2022 या वर्षात 'कर्तव्य साधना'ने काय दिले? 

10 मिनिटांचा व्हिडिओ

गेल्या वर्षभरामध्ये कर्तव्यवर 317 युनिट्स प्रसिद्ध झाली. यामध्ये जवळपास 175 लेख, 15 मुलाखती, 30 इंग्रजी लेख, 50 ऑडिओ, 10 व्हिडिओ, 21 पुस्तक परिचय, 10 रिपोर्ताज व इतर लेखन प्रसिद्ध झालेलं आहे.  

वर्षभरामध्ये कर्तव्यवर विविध विषयांवर सहा मालिका प्रसिद्ध झाल्या.

मराठी लेखिका, अनुवादक, संपादक व स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या / विश्वस्त असलेल्या करुणा गोखले यांनी 2021 या वर्षी 'स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान' या विषयावरील संशोधन प्रकल्प हाती घेतला होता.. त्यामध्ये 203 युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या. त्या सर्वांना एकूण 62 प्रश्न विचारले गेले आणि प्रत्येक मुलाखत साधारणतः सव्वा तास चालली. त्या अभ्यासावर आधारित बारा भागांची लेखमाला 'कर्तव्य'वरून जानेवारी ते 27 मार्च या काळात प्रत्येक रविवारी प्रसिध्द झाली.

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत 10 फेब्रुवारी 2022 ते 7 मार्च 2022 दरम्यान निवडणूक पार पडली. पाचही राज्यांचे निकाल 10 मार्च रोजी घोषित झाले. शेतकरी आंदोलन आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाच राज्यांतील निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. 10 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात पाचही राज्यांतील निवडणुकांचा अन्वयार्थ लावणारी लेखमाला कर्तव्य साधनातून प्रसिद्ध झाली. त्या राज्यातील निवडणुकांची वैशिष्ट्ये, नेतृत्व, प्रश्‍न, विकास, वेगवेगळी समीकरणे, सरकारची कामगिरी, पक्षांच्या यशापयशाची कारणे याचा सविस्तर आढावा या लेखमालेतील 17 लेखांतून घेण्यात आला. कर्तव्य साधना, द युनिक फाउंडेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील संशोधक आणि स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्स यांच्या सहयोगातून ही लेखमाला प्रसिद्ध झाली.

रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘कर्तव्य साधना’वरून वाचकांना काय वेगळे व महत्त्वाचे देता येईल याचा विचार करत असताना एक कल्पना पुढे अशी आली की, काही उत्कृष्ट युद्धपटांवर किंवा युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या सिनेमांवरील लेख असलेली मालिका ‘कर्तव्य’वरून प्रसिद्ध करावी. 1 एप्रिल ते 11 जून या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या या मालिकेत विजय पाडळकर, निलांबरी जोशी, संजय भास्कर जोशी, मकरंद दीक्षित, मीना कर्णिक, अच्युत गोडबोले, आ. श्री. केतकर, मेघनाद कुलकर्णी या मराठीतील लेखक, समीक्षक व सिनेमा क्षेत्रांतील जाणकार अभ्यासकांचे 17 लेख प्रसिद्ध झाले.

मराठी साहित्य आणि संस्कृती यांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिला जाणारा व सर्वाधिक दाखल घेतला जाणारा उत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उल्लेख करावा लागतो. या वर्षीचे संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर या तालुक्याच्या गावी 22 ते 24 एप्रिल 2022 असे तीन दिवस पार पडले. त्या संमेलनाचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध मराठी लेखक भारत सासणे.

भारत सासणे यांची लहान-मोठी अशी तीन डझन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. शिवाय, विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध मात्र पुस्तकरूपाने न आलेलं असं लेखन शिल्लक आहे आणि अद्यापही त्यांचं लेखन चालू आहे.  ‘दंतकथा’ आणि ‘उघडा दरवाजे उघडा!’ हे सासणे यांनी केलेले अनुवाद 2021 मध्ये साधना प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने आलेले आहेत. याशिवाय आणखी काही लेख व कथा त्यांनी ‘साधना’साठी लिहिलेल्या आहेत.

