कबिनीतल्या ब्लॅक पँथरचं दर्शन

वन्यजीवनाशी असलेले आपले आंतरिक संबंध कसे आहेत, याचा धडाच कोविड-19 या वैश्विक महामारीनं दिला आहे.

फोटो सौजन्य: Shaaz Jung | Twitter

ब्लॅक पॅंथरचं दर्शन मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी आनंदात भर घालणारा तो क्षण म्हणजे माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.

जगप्रसिद्ध ब्लॅक पँथर (ज्याला स्थानिक भाषेत ब्लॅकी किंवा कारिया म्हटलं जातं) या दुर्मीळ प्राण्याला पाहण्यासाठी मी वर्षानुवर्षं कर्नाटकच्या कबिनी जंगलात एखाद्या तीर्थयात्र्याप्रमाणे वाऱ्या करते आहे. गेल्या वर्षी कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात सुदैवानं काही आठवडे मी जंगलात राहिले पण त्या वेळी मला ब्लॅक पॅंथरचं ओझरतंसुद्धा दर्शन झालं नाही.

13 डिसेंबर 2020 रोजी बंगळुरूमधल्या साहित्य संमेलनात एक चर्चासत्र पार पडलं… ‘रोमॅन्सिंग द ब्लॅक पॅंथर’ असं शीर्षक असलेल्या त्या कार्यक्रमात माझ्या ब्लॅक पॅंथर प्रेमाबद्दल मी भरभरून बोलले आणि माझं नशीब इतकं थोर की, या चर्चासत्रानंतर बरोबर पाच दिवसांनी मला कारियाचं दर्शन घडलं.

जंगलात तो एका झाडावर लपून बसला होता. आमच्या जीपपासून 30 फूट अंतरावर आणि जमिनीपासून 30 फूट उंचीवर. मानवी नजरेच्या टप्प्यापासून थोडा दूर पण त्याच्याकडे रोखलेल्या कॅमेर्‍याच्या लेन्सच्या अगदी चपखल टप्प्यात होता तो.  

ते दृश्य पाहिल्यानंतर... तुझ्यासाठी तो क्षण कसा होता असं मला अनेकांनी विचारलं. खरंतर माझी भावना शब्दांत व्यक्त करणं तसं अवघड आहे. माझं भानच हरपलं होतं. जेव्हा मी दुर्बिणीमधून त्या काळ्या आकृतीकडे पाहिलं तेव्हा डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंनी दुर्बिणीच्या लेन्सेस डबडबल्या होत्या. 

ब्लॅकीला (कारिया) पाहून मला आनंदाश्रू अनावर झाले आहेत आणि आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहताहेत हे माझ्या लक्षात आलं. मग मी त्यांच्याकडे वळत दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला. मी आकाशाकडे पाहत, ‘त्याला’ही धन्यवाद दिले. मला या क्षणाच्या अनुभूतीपर्यंत घेऊन येणाऱ्या वाइल्डलाईफ फिल्ममेकर संदेश कडूरचे आणि माझ्या इतर हितचिंतकांचेही मनोमन आभार मानले. माझ्या प्रिय जंगलाचेही आभार मानले. ब्लॅक पॅंथरला धन्यवाद देणं तर क्रमप्राप्तच होतं. आता कारिया आमच्याकडे रोखून पाहत होता. तो क्षण माझ्यासाठी अत्युच्च आनंदाचा क्षण होता.

ब्लॅक पँथरला पाहण्यासाठीच्या माझ्या दीर्घकालीन शोधानं मला संयम आणि विनम्रता या दोन गोष्टी शिकवल्या त्यामुळेच जंगल आणि मानवजातीचं भविष्य यांच्यातील जटिल संबंधांबाबतचं माझं आकलन समृद्ध झालं. भारतातल्या संपन्न जैवविविधतेचं जतन करण्यासाठी काही काम करण्याचा माझा संकल्प मी पक्का केला.

