठ म्हणून वापरले आहे. त्याचा विचार करता ‘निसर्गाशी नाते आणि नात्यांची नैसर्गिकता’ ही कवीला महत्त्वाची वाटत असावीत असे वाटते. कवितासंग्रहाला शिवाजी विद्यापीठतील मराठीचे प्राध्यापक रणधीर शिंदे यांची सुंदर, या कवितांकडे बघण्याची दृष्टी देणारी प्रस्तावना लाभली आहे.

संग्रहातील बऱ्याच कविता मुक्तछंदात आहेत. कदाचित त्यामुळेच त्यांना त्यांचे विचार व भावना मुक्तपणे मांडता आल्या असाव्यात. छंदोबद्ध कविता लिहिण्याकडेही त्यांचा कल आहे.त्यांचा यापूर्वीचा कवितासंग्रह "कोरी वही... निळी शाई"यात बऱ्याच कविता छंदात आहेत. या संग्रहातील काही थोड्या कविता त्या मार्गाने जाताना दिसतात, पण मुख्यतः मुक्तछंदात अभिव्यक्ती दिसते. कवितेचा मूळ आकृतिबंध सोडून लिहिलेल्या या कविता असल्या, तरीही कवीने भावनिक आणि वैचारिक समन्वय योग्य पद्धतीने साधला आहे. रूढार्थाने कविता म्हणावं अशी त्यांची कविता जरी नसली, वृत्त, छंद, यमक वगैरेंनी ही कविता जरी सजत नसली, तरीही ती सुंदरच आहे. ती सजते ती कवीने वापरलेल्या भावोत्कट प्रतिमांमुळे. किंबहुना हेच त्यांच्या लिखाणातलं ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांची प्रत्येक कविता आपल्याला विचार करायला भाग पाडते. उदाहरण द्यायचं झालं तर चैतन्य म्हणतात,

‘वहिनी-भाऊ-भगिनीचा
नात्यातील तरल 'हिरवेपणा'
मेथी-मटार-मलाईचा’

भाऊ, बहीण आणि वहिनी यांच्या नात्यातला गोडवा,स्निग्धता आणि ताजेपणा दाखवण्यासाठी त्यांनी ही एक वेगळी पण उत्तम प्रतिमा वापरली आहे.

खाद्यपदार्थांविषयी त्यांना विशेष ममत्वभाव दिसतो. कवितांमध्ये खाद्यपदार्थांवर बेतलेल्या अनेक दृश्य प्रतिमा आहेत. एका कवितेत ते पोळी आणि ब्रेड याविषयी लिहितात. पोळी आणि ब्रेड मध्ये त्यांना आपापले सोलमेटच दिसतात.

‘स्प्रिंग अनियन: द वेडिंग अल्बम’ या कवितेत ते जिरं मोहरी पासून बीट, स्ट्रॉबेरी, मूग, मटकी, काळे वाल, सुरण या सगळ्यांबद्दल त्या त्या पदार्थाच्या वैशिष्ट्यांसह लिहितात. अखेरीस गाडी कोथिंबीरीवर घसरते.ती सर्वसमावेशक आहे, तिची कुणाशीही जोडी जमू  शकते असं कवी म्हणतो.

‘नसे चिंता जरी
लग्नगाठ नाही जुळली
कुमारी राहूनही सर्व भाज्यांच्या संसारात
आनंद न फुलवेल...
ती मग कोथिंबीर कसली?’

कोथिंबिरीच्याही मनात शिरून तिचे विचार जाणण्यासाठी कवीची दुर्बीणच हवी.

‘वरणफळे’ कवितेत तर संपूर्ण पोळीत त्यांना आईचा चेहरा दिसतो आणि कापलेल्या प्रत्येक चकोलीत स्वतःचा चेहरा दिसतो. जणू आईच्या नाळेपासून तुटलेला मुलगाच. अशी अत्यंत मनस्वी आणि भावोत्कट खाद्यप्रतीकं त्यांच्या बऱ्याच कवितांत दिसतात.

त्यांची कविता प्रामुख्याने कुटुंब कविता आहे. आई-वडील,पत्नी,मुलगी,मित्र-मैत्रिण या सगळ्यांविषयी ती बोलते. एका कवितेत तर आदर्श जावयाचं गुणवर्णनच त्यांनी केलं आहे. तसंच त्यांंची कविता कुमारवयीन आणि पौगंडवयीन प्रेमभावनाही व्यक्त करते. त्यांच्या प्रत्येक कवितेला एका वाङमय आणि इतिहास यांचा भरभक्कम पाया आहे मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीपासून रस्किन बॉण्डपर्यंत, राजा भगीरथापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत, मिर्झा राजे जयसिंगांपासून बाबा बुडानपर्यंत सगळे आपापली उपस्थिती चैतन्याच्या कवितेत नोंदवतात.

