भारतातील सिद्दींचा इतिहास

उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज : 1

सातशे वर्षांपूर्वी आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेले हबशी किंवा सिद्दी समाजातील लोक भारताच्या पूर्व व पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील काही ठिकाणी उतरवले गेले. त्यातील काही लोक महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक या राज्यांच्या सीमावर्ती भागांत स्थायिक झाले. त्यांचा इतिहास, त्यांचे वर्तमान आणि त्यांची स्थिती-गती यांचा अभ्यास करण्याची इच्छा प्रवीण खुंटे, प्रवीण राठोड, ज्योती भालेराव - बनकर , सूरज निर्मळे, चंदनसिंग या पाच तरुणांनी व्यक्त केली. त्यासाठी साधना ट्रस्टने त्यांना फेलोशिप दिली. मग त्यांनी अभ्यास केला आणि प्रत्यक्ष त्या भागात दोन वेळा भेट देऊन तिथल्या लोकांशी संवाद साधला. त्यातून आकाराला आलेले लेख आणि ऑडिओ-व्हिडिओ असा हा दीर्घ रिपोर्ताज सादर करीत आहोत, 1 ते 15 मे 2022 या काळात. त्यातील हा पहिला लेख.

विविधतेने नटलेल्या अखंड भारत देशात अनेक जाती, धर्म, पंथ, वंशाचे लोक राहतात. त्यामध्ये संख्येने अत्यल्प असलेले असे काही समूह आहेत, ज्यांची जाणीव किंवा ज्यांच्याविषयीची किमान माहितीदेखील बहुसंख्य भारतीय जनतेला नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी विचार करण्याची वेळच आपल्यावर येत नाही. अशा समूहांपैकी एक म्हणजे सिद्दी समाज. 

आज भारतात गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेशात सिद्दी समाज राहतो. संपूर्ण भारतात सिद्दींची लोकसंख्या 65 ते 70 हजारांच्या दरम्यान आहे. त्यांचे सर्वाधिक प्रमाण कर्नाटक आणि गुजरातमध्ये असून महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशातील प्रमाण अत्यल्प आहे. महाराष्ट्रातील संगमवाडी, जंजिरा आदी किनारपट्टीच्या काही भागांमध्ये सिद्दी कुटुंबे राहतात. भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये सिद्दी समाज संख्येने अधिक आहे. असे असले तरी या सर्व लेखांमधील चर्चा केवळ उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाजापुरती मर्यादित असणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातल्या कारवार, धारवाड, बेळगाव या जिल्ह्यांत सिद्दी समाजाचे लोक राहतात. कोंकणी, मराठी आणि कन्नड अशा तिन्ही भाषांचे मिश्रण करून बोलणाऱ्या सिद्दींची लोकसंख्या 30 ते 35 हजारांपर्यंत आहे. पोर्तुगिजांच्या काळात गोव्यात सिद्दी गुलामांचे प्रमाण अधिक होते. त्यांच्याकडून प्रामुख्याने शेती, घरगुती कामे करून घेतली जायची.

आपल्यातील अनेकांना आता असा प्रश्न पडला असेल की, हे सिद्दी कोण? आपल्या मातीत पूर्णपणे मिसळून गेलेले हे सिद्दी मूळचे आफ्रिकन वंशाचे आहेत. पण वर्षानुवर्षे इथे राहिल्यामुळे आता ते भारतीय आहेत. काळी तुकतुकीत त्वचा, खरबरीत केस यांमुळे सहज ओळखू येणारी ही माणसे मागील सातशे ते आठशे वर्षांपासून आपल्या देशात राहतात. अरब, पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश व्यापाऱ्यांनी आफ्रिका खंडातील विविध देशांमधून पकडून आणून भारतात विकलेल्या आफ्रिकन गुलामांचे हे वंशज आहेत.

1883च्या बॉम्बे गॅझेटिअरअनुसार (‘बॉम्बे’चे राजपत्र) तिसऱ्या शतकात कोकणातील सोपारा, कल्याण, महाडजवळील चौल आणि पाल ही अरब व्यापाऱ्यांची व्यापारकेंद्रे होती. त्या सोबतच आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील गेर्दोशिया (आताचा बलुचिस्तान, पाकिस्तान) इथून जवळ असलेल्या आखाती देशांशी (पूर्वीचा पर्शियन गल्फ) त्यांचा व्यापार चालायचा.

वाईन, खजूर, कापड, सोने, मोती आणि त्या सोबत गुलामसुद्धा विकले जायचे. त्याचप्रमाणे भारतातून मका, तांदूळ, लोणी, तीळ, कापूस, साखर, लोह आफ्रिकेच्या पूर्व भागातील देशांत तसेच टांझानिया देशाच्या ‘झांजीबार’ या बेटावर निर्यात केले जायचे. त्या बदल्यात आफ्रिकेतील गुलाम, कासवाचे कवच आणि दालचिनी आयात केली जायची.

