नाचते-गाते स्त्रीवादी वादळ

कमला भसीन यांचं नुकतच निधन झालं...

25 सप्टेंबर 2021 रोजी कमला भसीन यांच्या निधनाची वार्ता कळली आणि त्यांच्याबरोबर झालेले संवाद, त्यांच्या झालेल्या गाठीभेटी सारं नजरेसमोर तरळून गेलं. जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, स्त्री चळवळीच्या समर्थक, अभ्यासक, जेंडर ट्रेनर, गीतकार, कवयित्री, दक्षिण आशियामधल्या स्त्रीवादी संपर्काचं जाळं विणण्यात प्रमुख भूमिका बजावणारी व्यक्ती अशा अनेक भूमिकांमध्ये त्या ओळखल्या जातात. 

1970पासून एफएओ, जागोरी, संगत अशा संस्थांशी कमलादी औपचारिकपणे जोडल्या गेल्या होत्या. जागोरी आणि संगत या संस्थांच्या त्या संस्थापक होत्या. याशिवाय स्त्रीप्रश्नांवर काम करणाऱ्या भारतभरातल्या अनेक संस्था-संघटनांशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध राहिला. 

मी पहिल्यांदा कमलादींना भेटले ते 2004-05मध्ये. बरोड्यात ओळख नावाच्या स्त्रीवादी संस्थेमध्ये मी काम करत होते. नुकतीच समाजकार्यात पदवी मिळवली होती. स्त्रीवादी विचारांनी मी भारावून गेले होते. त्यामुळं स्त्री चळवळीमध्ये मी काम सुरू केलं. 

ओळख संस्था सुरू करण्यामध्ये आणि तिचा विकास होण्यामध्ये दिल्लीच्या जागोरी संस्थेचा आणि विशेषकरून आभा भैय्या आणि कमला भसीन यांचा मोठा हातभार आहे हे मी ऐकून होते. कमलादी कशा दिलखुलास आहेत, बिंधास आहेत, खुशमिजाज आहेत, त्या आल्या की कशी मज्जा येते पण खूप काही शिकायलासुद्धा मिळतं हे मी माझ्याआधी तिथे काम करणाऱ्या सहकारी मैत्रिणींकडून ऐकलं होतं. 

ओळख स्थापन करणाऱ्या निमिषा देसाई अनेकदा गप्पांमधून स्वतःचं जीवन, काम कसं सुरू केलं, संघटना कशी बांधली यांविषयी सांगत. कमलादी आणि भैय्या यांनी त्यांना वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन, त्यांना दिलेली साथ, वैयक्तिक आणि राजकीय जीवनात उभं राहण्यासाठी केलेली मदत यांविषयी त्या भरभरून बोलायच्या. 

पुरुषसत्ता, स्त्रीवाद, लिंगभाव या संकल्पनांची ओळख करून देणाऱ्या त्यांच्या पुस्तिकाही मी शिकत असताना वाचल्या होत्या. सरळ, सोपी भाषा आणि गुंतागुंतीच्या संकल्पना सहजपणे सांगण्याची हातोटी यांमुळे त्या पुस्तिका खूप लोकप्रिय ठरल्या होत्या. संस्थेत असताना सकाळी काम सुरू करण्यापूर्वी आम्ही एकत्र गाणी म्हणायचो. त्यांतली अनेक गाणी  कमलादींनीच लिहिलेली आहेत हे हळूहळू कळत गेलं त्यामुळं त्यांना भेटण्याची खूपच उत्सुकता होती आणि एक दिवस तो योग आला. 

एका प्रशिक्षणासाठी त्या बरोड्यात आल्या आणि एका स्त्रीवादी वादळाशी गाठ पडल्यासारखं झालं... प्रचंड ऊर्जा आणि उत्साह, आपल्या उपस्थितीनं वातावरण पूर्णतः बदलून टाकणारं चैतन्य. पहिल्यांदाच भेटत असलो तरी प्रेमानी मिठी मारून समोरच्याला आपलंसं करून घेणारं व्यक्तिमत्त्व; स्पष्ट आणि सहज वाणी, डफली वाजवत धरलेले गाण्याचे सूर आणि अतिशय ओघवत्या शैलीत कठीण मुद्दे सर्वांना समजतील अशा भाषेत सांगण्याचं कौशल्य. हे सगळं त्या पहिल्या भेटीत मी अनुभवलं. 

त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमात, स्त्री-अभ्यासाच्या आणि स्त्री-चळवळीच्या परिषदांमध्ये, स्त्रीवादी वर्तुळांमध्ये त्या भेटत राहिल्या. त्यांची शेवटची भेट जानेवारी 2020मध्ये दिल्ली इथं झालेल्या स्त्री-अभ्यासाच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये झाली. तेव्हासुद्धा त्यांच्या केवळ असण्यानं परिषदेचा चेहराच बदलून गेला. अशा कमलादी आता आपल्यात नाहीत ही कल्पना खूपच असह्य आहे... कारण त्यांच्यासारख्या स्त्रीवादी आवाजाची आज खूप गरज होती. 

