मनाला वेढून राहिलेल्या अस्वस्थतेचं ओझं कमी करण्यासाठी लेखन करतो

माझा कथालेखनाचा अनुभव - 2

महाराष्ट्राला दिवाळी अंकांची मोठी परंपरा आहे. दरवर्षी अक्षरशः शेकडो दिवाळी अंक प्रकाशित होतात आणि त्यांतून असंख्य कथाही प्रसिद्ध होतात... मात्र कथालेखनामागे असणारी लेखकाची अस्वस्थता, त्याचे चिंतन यांविषयी क्वचितच लिहिले जाते. त्यामुळे 'माझा कथालेखनाचा अनुभव' याविषयावरील दोन लेख कर्तव्य साधनावरून प्रसिद्ध करत आहोत. इंदुमती जोंधळे यांचा लेख काल प्रसिद्ध झाला. त्याच मालिकेतील रफीक सुरज यांचा हा लेख.

लेखक, कवी, समीक्षक म्हणून परिचित असणारे रफीक सूरज यांच्या कथा श्रमिक, कष्टाळू, सोशिक समाजाचा वेध घेताना दिसतात. ते साहित्य अकादमीमध्ये मराठी भाषा सल्लागार सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आभाळ, बेबस, पायाड हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत तर रहबर ही कादंबरी, सोंग घेऊन हा पोर हा कवितासंग्रह, महानगरीय कविता: नवे वळण, नवे परिणाम, आवडनिवड हे समीक्षालेखन प्रसिद्ध आहे. रफिक यांनी त्यांच्या कथालेखनाच्या आंतरिक उर्मिविषयी या लेखात मांडणी केली आहे. 

मी का लिहितो? माझ्या लेखनाच्या प्रेरणा कोणत्या? यांसारख्या प्रश्नांची नीट उकल होण्याआधीच न कळत्या वयात म्हणजे शालेय जीवनात माझ्या लेखनाची सुरुवात झाली आहे. पाठ्यपुस्तकातील कवींना समोर ठेवून 'ट' ला 'ट' लावून लिहिलेल्या काही बालकविता स्थानिक दैनिकांच्या रविवार पुरवणीतून छापून आल्या होत्या. तर सतराव्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 1987च्या ‘साप्ताहिक सकाळ’च्या अंकात ‘एक रुपया’ ही माझी पहिली कथा प्रसिद्ध झाली. या कथेनं मला मानधनाचे चक्क पन्नास रुपये मिळवून दिले होते. माझ्या आयुष्यातील ही पहिली मिळकत. त्यामुळे या कथेचं मला कायम कौतुक वाटत आलं आहे. 

कथा छापून आलेला तो अंक माझ्या घरच्यांना, नातेवाइकांना आणि मित्रांना मोठ्या हौसेनं दाखविला होता. वारंवार कथेचं पान उघडून त्या छापील अक्षरांवरून मी पुढे कितीतरी दिवस कौतुकाने हात फिरवत राहिलो होतो. पुढे वेगवेगळ्या कथा-कविता स्पर्धांमधून बक्षिसं मिळाली. ‘साप्ताहिक स्वराज्य’ या विनोदी कथास्पर्धेसाठी मी विनोदी कथा लिहिली आणि त्या कथेला प्रथम क्रमांकही मिळाला. वेगवेगळ्या मासिकांतून - दिवाळी अंकांतून लेखनाला प्रसिद्धी मिळत गेली. मी माझ्या वकुबाप्रमाणे जमेल तसं सातत्य राखतराखत माझा लेखनप्रपंच मांडत गेलो.

लेखनाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मी पुष्कळ कथा-कविता लिहिल्या. ते सगळंच उत्साहाच्या भरात केलेलं होतं, असं मात्र म्हणता येणार नाही. थोडीशी आत्मप्रौढी पत्करून मी असं म्हणेन की, माझ्या लेखनाबाबत मी पुरेसा सजग होतो. वयाच्या विशीच्या टप्प्यापर्यंत मराठी अणि हिंदीतील अनेक महत्त्वाचे लेखक मी वाचलेले होते. प्रेमचंद, निराला, हरिशंकर परसाई, महादेवी वर्मा, कर्तारसिंग दुग्गल, अमृता प्रीतम, भीष्म साहनी- अशा अनेक हिंदी लेखकांची पुस्तकं माझ्या वडिलांच्या संग्रही माझ्या घरातच होती. संत कबीर आणि प्रेमचंद हे वडिलांचे आवडते लेखक. त्यांचे अनेक संदर्भ वडिलांच्या तोंडून सतत कानांवर पडायचे. वडिलांचे जवळचे एक मित्र बालसाहित्य लिहायचे. त्यांच्यामुळेही वाचनाचे वेड वाढले. भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणे, ताम्हणकरांचा गोट्या याबरोबरच सुधाकर प्रभू यांच्या बालकादंबऱ्या वाचल्या होत्या. किशोर-छावा-रानवारा-टॉनिक-चांदोबा वगैरेचा प्रत्येक अंक वाचून व्हायचा. 

माझ्या थोरल्या मामांना गुलशन नंदांसारखे पॉकेट कादंबऱ्या लिहिणारे लोक आवडायचे. त्यांची कपाटेच्या कपाटे अशा लेखकांच्या कादंबऱ्यांनी भरली होती. मी ते झपाटल्यासारखा वाचायचो. विशेषत: गुलशन नंदांच्या अनेक कादंबऱ्या या चित्रपटांच्या कथा असायच्या. अगदी या टप्प्यावर नेमाडे, ग्रेस, जीए, आनंद यादव, सुर्वे, शंकर पाटील, इंदिरा संत, व्यंकटेश माडगूळकर, महानोर, कानेटकर - शिरवाडकर अशांबरोबरच अर्नाळकर-बाबा कदम-शिरवळकर अशा वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तींच्या लेखकांचं ग्रंथवाचन होत गेलं. त्यामुळे वाचनाचा अमुकच एक ‘ट्रेंड’ अशी काय भानगड नव्हती. मला कोणत्याही प्रकारचं वाचन वर्ज्य नव्हतं. एका स्थानिक दैनिकाच्या रविवारच्या पुरवणीत हमखास एक शृंगारिक कथा छापून यायची. ती कथाही मी अधाशासारखा वाचून काढायचो. वाचनाचे इतके बारीक-सारीक तपशील देण्याचं मुख्य कारण म्हणजे, माझ्या या अरभाट व बेशिस्त वाचनामुळे माझ्या लेखनाला निश्चितच एक वेगळं आत्मभान येत गेलं असावं. त्यामुळे माझ्या लेखनाची काही अंशी का होईना, तटस्थतेने चिकित्सा करणं मला जमत गेलं असं वाटतं. 

साहित्यिक कळप हाताशी धरून प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या सवंग वृत्तींपासून मला दूर राहता आलं. हाताशी पंधरा-सोळा कथा साचल्या आणि आपला एक कथासंग्रह यावा, असं मला वाटलं. पण त्या अनुषंगानं एखाद्या जाणकाराचा सल्ला घ्यावा, असं काही मला सुचलं नाही. मी थेट साहित्य संस्कृती मंडळाकडे कथांचं बाड पाठवलं. मंडळाच्या पुण्याईने अनुदान योजनेतून माझा ‘आभाळ’ हा कथासंग्रह 1990 मधे प्रकाशित झाला. त्या वेळी मी वयाने वीस वर्षांचा होतो.

