सहज, सुरेल मालिनीबाई!

ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांचे बुधवारी (7 सप्टेंबर) वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरांजली वाहणारा लेख.

विशिष्ट मूल्य स्वीकारून, एक प्राध्यान्यक्रम ठरवून घेऊन समाजात वावरणाऱ्या माणसांच्या व्यक्तिमत्त्वात दिसणारी एकसंधता त्यांच्यात खास होती. माणूस म्हणून आदर्श आयुष्य जगणं हे त्यांच्यालेखी पहिलं मूल्य होतं, त्या तर स्वतःला कलाकारच मानत नव्हत्या! आणि ही कुठली पोज नव्हती, तो त्यांचा स्वभावगुण होता हे जितकं त्यांच्या वागण्या-बोलण्यातून कळतं, त्यापेक्षाही त्यांच्या गाण्यातून पोचतं.. याहून मोठं साध्य कलाकारासाठी काय असतं?

प्रदीर्घ काळ ग्वाल्हेर गायकीचा वारसा सांगणाऱ्या कलावंतामध्ये मालिनीबाई पहिल्या रांगेत होत्या. त्यांच्या जाण्याने एक बुजुर्ग अधिकारपद रितं झाल्याची जाणीव तीव्र आहे... भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये सर्वानुमते मुख्य मानली गेलेली घराणी चार. ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर आणि किराना. जयपूर आणि किराना या घराण्यांमध्ये पुरुष गायक आणि स्त्री गायिका यांचं गुणोत्तर बऱ्यापैकी समान. कदाचित लोकप्रियतेचा निकष लावला तर ढोबळमानाने या दोन घराण्यांतील स्त्री गायिकाच अधिक उठून दिसतात. त्या मानाने ग्वाल्हेर आणि आग्रा या घराण्यांमध्ये पुरुष गायकांचं प्राबल्य दिसतं. या चारही घराण्यांच्या गायकीची परंपरेने चालत आलेली वैशिष्ट्यं पाहिली तर त्याचं काही निदान करता येऊ शकेल. विशेषतः ग्वाल्हेर गायकीचं सौष्ठवयुक्त स्वरूप पुरुषांच्या गळ्याला अधिक अनुकूल. त्यामुळेच कदाचित या घराण्याच्या प्रदीर्घ परंपरेतही स्त्री गायिका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच दिसतात. या पुरुषी (ध्वनीवैशिष्ट्य या अर्थाने) मानल्या गेलेल्या गायकीची तालीम घेऊन ती कंठगत करणं आणि अभिजात संगीताच्या विस्तीर्ण प्रदेशात स्वतःचं वेगळेपण दाखवणं हेच मुळात अग्निदिव्य. मालिनीबाईंना त्याचा ध्यास होता!

मालिनीबाईंना हे कसं साधलं याचा विचार करण्यापूर्वी त्यांचा प्रारंभिक जीवनक्रम पाहायला हवा. स्वान्तसुखाय संगीतावर प्रेम करणाऱ्या कुटुंबामध्ये मालिनीबाईंचा जन्म झाला, राजस्थानच्या अजमेरमध्ये 1941ला. त्यांचं माहेरचं नाव प्रभा वैद्य. मालिनीबाईंना आणि त्यांच्या भावंडांना तालासुराचे प्राथमिक संस्कार लाभले ते घरातच. पुढे वयाच्या पंधराव्या वर्षी वडिलांनी त्यांना अजमेर संगीत शाळेमध्ये दाखल केलं. तिथले प्राचार्य होते, पं. गोविंदराव राजूरकर. संगीत शाळेतला हा प्रवास पुढे संगीत निपुण या पदवीपर्यंत सुरू राहिला. आणि नंतर राजूरकर गुरुजींकडे त्यांनी गायकीची तालीम घेतली. 