अशा या भारत सासणे यांची दीर्घ मुलाखत ‘साधना’साठी घ्यावी असं वाटणं साहजिकच होतं. थोडेच पण विचारगर्भ लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या दासू वैद्य यांनी सासणे यांची मुलाखत घेतली. तीन-साडेतीन तासांच्या या दीर्घ मुलाखतीत सासणे यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, लेखनप्रवासाविषयी सविस्तर चर्चा आहे. तिचं शब्दांकन साधना साप्ताहिकाच्या 23 एप्रिल 2022च्या अंकात प्रसिद्ध झालं. मात्र मूळ ध्वनीमुद्रित स्वरूपात असलेल्या या मुलाखतीचा दुहेरी उपयोग होऊ शकेल आणि ती वेगळ्या माध्यमातून अधिक लोकांपुढे जाऊ शकेल असा विचार करून ती कर्तव्यवर दररोज एक भाग या प्रमाणात 18 ते 24 एप्रिल असे सलग आठ दिवस कर्तव्यवरून प्रसिद्ध झाली.

सातशे वर्षांपूर्वी आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेले हबशी किंवा सिद्दी समाजातील लोक भारताच्या पूर्व व पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील काही ठिकाणी उतरवले गेले. त्यातील काही लोक महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक या राज्यांच्या सीमावर्ती भागांत स्थायिक झाले. त्यांचा इतिहास, त्यांचं वर्तमान आणि त्यांची स्थिती-गती यांचा अभ्यास करण्याची इच्छा प्रवीण खुंटे, प्रवीण राठोड, ज्योती भालेराव - बनकर , सूरज निर्मळे, चंदनसिंग या पाच तरुणांनी व्यक्त केली. त्यासाठी साधना ट्रस्टने त्यांना फेलोशिप दिली. मग त्यांनी अभ्यास केला आणि प्रत्यक्ष त्या भागात दोन वेळा भेट देऊन तिथल्या लोकांशी संवाद साधला. त्यातून आकाराला आलेले आठ लेख आणि सहा व्हिडिओ असा हा दीर्घ रिपोर्ताज 1 ते 18 मे या काळात प्रसिद्ध झाला. सिद्दींचा इतिहास, त्यांची चळवळ, लोककला, सिद्दींचं खेळातील महत्त्व, त्यांचा जगण्याचा संघर्ष, मार्गारेट अल्वा यांची सिद्दीचं आरक्षण आणि स्पेशल एरिया प्रोग्रॅम याविषयीची मुलाखत या विषयांवरील प्रत्येकी 10 ते 15 मिनिटांचे हे व्हिडिओज आहेत.

1920 ते 2005 असं 85 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या स. मा. गर्गे यांची ओळख, इतिहास संशोधक व समाज शास्त्रज्ञ अशी दुहेरी सांगता येईल. त्याबरोबरच त्यांनी पावशतकाहून अधिक काळ पत्रकारिताही केली. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'प्रतिष्ठान' या नियतकालिकात 'शांतिपर्वातील कथा' या लेखमालेत 11 कथा लिहिल्या आणि नंतर लगेचच 1962 मध्ये त्या पुस्तकरूपाने आल्या. त्याची दुसरी आवृत्ती 1992 मध्ये त्यांनी स्वतःच प्रकाशित केली, त्यानंतर दीर्घकाळ ते पुस्तक आऊट ऑफ प्रिंट राहिलं आहे. मात्र कोणत्याही काळात व कोणत्याही देशात या कथा कमी अधिक लागू पडणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर या कथा 21 जून ते 2 जुलै 2022 या काळात सलग क्रमशः प्रकाशित झाल्या.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुख्य ओळख अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते अशी आहे. त्यानंतर साधना साप्ताहिकाचे दीड दशक संपादक अशीही त्यांची एक महत्त्वाची ओळख आहे. मात्र आयुष्याच्या पंचविशीपर्यंत त्यांची मुख्य ओळख राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू अशी होती. त्यांना राज्य सरकारचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार दोन वेळा मिळाला होता. एकदा कबड्डीचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून, आणि दुसऱ्यांदा कबड्डी खेळातील संघटक, पंच, कॉमेंटेटर, स्तंभलेखक, क्रीडाप्रसारक, इत्यादी प्रकारच्या अन्य योगदानासाठी.