एक गोष्ट मला या ठिकाणी विशेषत्वाने नोंदवली पाहिजे. मी बेताचीच आर्थिक स्थिती असलेल्या पण शिक्षकी पेशा असलेल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो. इतरांच्या तुलनेत मला गरिबीचे चटके फारसे अनुभवास आले नाहीत. त्याबरोबरच श्रीमंतीही कधी चाखता आली नाही. आईवडील दोघांच्याही नोकऱ्या ग्रामीण भागातच झाल्या. त्यामुळे घरातूनच खेड्या-पाड्यांतील रीतिरिवाजांचा खूप मोठा पगडा आणि संस्कार आम्हां भांवडांवर होत आलेला. नोकरीतील बदल्या, शिक्षण अशा अनेक कारणांमुळे अनेक गावांतून वास्तव्य करावं लागलं, तरी कोल्हापूर जिल्हा कधी सोडावा लागला नाही. 

कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांचं संस्थान. महाराजांनी रुजवलेल्या सांस्कृतिक एकोप्याच्या रोपट्यामुळे अजूनही आमच्याकडे तीव्र टोकाची धार्मिक अथवा जातीय तेढ अनुभवास आली नाही. सर्व जाती-पाती आणि धर्मीय लोकांच्या आम्ही कायम सहवासात राहिलो. कधीही परकेपणाचा भाव अनुभवास आला नाही. शाहू महाराजांच्या कृपेमुळे हिंदू-मुस्लिम समन्वयच कायम वाट्याला आला. गावातले सर्व उत्सव, जत्रा, उरूस, सण सर्वांनी एकत्रच मिळून साजरे केले जायचे. गावातले बहुतांश रीतिरिवाज प्रत्येक घरी सारखेच असायचे. त्यामुळे आम्हांला ‘मुसलमान’ असणं म्हणजे वेगळं काही असण्याची ओळख कधी जाणवलीच नाही. पोशाख, खान-पान, शेती, मोलमजुरी अशा सर्वच पातळ्यांवर कुठेही वेगळेपणा नव्हता. घरात दखनी बोलणारे आम्ही लोक अमच्या नातेवाइकांना पत्रं मात्र मराठीत लिहायचो. कारण बहुतेक जणांचं शिक्षण मराठी माध्यमातच झालेलं.

माझं सुरुवातीचं लेखन विविध नियतकालिकांतून प्रकाशित होऊ लागलं, त्या वेळी मी अभियांत्रिकी पदविकेसाठी गारगोटीला शिकत होतो. आजचे आघाडीचे लेखक राजन गवस तेव्हा गारगोटीतच नोकरीत होते. गवस सरांचा आणि माझा पूर्वीचा थोडा परिचय होताच. त्यामुळे अधूनमधून मी त्यांच्याकडे जात असे. एकदा अशाच गप्पांच्या ओघात सर मला म्हणाले, ‘‘तू ज्या मुस्लिम समाजातून आला आहेस, त्या समाजाचं जीवनचित्रण मराठीत फारसं झालेलं नाही. अन् हे समाजजीवन मुस्लिम जीवनाचा थेट अनुभव असलेल्या तुझ्यासारख्यानं आग्रहपूर्वक मांडायला हवं. वरवरच्या वास्तवाला मांडण्यापेक्षा थोडं अधिक खोलात जाऊन तुझ्या प्रत्यक्ष जगण्याला भिडण्याचा प्रयत्न कर.’’ त्याबरोबरच मुस्लिम मानसिकतेविषयी मराठीत जे थोडंफार लेखन झालं आहे, त्या लेखनाचे संदर्भही सरांनी मला दिले.

मी माझ्या लेखनाविषयी पहिल्यांदाच अधिक गंभीर झालो. अंतर्मुख होऊन विचार करू लागलो. ‘एक लिहिणारा’ म्हणून माझ्यावरील जबाबदारीचे भान मला येऊ लागलं. हळूहळू त्याचं दडपणही जाणवू लागलं. सुरुवातीला असणारा लेखनाचा वेग आता बराच मंदावला. उगाच भारंभार लिहिण्यापेक्षा थोडंच पण कसदार लिहावं, असं वाटू लागलं. आपले अनुभव तोकडे आहेत. वाचन-चिंतन कमी पडत आहे याची जाणीव होऊ लागली. मी माझ्या भोवतालाचा बारकाईनं शोध घेऊ लागलो. माझ्या समोरची माणसं वाचू लागलो.