मालिनीबाईंच्या घरामध्ये दुसरी बैठक होती ती गणिताची. त्यामुळे त्यांना स्वतःला गणितात खूप पुढे जावं आणि प्राध्यापक व्हावं किंवा बँकेत मोठी ऑफिसर व्हावं असं वाटत होतं. अजमेरच्या ‘सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेज’मधून त्यांनी गणिताची पदवी घेतली आणि तिथेच काही काळ गणिताचं अध्यापनही केलं. पण पुढे राज्य पातळीवर त्यांना गाण्यात प्रथम क्रमांक मिळाला आणि संगीत शिक्षणासाठी दोन वर्षांची पूर्णवेळाची सरकारी शिष्यवृत्ती मिळाली. त्यातून महिन्याला (त्या काळचे) दोनशे रुपये मिळणार होते. मात्र विशिष्ट गुरूंकडे शिकण्याची अट त्या शिष्यवृत्तीसाठी होती. इतकी वर्षं राजुरकर गुरुजींकडे शिकल्यानंतर केवळ शिष्यवृत्तीसाठी दुसऱ्या गुरूकडे जाणं मालिनीबाईंना पटलं नाही. तेव्हा अजमेरला राजुरकर गुरुजींकडेच शिकण्याची अट मान्य होऊन ती शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. गाण्यातून त्यांना आनंद मिळत होता, मात्र संगीत हेच आपलं कार्यक्षेत्र राहणार आहे असा विचार त्या वयात पक्का झालेला नव्हता. पण हाती घेतलेलं काम जबाबदारीने करायचं हा घरचा संस्कार. शिष्यवृत्तीसाठी मिळालेल्या पैशाचा योग्य उपयोग झाला पाहिजे, त्यासाठी मग गुरुजींनी दिलेल्या तालमीवर भरपूर मेहनत घेतली गेली पाहिजे हा त्यांच्या आईचा दंडक त्या कसोशीने पाळत होत्या. दरम्यानच्या काळात गोविंदरावांचे पुतणे वसंतराव राजूरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ते हैदराबादला ‘गव्हर्नमेंट म्युझिक कॉलेज’मध्ये संगीत शिकवत असत. 

शिष्यवृत्तीच्या अखेरच्या काळात अजमेरला त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला. गोविंदराव त्यांना म्हणाले की, ‘इथून पुढे तू गाणं चालू ठेवशील की नाही हे सांगता येत नाही. तर तू इथल्या गणपतीसमोर गा..’ गुरुजी समोर बसले आणि ‘आता हे गा, ते गा’ असं सांगत गेले आणि त्या गात गेल्या... ही त्यांची निवडक श्रोत्यांपुढे झालेली पहिली मैफल चालली, रात्री साडेनऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत!

