गणपतराव सर्वांना आवडले… पेलवले का नाहीत? 

शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने... 

गणपतराव देशमुख 30 जुलै 2021 रोजी आपल्यातून निघून गेले. त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926चा. जवळपास 95 वर्षं ते समृद्ध जगले. सोलापूर जिल्ह्यातला सांगोला तालुका हा त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ होता. त्या मतदारसंघातून ते अकरा वेळा विधानसभेत निवडून गेले. हा भारतीय राजकारणातला मोठा विक्रम होता. तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या तोडीची गणपतरावांची संसदीय कारकिर्द होती. 3 ऑगस्ट 1947 रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली होती, म्हणजे स्थापनेपासून मृत्यूपर्यंत गणपतराव या पक्षातच राहिले. कणा ताठ ठेवून त्यांनी लोकांसाठी अहोरात्र काम केलं.

गणपतरावांचा पोशाख साधा होता. पांढरा शर्ट, पांढरी पँट, हातात बॅग. बॅगेत कागदपत्रं असत. आमदारांची आजची प्रतिमा वेगळी आहे. गणपतरावांनी साधेपणाचं व्रत आयुष्यभर पाळलं. गणपतरावांचं निधन झाल्यानंतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, अभ्यासकांनी आणि पत्रकारांनी त्यांच्याविषयी भरभरून लिहिलं. त्यांचा साधेपणा, त्यांचा प्रमाणिकपणा, त्यांचं मूल्याधिष्ठित राजकारण, त्यांचं माणूस म्हणून मोठेपण यांविषयी न्यूज चॅनल्स, वर्तमानपत्रं आणि सोशल मिडिया यांमध्ये भरभरून लिहून आलं आहे.

गणपतरावांची तरुणपणातली जडणघडण एका भारावलेल्या वातावरणात झाली. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गणपतराव तरुण विद्यार्थी होते. पंढरपुरात हायस्कूलला होते. देशात महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचा बोलबाला होता. नवा भारत घडवण्यासाठी सर्व विचारधारांचे प्रतिनिधी कामाला लागले होते. काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, उजवे, आंबेडकरवादी हे सर्वच आदर्शवादी राजकारणाचे समर्थक होते. कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा याचे पायंडे पाडले होते. अशा आदर्श वातावरणात गणपतराव नवा समतावादी भारत घडवण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या मार्क्सवादी विचारधारेनं झपाटले. काँग्रेस पक्षाशी मतभेद झालेले शंकरराव मोरे, केशवराव जेधे या नेत्यांनी मार्क्सवादाची तात्त्विक बैठक असलेला  शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) स्थापन केला. विद्यार्थिदशेतील देशमुखांनी या पक्षात प्रवेश केला. 

पंढरपुरात समाजवादी नेते बापू काळदाते हे गणपतरावांचे वर्गमित्र होते. गणपतराव पुढे पुण्यात एसपी कॉलेजला पदवीधर झाले. नंतर पुण्यातूनच आयएलएस लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. पुण्यातल्या शिक्षणात एसपी कॉलेजला शरद पवार यांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार हे गणपतरावांचे वर्गमित्र होते. शेतकरी कामगार पक्षात भाई एन.डी. पाटील हे गणपतरावांचे समकालीन नेते राहिले होते.

स्वातंत्र्य मिळालं होतं. आता सर्व जाती-जमातींच्या, धर्मांच्या गरिबांना सन्मानानं जगता येईल असा भारत घडवायचा, त्या आदर्श ध्येयासाठी अहिंसक मार्गानं संघर्ष करायचा असं उद्दिष्ट शेकापनं ठरवलं. शेवटच्या श्वासापर्यंत गणपतराव शेकापचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून जगले.

गणपतराव एसटीनं प्रवास करत. मुंबईत आमदार निवासात घरून आणलेली भाकरीभाजी खात. हॉटेलात जेवत नसत. ज्वारीची भाकरी आणि भाजी हे त्यांचं आवडतं जेवण होतं. आमदार निवासात आमदारांना वर्तमानपत्रं दिली जातात. गणपतराव त्या वर्तमानापत्रांची रद्दी जीव लावून साठवून ठेवत आणि ती विकून त्याचे पैसे राज्य सरकारकडे जमा करत. स्वतःचे बूट स्वतः घेऊन जात आणि बूट पॉलीशवाल्याकडून पॉलीश करून घेत. पॉलीशवाला म्हणे, ‘आबाऽ मी येईल की बूट न्यायला. तुम्ही कशाला येता?’ त्याला गणपतराव म्हणत, ‘नको. माझं काम मीच केलं पाहिजे.’ 

