अतिरेकीवादाची मुळे

 मूलतत्ववाद ते अतिरेकीवाद विरोधाचा प्रवास

कर्तव्य साधना

हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या प्रकाशन संस्थेकडून गेल्या वर्षी 'इस्लाम अँड फ्युचर ऑफ टॉलरंस' या मोठ्या नावाचे अगदीच छोटे पुस्तक प्रकाशित झाले, त्याचा मराठी अनुवाद आता साधना प्रकाशनाकडून आला आहे.  हे संपूर्ण पुस्तक संवाद फॉर्म मध्ये आहे. ही चर्चा जरी इस्लामला समोर ठेवून केलेली असली तरी, यातील विवेचन विश्लेषण कमीअधिक प्रमाणात सर्वच धर्मांना लागू होणारे आहे. सर्वाधिक महत्त्वाची बाब अशी की, या पुस्तकातील भूमिका हमीद दलवाई व मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या खूप जवळ जाणारी आहे. आणि आणखी विशेष हे आहे की, हे संवाद वाचताना नरहर कुरुंदकर व हमीद दलवाई यांच्यात झालेल्या संवादांची कल्पना येऊ शकते. या पुस्तकातील हे दुसरे प्रकरण...

हॅरिस- आज आपण अधिक आशावाद मनात बाळगून संभाषण सुरू करू या, कारण आपल्याला अनेक मुद्द्यांवर बोलायचे आहे. पण मुद्द्यांना हात घालण्याआधी आपण तुमची पार्श्वभूमी सांगू, कारण ती फारच रोचक आहे. आपण ज्या समस्यांवर चर्चा करणार आहोत, त्यांविषयी तुम्हाला एवढी माहिती कशी, हे जरा आपल्या वाचकांना सांगता का?

नवाझ- माझ्या ‘रॅडिकल’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या आत्मकथनात माझी जीवनकहाणी विस्तृत स्वरूपात आली आहे, पण इथे मी ती अगदी थोडक्यात सांगतो. मी यू.के.मधील इसेक्स येथे जन्मलो आणि तिथेच लहानाचा मोठा झालो. माझ्या वाढीच्या काळाला मी यू.के.मधील वंशभेदाचा सर्वांत वाईट कालखंड म्हणतो. आमच्या देशातील वांशिक नातेसंबंध स्टीव्हन लॉरेन्सच्या खून खटल्याने बदलले. या खटल्याची सरकारला चौकशी करावी लागली व त्यातून मॅकफर्सन अहवाल तयार झाला. त्या अहवालाने ‘संस्थात्मक वंशवाद’ हा शब्द पहिल्यांदा चलनात आणला आणि निष्कर्ष काढला की, यू.के.च्या पोलीस खात्यात असा वंशवाद आहे. मॅकफर्सन अहवालाने अधिकृतपणे जाहीर केलेला हा फारच मोठा आरोप होता.

मी वयात आलो तो यू.के.च्या सामूहिक मानसिकतेत बदल होण्याच्या अगदी थोडा आधी. त्या वेळी मला नुकती कुठे समज येऊ लागली होती. मी स्वत: संस्थात्मक वंशवादाचा अनुभव अनेकदा घेतला होता आणि त्यामुळे देशातील मुख्य समाजप्रवाहाच्या बाबतीत माझा पूर्ण भ्रमनिरास झालेला होता. मला अनेकदा विनाकारण अटक झाली होती. आमच्या पिढीला कोवळ्या वयात अशा प्रकारचा भेदभाव वारंवार अनुभवास येत होता. त्याच वेळी युरोप खंडाच्या पटलावर बोस्नियात सुरू असलेला वंशसंहारपण नजरेस पडत होता.