कमलादींचा जन्म 24 एप्रिल 1946 रोजी राजस्थान इथं झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. त्या राजस्थानातल्या खेड्यापाड्यांमध्ये वाढल्या. इथला अनुभव स्त्रियांचं आयुष्य समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला असं त्यांनी नमूद केलं होतं. परदेशातून शिक्षण पूर्ण करून आल्यावर त्यांनी सेवा मंदिर इथं काम सुरू केलं. शिकलेल्या सिद्धान्तांना प्रत्यक्ष कामात उतरवून बघणं ही त्यांची प्रेरणा होती.

त्यांच्या संघटनात्मक कार्याचा गौरव अनेकांनी केला आहे म्हणून इथे त्याची पुनरावृत्ती करत नाही... पण अतिशय कठीण व्यक्तिगत आव्हानांना त्या सामोऱ्या गेल्याआणि त्यावर मात करत पाच दशकांपेक्षा अधिक काळ त्या स्त्रीवादी जीवन जगल्या. शेवटच्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या सहकारी मैत्रिणींनी त्यांची घेतलेली काळजी, त्यांची अंतयात्रा म्हणजे स्त्रीवादी समूहजीवन कसे असावे, पर्यायी स्त्रीवादी सांस्कृतिक व्यवहार कसा असू शकतो याचा पाठच होता.  

स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादी चळवळी या दोन्हींसाठी कमलादी अतिशय महत्त्वाच्या होत्या. स्त्री-अभ्यासाच्या क्षेत्रात असल्यामुळं मी त्यांच्या या पैलूविषयी सांगणार आहे. स्त्री-अभ्यास ज्ञानशाखा म्हणून विकसित व्हावी म्हणून त्या कार्यरत होत्या. जयपूर इथं झालेल्या स्त्री-अभ्यासाच्या राष्ट्रीय परिषदेच्या त्या सचिव होत्या. भारतानं केलेल्या अणुचाचण्यांच्या विरोधात मोठा मोर्चा आयोजित करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. 

स्त्री-अभ्यास या ज्ञानशाखेसाठी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे/पुस्तिकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांतलं पहिलं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे रितू मेनन यांच्यासमवेत त्यांनी लिहिलेलं 'बॉर्डर्स अँड बाउंडरीज्'. उर्वशी बुटालिया यांनी लिहिलेल्या 'द अदर साईड ऑफ सायलेन्स' या पुस्तकाच्या बरोबरीनं फाळणीची स्त्रीवादी मांडणी आणि त्यातून फाळणीच्या इतिहासाच्या सरधोपट मांडणीवर प्रश्न उपस्थित करण्याचं श्रेय या पुस्तकाला जातं. फाळणीविषयी मुबलक साहित्य उपलब्ध असूनही स्त्रिया आणि इतर परिघावरच्या गटांसाठी फाळणीचा अनुभव कसा होता, त्यांच्या अनुभवांना केंद्रस्थानी ठेवून फाळणीकडे पाहिलं असता त्या ऐतिहासिक घटनेचे वेगळेच पैलू पुढे येतात हे त्यांनी या पुस्तकात अधोरेखित केलं आहे. 

राष्ट्र नावाच्या गोष्टीशी स्त्रियांचं असलेलं नातं हे केवळ नागरिकत्वाचं कधीच राहत नाही. स्त्रियांना नेहमी समूह / धर्म यांच्या चौकटीत अडकवलं जातं हे त्यांनी दाखवून दिलं. किंबहुना अपहरण झालेल्या स्त्रियांना परत आणण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या देशांमधल्या सरकारांनी केलेल्या करारातून स्त्रियांकडे कुटुंब / समूह / धर्म यांच्या परिप्रेक्ष्यातूनच बघितलं गेलं आणि त्यांचे नागरिक म्हणून असलेलं कर्तेपण नाकारलं गेलं हे त्यांनी या पुस्तकातून दाखवून दिलं. एका अर्थानं 'स्त्रियांचं राष्ट्र कोणतं?' हा प्रश्न यातून पुढं आला. 

या पुस्तकानंतर त्यांनी स्त्री-अभ्यासातल्या अतिशय मूलभूत अशा संकल्पना सोप्या आणि सर्वांना समजतील अशा भाषेत मांडणाऱ्या पुस्तिका लिहिल्या. इंग्लीशमध्ये लिहिलेल्या या पुस्तिकांचे अनुवाद अनेक भारतीय भाषांमध्ये झाले. जेंडरविषयक प्रशिक्षणामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. अवघड भाषेत लिहिले गेलेले महत्त्वाचे स्त्रीवादी सिद्धांकन आणि संकल्पना पटकन समजतील, रुचतील अशा भाषेत लिहिण्याची कमालीची हातोटी कमलादींकडे होती. 