'छत्री' कवितेतली कहाणीही छान आहे. साहित्याच्या क्षेत्रात संपादक असलेली एक आई आपल्या छोट्या मुलीला छत्री विकत घेऊन देण्यासाठी एका दुकानात जाते. मुलगी म्हणते, “मला सपाट आकाराची, रस्किन बॉण्ड यांच्या कथेत आणि त्यावरील सिनेमात आहे ना अगदी तशीच छत्री हवी आहे.” दुकानदाराला रस्किन बॉण्ड माहीत नाही, त्याच्या गोष्टी माहीत नाहीत हे कळल्यावर ती मुलगी म्हणते,

‘मग राहू द्या
मला नकोच तुमच्या
दुकानातील निळी छत्री’

आपला साहित्यिक वारसा मुलगी नक्कीच पुढे चालवेल, याचा आनंद आईला होतो.

‘दुकानाच्या वरती तर
छप्पर असते पण...
त्या छोट्या मुलीची आई
आनंदाच्या नव्या पावसात
पुरेपूर राहते भिजत...’

इथे आपल्याला कवीचे बलस्थान जाणवते.

पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचताच कवीच्या सिनेमाप्रेमाची खूण पटते. ‘दिल चाहता है’ या सदाबहार हिंदी सिनेमाला आणि त्या सिनेमाचे गीतकार आणि दिग्दर्शक असलेल्या जावेद अख्तर आणि फरहान अख्तर या पिता-पुत्रांना त्यांनी हा काव्यसंग्रह अर्पण केला आहे. अर्थातच मराठीतील एक तडफदार आणि तरुण लेखिका इरावती कर्णिक यांनाही ते विसरलेले नाहीत.


हेही वाचा - सदाभाऊंचा चैतन्य...


त्यांचं सिनेमाप्रेम त्यांच्या काही काही कवितांमधून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ चा मराठी अनुवाद करणारा हा सिनेमाप्रेमी कवी आहे. या संग्रहात त्यांनी त्यांनी राणी मुखर्जी, तेजस्विनी पंडित, सैफ अली खान यांच्या फिल्मी करियरवर लिहिलेल्या कविता आहेत; त्यात काहीच नवल नाही.

राणी मुखर्जीचा ‘गुलाम’ चित्रपटापासून ‘मर्दानी’ चित्रपटापर्यंतचा चढत जाणारा आलेख कवी ‘बहुरूपा राणी’ या कवितेत मनापासून मांडताना दिसतात. राणीच्या ‘हिचकी’चित्रपटाचा ते आवर्जून उल्लेख करतात. अगदी कॉलेजवयीन टीना ते मध्यम वयातील नैना माथूर सारखी शालेय शिक्षिका अशा अनेक स्त्री प्रतिमा पडद्यावर साकारणारी राणी त्यांच्या विशेष आवडीची वाटली. मग ते लिहून जातात

‘पण काही म्हण गं
अभिनेत्री तू
एकेकाळची चौकटराणी बदामराणी
अशी रणरागिणी राणी झाल्याचे पाहून
मन गेले होते
अगदीच आनंदून
एकदम तृप्त होऊन’... 
‘सांग बाई अभिनेत्री
ह्यातील कोणती राणी तू???’

केवळ त्यांचं वाचन भरपूर आणि दर्जेदार असल्यामुळेच मराठीतील नामवंत पुस्तकांना ते आपल्या कवितेतील भावविश्वाशी जोडून घेतात. म्हणूनच कोसला कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर आणि ‘धूम टू’ चित्रपटातील खलनायक आर्यन म्हणजे ऋतिक रोशन यांच्यात ते समर्थपणे संवाद घडवून आणू शकतात.

‘टू सीटर’ या कवितेत बाप लेकाचं मैत्रीपूर्ण नातं मोठ्या जबाबदारीने निभावून नेताना ते म्हणतात

‘एकमेकांना सावध करत
एकमेकांची काळजी घेत
वेळप्रसंगी एकमेकांना विचार संजीवनी देत
मतभेद गृहीत धरून
ते घेतात एकमेकांशी जुळवून’

बाप लेकाच्या नात्यातील निखळपणा ते इथे प्रभावीपणे मांडताना दिसतात.