शिष्यवृत्ती संपली आणि मालिनीबाई वसंतरावांसोबत हैदराबादला स्थायिक झाल्या, तेव्हाही त्यांच्या मनात एमएससी करून गणिताला प्राधान्य द्यायचं होतं. पण गणित आणि गाणं या दोन्ही आघाड्या सांभाळणं शक्य नव्हतं म्हणून शेवटी वसंतरावांच्या इच्छेखातर त्यांनी गाणं करायचं ठरवलं. हैदराबादला आल्यानंतर वसंतरावांनी चक्क हुकूमशाही सुरू केली! मात्र ही हुकुमशाही मालिनीबाईंना घराणेदार ग्वाल्हेर गायकीचा वसा देण्यासाठी होती हे आपलं सुदैव! घरी कोणी गाण्यातले दर्दी पाहुणे आले की ते सांगायचे, “यांच्यासमोर गाऊन दाखव.” त्यावेळेला मालिनीबाईंकडे त्यांना नाही म्हणायची हिम्मत नव्हती. मग हातातलं काम सोडून गायचं. मालिनीबाई आणि वसंतरावांचं नातं (मालिनीबाईंच्याच शब्दांत) डॉ. आनंदीबाई आणि गोपाळरावांसारखं होतं! वसंतराव त्यांना म्हणत, “नाव, पैसा या गोष्टींचा तू अजिबात विचार करू नकोस. तुझं गाणं पुढे चालू ठेव.” आबासाहेब जहागीरदार यांनी हैदराबादला त्यांचं पहिलं गाणं केलं. पुढे त्यांचे एक स्नेही आणि संगीताचे जाणकार व रचनाकार डॉ. पत्की यांनी गुलबर्ग्याला त्यांचं गाणं ठेवलं. पत्की यांनीच किराना घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांच्या कानावर त्यांचं नाव घातलं. गंगूबाईंची त्यांची भेट झाली. त्यांचं गाणं ऐकून गंगूबाईंनी त्यांचं नाव पं. भीमसेन जोशींना ‘सवाई गंधर्व महोत्सवा’साठी सुचवलं. हा काळ होता 1965-66 चा. ‘सवाई गंधर्व’चं त्यांना बोलावणं आलं तेव्हा त्यांची मुलगी तीन-चार महिन्यांची होती, शिवाय त्याआधी सहा महिने त्यांचा रियाज झालेला नव्हता. पण ती निमंत्रणाची तार वाचून वसंतराव त्यांना घेऊन पुण्याला निघालेच. ‘सवाई’मध्ये दहा-बारा हजार लोकांची गर्दी पाहून मालिनीबाईंच्या मनावर प्रचंड दडपण आलं. कारण तालीम आणि मेहनत असली तरी इतक्या मोठ्या कार्यक्रमात गाण्याचा सराव नव्हता. पण वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी अशा बुजुर्गांनी त्यांना धीर व आत्मविश्वास दिला आणि त्या गायल्या... अर्थात मालिनीबाईंचं गाणं अस्सल होतंच. लोकांनी त्याला भरभरून दाद दिली. सवाई गंधर्वला नाव झाल्यानंतर मग भारतभरच्या संगीत महोत्सवांची आमंत्रणं येतं. त्यातूनच पुढे ग्वाल्हेरचा तानसेन समारोह, लखनऊ, बनारस, कलकत्ता, दिल्ली, मुंबई असं त्यांचं भारतभर भ्रमण सुरू झालं.


मालिनीबाईंच्या 1974 मध्ये मुंबईत झालेल्या एका मैफिलीचे ध्वनीमुद्रण 
(या दीड तासाच्या मैफिलीत त्यांनी राग मालकंस मध्ये 'पग लागन दे' हा विलंबित पारंपरिक ख्याल आणि 'फूल बेदाग' ही कुमारांची द्रुत बंदिश ऐकवली आहे. त्यानंतर काफी रागात 'ओ मिया जानेवाले' हा टप्पा आणि तराणा ऐकवला आहे.)


मालिनीबाईंचा गाण्याचा बाज स्वतंत्र होता, आवाजाची वैशिष्ट्यं समकालीन गायिकांच्या तुलनेत वेगळी होती शिवाय स्वभावातली सहज नम्रता आणि साथीदार वादकांचा स्वतःइतकाच सन्मान राखला जाण्याबाबतची दक्षता या दुर्लभ गुणांमुळेही त्यांना लोकप्रेम लाभलं. किराना घराण्याच्याच ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर आणि माणिक वर्मा यांचा स्नेह त्यांना लाभला, त्यांच्या शालीनतेचे संस्कार मालिनीबाईंनी स्वतःहून स्वीकारले आणि श्रोत्यांनाही त्याची कायम आठवण करून दिली. गृहकृत्यदक्षता आणि गाणं हे दोन प्राधान्यक्रम त्यांनी स्वतःसाठी पहिल्यापासूनच कटाक्षाने निवडले होते ते अखेरपर्यंत. त्यामुळेच, अनेक संधींचा त्यांना लौकिकअर्थाने त्याग करावा लागला असेल तरी त्याचा विषाद त्यांच्या व्यक्तिमत्त्वात उमटला नाही. स्वतःच्या संगीताची चर्चा, भारंभार मुलाखती, प्रसारमाध्यमांतून सेल्फ प्रमोशन इत्यादी विषय स्वाभाविकच त्यांच्यालेखी फारसे महत्त्वाचे नव्हते. विशिष्ट मूल्य स्वीकारून, एक प्राध्यान्यक्रम ठरवून घेऊन समाजात वावरणाऱ्या माणसांच्या व्यक्तिमत्त्वात दिसणारी एकसंधता त्यांच्यात खास होती. माणूस म्हणून आदर्श आयुष्य जगणं हे त्यांच्यालेखी पहिलं मूल्य होतं, त्या तर स्वतःला कलाकारच मानत नव्हत्या! आणि ही कुठली पोज नव्हती, तो त्यांचा स्वभावगुण होता हे जितकं त्यांच्या वागण्या-बोलण्यातून कळतं, त्यापेक्षाही त्यांच्या गाण्यातून पोचतं.. याहून मोठं साध्य कलाकारासाठी काय असतं?