अशा डॉ. दाभोलकरांनी माणूस साप्ताहिकात 1970 – 71 मध्ये क्रीडांगण हे पाक्षिक सदर लिहिलं. त्यात कब्बडी, कुस्ती, अन्य देशी खेळ यांच्यासोबत क्रिकेटवरही त्यांनी लिहिलं आहे. या सदरातील एकूण 22 लेखांतून क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी आसुसलेलं मन आणि एकूणच खेळांच्याविषयी असलेले त्यांचे प्रगल्भ विचार यांचं दर्शन घडतं.

तब्बल 50 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले आणि त्यानंतर आजतागायत कुठेही  उपलब्ध नसलेले, 'माणूस'च्या अर्काइव्हमधून संकलित केलेले हे 22 लेख 31 जुलै ते 30 ऑगस्ट या काळात प्रसिद्ध झाले. डॉ. दाभोलकर यांच्या आयुष्यातील सुरुवातीचं हे पर्व किती रोमांचक असेल याची कल्पना तर या लेखमालेतून येतेच, पण 50 वर्षांपूर्वीच्या क्रीडा जगताची एक झलकही पाहायला मिळते. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातला फारसा समोर न आलेला पैलू दाखवणारे हे लेख आजही वाचनीय आहेत.

साधनाचा 75 वा वर्धापनदिन विशेषांक ‘कालचे स्वातंत्र्य आमच्या दारात आलेच नाही’ या विषयावर काढण्यात आला. या अंकात भटके विमुक्त, आदिवासी, दलित, बहुजन आणि मुस्लिम समाज यांच्यातील तळागाळापर्यंत मागील 75 वर्षांत स्वातंत्र्याची फळं कितपत पोहोचली याचा वेध घेणाऱ्या, राष्ट्रीय स्तरांवरील चार मान्यवरांच्या - अनुक्रमे किशोरचंद्र देव, बाळकृष्ण रेणके, कांचा इलाया शेफर्ड आणि नूर जहीर यांच्या – मुलाखतींचे मराठी अनुवाद असलेला हा अंक आहे. यापैकी किशोरचंद्र देव, कांचा इलाया शेफर्ड आणि नूर जहीर यांच्या मूळ इंग्रजी व हिंदीतील मुलाखती कर्तव्यवर प्रसिद्ध झाल्या आहेत.

वर्षभरामध्ये आ. श्री. केतकर यांनी मुख्यतः  विविध क्रीडाप्रकारांतील चालू घडामोडींवर व इतर विषयांवर 21 हून अधिक लेख लिहिले आहेत. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बुद्धिबळ, बॅटमिंटन, लेझीम, स्नूकर अशा विविध खेळांच्या सामन्यांविषयी त्यांनी लिहिलं आहे. सोमनाथ कोमरपंत यांनी नानासाहेब गोरे, वसंत बापट, इंदिरा संत, पु. ल. देशपांडे व मराठीतील अन्य साहित्यिकांच्या जन्म किंवा स्मृतीदिनाच्या निमित्ताने जवळपास 10 लेख लिहिले आहेत. 

याशिवाय काश्मीर फाईल्स या सिनेमाची चिकित्सा करणारा ‘काश्मीरच्या अर्धवट फाईल्स’ हा कलीम अजीम यांचा लेख, मॅक्स्वेल लोपीस यांनी लता मंगेशकरांवर लिहिलेला स्मृतीलेख, गणेश मतकरी यांनी पर्सीवल एवरेट यांच्या 'द ट्रीज' या कादंबरीवर लिहिलेला लेख, विशेष उल्लेखनीय म्हणता येतील.