तिसऱ्या शतकात याचे प्रमाण खूप कमी होते. हे गुलाम आताच्या सोमालिया आणि इथिओपिया (जुने ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’) येथील होते. इथिओपियन साम्राज्याचीओळख ‘अ‍ॅम्बेशिया’ म्हणूनदेखील होती. सहाव्या शतकापर्यंत भारतीय किनारपट्टीवरून गुलामांचा व्यापार करण्यात अरबांचा चांगलाच जम बसला होता. 13व्या शतकात त्याचे प्रमाण अधिकच वाढत गेले. या गुलामांना ‘हबशी’ किंवा ‘सिद्दी’ म्हटले जायचे. या लोकांच्या डीएनए चाचण्यांवरून हे सिद्ध करण्यात आले आहे की, हे लोक आफ्रिकेतील बंटू जमातीचे होते. ॲम्बेशिया भागातील हबशींची खासगी अंगरक्षक किंवा सैन्य म्हणून मागणी वाढू लागली होती. आनुवंशिकतेने शारिरीकदृष्ट्या कणखर, सहनशील असणाऱ्या सिद्दींमध्ये शारीरिक कष्टाची कामे करण्याची क्षमता अधिक होती. हे लोक नाविक कामातदेखील खूप कुशल होते. त्यामुळेच अरबांसोबत पोर्तुगीज, ब्रिटिश यांनीसुद्धा आफ्रिकन गुलामांनी भरलेली जहाजे भारतीय किनाऱ्यांवर आणली. महाराष्ट्रातील कोकणासोबतच केरळ, गोवा, गुजरात, पाकिस्तान आणि बलुचिस्तान या ठिकाणांवरूनसुद्धा गुलामांचा व्यापार चालत होता. यातील अनेक गुलामांना भारतातील राजे स्वतःचे अंगरक्षक म्हणून ठेवून घ्यायचे. तर यातील बहुतेकांना विकत घेऊन मोठे जमीनदार, सावकार त्यांच्याकडून शेती व इतर कामे करून घ्यायचे. अशा सावकार व जमीनदारांच्या घरी सिद्दी लोकांच्या किती पिढ्या खपल्या असतील याची गणतीच नाही.

सिद्दींना गुलाम बनवून आणण्याची विशिष्ट पद्धत होती. त्या अमानवी पद्धतीबद्दल जाणून घेताना कोणत्याही संवेदनशील माणसाचे ह्रदय पिळवटून निघेल. त्याविषयी सांगताना सिद्दी समाजातील नेते दियोग सिद्दी यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. दियोग सिद्दी सांगतात, “आफ्रिकेतील लोकांना गुलाम म्हणून आणण्याची एक विशिष्ट पद्धत होती. सिद्दी लोक जंगलांमध्ये छोट्या-छोट्या वस्त्या करून रहात होते. व्यापारी त्यांच्या वस्त्यांवर हल्ला करायचे. त्यांच्याकडे बंदुका होत्या. वस्तीवरील चार-पाच माणसांना मारून इतरांमध्ये दहशत निर्माण करायची. त्यांना मारण्याची भीती दाखवून उभं रहायला सांगितलं जाई. त्यांचे दोन्ही हात बांधून त्यांना घोड्याला बांधलं जाई आणि तसंच पळवत त्यांना किनाऱ्यापर्यंत आणलं जाई. एका मोठ्या बोटीच्या तळघरात दोन्ही हातपाय बांधून टाकून दिलं जात असे. त्या वेळी ॲम्बेशिया प्रांतामधून निघालेल्या या बोटींना भारतात येण्यासाठी काही महिन्यांचा काळ लागायचा. या काळात त्यांना तसंच बांधून ठेवलं जायचं. 

संडास, लघवी सर्व काही तिथंच. त्यातच खाण्यासाठी पावाचे तुकडे टाकले जात. त्या प्रवासात जे मरतील त्यांना तिथेच जलसमाधी दिली जायची. त्यांच्यामधून जे वाचतील त्यांना या किनाऱ्यावर आणून विकलं जाई. किनाऱ्यावर आल्यावर सर्वांना स्वच्छ धूवून विकण्यासाठी उभं केलं जायचं. बऱ्याचदा एका कुटुंबातील दोन-तीन सदस्य असायचे. पण गुलाम म्हणून विकत घेताना नवरा एकीकडे, बायको दुसरीकडे, मुलं आणखी भलतीकडेच जायची. या सगळ्या अमानवी त्रासांमधून जे इथं येईपर्यंत वाचले आणि जगले त्यांची संतती आम्ही आहोत. त्या वेळी एका घोड्याचा भाव माणसाच्या पाच पट अधिक होता.”