मालिनीबाईंनी स्वतःसाठी एक आयुष्य निवडलं आणि ते शंभरनंबरी जगण्याचा प्रयत्न साधला. पण त्यांच्या असण्याने अभिजात संगीतातही बरंच काही साधलं गेलं. ते नक्की काय होतं? मालिनीबाईंना ज्या ग्वाल्हेर गायकीचा वारसा होता, तिच्या संदर्भातही त्यांच्या गाण्याचा विचार करायला हवा. ग्वाल्हेर हे आद्य घराणं मानलं जातं, ती अष्टांग गायकी आहे. ही ‘अष्टांगे’ कोणती याबाबत जाणकारांत मतभेद असले तरी सारांशाने असं म्हणता येतं, संस्कृतातल्या प्राचीन परंपरेनुसार तो एक सर्वसमावेशक शब्द आहे. ही गायकी म्हणजे वस्तुतः अभिजात संगीताची गंगोत्रीच असल्यामुळे ती स्वतःत सर्व संगीत घटकांचा समान उदारत्वाने समावेश करते आणि त्यांच्या मांडणीचं स्वातंत्र्य त्या त्या कलावंताकडे देते. हे त्या गायकीचं मूलतत्त्वच आहे. पुढे प्रचारात आलेल्या इतर सर्व घराण्यांमध्ये काही घटकांना प्राधान्य, काहींना अल्पत्व असं मूलतत्त्व आणि मग त्यांचा सूक्ष्म विचार दिसतो. ‘सर्व घराणी ग्वाल्हेरमधून निघतात आणि ग्वाल्हेरमध्येच सामावतात’ या पारंपरिक सूत्राचं निदान इथे होतं.

पण पुढे इतर घराण्यांचा पुष्कळ प्रचार झाल्यानंतर त्यांचा संगीत विचार जितका ठळक दिसतो, तितका ग्वाल्हेर गायकीचा दिसत नाही या गैरसमजामुळे; आणि संगीताचा प्रचार मोठ्या प्रमाणावर करणाऱ्या गांधर्व महाविद्यालयाची मूळ चौकट घडवणाऱ्या ग्वाल्हेर घराण्याच्या बुजुर्गांनी कानसेन तयार करण्याच्या उद्देशाने ती गायकी त्या चौकटीपुरती सौम्य केलेली असल्यामुळे ग्वाल्हेर घराण्याचं निश्चित तत्त्व काय हे सामान्य श्रोत्यांपर्यंत इतर गायकींच्या तुलनेत तितक्या स्पष्टपणे पोचलं नाही. त्यामुळे ग्वाल्हेर गायकी म्हणजे इथे सगळंच आहे आणि काहीच निश्चित नाही अशी ढोबळ समजूत प्रचारात आली. मात्र, वर उल्लेख केलेल्या तत्त्वानुसार ग्वाल्हेरमध्ये कलाकाराला अधिक खुला अवकाश मिळाल्यामुळे त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावतात. पण त्याचबरोबर मांडणीची एक मोठी जबाबदारीही येऊन पडते. हे स्वातंत्र्य घेऊन आणि जबाबदारीने निभावून आपल्या मांडणीतून रसनिष्पत्ती साधणारी अनेक मोठी मंडळी या परंपरेत झाली. त्यामुळे ग्वाल्हेरच्या या प्राचीन, विशाल वटवृक्षाच्या अनेक पारंब्या संपूर्ण भारतभर पसरलेल्या दिसतात. विसाव्या शतकात ग्वाल्हेरची बैठक सांगणारं, आपलं गाणं घेऊन अनेक बुजुर्ग ठिकठिकाणी स्थिरावले. त्यांच्यापैकी फार कमी जणांचं ध्वनिमुद्रण आज उपलब्ध आहे. मालिनीबाईंचे गुरुजी गोविंदराव राजुरकर यांना पं. राजाभैया पूछवाले यांची तालीम होती. स्वतः वसंतराव राजूरकर यांचंही शिक्षण राजाभैय्या आणि पं. प्रभाकर चिंचोरे यांच्याकडे झालेलं होतं. ही ग्वाल्हेरची एक अनवट शाखा. मालिनीबाईंचा बंध गोविंदराव, वसंतराव यांच्या माध्यमातून या शाखेशी जुळला.