व्यापक अर्थानं लिहिणं ही गोष्टच मुळी तापदायक आणि थकविणारी गोष्ट आहे. इतकं स्वत:ला थकवून, तावून, सुलाखून केलेल्या या लेखन-उद्योगामुळे काय साधलं जाणार आहे? आपण लिहितो वगैरे याचा उपयोग काय? जगण्यातली गुंतागुंत समजून घेताना अशा प्रश्नांनी मला अधिकच भंडावून टाकलं आहे. अशा प्रश्नांची अजूनही मला नेमकेपणानं उत्तरं मिळालेली नाहीत. जगताना काही गोष्टी करण्यासाठीच एक कुठूनतरी दबाव येत असतो. लिहिण्यासाठीही असाच एखादा दबाव कार्यरत असावा, अशा वेळी लिहिण्या-बिहिण्याची कृती करणं-न करणं यांतील हिशेब कुचकामी असतात. ती कृती करत राहणं हाच त्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग राहतो. मनाला वेढून राहिलेल्या अस्वस्थतेचं ओझं कमी करण्यासाठी आपण वेळोवेळी लिहिणं हाच मार्ग मला उपयुक्त वाटतो.

साधारणत: 1987 ते 2021 या काळात माझ्या एकूण 75 ते 80 कथा वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रकाशित झाल्या. त्यातल्या फारच थोड्या पुस्तकरूपानं छापल्या गेल्या. आतापर्यंत माझे ‘आभाळ’ (1990), ‘बेबस’ (2013) आणि ‘पायाड’ (2020) असे तीन कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘आरशातल्या आरशात’ हा कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. इतर कथांचीही नीट व्यवस्था लागली तर अजून किमान दोन तरी कथासंग्रह नावापुढे लागतील. अजूनही कथा हा प्रकार हाताळणे सुरू आहेच. व्यक्त होण्यासाठी कथा हा मला उपयुक्त प्रकार वाटत आला आहे. जगण्याचे काही-एक आकलन मांडण्यासाठीचा उचित अवकाश कथेतही असतो, अशी माझी स्पष्ट धारणा आहे.

तीन दशकांहून अधिक काळ मी कथा हा प्रकार निष्ठेनं हाताळला आहे. मराठी कथेत मी मोलाची काही भर टाकली आहे काय? मी माझ्या कथालेखनातून वास्तवाला भिडण्यात यशस्वी झालो आहे काय? अशा प्रश्नांची उत्तरं मी कसा देणार? ती मला देता येणार नाहीत. एकदा लिहून झालं की, ते लिहिणाऱ्याचं राहतं कुठे? मागणी तसा हुकमी पुरवठा करण्याचं तंत्र मला कधीच अवगत झालं नाही किंवा ठरवून एखाद्या विषयावरही लिहिणं मला जमलं नाही. जगताना प्रत्येकाला छळणारं, ताप देणारं काही प्रश्न असतात. व्यक्तिपरत्वे हे प्रश्न वेगवेगळे असणार. प्रत्येक व्यक्तीची जगण्याची रीत, तिचं आकलन, तिचा स्वभाव अशा अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतात.

