नटसम्राट साकारणारे डॉ. लागू

पहिला प्रयोग पाहताना मी सर्वस्वाने प्रेक्षकाच्या भूमिकेत विलीन झालो होतो..

Photo Courtesy: divyamarathi.bhaskar.com

1 मे 1998 रोजी डॉ नरेंद्र दाभोलकर साधना साप्ताहिकाचे संपादक झाले, तेव्हा साधनाच्या पहिल्याच दिवाळी अंकात त्यांनी डॉ लागू यांच्यावर दोन लेख प्रसिद्ध केले होते. एक निळू फुले यांचा आणि दुसरा  वि. वा. शिरवाडकर यांचा. डॉ. श्रीराम लागू अनेक पुरस्कारांनी सन्मानित उत्तुंग व्यक्तिमत्व. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी त्यांच्यावर लिहिण्याचे कबूल केले, हे समजताच त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रियाही- 'आयुष्यात अनेक सन्मान लाभले, पण तात्यासाहेबांनी माझ्यावर लिहिणे हा सर्वोच्च पुरस्कार', अशीच केली होती. असा हा समसमां संयोग. 


मुंबईतील साहित्यसंघाच्या रंगमंचावर कोठल्या तरी नाटकाची तालीम व्हायची होती. मी जवळपास कोणाशी तरी बोलत उभा होतो। तालीम सुरू व्हायला अवकाश असल्यामुळे मंचावर जमलेली कलाकार मंडळी गप्पा मारीत बसली होती. कोठला तरी वाद तिरिमिरीनं चालला होता.चारपाच स्वर परस्परांवर आघात - प्रत्याघात करीत होते. तेवढ्यात शंकर घाणेकरांचा सरळ रेषेत जाणारा खरखरीत आवाज माझ्या कानावर आला. सर्व आवाजांवर मात करणारच नव्हे तर ते बंद करणारा समारोप करणारा. आदेश देणारा. घाणेकर म्हणाले, "बस्स झालं- वाद कशाला हवाय? आमचे नटसम्राट नानासाहेब. तुमचे नटसम्राट डॉक्टर लागू. आता चर्चा बंद!"

नटसम्राट! काळ्या पडद्यावर रुपेरी अक्षरं झगमगत प्रगट व्हावीत तसा तो शब्द माझ्यासमोर प्रगट झाला होता.त्या वादात मला रस नव्हता पण त्या नटाच्या जीवनावर एक नाटक मी तेव्हा लिहीत होतो. त्या नाटकाला अत्यंत समर्पक असं नाव मला सापडलं होतं. नटसम्राट.

नाटकाला नाव देताना माझा नेहमीच गोंधळ होत असे. बहुदा लेखन पूर्ण झाल्यावर नावाचा विचार होई. चारपाच नावं समोर येत आणि कित्येकदा पुढे पश्चाताप व्हावा अशा नावाचीच नेमकी निवड व्हायची. लेखन पूर्ण होण्याच्या आधीच योग्य नाव सापडलं ते याच नाटकासाठी. पुढे नाटक लिहून पूर्ण झालं. रंगभूमीवरही आलं. पण ज्यांच्यापासून या नाट्यलेखनाला  प्रेरणा मिळाली होती ते 'आमचे'   नटसम्राट त्यात नव्हते, 'तुमचे' नटसम्राट त्यात प्रमुख भूमिकेत अवतरले होते. डॉ. श्रीराम लागू.

डॉक्टरांचा औपचारिक परिचय अनेक वर्षांपूर्वी पी. डी. ए. च्या नाटकांच्या निमित्तानं झाला होता. आतापर्यंत त्या परिचयाचं रूपांतर अनौपचारिक मैत्रीत झालं होतं. वसंतरावकानेटकरांचा त्यांचा स्नेहबंध पूर्वीपासूनचा. आता त्यात मीही प्रविष्ट झालो होतो. नाटकाच्या किंवा चित्रीकरणाच्या निमित्ताने ते नाशिकला येत. आले म्हणजे, गप्पागोष्टी, चर्चा, वाद इत्यादींच्या दीर्घकालीन मैफिली झडायच्या. आफ्रिकेतून परत आल्यावर त्यांनी वैद्यकीय व्यवसायाला फारकत देऊन निर्धारानं नाट्य व्यवसायात प्रवेश केला होता. रंगभूमीवर एक चांगले कलावंत म्हणून त्यांना यश मिळत होतं, पण बहुजन समाजात त्यांना लोकप्रियता मिळाली ती पिंजरादि चित्रपटांतील भूमिकांमुळे. पुढे मराठीतून ते हिंदीत गेले आणि त्यातही त्यांनी सन्मानाचं स्थान संपादन केलं. 

