मानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ईश्वरश्रद्धा तारक ठरते का?

‘ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य’ या दीर्घ लेखाचा भाग 1 

29 मार्च 2020 रोजी नाशिक येथे नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार होते. या मेळाव्यात प्रमुख वक्त्यांपैकी एक असलेल्या डॉ. अंजली जोशी यांच्या व्याख्यानाचा विषय होता 'ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य'. परंतु  25 मार्च पासून लागू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे हा मेळावा होऊ शकला नाही. त्यामुळे 'ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य' हे व्याख्यान लेखरूपाने तीन भागांत प्रसिद्ध करत आहोत. या पहिल्या भागात, एकूण आठ व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांपैकी पहिली पाच वैशिष्ट्ये आणि ईश्वरश्रद्धा यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. या दीर्घ लेखाचा दुसरा व तिसरा भाग क्रमशः उद्या व परवा प्रसिद्ध होईल.   

‘ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य’ या विषयाकडे कशा दृष्टीने पाहिले आहे, हे मी सर्वप्रथम सांगू इच्छिते. मानसशास्त्र हा माझ्या अभ्यासाचा व संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे एक मानसशास्त्रीय संशोधक म्हणून मी या विषयाची चिकित्सा केली आहे. संशोधकाने वैयक्तिक निष्ठा किंवा मतांना दूर ठेवून, कुठलीही एक विशिष्ट बाजू उचलून न धरता तटस्थ भूमिका घेणे अपेक्षित असते. या भूमिकेतून ईश्वरश्रद्धा असणे व नसणे या दोन्ही भूमिकांकडे मी सम्यकपणे पाहण्याचा प्रयत्न केला आहे व त्यांची चिकित्सा करताना जे हाताशी लागले ते मांडणार आहे. 

मी तीन मुद्दयांचा परामर्श घेणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे मानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी जी व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये मानसशास्त्रज्ञांनी सुचविली आहेत, त्यांची जोपासना करण्यास ईश्वरश्रद्धा तारक ठरते का ते पाहणे. यासाठी मी गुणात्मक विश्लेषणावर (Qualitative Analysis) भर दिला आहे. 

दुसरा मुद्दा असा की ईश्वरश्रद्धा असण्याचा किंवा नसण्याचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, हे पाहणारी जी मानसशास्त्रीय संशोधने झाली आहेत त्यांचा आढावा घेणे. यासाठी मी संख्यात्मक विश्लेषणावर (Quantitative Analysis) भर दिला आहे. या दोन मुद्दयांच्या विवेचनानंतर शेवटच्या मुद्दयात या विषयावर प्रतिबिंबित होताना मला ठळकपणे जाणवलेले काही मुद्दे व निरीक्षणे मी मांडणार आहे. 

प्रथम ईश्वरश्रद्धा म्हणजे काय ते पाहू. त्यातल्या ईश्वर या शब्दाचे अनेक प्रकारे मूल्यमापन होते. कुणी जर माणसांमध्ये ईश्वर पाहत असेल तर तो ईश्वर मला अभिप्रेत नाही किंवा कुणी पाणी, पाऊस यांना ईश्वर मानत असतील तर तोही अभिप्रेत नाही. तसेच एखादा विशिष्ट ईश्वरही मला अभिप्रेत नाही. ईश्वर या संबोधनात मला काय अभिप्रेत आहे, सांगण्यासाठी मी मरिअम वेबस्टरच्या शब्दकोशाचा (1) आधार घेतला आहे.  ‘जगाची निर्मिती व नियंत्रण करणारी पूज्य मानली जाणारी सर्वोच्च शक्ती म्हणजे ईश्वर’ अशी व्याख्या तिथे दिली आहे व हाच अर्थ मला अभिप्रेत आहे. म्हणजेच या शक्तीचे अस्तित्व मान्य करून तिच्यावर दृढ विश्वास ठेवणे म्हणजे ईश्वरश्रद्धा असे म्हणता येईल. 