कथा सुचण्याचे किंवा कथेची बीजधारणा होण्याचे प्रसंग खूपच विलक्षण असतात. माझ्या कथेच्या अनुषंगानं मला एक-दोन उदाहरणं समोर ठेवता येतील. माझ्या ‘बेबस’ या कथासंग्रहात अगदी पहिलीच ‘शापित’ या शीर्षकाची एक कथा आहे. ‘शापित’ या कथेसाठी माझ्या आयुष्यात घडलेल्या दोन घटनांचा सहजस्पर्श आहे. पहिली घटना म्हणजे- कवड्या टाकून भविष्यवाणी जगणाऱ्या एका रमलविद्या जाणकार पंडिताला माझ्या एका स्नेहीमित्रानं त्याच्या घरी बोलावलं होतं. हा पंडित खूप लांबून म्हणजे कर्नाटकातील उडपी-कारकल भागातून आलेला होता. मूठभर कवड्या टाकून, त्यांच्या मांडामांडीतून हा पंडित आयुष्यात घडणाऱ्या किचकट प्रश्नांची उत्तरं शोधायचा, त्यावर भविष्यवाणी करायचा. या पंडिताची सहजासहजी ‘अपॉइंटमेंट मिळत नसे, इतका तो व्यस्त असायचा म्हणे. मला त्याच्या त्या भविष्यवाणीविषयी खूपच उत्सुकता होती. त्या उत्सुकतेपोटी मी माझ्या मित्राच्या घरी गेलो. एका प्रश्नातून दुसरा प्रश्न, दुसऱ्यातून तिसरा अशा प्रश्नांच्या मालिकांतून हा पंडित कवड्या पसरून, त्यातून काही गणितं सोडवत शंकासमाधान करायचा. 

आता अशा भविष्यावर माझ्या मित्रमहोदयांचा खूपच भरोसा होता. मी त्या पंडिताची देहबोली, समोरच्या व्यक्तींच्या प्रश्नाला उत्तरं देण्यातली त्याची तत्परता, प्रश्नाच्या पार मुळापर्यंत जाण्यासाठीची चिकाटी आणि सुचवलेली उपाययोजना अशा गोष्टी फारच बारकाईनं निरखत होतो, तर दुसऱ्या बाजूला वाट्याला आलेल्या परिस्थितीमुळे हतबल झालेल्या माझ्या मित्राची दयनीय अवस्थाही बघत होतो. 

या कथेच्या निर्मितिप्रक्रियेत कारणीभूत ठरलेली दुसरी घटना अशी- माझ्या एका घनिष्ठ मित्राला एका नव्यानेच डेव्हलप होत असलेल्या कॉलनीमध्ये घरबांधणीसाठी प्लॉट घ्यायचा होता. त्याच्या आग्रहावरून मी ती जागा बघायला गेलो. हा मित्र मितभाषी होता. तेव्हा मीच पुढाकार घेऊन प्लॉट डेव्हलपरशी व्यावरहारिक बोलणी करत होतो. त्यामुळे प्लॉट मलाच पाहिजे असणार, असा त्या डेव्हपलपरचा समज बनला. बोलणी अंतिम टप्प्यात आली असताना, त्यानं मला माझं नाव विचारलं. मी माझं खरं नाव सांगितलं. मी ‘मुस्लिम’ आहे, असं समजताच त्यानं ‘‘हा प्लॉट आमच्या नातेवाइकानं फायनल केला आहे. मी नंतर कळवतो,’’ असे काहीबाही आढेवेढे घ्यायला सुरुवात केली. एकंदरीत हा प्रकार लक्षात आल्यावर मी हिरमुसून गप्प झालो.

खरं तर प्लॉट मला घ्यायचाच नव्हता. तो मित्राला घ्यायचा होता, पण हा व्यवहार मला माझ्यासाठी अत्यंत अपमानास्पद वाटला. माझ्या मित्राच्याही डोक्यात सर्व गोष्टी आल्या होत्या. त्यानं त्या डेव्हलपरला चांगलंच फैलावर घेतलं. ‘‘जात-धर्म अशा गोष्टींशी इतका चिकटून असलेल्या माणसाशी मला व्यवहारच करायचा नाही,’’ असं त्या मित्रानं ताडकन सुनावून टाकलं. या दोन्ही घटना भिन्न पार्श्वभूमीवरच्या. दोन्ही घटनांतील पात्रे, तपशील यांचा एकमेकींशी तसा काहीच संबंध नाही. कथा लिहिताना आपल्याला काय लिहायचं आहे हे  सुस्पष्टपणे डोक्यात नव्हतंच. जसं लिहायला बसलो, तशा मनातल्या आत दडून बसलेल्या अनेक गोष्टी उचंबळून बाहेर येतात. आपल्यासाठीचा योग्य अवकाश शोधतात आणि त्यातून एक सूत्र आपोआप गुंफत जातं, असा माझा अनुभव आहे. 

