कोरोनानंतरचे जग आणि व्यक्तिवादाचे भवितव्य

आपण वेळीच सावध झालो नाही, तर ही महामारी व्यक्तिवादाच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरू शकते.

फोटो सौजन्य: timesofindia.indiatimes.com

व्यक्तिवाद हा पश्चिमेत ज्ञानोदयाच्या कालखंडामधूनच निर्माण झाला. व्यक्तीची प्रतिष्ठा तो मान्य करतो आणि व्यक्तीच्या निवडीला राज्यसंस्था किंवा समाजगट यांच्या आधी प्राधान्य दिलं जातं. यातूनच 'लेझेस फेअर भांडवलशाही' (laissez faire capitalism) जन्माला आली; ज्याच्यानुसार प्रत्येक जण मुक्त बाजाराचा 'कर्ता' असतो.

पश्चिमी धाटणीचा व्यक्तिवाद दुसऱ्या जागतिक महायुद्धापासूनच ऐन बहरात आला. युरोपचा बहुतांश भाग पोलादी पडद्यामध्ये असताना (iron curtain) आणि चीनदेखील व्यापारपूर्व मानसिकतेत असताना संपूर्ण वर्चस्व अमेरिकेकडे होते. आणि अमेरिका व्यक्तिवादातील, रानटीपणा व संस्कृती यांच्या 'सरहद्दीवरील व्यक्ती'च्या कल्पनेसाठी (frontiersman idea) युद्धमालिकांची (bull run) निश्चिती करत होती. तगडी, अभिमानी व्यक्ती त्याच्या केंद्रभागी होती. त्याच्या मुक्त आकांक्षांभोवती प्रगतीचे धागे विणले जात होते.

त्याच दरम्यान आणखी एक प्रकारचा व्यक्तिवाद प्रचलित होता. महात्मा गांधी आणि त्यांचे मार्गदर्शक यांच्या श्रध्दांवर तो आधारलेला होता. या व्यक्तिवादाची मुळं आध्यात्मिकतेत होती. गांधींनी हे ओळखलं होतं की, पाश्चिमात्य पद्धतीच्या व्यक्तिवादाची परिणीती निव्वळ जडवादात होऊ शकते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक व्यक्तीकडे केवळ वैयक्तिक इच्छांची पूर्तता करणारा म्हणून नव्हे तर स्वायत्त आणि नैतिक अशा कर्त्याच्या स्वरूपात पाहिले. व्यक्तीचे पवित्र मानवी हक्क त्यांनी सामाजिक प्रगतीच्या हृदयस्थानी ठेवले. समाजातील शेवटच्या, सर्वाधिक असुरक्षित व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून राज्य संस्था आणि समाज त्यांचे धर्मपालन करू शकतील असे अभिप्रेत होते.

व्यक्तिवादाच्या पहिल्या कल्पनेने तीन शतके नव्या गोष्टींना जोरदार चालना दिली. उद्योजक, सर्जनशील कलावंत, समाजधुरीण यांनी नव्या कल्पना, उत्पादने आणि सेवांसाठी जागतिक पातळीवर एक अवकाश तयार केला. यामुळे त्या आधीपेक्षा कितीतरी अधिक व्यक्तींसाठी अधिक भौतिक संपन्नता निर्माण झाली.

दुसऱ्या कल्पनेने, राज्यसंस्था आणि तसेच स्वास्थ्य व आश्रय यांबाबतीतील समाजाची मदत यांना निरनिराळ्या उपेक्षित व्यक्तीसमुहांपर्यंत पोचवले. प्रत्येक व्यक्तीला त्याची प्रतिष्ठा आणि जोखीम पत्करण्याची क्षमता यांचा सन्मान ठेवून सामाजिक सुरक्षाकवचात ठेवण्याचा हा - पूर्णांशाने प्रत्यक्षात न येऊ शकलेला - एक भव्य प्रयोग होता. 