ईश्वरश्रद्धेच्या बाबतीत तीन प्रकारचे वर्तन संभवू शकते. पहिले वर्तन म्हणजे ईश्वरश्रद्धेला अनुसरून आचरण करणे, म्हणजेच प्रार्थना, जप इत्यादींद्वारे ईश्वरोपासना करणे. दुसरे वर्तन म्हणजे ईश्वरश्रद्धा आहे पण तद्‌नुसार वर्तन न करणे. श्रद्धा असूनही त्याचा कुठलाच आविष्कार दिसत नसेल तर ती श्रद्धा असून नसल्यासारखीच आहे. त्यामुळे हे वर्तन विचारात घेण्याचा प्रश्नच नाही. तिसरे वर्तन म्हणजे ईश्वरश्रद्धा नसूनही ईश्वरोपासना करणे. हे तर्कविसंगत वाटते. पण समजा असा कुणी मनुष्य असेल तर तो केवळ बळजबरीने ईश्वरोपासना करीत आहे, असे म्हणावे लागेल. अशा माणसांचाही विचार करण्याचे येथे कारण नाही. म्हणून ‘ईश्वरश्रद्धा’या संबोधनात मी पहिल्या वर्तनाचा म्हणजेच ईश्वरश्रद्धेनुसार होणारे आचरण, म्हणजे ईश्वरोपासनागृहीत धरली आहे. तसेच या विषयाची चर्चा करताना ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारा कुठलाही वस्तुनिष्ठ निर्णायक पुरावा आजतागायत मिळाला नाही, ही वस्तुस्थितीही लक्षात घेतली आहे.  

माणसे ईश्वरश्रद्धा का ठेवतात, याची अनेक कारणे संभवतात. काही म्हणतात की आम्ही विशिष्ट धर्माचे अनुयायी आहोत. त्या धर्मामध्ये ज्या ईश्वरास पूज्य मानले आहे त्या ईश्वरावर आमची श्रद्धा आहे. काही म्हणतात की ईश्वरश्रद्धा ठेवण्याची आमची कुलपरंपरा आहे व तिचे जतन करण्यासाठी आम्ही ती ठेवतो. स्वतःच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही ईश्वरश्रद्धा बाळगतात. काही म्हणतात की ऐहिक सुखप्राप्तीसाठी आम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही, तर पारमार्थिक विकासासाठी ती ठेवतो. अंतिम सत्यात विलीन होण्यासाठी किंवा मोक्षप्राप्तीसाठी आम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवतो. तर काही जण असेही म्हणतात की ईश्वर प्रसन्न होऊन काही चमत्कार दाखवेल त्यामुळे आम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवतो. 

ईश्वरश्रद्धेचे अजून एक कारण सांगितले जाते. ते म्हणजे- ईश्वरावर श्रद्धा ठेवल्यामुळे आम्हांला मनःशांती मिळते. संकटसमयी कुठला मार्ग निवडावा ते अनेकदा आम्हांला कळत नाही. तेव्हा ईश्वर आम्हांला योग्य मार्ग दाखवितो. ईश्वराचा आम्हांला आधार वाटतो. 

या कारणांच्या सत्यासत्यतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. उदाहरणार्थ, ईश्वर खरेच आपली मनोकामना पूर्ण करतो का किंवा चमत्कार करून दाखवितो का अथवा ईश्वरश्रद्धा बाळगणे म्हणजेच धर्मपालन करणे किंवा परंपरेचे जतन करणे आहे का? मुळात सर्वोच्च व अतिनैसर्गिक शक्ती जगात अस्तित्वात आहे हे मानण्यास कुठला वस्तुनिष्ठ पुरावा आहे? अशा स्वरूपाचे हे मूलभूत प्रश्न आहेत. त्यांची तात्विक, धार्मिक किंवा आध्यात्मिक अंगाने व्यापक चर्चाहोऊ शकते. परंतु येथे ईश्वरश्रद्धेची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा करणे, हा उद्देश असल्यामुळे मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या मुद्दयांवर मी भर देणार आहे. त्यासाठी ईश्वरश्रद्धेच्या अन्य कारणांवर भर न देता, ती मानसिक शांतीसाठी उपयोगी पडते, म्हणजेच मानसिक आरोग्यसंवर्धनाचे कार्य करते, या कारणाचा मी विस्तृत ऊहापोह करणार आहे.  