रंगनाथ पठारे या माझ्या आवडत्या लेखकानं एके ठिकाणी नोंदवलं आहे- ‘‘आपण सारे जण ज्या प्रकारचं सांस्कृतिक संचित घेऊन घडत जातो, वा घडताना काही स्वीकारत जातो, ते लिहिताना मनाच्या गाभ्याशी असतं. आपण पाहतो त्यातलं पुष्कळ आपल्याला वाटतं तसं असत नाही. कधी कधी ते असतं, तसं का असतं या संबंधी काही प्रश्न आपल्या मनात वस्तीला असतात आणि उचित संधी येताच ते प्रकट होतात. हे करताना आपलं वर्तमान व त्याचं-आपलं आकलन एका पद्धतीनं आपण करतो आणि त्यातून घटिताचा अर्थ शोधतो. प्रश्नांची उत्तरं मिळतातच असं नाही; पण मनाच्या पातळीवर एक गंभीर प्रवास होतो.’’ माझ्या ‘शापित’ या कथेचं कथाबीज वर नोंदवलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत होतं. 

कथाबीज हे सुचण्यापुरतं, निर्मितिकेंद्र निर्माण करण्यापुरतं आणि एकूण मांडणीचा रोख नियंत्रित करण्यापुरतं त्याच्या अस्तित्वाची गरज असते. या कथाबीजाला आकार देऊन त्यातून प्रकटणारा ‘कलानुभव’ अधिक महत्त्वाचा असतो. प्रत्यक्ष कथा लिहिताना मूळ अनुभवलेल्या घटनांतील प्रसंगांची, पात्रांची, त्यातील घटनांच्या क्रमातील आपोआप आवश्यकतेनुसार उलटापालट होत जाते. ‘शापित’ कथेतील निवेदक हा प्रत्यक्ष अनुभव घेणारा ‘मी’ नाही. प्लॉट घेण्यासाठी इच्छुक असलेला प्रत्यक्षातील माझा मित्र हा कथेचा निवेदक आणि मुख्य पात्र बनला आहे. त्या अनुषंगानं त्या कथेत वावरणारी पात्रं, भाषा, तपशील सर्वच गोष्टी बदलून गेल्या आहेत. घरातील स्वास्थ्य बिघडलं म्हणून अंधश्रद्धेचा आधार घेणाऱ्या कथानायकाचं मतपरिवर्तन होऊन तो मानसिकदृष्ट्या सबल बनतो या टप्प्यावर ही कथा येऊन थांबते. प्रत्यक्षात आपण पाहिलेलं किंवा अनुभवलेलं लेखनात इतकं वेगळं होऊन जातं, की त्याचा तथाकथित प्रत्यक्षाशी जणू काही संबंधच उरत नाही! लिहिताना सुट्या सुट्या गोष्टींचीही एक सुसंगत घटना आकारास येत जाते आणि त्यातून आपोआपच एक ‘कल्पित वास्तव’ उभं राहत जातं. अर्थात हे सगळं नीटपणे ठरवून किंवा विचारपूर्वक होतं, असं नाही. स्वाभाविकपणेच होत जातं. लेखक अशा गोष्टींना अडवू शकत नाही. कथालेखन वरवर घटनेसंबंधी असलं, तरी खरं तर घटनेच्या निमित्ताने लिहिणारा स्वत:चं एखादं विधान शोधण्याचा प्रयत्न करीत असतो.