गणपतराव दोनदा राज्यमंत्रीमंडळात मंत्री होते. मंत्रिपद गेलं की ते सरकारी गाडी जिथं असेल तिथं सोडून देत. ड्रायव्हरला सांगत, ‘मी घरी जातो, तू गाडी मुंबईला घेऊन जा.’ सरकारी बंगला ते तत्काळ रिकामा करत. मंत्रिपदी असताना सरकारी बंगल्यात कुटुंबाला आणत नसत. त्याविषयी त्यांचं म्हणणं असे - मंत्री आज आहे, उद्या नाही. शिवाय मुंबईत कुटुंबाचा खर्च परवडत नाही. जे परवडत नाही ते करायचं नाही. ते पत्नीला घरखर्चाला दर महिन्याला पाचशे रुपये देत. त्यावर त्यांचं कुटुंब चाले.

सांगोल्यात गणपतरावांच्या घरी गेलं की लक्षात येई, वर्षानुवर्षं तसंच घर. तेच टेबल, खुर्ची, टेलिफोन, फर्निचर तेच. काही बदल नाही. सकाळी सात वाजता त्यांची दिनचर्या सुरू होई. लोक भेटायला येत. सरकारी योजना लोकांपर्यंत जाव्यात यावर त्यांचा कटाक्ष असे. वर्षातून एकदा ते मतदार संघातल्या सर्व गावांचा दौरा करत. बहुधा विधीमंडळाचं अधिवेशन झालं की तो दौरा असे. या दौऱ्यात प्रत्येक गावातल्या लोकांशी बोलून ते आमदार निधी वाटून टाकत. लोकांच्या जशा मागण्या असत तशी तातडीनं कामं करवून घेत.

गावदौऱ्यात मी एकदा त्यांच्यासोबत गेला होतो. प्रत्येक गावात तरुण ते वयोवृद्ध, महिलांपासून तर शाळेतल्या मुलांपर्यंत सर्व जण बैठकांत सहभागी होत. तेव्हा तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, बीडीओ अशी सर्व सरकारी यंत्रणा हजर असे. गणपतराव बैठकांत मोजकं बोलत. फटाफट निर्णय घेत. सर्वांना गणपतरावांबद्दल खूप विश्वास होता. महिलांचे प्रश्न प्रथम ऐकून घेत आणि त्वरित सोडवत. पिण्याचं पाणी, शाळांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देत. 

काही कार्यकर्ते रुसले तर गणपतराव त्यांच्या खास स्टाईलमध्ये विचारत, ‘तुम्हाला काय कमी पडले?’ गणपतरावांनी दखल घेतली की मग रुसलेले कार्यकर्ते रुसवा संपवून खुलत आणि बैठकांत सहभागी होत. आपलं गाऱ्हाणं सांगत. त्यावर तत्काळ निर्णय होई. गटतट गावात असे. कोण कोणत्या गटाचा, कोणा कार्यकर्त्यांच्या काय काय खोडी आहेत हे गणपतरावांना तोंडपाठ असे. पण ते कार्यकर्त्यांचा कधीही सार्वजनिक पाणउतार करत नसत. सर्वांना सांभाळून घेत. ते केवळ तालुक्याचे आमदार, लोकप्रतिनिधी नव्हते तर पालक होते. त्यांना लोक आबा म्हणत. घरातला कर्ता पुरुष म्हणजे आबा. गणपतरावही सांगोला तालुक्यातल्या कुटुंबाचं कर्तेपण आयुष्यभर निभावत राहिले.

गणपतराव धनगर समाजात जन्मले. त्यांचं आडनाव देशमुख त्यामुळे महाराष्ट्रात त्यांची जात सहसा कळत नसे. आपण धनगर आहोत याचा न्यूनगंड गणपतरावांना कधीही नव्हता. सांगोल्यातल्या मतदारांमध्ये धनगर-मराठा समाजाची बहुसंख्या आहे. या दोन्ही समाजांना गणपतरावांनी बरोबरीनं वागवलं. तालुक्याच्या सत्तेत बरोबरीची हिस्सेदारी बहाल केली शिवाय इतर ओबीसी, दलित, अल्पसंख्याक यांना सत्तेत योग्य तो वाटा दिला. सर्व जाती आपल्या पक्षात येतील, त्या-त्या जातीतले गुणवान, कर्तबगार कार्यकर्ते पुढे येतील असं त्यांचं धोरण होतं. या धोरणामुळे सांगोल्यात जातिवाद कधी बोकाळला नाही. कधी जातीय दंगली झाल्या नाहीत. सांगोल्यात गुन्हेगारीचं प्रमाण अल्प आहे. राजकारणात गुन्हेगारांना प्रतिष्ठा देण्यास त्यांनी सतत नकार दिला. त्याचे सकारात्मक परिणाम सांगोल्यात आजही दिसतात.