साहजिकच, आमची पिढी समाजापासून तुटलेली, असंतुष्ट आणि भ्रमनिरास झालेली पिढी होती. अशा आत्यंतिक अस्मिता-संभ्रमाच्या  (Identity Crisis) संकटातून जात असताना माझी गाठ इस्लामवादी विचारप्रणाली (Islamist Ideology) मानणाऱ्या गटाशी पडली आणि यथावकाश मी त्यांच्यामध्ये सामील झालो. आमचा हिज्ब-उत-तहरीर हा गट क्रांतिकारी स्वरूपाचा होता. आजही तो जगभर सक्रिय असून पाश्चिमात्य देशांत त्याला कायद्याने मान्यता आहे. इस्राईलच्या निर्मितीनंतर मुस्लिमांना जेव्हा पहिल्यांदा अस्मिता-संभ्रम भेडसावू लागला, त्या सुमारास म्हणजे 1953 मध्ये जेरुसलेममध्ये ‘हिज्ब-उत-तहरीर’ची स्थापना झाली.

धर्माधिष्ठित खिलाफत ऊर्फ इस्लामिक स्टेटच्या निर्मितीची संकल्पना लोकप्रिय करणारा तो पहिला गट होता. या गटाच्या सदस्यांचा भर दहशतवादाचा आसरा घेण्यापेक्षा मुस्लिमांचे जनमत आपल्याकडे वळवून त्यांना गटात भरती करून घेण्याकडे असतो. इजिप्त, तुर्कस्तान, पाकिस्तान यांसारख्या मुस्लिमबहुल राष्ट्रांमध्ये लष्करी उठाव घडवून आणून सत्तेवर येणे, हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे.

मी या गटात येऊन दाखल झालो तो एक अत्यंत संतप्त- खरे तर उद्‌ध्वस्त मन:स्थितीतील सोळा वर्षांचा, हिंस्र वांशिक हल्ल्यांचा बळी ठरलेला नवयुवक या रूपात. मात्र माझ्या सगळ्या व्यथा, सर्व तक्रारी या मी नव्याने स्वीकारलेल्या विचारप्रणालीतील हट्टाग्रहांमुळे खूप काळ थिजलेल्या होत्या. मी माझे शब्द फार काळजीपूर्वक निवडतोय. केवळ व्यथा, गाऱ्हाणी आणि तक्रारींमुळे कुणी अतिरेकी होत नाही. व्यथा, तक्रारी हे फक्त अर्धसत्य झाले.

मला काय म्हणायचे आहे ते अगदी नेमक्या शब्दांत सांगायचे तर, पुढीलप्रमाणे मांडावे लागेल : बोस्नियात सुरू असलेल्या वंशसंहाराच्या वेळी पश्चिमी राष्ट्रांनी हस्तक्षेप केला नाही अन्‌ काही मुस्लिम अतिरेकीवादाकडे वळले. याउलट, अफगाणिस्तान आणि इराकमध्ये आपण हस्तक्षेप केला, म्हणून आणखी काही मुस्लिम अतिरेकी झाले. पुनश्च, सिरियाच्या बाबतीत आपण हस्तक्षेप करण्यात कुचराई केली म्हणून अजून काही मुस्लिम अतिरेकी झाले. मात्र, परराष्ट्र धोरणाला दोष देणारा, व्यथा व गाऱ्हाण्यांची भाषा करणारा हा युक्तिवाद म्हणजे पूर्ण सत्य नव्हे. एखादी व्यक्ती अतिरेकी का होते, याचे हे स्पष्टीकरण अपूर्ण होय.