त्यासाठी सर्वप्रथम मानसिक आरोग्य म्हणजे काय ते पाहू. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या व्याख्येनुसार (2) मानसिक स्वास्थ्य म्हणजे ‘सौख्याची अशी स्थिती की जेव्हा व्यक्तीस तिच्या क्षमतांची जाणीव होते व दैनंदिन जीवनातील तणावाशी ती सामना करू शकते. तसेच स्वतःची कार्यक्षमता उच्ततम राखण्यासाठी प्रयत्न करू शकते.’ ही स्थिती साध्य करण्यासाठी म्हणजेच मानसिक स्वास्थ्य उच्च राखण्यासाठी कुठली व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये धारण करावयास हवीत, याबाबत अनेक आघाडीच्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. 

उदाहरणार्थ, मॅस्लो (3) या मानसशास्त्रज्ञांनी आत्मप्रगटीकरणाची प्रेरणा ही अच्तुत्तम प्रेरणा मानली असून ही प्रेरणा असलेल्या व्यक्तींची 15 वैशिष्ट्ये वर्णन केली आहेत. कार्ल रॉजर्स (4) या मासनशास्त्रज्ञांनी ‘संपूर्ण कार्यरत व्यक्तींचे’ 7 व्यक्तिमत्त्व विशेष शोधून काढले आहेत. गॉर्डन ऑलपोर्ट (5) यांनी प्रगल्भ व्यक्तिमत्वाची 8 वैशिष्ट्ये नमूद केली आहेत. अल्बर्ट एलिस (6) यांनी निरोगी व्यक्तिमत्वात 15 गुणविशेषांचा अंतर्भाव केला आहे, तर मार्टिन सेलिग्मन (7) या अलीकडील मानसशास्त्रज्ञांनी 28 व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांना अग्रक्रम दिला आहे.   

या मानसशास्त्रज्ञांच्या प्रतिपादनानुसार अशा वैशिष्ट्यांची जोपासना करणाऱ्या व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य पूर्णतम स्थितीत असेल. हे मानसशास्त्रज्ञ भिन्न विचारधारांचे पुरस्कर्ते असले तरीही त्यांनी वर्णन केलेल्या काही व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांत समानता आढळते. त्यांनी वेगवेगळ्या शीर्षकांद्वारे ही वैशिष्ट्ये नमूद केली असली तरी त्यांना अभिप्रेत असणारे अर्थ ध्यानात घेतले तर काही वैशिष्ट्यांवर सर्वसाधारण एकमत होऊ शकते. ही वैशिष्ट्ये बाजूला काढून त्यांच्या अर्थाच्या बहुतांशी जवळपास जाणारी शीर्षके निवडली तर ही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे येतीलः

    स्वहित व सामाजिक हित
    वस्तुनिष्ठता 
    मनाचा खुलेपणा 
    परिवर्तनीयता 
    सर्जनशीलता
    स्वावलंबन 
    स्वीकार (स्वतःचा व इतरांचा)
    आशावाद

मानसिक स्वास्थ्याचे संवर्धन करण्यात ही वैशिष्ट्ये महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे ती जोपासण्यास ईश्वरश्रद्धा मदत करते का ते पाहण्यासाठी प्रत्येक वैशिष्ट्य तपासून पाहू. 

स्वहित व सामाजिक हित

मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी मनुष्याने स्वहितास प्राधान्य दिले पाहिजे. याचा अर्थ फक्त स्वतःचे हित बघणे असा नव्हे, तर स्वहिताचे रक्षण केले तर सामाजिक हितासाठीही तो झटू शकेल असा सुबुद्ध विचार त्यामागे आहे. थोडक्यात सामाजिक हित जपण्यासाठी स्वहिताचे रक्षण करणे ही पहिली पायरी आहे. ईश्वरश्रद्धा बाळगणारा मनुष्य ही पायरी गाठतो का ते पाहू. जर मनुष्य ईश्वरश्रद्धा मानत असेल तर ती जोपासणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांची ओळख करून घेण्यासाठी त्यास धर्मग्रथांचे प्रामाण्य मानावे लागते. 