पुरुषसत्तेबद्दल बोलणं म्हणजे पुरुषविरोधी बोलणं नव्हे हे त्यांनी समजावून दिलं. ती व्यवस्था आहे. त्यातून स्त्रियांच्या उत्पादक आणि पुनरुत्पादक क्षमतांवर, लैंगिकता आणि श्रम यांच्यावर, त्यांच्या चलनवलन स्वातंत्र्यावर कसं नियंत्रण ठेवलं जातं हे त्यांनी दैनंदिन आयुष्यातल्या सोप्या उदाहरणांमधून स्पष्ट केलं. लिंगभाव म्हणजे काय ही नवीन संकल्पना स्त्री-अभ्यासातून कशी आली, लिंग आणि लिंगभाव यांमधील फरक यांविषयी त्यांनी लिहिलं. हा फरक समजून घेणं केवळ स्त्री-चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर सामान्यांसाठीही महत्त्वाचं का आहे याची मांडणी त्यांनी आपल्या पुस्तिकेतून केली. 

विकासप्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर लिंगभावाचा विचार करण्यासंबंधी 1970च्या दशकापासून स्त्रीवादी उहापोह सिद्धांकन आणि प्रत्यक्ष कृती या पातळीवर होत होता. त्याचा पट अतिशय ताकदीनं कमलादींनी एका छोट्या पुस्तिकेत मांडला. त्यामुळंच कदाचित ही पुस्तिका भारतातच नव्हे तर दक्षिण आशियामधील विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठीच ‘मस्ट रीड’ झाली. यात केवळ सैद्धान्तिक मुद्द्यांची चर्चा करून त्या थांबल्या नाहीत तर आपल्या विकासप्रकल्पात / कार्यक्रमात लिंगभावाचा समावेश करायचा म्हणजे काय ठोस उपाययोजना कराव्या लागतील याची रूपरेषाही देण्यात आली आहे. 

या मालिकेतली त्यांची तिसरी महत्त्वाची पुस्तिका त्यांनी पाकिस्तानी स्त्रीवादी कार्यकर्त्या निगत सईद खान यांच्यासमवेत लिहिली. दक्षिण आशियातील स्त्रीवादाची समर्पकता आणि उपयुक्तता या संदर्भातल्या काही प्रश्नांसंबंधीची ही पुस्तिका होती. 

‘स्त्रीवाद ही पाश्चिमात्य विचारधारा आहे; 'आपल्या' स्त्रियांसाठी ती उपयुक्त नाही, लागू नाही आणि त्यांना तिची गरजही नाही. किंबहुना स्त्रीवादी असणं म्हणजे पाश्चिमात्य विचारांचं अंधानुकरण करणं’ अशा आजही लोकप्रिय असलेल्या धारणांना सुरुंग लावण्याचं काम या पुस्तिकेतून भसीन आणि खान अतिशय चपखलपणे करतात. 

स्त्रीवादाची दक्षिण आशियायी पाळंमुळं, या विचाराची गरज यांविषयीची मांडणी या पुस्तकात आहे. पाश्चिमात्य असल्यामुळे अयोग्य असा शिक्का केवळ स्त्रीवादावरच का लावला जातो? पश्चिमेतून आलेल्या राष्ट्रवाद, लोकशाही, मार्क्सवाद अशा इतर विचारांच्या बाबतीत हा प्रश्न का उपस्थित केला जात नाही या प्रश्नांची नेमकी आणि समर्पक उत्तरं या पुस्तकात सापडतात. प्रश्न आणि त्याचं उत्तर असा थोडा वेगळा आकृतिबंध असूनसुद्धा हे पुस्तक लक्षणीय आहे. त्यातून अतिशय स्पष्ट आणि सोप्या पद्धतीनं, विषयाला थेट हात घालत संवादी पद्धतीनं मुद्दे पुढे येतात.

या मालिकेतलं चौथं आणि शेवटचं पुस्तक पुरुष आणि पुरुषत्व यांची उकल करणारं होतं. पुरुषत्वाची जडणघडण, पुरुषसत्तेत पुरुष कसे घडतात, त्यातून मिळणाऱ्या सत्तेबरोबरच त्यांच्यावर पुरुषत्व निभावण्याचा बोजा कसा पडतो, या व्यवस्थेतून पुरुषांकडून हिंसा कशी घडते आणि या सगळ्यांतून पुरुष स्वतःच्या मनुष्यत्वापासून कसे दूर जातात या विषयांची चपखल मांडणी त्या करतात. ही व्यवस्था बदलण्यामध्ये पुरुषांनी का सहभाग घेतला पाहिजे, समानतेसाठीची लढाई ही केवळ स्त्रियांची का असू नये, समानता आणणे हे पुरुषांच्याही फायद्याचं कसं आहे हे त्या अधोरेखित करतात. 