राजाभैय्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं की, ते टप्पेही फार रंगून गात. पं. कुमार गंधर्व (ज्यांनीही स्वतःचा धागा ग्वाल्हेर परंपरेशी जोडलेला आहे) यांनी त्यांच्या वह्यांवरून टप्प्याचा अभ्यास केलेला होता. मालिनीबाईंच्या गाण्यामध्येही त्यांनी गायलेले टप्पे हा एक मुख्य आकर्षणाचा बिंदू राहिलेला आहे. पुढे राजाभैय्यांचीच तालीम लाभलेले पं. के. जी. गिंडे यांच्याकडून मालिनीबाईंना राग आणि बंदिश यांच्या मांडणीची काही तंत्रे शिकता आली. पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. कुमार गंधर्व यांच्या गाण्यातून रागांकडे पाहण्याची आपली दृष्टी स्वतंत्र असली पाहिजे हा संस्कार मालिनीबाईंनी घेतला. विशेषतः कुमारांच्या अभिनव गायकीचा मालिनीबाईंवर अतिशय प्रभाव होता. ‘कुमारांची प्रत्येक मैफल हा माझ्यासाठी अभ्यासवर्ग होता’ असं त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर कुमारांचे साथीदार वसंतराव आचरेकर (तबला) आणि गोविंदराव पटवर्धन (हार्मोनियम) हेच त्यांनी स्वतःसाठी निवडले होते. पुढे सुभाष कामत आणि अरविंद थत्ते यांच्याशीही त्यांचे सूर जुळले. एका जुन्या लेखामध्ये मालिनीबाईंनी गंगूबाई हनगलांच्या आवाजाचाही आपल्यावर प्रभाव असल्याचं लिहिल्याचं आठवतं. निरनिराळ्या गुरूंकडून प्रत्यक्ष तालमीतून सिद्ध झालेली मूळ ग्वाल्हेरची बैठक, कुमारांच्या गाण्याचा प्रभाव व अभ्यास, गंगूबाईंच्या आवाजाचं आकर्षण आणि या सगळ्यामागे व्यापून असलेलं गणित विषयाचं प्रेम या पार्श्वभूमीवर मालिनीबाईंचं गाणं ऐकलं पाहिजे.

सुरेलपणा, सहजता, चपळता, स्पष्ट शब्दोच्चार ही आवाजाची सर्व वैशिष्ट्यं त्यांना अनुकूल होती. ढाला पण मोकळा, आक्रमक पण पारदर्शक असा त्यांचा स्वर होता. ग्वाल्हेर गायकीतली गमक, टप्पा ही अंगं त्यांच्या गाण्यात त्यांनी स्वतःच्या वेगळेपणासह आणली होती; ग्वाल्हेरच्या पारंपरिक वैशिष्ट्यपूर्ण रचनांचा साठा होता; शिवाय ख्यालामध्ये मध्यलयीतल्या स्वरविस्तारावर कुमारांच्या मांडणीचा, लगावांचा काही असर होता. द्रुत मांडणीत लयीचं प्रेम अधिक होतं. ग्वाल्हेरच्या पारंपरिक व अन्य समकालीन रचनाकारांच्याही नव्या अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना त्यांच्या रेकॉर्ड्समधून लोकप्रिय झाल्या. भूपाल तोडी, मारू बिहाग, चक्रधर, बसंत मुखारी, धानी, सालगवराळी अशा काही रागांतली त्यांची मांडणी लक्षणीय आहे. अहिर भैरव, बिलासखानी तोडी, जौनपुरी, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग, श्री हे त्यांचे आवडते राग होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, रेंगाळणारं संथ गाणं त्यांना आवडत नव्हतं. एवढंच नव्हे तर इतरही अनेक समकालीन गायिकांप्रमाणे त्यांचे सर्व गुरु पुरुष गायक होते. त्यामुळे त्यांच्या तालमीतून मिळालेल्यापैकी स्वतःच्या आवाजात खुलून दिसतील अशीच वैशिष्ट्यं त्यांनी आपल्या गाण्यामध्ये स्वीकारली आणि आक्रमक वाटणाऱ्या गाण्यातही प्रयत्नपूर्वक गोडवा टिकवला.