जर तो धर्म सांप्रदायिक असेल तर ही ओळख करून देणाऱ्या संप्रदायाच्या प्रमुखाच्या म्हणण्यापुढे त्याला नतमस्तक व्हावयास लागते. जर तो धर्म सांप्रदायिक नसला तर पारंपरिक रीतीने श्रेष्ठ मानल्या गेलेल्या पंडितापुढे मान तुकवावी लागते. प्राधान्यांच्या अशा अनेक उतरंडींतून सर्वांत शेवटी त्याचा स्वतःचा क्रमांक लागतो. शिवाय ईश्वराची उपासना करण्यासाठी मनुष्यास नाना प्रकारच्या आचारांत गुंतावे लागते. प्रार्थना, जप, पूजा-अर्चा, विधी करावे लागतात. उपास-तापास करून आत्मक्लेशांस सामोरे जावे लागते. 

तसेच आपण उपासना योग्य रीतीने करीत आहोत का नाही ते पाहण्यासाठी त्याला समश्रद्ध लोकांच्या आचरणावर सतत नजर ठेवावी लागते व त्या तुलनेत आपण कमी पडू नये म्हणून स्वतःच्या उपासनेवर सक्त पहारा देत बसावे लागते. थोडक्यात परमेश्वरास हव्या असलेल्या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागते व स्वतःचे हित दुय्यम समजावे लागते. स्वहितास जेव्हा शेवटचे प्राधान्य दिले जाते तेव्हा मनुष्याची भावनिक अस्वस्थता वाढते कारण तो स्वतःवर सतत अन्याय करीत राहतो व आत्मपिडा देत राहतो. त्यात यत्किंचितही कमतरता आली तरी अपराधी भावनेचे ओझे बाळगत राहतो. 

यावर काही भाविक असे म्हणतील की आम्ही ईश्वराकडून काही प्राप्त व्हावे म्हणून त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाही, तर फक्त देवासमोर हात जोडून व डोळे मिटून बसतो. त्यामुळे आम्हांला खूप बरे वाटते. म्हणजे आम्ही स्वहितच पाहत असतो. प्राप्तीची अभिलाषा न धरता ठेवलेली श्रद्धा स्वहित पाहते का हे थोडे खोलात जाऊन पाहू. आम्हांला ईश्वराच्या केवळ स्मरणानेही बरे वाटते असे जेव्हा भाविक सांगतात तेव्हा तसे का बरे वाटते याची चिकित्सा क्वचितच करतात. याचे कारण असे आहे की ईश्वरच काय पण कुठल्याही गोष्टीवर, अगदी भ्रामक कल्पनेवर पूर्ण विश्वास ठेवून भक्तिभाव वाटून घेतला तर तसे बरे वाटू शकते. यात ईश्वराचे कर्तृत्व काहीच नाही. ईश्वराच्या जागी पिशाच्च असेल तरीही तसेच बरे वाटू शकते. थोडक्यात ईश्वराच्या अंगभूत सामर्थ्यामुळे भाविकास बरे वाटत नसून ‘कशावरही गाढ विश्वास ठेवण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे’ त्याला बरे वाटत असते. 

अजून एक उदाहरण घेऊ. समजा एखादी स्त्री असे म्हणू लागली की शाहरुख खान माझा पती आहे व यावर माझा ठाम विश्वास आहे. तिला जर असे विचारले की तुझे त्याच्याशी लग्न झाल्याचा काय वस्तुनिष्ठ पुरावा तुझ्याकडे आहे? यावर ती असे म्हणाली की माझ्याकडे पुरावा नाही. पण माझा असा गाढ विश्वास आहे की तो माझा पती आहे. रोज मी त्याचे स्मरण करते व मला फार बरे वाटते. माझा आत्मविश्वास वाढतो. या स्त्रीला आपण काय सल्ला देऊ? तिला बरे वाटते म्हणून तसे करण्यास अधिक प्रोत्साहन देऊ का भ्रम झाला आहे म्हणून मानसोपचारकाकडे जाण्यास सांगू? 

जर आपण तिला प्रोत्साहन देत गेलो तर तिच्या भ्रमाच्या आविष्कारांची व्याप्ती वाढत जाईल. आज फक्त शाहरुख खान पुरता मर्यादित असलेला भ्रम इतर व्यक्तींबाबतही वाटू शकेल. म्हणजेच तिला बरे वाटले तरी ते तात्कालिक बरे वाटणे असेल कारण सत्याकडे पाठ फिरवून केलेले काल्पनिक स्वप्नरंजन दूरच्या दृष्टीकोनातून पाहिले तर तिच्यासाठी आत्मघातकी ठरेल. याचाच अर्थ वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून ‘बरे वाटले’ तरी ते स्वहितकारक ठरत नाही. 