हॅरिस- परराष्ट्रांचा हस्तक्षेप आणि मुस्लिम समाजाचा रोष हा मुद्दा फार अवघड, निसरडा आहे; त्याकडे आपण पुन्हा येऊच. पण मला वाटते की, बोस्नियातील पश्चिमी राष्ट्रांचा हस्तक्षेप हा दोन कारणांनी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा होता. या दोन्ही कारणांमध्ये मुस्लिमांनी नाराज होण्यासारखे काही नव्हते. एक म्हणजे, या हस्तक्षेपासाठी आम्हाला कुठल्याही मुस्लिम राष्ट्रावर आक्रमण करण्याची गरज पडणार नव्हती. दुसरे म्हणजे, हस्तक्षेप केलाच तर मुस्लिमेतर लोकांवर बॉम्बहल्ला करावा लागणार होता, मुस्लिमांवर नाही. नजीकच्या काळात झालेल्या सशस्त्र संघर्षांचा अनुभव असे सांगतो की, वरील दोन परिमाणांपैकी एक जरी बदलले, तरी खूपशा मुस्लिमांना अशी कार्यवाही हा पवित्र इस्लामवरचा अपवित्र हल्ला वाटतो; मग पश्चिमी सत्तांनी लक्ष्य केलेला शत्रू किती का वाईट आणि धर्मनिरपेक्ष असेना!

अशा पेचाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सद्दाम हुसेन. हा धर्मनिरपेक्ष जुलमी हुकूमशहा अख्ख्या जगाच्या तिरस्काराचा विषय होता. पण ज्या क्षणी मुस्लिमेतर राष्ट्रांनी एकत्र येऊन त्याच्यावर हल्ला चढवला, त्या क्षणी ‘इस्लामच्या पवित्र भूमीवर काफिर हल्ला चढवत आहेत’, असे म्हणत जवळजवळ अख्खे मुस्लिम जगत चवताळून उठले. हे मान्य की, इराकी युद्धास विरोध करावा अशी अनेक आणि पूर्णपणे वैध कारणे अस्तित्वात होती; परंतु सद्दामवर हल्ला हे त्यांपैकी नव्हते. धर्मश्रद्धेतील एक समस्या म्हणजे धर्मामुळे दर वेळी निष्कारणच स्वधर्मीयांमध्ये परस्परनिष्ठा आणि परधर्मीयांविषयी आकस निर्माण होतो; मग स्वधर्मीय किती का भ्रमिष्टासारखे वागेनात! मी तर म्हणेन की, आम्ही जेव्हा खरोखरच पूर्णपणे मानवतेच्या दृष्टिकोनातून बोस्नियात हस्तक्षेप केला, तेव्हा आम्हाला त्याचे फारसे श्रेय मिळाले नाही.

नवाझ- अगदी खरे. मी मुस्लिमांच्या व्यथा आणि गाऱ्हाणी यांचा उल्लेख केवळ यासाठी केला, कारण ती दुखऱ्या तरुण मुलांचा बुद्धिभेद करण्यासाठी उपयोगी पडतात.  प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे स्वयंसेवक गाऱ्हाणी, व्यथा यांचा वापर करून एखादी हट्टाग्रही विचारप्रणालीसुद्धा तीव्र अस्मिता-संभ्रम अनुभवणाऱ्या तरुणांच्या गळी उतरवू शकतात. एकदा हे हट्टाग्रह मनात रुजले की त्या व्यक्तीचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन साचेबद्ध होतो; तिला इतरांचे वागणे ग्रहण करण्याची विशिष्ट नजर प्राप्त होते. आता याच हट्टाग्रहांचा नवी भरती करण्यासाठी साधन म्हणून उपयोग करता येतो. हट्टाग्रह हीच बोलण्याची भाषा होऊन बसते. हे सारे समजून घेणे गरजेचे आहे, कारण कुठली ना कुठली गाऱ्हाणी कायमच अस्तित्वात असतात. अनादिकालापासून ती आहेत आणि अनंत काळापर्यंत ती राहणार आहेत.

