अ‍ॅमेझॉनच्या पर्जन्यवनातील आग - एक दृष्टीक्षेप

AFP/ Getty Image

उष्णकटीबंधीय क्षेत्रातील सर्वात मोठं पर्जन्यवन म्हणून ओळखले जाणारे अ‍ॅमेझॉन तब्बल 55 लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेलं आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, बोलिविया, पेरु, इक्वॅडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरीनेम आणि फ्रेंच गयाना या देशांना लागून हे पर्जन्यवन आहे. अमेझॉन नदी दक्षिण अमेरिका खंडातील बहुतांश देशांना व्यापते. पण याचा दोन तृतीयांश भाग एकट्या ब्राझीलमध्ये आहे. अमेझॉन नदीच्या बाजूने पसरलेल्या या पर्जन्यवनांत कायम पाऊस पडतो. सूर्याची किरणं पोहोचणार नाहीत अशी मुबलक क्षेत्रं अ‍ॅमेझॉनमध्ये आहेत.

या अ‍ॅमेझॉन पर्जन्यवनांत दोन आठवड्यांपासून प्रचंड आग लागली आहे. अ‍ॅमेझॉनमधली ही आग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अवघ्या एका महिन्यात अमेझॉन पर्जन्यवनातील जवळपास 2 हजार 254 चौरस किमी क्षेत्र नष्ट झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 278 टक्के अधिक जंगल या आगीत नष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मागील 10 वर्षांत अ‍ॅमेझॉनमधील 10 हजार चौरसफुटांवर जंगलतोड झाली आहे. युरोपियन युनियनच्या सॅटेलाईटने जारी केलेल्या फोटोनुसार, आगीचा धूर संपूर्ण अटलांटिक किनार्‍यावर पसरलाय. तर धुराचं साम्राज्य ब्राझीलमधील निम्म्या भागावर पसरलं असून शेजारील पेरु, बोलिविया आणि पेरुग्वेमध्येही धूर पसरत आहे.

अ‍ॅमेझोनमध्ये असा वणवा नेहमीच पेटतो. मात्र यावेळेस लागलेल्या आगीत झालेलं नुकसान प्रचंड आहे. ब्राझीलमध्ये या वर्षात 72 हजार 843 आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. ऑगस्टच्या 15 तारखेपासून तब्बल 9 हजार 500 आगीच्या घटना घडल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत आग लागण्याच्या घटनांमध्ये  या वर्षी 84 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यात आगीच्या घटनांमध्ये 700 पटींनी वाढ झाली आहे.  मागील 15 वर्षांचा विचार करता ही वाढ अनैसर्गिक आहे.

बहुतेकवेळा अ‍ॅमेझॉनमधील काही भागांत शेतीसाठी आग लावली जाते ती एकतर कापणीनंतर शेतात उरलेल्या पिकांना काढण्यासाठी किंवा नव्या पिकाच्या पेरणीसाठी जमिन तयार करता यावी म्हणून असते. इतकंच नव्हे तर जमिन बळकावण्यासाठी काही लॅण्डमाफियासुद्धा जंगलाला आग लावून देतात. थोडक्यात अ‍ॅमॅझोनमध्ये बहुतेकवेळा पेटलेले वणवे हे मानवनिर्मित आणि जाणिवपूर्वक लावलेले असतात. याहीवेळी अ‍ॅमॅझोनमध्ये लागलेली आग अशीच मानवनिर्मित आहे. मात्र असा वणवा पेटला तरी संपूर्ण जंगल नष्ट होत नाही.

सॅटेलाईट निरीक्षकांच्या मते, संपूर्ण जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असं समजणं चूक ठरेल. विशेष करुन सोशल मिडीयावर या आगीच्या संदर्भात चूकीची माहिती पसरवण्यात येत आहे. सोबत  फिरत असलेले आगीचे फोटो देखील जुने आहेत. 

बहुतेक बातम्यांमधून असं म्हटलं जात आहे की, पृथ्वीवरील 20 टक्के ऑक्सिजनची निर्मिती अ‍ॅमॅझोनमध्ये होते. हा आकडा कुठून आला याबाबत कुठलीच स्पष्टता नाही. याउलट वातावरणातील बदलावर अभ्यास करणारे शास्त्रज्ञ मायकेल मान आणि जोनाथन फोले यांच्या मते अ‍ॅमॅझोनच्या जंगलातून 6 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन निर्मिती होत नाही. मात्र अ‍ॅमॅझोन वनाची परिसंस्था अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे अशा वणव्यांना गांभीर्यांनं घेतलं गेलं पाहिजे. पश्चिमेकडून येणार्‍या 25 टक्के औषधांमध्ये अ‍ॅमॅझोन पर्जन्यवनातील वनौषधींचा वापर होतो. शास्त्रज्ञांना आजवर अ‍ॅमॅझोनमध्ये एक टक्क्यांपेक्षा कमी वनस्पतींची चाचणी करण्यात यश आले आहे, त्यांचा उपयोग 25 टक्के औषधांच्या निर्मितीसाठी होतो.

अशा संपंन्न जंगलातील आगींच्या घटना या बहुतेकवेळा बेकायदेशीरित्या लावलेल्या असतात. शिवाय जंगलतोडीचे प्रमाण वाढत असल्याची ही धोक्याची सूचना आहे. वातावरण बदलाची सद्यस्थिती पाहता कार्बन शोषून घेण्यासाठी आणि वातावरणाचे संतुलन राखण्यासाठी कोट्यवधी झाडांची गरज आहे. अ‍ॅमॅझोनच्या वणव्याची ही समस्या आता टीपेला पोहचली आहे. वणव्याचं प्रमाण असंच राहिलं तर जंगलांचं वाळवंटात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण आत्ताच सावध होण्याची गरज आहे.

विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत ब्राझीलमध्ये जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर मात्र ब्राझीलने 2005 ते 2014  या काळात देखरेख, उत्तम नियोजन आणि दंडात्मक कारवाई करुन जंगलतोडीचं प्रमाण 80 टक्क्यांनी कमी केलं. परंतु आता ती यंत्रणा पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे दोन दशकांपूर्वीची जंगलतोडीची भयंकर परिस्थिती परत उद्भवण्याची शक्यता आहे.

पर्यावरणप्रेमी गेल्या अनेक वर्षांपासून अ‍ॅमॅझोन पर्जन्यवन वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण ब्राझील सरकारने याकडे दुर्लक्ष करत खाणी, शेतीसाठी वनतोडीच्या परवानग्या दिल्या व जंगलतोड रोखण्यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. पर्यावरणप्रेमी आणि ब्राझील सरकारमध्ये आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तर पृथ्वीवरील वनसंपत्ती नष्ट होत असल्यामुळे ब्राझील सरकारवर युरोपसह अनेक देशांनीही टीका सुरु केली आहे. युरोपियन युनियन आणि इतर राष्ट्रांनी व्यापारी निर्बंध लादण्याचा इशारा दिल्यानंतर ब्राझील सरकारला जाग आली असून आग नियंत्रण आणण्यासाठी पाऊले उचलण्याचे त्यांनी मान्य केले आहे.

 

Tags: brazil environment अ‍ॅमेझॉन ब्राझील जंगल पर्यावरण Load More Tags

Add Comment