मी स्वतःला फार भाग्यवान समजते की, त्या दिवशी काही वेळासाठी का होईना मला ब्लॅक पॅंथरचं दर्शन झालं. त्यानंतर मी पुन्हापुन्हा कबिनीला येत राहिले आणि कारियाही पुन्हापुन्हा दर्शन देत राहिला.

त्यानंतर 6 मार्चला आम्ही पुन्हा एक अविस्मरणीय अनुभव घेतला. त्या दिवशी आम्हाला कारिया आणि त्याचा दीर्घकालीन प्रतिस्पर्धी बिबट्या यांच्यातली झटापट पाहायला मिळाली. हा तोच बिबट्या होता ज्याला वाइल्डलाईफ फिल्ममेकर शाझ जंग ‘स्कारफेस’ असं म्हणतो. 

...तर कारियानं या बिबट्याला खुल्या मैदानात आव्हान द्यायचं ठरवलं होतं. कबिनीच्या त्या झडून गेलेल्या जंगलात (पानगळीच्या मौसमात) तो सागाच्या एका उंच झाडावर बसला होता. 

त्या झाडाची सावली आसपास पसरली होती. तिथून तो उघड्या जीपमध्ये बसलेल्या आजूबाजूच्या पर्यटकांकडे पाहत होता. त्या पर्यटकांसाठी ही एक अतिशय दुर्मीळ संधी होती, कारियाची (ब्लॅक पॅंथर) आणि बिबट्याची झटापट पाहण्याची. शेजारीच असलेल्या मिस्ट नावाच्या निळ्या डोळ्यांच्या मादी बिबट्याला मिळवण्यासाठी कारिया आणि स्कारफेस बिबट्या एकमेकांशी झटापट करायला लागले. मिस्ट मात्र तिचं बछडं गमावल्याच्या दुःखात होती.

हे थरारनाट्य सुरू झालं. मादी जशी क्रामकीडेच्या, प्रजोत्पादनाच्या अवस्थेत येते तसे अनेक बिबटे तिच्याभोवती घिरट्या घालायला लागतात त्यामुळे कारियानं आखून घेतलेल्या त्याच्या विहार क्षेत्रात इतर बिबट्यांचा वावर वाढणार, ते त्याच्याशी झटापट करणार, त्याला त्याचा प्रदेश टिकवून ठेवण्यासाठी ही लढाई जिंकायला भाग पाडलं जाणार हे तर स्वाभाविक होतं. कारियासाठी इतर अनेक लढायांप्रमाणेच हीसुद्धा लढाई. ही लढाई बिबटे आणि कारियांचे इतर कळप धाकधूक करत बघतात, आपला सदस्य विजयी होऊन यावा या प्रतीक्षेत ते असतात.

गेल्या काही आठवड्यांत कारियानं वारंवार दिलेल्या दर्शनामुळे जगभरातल्या सगळ्या वाइल्ड लाईफ फोटोग्राफर्समध्ये आणि पर्यटकांमध्ये एक उत्साहाची लहर पसरली आहे... त्यामुळे अनेक जण लाडक्या कारियाचं दर्शन घेण्यासाठी कबिनी जंगलात जाण्याची धडपड करत आहेत. 

हा जगातला असा एकमेव ब्लॅक पॅंथर आहे की, ज्याचा अधिवास पर्यटकांच्या विहारक्षेत्राच्याही पलीकडे आहे. तो फक्त त्याची तहानभूक भागवण्यासाठी वावरतो तेव्हाच पर्यटकांच्या नजरेस पडतो. कारिया आता नऊ वर्षांचा आहे. बिबट्यांचं आयुर्मान सर्वसाधारणपणे बारा वर्षं असतं... त्यामुळेच त्याला पाहण्याची एकही संधी निसटू नये याकरता आमच्यासारखे वन्यजीवप्रेमी अगदी हपापल्यासारखे पुन्हापुन्हा जंगलात येत असतात.

