25 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विख्यात लेखक, संपादक आणि पत्रकार श्री. सदा डुम्बरे यांचे रुग्णालयात निधन झाल्याची वार्ता आमच्या पत्रकारनगरच्या व्हाट्सॲप गटावर येऊन थडकली आणि एका सुसंस्कृत, सुजाण सदस्याच्या अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे अवघ्या पत्रकारनगरवर शोककळा पसरली. रात्री उशिरापर्यंत आणि दुसऱ्या दिवशीही शोकसंदेशांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा, मैत्रीपूर्ण आणि सर्जन व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणाऱ्या अनेक संदेशांचा खच गटावर पडला.
त्यांनी घडवलेल्या अनेक व्यक्तींनी त्यांच्याविषयीच्या आपल्या भावना वृत्तपत्रांतून, साप्ताहिकांतून आणि शोकसभेतून प्रकट केल्या... परंतु या सर्वांमध्ये त्यांच्या घरीच घडत असलेल्या एका उदयोन्मुख लेखकाला अर्थात त्यांचा पुत्र असलेल्या चैतन्यला मात्र शोकसागरात बुडून गेल्यामुळे आपल्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत. सदा डुम्बरेंनी अर्थात आमच्या सदाभाऊंनी अनेक अडचणींचा सामना करत चैतन्यच्या साहित्यिक जडणघडणीत फार मोलाचा वाटा उचलला होता. डुम्बरे पितापुत्रांच्या या साहित्यिक नात्याचा घेतलेला हा छोटासा मागोवा.
जात्याच चंचल, अवखळ, बहिर्मुख स्वभाव असलेल्या चैतन्यच्या बालसुलभ ऊर्जेचा योग्य विनियोग व्हावा म्हणून 1995मध्ये त्याची तिसरीची परीक्षा पार पडल्यानंतरच्या उन्हाळी सुट्टीत सदाभाऊ त्याच्यासाठी पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांमधून बालसाहित्यातील अनेक पुस्तके घेऊन आले. त्यामध्ये विंदा करंदीकरांच्या पिशीमावशी, अडमतडम, सात एके सात अशा कवितांचा संग्रह, बालकवी, गोविंदाग्रज यांचे कवितासंग्रह; रॉबिन्सन क्रुसो, सिंदबाद यांच्या साहसी सफरकथा; टॉम सॉयरच्या उनाड साहसकथा, अरेबिअन नाइट्स अशी बालमनाच्या विविध कप्प्यांना गवसणी घालणारी पुस्तके होती.
सदाभाऊ एवढेच करून थांबले नाहीत तर बऱ्याचदा त्यांतील गोष्टींचे भावानुरूप प्रकट वाचनही ते चैतन्यसमोर करत गेले. ती सुट्टी संपता-संपता चैतन्यच्या मनात नकळत साहित्यप्रेमाचे बीज रोवले गेले आणि चौथीपासून भाषा, निबंधलेखन या विषयांकडे त्याचा कल वाढू लागला. पुढे माध्यमिक शाळेत प्रवेश करताना तर त्याला स्वलेखनाची ऊर्मी येऊ लागली. त्याच्या बालकवितांचे, निबंधांचे पहिले श्रोते सदाभाऊ असत. चैतन्यला प्रोत्साहन देतानाच ते काही सुधारणाही सुचवत.
हे लेखन आनंददायी व्हावे म्हणून त्यांनी त्याला उत्कर्ष बुक सर्व्हिस, व्हीनस ट्रेडर्स अशा दुकानांमधून आकर्षक लेखनवह्याही आणून दिल्या. अशातच त्याला अक्षरनंदन या प्रयोगशील, सर्जनशील आणि वेगळ्या जाणिवा जपणाऱ्या शाळेत दाखल केल्यामुळे तेथील वर्गमित्र, ताई (शिक्षिका) यांच्याकडून त्याच्या लेखनाला दाद मिळू लागली आणि त्याच्या वाचन-लेखनाने आणखी वेग घेतला.
अर्थात नियती सारे काही सुरळीत कसे चालू देईल? याच सुमारास चैतन्यला एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला. पुढे दिवसाला 15-20 वेळा चक्कर येण्यापर्यंत तो वाढला आणि बालसाहित्यक्षेत्रात बागडू लागलेल्या या फूलपाखराला पुन्हा आपल्या कोषात बंदिस्त व्हावे लागले. सदाभाऊंनी आणि चैतन्यच्या आईने, बहिणीनेदेखील स्वतःवर बंधने घालून घेतली आणि संपूर्ण कुटुंबाचे एकत्र बाहेर जाणे जवळजवळ बंद झाले.