त्यांच्या आवाजातील शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गानप्रकारांचं पुष्कळ ध्वनीमुद्रण आज उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त चित्रपटसंगीत, भावगीत याकडे त्या वळल्या नाहीत. नाही म्हणायला संजय लीला भन्साळी या दिग्दर्शकाने ‘सोहनी’तल्या ‘काहे अब तुम आये हो’च्या त्यांच्या ध्वनीमुद्रणाचा ‘बाजीराव मस्तानी’ या अलीकडील चित्रपटात एका प्रसंगात पार्श्वसंगीतासाठी उपयोग करून घेतल्यामुळे त्यांचा ‘बॉलीवूड’शी अत्यल्प संबंध आला. 2016 मध्ये वसंतराव गेल्यानंतर त्यांचा एकंदर सामाजिक वावर कमी झालेला होता. पण तरीही आमच्या पिढीसाठी अशा बुजुर्गांच्या केवळ असण्याचाही आधार असतो. त्यांनी अनुसरलेल्या मूल्यांच्या प्रकाशात आपल्या वाटा तपासून घेता येतात. स्वतःच्या गाण्यामध्ये शुद्धता आणि सौंदर्य कसं टिकवायचं ते उमगतं. मालिनीबाईंच्या जाण्याने होणारं खरं नुकसान ते आहे. 

वयाच्या एका टप्प्यावर संगीतसाधन हा अवघड वसा मालिनीबाईंनी आनंदाने स्वीकारला होता; आता त्यांना निरोप देताना मनात येतं, घेतला वसा त्यांनी टाकला नाही!

- सुहास पाटील
suhas.horizon@gmail.com 
(लेखक, साधना साप्ताहिकाच्या डिजिटल विभागामध्ये सहसंपादक आहेत.)


मालिनीबाईंच्या 2015 मध्ये झालेल्या एका मैफिलीचा दीड तासाचा व्हिडीओ
(यात त्यांनी बागेश्रीकंस रागात 'तुम बिन नाही' हा विलंबित व 'नैनन नींद' हा द्रुत ख्याल ऐकवला आहे. त्यानंतर खमाज रागात 'चाल पहचानी' हा टप्पा व त्याला जोडून एक तराणा व शेवटी 'साधले नर षड्ज अपना' ही भैरवी ऐकवली आहे.)

Tags: Hindustani Classical Music Malini Rajurkar Kumar Gandhrva Obituary स्मृतीलेख मृत्युलेख संगीत शास्त्रीय संगीत रागसंगीत ग्वाल्हेर घराणे Load More Tags

Comments:

Uday Payelkar

मालिनी ताई विषयी समग्र माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

Heena

आवडला लेख.

संगीता बापट

मालिनीबाईंची सर्व वैशिष्ट्य उलगडणारा सुंदर लेख

Atul Phanse

वरील मालकौन्स व टप्पा -ओ मिया वे जानेवाले हे आमच्याकडील, माझ्या वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथी कार्यक्रमातील रेकॉर्डिंग आहे याची नोंद घ्यावी. धन्यवाद.

Deepali Awkale

A well-studied and well conveyed article, even for layman readers who don't deeply belong to classical world. Thankyou for writing it. Best wishes.

Add Comment