असं असलं तरी कबिनी जंगल केवळ ब्लॅक पॅंथर्सपुरतं मर्यादित नाही तर ते आपल्याला इतरही खूप काही देतं. या ऋतूमध्ये जंगलात पाणी फार कमी असतं, पानगळ झालेली असते. साहजिकच निष्पर्ण जंगलात प्राणी खूप सहजपणे दिसतात. विशेषतः वाघ, बिबटे इत्यादी.

बहुतकरून लोकांना बिबट्यांपेक्षा ऐटदार पट्टेरी वाघ पाहण्यात जास्त रस असतो. त्यांना या ऋतूमध्ये जशी हे प्राणी बघण्याची पर्वणी मिळते तशी एरवी मिळत नाही. आता संशोधकांना आणि वन्यजीव फोटोग्राफर्सनाही कबिनीच्या जंगलातल्या एका वाघिणीच्या कुटुंबाचा ध्यास लागला आहे. इथल्या बॅकवॉटरच्या परिसरात राहणाऱ्या एका वाघिणीनं मागील तिन्ही वर्षांच्या कालावधीत दोनदा बछड्यांना जन्म दिला. दोन्ही वेळांना तिनं तीन-तीन बछड्यांना जन्म दिला. एकाच वर्षी जन्मलेल्या तीन पिल्लांना सोबत घेऊन ती फिरत असते. 

गेल्या वर्षी जन्म दिलेल्या बछड्यांपैकी एखादातरी या आपल्या नवीन भावंडांसह आईसोबत फिरताना दिसतो. हे एक प्रकारे वाघांचं पाळणाघरच झालं आहे. वाघीण एकाच वेळी चार ते पाच बछड्यांना जन्म देऊ शकत असली तरी त्यातली सगळीच बछडी जगण्याची शक्यता फार दुर्मीळ असते. तुम्ही भाग्यवान असाल तर कबिनीमध्ये फिरताना तुम्हाला पाच वाघ एकत्र संचार करताना दिसू शकतात. एक वर्ष वयाचे तीन बछडे, त्यांची धष्टपुष्ट आई आणि या पिल्लांचा सांभाळ करणारा एक वाघ.   

बछड्यांशी त्यांच्या मोठ्या भावंडांनी (आधी जन्मलेल्या बछड्यांनी) भावनिकरीत्या जोडलं जाणं, त्यांच्याशी जुळवून घेणं हे सहसा घडत नाही. एकाच वाघिणीची नवीजुनी सगळी बछडी शांतपणे एकत्र राहतील असेही नाही... मात्र कबिनीच्या जंगलातल्या या वाघांचं सहअस्तित्व, ते एकमेकांना करत असलेलं सहकार्य हे सारं न्याहाळणं हा एक खरोखरीच अद्वितीय अनुभव आहे.

आता कबिनीतला उन्हाळा एकदम कडकडीत असेल आणि लोकांचे कळपच्या कळप पुन्हा तिकडे वळायला लागतील यात काही शंका नाही. ‘पीस ऑफ वाइल्ड थिंग्ज’ या कवितेत वेंडल बेरी या कवीला जे जंगल दिसलं तसा अनुभव घेण्यासाठी लोक नक्कीच जंगलांकडे वळतील. जंगलांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. सजग राहणं, आहे तो क्षण भरभरून जगणं या त्यांतल्या महत्त्वाच्या दोन गोष्टी. जंगलामुळे आपल्या संवेदनाही टोकदार होतात. निसर्गासोबत वेळ व्यतीत केल्यानं माणूस किती समृद्ध होतो यावर अनेक संशोधनं झालेली आहेत.

आपल्या आवडत्या आणि काहीतरी वेगळेपण असलेल्या वन्यजीवांवर प्रेम करताना वाहवत जाऊ नका असं जैवसंवर्धक आपल्याला अनेकदा बजावतात... कारण इतर लहान वन्यजीवांचं अस्तित्वही तितकंच महत्त्वाचं आहे. या लहान जीवांच्या अस्तित्वाशिवाय मोठे प्राणी जगू शकत नाहीत आणि अन्नसाखळीच कोलमडू शकते. यांतले अनेक लहान जीव त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या परिप्रेक्ष्यात भव्य असतात. 