पुरुषसत्तेचा आणि लिंगभावाचा विचार खूप लहानपणापासून मुलांमध्ये विकसित होतो. हे लक्षात घेऊन कमलादींनी लहान बालकांसाठी समानतेची आणि न्यायाची मूल्यं अधोरेखित करणारी बडबडगीतं लिहिली. हे संग्रह खूप वेगळा विचार पुढे आणतात. 

स्त्रीवादी चळवळीत काम करताना हसणं महत्त्वाचं आहे म्हणून बिंदिया थापर यांच्याबरोबर त्यांनी स्त्रीवादी विनोदांचं पुस्तकही लिहिलं. त्याचबरोबर त्यांनी असंख्य गाणी लिहिली. बोजड वाटणारं सिद्धांकन सोपं करून ते लोकप्रिय केलं. लोकप्रिय गाण्यांच्या चालींवर स्त्रीवादाचा संदेश देणारी गाणी लिहिली. त्यांचा हा वारसा अनमोल आहे. मी मुलगी आहे म्हणून मला शिकायचे आहे, मिलकर हम नाचेंगे गायेंगे, तुम्हारा साथ मिलने से... अशी अनेक गाणी. अम्मा देख, तेरी मुव्हमेंट बिगडी जायेसारखी चळवळीवर हसतखेळत टिप्पणी करणारी अशी असंख्य गाणी उदाहरणादाखल सांगता येतील. 

खरंतर त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे. अनेक कार्यकर्त्यांना, संघटना-संस्थांना घडवणं, उभं करणं यासाठीचं त्यांचं काम मोठं आहे. अविरत काम, सतत संघर्ष करत असताना दिलखुलास हसणं, नाचणं, गाणं महत्त्वाचं का आहे हे त्यांनी दाखवून दिलं. चुका झाल्या तर त्या स्वीकारणं आणि त्यावर विमर्षात्मक विचार करणं या स्त्रीवादी तत्त्वाशी त्या अखेरच्या दिवसापर्यंत प्रामाणिक राहिल्या. 

राष्ट्राच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या भावना टोकदार होत असताना सीमारेषांच्या पलीकडेही स्त्रीवादी भगिनीभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कमलादी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. दक्षिण आशियायी पातळीवर स्त्रीवादी जाळं निर्माण करण्यासाठी त्या तीनचार दशकांपासून प्रयत्नशील होत्या. ‘हम सरहद पर बनी दीवार नहीं, हम तो उस दीवार में पडी दरार हैं।’ अशा सोप्या शब्दांत राष्ट्रातीत स्त्रीवादी राजकारण कसं असावं याची मांडणी त्यांनी केली. 

कमलादींसारख्या व्यक्ती कधीच मरत नसतात. त्यांच्या शब्दांतून, त्यांच्या गाण्यांतून त्या आपल्याला नेहमीच संघर्षाची प्रेरणा देत राहतील आणि त्यांचे हे शब्द नेहमी घुमत राहतील...

मिलकर लड़ती जायेंगी, वो आगे बढ़ती जायेंगी।
हा मेरी बहने अब आगे बढ़ती जायेंगी।
नाचेंगी और गायेंगी, वो फनकारी दिखलायेंगी।
हां... मेरी बहने अब मिलकर खुशी मनायेंगी।
गया ज़माना पिटने का, अब गया ज़माना मिटने का।
तोड़ तोड़ के बंधनों को देखो बहने आती हैं।

- डॉ. स्नेहा गोळे
gole.sneha@gmail.com

(डॉ. स्नेहा गोळे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अध्यसन केंद्र येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Tags: व्यक्तिवेध स्नेहा गोळे कमला भसीन स्त्रीवाद Sneha Gole Kamla Bhasin Feminism Load More Tags

Comments:

Ujwala Mehendale

The author has mentioned 4 important booklets/books written by Kamaladi. Can I get the full names of these books in English?

सुनीती नी देव

छान लेख लिहिलाय. अभिनंदन.

पोपट पगार

स्नेहा गोळेनी अतिशय चांगल्याप्रकारे लिखाण केले आहे, मला स्वतः ला आवडले.

संजय मेश्राम

खूप छान लेख. कमला भसीन यांच्या कार्याची जवळून ओळख करून दिल्याबद्दल लेखिका, प्रकाशक यांना धन्यवाद.

Daya

कमला भसीन या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख मला स्वतःला खूप आवडला. लेखिका आणि प्रकाशक दोघांनाही धन्यवाद.

Add Comment