‘किल्ला’ कवितेत जुन्या नव्याचा संगम, ‘चंद्राच्या शोधात 'तो'’ या कवितेत त्याला अजून आपली प्रियतमा भेटत नसल्याची खंत. अशा एक ना अनेक गोष्टी कवी त्याच्या प्रत्येक कवितेतून सांगत राहतो आणि वाचक त्याच्याशी बांधला जातो.

कवी स्वतःचाच जीवन प्रवास अनेक कवितांमधून मांडताना दिसतात. तरुणपणातली प्रेमभावना दर्शवताना ते बालपणातली निखळ मैत्री विसरत नाहीच.त्यांच्या विचारातील, लिखाणातील आणि पर्यायाने कवितेतील निष्पापता आणि प्रगल्भता दोन्हीही एकाच वेळी आपल्याला जाणवत राहतात; ते अनुभवण्यासाठी म्हणून त्यांची कविता वाचावी. त्यांची प्रत्येक कविता म्हणजे जणू एक गोष्टच वाटते.आतल्या आत एक संपूर्ण कहाणी.

अशा प्रकारची कविता आणि अशा प्रकारची प्रतिमा-प्रतीकं यापूर्वी वाचनात आलेली नाहीत. खूप वेगळा विचार घेऊन ही कविता आली आहे. पारंपारिक कवितेला छेद देणारी ही कविता आहे.

संग्रहात काही दीर्घकविता आहेत. त्या बऱ्याचशा कथनात्मक आहेत. कवितेसाठी निवडलेला विषय, एखादं नातं यावर चैतन्य भरभरून बोलतात. आपलं भावविश्व शब्दांच्या सहाय्याने संपूर्णपणे वाचकाच्या हवाली करतात.

नव्या काळातली, नव्या मनूने लिहिलेली वेगळी कविता म्हणून आवर्जून वाचावा, आणि त्यातील प्रतिमांच्या ताजेपणासाठी तो संग्रही ठेवावा असाच हा संग्रह.

अनुराधा गटणे (पुणे)
anuradhavinayak.24@gmail.com 
(लेखिका स्वतः कवयित्री, अभिवाचक आहेत.)


‘एक नातं असंही’
कवी - चैतन्य सदाशिव डुम्बरे
chetudumbre@gmail.com 
+91 99239 88310
प्रकाशक - डिंपल पब्लिकेशन
पृष्ठ संख्या - ११९
मूल्य - २००/-रुपये.

पुस्तक विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: chaitanya dumbre book review pustak parikshan anuradha gatane sada dumbre Load More Tags

Comments: Show All Comments

उमेश देशपांडे

छत्री, स्प्रिंग अनियन: द वेडिंग अल्बम, इतर कवितांमधील अंशही अतिशय लक्षवेधक, ताजेतवाने आणि सुंदर आहेत. कवि चैतन्य यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!

माधवी

गटणे मॅडम ने खुप परीक्षण केले आहे कविता संग्रह हा खुप वेगळ्या विषयावर आहे आजपर्यंत कोणी अश्या प्रकारच्या कविता केल्या नसतील कौटुंबिक जिव्हाळा कविता मध्ये वाटतो नक्की संग्रह वाचेल.

चिन्मय थिटे

खूप वेगळ्या धाटणीचा कविता संग्रह आहे. इतके कठीण विषय खूप वेगळ्या आणि नवौन्मेष आणि पद्धतीने आणि एक वेगळ्याच निरागासातेने मांडले आहेत.

Chinmayi

सुरेख विश्लेणात्मक लेख आहे.. कवितांमधील मिष्कीलता तसेच कवीच्या नातेसंबंधांचे निरीक्षण अगदी अचूक मांडले गेले आहे.

Charu Fenani

खूप छान आढावा घेतलाय.डुंबरेंच्या लेखनातील ताजेपणा ठळक पणे नजरेसमोर आला.तुमचेही कौशल्य वाखाणण्याजोगे.

Vrushalee Gatne

परीक्षण वाचून पुस्तक वाचायचीही उत्सुकता वाटत आहे. छत्री कविता म्हणजे एक छोटी फिल्मच आहे.

आसावरी काकडे

सविस्तर छान लिहिले आहेस.. कविता संग्रह चाळून बघते आहे असा फील आला.. कविता लेखन,अभिवाचना बरोबर परीक्षणही छान करतेस हे माहीत नव्हतं...

Add Comment