या उन्हाळ्यात विषाणूंबाबतचं थोडंसं चिकित्सक आकलन आपण आत्मसात केल्यावर... एक लहानगा विषाणूही काय करू शकतो हे आपण पाहिलंच. संपूर्ण परिसंस्था पाहण्यासाठी आपण काही काळ मोठ्या प्राण्यांवरून आपलं लक्ष इतर प्राण्यांकडे वळवायला हवं.   

कबिनीमध्ये हे फारच सोपं आहे. तिथलं जंगलदर्शन हे जंगलात बांधलेल्या सरकारी विश्रामगृहांमार्फत आणि रिझॉर्ट्समार्फत घडवलं जातं. जंगलात किती पर्यटक जाऊ शकतात हेही जैवसंवर्धकांनी काटेकोरपणे ठरवलेलं असतं त्यामुळे तिथे जंगल जीप्सच्या गर्दीनं ओसंडून वाहत नाही. पर्यटकांच्या वावरावरही मोठ्या प्रमाणात बंधनं असतात शिवाय वनखात्याच्या कर्मचाऱ्यांच्या आणि काही स्वयंसेवकांच्या साहाय्यानं जंगल संपूर्णपणे कचरामुक्त ठेवलं जातं.

पर्यटक जेव्हा-जेव्हा कबिनीला भेट देतात तेव्हा हे जादूई जंगल त्यांना दरवेळी नवीन काहीतरी देऊ करतं. पर्यटकांनाच नाही तर नानाविध प्रकारच्या जैवसमृद्धीलाही या जंगलानं सुखानं आश्रय दिला आहे. मानवनिर्मित आणि नैसर्गिक असे जंगलाचे दोन भाग आहेत. त्यात भर म्हणून कबिनी पाणलोट क्षेत्र आणि त्यातलं वन्यजीवनही सुखकारक आहे पण या स्वर्गासारख्या जंगलात खूप दक्षता बाळगणं गरजेचं आहे. इथं येणाऱ्या पर्यटकांनी केवळ सफारीचा आनंद लुटणारे ग्राहक न होता जंगलाचे विश्वस्त झालं पाहिजे.

कुतूहलापोटी तरी विनम्रतेनं आपण जंगलात जाऊ शकतो का? जंगलाच्या सौंदर्याला कवेत घेतत्यावर प्रेम करू शकतो का? आपण आता वैश्विक महामारीतून सावरण्याच्या मार्गावर आहोत. आपलं निसर्गासोबत असलेलं अतूट नातं किती महत्त्वाचं आहे हे या महामारीनं आपल्याला शिकवलं. या नात्याबद्दल पुन्हा नव्यानं विचार करण्याची,  निसर्गाशी तुटलेलं नातं जोडण्याची यापेक्षा योग्य वेळ ती कोणती?    

वैयक्तिक माझ्यासाठी तरी मी निसर्गाची विश्वस्त म्हणून काम करायचं ठरवलं आहे. कारियाला पाहण्याच्या अनुभवानंतर आताही मी नेहमीच जंगलात जाते... तेव्हा त्याबद्दल लोक मला विचारतात. कारिया जर पुन्हापुन्हा मला खुणावत असेल तर तो मला हे विनवतो आहे की, मी त्याला पाहण्यापलीकडे विचार करून जंगलाच्या हृद्यापाशी पोहोचलं पाहिजे, कदाचित तिथे मानवी मनाचं अस्तित्व सापडेल.   

(अनुवाद – प्रियांका तुपे)

- रोहिणी निलेकणी

(लेखिका अर्घ्यम – ‘अ फाउंडेशन फॉर सस्टेनेबल वॉटर अँड सॅनिटेशन’ या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत.)

Tags:Load More Tags

Comments:

Vinayak Gopal Phadke

काय जबरदस्त लेख आहे. पूर्ण होई पर्यंत खिळवून ठेवतो.

Add Comment