डॉक्टरांचं घरी येणं-जाणं ही वस्तीतल्या लोकांना उत्तेजित करणारी घटना होऊ लागली. पण स्वतः डॉक्टर या लौकिकाबाबत अतिशय तठस्थ होते. त्या क्षेत्रातील आपलं मोठेपण त्यांनी राखीसारखं मनगटावर कधीच मिरवलं नाही. नाट्यकला गी त्यांच्या दृष्टीनं एक गंभीर साधना होती. टाळ्या मिळविण्याचं साधन नव्हतं. आमच्या बैठकीतही त्यांची भूमिका नटाची नसे, तर विचारवंताची आणि अभ्यासकाची असे. 

त्यांचं वाचन दांडगं आणि काही मतंही दांडगी. विचारशक्तीवर कोठल्याही संकेताचे वा पारंपरिकतेचे लेप सहसा कधी चढवलेले नसत. त्यामुळे अनेक धक्कादायक मतं ते सहजतेनं आणि निःसंदेहतेनं मांडत. एक प्रसंग मला आठवतो- वर्षाकाळात केवळ पाऊस अंगावर घेण्यासाठी आम्ही सात-आठ स्नेही जव्हारकडे जात असू. या पर्जन्ययात्रेत एकदा डॉक्टर सामील झाले आणि भरपूर भिजलेही. रात्री अकरा बाराच्या सुमारास पावसात आणि अंधारात कोठून कोठे जात असता, वसंतराव आणि डॉक्टर लागू यांच्यात एक वाद अकस्मात पेटला. आमच्या मंडळात एक स्थापत्यविशारद आणि दोन-तीन धन्वंतरी होते. चिखलातून रस्ता काढील आणि जीवजीवाणूंची चाहूल घेत आम्ही पुढे चाललो होतो. तेवढ्यात मागून किंचित चढलेले आवाज आणि कोस्लर, रसेल, सार्त अशा महान प्रज्ञावंतांची नावं कानावर आली. वाद बराच रंगला होता आणि अधिकाधिक उच्च पातळीवर चढत होता. तेवढ्यात एक मोठं डबकं वाटेत आल्यानं तो थांबला. मतं होती, मतभेद होते, चर्चा होत्या. आणि या सर्वांच्या पाठीशी एक निर्मळ, सुखदुःखात सहभागी होणारा मित्रभाव होता.

नाटक लिहून पूर्ण झालं आणि ते गोवा हिंदुकडे प्रयोगासाठी गेलं. नाटक करण्यासारखं आहे, पण चालण्यासारखं आहे की नाही, यासंबंधी सारेच साशंक होते. मीही साशंकच होतो. याच नाटकाच्या रौप्यमहोत्सवात बहुधा, मी म्हटलं होतं- माझ्या नाटकांना चालण्यापेक्षा बसण्याची सवय अधिक आहे. प्रेक्षलयांपेक्षा ग्रंथालयांकडेच त्यांचा ओढा अधिक असतो. म्हणून अनासक्त भावाने आणि 'गाजराची पुंगी' न्यायानं मी ते माझ्या मित्राच्या, रामकृष्ण नाईकांच्या स्वाधीन केलं. 

नाटक विशिष्ट प्रसंगी सादर करायचं असल्यानं निर्मितीची जमवाजमव सुरू झाली होती. त्या बाबतीत मी फारसं लक्ष घालीत नसे. पण या नाटकातील प्रमुख भूमिका डॉक्टरांनी करावी असं माझं मतच नव्हे, तर आग्रह होता. वसंतरावांचाही मला पाठिंबा होता. आमच्या आग्रहामुळे दुसऱ्या कलावंताकडे गेलेली वही डॉ. लागूंकडे पाठवण्यात आली. तरी साशंकता सर्वत्र होतीच. कीर्तीच्या शिखरावर असलेले डॉक्टर ही भूमिका स्वीकारतील की नाही, स्वीकारली तरी जरूर तेवढ्या तारखा देतील की नाही, तारखा दिल्या तरी व्यवहारात जमेल की नाही, अशा अनेक शंका होत्या. मला त्या नव्हत्या, ते माझे मित्र होते म्हणून नव्हे, तर नाटकांबाबत व्यवहाराच्या पलीकडे जाणारा, त्यांचा ध्येयवाद मला माहीत होता म्हणून. 