यातही गंमत अशी आहे की असे वर्तन जर एखाद-दुसऱ्या व्यक्तीने केले तर आपण त्या वर्तनास भ्रम म्हणतो. पण तसा स्वरुपाचे वर्तन जर बरेच जण करीत असतील तर त्यास श्रद्धेचे अधिष्ठान येते. म्हणजे परत असा प्रश्न उभा राहतो की एखादे वर्तन अनेक व्यक्ती करीत असतील तर ते योग्य असेल का? तसे असेल तर गेल्या शतकातील बहुसंख्य समाज हा स्त्री-शिक्षणाच्या विरोधी होता. म्हणून त्यांचे वर्तन योग्य आहे असे म्हणता येईल का? याचा अर्थ अनेक जण करतात हा त्या वर्तनाच्या योग्यतेचा निकष होऊ शकत नाही. 

थोडक्यात, स्वहित रक्षणासाठी ईश्वरश्रद्धा फारशी उपयोगी पडत नाही. जो मनुष्य स्वहिताची काळजी घेऊ शकत नसेल, म्हणजे पहिली पायरीच नीट गाठू शकत नसेल तो सामाजिक हिताची पुढची पायरी पूर्ण कार्यक्षमतेने गाठण्याची शक्यता कमी आहे. असा मनुष्य सामाजिक हिताच्या ज्या काही गोष्टी करीत असेल तो ईश्वराचा आदेश म्हणून करीत असेल; स्वयंस्फूर्तीने नसेल. किंवा आपण ज्यांचे हित करीत आहोत त्यांनी आपलीच ईश्वरश्रद्धा मानावी या अंतःस्थ हेतुने करीत असेल. ते हित निर्मळ, निरलस भावनेने केले जाण्याची शक्यता कमी आहे. याचा अर्थ तो सामाजिक हित करीत असला तरी ते सशर्त सामाजिक हित असेल. याउलट अशा श्रद्धेचे ओझे नसलेला मनुष्य हा स्वहिताचे रक्षण करण्याची, आत्मपीडा न करण्याची, सामाजिक हित स्वयंस्फूर्तीने करण्याची व ते सशर्त न करता बिनशर्तपणे करण्याची शक्यता जास्त आहे. 

वस्तुनिष्ठता, मनाचा खुलेपणा, परिवर्तनीयता, सर्जनशीलता 

एखाद्या मनुष्याचा दृष्टीकोन वस्तुनिष्ठ आहे असे आपण कधी म्हणू शकतो? तो जर कार्यकारण भाव तपासून पाहत असेल व जेवढा पुरावा तेवढ्या प्रमाणात विश्वास ठेवत असेल तर तो वस्तुनिष्ठ आहे, असे म्हणता येईल. ईश्वरश्रद्धा ठेवणारा मनुष्य संकट आले असताना ते वस्तुनिष्ठ पद्धतीने सोडविण्याऐवजी ईश्वराचा धावा करतो. संकटाशी दोन हात करण्याचे सोडून निष्क्रिय होतो. अनेक संकटांच्या वेळी ईश्वरश्रद्धा कामाला येत नाही, हे कळूनही त्याची ईश्वरावरील श्रद्धा भंग पावत नाही. ज्याच्याकडून आपण मदतीची याचना करीत आहोत तो मदतीला येत नसेल तर वास्तविक त्याने ती मदत मागणे थांबवावयास हवे. पण तसे न होता तो स्वतःच्या श्रद्धेला घट्ट कवटाळून बसतो. 