साधारणतः गेल्या दशकभरापासून मात्र व्यक्तिवाद आणि व्यक्तिवादाचे श्रेष्ठत्व गंभीररित्या धोक्यात आले आहे.

याची मुख्यत्त्वेकरून तीन कारणे आहेत - पहिले कारण म्हणजे, दहशतवाद आणि त्याचबरोबरीने, आर्थिक पडझड. 9/11 प्रकरण झाले, तेव्हा एका रात्रीत सर्वकाही बदलले, व्यक्तीच्या कर्तेपणाला (individual agency) त्याने सर्वात मोठा धक्का दिला. सामाजिक सुरक्षेच्या आश्वासनाच्या बदल्यात, व्यक्तिवाद आणि उदारमतवादाचा बालेकिल्ला असणाऱ्या अमेरिकेलाही, प्राणपणाने जपलेल्या अनेक स्वातंत्र्यांचा आणि व्यक्तिगत गोपनियतेच्या हक्काचा त्याग करावा लागला. त्यानंतर 2008 साली आर्थिक अरिष्ट कोसळले. परिणामस्वरूप, त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर जागतिकीकरणानंतरच्या जगात आपण प्रवेश केला. त्याचवेळी एकाधिकारशाहीचा उदय होऊन, तिने राज्यसंस्था बळकट केली होती.

अनेक देशांमधील स्वप्नवत देशभक्ती - ज्यामध्ये प्रत्येकाचे देशप्रेम प्रामाणिक टीकेच्या स्वरूपात व्यक्त होणे शक्य होते - तिचे रूपांतर 'my country, right or wrong' याप्रकारच्या टोकाच्या राष्ट्रवादात झाले. विरोधी भूमिकेला स्थान उरले नाही. आणि यामुळे स्वायत्त व्यक्ती राजकीय सत्तेपासून फारच दूर ढकलली गेली.

दुसरे कारण म्हणजे, 'इंटरनेट जायंट्स'चा उदय आणि  त्यांना मोठ्या संख्येने उपलब्ध असणारे सोशल प्लॅटफॉर्म्स. सुरुवातीच्या काळात हे सर्व व्यक्तीच्या मुक्त असण्याला जे महत्त्व असते, त्याचे रक्षण करणाऱ्या तटबंदीप्रमाणे वाटत होते. कुठल्याही काळी, कुठल्याही ठिकाणी आणि कुठल्याही बाबतीत ग्राहक हाच राजा होता. एकेकाळचा नोकरदार आता इतरांना नोकरी देऊ करणारा उद्योजक झाला. शहरवासी म्हणजे सिटीझन्स आता नेटिझन्स किंवा 'नेट'वासी झाले. जगभरातून त्यांची मतं व्यक्त करू लागले. 

दुर्दैवाने 'निवड करण्याचा व्यक्तीचा हक्क' हे मोहजाल ठरले; मंदपणे लुकलुकणारे ते मृगजळच होते. आपल्यावर पाळत ठेवू शकणाऱ्या भांडवलशाहीची भीती आज आपणा सर्वांना वाटते आहे, तिची ती सुरवात होती. ज्या भांडवलशाहीत कंत्राटी कामगारांकडून प्रमाणापेक्षा अधिक काम करून घेतले जाते आणि त्याचा मोबदला मात्र कमी दिला जातो; जिथे ग्राहक हा एखाद्या माहितीप्रमाणे असतो आणि त्याची 'मुक्त इच्छा' ही आर्टीफिशल इंटेलिजन्सने नियंत्रित केली जाऊ शकते. याच तंत्रज्ञानाद्वारे व्यक्तीचा हक्क आणि गोपनियतेचा हक्क यांचा संकोच करत, त्यांच्यावर पाळत ठेवणेही भयावह गतीने शक्य झाले आहे. प्रत्येकाचा मताधिकार - जी निवडणुकांधारीत लोकशाहीने व्यक्तीला दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहे, तीदेखील आता नियंत्रित करण्याजोगी गोष्ट बनली आहे.