सांगोला हा महाराष्ट्रातला सर्वाधिक दुष्काळ असलेला तालुका. या तालुक्यात डाळिंब, बोरं या फळबागांना गणपतरावांनी जाणीवपूर्वक चालना दिली. शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांच्या पालनासाठी पूरक योजना राबवल्या. गो-पालनाला, दुग्धव्यवसायला चालना दिली. त्यातून सांगोल्याचं अर्थकारण दुष्काळ आणि पाणीटंचाई असूनही बदललं. सामान्य शेतकऱ्यांच्या घरात पैसा आला. पक्की घरं झाली, सगळीकडे सिमेंट काँक्रीटची घरं आली. शिक्षण क्षेत्रात हा परिसर पुढे झेपावला. सांगोला तालुक्यात गेल्या पन्नास वर्षांत शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सैनिक, पोलीस यांची संख्या गावागावांत वाढली त्यामुळे या तालुक्याचा चेहरामोहरा बदलला.

गणपतराव कार्यकर्त्यांना सभेत सांगत, ‘आपला भाग दुष्काळी आहे त्यामुळे अल्प पाण्यात जी पिकं येतील ती घ्या. फळबागा फुलवा. शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळवा. काटकसरीनं राहा. आहे त्या परिस्थितीवर आपल्याला मात करायचीय. स्वतःचं, कुटुंबाचं जीवन सुखी करायचंय.’

इतक्या सोप्या शब्दांत गणपतराव लोकांना समाजवाद सांगत असत. शेकापच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याची त्यांची खास पद्धत असे. भांडवलशाही, मार्क्सवाद, साम्राज्यवाद, कम्युनिझम असे शब्द न वापरता ते साम्यवादी तत्त्वज्ञान लोकांना सांगत. त्यानुसार वागण्याचं आवाहन करत. लाल झेंडा आणि क्रांती यांचा परिचय करून देत.

निवडणुकीचं राजकारण आदर्श कसं असू शकतं याचं दर्शन सांगोल्यात प्रत्येक निवडणुकीत होत असे. राजकारणात गुन्हेगार, पैसा, दारू, गुंड, जातीयवाद यांचा प्रभाव वाढत होता. तेव्हा त्या अपप्रवृत्तींना गणपतरावांनी स्वतःच्या चांगुलपणानं थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. याविषयी सविस्तर लिहिता येऊ शकेल. गणपतरावांची निवडणूक राज्यात सर्वांत कमी पैशात लढवली जाई. अपप्रवृत्ती नाहीच्या बरोबर असत. गावोगाव त्यांनी आदर्श राजकारण, निवडणुका यांविषयी आपल्या आचरणातून खूप मोठं प्रबोधन केलं होतं. तरीही काळ बदलतोय याची कल्पना त्यांना होती.

गणपतराव गेले तेव्हा सर्वांनी त्यांच्या राजकीय मॉडेलची वाहवा केली. त्यांचं राजकीय व्यक्तिमत्त्व सर्वांना आवडत होतं पण गणपतराव आपल्या समाजाला पेलवले का हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे. गणपतराव हे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू, तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी, केरळचे माजी मुख्यमंत्री नंबुद्रीपाद यांच्या तोडीचे नेते होते. तसं राजकारण त्यांनी केलं. विधानसभेत गणपतरावांचा दबदबा असे. दुष्काळ, पाणी, शेती, फळबागा, रोजगार हमी योजना, महागाई, शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयांचा विचार करून गणपतरावांनी विविध योजना, आदर्श धोरणं आखण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडलं. त्याचा राज्याच्या जडणघडणीत मोठा प्रभाव पडलेला दिसतो.