इतर समाजांनासुद्धा गाऱ्हाणी, तक्रारी, व्यथा यांचा सामना करावाच लागतो; पण विचारप्रणालीशी संबंधित असे हे विशिष्ट घटित एका ठरावीक संदर्भात उदयास आले आहे. उदाहरणार्थ, मूलतत्त्ववादाच्या प्रसारासाठी आपण सहसा दारिद्र्य आणि शिक्षणाचा अभाव या दोन दुरितांना जबाबदार धरतो. परंतु अभ्यासकांना खूप पूर्वीच ठाऊक झाले आहे की, बहुतांश दहशतवादी हे उच्चशिक्षित आहेत. सांगायचा मुद्दा हा की, वयाच्या सोळाव्या वर्षी मी जी विचारप्रणाली आणि पर्यायाने दृष्टिकोन अंगीकारला, त्याने माझी गाऱ्हाणी गाण्याची वृत्ती थिजून त्याचे परिवर्तन हट्टाग्रहांत झाले. त्यानंतरच मी फार त्वेषाने हिज्ब-उत-तहरीरसाठी भरतीचे काम सुरू केले. धर्माधिष्ठित खिलाफत ऊर्फ इस्लामिक स्टेट या संकल्पनेचा प्रसार करण्यात माझा मोठा वाटा होता, हे मी कबूल करतो.

हॅरिस- या तुमच्या संकल्पना तुम्हाला फक्त यू.के.मध्ये लोकप्रिय करायच्या होत्या, की संपूर्ण जगात?

नवाझ- अख्ख्या जगात. हिज्ब-उत-तहरीर हा गट जेरुसलेममधून जॉर्डनमध्ये पसरला. तिथून सिरिया व इराकमध्ये आणि यथावकाश इजिप्तमध्ये जाऊन पोचला. त्यानंतर मध्यपूर्वेच्या मार्गाने तो पश्चिमेत, तिथून जर्मन मुस्लिमांच्या मार्फत तुर्कस्तानात आणि फ्रेंच मुस्लिमांच्या मार्फत उत्तर आफ्रिकेत पसरला. ब्रिटनमधील भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या माध्यमातून तो दक्षिण आशियापर्यंत जाऊन पोचला. मी स्वत: आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘भरती आयोजक’ (recruiter) या नात्याने क्रांतिकारी इस्लामवादाची निर्यात ब्रिटनमधून पार पाकिस्तान, डेन्मार्क आणि इजिप्तमध्येसुद्धा केली.

युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या ‘स्कूल ऑफ ओरिएन्टल अँड आफ्रिकन स्टडीज’मध्ये 1999 मध्ये कायदा आणि अरेबिकमध्ये पदवी घेत असताना ती अर्धवट सोडून मी हिज्ब-उत-तहरीरच्या आदेशावरून एक वर्षासाठी पाकिस्तानला गेलो. तेथे आमच्या गटाची शाखा उघडणे, हा माझ्या दौऱ्याचा हेतू होता. आदल्याच वर्षी पाकिस्तानने अणुचाचणी केली होती आणि आमच्या जागतिक नेत्यांमध्ये अणुबॉम्बधारी खिलाफत बनण्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाली होती.

आम्ही कुठेही आमच्या संस्थेची पाळेमुळे रुजवण्यास सुरुवात केली, तरी आमचे लक्ष्य हे नेहमी लष्करी अधिकारीच असायचे; जेणेकरून आम्ही त्या देशात लष्करी उठाव घडवून आणू शकू.  पाकिस्तानातून परतल्यानंतर 2000 मध्ये मी ब्रिटनच्या सँडहर्स्ट रॉयल मिलिटरी ॲकॅडेमीमध्ये शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी व्यक्तिश: संभाषण करायचो. तेव्हापासून पाकिस्तानने लष्करी उठावाचे अनेक अयशस्वी प्रयत्न बघितले आहेत. त्यांतील काहींविषयी वृत्तपत्रांत छापूनही आले होते.