असे का होते याचे स्पष्टीकरण देणारा एक प्रयोग लिऑन फेंस्टिंगर (8) यांनी पन्नासच्या दशकात केला. ‘When Prophecy Fails’ म्हणजेच ‘जेव्हा भविष्यवाणी खोटी ठरते’ या नावाने तो मानसशास्त्रात प्रसिद्ध आहे. 21 डिसेंबरला महाप्रलय होऊन जगबुडी होणार असा दृढविश्वास बाळगणाऱ्या एका श्रद्धाळू गटामध्ये फेस्टिंगर यांनी शिरकाव करून घेतला. या दिवशी परग्रहवासी आपल्याला यानातून घेऊन जातील व या प्रलयापासून आपण बचावू शकू, असा विश्वास त्यांनी बाळगला होता. हा विश्वास देणाऱ्या प्रमुखाच्या घरी ते परग्रहावर जाण्याच्या पूर्ण तयारीने आदल्या दिवसापासून जमले होते. त्या तारखेला दिलेली वेळ टळूनही जगबुडी झाली नाही. वस्तुनिष्ठपणे विचार केला तर या या श्रद्धाळूंनी आपला विश्वास झुगारून द्यावयास पाहिजे होता. पण फेस्टिंगरला असे आढळून आले की विश्वास झुगारून देणे तर दूरच राहो, पण त्याऐवजी हे श्रद्धाळू ‘ईश्वराने कृपावंत होऊन जगाला प्रलयापासून वाचवले आहे’, असे म्हणत स्वतःच्या विश्वासाचे पूर्वीपेक्षा अधिक जोरदारपणे समर्थन करीत राहिले. 

याचे कारण फेस्टिंगरने असे शोधले की खोलवर रुजलेल्या एखाद्या विश्वासात बदल करावयाचा असेल तर एक प्रकारचा मानसिक तणाव निर्माण होतो. या तणावास त्याने ‘वैचारिक विसंगतीचा तणाव’ (Cognitive Dissonance) असे नाव दिले. हा तणाव सहन करणे ज्या माणसांना नको वाटते ते व़िरुद्ध पुरावा मिळूनही त्या विश्वासाचे समर्थन करीत राहतात व तणावास तोंड देणे ते टाळत राहतात.

विरुद्ध पुरावा समोर येऊनही भाविक ईश्वरावर श्रद्धा ठेवणे सोडत नाही याचे कारण त्याच्या वैफल्य सहन करण्याच्या कमी क्षमतेत असावे. संकटसमयी ईश्वर धावून येत नाही तरीही प्रयोगातील श्रद्धाळूंप्रमाणे ते स्वतःच्या श्रद्धेचे समर्थन करीत राहतात की, माझ्याच उपासनेत काहीतरी खोट राहिली असली पाहिजे अथवा मी कणखर होण्यासाठी ईश्वराने मला जाणूनबुजूनच मदत केली नाही किंवा ईश्वराने मला आत्ता मदत केली नाही तरी अंतिमतः तो माझ्या भल्याचेच करेल, इ्‌त्यादी.

विरुद्ध पुरावा समोर असूनही जुन्या विश्वासाचे समर्थन देण्याच्या प्रवृत्तीस म्हटले जाते, ‘Motivated Reasoning’. आपण यास ‘आव आणलेला तर्क’ किंवा ‘आभासी तर्क’ असे म्हणू शकतो. वैचारिक विसंगतीचा तणाव टाळण्यासाठी वापरली जाणारी ही सदोष विचारपद्धती आहे. त्यात कार्यकारणभावापासून पूर्णतः फारकत घेतली जाते.

कार्यकारणभाव न तपासण्याची एकदा सवय लागली की अविवेकी, असमंजस विचार करण्याची  प्रवृत्ती अधिकाधिक वाढीस लागते. जंतरमंतर, चमत्कारांच्या पाठी मनुष्य लागतो. जीवनकलहाला सामोरे न जाता काहीतरी चमत्कार होऊन संकट आपोआप दूर होईल असा खोटा आशावाद बाळगतो व कर्तव्यशून्य होतो. थोडक्यात, संकटातून वस्तुनिष्ठतेने मार्ग काढण्यापेक्षा कार्यकारणभाव नसलेल्या गोष्टींच्या पाठी लागून समस्या अजून जटील करून ठेवतो.