तब्बल नऊ वर्षे अशा निराशाजनक अवस्थेत घालवल्यानंतर सदाभाऊंच्या आणि कुटुंबीयांच्या अथक प्रयत्नांना यश आले. तिरुअनंतपुरमस्थित श्री. चित्रा तिरुनाल आयुर्विज्ञान संस्थेत किशोरवयीन चैतन्यवर 4 डिसेंबर 2004 रोजी यशस्वीपणे मेंदू शस्त्रक्रिया पार पडली आणि तत्पश्चात त्याची हरवलेली आकलनशक्ती, लेखन-वाचनाची ऊर्मी परत येऊ लागली. नंतरच्या प्रत्येक वार्षिक तपासणीसाठी चैतन्यला तिरुअनंतपुरमला घेऊन जातानाचा प्रत्येक प्रवास सदाभाऊंनी मध्ये लागणाऱ्या अनेक राज्यांची, प्रदेशांची वैशिष्ट्ये त्याला सांगत संस्मरणीय केला.
दरम्यान शारीरिक मर्यादांमुळे त्याला प्रिझम फाउंडेशन संचलित फिनिक्स शाळेत प्रवेश घ्यावा लागला होता. तेथील ‘तमोहर’ या वार्षिक अंकात सदाभाऊंच्या प्रोत्साहनाने त्याने लिहिलेल्या अनुभवपर लेखाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अशा उत्साही मनःस्थितीत 2005मध्ये 10वीचा टप्पा यशस्वीपणे पार करत असतानाच चैतन्यने लेखन, मुद्रितशोधन, अनुवाद, संपादन या क्षेत्रात कारकिर्द करण्याचे पक्के केले आणि कलाशाखेला प्रवेश घेतला.
सदाभाऊंनी त्याला नवीकोरी सायकल घेऊन दिली. अभ्यासाबरोबरच मेहता, राजहंस, साकेत इत्यादी नामवंत मराठी प्रकाशनसंस्थांमध्ये जाऊन बसून तेथील कामकाज, वातावरण इत्यादींचे निरीक्षण करण्याचा उपक्रम चैतन्यने आखून घेतला. तिथे उपलब्ध असलेली अनेक मराठी, इंग्लीश पुस्तके वाचून चैतन्यची साहित्यरूची अधिक प्रगल्भ होऊ लागली. यांचबरोबर पुण्यात होणारे अनेक परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके, चित्रपट यांनाही उपस्थित राहण्यामुळे चैतन्यच्या साहित्यिक जाणिवा समृद्ध होऊ लागल्या. हे चालू असतानाच त्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मराठी साहित्यात बी.ए. आणि 2016 मध्ये पुणे विद्यापीठातून एम.ए.ही पूर्ण केले.
सदाभाऊंच्या मार्गदर्शनामुळे आणि गुणवत्तेच्या कडक मूल्यमापनातून तावून, सुलाखून निघालेले चैतन्यचे लेख, कविता यादरम्यान विविध नियतकालिकांमधून छापून येऊ लागले. शिनिची होशी या जपानी लेखकाच्या ‘शिंझेनकिस’ या कथासंग्रहाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे साप्ताहिक साधनामध्ये परीक्षण, साधनाच्याच कर्तव्यसाधना या वेब नियतकालिकात डॉ.अमोल कोल्हे यांच्या ‘शिवगंध’ पुस्तकाचे परीक्षण, साप्ताहिक सकाळमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्वानुभवांवर आधारित काल्पनिकता आणि वास्तविकता यांच्या सीमारेषेवरील ‘म्हणे अभ्यास’ ही गुजगोष्ट, साधना साप्ताहिकात ‘बंदरामधील बुद्ध’ ही कविता, मिळून साऱ्याजणी मासिकात ‘नॉट गॉन विथ द विंड’ ही कविता, त्याचीच सुधारित आवृत्ती परिवर्तनाचा वाटसरूच्या दिवाळी 2016 अंकात, ‘उलूक फिलॉसॉफी’ ही कविता पुरुष उवाच या दिवाळी अंकात, पुणे पोस्टच्या दिवाळी 2019 अंकात ‘पनीर जिंदगी’, तसेच 2020 दिवाळी अंकात ‘टू सीटर’ ही या पितापुत्रांच्या तरल नात्यावरील कविता असा त्याचा लेखनप्रवास विविध अंगांनी आणि रंगांनी बहरू लागला.