हेही वाचा : 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन' सह अनुभवलेला काश्मीर - ऐश्वर्या रेवडकर


पोर्तुगिजांनी 25 फेब्रुवारी 1869 नंतर गुलामी संपवली. तर त्याच्या सव्वीस वर्षे आधी म्हणजे एप्रिल 1843 मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या संपूर्ण साम्राज्यात गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली. त्यानंतर गुलामांचा ताबा कोणी घेण्याचा प्रयत्न केल्यास तो फौजदारी गुन्हा असल्याचे जाहीर केले. त्या वेळी सिद्दींचे प्रमाण गोव्यात अधिक होते. पण आतापर्यंत सिद्दी केवळ वंशानेच आफ्रिकेचे राहिले होते. त्यांच्या अनेक पिढ्या इथेच जन्मून इथेच संपल्या होत्या. आपण आफ्रिकेतील नक्की कुठले, आपला इतिहास काय- याची फारशी जाणीव त्यांना नव्हती. त्यातच इतकी वर्षे इथे राहिल्यामुळे येथील संस्कृतीमध्ये ते मिसळून गेले होते. गुलामीचे कायदे रद्द झाल्यानंतर पुन्हा गुलामीच्या जोखडात अडकून पडू नये म्हणून त्यांनी स्वरक्षणासाठी उत्तर कर्नाटकातील कारवार (पूर्वीचा उत्तर कन्नड) जिल्ह्यातील घनदाट जंगलात धाव घेतली. ते आजच्या दिवसापर्यंत तिथेच राहत आहेत. कारवारसोबतच धारवाड, बेळगाव या जिल्ह्यांच्या काही भागांतील जंगलांमध्ये सिद्दींचे स्थलांतर झाले. कारवार जिल्ह्यातील हलियाल, यल्लापूर, जोयडा (पूर्वीचा सुपा), अंकोला आणि मुंडगोड या तालुक्यांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या सोबतच धारवाडमधील कालघाटगी तालुक्यात तर बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सिद्दी समाज अल्प स्वरूपात राहतो. या नोंदी बॉम्बे गॅझेटिअरमध्ये करण्यात आल्या आहेत.

घनदाट जंगलात रहायला गेल्यामुळे इतर समाजाशी त्यांचा संपर्क तुटला होता. जंगलात मिळणाऱ्या साधनांवर त्यांची उपजीविका सुरू होती. जंगल साफ करून तिथे कुंब्रीबेसाय (जंगलातील) पद्धतीची शेती केली जायची. त्यात नाचणी, बाजरीसारखी पिके घेतली जायची. एवढ्यावर भागत नसल्याने जंगलात मिळणाऱ्या वस्तूंवर उदरनिर्वाह केला जायचा. मागील दीडशे ते पावणेदोनशे वर्षांपासून हे लोक याच जंगलांमध्ये वास्तव्यास आहेत.

भारतीय इतिहासातील सिद्दी राज्यकर्त्यांची उदाहरणे

गुलाम म्हणून भारतात आलेल्या सिद्दींपैकी काहींनी मोगलकाळापासून अनेक शासकांकडे काम केले. त्यातील मोजके आपल्या कर्तबगारीने महत्त्वाच्या पदांपर्यंतही पोहोचले. इतिहासाच्या पानांवर आपली मोहर उमटवलेल्या अशाच काही सिद्दींविषयी थोडक्यात माहिती.

मलिक अंबर -
औरंगाबाद शहराच्या इतिहासात एक नाव नेहमी घेतले जाते ते ‘मलिक अंबर’ या सिद्दीचे. औरंगाबाद शहराचा निर्माता हाच सिद्दी होता. औरंगाबाद शहरात अजूनही अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा व्यवस्था म्हणजे ‘नहर-ए-अंबरी’ ची उभारणी मलिक अंबर याने केली होती. अंबर राजकारणी, प्रशासक आणि कर्तृत्ववान योद्धा होता. मराठ्यांच्याही आधी मुघलांच्या नाकात दम करून बादशाह जहांगीरला त्रस्त करून सोडण्याचे काम त्याने केले. एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा ‘पेशवा’ अर्थात पंतप्रधान हा मोठा प्रवास त्याने केला. ढासळलेली निजामशाही सावरून ती सांभाळण्याचे काम केले. दख्खन प्रांताचा तो प्रमुख सेनानी होता. देशाच्या इतिहासात मलिक अंबर याचे स्थान महत्त्वाचे आणि वरचे आहे.