विरुद्ध पुरावा समोर येऊनही स्वतःच्याच मतांचे पुष्टीकरण करण्याच्या प्रवृत्तीमुळे स्वतःच्या मतांशी सहमत नसणाऱ्या विचारांना किंवा मतांना मनात शिरकाव करू न देण्याच्या प्रवृत्तीलाही साहजिकच चालना मिळते. अधिकाधिक विरुद्ध पुरावा समोर आला तर आपला विश्वास डळमळीत होईल याची भीती वाटून हा मनुष्य स्वतःच्या मनाची दारे इतकी घट्ट बंद करून घेतो की अन्य विचारांची झुळूकही त्याला लागत नाही. यामुळे तो अधिकाधिक संकुचित, एकारलेल्या विचारांचा व अपरिवर्तनीय होत जातो. 

मनुष्य जेवढ्या निर्भयतेने विचार करेल व विचारांची दारे जेवढी खुली ठेवेल, तेवढा तो जास्त सर्जनशील असेल. बंदिस्त व घुसमटलेल्या मानसिकतेत सर्जनशीलतेला कोंब फुटू शकत नाहीत. याउलट मनुष्य जेवढ्या मोकळ्या मनाचा असतो तेवढा तो परिवर्तनास तयार असतो. असा मनुष्य इतर मतांकडे व व्यक्तींकडे पूर्वर्ग्रहदूषित नजरेने न पाहणारा, खुला, लवचिक व सर्जनशील असतो. अर्थातच त्याचे मानसिक स्वास्थ्यही उच्च असते. याउलट भयग्रस्त, असुरक्षित, संकुचित, वैफल्य सहनशीलता निम्न असणाऱ्या मनुष्याचे मानसिक स्वास्थ्य कितपत संतुलित राहील याची कल्पना कुणीही करू शकेल. 

- डॉ. अंजली जोशी
 anjaleejoshi@gmail.com

(लेखिका, मानसोपचारतज्ज्ञ असून मुंबईतील नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये 'असोसिएट डीन' म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यापैकी 'मी अल्बर्ट एलिस' या पुस्तकाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे, तर  'विरंगी मी, विमुक्त मी' या पुस्तकाला महाराष्ट्र फाउंडेशनच्या ललित ग्रंथ पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.)  

संदर्भ:
1. God (n.d.) In Merriam-Webster’s collegiate dictionary. Retrived from https://www.merriam-webster.com/dictionary
2. World Health Organization. (2017)  World Health Organization. August 2014. Retrieved 21 Feb 2020 https://www.who.int/en/news-room/fact-sheets/detail/mental-health-strengthening-our-response
3. Maslow, A. H. (1970). Motivation and personality. New York: Harper & Row. Retrived from https://artsofthought.com/2018/04/22/maslow-15-traits-of-self-actualized-people/
4. Rogers, Carl (1961). On becoming a person: A therapist's view of psychotherapy. London: Constable. 
5. Allport, G. (1961). Pattern and Growth in Personality. New York: Holt, Rinehart & Winston.
6. Joshi, A; & Phadke K. M. (2018) Rational Emotive Behaviour Therapy Integrated. Sage Publications, India. pp. 122-126. 
7. Peterson, C&Seligman, M. (April, 2004). Character Strengths and Virtues: A Handbook and Classification. OUP USA. First Edition. 
8. Festinger, Leon; Henry W. Riecken; Stanley Schachter (1956). When Prophecy Fails: A Social and Psychological Study of a Modern Group that Predicted the Destruction of the World. University of Minnesota Press. Reissued 2008 by Pinter & Martin with a foreword by Elliot Aronson.

वाचा ‘ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य’ या दीर्घ लेखाचा भाग 2: 
आत्मनिर्भरता आणि ईश्वरश्रद्धा

Tags:Load More Tags

Comments:

Umesh Shivaji Jagtap

अतिशय सुरेख पध्दतीने आपण हा विषय हाताळला. अत्यंत शास्त्रीय विवेचन विचार करायला लावणारे. धन्यवाद.

Anjani Kher

उच्च मानसिक स्वास्थ्याची सर्व लक्षणे धारण करणारी माणसे ही अन्तर्यामी सश्रद्ध असू शकतील.. धार्मिकतेची बाह्य लक्षणे असतीलच असं नाही. हे false binary कडे झुकतय.

मुकुंद नगराळे

खूप छान. सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.

Daniel Mascarenhas

सुंदर, मुद्देसुद विश्लेषण

Govardhan Garad

Very nice thoughts in Corona virus period .

Add Comment