काही तरी नवीन, वेगळ्या, अपारंपरिक संहितेच्या शोधात ते नेहमी असत. हे नाटक प्रायोगिक नव्हतं, पण प्रयोगिकतेकडे झुकणारं होतं. विशेषतः नाटकाच्या प्रारंभीच चारपाच पानं पसरलेलं लंबंचौडं भाषण. हा एक साहसी प्रयोगच होता आणि त्याला प्रेक्षकांकडून टाळ्यांऐवजी शिट्यांचा आणि खोकल्याचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या संकटाला तोंड देण्याची कुवत डॉक्टरांमध्येच होती. कोठल्याही व्यवसायनिष्ठ नटानं ते आव्हान स्वीकारलं नसतं. डॉक्टरांनी नाटक वाचलं. त्यांना ते आवडलं. आनंदानं आणि उत्साहानं त्यांनी ते काम स्वीकारलं. कावेरीच्या भूमिकेसाठी शांता जोग या गुणवान अभिनेत्रीची निवड आधी झालेलीच होती. दिग्दर्शनाची जबाबदारी तेव्हा आघाडीवर असलेल्या पुरुषोत्तम दारव्हेकरांकडे सोपविण्यात आली होती. नाशिकचे बाबुराव सावंत विठोबाची भूमिका करणार होते, बाकी पात्रयोजना मला माहीत नव्हती. तालमींना वारंवार हजर राहणं मला जमणारं नव्हतं. आणि तशी गरजही वाटत नव्हती. फार तर दोनतीनदा डोकवलो होतो. एका दृष्टीनं ते बरंच होतं. इतर प्रेक्षकांप्रमाणेच प्रयोगापुरतं माझं मन कोरंच होतं.

'नटसम्राट'चा पहिला प्रयोग मुंबईच्या बिर्ला नाट्यगृहात झाला. रंगमंचावरील पूजाअर्चादि विधी आटोपल्यावर मी प्रेक्षकांमध्ये जाऊन बसलो. तिसरी घंटा खणखणली. पडदा वर गेला आणि अंधुक प्रकाशात एका खुर्चीवर अर्धवट निद्रिस्त असलेल्या डॉक्टरांचं दर्शन झालं. हे डॉक्टर श्रीराम लागू आहेत, मी नाटकाचा लेखक आहे, भोवताली नाटकाची परीक्षा घेणारे प्रेक्षक आहेत, इत्यादी विचारांच्या लाटा-लहरी मनात अपरिहार्यपणे कल्लोळत होत्या. पण हे सारं पहिली दहाबारा मिनिटंच.

सारे कल्लोळ ओसरले आणि मी सर्वस्वानं प्रेक्षकाच्या भूमिकेत विलीन झालो. उच्च कोटीतील अभिनयाचा अपूर्व अनुभव मी घेत होतो. मी लेखक आहे हे मी विसरलो, डॉक्टर लागू काम करीत आहेत हेही विसरलो. भोवतालचे प्रेक्षकही माझ्या जाणिवेतून अंतर्धान पावले.
गंधर्वकाळातील एका वृद्ध नटाचा जीवनपट आपल्यासमोर उलगडत आहे एवढंच जाणवत होतं. गणपतराव बेलवलकरानं माझ्यासह सर्व नाट्यगृह आपल्या कब्जात घेतलं होतं. रंगमंचावरील पाच दिव्यांचं कुंपण ओलांडून त्याची सुखदु:खं सार्‍या नाट्यगृहात धुक्यासारखी पसरत होती.

हा सर्व प्रभाव होता डॉक्टरांच्या अभिनयसामार्थ्याचा. कलेचा परमोत्कर्ष कलेच्या विलोपनातच होतो हे सुभाषित येथे सार्थ झालं होतं. प्रारंभीच्या ज्या लांबलचक भाषणांबद्दल मला, आम्हा सर्वांनाच धास्ती वाटत होती. ती तर अभिजात संगीताच्या मैफलीसारखी गुंजारवत होती. भरतमुनीनं नाट्यशास्त्राला पाचवा वेद म्हटलं आहे. त्याचा आधुनिक अर्थ हा की या कलाप्रकाराच्या प्रांतात साधकांनी गांभीर्यानं, एकाग्रतेनं आणि पूर्वतयारीनं प्रवेश केला पाहिजे. वेदोच्चारातील पावित्र्य म्हणजेच शिस्त सांभाळली पाहिजे हे सर्व डॉक्टर मानतात आणि कोणत्याही भूमिकेचा, सर्व नाटकाचा आंगिक आणि वाचिक अभिनयाच्या दृष्टीनं एक नकाशा प्रयोगासाठी सिद्ध करतात. 