तिसरे कारण म्हणजे, जग हे अधिकच परस्परावलंबी झाले आहे. वातावरण बदल व वायू प्रदूषण यांना सीमा माहीत नाहीत; आणि प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे विषाणू प्रभावी होण्यालाही (Antibiotics Resistance) मर्यादा राहिलेल्या नाहीत. आफ्रिकेतील विषाणू अमेरिकेतील लोकांना आजारी पाडू शकतात. इंडोनेशियातील जंगलांचे दहन आशियामध्ये श्वासोच्छवासाला अडथळा आणू शकते.

आता जर आपण सावध झालो नाही, तर मात्र ही महामारी व्यक्तिवादाच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरू शकते. तिने आपल्याला ताबडतोब आपले व्यक्तिगत विशेषाधिकार त्यागून राज्यसंस्थेच्या किंवा नजिकच्या समूहाच्या - आपल्या सदनिका, आपले गाव अथवा शहर यांच्या - हुकूमनाम्यांनुसार तात्काळ वर्तन करण्यास भाग पाडले आहे. आणि आपले स्वातंत्र्य हेतुपुरस्सर वापरण्याने निर्माण होऊ शकणारा धोका जाणून आपणही आपल्या स्वातंत्र्याचा त्याग करण्यासाठी राजीखुषीने तयार झालो आहोत. आपल्या कृती इतरांवर किती परिणाम करू शकतात याची जाणीव झाल्यानंतर व्यक्तिवादाच्या 'सरहद्दीवरील व्यक्ती' (Frontiersman) या कल्पनेचा फोलपणा उघड झाला आहे. 

व्यक्तिवादाचे सकारात्मक पैलू गमावण्याविषयी मात्र आपण सावध असले पाहिजे. एखाद्या व्यापक स्वरूपाशी किंवा कायद्यातील नियमांशी बांधिलकी न मानणाऱ्या समूहाकडून आपली स्वतंत्र ओळख बळाने गिळंकृत केली जाणार नाही, याविषयी आपण दक्ष असले पाहिजे. सरकारचे नियम पाळणे ही एक गोष्ट आहेच, परंतु कुठूनतरी उकरून काढलेल्या अवास्तव, व विशेषतः 'इतरांच्या' भीतीला बळी न पडणे हेदेखील महत्त्वाचे आहे. आधीच आपण झुंडशाही आणि झुंडीच्या नियमांच्या उदयाचे साक्षीदार आहोत. घाबरलेले गावकरी बाहेरून गावात येणाऱ्या प्रत्येकालाच अडवत आहेत; डॉक्टरांना शहरांतील त्यांच्या घरी परतण्यास अटकाव होतो आहे; कशाचीही तमा न बाळगता पोलीस लाठी चालवत आहेत. 

महामारीवरील या प्रतिक्रिया नजीकच्या भविष्यकाळात सकारात्मक व्यक्तिवादाचा शेवट घडवून आणू शकतात. व्यक्तिचे कर्तेपण आणि समूहाचे हित यांच्यातील संतुलन समाजाने तात्काळ आणि सर्जनशीलपणे पुन्हा साधले पाहिजे. कुठलीही व्यक्ती बेटावर राहणारी असत नाही, परंतु प्रत्येकाचे आंतरिक स्वभावमूल्य आपण दडपायला नको. सर्व चांगल्या समाजांचा तो पाया आहे.

(अनुवाद : सुहास पाटील)

- रोहिणी नीलेकणी
(हा लेख 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी दैनिकात 03 एप्रिल, 2020 रोजी प्रकाशित झालेला आहे.)

Tags: कोरोना व्यक्तिवाद अनुवाद Load More Tags

Comments:

Sanjay n bagal

दूरदृष्टी व संभाव्य धोका यांची सांगड

Add Comment