त्यादरम्यान मी लंडनमध्ये पुनश्च पदवीचा अभ्यास सुरू केला होता, परंतु दर शनिवार-रविवार कोपनहेगनला आमच्या संस्थेची डॅनिश-पाकिस्तानी शाखा उघडण्याच्या कामासाठी जा-ये करत होतो. मला 2001 मध्ये माझ्या अरेबिक भाषेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून इजिप्तला जावे लागले. ट्वीन टॉवरवरील 9/11 च्या हल्ल्याच्या एक दिवस आधी मी इजिप्तमध्ये येऊन थडकलो. या हल्ल्यांचे गांभीर्य फारसे लक्षात न आल्याने मी माझे संस्था-भरतीचे काम संपूर्ण इजिप्तमध्ये सुरूच ठेवले होते. एप्रिल 2002 मध्ये माझ्या अलेक्झांड्रियातील घरावर इजिप्त सरकारच्या राज्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी धाड टाकली. माझ्या मुसक्या आवळून, डोळ्यांवर पट्टी बांधून मला कैरोस्थित सुरक्षा मुख्यालयात नेण्यात आले. तिथे विजेचे झटके देऊन इतर अनेक कैद्यांचा छळ होत असलेला मला दिसला. त्या वेळी मी चोवीस वर्षांचा होतो.

इजिप्तमधील माझरा तोरा नावाच्या तुरुंगात माझी पाच वर्षांसाठी राजकीय कैदी म्हणून रवानगी झाल्यानंतर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने मला प्रिझनर ऑफ कॉन्शन्स (कुठल्याही प्रकारची हत्या न केलेला राजकीय कैदी) म्हणून पंखाखाली घेण्याचे धाडसी पाउल उचलले. संस्था आमच्या श्रद्धा-विश्वासांशी सहमत नसली, तरी तिचे म्हणणे होते की, इजिप्तमध्ये आमच्या हातून कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडलेला नव्हता. ते खरेच होते. शिवाय ब्रिटनमध्ये हिज्ब-उत-तहरीर या आमच्या गटास कायद्याने मान्यता होती. मी ब्रिटनमध्ये असतानाच या गटाचे सदस्यत्व घेतले होते.

इजिप्तमधील या तुरुंगात मी हर एक प्रकारच्या इस्लामवादींच्या सहवासात आलो; इजिप्तचे भूतपूर्व अध्यक्ष अन्वर सादत यांचा मारेकरी, ते तुरुंगात डांबलेला इजिप्तमधील मुस्लिम ब्रदरहूडचा जागतिक नेता मुहम्मद बदेई, इथपर्यंत इस्लामवादींचे अनेक नमुने मला या तुरुंगात बघायला मिळाले. वयाच्या सोळाव्या वर्षी अतीव उत्साहाने जे ध्येय मी उराशी कवटाळले आणि जी विचारधारा स्वीकारली, ती खऱ्या अर्थाने जाणून घेण्याचा प्रयत्न मी या तुरुंगात केला.

तुरुंगात इतर कैद्यांबरोबर माझ्या प्रदीर्घ चर्चा व्हायच्या. त्या माझ्या आधीच्या श्रद्धा-विश्वासांपासून काहीशा दूर सरकू लागल्या होत्या. त्याच वेळी ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेचे कार्यकर्ते आमच्यापर्यंत पोचू लागले होते. या दोन्हींच्या संयुक्त प्रभावाखाली माझा प्रवास धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी, मानवी हक्कांच्या पायावर आधारलेला दृष्टिकोन अंगीकारण्याकडे सुरू झाला- एक प्रदीर्घ, लांबवरचा प्रवास! 2006 मध्ये माझी मुक्तता करण्यात येऊन मला लंडनला परत पाठवण्यात आले.

2008 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच मी आणखी काही सहकाऱ्यांबरोबर ‘क्विलिअम’ ही संस्था स्थापन केली आणि तिचा अध्यक्ष झालो. अतिरेकीवादाच्या विरोधात काम करणारी जगातली ही पहिली संस्था होय.

(अनुवाद: करुणा गोखले)
 

वाचा या पुस्तकाचे पहिले प्रकरण:

इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य: एक सुसंवाद

Tags: Majid Nawaz Islam New Book मजीद नवाझ सॅम हॅरिस इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य नवे पुस्तक अनुवाद इस्लाम Load More Tags

Comments:

Sudam Gopal Sutar

लेखन उत्कृष्ठ आहे सर

Add Comment