सिद्दी जौहर (याकूत खान) -
हा मोगलांच्या आरमाराचा आणि जंजिऱ्याच्या सिद्दींचा प्रमुख होता. मलिक अंबर याच्या मृत्यूनंतर निजामशाहीचा अस्त झाला. त्यानंतर जंजिऱ्यावरील सिद्दींना घेऊन स्वतःचे राज्य घोषित केले. औरंगजेबाच्या मदतीने जंजिऱ्याच्या अभेद्यपणामुळे आरमारावर वर्चस्व मिळवले. अजिंक्य राहिलेल्या या किल्ल्यावर शेवटपर्यंत सिद्दींचे वर्चस्व राहिले. यामध्ये सर्वांत मोठा वाटा याकूत खान याचा आहे. सोळाव्या शतकातील त्या वेळच्या आरमार-प्रमुखांमध्ये सर्वांत यशस्वी आणि सरस नौदल-प्रमुख म्हणून याकूत खान याच्याकडे पाहिले जाते.

जमाल-उद-दीन याकूत -
इ.स. 12व्या शतकात दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली महिला शासक म्हणजे ‘रझिया सुल्तान’ सुल्तान अल्तमश याची मुलगी. रझिया सुल्तान हिचा अगदी विश्वासपात्र सहकारी म्हणजे आफ्रिकन वंशाचा हबशी गुलाम जमाल-उद-दीन याकूत. रझिया सुल्तान हिचे याकूत याच्यावर प्रेम असल्याचेही अनेकांनी लिहिले आहे.

सिद्दी इब्राहिम महम्मद याकूत खान -
गुजरातमधील सचिन प्रांताचे नबाब होते. त्यांचे वंशज अजून सचिन प्रांतातच राहतात. पोर्तुगिजांनी जुनागडच्या नवाबांना भेट दिलेल्या सिद्दी गुलामांचे हे वंशज आहेत. 

भारतीय इतिहासातील ही काही प्रमुख सिद्दी पात्रे आहेत. मात्र, इतिहासात नोंद नसली यांच्यासह सर्वसामान्य नागरिक आणि गुलाम म्हणून हजारो सिद्दींच्या अनेक पिढ्या इथे अस्तित्वात होत्या. 

- प्रवीण खुंटे
kpravin1720@gmail.com


मलिक अंबरचे चित्र वगळता लेखातील इतर सर्व छायाचित्रे सूरज निर्मळे यांनी काढलेली आहेत.


प्रिय वाचकहो,
साधनाचे भूतपूर्व संपादक यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग. प्र. प्रधान या तिघांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. हा रिपोर्ताज त्या तिघांच्या स्मृतिला अर्पण करीत आहोत. या अभ्यासासाठी दिलेली फेलोशिप 'थत्ते बापट प्रधान फेलोशिप' या नावाने ओळखली जाईल! आणि एक आवाहन ...

1. या रिपोर्ताजसाठी दिलेल्या फेलोशिपच्या रकमेतून, या पाच तरुणांना पुरेसे मानधन राहिले नाही. त्यांना ते देता यावे असा प्रयत्न आहे.
2. शिक्षण घेणाऱ्या सिद्दी समाजातील मुलामुलींना आणि काही गावांना मदतीची गरज आहे.
3. अशा प्रकारच्या अन्य विषयांवरील अभ्यासासाठी साधनाकडे फेलोशिप मागणारे सात-आठ चांगले प्रस्ताव आलेले आहेत. 

वरील तीनपैकी कोणत्याही कारणासाठी कोणी आर्थिक मदत करू इच्छित असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. 'साधना ट्रस्ट'च्या बँक खात्यावर देणगी स्वीकारता येईल. (साधनाकडे 80 G आहे), नंतर तिची योग्य प्रकारे कार्यवाही होईल, त्याचे सर्व तपशील संबंधितांना कळवले जातील.
धन्यवाद! 

विनोद शिरसाठ, संपादक, साधना 
weeklysadhana@gmail.com
Mob 9850257724

प्रवीण खुंटे (सिद्दी समाज रिपोर्ताजचा समन्वयक)
kpravin1720@gmail.com
Mob : 97302 62119

Tags: सिद्दी समाज आदिवासी डॉक्युमेंटरी कर्नाटक दुर्लक्षित समाज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षण संशोधन लेखमाला उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज Load More Tags

Comments:

Sunil D'mello

खूपच सुंदर माहिती, आपण घेतलेली मेहनत दिसत आहे. काही सिद्दी लोकांनी खेळात बरेच नाव कमावले होते/आहे ह्याबाबत अधिक माहिती आपल्या पुढील लेखांत येईल ही अपेक्षा. मराठी बोलणाऱ्या हबशी लोकांबाबत वाचायला आवडेल. धन्यवाद.

VIJAY KAMBLE

महत्त्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद.

Manoj Sahare

अप्रतिम !

Add Comment

संबंधित लेख