एन.डी. पाटील, केशवराव धोंगडे, दत्ता पाटील, दि.बा. पाटील, मृणालताई गोरे, दत्ता देशमुख, माधवराव गायकवाड अशा डाव्या, समाजवादी नेत्यांच्या फळीतले गणपतराव हे एक आघाडीचे नेते होते. आदर्श, वैचारिक भूमिका घेणारांना राजकारण जमत नाही हा आरोप त्यांनी स्वतःपुरता खोटा ठरवला. आदर्श वैचारिक भूमिका आणि जनतेचं निवडणुकीचं संसदीय राजकारण या दोन्ही आघाड्यांवर यश मिळवता येतं हे त्यांनी सिद्ध केलं.

राजकारण बदलतंय हे त्यांना कळत होतं. भ्रष्टाचार, पैशाची शिरजोरी, कंत्राटदार लॉबीचं वर्चस्व, भांडवलदारांचा वरचश्मा हे सारं त्यांनी बघितलं. त्याविषयी विचारलं तर ते म्हणत, ‘हा काळाचा महिमा आहे.’ त्यांचा शेतकरी कामगार पक्षही बदलला. ते त्यांना पटत नव्हतं त्यामुळे त्यांनी अपप्रवृत्तीला स्वतःच्या परिघात येऊ दिलं नाही. अंधारातल्या दिव्यासारखे ते शेवटपर्यंत तेवत राहिले.

- राजा कांदळकर
rajak2008@gmail.com

Tags: व्यक्तिवेध राजा कांदळकर गणपतराव देशमुख राजकारण समाजकारण Raja Kandalkar Ganpatrao Deshmukh Politics Society Load More Tags

Comments: Show All Comments

नरेंद्र महादेव आपटे

दिवंगत आमदार श्री गणपतराव देशमुख यांच्या कार्य कर्तृत्वाबद्दल लिहिलेला लेख वाचनीय आहे. या संदर्भात माझ्या मनात आलेले विचार: देशमुख यांच्या सारखे विरोधी पक्षातील अनेक आमदार प्रमाणक होते. त्यांनी संपत्ती करण्याचा मोह पूर्णपणे टाळला. परंतू आता जमाना बदलला आहे. तरुण मतदार त्याच्या भवितव्याचा विचार करतो आणि ते आपण समजून घेतले पाहिजे. लोकशाही समाजवाद बहुसंख्यांना एक ओझे वाटण्या इतका परका झाला आहे का हा माझा सवाल आहे. मतदारांच्या मानसिकतेतील बदलांचा फटका प्रा मधू दंडवते यांच्या सारख्या विद्वान व्यक्तींना पण बसला. प्रा दंडवते यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव एका परीने काळाचा महिमा होता आणि एका परीने तो पराभव लोकशाही समाजवादाचा पण पराभव होता. गणपतराव देशमुख यांचा पराभव झाला नाही पण ते नव्या पिढीवर कितीसा प्रभाव टाकू शकले? डाव्या विचारांच्या सर्वांनी कठोर आत्म निरीक्षण करण्याची गरज आहे. तसे होणार आहे का?

हिरा

2008 साली आमचे अनुदानित महाविद्यालय व्यवस्थापनाने मनमानीपणे बंद केले .त्यानंतर आम्ही विविध मार्गांनी आमचे आंदोलन सुरू ठेवले .विधानसभेत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालय सुरू करण्याचे आश्‍वासनही दिले. परंतु न्यायालयीन लढाईत पुढील सर्व प्रक्रिया थंड पडली .ह्या काळात आम्ही अनेकजणांना भेटलो, निवेदने दिली परंतु आमचे निवेदन अतिशय काळजीपूर्वक वाचणारी एकच व्यक्ती आम्हाला भेटली ती म्हणजे आदरणीय गणपतराव देशमुख! त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

जयप्रकाश सावंत

भारावून टाकणा-या व्यक्तिमत्त्वावरचा अतिशय सुंदर लेख.

subhash Ranade

गणपतराव देशमुख जिस नस्ल के प्रतिबद्ध नेता थे , उस नस्ल के नेता-कार्यकर्ताओं की नस्ल अब लगभग विलुप्त हो चुकी हैं ।मेरी विनम्र श्रद्धांजलि ।

Raja pande

अतिशय वास्तवदर्शी महत्वाची मांडणी केली आहे.

Dr Rajan Tungare

This is the rarest example of simplicity and humility. Such representatives are the pillars of our democracy. He was truely the people's representative. Salute to him.

Maruti Sherkar

Legendary.. Exceptional.. This article compels us to be simple and ground to earth for the wellbeing of our poor and needy masses..

Add Comment