विनय हर्डीकर यांनी कर्तव्यवरील Hard(ikar) Talk या सदरामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींवर 15 इंगजी लेख लिहिलेले आहेत. The Curse of Democracy? Pseudo-Secularism versus Pseudo-Hindutva, Wheel comes Full Circle: anti-Congressism to anti-BJPism, Mikhail Gorbachev: Man of Steel with Hands of Silk अशी काही उदाहरणे सांगता येतील.

याशिवाय नरहर कुरुंदकर यांच्या कन्या तेजस्विनी देव यांनी वडिलांविषयी लिहिलेला लेख, सुनील देशमुखांनी लिहिलेला BRIC Block vs. the Western Economies: A Historic Split हा लेख, हरिहर सारंग यांचा Whether the ED is guided by the principle of Natural Justice? हा लेख विशेष उल्लेखनीय म्हणता येतील.

हेमकलसा लोकबिरादरी प्रकल्पाच्या शिक्षण विभागाच्या समन्वयक समीक्षा गोडसे यांची नेलगुंडाच्या साधना विद्यालयाच्या संदर्भात आणि स्टैंडअप आर्टिस्ट संजय राजौरा यांची त्यांच्या कामासंदर्भात अशा दोन मुलाखती डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी घेतल्या, त्या ऑडिओ पॉडकास्ट स्वरूपात कर्तव्यवर प्रसिद्ध झाल्या.  सहा देशांतील सहा चित्रपट अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2022 मधील सर्व लेख ऑडिओ स्वरूपात त्या त्या लेखाच्या लेखकांच्याच आवाजात प्रसिद्ध झाले. 

अनेक अभ्यासूजनांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया हा मराठीतील इतर वैचारिक लेखनाला वाहिलेल्या पोर्टल्समध्ये कर्तव्यचा ठळक विशेष राहिलेला आहे. प्रत्येक लेखाच्या खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये सर्वसामान्य वाचकांपासून ते जाणकारांपर्यंत अनुकूल/प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदवलेल्या दिसतात. याशिवाय थेट लेखकाच्या इमेलवर किंवा कर्तव्यच्या व्हाटस्अप खात्यावर प्रतिक्रिया पाठवणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे.

कर्तव्य हे साधनाचेच एक अंग असले तरी साप्ताहिकाचा मजकूर कर्तव्यवर अथवा कर्तव्यवरील मजकूर साधनात घेतला जाणार नाही याबाबत आम्ही नेहमीच दक्ष राहिलेलो आहे. पण विषयाचे महत्त्व असेल तेव्हा माध्यमांतर करून असा कंटेंट कर्तव्यवर आलेला आहे. दर्जाशी तडजोड न करता सातत्य राखून उत्तम वैचारिक लेखन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न गेल्या तीन वर्षांत अधिकाधिक नेटकेपणाने साध्य होतो आहे असा विश्वास आम्हाला वाटतो.  येत्या वर्षभरामध्ये कर्तव्यचा व्हिडीओ विभागही अधिक कार्यक्षम बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.  

कर्तव्य साधनावर रोज प्रसिद्ध होणारे लेख नियमितपणे मोफत आपल्यापर्यंत पोहोचावेत यासाठी आपण  7058286750  या क्रमांकावर संपर्क करू शकता. कर्तव्यवर प्रसिद्ध होणाऱ्या लेखनासंबंधीच्या आपल्या सूचनांचेही आम्हाला अगत्य आहे.

Tags: kartavya sadhana marathi web portal opinion sadhana saptahik vinod shirsath narendra dabholkar current affairs Load More Tags

Comments:

विष्णू दाते

अतिशय उत्तम गोषवारा! तो वाचूनही लेख वाचल्या सारखाच आनंद झाला! यातील अनेक उत्तम लेख वाचायचे राहून गेले! या पुढेही असाच आनंद " कर्तव्य साधना" देत राहील ही खात्री आहे!

Add Comment