2016मध्ये चैतन्यने एम.ए. यशस्वीपणे पूर्ण केल्याच्या आनंदात सदाभाऊ त्याला मुंबईला फिरायला घेऊन गेले आणि तेथील इतर अनेक पर्यटनस्थळांबरोबरच फोर्टच्या प्रसिद्ध ‘किताबखाना’ (किताब आणि खाना दोन्ही मुबलक मिळणाऱ्या!) ग्रंथदालनात घेऊन गेले. खान्याबरोबरच किताबांमध्येही तितकाच रस दाखवताना रसिक चैतन्यचे लक्ष यासिर उस्मान यांनी लिहिलेल्या ‘रेखा- द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकाने वेधून घेतले. इतर काही अभिनेत्यांची मराठीतील मूळ तसेच अनुवादित चरित्रे उपलब्ध आहेत, त्यात आपण अभिनेत्री रेखाच्या इंग्लीशमधील चरित्राच्या मराठी अनुवादाची भर टाकावी असा विचार त्याच्या मनात चमकला.
पुण्यात आल्यावर सदाभाऊंशी सविस्तर चर्चा करून लगोलग सायन (Scion) पब्लिकेशनच्या नितीन कोत्तापल्लेंची त्याने भेट घेतली आणि मूळ लेखकांची अनुमती मिळवून एका मोठ्या झगमगत्या पुस्तकाचा तितकाच झळाळता मराठी अनुवाद पूर्ण केला. ऑगस्ट 2018मध्ये त्याचे हे अनुवादित पुस्तक मराठी साहित्यात दिमाखात पेश झाले. पुढच्या वर्षा-दीडवर्षातच त्याने ‘कोरी वही निळी शाई’ या स्वतःच्या कवितासंग्रहाचे लेखन पूर्ण केले आणि प्रसिद्ध कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने मार्च 2020मध्ये हा कवितासंग्रह प्रकाशित केला. यामध्ये चैतन्यच्या व्यक्तिचित्रात्मक, सामाजिक, कौटुंबिक, स्त्री-पुरुष नातेसंबंध उलगडणाऱ्या, कल्पनाविश्वात विहरणाऱ्या 20 कविता समाविष्ट आहेत.
सदाभाऊंनी स्वतः सामाजिक, वैचारिक विषयांवर गद्यलेखन केले... परंतु चैतन्यला त्यांनी विविध विषयांमध्ये, काव्यांमध्ये विहरण्यासाठी सर्वार्थाने उत्तेजन दिले. चैतन्यमध्ये साहित्यिक जाण जोपासत नवनवीन लेखनप्रयोग करण्यास त्याला उद्युक्त केले. प्रत्येक लेखनकृतीचा स्वतंत्र बाज ओळखून त्याप्रमाणे त्यावर भाषेचा साज चढवण्याची दृष्टी बहाल केली. या क्षमतांना केंद्रस्थानी ठेवून आता तो एका प्रसिद्ध हिंदी भाषक कवींच्या गाजलेल्या स्त्रीप्रधान हिंदी कवितांचा मराठी अनुवाद करण्याचे अवघड आव्हान पेलत आहे. त्याचबरोबर नियतकालिकांमध्ये स्वतःचे लेख, कविता लिहिण्यातही गढून गेला आहे.
आपल्या आदर्श पिताजींची उणीव त्याला पदोपदी जाणवत राहीलच... परंतु बाबांच्या इतक्या वर्षांच्या साथीतून हाती लागलेल्या पाथेयाच्या जोरावर तो आपली दमदार वाटचाल निश्चितपणे चालू ठेवेल. सदाभाऊंच्या आत्म्यालाही त्यामुळे खऱ्या अर्थाने शांतता लाभेल असा विश्वास वाटतो!
- भूषण तळवलकर, पुणे
bhooshantalwalkar@gmail.com
Tags: लेख व्यक्तिवेध सदा डुम्बरे चैतन्य डुम्बरे भूषण तळवलकर पिता पुत्र साहित्य sada dumbare chaitanya dumbare bhushan talwalkar Load More Tags
Add Comment