मला ‘कोंडी’ ही कथा लिहिण्यासाठीही असंच एक छोटंसं कथाबीज कारणीभूत ठरलं. माझ्या जवळच्या नातेवाइकाचा एक मित्र - ज्याच्याशी जुजबी ओळख होती - एकदा आपल्या आठ-दहा वर्षांच्या मुलीला घेऊन अचानकपणे घरी आला. त्याची बायको नुकतीच वारली होती. तो आमच्या समोर खूप रडला. त्याला त्याच्या दोन-तीनशे किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या त्याच्या मूळ गावी जाऊन यायचं होतं. त्यासाठी दोन-चार दिवस त्याच्या मुलीला आम्ही सांभाळावं अशी त्यानं विनंती केली. खरं तर जुजबी ओळखीच्या आधारावर त्यानं आमच्यावर एवढा कसा विश्वास टाकला, हे समजण्याच्या पलीकडचं होतं. त्यासाठी त्यानं आमच्या घराची निवड का केली? तो आपल्या मुलीला दुसरीकडे, अगदी ज्यांचा तो मित्र होता, त्या आमच्या नातेवाइकाकडे ठेवू शकला असता की? आम्हांला मधे ओढायचं काही कारण नव्हतं. पण एकंदरीत तो प्रसंग खूपच ‘भावविवश’ होता.

तो मुलीला आमच्याकडे सोडून गावी निघून गेला, पण पुढे आमच्या समोर बाका प्रसंग उभा राहिला. चारचे पाच, पाचाचे सहा, आठ-दहा दिवस झाले, तरी तो परत येईनाच. त्याचा काहीच पत्ता नाही. ही काय आफत ओढवून घेतली? चौकशी तरी कुणाकडे करायची? नातेवाइकाला संपर्क केला, तर उलट तोच आमच्या वेडपटपणाला नावे ठेवू लागला. ‘‘तुम्ही कशाला अंगाला लावून घेतलंत? मला मधे गोवू नका. तुमचं तुम्हीच निस्तरा.’’ असं बोलू लागला. मला काहीच सुचेना. घरच्यांचाही धीर खचला. पण मुलगी मात्र मजेत होती. ती हसत-खेळत तिच्या जगात मस्त होती. तिचं मजेत असणं हे पुन्हा आमच्यासाठी त्रासदायक होत होतं. घरातलं वातावरण पार बिघडलं होतं.

दहा-बारा दिवसांनी आमच्या सुदैवानं तो उगवला आणि आमचा जीव भांड्यात पडला. तो मुलीला घेऊन गेला. जाताना मी त्याला तडातडा खूप बोललो, त्या वेळी ती मुलगी बापाला घट्ट बिलगली होती. तिच्या डोळ्यांत आसवं होती. इतक्या दिवसांत आम्ही तिला रडताना पहिल्यांदाच बघत होतो. तिच्या डोळ्यांत कसलेतरी अनामिक भाव होते. खूप दिवस ते डोळे नजरेसमोरून हलत नव्हते. एक प्रकारे अस्वस्थ करणारा, आवाहन देणारा कथात्मक अनुभवाचा तुकडा माझ्यासमोर उभा रहिला होता. मी लिहिण्यासाठी धडपडत होतो. बेचैन होत होतो. पण कागदावर काहीच उमटत नव्हतं. फक्त त्या मुलीचे रोखून धरलेले डोळे मला कागदात दिसायचे. मी दचकून जायचो. मीही इरेला पेटून मांडामांड करण्यासाठी धडपडत होतो. लिहिण्यासाठी ‘व्यूहरचना’ करीत होतो. फार चमत्कारिक होतं सगळं!

या कथेनं माझा अक्षरश: दम काढला. लेखक म्हणून माझी पुरती ‘कोंडी’ झाल्यागत वाटत होतं. वेगवेगळ्या अंगांनी भिडत काहीतरी कागदावर उमटत गेलं. मी कथेचं शीर्षक ‘कोंडी’ असंच ठेवलं. लिहिणं सुरू झालं आणि एकदम वेगानं सुरू झालं. पुढे कुठं अडलं नाही. काहीतरी पुढं सरकरण्याचा रस्ता दिसत राहिला आणि चालत गेलो. इतकं सोपं होतं. लिहून झाल्यावर लक्षात आलं- आपल्याला हे कुठं लिहायचं होतं? हे वेगळंच काही लिहून झालं!