नाट्यकलावंताचं काम इकडचे शब्द व कथासूत्र तिकडे पोचविणं हेच नसतं, तर ‘ये हृदयींचे ते हृदयी घातले’ ही त्याची प्रतिज्ञा असते. तो वाहतूक करीत नाही तर एक नवनिर्मिती करीत असतो. संहितेच्या गर्भात असलेल्या अप्रत्यक्षतेला तो प्रत्यक्षता देतो, एक अभिनव वास्तव रंगमंचावर उभे करतो. हीच भूमिका डॉक्टरांची आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या आंगिक वाचिक अभिनयाची तपार्जित आयुधं त्यांच्याजवळ आहेतच, पण एक दैवार्जित आयुष्यही आहे. आणि ते म्हणजे स्वराचं. 

नानासाहेबांसारख्या श्रेष्ठींच्या आवाजापेक्षा त्यांच्या आवाजाची जात अगदी भिन्न आहे. तो घुमत नाही. फार चढत नाही, वा फार उतरत नाही. तीन सप्तकांत सहजतेनं साधणारे आरोहावराह ही नानासाहेबांच्या स्वराची खासियत तर डॉक्टरांचा स्वर सामवेदाच्या गायनाप्रमाणे तीनच स्वरांतील कोमल, तीव्र, अतितीव्र अशा चढउतारांचा कुशलतेनं आविष्कार करणारा कोमल पट्टीत तो अस्पष्ट होत नाही. पट्टीत कर्कश होत नाही. या स्वरसाधनेचं प्रभावी दर्शन प्रयोगात होत होतं. नाटक कलेकलेनं पुढे सरकत होतं आणि डॉक्टरांचं अभिनयसामर्थ्यही. वात्सल्य, विनोद, कारुण्या, क्रोध, अगतिकता-सारे रसविशेष मूर्त रूपात समोर वावरत होते. तितकीच प्रभावी साथ होती कावेरीचीही.

‘असं असतं नाटक राजा’ या भरतवाक्यानंतर पडदा पडला आणि अडीच तीन तास कब्जा घेणार्‍या एका दत्तक भावबंधनातून मुक्त झाल्यासारखं वाटलं. हे आपलं नाटक आहे आणि ते या प्रतिभाशाली कलावंतानं किती तरी उंचीवर नेऊन ठेवलं याची जाणीव झाली. शंकर घाणेकरांचं बोलणं आठवलं. तुमचा नटसम्राट आता आमचा नटसम्राट झाला होता. किंबहुना तुमचा आणि आमचा यांतील सीमारेषाच डॉक्टरांनी पुसून टाकली होती.

- वि. वा. शिरवाडकर 
(साप्ताहिक साधना, दिवाळी अंक 1998)

हे ही वाचा 

डॉ. श्रीराम लागू: लयबद्ध माणूस, लयबद्ध अभिनेता- निळू फुले 

निळू फुले: अभिजात कलावंत, लोभस व्यक्तिमत्व - डॉ. श्रीराम लागू

Tags: Kusumagraj Vi Va Shirwadkar Sadhana Archive श्रीराम लागू वि वा शिरवाडकर कुसुमाग्रज नटसम्राट Load More Tags

Comments: Show All Comments

संजीव मनोहर वाडीकर

वंदनीय तात्यासाहेबांच्या अक्षर वाङमयाला आपल्या अफाट अभिनयाने जिवंत करणारे डॉ. लागू .. दोघांनाही अभिवादन.

मंजिरी देशमुख

अशा भारदस्त व बहुगुणी नटसम्राटाला मानाचा सलाम!!

Dr D.A.Desai

" काळाच्या पडद्यालाही अमर करणारा नटसम्राट "

प्रकाश य. भगत

दोन्हीही नटसम्राटानी एकाने मराठी साहित्याला व दुसऱ्याने मराठी नाटकाला उचीवर नेऊन ठेवले.

विजयकुमार पांडुरंग फडके

ज्यांनी हेनाटकवाचल आणि पाहिल त्यानीसह्याद्रिच्या शिखरावरून हिमालयाचे दर्शन केल्यासारखे आहे. अप्रतीम.

प्रकाश कुलकर्णी

अप्रतिम.

लतिका जाधव

अप्रतिम!

sanjay bagal

अप्रतिम लेखन

G D Parekh

Mejavanich

Add Comment