माझ्या ‘आभाळ’ या कथासंग्रहातील सर्व कथांमधून जाणवणारं एकच एक असं सूत्र दिसत नाही. या कथा माझ्या उमेदीच्या ऐन टप्प्यांवरील कथा आहेत. कथा संग्रहरूपाने प्रकाशित करताना किमान काही-एक सूत्र धरून कथांचा अंतर्भाव करावा, याची मला कल्पनाच नव्हती. पहिला कथासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर तब्बल तेवीस वर्षांनंतर माझा दुसरा कथासंग्रह ‘बेबस’ प्रकाशित झाला. ‘बेबस’मधे मात्र मुस्लिम समाजाचं जीवनचित्रण, मानसिकता आणि व्यवस्थेनं पुरती कोंडी केलेली माणसं प्रकटली आहेत. कायम गुदमरून टाकणाऱ्या पर्यावरणात जगण्याचा अवकाश शोधणारी माणसं ही कायम माझ्या आस्थेच्या केंद्रस्थानी राहिली आहेत. या संग्रहातील कथेत मुसलमानांच्या बोली असलेल्या ‘दखनी’ बोलीचा वापर मी केला. असा वापर मी ‘रहबर’ या कादंबरीतही केला होता. भाषेचा असा वापर अनेकांना आवडला. पुढे माझा ‘पायाड’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला.

या संग्रहातल्या कथांमध्ये विशेषत: बांधकाम व्यवसायात पोटापाण्यासाठी ढोरमेहनतीची कामं करणारे गवंडी, सुतार, पेंटर, प्लंबर, सेंट्रिंग काम करणारे मजूर, खुदाईकाम करणारे, बांधकाम कंत्राटदार अशा लोकांचं जग मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पैसा’ हा बांधकाम क्षेत्राच्या केंद्रस्थानी असला, तरी हे विश्व साकार करणाऱ्या कारागिरांच्या जीवनातील समस्या दिवसेंदिवस अधिकच जटिल होत आहेत. भूक शमनाच्या ओढगस्तीत बेदखल होणारी माणसं हे ‘पायाड’चं सूत्र आहे. लेखक-प्रकाशकांचं जग, ग्रंथव्यवहार, साहित्याची निर्मितिप्रक्रिया, पुरस्कारांतील राजकारण, संधिसाधूपणा, खोटेपणा, दांभिकपणा अशा विषयांवरील अकरा कथांचा ‘आरशातल्या आरशात’हा संग्रह आता एक-दोन महिन्यांत प्रकाशित होईल.

माझ्या कथालेखनाच्या अनुषंगानं इथं जेवढा व्यक्त झालोय, त्यातून माझी एकूण भूमिका पुरेशी स्पष्ट झालीय, असं मला वाटतं. त्यामुळे यापेक्षा नवं काही सापडेपर्यंत आपण थांबणंच बरं, नाही का?

- रफीक सूरज
rafiqsuraj70@gmail.com


कथालेखनाचा अनुभव सांगणारा इंदुमती जोंधळे यांचा हा लेखही वाचा 

माणूस म्हणून जगण्यासाठीची अटकळ कथासूत्रात असेल, तर ती कथा अधिक वेधक बनते!


वाचा मनस्विनी लता रवींद्र यांचे लेखन विषयक चिंतन करणारे दोन लेख 

...आणि मी कथा लिहायला लागले !

...मग मी का लिहिते?

Tags: रफिक सूरज कथा कथालेखन लेखन प्रक्रिया writing rafiq suraj story writing writing process विशेष Vishesh रफीक सुरज Load More Tags

Comments:

मांतेश हिरेमठ

सर, आपल्या कथानिर्मितीचे अनुभव अस्सल आहेत . खूपच सुरेख मांडणी .

Add Comment